श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतुर्नवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राक्षसीनां विलापः -
राक्षसींचा विलाप -
तानि नाग सहस्राणि सारोहाणां च वाजिनाम् ।
रथानां त्वग्निवर्णानां सध्वजानां सहस्रशः ॥ १ ॥

राक्षसानां सहस्राणि गदापरिघयोधिनाम् ।
काञ्चनध्वजचित्राणां शूराणां कामरूपिणाम् ॥ २ ॥

निहतानि शरैर्दीप्तैः तप्तकाञ्चनभूषणैः ।
रावणेन प्रयुक्तानि रामेणाक्लिष्टकर्मणा ॥ ३ ॥

दृष्ट्‍वा श्रुत्वा च सम्भ्रान्ता हतशेषा निशाचराः ।
राक्षसीश्च समागम्य दीनाश्चिन्तापरिप्लुताः ॥ ४ ॥
अनायासेच महान्‌ पराक्रम करणार्‍या भगवान्‌ श्रीरामांकडून त्यांच्या तप्त सुवर्ण विभूषित चमकदार बाणांनी रावणाने धाडलेले हजारो हत्ती, स्वारांसहित हजारो घोडे, अग्निसमान देदिप्यमान्‌ तसेच ध्वजांनी सुशोभित हजारो रथ, तसेच इच्छेनुसार रूप धारण करणारे, सुवर्णमय ध्वजामुळे विचित्र शोभा प्राप्त झालेले आणि गदा-परिघांनी युद्ध करणारे हजारो शूरवीर राक्षस मारले गेले हे पाहून - ऐकून, युद्धात वाचलेले निशाचर घाबरून गेले आणि लंकेमध्ये जाऊन राक्षसींना भेटून खूपच दुःखी आणि चिंतामग्न झाले. ॥१-४॥
विधवा हतपुत्राश्च क्रोशन्त्यो हतबान्धवाः ।
राक्षस्यः सह सङ्‌गम्य दुःखार्ताः पर्यदेवयन् ॥ ५ ॥
ज्यांचे पति, पुत्र आणि बंधु-बांधव मारले गेले होते त्या अनाथ राक्षसी झुंडीच्या झंडीने एकत्र होऊन दुःखाने पीडित होऊन विलाप करू लागल्या. ॥५॥
कथं शूर्पणखा वृद्धा कराला निर्णतोदरी ।
आससाद वने रामं कन्दर्पसमरूपिणम् ॥ ६ ॥
हाय जिचे पोट घुसलेले आहे आणि आकार विकराळ आहे ती म्हातारी शूर्पणखा वनात कामदेवासारखे रूप असलेले श्रीरामापाशी कामभावाने कशी गेली - कशा प्रकारे जाण्याचे साहस करू शकली ? ॥६॥
सुकुमारं महासत्त्वं सर्वभूतहिते रतम् ।
तं दृष्ट्‍वा लोकवध्या सा हीनरूपा प्रकामिता ॥ ७ ॥
जे भगवान्‌ राम सुकुमार आणि अत्यंत बलशाली आहेत तसेच संपूर्ण प्राण्यांच्या हितात संलग्न राहातात, त्यांना पाहून ती कुरूप राक्षसी त्यांच्या प्रति कामभावनेने युक्त झाली - हे कसे दुःसाहस आहे ? ही दुष्टा तर सर्वांच्या द्वारा मारून टाकली जाण्यासच योग्य आहे. ॥७॥
कथं सर्वगुणैर्हीना गुणवन्तं महौजसम् ।
सुमुखं दुर्मुखी रामं कामयामास राक्षसी ॥ ८ ॥
कोठे सर्वगुण संपन्न, महान बलशाली तसेच सुंदर मुख असलेले श्रीराम, आणि कोठे ती सर्वगुणहीन, दुर्मुखी राक्षसी ! तिने कशी त्यांची कामना केली ? ॥८॥
जनस्यास्याल्पभाग्यत्वाद् वलिनी श्वेतमूर्धजा ।
अकार्यमपहास्यं च सर्वलोकविगर्हितम् ॥ ९ ॥

राक्षसानां विनाशाय दूषणस्य खरस्य च ।
चकाराप्रतिरूपा सा राघवस्य प्रधर्षणम् ॥ १० ॥
जिच्या सर्वांगावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, डोक्याचे केस पिकले आहेत तसेच जी कुठल्याही दृष्टीने श्रीरामांना योग्य नाही आहे, त्या दुष्टेने आम्हा लंकावासीयांच्या दुर्भाग्यानेच खर, दूषण तथा अन्य राक्षसांच्या विनाशासाठी श्रीरामांचे घर्षण केले होते. (त्यांना आपल्या स्पर्शाने दूषित करण्याचा प्रयत्‍न केला होता.) ॥९-१०॥
तन्निमित्तमिदं वैरं रावणेन कृतं महत् ।
वधाय सीता साऽऽनीता दशग्रीवेण रक्षसा ॥ ११ ॥
तिच्यामुळेच दशमुख राक्षस रावणाने हे महान्‌ वैर मांडले आणि आपल्या तसेच राक्षसकुळाच्या वधासाठी त्याने सीतेला हरण करून आणले. ॥११॥
न च सीतां दशग्रीवः प्राप्नोति जनकात्मजाम् ।
बद्धं बलवता वैरं अक्षयं राघवेण च ॥ १२ ॥
दशमुख रावण जनकनंदिनी सीतेला कधीही प्राप्त करू शकणार नाही, परंतु त्याने बलवान्‌ राघवांशी अक्षय वैर बांधले आहे. ॥१२॥
वैदेहीं प्रार्थयानं तं विराधं प्रेक्ष्य राक्षसम् ।
हतमेकेन रामेण पर्याप्तं तन्निदर्शनम् ॥ १३ ॥
राक्षस विराध वैदेही सीतेला प्राप्त करू इच्छित होता, हे पाहून रामांनी एकाच बाणाने त्याचा अंत करून टाकला. तो एकच दृष्टांत त्यांची अजेय शक्ति समजण्यासाठी पुरेसा आहे. ॥१३॥
चतुर्दश सहस्राणि रक्षसां भीमकर्मणाम् ।
निहतानि जनस्थाने शरैरग्निशिखोपमैः ॥ १४ ॥

खरश्च निहतः सङ्‌ख्ये दूषणस्त्रिशिरास्तथा ।
शरैरादित्यसङ्‌काशैः पर्याप्तं तन्निदर्शनम् ॥ १५ ॥
जनस्थानात भयानक कर्म करणार्‍या चौदा हजार राक्षसांना श्रीरामांनी अग्निशिखे प्रमाणे तेजस्वी बाणांच्या द्वारे मारून टाकले होते आणि सूर्याप्रमाणे प्रकाशमान सायकांनी समरांगणात खर, दूषण तसेच त्रिशिराचाही संहार करून टाकला होता, हा त्यांची अजेयता समजण्यासाठी पर्याप्त दृष्टांत होता. ॥१४-१५॥
हतो योजनबाहुश्च कबन्धो रुधिराशनः ।
क्रोधान्नादं नदन् सोऽथ पर्याप्तं तन्निदर्शनम् ॥ १६ ॥
रक्तभोजी राक्षस कबंधाचे बाहु एकेक योजन लांब होते आणि तो क्रोधवश फार मोठ मोठ्‍याने सिंहनाद करत होता तरीही तो श्रीरामांच्या हाताने मारला गेला. तो दृष्टांतही श्रीरामांच्या दुर्जय पराक्रमाचे ज्ञान करविण्यासाठी पर्याप्त होता. ॥१६॥
जघान बलिनं रामः सहस्रनयनात्मजम् ।
वालिनं मेरुसङ्‌काशं पर्याप्तं तन्निदर्शनम् ॥ १७ ॥
मेरूपर्वतासमान महाकाय बलवान्‌ इंद्रकुमार वालीला श्रीरामांनी एकाच बाणाने ठार मारले. त्यांच्या शक्तिचा अंदाज लावण्यासाठी ते एक उदाहरणही पुरेसे आहे. ॥१७॥
ऋष्यमूके वसण्श्चैव दीनो भग्नमनोरथः ।
सुग्रीवः स्थापितो राज्यं पर्याप्तं तन्निदर्शनम् ॥ १८ ॥
सुग्रीव फारच दुःखी आणि निराश होऊन ऋष्यमूक पर्वतावर निवास करत होता, परंतु श्रीरामांनी त्यांना किष्किंधेच्या राजसिंहासनावर बसवले. त्यांचा प्रभाव जाणण्यास तो एकच दृष्टांत पर्याप्त आहे. ॥१८॥
धर्मार्थसहितं वाक्यं सर्वेषां रक्षसां हितम् ।
युक्तं विभीषणेनोक्तं मोहात् तस्य न रोचते ॥ १९ ॥

विभीषणवचः कुर्याद् यदि स्म धनदानुजः ।
श्मशानभूता दुःखार्ता नेयं लङ्‌का भविष्यति ॥ २० ॥
विभीषणानी जे धर्म आणि अर्थाने युक्त वचन सांगितले होते ते सर्व राक्षसांसाठी हितकर तसेच युक्तियुक्त होते, परंतु मोहवश रावणाला ते चांगले वाटले नाही. जर कुबेराचा लहान भाऊ रावण याने विभीषणाचे ऐकले असते तर ही लंकापुरी याप्रकारे दुःखाने पीडित होऊन स्मशान बनली नसती. ॥१९-२०॥
कुम्भकर्णं हतं श्रुत्वा राघवेण महाबलम् ।
अतिकायं च दुर्धर्षं लक्ष्मणेन हतं तदा ।
प्रियं चेन्द्रजितं पुत्रं रावणो नावबुध्यते ॥ २१ ॥
महाबली कुंभकर्ण श्रीरामांच्या हातून मारला गेला. दुःसह वीर अतिकाय याला लक्ष्मणांनी ठार मारले तसेच रावणाचा प्रिय पुत्र इंद्रजितही त्यांच्या हातूनच मारला गेला तथापि रावण भगवान्‌ श्रीरामांचा प्रभाव जाणत नाही आहे. ॥२१॥
मम पुत्रो मम भ्राता मम भर्ता रणे हतः ।
इत्येवं श्रूयते शब्दो राक्षसानां कुले कुले ॥ २२ ॥
हाय ! माझा मुलगा मारला गेला. माझ्या भावाला प्राण गमवावे लागले. रणभूमीवर माझे पतिदेव मारले गेले ! लंकेच्या घराघरांतून राक्षसींचे हे शब्द ऐकू येत होते. ॥२२॥
रथाश्चनागाश्च हतास्तत्र तत्र शतसहस्रशः ।
रणे रामेण शूरेण राक्षसाश्च पदातयः ॥ २३ ॥
समरांगणात शूरवीर श्रीरामांनी जेथे तेथे हजारो रथ, घोडे आणि हत्ती यांचा संहार करून टाकला आहे. पायदळ सैनिकांनाही मारून टाकले आहे. ॥२३॥
रुद्रो वा यदि वा विष्णुः मर्महेन्द्रो वा शतक्रतुः ।
हन्ति नो रामरूपेण यदि वा स्वयमन्तकः ॥ २४ ॥
असे वाटते आहे की श्रीरामांचे रूप धारण करून आम्हाला साक्षात्‌ भगवान्‌ रूद्रदेव, भगवान्‌ विष्णु, शतक्रतु इंद्र अथवा स्वतः यमराजच मारीत आहेत. ॥२४॥
हतप्रवीरा रामेण निराशा जीविते वयम् ।
अपश्यन्तो भयस्यान्तं अनाथा विलपामहे ॥ २५ ॥
आपले प्रमुख वीर श्रीरामांच्या हातून मारले गेले. आता आपण आपल्या जीवनासंबंधी निराश होऊ लागलो आहोत. आपल्याला या भयाचा शेवट दिसून येत नाही, म्हणून आपण अनाथाप्रमाणे विलाप करत आहोत. ॥२५॥
रामहस्ताद् दशग्रीवः शूरो दत्तमहावरः ।
इदं भयं महाघोरं समुत्पन्नं न बुध्यते ॥ २६ ॥
दशमुख रावण शूरवीर आहे. त्याला ब्रह्मदेवांनी महान्‌ वर दिला आहे. या घमेंडीमुळे हा श्रीरामांच्या हाताने प्राप्त झालेल्या या महाघोर भयाला समजू शकत नाही. ॥२६॥
तं न देवा न गन्धर्वा न पिशाचा न राक्षसाः ।
उपसृष्टं परित्रातुं शक्ता रामेण संयुगे ॥ २७ ॥
युद्धस्थळी श्रीराम ज्यांना मारण्यास हट्‍टास पेटतात त्याला देवता. गंधर्व, पिशाचे अथवा राक्षस कुणीही वाचवू शकत नाहीत. ॥२७॥
उत्पाताश्चापि दृश्यन्ते रावणस्य रणे रणे ।
कथयन्ति हि रामेण रावणस्य निबर्हणम् ॥ २८ ॥
रावणाच्या प्रत्येक युद्धात जे उत्पात दिसून येत आहेत, ते रामांच्या द्वारा रावणाच्या विनाशाचीच सूचना देत आहेत. ॥२८॥
पितामहेन प्रीतेन देवदानवराक्षसैः ।
रावणस्याभयं दत्तं मानुषेभ्यो न याचितम् ॥ २९ ॥
ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन रावणाला देवता, दानव तसेच राक्षसांकडून अभयदान दिलेले आहे. मनुष्यांकडून अभय प्राप्त होण्यासाठी याने याचनाच केली नव्हती. ॥२९॥
तदिदं मानुषं मन्ये प्राप्तं निस्संशयं भयम् ।
जीवितान्तकरं घोरं रक्षसां रावणस्य च ॥ ३० ॥
म्हणून मला वाटते आहे की हे निःसंशय मनुष्यांकडूनच घोर भय प्राप्त झालेले आहे, जे राक्षसांच्या आणि रावणाच्या जीवनाचा अंत करणारे आहे. ॥३०॥
पीड्यमानास्तु बलिना वरदानेन रक्षसा ।
दीप्तैस्तपोभिर्विबुधाः पितामहमपूजयन् ॥ ३१ ॥
बलवान्‌ राक्षस रावणाने आपली उद्दीप्त तपस्या तसेच वरदानाच्या प्रभावाने जेव्हा देवतांना पीडा दिली तेव्हा त्यांनी पितामह ब्रह्मदेवांची आराधना केली. ॥३१॥
देवतानां हितार्थाय महात्मा वै पितामहः ।
उवाच देवतास्तुष्ट इदं सर्वामहद्‌वचः ॥ ३२ ॥
यामुळे महात्मा ब्रह्मदेव संतुष्ट झाले आणि त्यांनी देवतांच्या हितासाठी त्या सर्वांना ही महत्वपूर्ण गोष्ट सांगितली. ॥३२॥
अद्यप्रभृति लोकांस्त्रीन् सर्वे दानवराक्षसाः ।
भयेन प्रभृता नित्यं विचरिष्यन्ति शाश्वतम् ॥ ३३ ॥
आजपासून समस्त दानव तसेच राक्षस भयाने युक्त होऊनच नित्य निरंतर तीन्ही लोकात विचरण करतील. ॥३३॥
दैवतैस्तु समागम्य सर्वैश्चेन्द्रपुरोगमैः ।
वृषध्वजस्त्रिपुरहा महादेवः प्रतोषितः ॥ ३४ ॥
तत्पश्चात्‌ इंद्र आदि संपूर्ण देवतांनी मिळून त्रिपुरनाशक वृषभध्वज महादेवांना संतुष्ट केले. ॥३४॥
प्रसन्नस्तु महादेवो देवानेतद् वचोऽब्रवीत् ।
उत्पत्स्यति हितार्थं वो नारी रक्षःक्षयावहा ॥ ३५ ॥
संतुष्ट झाल्यावर महादेवांनी देवतांना सांगितले - तुम्हा लोकांच्या हितासाठी एका दिव्य नारीचा आविर्भाव होईल, जी समस्त राक्षसांच्या विनाशास कारण होईल. ॥३५॥
एषा देवैः प्रयुक्ता तु क्षुद् यथा दानवान् पुरा ।
भक्षयिष्यति नः सर्वान् राक्षसघ्नी सरावणान् ॥ ३६ ॥
जसे पूर्वकल्पात देवतांच्या द्वारा प्रयुक्त झालेल्या क्षुधेने दानवांचे भक्षण केले होते, त्या प्रकारेच ही निशाचरनाशिनी सीता रावणासहित आम्हा सर्व लोकांना खाऊन टाकेल. ॥३६॥
रावणस्यापनीतेन दुर्विनीतस्य दुर्मतेः ।
अयं निष्टानको घोरः शोकेन समभिप्लुतः ॥ ३७ ॥
उद्दण्ड आणि दुर्बुद्धि रावणाच्या अन्यायाने हा शोकसंयुक्त घोर विनाश आम्हा सर्वांना प्राप्त झाला आहे. ॥३७॥
तं न पश्यामहे लोके यो नः शरणदो भवेत् ।
राघवेणोपसृष्टानां कालेनेव युगक्षये ॥ ३८ ॥
जगतात आम्हाला असा कोणी पुरूष दिसून येत नाही की जो महाप्रलयाच्या वेळच्या काळाप्रमाणे यासमयी राघवामुळे संकटात पडलेल्या आम्हा राक्षसीणींना अभय देऊ शकेल. ॥३८॥
नास्ति नः शरणं किंचिद् भये महति तिष्ठताम् ।
दवाग्निवेष्टितानां हि करेणूनां यथा वने ॥ ३९ ॥
आम्ही फार मोठ्‍या भयाच्या अवस्थेत स्थित आहोत. ज्याप्रमाणे वनात दावानलाने घेरलेल्या हत्तिणींना कोठेही प्राण वाचविण्यासाठी जागा मिळत नाही, त्याप्रमाणे आमच्यासाठी ही कोणी आश्रय नाही आहे. ॥३९॥
प्राप्तकालं कृतं तेन पौलस्त्येन महात्मना ।
यत एव भयं दृष्टं तमेव शरणं गतः ॥ ४० ॥
महात्मा पुलस्त्यनंदन विभीषणांनी समयोचित कार्य केले आहे. त्यांना ज्यांच्या पासून भय दिसून आले, त्यांनाच ते शरण गेले. ॥४०॥
इतीव सर्वा रजनीचरस्त्रियः
परस्परं सम्परिरभ्य बाहुभिः ।
विषेदुरार्ता भयभारपीडिता
विनेदुरुच्चैश्च तदा सुदारुणम् ॥ ४१ ॥
याप्रकारे निशाचरांच्या सार्‍या स्त्रिया एक दुसरीला आलिंगन देऊन, जवळ घेऊन आर्तभावाने आणि विषादाने ग्रस्त झाल्या आणि अत्यंत भयाने पीडित होऊन अतिभयंकर क्रंदन करू लागल्या. ॥४१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुर्नवतितमः सर्गः ॥ ९४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा चौर्‍याणवावा सर्ग पूरा झाला. ॥९४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP