श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतुःपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

वज्रदंष्ट्राङ्‌गदयोर्युद्धमङ्‌गदेन तस्य वधश्च -
वज्रद्रंष्ट्र आणि अंगदाचे युद्ध तसेच अंगदाच्या हातून त्या निशाचराचा वध -
स्वबलस्य च घातेन अङ्‌गदस्य बलेन च ।
राक्षसः क्रोधमाविष्टो वज्रदंष्ट्रो महाबलः ॥ १ ॥
अंगदाच्या पराक्रमाने आपल्या सेनेचा संहार होताना पाहून महाबली राक्षस वज्रदंष्ट्र अत्यंत कुपित झाला. ॥१॥
स विस्फार्य धनुर्घोरं शक्राशनिसमस्वनम् ।
वानराणामनीकानि प्राकिरच्छरवृष्टिभिः ॥ २ ॥
तो इंद्राच्या वज्रासमान तेजस्वी आपले भयंकर धनुष्य खेचून वानरांच्या सेनेवर बाणांची वृष्टि करू लागला. ॥२॥
राक्षसाश्चापि मुख्यास्ते रथेषु समवस्थिताः ।
नानाप्रहरणाः शूराः प्रायुध्यन्त तदा रणे ॥ ३ ॥
त्याच्या बरोबर अन्य प्रधान - प्रधान शूरवीर राक्षसही रथांवर बसून हातात नाना प्रकारची हत्यारे घेऊन संग्रामभूमी मध्ये युद्ध करू लागले. ॥३॥
वानराणां तु शूरास्तु ते सर्वे प्लवगर्षभाः ।
आयुध्यन्त शिलाहस्ताः समवेताः समन्ततः ॥ ४ ॥
वानरांमध्ये जे शूरवीर होते ते सर्व वानरश्रेष्ठ सर्व बाजूनी एकत्र येऊन हातात शिला घेऊन युद्ध करू लागले. ॥४॥
तत्रायुधसहस्राणि तस्मिन्नायोधने भृशम् ।
राक्षसाः कपिमुख्येषु पातयाञ्चक्रिरे तदा ॥ ५ ॥
त्यासमयी त्या रणभूमीमध्ये राक्षसांनी मुख्य मुख्य वानरांवर हजारो अस्त्रशस्त्रांची वृष्टि केली. ॥५॥
वानराश्चापि रक्षःसु गिरीवृक्षान् महाशिलाः ।
प्रवीराः पातयामासुः मत्तवारणसंनिभाः ॥ ६ ॥
मत्त हत्तीप्रमाणे विशालकाय वीर वानरांनीही राक्षसांवर अनेकानेक पर्वत, वृक्ष आणि मोठ मोठ्‍या शिला फेकल्या. ॥६॥
शूराणां युध्यमानानां समरेष्वनिवर्तिनाम् ।
तद् राक्षसगणानां च सुयुद्धं समवर्तत ॥ ७ ॥
युद्धात पाठ न दाखविणार्‍या आणि उत्साहपूर्वक लढणार्‍या शूरवीर वानरांचे आणि राक्षसांचे ते युद्ध उत्तरोत्तर वाढत गेले. ॥७॥
प्रभिन्नशिरसः केचिद् छिन्नैः पादैश्च बाहुभिः ।
शस्त्रैरर्दितदेहास्तु रुधिरेण समुक्षिताः ॥ ८ ॥
कुणाचे मस्तक फुटले, कुणाचे हात पाय तुटले आणि बर्‍याचशा योद्धांचे शरीर शस्त्रांच्या आघाताने पीडित होऊन रक्तात न्हाऊन निघाले. ॥८॥
हरयो राक्षसाश्चैव शेरते गां समाश्रिताः ।
कङ्‌कगृध्रबलाढ्याश्च गोमायुकुलसंकुलाः ॥ ९ ॥
वानर आणि राक्षस दोन्हीही धराशायी झाले. त्यांच्यावर कंक, गिधाडे आणि कावळे तुटून पडले. कोल्ह्यांची जमात पसरून गेली. ॥९॥
कबंधानि समुत्पेतुः भीरुणां भीषणानि वै ।
भुजपाणिशिरश्छिन्नाः छिन्नकायाश्च भूतले ॥ १० ॥
तेव्हां ज्यांची मस्तके तुटून गेली होती, अशी धडे सर्वत्र नाचू, उड्‍या मारू लागली, जी भित्र्या स्वभावाच्या सैनिकांना भयभीत करत होती. योद्ध्यांच्या तुटलेल्या भुजा, हात मस्तके आणि शरीराचे मध्यभाग पृथ्वीवर पडलेले होते. ॥१०॥
वानरा राक्षसाश्चापि निपेतुस्तत्र भूतले ।
ततो वानरसैन्येन हन्यमानं निशाचरम् ॥ ११ ॥

प्राभज्यत बलं सर्वं वज्रदंष्ट्रस्य पश्यतः ।
वानर आणि राक्षस दोन्ही दलाचे लोक तेथे धराशायी होत होते. तत्पश्चात्‌ थोड्‍या वेळाने वानर सैनिकांच्या प्रहाराने पीडित होऊन ती सारी निशाचरसेना वज्रद्रंष्ट्राच्या डोळ्या देखत पळत सुटली. ॥११ १/२॥
राक्षसान् भयवित्रस्तान् हन्यमानान् प्लवंगमैः ॥ १२ ॥

दृष्ट्‍वा स रोषताम्राक्षो वज्रदंष्ट्रः प्रतापवान् ।
वानरांच्या माराने राक्षसांना भयभीत झालेले पाहून प्रतापी वज्रद्रंष्ट्राचे डोळे क्रोधाने लाल झाले. ॥१२ १/२॥
प्रविवेश धनुष्पाणिः त्रासयन् हरिवाहिनीम् ॥ १३ ॥

शरैर्विदारयामास कङ्‌कपत्रैरजिह्मगैः ।
तो हातात धनुष्य घेऊन वानरसेनेला भयभीत करीत त्या सेनेत घुसला आणि सरळ जाणार्‍या कंकपत्रयुक्त बाणांच्या द्वारे शत्रूंना विदीर्ण करू लागला. ॥१३ १/२॥
बिभेद वानरांस्तत्र सप्ताष्टौ नव पञ्च च ॥ १४ ॥

विव्याध परमक्रुद्धो वज्रदंष्ट्रः प्रतापवान् ।
अत्यंत क्रोधाविष्ट झालेला प्रतापी वज्रद्रंष्ट्र तेथे एका एका प्रहाराने पाच, सात, आठ आणि नऊ नऊ वानरांना घायाळ करत होता. याप्रकारे त्याने सैनिकांना खूपच जखमी केले. ॥१४ १/२॥
त्रस्ताः सर्वे हरिगणाः शरैः संकृत्तदेहिनः ।
अङ्‌गदं संप्रधावन्ति प्रजापतिमिव प्रजाः ॥ १५ ॥
बाणांनी ज्यांचे शरीर छिन्न - भिन्न झाले होते, ते समस्त वानर भयभीत होऊन अंगदाकडे धावले, जणु प्रजापतिला प्रजा शरण जात होती. ॥१५॥
ततो हरिगणान् भग्नान् दृष्ट्‍वा वालिसुतस्तदा ।
क्रोधेन वज्रदंष्ट्रं तं उदीक्षन्तमुदैक्षत ॥ १६ ॥
त्यासमयी वानरांना पळतांना पाहून वालिकुमार अंगदाने आपल्याकडे पहाणार्‍या वज्रदंष्ट्राकडे क्रोधाने पाहिले. ॥१६॥
वज्रदंष्ट्रोऽङ्‌गदश्चोभौ योयुध्येते परस्परम् ।
चेरतुः परमक्रुद्धौ हरिमत्तगजाविव ॥ १७ ॥
नंतर तर वज्रद्रंष्ट्र आणि अंगद अत्यंत कुपित होऊन एक दुसर्‍यांशी वेगपूर्वक युद्ध करू लागले. ते दोघेही रणभूमीमध्ये वाघ आणि मत्त हत्तीप्रमाणे विचरत होते. ॥१७॥
ततः शरसहस्रेण वालिपुत्रं महाबलम् ।
जघान मर्मदेशेषु शरैरग्निशिखोपमैः ॥ १८ ॥
त्यासमयी वज्रदंष्ट्राने महाबलाढ्‍य वालिपुत्र अंगदाच्या मर्मस्थानी अग्निशिखेप्रमाणे तेजस्वी एक लाख बाण मारले. ॥१८॥
रुधिरोक्षितसर्वाङ्‌गो वालिसूनुर्महाबलः ।
चिक्षेप वज्रदंष्ट्राय वृक्षं भीमपराक्रमः ॥ १९ ॥
त्यामुळे त्यांचे सारे अंग रक्तबंबाळ झाले. तेव्हा भयानक पराक्रमी महाबली वालिकुमाराने वज्रदंष्ट्रावर एक वृक्ष फेकला. ॥१९॥
दृष्ट्‍वा पतन्तं तं वृक्षं असंभ्रान्तश्च राक्षसः ।
चिच्छेद बहुधा सोऽपि मथितः प्रापतद् भुवि ॥ २० ॥
तो वृक्ष आपल्याकडे येत असलेला पाहूनही वज्रदंष्ट्राच्या मनांत भय उत्पन्न झाले नाही. त्याने बाण मारून त्या वृक्षाचे कित्येक तुकडे करून टाकले. याप्रकारे खण्डित होऊन तो वृक्ष पृथ्वीवर पडला. ॥२०॥
तं दृष्ट्‍वा वज्रदंष्ट्रस्य विक्रमं प्लवगर्षभः ।
प्रगृह्य विपुलं शैलं चिक्षेप च ननाद च ॥ २१ ॥
वज्रदंष्ट्राचा तो पराक्रम पाहून वानरश्रेष्ठ अंगदाने एक विशाल पर्वत उचलून त्याच्यावर फेकला आणि अत्यंत जोराने गर्जना केली. ॥२१॥
समापतन्तं दृष्ट्‍वा स रथाद् आप्लुत्य वीर्यवान् ।
गदापाणिरसंभ्रान्तः पृथिव्यां समतिष्ठत ॥ २२ ॥
तो शैल येतांना पाहून त्या पराक्रमी राक्षसाने न घाबरता रथांतून उडी मारली आणि केवळ गदा हातात घेऊन पृथ्वीवर उभा राहिला. ॥२२॥
अङ्‌गदेन शिला क्षिप्ता गत्वा तु रणमूर्धनि ।
सचक्रकूबरं साश्वं प्रममाथ रथं तदा ॥ २३ ॥
अंगदाने फेकलेली ती शिला त्याच्या रथावर पडली आणि युद्धाच्या तोंडावरच त्या शिलेने चाके, कूबर आणि घोड्‍यांसहित त्या रथाचा तात्काळ चुराडा करून टाकला. ॥२३॥
ततोऽन्यत् शिखरं गृह्य विपुलं द्रुमभूषितम् ।
वज्रदंष्ट्रस्य शिरसि पातयामास वानरः ॥ २४ ॥
तत्पश्चात्‌ वानरवीर अंगदाने वृक्षांनी अलंकृत दुसरे विशाल शिखर हातात घेऊन ते वज्रदंष्ट्राच्या मस्तकावर मारले. ॥२४॥
अभवच्छोणितोद्‌गारी वज्रदंष्ट्रः सुमूर्च्छितः ।
मुहूर्तमभवन्मूढो गदामालिङ्‌ग्य निःश्वसन् ॥ २५ ॥
त्याच्या आघाताने वज्रदंष्ट्र मूर्च्छित झाला आणि रक्त ओकू लागला. तो गदेला हृदयाशी धरून एक मुहूर्तपर्यत निश्चेष्ट पडून राहिला. केवळ त्याचा श्वास चालत होता. ॥२५॥
स लब्धसंज्ञो गदया वालिपुत्रमवस्थितम् ।
जघान परमक्रुद्धो वक्षोदेशे निशाचरः ॥ २६ ॥
शुद्धिवर आल्यावर त्या निशाचराने अत्यंत कुपित होऊन समोर उभे असलेल्या वालिपुत्राच्या छातीवर गदेने प्रहार केला. ॥२६॥
गदां त्यक्त्वा ततस्तत्र मुष्टियुद्धमकुर्वत ।
अन्योन्यं जघ्नतुस्तत्र तावुभौ हरिराक्षसौ ॥ २७ ॥
नंतर गदेचा त्याग करून तो तेथे बुक्क्याने युद्ध करू लागला. ते वानर आणि राक्षस दोन्ही वीर एक दुसर्‍याला बुक्क्याने मारू लागले. ॥२७॥
रुधिरोद्‌गारिणो तौ तु प्रहरैर्जनितश्रमौ ।
बभूवतुः सुविक्रान्तौ अङ्‌गारकबुधाविव ॥ २८ ॥
दोघेही फार पराक्रमी होते आणि परस्परांशी लढत असता मंगळ आणि बुधाप्रमाणे भासत होते. आपसांतील प्रहारांनी पीडित होऊन दोघेही थकून गेले आणि तोंडातून रक्त ओकू लागले. ॥२८॥
ततः परमतेजस्वी अङ्‌गदः प्लवगर्षभः ।
उत्पाट्य वृक्षं स्थितवान् आसीत् पुष्पफलैर्युतः ॥ २९ ॥
तत्पश्चात्‌ परम तेजस्वी वानरश्रेष्ठ अंगद एक वृक्ष उपटून उभे राहिले. ते तेथे त्या वृक्षाच्या संबंधाने स्वतःही फळे आणि फुलांनी युक्त असल्यासारखे दिसत होते. ॥२९॥
जग्राह चार्षभं चर्म खड्गं च विपुलं शुभम् ।
किङ्‌किणीजालसञ्छन्नं चर्मणा च परिष्कृतम् ॥ ३० ॥
तिकडे वज्रदंष्ट्राने ऋषभाच्या कातड्‍यानी बनविलेली ढाल आणि सुंदर विशाल तलवार घेतली. ती तलवार लहान लहान घंटिकांच्या जाळीने आच्छादित तसेच चामड्‍याच्या म्यानाने सुशोभित होती. ॥३०॥
चित्रांश्च रुचिरान् मार्गान् चेरतुः कपिराक्षसौ ।
जघ्नतुश्च तदाऽन्योन्यं निर्दयं जयकाङ्‌क्षिणौ ॥ ३१ ॥
त्यासमयी परस्परांवर विजय मिळविण्याची इच्छा करणारे ते वानर आणि राक्षसवीर सुंदर आणि विचित्र पवित्रे बदलू लागले आणि गर्जना करत एकमेकांवर आघात करू लागले. ॥३१॥
व्रणैः सास्त्रैरशोभेतां पुष्पिताविव किंशुकौ ।
युध्यमानौ परिश्रान्तौ जानुभ्यामवनीं गतौ ॥ ३२ ॥
दोघांच्या जखमांतून रक्ताची धार वाहू लागली त्यामुळे ते फुललेल्या पलाश वृक्षांप्रमाणे शोभू लागले. लढता लढता थकून गेल्याने दोघांनीही पृथ्वीवर गुडघे टेकले. ॥३२॥
निमेषान्तरमात्रेण अङ्‌गदः कपिकुञ्जरः ।
उदतिष्ठत दीप्ताक्षो दण्डाहत इवोरगः ॥ ३३ ॥
परंतु डोळ्याचे पाते लवते न लवते तोच कपिश्रेष्ठ अंगद उठून उभे राहिले. त्यांचे डोळे रोषाने उद्दिप्त झाले होते आणि काठीचा आघात खालेल्या सर्पाप्रमाणे उत्तेजित झाले होते. ॥३३॥
निर्मलेन सुधौतेन खड्गेनास्य महच्छिरः ।
जघान वज्रदंष्ट्रस्य वालिसूनुर्महाबलः ॥ ३४ ॥
महाबलाढ्‍य वालिकुमारांनी निर्मल आणि तीक्ष्ण धार असलेल्या आपल्या चमकदार तलवारीने वज्रदंष्ट्राचे विशाल मस्तक छाटून टाकले. ॥३४॥
रुधिरोक्षितगात्रस्य बभूव पतितं द्विधा ।
तच्च अस्य परिताक्षं शुभं खड्गहतं शिरः ॥ ३५ ॥
रक्तबंबाळ झालेल्या शरीराच्या त्या राक्षसाचे ते खड्गाने छाटलेले सुंदर मस्तक, ज्याचे नेत्र उलटले होते, जमीनीवर पडून दोन तुकड्‍यात विभक्त झाले. ॥३५॥
वज्रदंष्ट्रं हतं दृष्ट्‍वा राक्षसा भयमोहिताः ।
त्रस्ताः ह्यभ्यद्रवन् लङ्‌कां वध्यमानाः प्लवंगमै ।
विषण्णवदना दीना ह्रिया किञ्चिदवाङ्‌मुखाः ॥ ३६ ॥
वज्रदंष्ट्र मारला गेला हे पाहून राक्षस भयाने अचेत झाले. ते वानरांचा मार खाऊन भयामुळे लंकेत पळून गेले. त्यांच्या मुखावर विषाद पसरला होता. ते फार दुःखी झाले होते आणि लज्जेमुळे त्यांनी आपले मुख काहीसे खाली केले होते. (मान खाली घातली होती.) ॥३६॥
निहत्य तं वज्रधरः प्रतापवान्
स वालिसूनुः कपिसैन्यमध्ये ।
जगाम हर्षं महितो महाबलः
सहस्रनेत्रस्त्रिदशैरिवावृतः ॥ ३७ ॥
वज्रधारी इंद्रासमान प्रतापी महाबली वालिकुमार अंगद त्या निशाचर वज्रदंष्ट्राला मारून वानर सेनेमध्ये सन्मानित होऊन देवतांनी घेरलेल्या सहस्त्र नेत्रधारी इंद्राप्रमाणे फार हर्षित झाले. ॥३७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे चतुष्पञ्चाशः सर्गः ॥ ५४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा चौपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP