श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ अष्टमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
माल्यवतो युद्धं पराजयश्च सुमालिप्रभृतीनां रसातले प्रवेशः -
माल्यवानाचे युद्ध आणि पराजय तसेच सुमाली आदि सर्व राक्षसांचा रसातलात प्रवेश -
हन्यमाने बले तस्मिन् पद्मनाभेन पृष्ठतः ।
माल्यवान् संनिवृत्तोऽथ वेलामेत्य इवार्णवः ॥ १ ॥
(अगस्त्य म्हणतात - रघुनंदना !) पद्मनाभ भगवान्‌ विष्णुंनी जेव्हा पळून जाणार्‍या राक्षसांच्या सेनेला पाठीमागून मारण्यास आरंभ केला, तेव्हा माल्यवान्‌ परत आला. जणु महासागर आपल्या तटभूमीपर्यंत जाऊन निवृत्त झाला होता. ॥१॥
संरक्तनयनः क्रोधात् चलन्मौलिर्निशाचरः ।
पद्मनाभमिदं प्राह वचनं पुरुषोत्तमम् ॥ २ ॥
त्याचे नेत्र क्रोधाने लाल झाले होते आणि मुकुट हलत होता. तो निशाचर पुरुषोत्तम भगवान्‌ पद्मनाभांना याप्रकारे म्हणाला - ॥२॥
नारायण न जानीषे क्षात्रधर्मं पुरातनम् ।
अयुद्धमनसो भीतान् अस्मान् हंसि यथेतरः ॥ ३ ॥
नारायणदेवा ! असे वाटत आहे की आपण पुरातन क्षात्रधर्माला बिल्कुल जाणत नाही म्हणून तर साधारण मनुष्याप्रमाणे तुम्ही ज्यांचे मन युद्धापासून विरत झालेले आहे तसेच जे घाबरून पळून जात आहेत, अशा आम्हा राक्षसांना मारून टाकत आहात. ॥३॥
पराङ्‌मुखवधं पापं यः करोति सुरेश्वरः ।
स हन्ता न गतः स्वर्गं लभते पुण्यकर्मणाम् ॥ ४ ॥
सुरेश्वर ! जो युद्धापासून विमुख झालेल्या सैनिकांच्या वधाने पाप करतो, तो घातक या शरीराचा त्याग करून परलोकी गेल्यावर पुण्यकर्मा पुरुषांना मिळणार्‍या स्वर्गाला प्राप्त करत नाही. ॥४॥
युद्धश्रद्धाथवा तेऽस्ति शङ्‌खचक्रगदाधर ।
अहं स्थितोऽस्मि पश्यामि बलं दर्शय यत् तव ॥ ५ ॥
शंख, चक्र आणि गदा धारण करणार्‍या देवते ! जर तुमच्या हृदयात युद्ध करण्याचा उत्साह असेल तर मी उभा आहे. पाहतो ! तुमच्यात कितीबळ आहे ? दाखवा आपला पराक्रम. ॥५॥
माल्यवन्तं स्थितं दृष्ट्‍वा माल्यवन्तमिवाचलम् ।
उवाच राक्षसेन्द्रं तं देवराजानुजो बली ॥ ६ ॥
पर्वताप्रमाणे अविचल भावाने उभा असलेल्या राक्षसराज माल्यवानाला पाहून देवराज इंद्रांचे लहान भाऊ महाबली भगवान्‌ विष्णुंनी त्याला म्हटले - ॥६॥
युष्मत्तो भयभीतानां देवानां वै मयाभयम् ।
राक्षसोत्सादनं दत्तं तदेतदनुपाल्यते ॥ ७ ॥
देवतांना तुम्हा लोकांच्या मुळे मोठे भय उपस्थित झाले आहे, मी राक्षसांच्या संहाराची प्रतिज्ञा करून त्यांना अभयदान दिले आहे, म्हणून या रूपात माझ्याकडून त्या प्रतिज्ञेचेच पालन केले जात आहे. ॥७॥
प्राणैरपि प्रियं कार्यं देवानां हि सदा मया ।
सोऽहं वो निहनिष्यामि रसातलगतानपि ॥ ८ ॥
मला आपले प्राण देऊनही सदा देवतांचे प्रिय कार्य करावयाचे आहे, म्हणून मी तुमचा वध केल्याशिवाय राहाणार नाही. ॥८॥
देवदेवं ब्रुवाणं तं रक्ताम्बुरुहलोचनम् ।
शक्त्या बिभेद सङ्‌क्रुद्धो राक्षसेन्द्रो भुजान्तरे ॥ ९ ॥
लाल कमलासमान नेत्र असणारे देवाधिदेव भगवान्‌ विष्णु जेव्हा याप्रकारे सांगत होते त्या समयी अत्यंत कुपित झालेल्या राक्षसराज माल्यवानाने आपल्या शक्तिच्या द्वारा प्रहार करून भगवान्‌ विष्णुंचे वक्षःस्थळ विदीर्ण करून टाकले. ॥९॥
माल्यवद्‌भुजनिर्मुक्ता शक्तिर्घण्टाकृतस्वना ।
हरेरुरसि बभ्राज मेघस्थेव शतह्रदा ॥ १० ॥
माल्यवानाच्या हातातून सुटून घंटानाद करत ती शक्ति श्रीहरिंच्या छातीवर जाऊन लागली. आणि मेघाच्या अंकावर प्रकाशित होणार्‍या वीजेसमान शोभा प्राप्त करू लागली. ॥१०॥
ततस्तामेव चोत्कृष्य शक्तिं शक्तिधरप्रियः ।
माल्यवन्तं समुद्दिश्य चिक्षेपाम्बुरुहेक्षणः ॥ ११ ॥
शक्तिधारी कार्तिकेय ज्यांना प्रिय आहेत अथवा जे शक्तिधर स्कंदांचे प्रियतम आहेत, त्या भगवान्‌ कमलनयन विष्णुंनी त्या शक्तिला आपल्या छातींतून खेचून काढून माल्यवानावरच फेकून मारली. ॥११॥
स्कन्दोत्सृष्टेव सा शक्तिः गोविन्दकरनिःसृता ।
काङ्‌क्षन्ती राक्षसं प्रायान् महोल्केवाञ्जनाचलम् ॥ १२ ॥
स्कंदांनी सोडलेल्या शक्तिसमान गोविंदाच्या हातून निघालेली ती शक्ति त्या राक्षसाला लक्ष्य करून निघाली; जणु अञ्जनगिरिवर एखादी फार मोठी उल्काच कोसळत असावी. ॥१२॥
सा तस्योरसि विस्तीर्णे हारभारावभासिते ।
अपतद् राक्षसेन्द्रस्य गिरिकूट इवाशनिः ॥ १३ ॥
हारांच्या समूहानी प्रकाशित होणार्‍या त्या राक्षसराजाच्या विशाल वक्षःस्थळावर ती शक्ति जणु एखाद्या पर्वताच्या शिखरावर वज्रपात व्हावा त्याप्रमाणे पडली. ॥१३॥
तया भिन्नतनुत्राणः प्राविशद् विपुलं तमः ।
माल्यवान् पुन्पुनराश्वस्तः तस्थौ गिरिरिवाचलः ॥ १४ ॥
तिने माल्यवानाचे कवच फाटून गेले तसेच तो गाढ मूर्च्छेमध्ये बुडून गेला, परंतु थोड्‍याच वेळात पुन्हा सावरून माल्यवान्‌ पर्वताप्रमाणे अविचल भावाने उभा राहिला. ॥१४॥
ततः कालायसं शूलं कण्टकैर्बहुभिश्चितम् ।
प्रगृह्याभ्यहनद् देवं स्तनयोरन्तरे दृढम् ॥ १५ ॥
त्याने काळ्या लोहाचा बनलेला आणि बहुसंख्य काट्‍यांनी जडविलेला शूल हातात घेऊन भगवंतांच्या छातीवर खोल प्रहार केला. ॥१५॥
तथैव रणरक्तस्तु मुष्टिना वासवानुजम् ।
ताडयित्वा धनुर्मात्रं अपक्रान्तो निशाचरः ॥ १६ ॥
याच प्रकारे तो युद्धप्रेमी राक्षस भगवान्‌ विष्णुंना बुक्क्यांनी मारून एक धनुष्य मागे सरला. ॥१६॥
ततोऽम्बरे महाञ्छब्दः साधुसाध्विति चोत्थितः ।
आहत्य राक्षसो विष्णुं गरुडं चाप्यताडयत् ॥ १७ ॥
त्या समयी आकाशांत राक्षसांचा महान्‌ हर्षनाद निनादू लागला. ते एकदमच बोलले - फारच उत्तम, फारच उत्तम. भगवान्‌ विष्णुंना बुक्का मारून त्या राक्षसाने गरूडावरही प्रहार केला. ॥१७॥
वैनतेयस्ततः क्रुद्धः पक्षवातेन राक्षसम् ।
व्यपोहद् बलवान् वायुः शुष्कपर्णचयं यथा ॥ १८ ॥
हे पाहून वैनतेय गरूड कुपित झाले आणि त्यांनी आपल्या पंखांच्या वार्‍याने, ज्याप्रमाणे प्रबळ वावटळ वाळलेल्या पानांच्या ढीगाला उडवून लावते, त्याप्रमाणे त्या राक्षसाला उडवून लावले. ॥१८॥
द्विजेन्द्रपक्षवातेन द्रावितं दृश्य पूर्वजम् ।
सुमाली स्वबलैः सार्धं लङ्‌कामभिमुखो ययौ ॥ १९ ॥
आपला मोठा भाऊ पक्षिराजांच्या पंखाच्या वार्‍याने उडालेला पाहून सुमाली आपल्या सैनिकांसह लंकेकडे निघून गेला. ॥१९॥
पक्षवातबलोद्धूतो माल्यवानपि राक्षसः ।
स्वबलेन समागम्य ययौ लङ्‌कां ह्रिया वृतः ॥ २० ॥
गरूडांच्या पंखांच्या वार्‍याने उडालेला राक्षस माल्यवान्‌ही लज्जित होऊन आपल्या सेनेला जाऊन मिळाला आणि लंकेकडे निघून गेला. ॥२०॥
एवं ते राक्षसा तेन हरिणा कमलेक्षण ।
बहुशः संयुगे भग्ना हतप्रवरनायकाः ॥ २१ ॥
कमलनयन श्रीरामा ! याप्रकारे त्या राक्षसांचे भगवान्‌ विष्णुंच्या बरोबर अनेक वेळा युद्ध झाले आणि प्रत्येक संग्रामात मुख्य मुख्य नायक मारले जाऊन सर्वांना पळून जावे लागले. ॥२१॥
अशक्नुवन्तस्ते विष्णुं प्रतियोद्धुं बलार्दिताः ।
त्यक्त्वा लङ्‌कां गता वस्तुं पातालं सहपत्‍नयः ॥ २२ ॥
ते कुठल्याही प्रकारे भगवान्‌ विष्णुंचा सामना करू शकले नाहीत. सदाच त्यांच्या बळाने पीडित होत राहिले. म्हणून समस्त निशाचर लंका सोडून आपल्या स्त्रियांसह पाताळात राहाण्यासाठी निघून गेले. ॥२२॥
सुमालिनं समासाद्य राक्षसं रघुसत्तम ।
स्थिताः प्रख्यातवीर्यास्ते वंशे सालकटङ्‌कटे ॥ २३ ॥
रघुश्रेष्ठ ! ते विख्यात पराक्रमी निशाचर सालकटङ्‌कट वंशांतील विद्यमान राक्षस सुमालीचा आश्रय घेऊन राहू लागले. ॥२३॥
ये त्वया निहतास्ते तु पौलस्त्या नाम राक्षसाः ।
सुमाली माल्यवान् माली ये च तेषां पुरःसराः ॥
सर्वे एते महाभागा रावणाद् बलवत्तराः ॥ २४ ॥
श्रीरामा ! आपण पुलस्त्य वंशातील ज्या ज्या राक्षसांचा विनाश केला आहे त्यांच्यापेक्षा प्राचीन राक्षसांचा पराक्रम अधिक होता. सुमाली, माल्यवान्‌ आणि माली तसेच त्यांच्यापुढे चालणारे योद्धे - हे सर्व महाभाग निशाचर रावणाहून अधिक बलवान्‌ होते. ॥२४॥
न चान्यो राक्षसान् हन्ता सुरारीन् देवकण्टकान् ।
ऋते नारायणं देवं शङ्‌खचक्रगदाधरम् ॥ २५ ॥
देवतांसाठी कंटकरूप त्या देवद्रोही राक्षसांचा वध शंख, चक्र गदाधारी भगवान्‌ नारायण देवाशिवाय दुसरे कोणी करू शकत नव्हते. ॥२५॥
भवान्नारायणो देवः चतुर्बाहुः सनातनः ।
राक्षसान् हन्तुमुत्पन्नो ह्यजेय्यः प्रभुरव्ययः ॥ २६ ॥
आपण चार भुजाधारी सनातन भगवान्‌ नारायणच आहात. आपल्याला कोणी परास्त करू शकत नाही. आपण अविनाशी प्रभु आहात आणि राक्षसांचा वध करण्यासाठी या लोकात अवतीर्ण झाला आहात. ॥२६॥
नष्टधर्मव्यवस्थानां काले काले प्रजाकरः ।
उत्पद्यते दस्युवधे शरणागतवत्सलः ॥ २७ ॥
आपणच या प्रजांचे स्त्रष्टा आहात आणि शरणागतांवर दया करत असता. जेव्हा जेव्हा धर्माची व्यवस्था नष्ट करणारे दस्यु उत्पन्न होतात तेव्हा तेव्हा त्या दस्युंचा वध करण्यासाठी आपण वेळोवेळी अवतार घेत राहाता. ॥२७॥
एषा मया तव नराधिप राक्षसानां
उत्पत्तिरद्य कथिता सकला यथावत् ।
भूयो निबोध रघुसत्तम रावणस्य
जन्मप्रभावमतुलं ससुतस्य सर्वम् ॥ २८ ॥
नरेश्वर ! याप्रकारे मी आपल्याला राक्षसांच्या उत्पत्तिचा हा सर्व प्रसंग ठीक ठीक ऐकविला आहे. हे रघुकुलसत्तमा ! आता आपण रावण तसेच त्याचे पुत्रांचे जन्म आणि अनुपम प्रभावाचे सर्व वर्णन ऐकावे. ॥२८॥
चिरात् सुमाली व्यचरद् रसातलं
स राक्षसो विष्णुभयार्दितस्तदा ।
पुत्रैश्च पौत्रैश्च समन्वितो बली
ततस्तु लङ्‌कामवसद् धनेश्वरः ॥ २९ ॥
भगवान्‌ विष्णुंच्या भयाने पीडित होऊन राक्षस सुमाली सुदीर्घकाळ पर्यंत आपल्या पुत्र पौत्रांसहित रसातलात विचरत राहिला. या मधल्या काळातच धनाध्यक्ष कुबेराने लंकेला आपले निवासस्थान बनविले. ॥२९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टमः सर्गः ॥ ८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा आठवा सर्ग पूरा झाला. ॥८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP