सारकाण्ड

यात्राकाण्ड

यागकाण्ड

विलासकाण्ड

जन्मकाण्ड

विवाहकाण्ड

राज्यकाण्ड (पूर्वार्ध)

राज्यकाण्ड (उत्तरार्ध)

मनोहरकाण्ड

पूर्णकाण्ड

आनंदरामायण


आनंद रामायण हा ग्रंथ मी श्री पाण्डेय रामतेज शास्त्री यांनी संपादित केलेल्या ग्रंथावरून टंकलेखित केला आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्या ग्रंथात दिलेली प्रस्तावनाच मी इथे देत आहे.

या पवित्र भारतभूमिवर जितके म्हणून कवि झाले, ज्यांच्या बुद्धिमध्ये प्रतिभा जागृत झाली, ज्यांच्या लेखणीत ओज उत्पन्न झाले आणि ज्यांच्या जाणिवेत काही विलक्षणता आली, त्या सर्वांनी आपापल्या कुवतीप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम आनंदकंद राघवेंद्र श्रीरामचंद्रांच्या यशोगानांत आपल्या वैचित्र्यपूर्ण कलेचा चमत्कार दाखविला आहे. असे करून भगवान् श्रीरामांच्या अनपायिनी कीर्तिबरोबर ते महामनस्वी कविही कायमचे अमर झाले आहेत. विकराळ काळ अहर्निश पवित्रे बदलत असूनही ते महामननशील कवि सूर्य-चंद्राप्रमाणे भक्तांच्या हृदयाकाशांत चमकत राहतात. या जगतात रामनामाचे वर्णन करणारी जितकी रामायणे प्रस्तुत आहेत ती सर्व आपापल्या पद्धतीने भगवान् कोशलकिशोराचे गुणगान करून अत्यंत भाविक भक्तांना आकर्षित करून घेत असतात. यात फरक केवळ् इतकाच आहे की काही कविपुंगव आदिकवि वाल्मीकि यांच्याप्रमाणे भगवान् कौसल्यानंदनास एका राजकुमाराच्या स्वरूपात आपल्या समोर सादर करतात आणि त्यांचे परमोज्ज्वल चरित्र आपल्या अनुपम काव्यकौशल्याने सजवून महत्तेच्या परमबिंदूपर्यंत पोहोचवितात. काही लोकमान्य, लोकपूज्य गोस्वामी तुलसीदासांसारखे अनन्य भक्त कवि असतात ते आपल्या भक्तिरसाच्या मंदाकिनीत बुड्या मारीत असतां भगवान् श्रीरामांना केवळ मर्यादा पुरुषोत्तमच नाही तर अखिल भुवन मंडलेश्वर, सचराचर जीवांचा अधीश्वर संबोधूनही तृप्त होत नाहीत. परंतु आमच्या आनंदरामायणाची रचना करणार्‍या कविची शैलीच अपूर्व आहे. या दोन्ही भावांची ते चातुर्याने जपणूक करीत अबाधरूपाने आणि अगदी सहजतेने श्रीरामचंद्रांच्या पावन चरित्राचे वर्णन करीत अग्रेसर होतात. ते आपल्या ग्रंथात कंटाळवाण्या अत्युक्तियुक्त घटनांचा समावेश करत नाहीत आणि तरीही चरित्रातील महत्त्वपूर्ण प्रसंगास सोडत नाहीत. त्यांचा उल्लेख अवश्य करतातच.

अधिकांश रामायणकार भगवान् राघवेंद्रांच्या जन्मापासून आपल्या कथावस्तूचा आरंभ करतात आणि विभिन्न कथांचे वर्णन करीत रामविजय करवून त्यांना अयोध्येच्या राजगादीवर बसवून आणि बालरूपधारी श्रीरामाला राजारामाच्या स्वरूपांत पाहून दूर सारतात. तेथेच त्यांची कथा समाप्त होते. परंतु प्रतिभासंपन्न आनंदरामायणकारांनी इतर अनेक कवींची सर्व पुंजी आपल्या ’सारकाण्ड’ नावाच्या एका काण्डात सांगून टाकली. त्यानंतर ते भगवंतांच्या अशा चरित्राचे वर्णन करतात जिथे कोणत्याही कविची दृष्टी पोहोचलीच नाही. ते भगवंतास भारतवर्षातील सर्व तीर्थांची यात्रा घडवितात. अनेकानेक अश्वमेध यज्ञ संपन्न करवितात. श्रीराम-लक्ष्मणादिकांच्या अनेकानेक संततिंच्या जन्माचे वर्णन करतात. नंतर अनेकानेक स्वयंवरात त्यांचे विवाह करवितात. भगवान् रामचंद्र आणि महाराणी सीता यांच्या सुंदर लीलांचे दिग्दर्शन करवितात, ज्याची कोणी कधी कल्पनाही केली नसेल. भगवंतांच्या दिग्विजयाची गाथा आणि अद्‍भुत भूगोलवर्णन हे तर या महाग्रंथाचा अमूल्य निधिच आहे. या शिवाय भगवंतांच्या निरनिराळ्या स्तुति, विविध अनुष्ठाने, अनेक प्रकारच्या रामलिंगतोभद्रांच्या रचनांचे प्रकार आदि असे विविध विषयांचे वर्णन यात करतात. असे हे सर्व पाहून सर्वथा नीरस मानवमनातही भक्तिमय त्रिपथ गंगेची अलौकिक धारा उचंबळून येते. हे सर्व होत असूनही या संपूर्ण ग्रंथात या बहुमूल्य रामायणाचा वास्तविक रचयिता कोण आहे याचा निर्देश आढळत नाही. जरी प्रत्येक सर्गाच्या अखेरीस ’इति आनंदरामायणे वाल्मीकिये’ असे संकल्पवाक्य लिहिलेले आढळते तरी लघुरामायणाखेरीज महर्षि वाल्मीकिकृत रामायणाचा कुठलाही अंश दृष्टिगोचर होत नाही. या रामायणात बहुतेक गोष्टी अशा आढळून येतात, काही वर्णने अशी दिसतात की जी वाल्मीकि रामायणाहून सर्वथा विलक्षण आहेत. असो. जोपर्यंत कोण्या धुरंधर विद्वान संशोधकास या ग्रंथाच्या ग्रंथकाराचा शोध लावण्यात यश येत नाही तो पर्यंत प्रस्तुत महाग्रंथाला महर्षि वाल्मीकिंच्या शतकोटी श्लोकात्मक रचनांच्या अंतर्गत मानून आपल्या श्रद्धांकुरावर आनंदरामायणातील आनंदमयी कथांच्या पावन गंगाजलाचे सिंचन करणेच उपयुक्त होईल.

श्री शास्त्री आपल्या प्रस्तावनेत शेवटी म्हणतात - या प्रस्तुतीत काही त्रुटी आढळली तर विधिचे विधान समजून आमच्या कमकुवतपणाची आपल्या सहज दयाळू स्वभावानुसार क्षमा करावी. कारण -
दृष्टं किमपि लोकेऽस्मिन् न निर्दोषं न निर्गुणम् ।
तस्मात् दोषान् परित्यज्य गृह्णन्तु गुणान्बुधाः ॥GO TOP