श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणकर्तृकं यमलोकस्य उपरि आक्रमणं, तेन यमसैनिकानां संहरणं च -
रावणाचे यमलोकावर आक्रमण आणि त्याच्या द्वारा यमराजांच्या सैनिकांचा संहार -
एवं संचिन्त्य विप्रेन्दो जगाम लघुविक्रमः ।
आख्यातुं तद् यथावृत्तं यमस्य सदनं प्रति ॥ १ ॥
(अगस्त्य म्हणतात - रघुनंदना !) असा विचार करून शीघ्र चालणारे विप्रवर नारद रावणाच्या आक्रमणाचा समाचार सांगण्यासाठी यमलोकात केले. ॥१॥
अपश्यत् स यमं तत्र देवमग्निपुरस्कृतम् ।
विधानमुपतिष्ठन्तं प्राणिनो यस्य यादृशम् ॥ २ ॥
तेथे जाऊन त्यांनी पाहिले, यमदेव अग्निला साक्षीच्या रूपात समोर ठेवून बसले आहेत आणि ज्या प्राण्याचे जसे कर्म आहे त्यास अनुसरून फळ देण्याची व्यवस्था करत आहेत. ॥२॥
स तु दृष्ट्‍वा यमः प्राप्तं महर्षिं तत्र नारदम् ।
अब्रवीत्सुखमासीनं अर्घ्यमावेद्य धर्मतः ॥ ३ ॥
महर्षि नारदांना तेथे आलेले पाहून यमराजांनी आतिथ्य धर्मानुसार त्यांच्यासाठी अर्घ्य आदि निवेदन करून म्हटले - ॥३॥
कच्चित्क्षेमं तु देवर्षे कच्चिद् धर्मो न नश्यति ।
किमागमनकृत्यं ते देवगन्धर्वसेवित ॥ ४ ॥
देवता आणि गंधर्वांकडून सेवित देवर्षे ! कुशल तर आहे ना ? धर्माचा नाश तर होत नाही आहे ना ? आज येथे आपल्या शुभागमनाचा काय हेतू आहे ? ॥४॥
अब्रवीत्तु तदा वाक्यं नारदो भगवान् ऋषिः ।
श्रूयतां अभिधास्यामि विधानं च विधीयताम् ॥ ५ ॥

एष नाम्ना दशग्रीवः पितृराज निशाचरः ।
उपयाति वशं नेतुं विक्रमैस्त्वां सुदुर्जयम् ॥ ६ ॥
तेव्हा भगवान्‌ नारद मुनि बोलले - पितृराज ! ऐका - मी एक आवश्यक गोष्ट सांगत आहे. आपण ऐकून तिच्या प्रतिकाराचाही काही उपाय करावा. यद्यपि आपल्याला जिंकणे अत्यंत कठीण आहे तथापि हा दशग्रीव नामक निशाचर आपल्या पराक्रमांच्या द्वारा आपल्याला वश करून घेण्यासाठी येथे येत आहे. ॥५-६॥
एतेन कारणेनाहं त्वरितो ह्यागतः प्रभो ।
दण्डप्रहरणस्याद्य तव किं नु भविष्यति ॥ ७ ॥
प्रभो ! याच कारणामुळे मी तात्काळ येथे आलो आहे, की आपल्याला या संकटाची सूचना द्यावी, परंतु आपण तर कालदण्डरूपी आयुध धारण करणारे आहात, आपली त्या राक्षसाच्या आक्रमणाने काय हानी होणार आहे ? ॥७॥
एतस्मिन् अंतरे दूराद् अंशुमन्तमिवोदितम् ।
ददृशुर्दीप्तमायान्तं विमानं तस्य रक्षसः ॥ ८ ॥
याप्रकारच्या गोष्टी होतच होत्या की त्या राक्षसाचे उदय पावलेल्या सूर्यासमान तेजस्वी विमान दुरून येतांना दिसून आले. ॥८॥
तं देशं प्रभया तस्य पुष्पकस्य महाबलः ।
कृत्वा वितिमिरं सर्वं समीपं सोऽभ्यवर्तत ॥ ९ ॥
महाबली रावण पुष्पकाच्या प्रभेने त्या समस्त प्रदेशाला अंधकार शून्य करून अत्यंत निकट आला. ॥९॥
सोऽपश्यत्स महाबाहुः दशग्रीवस्ततस्ततः ।
प्राणिनः सुकृतं कर्म भुञ्जानांश्चैव दुष्कृतम् ॥ १० ॥
महाबाहु दशग्रीवाने यमलोकात येऊन पाहिले की येथे बरेचसे प्राणी आपापल्या पुण्य तसेच पापाचे फळ भोगत आहेत. ॥१०॥
अपश्यत् सैनिकांश्चास्य यमस्यानुचरैः सह ।
यमस्य पुरुषैः उग्रैः घोररूपैः भयानकैः ॥ ११ ॥

ददर्श वध्यमानांश्च क्लिश्यमानांश्च देहिनः ।
क्रोशतश्च महानादं तीव्रनिष्टनतत्परान् ॥ १२ ॥
त्याने यमराजांच्या सेवकांसह त्यांच्या सैनिकांनाही पाहिले. यमयातनेचे दृश्यही त्यांच्या दृष्टिला पडले. घोर रूपधारी उग्र प्रकृतिचे भयानक यमदूत कित्येक प्राण्यांना मारत होते आणि क्लेश पोहोचवीत होते. ज्यामुळे ते फार मोठमोठ्‍याने किंचाळत, ओरडत होते. ॥११-१२॥
कृमिभिर्भक्ष्यमाणांश्च सारमेयैश्च दारुणैः ।
क्षोत्रायासकरा वाचो वदतश्च भयावहाः ॥ १३ ॥
कुणाला किडे खात होते आणि भयंकर कुत्रे कित्येकांचे लचके तोडत होते. ते सर्वच्या सर्व दुःखी होऊन कानांना पीडा देणारे भयानक चीत्कार करत होते. ॥१३॥
सन्तार्यमाणान् वैतरणीं बहुशः शोणितोदकाम् ।
वालुकासु च तप्तासु तप्यमानान् मुहूर्मुहुः ॥ १४ ॥
कुणाकुणाला वारंवार रक्ताने भरलेली वैतरणी नदी पार करण्यासाठी विवश केले जात होते आणि कित्येकांना तापलेल्या वाळूवर वारंवार चालवून संतप्त केले जात होते. ॥१४॥
असिपत्रवने चैव भिद्यमानानधार्मिकान् ।
रौरवे क्षारनद्यां च क्षुरधारासु चैव हि ॥ १५ ॥

पानीयं याचमानांश्च तृषितान् क्षुधितानपि ।
शवभूतान् कृशान्दीनान् विवर्णान् मुक्तमूर्धजान् ॥ १६ ॥

मलपङ्‌कधरान् दीनान् रूक्षांश्च परिधावतः ।
ददर्श रावणो मार्गे शतशोऽथ सहस्रशः ॥ १७ ॥
काही पापींना असिपत्राने- वनात ज्याची पाने तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण होती, विदीर्ण केले जात होते. कित्येकांना रौरव नरकात टाकले जात होते. कित्येकांना खार्‍या जलाने भरलेल्या नदीमध्ये बुडविले जात होते आणि बर्‍याच जणांना सुरीच्या धारेवर पळावयास लावले जात होते. कित्येक प्राणी भूक आणि तहानेने तळमळत होते आणि थोड्‍याशा जलासाठी याचना करीत होते. काही शवाप्रमाणे कंकाल, दीन दुर्बल, उदास आणि मोकळ्या केसांनी युक्त दिसून येत होते. कित्येक प्राणी तर आपल्या अंगाला मळ आणि चिखल लावलेले दयनीय तसेच रूक्ष शरीरांनी चोहोबाजूस पळत राहिले होते. याप्रकारे शेकडो आणि हजारो जीवांना रावणाने मार्गात यातना भोगतांना पाहिले. ॥१५-१७॥
कांश्चिच्च गृहमुख्येषु गीतवादित्रनिःस्वनैः ।
प्रमोदमानान् अद्राक्षीद् रावणः सुकृतैः स्वकैः ॥ १८ ॥
दुसरीकडे रावणाने पाहिले काही पुण्यात्मा जीव आपल्या पुण्य कर्मांच्या प्रभावाने चांगल्या घरात राहून संगीत आणि वाद्यांच्या ध्वनिने आनंदित होत आहेत. ॥१८॥
गौरसं गोप्रदातारो ह्यन्नं चैवान्नदायिनः ।
गृहांश्च गृहदातारः स्वकर्मफलमश्नतः ॥ १९ ॥
गोदान करणारे गोरसाला, अन्न देणारे अन्नाला आणि गृह प्रदान करणारे लोक गृहाला मिळवून आपल्या सत्कर्मांचे फळ भोगत आहेत. ॥१९॥
सुवर्णमणिमुक्ताभिः प्रमदाभिरलङ्‌कृतान् ।
धार्मिकान् अपरांस्तत्र दीप्यमानान् स्वतेजसा ॥ २० ॥
आणखी काही धर्मात्मा पुरुष तेथे सुवर्ण, मणि आणि मुक्तांनी अलंकृत होऊन यौवनाच्या मदाने मत्त राहणार्‍या सुंदर स्त्रियांसह आपल्या अंगकांतिने प्रकाशित होत आहेत. ॥२०॥
ददर्श सुमहाबाहू रावणो राक्षसाधिपः ।
ततस्तान् भिद्यमानांश्च कर्मभिर्दुष्कृतैः स्वकैः ॥ २१ ॥

रावणो मोचयामास विक्रमेण बलाद् बली ।
प्राणिनो मोचितास्तेन दशग्रीवेण रक्षसा ॥ २२ ॥
महाबाहु राक्षसराज रावणाने या सर्वांना पाहिले. पाहून बलवान्‌ राक्षस दशग्रीवाने आपल्या पापकर्मांमुळे यातना भोगणार्‍या प्राण्यांना पराक्रम द्वारा बलपूर्वक मुक्त करून टाकले. ॥२१-२२॥
सुखमापुर्मुहूर्तं ते ह्यतर्कितं अचिन्तितम् ।
प्रेतेषु मुच्यमानेषु राक्षसेन महीयसा ॥ २३ ॥

प्रेतगोपाः सुसङ्‌क्रुद्धा राक्षसेन्द्रमभिद्रवन् ।
यामुळे थोडा वेळपर्यंत त्या पाप्यांना मोठे सुख मिळाले. ते मिळण्याची त्यांना संभावनाही नव्हती अथवा त्याविषयी ते काही विचारही करू शकत नव्हते. त्या महान्‌ राक्षसाच्या द्वारा जेव्हा सर्व प्रेत-यातनांतून मुक्त केले गेले तेव्हा त्या प्रेतांचे रक्षण करण्याने, यमदूत अत्यंत कुपित होऊन राक्षसराजावर तुटून पडले. ॥२३ १/२॥
ततो हलहलाशब्दः सर्वदिग्भ्यः समुत्थितः ॥ २४ ॥

धर्मराजस्य योधानां शूराणां सम्प्रधावताम् ।
मग तर संपूर्ण दिशांतून हल्ला करणार्‍या धर्मराजांच्या शूरवीर योद्ध्यांचा महान्‌ कोलाहल प्रकट झाला. ॥२४ १/२॥
ते प्रासैः परिघैः शूलैः मुसलैः शक्तितोमरैः ॥ २५ ॥

पुष्पकं समवर्षन्त शूराः शतसहस्रशः ।
तस्यासनानि प्रासादान् वेदिकास्तोरणानि च ॥ २६ ॥

पुष्पकस्य बभञ्जुस्ते शीघ्रं मधुकरा इव ।
जसे फुलावर भ्रमरांच्या झुंडीच्या झुंडी एकत्र येतात त्या प्रकारे पुष्पक विमानावर शेकडो, हजारो शूरवीर यमदूत चढून आले आणि प्रास, परिघ, शूल, मुसळे, शक्ति तसेच तोमरांच्या द्वारा त्याला नष्ट करण्याचा - मोडून तोडून टाकण्याचा प्रयत्‍न करू लागले. त्यांनी पुष्पक विमानांतील आसने, प्रासाद, वेदी आणि तोरणे शीघ्रच तोडून टाकली. ॥२५-२६ १/२॥
देवनिष्ठानभूतं तद् विमानं पुष्पकं मृधे ॥ २७ ॥

भज्यमानं तथैवासीद् अक्षयं ब्रह्मतेजसा ।
देवतांच्या अधिष्ठानभूत ते पुष्पक विमान त्या युद्धामध्ये तोडले गेल्यावरही ब्रह्मदेवांच्या प्रभावाने जसेच्या तसे होऊन जात होते कारण ते नष्ट होणारे नव्हते. ॥२७ १/२॥
असङ्‌ख्या सुमहत्यासीत् तस्य सेना महात्मनः ॥ २८ ॥

शूराणां अग्रयातॄऽणां सहस्राणि शतानि च ।
महामना यमांची विशाल सेना असंख्य होती. त्यात शेकडो, हजारो शूरवीर पुढे सरसावून युद्ध करणारे होते. ॥२८ १/२॥
ततो वृक्षैश्च शैलैश्च प्रासादानां शतैस्तथा ॥ २९ ॥

ततस्ते सचिवास्तस्य यथाकामं यथाबलम् ।
अयुध्यन्त महावीराः स च राजा दशाननः ॥ ३० ॥
यमदूतांनी आक्रमण केल्यावर रावणाचे ते महावीर मंत्री तसेच स्वयं राजा दशग्रीवही वृक्ष, पर्वत शिखरे, तसेच यमलोकांतील शेकडो प्रासादांना उखडून त्यांच्या द्वारा पूर्ण शक्ति लावून इच्छेनुसार युद्ध करू लागले. ॥२९-३०॥
ते तु शोणितदिग्धाङ्‌गाः सर्वशस्त्रसमाहताः ।
अमात्या राक्षसेन्द्रस्य चक्रुरायोधनं महत् ॥ ३१ ॥
राक्षसराजाच्या मंत्र्यांची सारी अंगे रक्ताने न्हाऊन निघाली होती. सर्व प्रकारच्या शस्त्रांच्या आघातांनी ते घायाळ होत होते. तरीही त्यांनी फार फार महान्‌ युद्ध केले. ॥३१॥
अन्योन्यं ते महाभागा जघ्नुः प्रहरणैर्भृशम् ।
यमस्य च महाबाहो रावणस्य च मन्त्रिणः ॥ ३२ ॥
महाबाहु श्रीरामा ! यमराज तसेच रावणाचे ते महाभाग मंत्री एक दुसर्‍या नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांच्या द्वारा फार जोराने आघात प्रत्याघात करू लागले. ॥३२॥
अमात्यांस्तांस्तु सन्त्यज्य यमयोधा महाबलाः ।
तमेव चाभ्यधावन्त शूलवर्षैर्दशाननम् ॥ ३३ ॥
त्यानंतर यमराजाच्या महाबली योद्ध्यांनी रावणाच्या मंत्र्यांना सोडून त्या दशग्रीवावरच शूलांची वृष्टि करत चढाई केली. ॥३३॥
ततः शोणितदिग्धाङ्‌गः प्रहारैर्जर्जरीकृतः ।
फुल्लाशोक इवाभाति पुष्पके राक्षसाधिपः ॥ ३४ ॥
रावणाचे सारे शरीर शस्त्रांच्या माराने जर्जर झाले. तो रक्ताने चिंब भिजून गेला आणि पुष्पक विमानावर फुललेल्या अशोक वृक्षासमान प्रतीत होऊ लागला. ॥३४॥
स तु शूलगदापासाद् शक्तितोमरसायकान् ।
मुसलानि शिलावृक्षान् मुमोचास्त्रबलाद् बली ॥ ३५ ॥
तेव्हा बलवान्‌ रावणाने आपल्या अस्त्र-बलाने यमराजांच्या सैनिकांवर शूल, गदा, प्रास, शक्ति, तोमर, बाण, मूसळ, पत्थर आणि वृक्षांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥३५॥
तरूणां च शिलानां च शस्त्राणां चातिदारुणम् ।
यमसैन्येषु तद् वर्षं पपात धरणीतले ॥ ३६ ॥
वृक्ष, शिलाखंड आणि शस्त्रांची ती अत्यंत भयंकर वृष्टि भूतलावर उभ्या असलेल्या यमराजांच्या सैनिकांवर पडू लागली. ॥३६॥
तांस्तु सर्वान् विनिर्भिद्य तदस्त्रमपहत्य च ।
जघ्नुस्ते राक्षसं घोरं एकं शतसहस्रशः ॥ ३७ ॥
ते सैनिकही शेकडो-हजारोंच्या संख्येमध्ये एकत्र येऊन त्याच्या सार्‍या आयुधांना छिन्न-भिन्न करून त्याच्या द्वारा सोडलेल्या दिव्यास्त्रांचेही निवारण करून एकमात्र त्या भयंकर राक्षसास मारू लागले. ॥३७॥
परिवार्य च तं सर्वे शैलं मोघोत्करा इव ।
भिन्दिपालैश्च शूलैश्च निरुच्छ्वासमपोथयन् ॥ ३८ ॥
जसा मेघांचा समूह पर्वतावर सर्व बाजूनी जलधारांचा वर्षाव करतात, त्याप्रकारे यमराजांच्या समस्त सैनिकांनी रावणास चारी बाजूनी घेरून त्याला भिंदिपाल आणि शूलांनी छेदण्यास आरंभ केला. त्याला श्वास घ्यावयासही फुरसत ठेवली नाही. ॥३८॥
विमुक्तकवचः क्रुद्धः सिक्तः शोणितविस्रवैः ।
ततः स पुष्पकं त्यक्त्वा पृथिव्यामवतिष्ठत ॥ ३९ ॥
रावणाचे कवच फाटून खाली पडले. त्याच्या शरीरातून रक्ताची धार वाहू लागली. तो रक्ताने न्हाऊन निघाला आणि कुपित होऊन पुष्पक विमान सोडून पृथ्वीवर उभा राहिला. ॥३९॥
ततः स कार्मुकी बाणी समरे चाभिवर्तत ।
लब्धसंज्ञो मुहूर्तेन क्रुद्धस्तस्थौ यथान्तकः ॥ ४० ॥
तेथे एका मुहूर्तानंतर त्याने स्वतःला सावरले. मग तर तो धनुष्य आणि बाण हातात घेऊन वाढत्या उत्साहाने संपन्न होऊन समरांगणात कुपित झालेल्या यमराजासमान उभा राहिला. ॥४०॥
ततः पाशुपतं दिव्यं अस्त्रं सन्धाय कार्मुके ।
तिष्ठ तिष्ठेति तान् उक्त्वा तच्चापं विचकर्ष स ॥ ४१ ॥
त्याने आपल्या धनुष्यावर पाशुपात नामक दिव्य अस्त्राचे संधान केले आणि त्या सैनिकांना थांबा, थांबा म्हणत ते धनुष्य खेचले. ॥४१॥
आकर्णात् स विकृष्याथ चापं इन्द्रारिराहवे ।
मुमोच तं शरं क्रुद्धः त्रिपुरे शङ्‌करो यथा ॥ ४२ ॥
जसे भगवान्‌ शंकरांनी त्रिपुरासुरावर पाशुपातास्त्राचा प्रयोग केला होता त्याचप्रकारे त्या इंद्रद्रोही रावणाने आपल्या धनुष्याला कानापर्यंत खेचून तो बाण सोडून दिला. ॥४२॥
तस्य रूपं शरस्यासीत् सधूमज्वालमण्डलम् ।
वनं दहिष्यतो घर्मे दावाग्नेरिव मूर्च्छतः ॥ ४३ ॥
त्यासमयी त्या बाणाचे रूप धूम आणि ज्वालांच्या मण्डलांनी युक्त होऊन ग्रीष्म ऋतुमध्ये जंगलाला जाळण्यासाठी चारी बाजूस पसरणार्‍या दावानलासमान प्रतीत होऊ लागले. ॥४३॥
ज्वालामाली स तु शरः क्रव्यादानुगतो रणे ।
मुक्तो गुल्मान् द्रुमांश्चापि भस्म कृत्वा प्रधावति ॥ ४४ ॥
रणभूमीमध्ये ज्वालामालांनी घेरलेला तो बाण धनुष्यांतून सुटताच वृक्ष आणि झाडी यांना जाळत तीव्र गतीने पुढे जाऊ लागला आणि त्याच्या मागे मागे मांसाहारी जीव-जंतु चालू लागले. ॥४४॥
ते तस्य तेजसा दग्धाः सैन्या वैवस्वतस्य तु ।
रणे तस्मिन् निपतिता माहेन्द्रा इव केतवः ॥ ४५ ॥
त्या युद्धस्थळी यमराजाचे ते सारे सैनिक पाशुपतास्त्राच्या तेजाने दग्ध होऊन इंद्रध्वजाप्रमाणे खाली पडू लागले. ॥४५॥
ततस्तु सिचवैः सार्धं राक्षसो भीमविक्रमः ।
ननाद सुमहानादं कम्पयन्निव मेदिनीम् ॥ ४६ ॥
त्यानंतर आपल्या मंत्र्यांसह तो भयानक पराक्रमी राक्षस पृथ्वीला कंपित करीत असल्याप्रमाणे अत्यंत जोरजोराने सिंहनाद करू लागला. ॥४६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकविंशः सर्गः ॥ २१ ॥
याप्रमाणे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकविसावा सर्ग पूरा झाला. ॥२१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP