[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। त्र्यशीतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतस्य वनयात्रा शृङ्‌गवेरपुरे रात्रिवासश्च -
भरतांची वनयात्रा आणि शृङ्‌‍गवेरपुरात रात्री निवास -
ततः समुत्थितः कल्यमास्थाय स्यन्दनोत्तमम् ।
प्रययौ भरतः शीघ्रं रामदर्शनकाम्यया ॥ १ ॥
त्यानंतर प्रातःकाली उठून भरतांनी उत्तम रथावर आरूढ होऊन रामदर्शनाच्या इच्छेने शीघ्रतापूर्वक प्रस्थान केले. ॥१॥
अग्रतः प्रययुस्तस्य सर्वे मन्त्रिपुरोहिताः ।
अधिरुह्य हयैर्युक्तान् रथान् सूर्यरथोपमान् ॥ २ ॥
त्यांच्या पुढे पुढे सर्व मंत्री आणि पुरोहित घोडे जोडलेल्या रथांवर बसून यात्रा करीत होते. ते रथ सूर्याच्या रथाप्रमाणे तेजस्वी दिसत होते. ॥२॥
नवनागसहस्राणि कल्पितानि यथाविधि ।
अन्वयुर्भरतं यान्तमिक्ष्वाकुकुलनन्दनम् ॥ ३ ॥
यात्रा करणार्‍या इक्ष्वाकु कुलनंदन भरतांच्या मागोमाग विधिपूर्वक सजविले गेलेले नऊ हजार हत्ती चालत होते. ॥३॥
षष्ठी रथसहस्राणि धन्विनो विविधायुधाः ।
अन्वयुर्भरतं यान्तं राजपुत्रं यशस्विनम् ॥ ४ ॥
यात्रापरायण यशस्वी राजकुमार भरताच्या पाठोपाठ साठ हजार रथ आणि नाना प्रकारची आयुघे धारण करणारे धनुर्धर योद्धेही जात होते. ॥४॥
शतं सहस्राण्यश्वानां समारूढानि राघवम् ।
अन्वयुर्भरतं यान्तं राजपुत्रं यशस्विनम् ॥ ५ ॥
त्याचप्रमाणे एक लाख घोडेस्वार त्या यशस्वी राघव राजकुमार भरताच्या यात्रेसमयी त्याचे अनुसरण करीत होते. ॥५॥
कैकेयी च सुमित्रा च कौसल्या च यशस्विनी ।
रामानयनसन्तुष्टा ययुर्यानेन भास्वता ॥ ६ ॥
कैकेयी, सुमित्रा आणि यशस्विनी कौसल्या देवीही श्रीरामांना परत आणण्यासाठी केल्या जाणार्‍या त्या यात्रेमुळे संतुष्ट होऊन तेजस्वी रथाद्वारे प्रस्थान करत्या झाल्या. ॥६॥
प्रयाताश्चार्यसङ्‌घाता रामं द्रष्टुं सलक्ष्मणम् ।
तस्यैव च कथाश्चित्राः कुर्वाणा हृष्टमानसाः ॥ ७ ॥
ब्राह्मण आदि आर्यांचे (त्रैवर्णिकांचे) समूह मनात अत्यंत हर्षित होऊन लक्ष्मणासहित श्रीरामांचे दर्शन करण्यासाठी, त्यांच्याच संबंधी विचित्र गोष्टी बोलत, ऐकत यात्रा करीत होते. ॥७॥
मेघश्यामं महाबाहुं स्थिरसत्त्वं दृढव्रतम् ।
कदा द्रक्ष्यामहे रामं जगतः शोकनाशनम् ॥ ८ ॥
’(ते आपसात म्हणत होते-) ’आपण द्रुढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणार्‍या तसेच संसाराचे दुःख दूर करणार्‍या, स्थितप्रज्ञ, श्यामवर्ण महाबाहु श्रीरामांचे केव्हां दर्शन करू ? ॥८॥
दृष्ट एव हि नः शोकमपनेष्यति राघवः ।
तमः सर्वस्य लोकस्य समुद्यन्निव भास्करः ॥ ९ ॥
’जसे सूर्याचा उदय होताच सर्व जगतातील अंधकार तो हरण करतो त्याच प्रकारे राघव आमच्या दृष्टीसमोर येताच आमचा सर्व शोक- संताप दूर करतील. ॥९॥
इत्येवं कथयन्तस्ते सम्प्रहृष्टाः कथाः शुभाः ।
परिष्वजानाश्चान्योन्यं ययुर्नागरिकास्तदा ॥ १० ॥
याप्रकारे गोष्टी बोलत आणि अत्यंत हर्षाने भरून एक दुसर्‍यास आलिंगन देत अयोध्येचे नागरिक त्यावेळी यात्रा करीत होते. ॥१०॥
ये च तत्रापरे सर्वे सम्मता ये च नैगमाः ।
रामं प्रति ययुर्हृष्टाः सर्वाः प्रकृतयः शुभाः ॥ ११ ॥
त्या नगरात जे दुसरे सन्मानित पुरूष होते, ते सर्व लोक तसेच व्यापारी आणि शुभ विचाराचे प्रजाजनही अत्यंत हर्षाने श्रीरामांना भेटण्यासाठी प्रस्थित झाले. ॥११॥
मणिकाराश्च ये केचित् कुम्भकाराश्च शोभनाः ।
सूत्रकर्मविशेषज्ञा ये च शस्त्रोपजीविनः ॥ १२ ॥

मायूरकाः क्राकचिका वेधका रोचकास्तथा ।
दन्तकाराः सुधाकारा ये च गन्धोपजीविनः ॥ १३ ॥

सुवर्णकाराः प्रख्यातास्तथा कम्बलकारकाः ।
स्नापकोष्णोदका वैद्या धूपकाः शौण्डिकास्तथा ॥ १४ ॥

रजकास्तुन्नवायाश्च ग्रामघोषमहत्तराः ।
शैलूषाश्च सह स्त्रीभिर्यान्ति कैवर्तकास्तथा ॥ १५ ॥

समाहिता वेदविदो ब्राह्मणा वृत्तसम्मताः ।
गोरथैर्भरतं यान्तमनुजग्मुः सहस्रशः ॥ १६ ॥
जे कोणी मणिकार (मण्यांना सहाणेवर चढवून चमक उत्पन्न करणारे), चांगले कुंभार, सूताचा ताणा-बाणा करून वस्त्र विणण्याच्या कलेतील विशेषज्ञ, शस्त्रे निर्माण करून जीविका चालविणारे, मायूरक (मोरपंखाचे छ्त्र-व्यजन आदि बनविणारे), आर्‍यानी चंदन आदि लाकडे कापणारे, मणि मोती आदिमध्ये वेजे पाडणारे, रोचक (भिंती आणि वेदी आदिंच्या शोभेचे संपादन करणारे), दंतकार (हस्तिदंतापासून नाना प्रकारच्या वस्तू बनविणारे ), सुधाकार (चुना बनविणारे), गंधी, प्रसिद्ध सोनार, कांबळी आणि गालिचे बनविणारे), गरम जलाने स्नान घालण्याचे काम करणारे), वैद्य, धूपक (धूपन- क्रियेच्या द्वारा जीविका चालविणारे), शौण्डिक (मद्यविक्रेता) धोबी, शिंपी, गायी आणि गांव गोशाळेचे रक्षण करणारे गावचे पुढारी (पाटील), स्त्रियांसहित नट, नावाडी तसेच समाहित चित्त सदाचारी वेदवेत्ते हजारो ब्राह्मण बैलगाड्यांवर चढून वनाची यात्रा करणार्‍या भरतांच्या पाठोपाठ निघाले. ॥१२-१६॥
सुवेषाः शुद्धवसनास्ताम्रमृष्टानुलेपिनः ।
सर्वे ते विविधैर्यानैः शनैर्भरतमन्वयुः ॥ १७ ॥
सर्वांचे वेष सुंदर होते. सर्वांनी शुद्ध वस्त्रे धारण केली होती तसेच सर्वांच्या अं‍गावर तांब्यासमान लाल रंगाचा अङ्‌‍गराग लावलेला होता. ते सर्वच्या सर्व नाना प्रकारच्या वाहनांच्या द्वारे हळू हळू भरताचे अनुसरण करीत होते. ॥१७॥
प्रहृष्टमुदिता सेना सान्वयात् कैकयीसुतम् ।
भ्रातुरानयने यान्तं भरतं भ्रातृवत्सलम् ॥ १८ ॥
हर्ष आणि आनंदात मग्न झालेली ती सेना भावाला बोलवण्यासाठी प्रस्थित झालेल्या कैकेयीकुमार भ्रातृवत्सल भरताच्या मागोमाग जाऊ लागली. ॥१८॥
ते गत्वा दूरमध्वानं रथयानाश्वकुञ्जरैः ।
समासेदुस्ततो गङ्‌गां शृङ्‌वेरपुरं प्रति ॥ १९ ॥
याप्रकारे रथ, पालख्या, घोडे आणि हत्ती यांच्या द्वारे बर्‍याच दूर अंतरापर्यंत मार्ग आक्रमण केला आणि ते सर्व शृङ्‌‍गवेरपुरात गंगेच्या तटावर येऊन पोहोंचले. ॥१९॥
यत्र रामसखा वीरो गुहो ज्ञातिगणैर्वृतः ।
निवसत्यप्रमादेन देशं तं परिपालयन् ॥ २० ॥
तेथे रामसखा वीर निषादराज गुह सावधपणे त्या देशाचे रक्षण करीत आपल्या बंधु-बांधवांसह निवास करीत होते. ॥२०॥
उपेत्य तीरं गङ्‌गायाश्चक्रवाकैरलङ्‌कृतम् ।
व्यवतिष्ठत सा सेना भरतस्यानुयायिनी ॥ २१ ॥
चक्रवाकांनी अलंकृत गंगातटावर पोहोंचलावर भरताचे अनुसरण करणारी ती सेना तेथेच थांबली. ॥२१॥
निरीक्ष्यानुत्थितां सेनां तां च गङ्‌गां शिवोदकाम् ।
भरतः सचिवान् सर्वानब्रवीद् वाक्यकोविदः ॥ २२ ॥
पुण्यसलिला भागीरथीचे दर्शन करून आपली ती सेना शिथिल झाली आहे हे पाहून संभाषण करण्यात चतुर (वाक्यकोविद) भरतांनी समस्त सचिवांना म्हटले- ॥२२॥
निवेशयत मे सैन्यमभिप्रायेण सर्वतः ।
विश्रान्ताः प्रतरिष्यामः श्व इमां सागरङ्‌गमाम् ॥ २३ ॥
’आपण सर्व माझ्या सैनिकांना त्यांच्या इच्छेनुसार येथे सर्व बाजूस उतरवून (थांबवून) घ्या. आज रात्री येथे विश्राम केल्यानंतर आम्ही सर्व उद्या सकाळी या सागर-गामिनी नदी गंगेला पार करू. ॥२३॥
दातुं च तावदिच्छामि स्वर्गतस्य महीपतेः ।
और्ध्वदेहनिमित्तार्थमवतीर्योदकं नदीम् ॥ २४ ॥
या ठिकाणी विश्राम करण्याचे आणखीही एक कारण आहे. माझी इच्छा आहे की गंगेत उतरून, स्वर्गीय दशरथ महाराजांच्या पारलौकिक कल्याणाची इच्छा धरून त्यांना तिलांजलि अर्पण करावी. ॥ २४ ॥
तस्यैवं ब्रुवतोऽमात्यास्तथेत्युक्त्वा समाहिताः ।
न्यवेशयंस्तांश्छन्देन स्वेन स्वेन पृथक् पृथक् ॥ २५ ॥
त्यांनी असे म्हटल्यावर सर्व मंत्र्यांनी ’तथास्तु’ म्हणून त्यांची आज्ञा स्वीकारली आणि समस्त सैनिकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे भिन्न भिन्न स्थांनावर उतरविले. ॥२५॥
निवेश्य गङ्‌गामनु तां महानदीं
    चमूं विधानैः परिबर्हशोभिनीम् ।
उवास रामस्य तदा महात्मनो
    विचिन्तमानो भरतो निवर्तनम् ॥ २६ ॥
महानदी गंगेच्या तटावर राहुट्या आदिनी सुशोभित झालेल्या त्या सेनेला व्यवस्थापूर्वक उतरविल्यावर भरतांनी महत्मा श्रीरामांच्या परत येण्याविषयी विचार करीत त्या समयी तेथे निवास केला. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्र्यशीतितमः सर्गः ॥ ८३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा त्र्याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP