श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ षडधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण परित्यक्तस्य लक्ष्मणस्य सशरीरं स्वर्गे गमनम् -
श्रीरामांनी त्याग केल्यावर लक्ष्मणांचे सशरीर स्वर्गगमन -
अवाङ्‌मुखमथो दीनं दृष्ट्‍वा सोममिवाप्लुतम् ।
राघवं लक्ष्मणो वाक्यं हृष्टो मधुरमब्रवीत् ॥ १ ॥
श्रीराघव राहुग्रस्त चंद्रम्याप्रमाणे दीन झाले होते. त्यांना मान खाली घालून खेद करतांना पाहून लक्ष्मणांनी मोठ्‍या हर्षाने मधुर वाणीने म्हटले - ॥१॥
न संतापं महाबाहो मदर्थं कर्तुमर्हसि ।
पूर्वनिर्माणबद्धा हि कालस्य गतिरीदृशी ॥ २ ॥
महाबाहो ! आपण माझ्यासाठी त्रास करून घेऊ नये; कारण की पूर्वजन्मांच्या कर्मांनी बद्ध झालेली काळाची गति अशीच आहे. ॥२॥
जहि मां सौम्य विस्रब्धं प्रतिज्ञां परिपालय ।
हीनप्रतिज्ञाः काकुत्स्थ प्रयान्ति नरकं नराः ॥ ३ ॥
सौम्य ! आपण निश्चिंत होऊन माझा वध करून टाकावा आणि असे करून आपल्या प्रतिज्ञेचे पालन करावे. प्रतिज्ञा भंग करणारी माणसे नरकात पडतात. ॥३॥
यदि प्रीतिर्महाराज यद्यनुग्राह्यता मयि ।
जहि मां निर्विशङ्‌कस्त्वं धर्मं वर्धय राघव ॥ ४ ॥
महाराज ! जर आपले माझ्यावर प्रेम आहे आणि जर आपण मला कृपापात्र समजत आहात तर निःशंक होऊन मला प्राणदण्ड द्यावा. राघवा ! आपण आपल्या धर्माची वृद्धि करावी. ॥४॥
लक्ष्मणेन तथोक्तस्तु रामः प्रचलितेन्द्रियः ।
मन्त्रिणः समुपानीय तथैव च पुरोधसम् ॥ ५ ॥

अब्रवीच्च तदा वृत्तं तेषां मध्ये स राघवः ।
दुर्वासोभिगमं चैव प्रतिज्ञां तापसस्य च ॥ ६ ॥
लक्ष्मणांनी असे म्हटल्यावर श्रीरामांची इंद्रिये चंचल झाली - ते धैर्यापासून विचलित झाल्यासारखे झाले आणि मंत्री तसेच पुरोहितांना बोलावून त्यांच्या सर्वांच्या मध्ये तो सारा वृत्तांत सांगू लागले. राघवांनी दुर्वासांचे आगमन आणि तापसरूपधारी काळाच्या समक्ष केली गेलेली प्रतिज्ञा याबद्दल सांगितले. ॥५-६॥
तच्छ्रुत्वा मन्त्रिणः सर्वे सोपाध्यायाः समासत ।
वसिष्ठस्तु महातेजा वाक्यमेतदुवाच ह ॥ ७ ॥
हे ऐकून सर्व मंत्री आणि उपाध्याय गुपचुप बसून राहिले. (कोणी काही बोलू शकले नाही.) तेव्हा महातेजस्वी वसिष्ठांनी हे वाक्य उच्चारले -. ॥७॥
दृष्टमेतन्महाबाहो क्षयं ते रोमहर्षणम् ।
लक्ष्मणेन वियोगश्च तव राम महायशः ॥ ८ ॥
महाबाहो ! महायशस्वी श्रीरामा ! यासमयी जो अंगावर कांटे आणणारा विकट विनाश होणार आहे (तुमच्याच बरोबर जो बर्‍याच प्राण्यांचे साकेत गमन होणार आहे) आणि लक्ष्मणांशी जो वियोग होऊन राहिला आहे, हे सर्व मी तपोबल द्वारा आधीच पाहिलेले आहे. ॥८॥
त्यजैनं बलवान् कालो मा प्रतिज्ञां वृथा कृताः ।
विनष्टायां प्रतिज्ञायां हि नष्टायां धर्मो हि विलयं व्रजेत् ॥ ९ ॥
काळ फार प्रबळ आहे. तुम्ही लक्ष्मणाचा त्याग करा. प्रतिज्ञा खोटी करू नका, कारण प्रतिज्ञा नष्ट झाल्यावर धर्माचा लोप होईल. ॥९॥
ततो धर्मे विनष्टे तु त्रैलोक्यं सचराचरम् ।
सदेवर्षिगणं सर्वं विनश्येत् तु न संशयः ॥ १० ॥
धर्माचा लोप झालातर चराचर प्राणी, देवता तसेच ऋषिंसहित सारे त्रैलोक्य नष्ट होऊन जाईल, यात संशय नाही. ॥१०॥
स त्वं पुरुषशार्दूल त्रैलोक्यस्याभिपालनात् ।
लक्ष्मणेन विना चाद्य जगत् स्वस्थं कुरुष्व ह ॥ ११ ॥
म्हणून पुरूषसिंह ! तुम्ही त्रिभुवनाच्या रक्षणावर दृष्टि ठेवून लक्ष्मणांचा त्याग करा आणि त्यांच्या शिवाय आता धर्मपूर्वक स्थित राहून संपूर्ण जगाला स्वस्थ आणि सुखी बनवा. ॥११॥
तेषां तत् समवेतानां वाक्यं धर्मार्थसंहितम् ।
श्रुत्वा परिषदो मध्ये रामो लक्ष्मणमब्रवीत् ॥ १२ ॥
तेथे एकत्र जमलेल्या मंत्री, पुरोहित आदि सर्व सभासदांच्या त्या सभेमध्ये वसिष्ठ मुनींनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून श्रीराम लक्ष्मणांना म्हणाले - ॥१२॥
विसर्जये त्वां सौमित्रे मा भूद् धर्मविपर्ययः ।
त्यागो वधो वा विहितः साधूनां ह्युभयं समम् ॥ १३ ॥
सौमित्रा ! मी तुझा परित्याग करत आहे; ज्यायोगे धर्माचा लोप होणार नाही. साधु पुरूषाचा त्याग केला जावो अथवा वध - दोन्ही समानच आहेत. ॥१३॥
रामेण भाषिते वाक्ये बाष्पव्याकुलितेन्द्रियः ।
लक्ष्मणस्त्वरितं प्रायात् स्वगृहं न विवेश ह ॥ १४ ॥
श्रीरामांनी इतके म्हणताच लक्ष्मणांच्या नेत्रात अश्रु दाटून आले. ते तात्काळ तेथून निघाले. आपल्या घरापर्यंतही गेले नाहीत. ॥१४॥
स गत्वा सरयूतीरं उपस्पृश्य कृताञ्जलिः ।
निगृह्य सर्वस्रोतांसि निःश्वासं न मुमोच ह ॥ १५ ॥
शरयूच्या किनार्‍यावर जाऊन त्यांनी आचमन केले आणि हात जोडून संपूर्ण इंद्रियांना वश करून प्राणवायुचा निरोध केला. ॥१५॥
अनिःश्वसन्तं युक्तं तं सशक्राः साप्सरोगणाः ।
देवाः सर्षिगणाः सर्वे पुष्पैरभ्यकिरंस्तदा ॥ १६ ॥
लक्ष्मणांनी योगयुक्त होऊन श्वास घेणे बंद केले आहे - हे पाहून इंद्र आदि सर्व देवता, ऋषि आणि अप्सरा त्या समयी त्यांच्यावर पुष्पवृष्टि करूं लागले. ॥१६॥
अदृश्यं सर्वमनुजैः सशरीरं महाबलम् ।
प्रगृह्य लक्ष्मणं शक्रः त्रिदिवं संविवेश ह ॥ १७ ॥
महाबली लक्ष्मण आपल्या शरीरासहच सर्व मनुष्यांच्या दृष्टितून अदृश्य झाले. त्या समयी देवराज इंद्र त्यांना बरोबर घेऊन स्वर्गात निघून गेले. ॥१७॥
ततो विष्णोश्चतुर्भागं आगतं सुरसत्तमाः ।
दृष्ट्‍वा प्रमुदिताः सर्वे पूजयन्ति स्म राघवम् ॥ १८ ॥
भगवान्‌ विष्णुंचे चतुर्थ अंश असलेल्या लक्ष्मणांना आलेले पाहून सर्व देवता हर्षाने भरून गेल्या आणि त्या सर्वांनी प्रसन्नतापूर्वक लक्ष्मणांची पूजा केली. ॥१८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षडुत्तरशततमः सर्गः ॥ १०६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकशेसहावा सर्ग पूरा झाला. ॥१०६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP