॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय आठवा ॥
शूर्पणखेला विद्रूप करतात

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

स तां पंचवटीं गत्वा नानाशकुनिनादिताम् ।
उवाच भ्रातरं रामो लक्ष्मणं शुभलक्ष्मणम् ॥१॥
अयं देशः समः श्रीरान्तुप्पितस्तरुभिर्वृतः ।
इहाश्रमपदं रम्यं यथावत्कर्तमर्हसि ॥ २ ॥

पंचवटीत आगमन व वनसौंदर्याने सर्वांना संतोष :

पंचवटीं । श्रीराम सुखावे देखोनि दृष्टीं ।
सुखावली सीता गोरटी । आल्हाद पोटीं सौमित्रा ॥ १ ॥
श्रीरामा देखोनि आल्हादें । कोकिळा कूजती पंचमशब्दें ।
घुमरी घुमघुमती स्वानंदें । सुखानुवाद अति मधुर ॥ २ ॥
श्रीरामां तूं तूं सीते तूं तूं । धन्य धन्य सुमित्रा तूं तूं ।
ऐसें कपोत कूजतू । पुण्यपुरुषार्थी ये वनीं ॥ ३ ॥
स्वतःप्रमाण कीं परतःप्रमाण । प्रयोगोपाधीनें व्यावर्तित कोण ।
जहदजहल्लक्षणेचें काय प्रयोजन । शुक सारिका आपण विवादती ॥ ४ ॥
जेथें शुक बोले विचक्षण । आत्मा येथें स्वतःप्रमाण ।
तो जहदजहत् नेणे । श्रीराम पूर्ण लक्षावा ॥ ५ ॥
ऐसें पक्षी विवादती । तेणें सुखावे श्रीराममूर्ती ।
लक्ष्मण चमत्कारें चित्तीं । सीता सती स्वानंदें ॥ ६ ॥
मयूर आनंदें नाचत । शुक पिंगळे अनुवादत ।
ये वनीं बसल्या श्रीरघुनाथ । पुण्यपुरुषार्थ पावेल ॥ ७ ॥
अति पावन पंचवटी । श्रीराम वसल्या जगजेठी ।
मारील राक्षसांच्या कोटी । सुखसंतुष्टी तिहीं लोकीं ॥ ८ ॥
ऐकोनि पक्ष्यांचें कूजित । संतोषला श्रीरघुनाथ ।
सौमित्रासी स्वयें सांगत । आश्रम येथे निर्मावा ॥ ९ ॥

अरुणावरुणासंगमावर आश्रमस्थापना :

अरुणावरुणासंगम सार । प्राची सरस्वती पवित्र ।
लक्षून सुंदर कपालेश्वर । करीं सत्वर स्वाश्रम ॥ १० ॥
गंगातीर सम सुशीळ । वृक्ष पुष्पित सफळ ।
मलयानिळसुपरिमळ । सुख प्रबळ यै वनीं ॥ ११ ॥
तूं तव निजसखा लक्ष्मण । सर्वांगे सुंदर सुलक्षण ।
येथें वसतां सुख संपूर्ण । करीं निर्माण आश्रम ॥ १२ ॥

अवमुक्तस्तु रामेण लक्ष्मणः परवीरहा ।
अचिरेणाश्रमं भ्रातुश्चकार सुमहाबलः ॥ ३ ॥
पर्णशालां सुविपुलां चकार सुनरोत्तमः ।
उपास्यां राघवस्यार्थे प्रेक्षणीयामनुत्तमाम् ॥ ४ ॥

लक्ष्मणाचें शुभ लक्षण । नां म्हणों नेणे आपण ।
शिरीं वंदोनी श्रीरामचरण । करी निर्माण आश्रम ॥ १३ ॥
यज्ञशाळा द्विजशाळा । जीवनशाळा शयनशाळा ।
निर्मिलिया पर्णशाळा । अति विशाळा ऋषिवासा ॥ १४ ॥
वृंदावनें सुमनवनें । शोभताती वनें उपवनें ।
बिल्व अश्वत्थ मधुवनें । आम्रवनें मघमघित ॥ १५ ॥
पंचपंच वृक्षांची दाटी । गंगातीरीं निकटनिकटीं ।
त्यांमाजी शोभे पंचवटी । देखतां दृष्टीं मन निवे ॥ १६ ॥
अरुणा वरुणा सरस्वती । त्रिवेणी वाहे आश्रमाप्रती ।
सुंदर कपालेश्वरस्थिती । सन्मुख भारती आश्रमीं ॥ १७ ॥

आश्रमातील दैनंदिनी :

पंचवटीं आश्रम सुहावा । हेचि श्रीरामाची निजसेवा ।
लक्ष्मणें केली सद्भावा । श्रीराघवसुखार्थी ॥ १८ ॥
उत्तमोत्तम आश्रमस्थिती । देखोनि सुखावे श्रीरघुपती ।
लक्ष्मणासी अति प्रीतीं । सुखानुभूतीं आलिंगी ॥ १९ ॥
स्वयें श्रीरामसुखसमेळीं । नानापुष्पीं नानाफळीं ।
निजाश्रमीं दिधली बळी । जनकबाळीसमवेत ॥ २० ॥
श्रीरामसीता आश्रमस्थिती । तेणें लक्ष्मणा सुखसंपत्ती ।
सेवा करावया अहोरातीं। उल्हास चित्तीं चौगुणा ॥ २१ ॥
कुश पुष्पें सुस्वाद फळें । शीतळ जळें सुपरिमळें ।
लक्ष्मण पुरवी सर्वकाळें । सेवाबळें उल्हासी ॥ २२ ॥
श्रीरामसेवेचें निजसुख । लक्ष्मणासी आत्यंतिक ।
विसरला द्वंद्वदुःख । परम हरिख सेवेचा ॥ २३ ॥
श्रीरामसीतेचें चरणतीर्थ । सौमित्र नित्य सेवित ।
सेवेसी विकिलें जीवित सावचित्त सर्वार्थीं ॥ २४ ॥

स्नानार्थ श्रीराम गेल्यावर सीतेचे कंबरेखालील वस्त्र व चोळी झोपेत अंगावरुन दूर होतेः

सीतेपासीं संरक्षण । श्रीरामें ठेवून लक्ष्मण ।
आपण करुं गेला स्नान । अतिविंदान तेथे जालें ॥ २५ ॥
श्रीरघुनाथासी देखतां । कदा निद्रा न करी सीता ।
श्रीराम स्नाना गेला असतां । विश्रामता निजेली ॥ २६ ॥
लक्ष्मणाचे दृष्टीसमोरीं । सीता स्वभावें निद्रा करी ।
वस्त्र उडालें गुह्यावरी । कुचांतरी निर्मुक्त ॥ २७ ॥

तशाही प्रसंगी लक्ष्मण ध्यानमग्न :

सुमित्रासी श्रीरामध्यान । न देखे कुच न देखे जघन ।
सीता दिसताहे नग्न । हेंही ज्ञान तो नेणे ॥ २८ ॥
श्रीराम करोनि आला स्नान । सीता दिसताहे नग्न ।
लक्ष्मणासी स्वयें आपण । काय वचन बोलत ॥ २९ ॥

अग्निकुंडसमा नारी घृतकुंभसमो नरः ।
दृष्ट्वा गुह्यं परस्त्रीणां कस्य नो चलितं मनः॥ ५ ॥

स्त्री तंव अग्निकुंड केवळ । नर घृतकुंभ तो विव्हळ ।
देखोनि नारीगृह्यस्थळ । मन निश्चळ कोणाचें ॥ ३० ॥

लक्ष्मणोक्ति –
पिता यस्य शुचिर्भूतो माता चापि पपिव्रता ।
श्रीरामसेवानिरतस्तस्यैवं निश्चलं मनः॥ ६ ॥

राम-लक्ष्मणांचा संवाद :

पिता ज्याचा शुचिर्भूत । माता पतिव्रता निश्चित ।
श्रीरामसेवेनित्य रत । त्याचें चित्त चळेना ॥ ३१ ॥
श्रीरामभक्तांची निजस्थिती । गृह्यगुह्यार्थ देखती ।
तेणें चळेना चित्तवृत्ती । जाण निश्चितीं श्रीरामा ॥ ३२ ॥
देहींचिया विकारवृत्ती । स्त्रीपुरुषत्वा अभिव्यक्तीं ।
देह देहातीत देखती । त्यांची वृत्ति चळेना ॥ ३३ ॥
सीता जगदंबा स्वयें सृष्टीं । पाहोनि लक्ष्मणाची कसवटी ।
ऐकोनि दोघांचिया गोष्टी स्वयें उठी सलज्ज ॥ ३४ ॥

सीतेचा आदरभाव :

लक्ष्मणाची स्थिती देखतां । सीतेने चरणीं ठेविला माथा ।
स्वयें श्रीराम जाला वंदिता । परमपूज्यता सौमित्रीं ॥ ३५ ॥
लक्ष्मणें घालोनि लोटांगण । दोहींचें मस्तकीं धरिले चरण ।
सेवासुख द्यावें मज आपण । पूर्ण पूज्यपण श्रीरामीं ॥ ३६ ॥
ऐकोनि सौमित्र वचन । श्रीरामें देतां आलिंगन ।
दोघां नाठवे दोनीपण । जालें परिपूर्ण परब्रह्म ॥ ३७ ॥
पावोनियां पूर्ण बोध । लक्ष्मणा सेवेचा आल्हाद ।
सेवेलागीं जाला सावध । कथानुवाद अवधारा ॥ ३८ ॥
लक्ष्मण जावोनि वनासी । नित्य आणी वनफळांसी ।
तंव तेणें वनीं एके दिवशीं । आश्चर्यासी देखिलें ॥ ३९ ॥

सांबराक्षसाची काळखड्ग प्राप्त्यर्थ तपश्चर्या :

शूर्पणखेचा लाडका सुत । सांब राक्षस विख्यात ।
काळखर्गाचे प्राप्त्यर्थ । करी वनांत तपश्चर्या ॥ ४० ॥
सांबतपश्चर्या अति अद्भुत । खर्गार्थी एकाग्रचित्त ।
काळखर्ग होतां प्राप्त । जालें विपरीत अदृष्टें॥ ४२ ॥

त्या खड्गाच्या मनातून साबाच्या हाती जावयाचे नसते म्हणून ते लक्ष्मणाच्या हाती जातेः

खर्ग उतरतां सत्वर । तंव शस्त्रदेवता करी विचार ।
सांब महापापी दुर्धर । खर्गे अधोर करील ॥ ४३ ॥
निर्दाळील गोब्राह्मणां । वध करील दीनजनां ।
त्याच्या हाती मी स्पर्शेना । शरण लक्ष्मणा मी होईन ॥ ४४ ॥
हा तंव धर्माचा साहाकारी । अकिंचनां कैवारी ।
दीनजनांतें उद्धरी । याच्या करीं मी पावेन ॥ ४५ ॥
सांब जे जाळींत तप करीत । लक्ष्मण फळें तोडी तेथ ।
खर्ग येवोनियां त्वरित । होय हस्तगत सौमित्रा ॥ ४६ ॥

त्याची धार पाहाण्यासाठी घाव मारतो तो नेमका झाडीतील सांबावर पडून त्याचा मृत्यू :

वनफळें आसुंडितां । अवचटें काळखर्ग आले हाता ।
लक्ष्मण पाहे सभोंवता । तंव खर्गदाता न दिसेचि ॥ ४७ ॥
खर्गे सुखावला करतळीं । हरिखें वेळोवेळां तुळी ।
वाहों पहावया तोडी जाळी । सांब ते वेळीं निवटिला ॥ ४८ ॥
घावो अतिशयें दुर्धर । जाळीसहित तुटलें शिर ।
भंडभडां वाहे रुधिर । चिंतातुर सौमित्र ॥ ४९ ॥
कोण तपस्वी होता येथ । मज घडला ब्रह्मघात ।
स्वर्गी क्षोभेल दशरथ । सत्य श्रीरघुनाथ क्षोभेले ॥ ५० ॥
कैचें खर्ग आलें हाता । तेणें हत्या बैसली माथरां ।
कैसेनि भेटों श्रीरघुनाथा । चितीं चिंता अनिवार ॥ ५१ ॥

ब्रह्महत्या दोष घडला असावा अशा शंकेने लक्ष्मण व्याकुळ :

ब्रह्महत्यार्‍याचें मुख । श्रीराम न पाहे सन्मुख ।
जीवीं लागली धुकधुक । परम दुःख सौमित्रा ॥ ५२ ॥
माता पिता बंधु गोत । माझा श्रीराम समर्थ ।
त्यासी सांगों वृत्तांत । प्रायश्चितार्थ पुसेन ॥ ५३ ॥
करितां श्रीरामनामस्मरण । कोटि दोषां होय दहन ।
त्यासी जालिया अनन्य शरण । हत्याहरण निमेषार्धे ॥ ५४ ॥
मुखीं श्रीरामनामवृत्ति । हृदयीं श्रीरामाची मूर्ति ।
पावलापावलीं श्रीरामस्थितीं । दोषनिवृत्ति श्रीरामें ॥ ५५ ॥
श्रीरामस्थिती पाउल पडे । तेणें समाधिसुख गाढें ।
प्रायश्चित्त जालें बापुडें । श्रीरामाकडे पाहतांचि ॥ ५६ ॥
हत्याभयें श्रीरामस्थिती । दृढ धरोनियां चित्तीं ।
पुसावया प्रायश्चित्तार्थी । आला निश्चितीं सौमित्र ॥ ५७ ॥
श्रीराम सीता पुसे आपण । स्त्रियेंवाचून लक्ष्मण ।
दिसताहे अति उद्विग्न । दीनवदन आभासे ॥ ५८ ॥
श्रीराम म्हणे सीतेप्रती । सौमित्र नव्हे विषयार्थी ।
दिसे नूतन खर्गाची प्राप्ती । कांहीं वनाप्रती प्रवर्तलें ॥ ५९ ॥
तंव लक्ष्मणें येवोनि आपण । साष्टांग घातलें लोटांगण ।
दोष घडला जी संपूर्ण । कृपा आपण करावी ॥ ६० ॥
जयजयाजी श्रीरघुनाथा । अनाथबंधो दीननाथा ।
कृपा करीं गा भगवंता । मज रक्षिता आन नाहीं ॥ ६१ ॥
तळीं धरित्री पाहतां । वरी आकाश न्याहळितां ।
दाही दिशा धांडोळितां । मज श्रीरघुनाथा आन नाहीं ॥ ६२ ॥
मी तंव नेणें माता पिता । बंधु भगिनी तूंचि तत्वतां ।
कौसल्येनें निरुपिलें वना येतां । मज रक्षिता तूंचि तूं ॥ ६३ ॥
लक्ष्मणाचें दीन वचन । ऐकोनियां श्रीरघुनंदन ।
मग संकेत पुसे आपण । येरु मस्तक खलावून । सांगता होय ॥ ६४ ॥
वनीं वनफळें तोडितां । अवचित खर्ग आलें हाता ।
त्याचा घावो पाहूं जातां । जाळी त्या अर्था तोडिली ॥ ६५ ॥
तंव जाळींत तप करीत । तपस्वी होता वारुळांत ।
त्याचा मज घडला घात । प्रायश्चित्तार्थ मज सांगा ॥ ६६ ॥

श्रीरामांनी मृतदेहाचा वर्ण विचारला :

ऐकोनि सौमित्राचे वचन । मग बोलला श्रीरघुनंदन ।
वैश्य क्षत्रिय कीं शूद्र ब्राह्मण । वधिला कोण जाळीमाजी ॥ ६७ ॥
न करितां हा इत्यर्थ । सांगतां न ये प्रायश्चित्तार्थ ।
लक्ष्मण धाडिला त्वरित । परीक्षार्थ प्रेताच्या ॥ ६८ ॥

शोध केल्यावर तो देह राक्षसाचा असल्याचे कळून आले :

लक्ष्मण तें शरीर पाहे डोळां । भ्यासुर मुख दाढा विक्राळा ।
खापराऐसा सबाह्य काळा । नेत्र अनलासारिखे ॥ ६९ ॥
लक्ष्मण सांगे इत्यर्थ । मज घडला राक्षसघात ।
ऐकोनि हांसे श्रीरघुनाथ । मुख्य धर्मार्थ हा आम्हां ॥ ७० ॥

त्यामुळे ब्रह्महत्या झालीच नाही :

तुज नाहीं निजज्ञान । शस्त्रदेवता अति सज्ञान ।
तिणें जाणोनि आपण । दृष्टनिर्दळण स्वयें केलें ॥ ७१ ॥
तो जरी सावध असता । तरी करिता तुझिये घाता ।
तुज प्रसन्न शस्त्रदेवता । न झुंजतां निर्दाळिला ॥ ७२ ॥
राक्षस अतुर्बळी होता । दुर्धर तपी शस्त्रप्राप्त्यर्था ।
दुष्टावरी क्षोभोनि शस्त्रदेवता । त्याच्याचि घाता तिणें केलें ॥ ७३ ॥
तपस्व्याच्या केलें घाता । दोष बैसला माझे माथां ।
ऐसें न म्हणावें तत्वतां । दोष सर्वथा न मानावा ॥ ७४ ॥

लक्ष्मणाला परमानंद :

करावया राक्षसांचे घात । आम्ही आलों असों या वनांत ।
शस्त्रें धरोनि तुझा हात । केला प्राणांत दृष्टाचा ॥ ७५ ॥
तूं तंव नव्हेसी कर्मकर्था । तुझ्या धरोनियां हाता ।
दुष्ट दमिला शस्त्रदेखता । दोष सर्वथा तुज नाहीं ॥ ७६ ॥
दोष नाहीं तुझे माथां । पुसणें न लगे प्रायश्चिता ।
ऐसें श्रीराम बोलतां । उल्हासता सौमित्रा ॥ ७७ ॥
धन्य ज्ञान श्रीरघुनाथा । शोधोनि काढिलें इत्यर्था ।
मी तंव नव्हे कर्मकर्ता दोष सर्वथा मज नाहीं ॥ ७८ ॥
धन्य धन्य श्रीरामकृपा । म्यां घेतलें दोषसंकल्पा ।
तोचि केला निर्विकल्पा । पुण्य पाप मज नाहीं ॥ ७९ ॥
ऐसं बोलोनि लक्ष्मण । मस्तकीं धरिले श्रीरामचरण ।
श्रीरामें दिधलें आलिंगन । समाधान सुबंधू ॥ ८० ॥
श्रीरामाचे निजभक्त । कर्मे करोनि अलिप्त ।
हरिभक्तांचें पढतां चरित्र । नित्यमुक्त महादोषी ॥ ८१ ॥
करावया राक्षसांच्या घाता । काळखड्ग आले आता ।
श्रीरामें पूजिलें सद्भावता । काळ सर्वथा साह्य आम्हां ॥ ८२ ॥
काळ साह्य जाला स्वभावतां । काळखर्ग आलें न प्रार्थितां ।
राक्षसनिर्दळणीं आतां । जाण तत्वतां सौमित्रा ॥ ८३ ॥

राक्षसवधाने दोष नाही :

राक्षस वधावया रणीं । आजिपासून जाहली बोहणी ।
तेथोनि विचरतां वनीं । सावधानीं वर्तावें ॥ ८४ ॥
याचा सूड घ्यावयासी । राक्षस तील कपटवेषी ।
योगी संन्यासी तापसी । विश्वास त्यांसीं न करावा ॥ ८५ ॥
अगत्य मानेल कर्तव्यता । ते मज पुसावी तत्वतां ।
मज पुसल्याविण सर्वथा। अल्पही कार्यार्था न करावें ॥ ८६ ॥
शिरीं वंदून श्रीरामवचन । सौमित्रा सदा सावधान ।
तंव तेथें करावया पुत्रशोधन । होईल आगमन शूर्पणखेचें ॥ ८७ ॥

शूर्पणखेला पडलेले वाईट स्वप्न :

शूर्पणखा स्वयें लंकेसी । देखती जाली दुष्ट स्वनांसी ।
पट्टाभिषेक होतां सांबासी । चरणघातेंसीं लोटिला ॥ ८८ ॥
मस्तकीं शेंदुराचा टिळा । गळां आरक्त कण्हेराच्या माळा ।
मुख माखिलें काजळा । भोंवता पाळा गोळांगुळांचा ॥ ८९ ॥
सर्वांगीं तेलमज्जन । नग्न गर्दभावरी आरोहण ।
दक्षिणदिशे करुनि गमन । गोमयर्‍हदीं प्रवेशला ॥ ९० ॥
शूर्पणखा सांगे रावणासी । दुष्ट स्वप्न देखिलें सांबासी ।
मी जाईन पद्मपुरासी । विमानेंसीं ते आली ॥ ९१ ॥

रावणाला निवेदन व तिचे पद्मपुरास आगमन, मुलाचे निधन कळल्यावरुन तिचा शोक :

भेटोनि त्रिशिराखरदूषणांसी । मग पाहूं आली ते सांबासी ।
देखोनि त्याच्या शिरच्छेदासी । आक्रंदेंसीं आरंबळे ॥ ९२ ॥
काय विंदान जालें यासी । कोण उठली गे विवसी ।
काळ कृतांत भीती ज्यासी । तेणें भूमीसी स्वीकारिलें ॥ ९३ ॥
हा स्वभावें उघडी दृष्टी । तैं सुरासुर पळती दिक्पुटीं ।
कळिकाळाची निवटे दृष्टी । तो हा हठी पडला भूमीं ॥ ९४ ॥
तुज म्यां नवस केले बहुवस । अश्वत्थसेवा आणि उपवास ।
थोर धरिली तुझी आस । तो तूं उदास जालासी ॥ ९५ ॥
तुझिया देखोनि मुखकमळा । मज तंव पान्हा सुतला बाळा ।
तो सांब परलोकासी गेला । मजसीं अबोला धरुनियां ॥ ९६ ॥
ऐसें विलाप अनेक । मुखावरी ठेवी मुख ।
हा हा कोणें वधिला बाळक । थोर दुःख मज दिधलें ॥ ९७ ॥
रडोनि काय करुं येथ । कोणें केला पुत्रघात ।
त्यासी पहावया निश्चित । वन समस्त ते शोधी ॥ ९८ ॥

लक्ष्मण दिसताच त्याच्या सूडाचा निर्धार :

तंव खड्गसहित धनुष्यबाण । वनीं देखिला लक्ष्मण ।
सांबजीवघाती हाचि संपूर्ण । त्याचें भक्षण मी करीन ॥ ९९ ॥
सांब वधिला करितां ध्यान । तो जरी असता सावधान ।
तरी याचें करिता सगट प्राशन । बळ संपूर्ण सांबासी ॥ १०० ॥
सांब माझा अतुर्बळी । येणें वधिला ध्यानसमेळीं ।
यासी मी सगळेंचि गिळीं । करीन रांगोळी हाडांची ॥ १ ॥
माझा सांब वधिला येणें । सांगों खरादिकां गार्‍हाणें ।
तें मज लाजिरवाणें । मारुन नेणें त्यांपासीं ॥ २ ॥
त्याचे अंगी बळ संपूर्ण । सबळ बळाचें लक्षण ।
डोळां दोनी सहस्त्रनयन । आणि नागचिन्ह बाहूंसी ॥ ३ ॥
डोळ्यांमाजी कूर्मदृष्टी । कळिकाळां न चळे पुष्टी ।
शेषशयनचिन्ह पृष्टीं आंगवण ॥ ४ ॥

तिचे वेषांतर :

यासी बहें गिळूं जातां । हा करील माझ्या घाता ।
दळून मारावा सर्वथा । याची कांता होवोनी ॥ ५ ॥
स्वरुपरुपें अति सुंदर । अलंकार ल्याली मनोहर ।
वांकी अंदुवांचा गजर । उभी समोर सौमित्रा ॥ ६ ॥
शीसफूल राखडी फरा गोंडा । पोफळ चापेकळी केतकी दांडा ।
दोहीं हातीं जडित चुडा । मुखीं विडा सुरंग ॥ ७ ॥
अंगीं मदुवीची कांचोळी । गळां हार एकावळी ।
पाठीवर वेणी मोकळीं । गोंडा दुफुलीसहित ॥ ८ ॥
नेसली क्षीरोदकपाटोळा । मध्यभागीं जडित कटिमेखळा ।
हळदी उटिली मुखकमळा । काजळ डोळां भळभळीत ॥ ९ ॥

शूर्पणखेची लक्ष्मणाला लग्नाची विनंती :

डोळे मोडी लक्ष्मणाकडे । दुडीपीडी करुनियां पायां पडे ।
लाजोनि पाठिमोरी मुरडे । पाहे देहूडे लक्ष्मणासी ॥ ११० ॥
मी तरी कुबेराची भगिनी । तुमचे प्राप्तीलोगोनी ।
बैसलें होतें अनुष्ठानीं । धर्म पत्‍नी मी होईन ॥ ११ ॥
सुंदर आवळे डोळ्यांसी । परी रामाज्ञा आठवे लक्ष्मणासी ।
राक्षस येती कपटवेषीं। विश्वास त्यांसीं न धरावा ॥ १२ ॥
ती घेवोनि कमळमाळा । घालूं आली लक्ष्मणाच्या गळां ।
येरू मनोनि विटाळा । परता सरला सक्रोध ॥ १३ ॥
मजसारिखी सुंदर कांता । वनीं मिनलिया एकांता ।
नपुंसकही न सरे मागुता । तुझी पुरुषता सभय कां ॥ १४ ॥
ती तव तुझी केवळ चरणदासी । सेवा करीन अहर्निशीं ।
शयन करुं पर्णशेजेसीं । शंका मानसीं न धरावी ॥ १५ ॥
माझा भोगिल्या गुह्यार्थ । कळेल सर्वही भावार्थ ।
माझेनि संगें पुरुषार्थ । जगीं विख्यात पावाल ॥ १६ ॥

लक्ष्मणाने सांगितल्यावरुन ती रामांकडे जाते :

सौमित्र म्हणे ऐक आतां । श्रीराम माझा ज्येष्ठ भ्राता ।
त्याची आज्ञा मज न होतां । तुझ सर्वथा नांगीकारीं ॥ १७ ॥
श्रीराम ज्येष्ठ बंधु तो कैसा । कोण पुरुषार्थ कैसी दशा ।
समूळ आणावया मानासा । मार्गजिज्ञासा पूसत ॥ १८ ॥
येणेंचि मार्गे गंगातटीं । श्रीरामाश्रम पंचवटीं ।
श्रीरामे वसे जगजेठी । सीता गोरटीसमवेत ॥ १९ ॥
माझ्या पुत्राचे हे वैरी । रम्याश्रम गंगातीरी ।
नांदतीती बरव्या परी । सीता सुंदरी प्रियतमा ॥ १२० ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । दोघे छळून मी मारीन ।
सीता सुंदरी नेऊन । स्वयें अर्पीन लंकानाथा ॥ २१ ॥

लक्ष्मणाला आपल्याबरोबर लग्न करण्यास आज्ञा देण्याची ती विनंती करते :

मग पंचवटीस जाऊन । श्रीरामा घालोनि लोटांगण ।
भाउजी वंदितें श्रीचरण । बाईसी शरण सर्वभावें ॥ २२ ॥
मी तंव तुमची धाकटी जाऊ । मजवरी कृपा करावी बहू ।
भावे धाकटे भाऊ । लग्नगौरवू न मानिती ॥ २३ ॥
भावे साचे आज्ञेवीण । माझें न करिती पाणिग्रहण ।
भाऊजींसी तुम्हीं सांगून । लावावें लग्न सौमित्रासीं ॥ २४ ॥
सीता म्हणे श्रीरामासी । सौमित्र कष्टताहे अहर्निशी ।
सुंदर कांता । जोडिली त्यासीं । मज वनवासीं सांगतिणी ॥ २५ ॥

श्रीरामांना तिच्या डोळ्यांवरुन तिची ओळख पटतेः

श्रीराम पाहे जंव सुंदरी । उलट बाहुल्या देखे नेत्रीं ।
हे तंव केवळ निशाचरी । छळणावारीं आलीसे ॥ २६ ॥
तिचा जाणोनि भावार्थ । हांसोनि बोले श्रीरघुनाथ ।
माझा सौमित्रीं संकेत । असे विपरीत एक सुंदरी ॥ २७ ॥
पाठीसीं लिहिल्या अक्षरासीं । आज्ञा माने सौमित्रासी ।
पत्र न माने वो तयासी । मुखवचनासी मानीना ॥ २८ ॥

रामांकडून तिची बोळवपण :

आज्ञा मागतां एकाएक । मुहूर्ती श्रीरामीं विमुख ।
पतीसी पत्र दावितां देख । तेथेंही विमुख म्यां व्हावें ॥ २९ ॥
विमुखपणाचा सोहळा । मुळींच आला माझ्या कपाळा ।
लग्नपत्रिका न दिसे डोळां । श्रीराम भोळा म्हणों नये ॥ ३० ॥
दोघां छळावें हें माझें मत । परी श्रीराम छळणासी नव्हे प्राप्त ।
आपलें कळों नेदी वृत्त । पत्र गुप्त पृष्ठभागीं ॥ ३१ ॥
पृष्ठभागीं आज्ञा लग्न । वनीं लक्ष्मण निर्दळीन ।
मग निर्दळावया श्रीरघुनंदन । खर दूषण आणीन ॥ ३२ ॥
पद्मपुरा निकटानिकटीं । श्रीराम मारिजेल राक्षससुभटीं ।
सीता हिरोनि गोरटी । नेईन भेटी लंकानाथा ॥ ३३ ॥
श्रीराम दुबाहु माणूस । खर दूषण उग्र राक्षस ।
श्रीरामा मारितां न लगे निमेष । सीता लंकेश भोगील ॥ ३४ ॥
पुत्रवैरी वधावा पुढें । विचार केला निजनिवाडें ।
सलज्ज बोले सीतेपुढें । मज सांकडें ओढवलें ॥ ३५ ॥
नेम केलासे भावेंसी । लग्नपत्रिका ते पाठीसीं ।
पाठिमोरी मी बैसूं कैसी । भाउजींसी तुम्ही सांगा ॥ ३६ ॥
पाठिमोरी बैसतां जाण । लाजें जाईल माझा प्राण ।
बाइजी सांगोनि आपण । पत्र लिहोन करीं द्यावें ॥ ३७ ॥
स्त्रियांचे जिणें लज्जायुक्त । बाइजी जाणां तुम्ही समस्त ।
प्रार्थोंनियां श्रीरघुनाथ । पत्रलिखित करीं द्यावें ॥ ३८ ॥
श्रीरामाचा निजभावार्थ । पत्र दिधलिया वाचील अर्थ ।
मग करुं धांवेल अनर्थ । केला विपतीतार्थ यालागीं ॥ ३९ ॥
सौमित्रातें वरूं पाहसी । तरी पत्र लिहूं दे पाठीसी ।
नाही तरी जावोनि वनासी । येईल मनासी तो वरीं ॥ १४० ॥
ऐसें ऐकोनि श्रीरामवचन । उकसाबुकसीं करी रुदन ।
जळो तें आणिकाचें वदन । श्रीलक्ष्मण निजपति ॥ ४१ ॥
भाउजी शिवतें तुमचे चरण । मी तंव पतिव्रता संपुर्ण ।
प्राणपति श्रीलक्ष्मण । तुम्हीं कठिण न वदावें ॥ ४२ ॥
मग श्रीराम बोले धर्मवचन । ज्येष्ठ भावजयी मातेसमान ।
कनिष्ठ ते लेंकरुं जाण । लाजेसी कारण असेना ॥ ४३ ॥
मग श्रीरामापुढें पाठिमोरी । येवोनि बैसली झडकरी ।
पत्र लिहावें पाठीवरी । आज्ञाधारी मि तुमची ॥ ४४ ॥

तिच्या पाठीवर लक्ष्मणास सूचना :

शूर्पणखेची न पडे दृष्टी । पत्र लिहिलें कटिपृष्ठीं ।
पत्रीं लिही विकत गोष्टी । सावधानदृष्टीं अवधारा ॥ ४५ ॥
सहनासिक सगटओष्ठ । वेगें करावें सरसपाट ।
हाचि इचा शेंसपाट । आज्ञा वरिष्ठ हे माझी ॥ ४६ ॥
करुं नये स्त्रीहनन । यालागीं इचा राखावा प्राण ।
करावें नासिकाच्छेदन । हेंचि सुलग्न पैं इयेचें ॥ ४७ ॥
काय लिहीलें पाठीसीं । हें तों न कळे शुर्पणखेसी ।
वंदोनि श्रीरामसीतेसीं । लक्ष्मणापासीं ते आली ॥ ४८ ॥
वेगीं घेवोनियां माळेसी । वरूं आली लक्ष्मणासीं ।
तो कोपला अतिशयेंसीं । निर्लज्ज होसी तूं एक ॥ ४९ ॥
श्रीरामाचे आज्ञेवीण । मी न करीं पाणिग्रहण ।
जळो तुझें काळें वदन । आज्ञेविण वरुं येसी ॥ १५० ॥
भाउजी कृपाळु । तिहीं दिधलें आज्ञापन ।
परी तुम्हांपासीं कठिणपण । सांगेन खूण ते ऐका ॥ ५१ ॥
भाउजी श्यामसुंदर जगजेठी । बाइजी चांपेकळी गोरटी ।
मज भेटलीं पंचवटीं । आज्ञा वाक्पुटीं वरावें तुम्हां ॥ ५२ ॥
तोंडीचे तोंडी आज्ञापन । सौमित्र म्हणे मानी कोण ।
तोंडीचें तोडीं होईल वरण । सत्य जाण सुंदरी ॥ ५३ ॥
माझा विश्वास नाहीं तुम्हासीं । जन्म कंठणें पायापासीं ।
लटिकें बोलिल्या चरणांसी । मुख श्रीरामासी केंवी दावूं ॥ ५४ ॥
थोर श्रमलेति वनांतीं । चरण तळहातीन हातीं ।
दोघें शयन करुं एकांतीं । तेणें विश्रांति पावाल ॥ ५५ ॥
लक्ष्मण म्हणे तूं तंव लंड । बोलाची बडबड उदंड ।
घाय हाणोनि फोडीन तोंड । तूं वेश्या रांड व्यभिचारिणी ॥ ५६ ॥
श्रीरामाचें हस्तलिखित । देखल्यावीण न लावीं हात ।
जवळी आलिया करीन घात । म्हणोनि खर्गा हात घातला ॥ ५७ ॥
म्हणे मी कपाळकरीटी । सत्य न माने माझी गोष्टी ।
श्रीरामलिखित पहा दृष्टीं । म्हणोनि पृष्ठी दाविली ॥ ५८ ॥

श्रीरामांच्या सूचनेप्रमाणे तिची संभावना :

श्रीरामाचीं हस्ताक्षरें । सार्थक वाचिली सौमित्रें ।
वेणी दंड धरोनि करें । बलात्कारें पाडिली ॥ ५९ ॥
मी काय धाकुटी कर्णकुमारी । मज झोंबोनि पाडितां पृथ्वीवरी ।
मीच पडतें धरणीवरी । पुरुषार्थ करीं प्राणनाथा ॥ १६० ॥
पाय देवोनि उरावरी । सओष्ठनासिका शस्त्रधारीं ।
सरसकटून क्षणामाझारीं । राहिला दुरी शस्त्रेसीं ॥ ६१ ॥
घायें उडविलें कपटपण । क्रूर राक्षसी अति दारुण ।
बारा हस्त एकैक स्तन । नाकेंवीण विक्राळ ॥ ६२ ॥

तिचा आक्रोश व पलायन :

शंख करी सुबद्ध । फफें करीत निघें शब्द ।
नाकेंवीण अति विरुद्ध । धरिला क्रोध सौमित्रीं ॥ ६३ ॥
जैसें म्यां केलें कपट । तैसेचि जालें सपाट ।
याचा मी भरीन घोंट । मुख अचाट पसरिलें ॥ ६४ ॥
मूख पसरी गिळावयासी । तंव लक्ष्मण शस्त्रातें हातवसीं ।
घाव घालावा जो शिसी । तंव राक्षसी पळाली ॥ ६५ ॥

लक्ष्मणाने घडलेले श्रीरामांना निवेदन केले :

सौमित्र आला पंचवटीं । श्रीरामासी सांगितली गोष्टी ।
समूळ राक्षसी ते खोटी । टाळी पिटिती परस्पर ॥ ६६ ॥
धन्य श्रीराम सूर्यवंशीं । कपटी ओळखिली राक्षसी ।
पत्र लिहिलें पाठीसीं । तेणें म्यां तिसी दंडिलें ॥ ६७ ॥
पत्र पडतें तिच्या हातीं । तैं ते भोवती आम्हांभोंवती ।
भली श्रीरामें केली युक्ती । पुष्ठपत्रार्थी दंडविली ॥ ६८ ॥
तुझी आज्ञा आत्यंतिक । आज्ञेनें तिसी लाविली सीक ।
सओष्ठ छेदोनि नासिक । विरुप देख ते केली ॥ ६९ ॥
सुपायीएवढी नखें देखा । यालागीं म्हणती शूर्पणखा ।
सौमित्रें छेदोनि नासिका । टाकिलें उदकामाझारीं ॥ १७० ॥
शूर्पणखेचें छेदिलें नाक । ते तीर्थी मासे निर्नासिक ।
अद्यापि देखती लोक ऐसी सुटंक दंडिली ॥ ७१ ॥
तिचा न घ्यावा निजप्राण । ऐसी तुझी आज्ञा पूर्ण ।
यालागीं ते राखिली जाण । गेली पळोन पद्मपुरा ॥ ७२ ॥
तंव सीतेसी म्हणे रघुनंदन । सुमित्रपत्‍नीचें लग्न ।
नासिका लावोनि सुलग्न । आला सावधान सौमित्र ॥ ७३ ॥

या घटनेपासून राक्षसांशी भांडणाला प्रारंभ :

रणबोहलें सोहळियाकारणें । होईल बाणाचें उटणें ।
अशुद्धें आंबा शिपणें । तळीं बसविणें शस्त्राचें ॥ ७४ ॥
येथे नाचेल रणधेंडा । ओवाळणी पडती राक्षसमुंडा ।
आयणी पायणी दोहीं कडां । शस्त्रें भडभडां पडतील ॥ ६५ ॥
श्रीराम बोलिला आपण । झालें कलहासी कारण ।
त्रिशिरा आणि खर दूषण । निर्दळीन रणकंदनें ॥ ७६ ॥
ऐसें बोलतांचि जाण । बाहूंसी आलें स्फुरण ।
करावया अरिमर्दन । धनुष्यबाण उचलिले ॥ ७७ ॥
एकाजनार्दना शरण । शरण आलें श्रीरामा स्फुरण ।
निर्दळील खरदूषण । श्रोतीं अवधान मज द्यावें ॥ ७८ ॥
इति भावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
शूर्पणखाविरुपकरणं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
॥ ओंव्या १७८ ॥ श्लोक ६ ॥ एवं १८४ ॥



GO TOP