॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ४ था

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

नामकृपेंच शंभु अविनाशी । साज अमंगल मंगलराशी ॥
शुक सनकदि सिद्ध मुनि योगी । नामकृपेंच आत्मसुखभोगी ॥
नारद जाणति नाम-बलातें । जग प्रिय हरिहर हरिसि हरा ते ॥
नामजपें प्रभु करी प्रसादा । भक्तमुकुटता ये प्रल्हादा ॥
ध्रुव सग्लानि जपुनि हरिनामा । पावे निश्चल अनुपम धामा ॥
स्मरुनि पवनसुत पावन नामा । ठेवी करुनी निजवश रामा ॥
गजगणिका अति पतित अजामिल । मुक्त होती हरिनामबलें किल ॥
किति वानूं नामाची महती । राम नामगुण गाउं न शकती ॥

दो० :- रामनाम हा कल्पतरु कलिं कल्याणनिवास ॥
स्मरुनि, भांग जो तो बने तुलसी तुलसीदास ॥ २६ ॥

शंभु नामाच्या प्रसादाने (कृपेने) च अविनाशी झाले व त्यांचा वेष (साज) आचार, अमंगल असून सुद्धा सर्व मंगलाचे निधान झाले. ॥१॥ शुक, सनकादि, मुनी नामकृपेनेच आत्मानंद (ब्रह्मानंद) भोक्ते बनले, कोणी योगी बनले व कोणी सिद्ध बनले व सुख भोगू लागले ॥२॥ नारदाला नामाचे सामर्थ्य (प्रताप)कळले, उमगले, हरि सर्व जगाला प्रिय आहेत, हरीला हर प्रिय आहेत; पण हरी आणि हर या दोघांनाही नारद प्रिय झाले आहेत. (ते नाम सामर्थ्यानेच) ॥३॥ प्रल्हादाने नामजप केला म्हणून प्रभु प्रसन्न झाले व प्रल्हाद भक्त-मुकुट (भक्त शिरोमणी) बनले.॥४॥ दीन दु:खी झालेल्या ध्रुवाने हरिनामाचा जप केला व निश्र्चल अनुपम धाम प्राप्त करून घेतले ॥५॥ पवनसुत हनुमंताने पावन राम नामाचे स्मरण करुन रामचंद्रास आपल्या मुठीत ठेवले.॥६॥ गज आणि अति पापी गणिका (वेश्या) व अजामिळ सुद्धा हरिनामाच्या प्रभावाने सहज मुक्त झाले ॥७॥ तेव्हा नामाचा महिमा किती व कोठवर सांगू ! राम सुद्धा नामगुणाचे वर्णन करू शकणार नाहीत.॥८॥ दो.- रामनाम हा कल्पतरु असून कलियुगात कल्याणाचे निवासस्थान आहे; जो भांग होता तो तुलसीदास त्याच्या स्मरणाने तुळस झाला. ॥दो. २६॥

त्रय कालीं चहूं युगीं त्रिलोकीं । नाम जपुनि बहु जीव विशोकी ॥
वेद-पुराण-संत-मत हें हो! । सकल सुकृत फल रामीं स्‍नेहो ॥
ध्यानें कृतयुगिं मखविधिं दूजे । द्वापरिं परितोषे प्रभु पूजें ॥
कलि केवल मलमूल मलीनहि। पाप पयोनिधि जनमन मीनहि ॥
नाम कामतरु करालकाळा । स्मरतां शमवि सकल जग-जाळा ॥
रामनाम कलिं अभिमत दाता । हित परलोक लोकिं पितृ-माता ॥
कलियुगिं कर्म न भक्ति विवेकु । रामनाम अवलंबन एकू ॥
कालनेमि कलि कपटनिधानू । नाम समर्थ सुमति हनुमानू ॥

दो० :- रामनाम नरकेसरी कनककशिपु कलिकाल ॥
जापक ते प्रल्हादसे सुररिपु वधि जनपाल ॥ २७ ॥

चारी युगात तिन्ही लोकात व तिन्ही काळात नामाचा जप करुन पुष्कळ जीव शोकरहित झाले (मुक्त झाले)॥१॥ अहो ! वेद, पुराणे व संत यांचे हेच मत आहे की सर्व सुकृताचे फळ म्हणजे रामावर स्नेह हेच होय.॥२॥ पहिल्या कृतयुगात ध्यानाने (योगाने) दुसर्‍या-त्रेतायुगात यज्ञयागादि कर्माने व द्वापारयुगात पूजा (व्रतादि) केल्याने प्रभु प्रसन्न होतात.॥३॥ कलियुग केवळ पापांचे मूळ आहे व मलीन आहे. पापसागरात लोकांची मने तर मासेच बनलेली असतात.॥४॥ कराल कलिकालात रामनाम हा कल्पतरू आहे व त्याचे स्मरण केले असता या जगरूपी जाळाला तो शमवितो.॥५॥ कलियुगात इच्छित फळ देणारे रामनाम आहे. ते परलोकसाधनात हित-मित्र आहे. व या लोकीं आई बापासारखे आहे.॥६॥ कलियुगात एक मुख्य आधार रामनाम आहे; कर्म-भक्ती व ज्ञान हे आधार नाहीत.॥७॥ कलियुग सर्व कपटांचा सागर कालनेमी (राक्षस) आहे, पण रामनाम समर्थ व सुबुद्धिमंत हनुमान आहे.॥८॥ कलिकाल हा हिरण्यकशिपु असून रामनाम नृसिंहावतार आहे, रामनाम जप तत्पर असणारे हे प्रल्हाद आहेत. देवांच्या त्या शत्रुचा वध करून आपल्या दासांचे पालन करणारा तो (रामनाम) नृसिंह भगवान आहे. ॥दो. २७॥

भाव-कुभाविं चिडुनि अळसानें । दशदिशिं मंगल नाम-जपानें ॥
स्मरुनि नाम तें राम-गुण-कथा । वदें नमुनि रघुनाथा माथा ॥
सर्व सुधारिल तो मम दोषू । करत कृपा तत्कृपें न तोषू ॥
सुधनी राम कुसेवक मी तों । राखि दयानिधि निजशीलें तो ॥
लोकीं वेदिं सुसाहिब-रीती । परिसुनि विनति जाणते प्रीती ॥
निर्धन धनी ग्रामनर नागर । पंडित मूढ मलीन सुभास्वर ॥
सुकवि कुकवि निजमति अनुसारें । स्तविति नृपा नारी नर सारे ॥
साधुसुजाण सुशीलहि नृपती । ईश-अंश-भव कृपाकर अती ॥
श्रवुनि सुवचिं सकलां सन्मानी । जाणुनि भक्ती नति-गति-वाणीं ॥
असे स्वभावें प्राकृत महिपति । ज्ञानी-शिरोमणी कोसलपति ॥
राम तोषती प्रेमें निर्मल । मज सम जगिं कुणि मंद अमंगल ॥

दो० :- शठदसाच्या कृपानिधि राखिल प्रीति-रुचींस ॥
करि उपलां जलयान जो सुमति सचिव कपिरीस ॥ २८ रा ॥
मीहि म्हणवितो म्हणति जन राम सहति उपहास ॥
स्वामी सीता-नाथसे सेवक तुलसीदास ॥ २८ म ॥

सद् भावनेने, दुर्भावनेने, चिडून, आळसाने कसेही नाम जपा दशदिशांस मंगल-प्राप्ती होणारच.॥१॥ आत्मकार्पण्य व रामगुणवर्णन - त्या नामाचे स्मरण करून व रघुनाथाला मस्तक नमवून मी रामगुण कथा करतो.॥२॥ माझे सर्व दोष रघुनाथ सुधारील कारण त्याच्या कृपेला कृपा करण्यात कधी तृप्ती वाटत नाही (त्याची नामाची कृपा झाली की, कृपा करण्यात रामचंद्राला कधी तृप्ती वाटत नाही.)॥३॥ मी तर कुसेवक आहे पण राम सुस्वामी आहेत; व ते दयानिधी आहेत म्हणून त्यांनी आपल्या स्वत:च्या शीलाने माझे रक्षण केले.॥४॥ वेदामध्ये व लोकात सुद्धा सुस्वामीची ही रीत (प्रसिद्ध) आहे की (सेवकाची) विनंती-प्रार्थना ऐकून ते प्रीती जाणतात-ओळखतात ॥५॥गरीब-श्रीमंत, गावंढळ-चतुर, पंडित-मूर्ख, मलीन-अति तेजस्वी चांगले कवि, वाईट कवि, स्त्रिया व पुरुष इत्यादि सर्वच आपाआपल्या बुद्धी प्रमाणे राजाची स्तुती करतात.॥६-७॥ साधु, सुजाण व सुशील राजा ईश्वरांश संभूत असल्याने अति कृपाळू असतो.॥८॥ त्यामुळे तो सर्वांनी केलेली स्तुती ऐकतो व त्यांच्या नतीने (नम्रतेने) गतीने व भाषणाने त्यांची भक्ती (प्रीती) जाणतो व चांगल्या शब्दांनी सर्वांचाच सन्मान करतो.॥९॥ प्राकृत राजे सुद्धा स्वभावताच असे (सुस्वामी) असतात. कोसलपती तर सर्व ज्ञान्यांचे शिरोमणीच आहेत. ॥१०॥ ते राम निर्मळ स्नेहानेच प्रसन्न होतात. पण माझ्या सारखा मंद व अमंगल (मलीन मनाचा) सर्व जगात दुसरा कोण आहे ! (कोणी नाही) ॥११॥ दो० - मी जरी शठ सेवक असलो तरी राम माझी प्रीती रूचि राखतील, (अशी मला खात्री वाटते) कारण ते इतके कृपानिधी आहेत की त्यांनी पाषाणांस नौका बनविले व माकडांना व खलांना आपले सचिव बनवून सुमति केले.॥दो०-२८रा॥ मी सांगतो की मी सीतापति रामचंद्रांचा सेवक आहे. लोकही उपहासाने असे म्हणतात की कुठे सीतापती सारखे स्वामी व कुठे तुलसीचा दास ! पण हा सर्व उपहास राम सहन करतात. ॥ २८ म॥

अघ धिटाइ अतिशय मम खोडी । ऐकुनि नरकहि नाका मुरडी ॥
जाणुनि मन निज भयें भीतसे । स्वप्निं राम मम अघ न बघतसे ॥
परिसुनि, बघुनि विचारुनि चित्तें । प्रभु वानिति मम बुद्धि-भक्तितें ॥
वदति अबद्ध हृदयिं रस-भरती । जन-मन जाणुनि राम रीझती ॥
प्रभुमनिं राहि न चूक कृतीची । स्मरती शतदां स्थिती हृदींची ॥
अघें व्याध इव ज्या हत वाली । करि सुकंठ मग तीच कुचाळी ॥
तीच कृती मग बिभीषणाची । स्वप्निंहि रामा स्मृति न तयाची ॥
भेटत भरता त्यां गौरविले । रघुवीरें नृपसदसिं वर्णिले ॥

दो० :- प्रभु तरुतळिं विटपीं कपी केले त्यां स्वसमान ॥
तुलसी कुठें न रामसे स्वामी शील-निधान ॥ २९ रा ॥
राम! भलेपण आपलें असे भलें सकलांस ॥
सदा सत्य जर वाक्य हें भले तुलसिदासास ॥ २९ म ॥
कथुनि दोष गुण निज असे पुन्हां नमुनि सर्वांस ॥
वर्णीं रघुवर विशदयश श्रवणें कलिमलनास ॥ २९ चं ॥

(कोणी विचारले तर) मी सांगतो की मी सीतापती रामचंद्रांचा सेवक आहे. लोकही उपहासाने असे म्हणतात की कुठे सीतापती सारखे स्वामी व कुठे तुलसी-दास ! पण हा सर्व उपहास राम सहन करतात.॥२८ म॥ माझे पाप माझा दोष व उद्धटपणा इतका मोठा आहे. की ऐकून नरक सुद्धा नाक मुरडूं लागतो ॥१॥ हे जाणून माझे मनच भिऊन स्वत: घाबरते; पण हे माझे पाप किंवा दोष वगैरे रामचंद्रांच्या स्वप्नात सुद्धा लक्षात येत नाहीत. ॥२॥ दुसर्‍यांकडून ऐकून व स्वत: आपल्या मनाशी विचार करून पाहून प्रभु (उलट,) माझ्या बुद्धीची व भक्तीची वाहवाच करतात.॥३॥ भाषा वेडीवाकडी असली आणि हृदयात जर प्रीतीला भरती येत असेल तर दासांचे मन ओळखून राम प्रसन्न होतात॥४॥ (कारण) प्रभूंच्या मनात आपल्या सेवकांच्या कृतीची चूक राहण्यास जागाच नाही; परंतु ते आपल्या सेवकांच्या अंत:करणाच्या स्थितीची त्यातील प्रेमभावनांची शंभर वेळा आठवण करीत असतात॥५॥ ज्या पापास्तव – ज्या अपराधामुळे रघुवीराने एखाद्या व्याधाप्रमाणे वालीचा वध केला ती कुचाली पुढे सुग्रीवाने केली.॥६॥ मग बिभीषणाने सुद्धा तेच कर्म केले पण रामचंद्रांनी त्यांचे दोष स्वप्नातही स्मरण केले नाहीत.॥७॥ (उलट) भरत भेटीच्या वेळी त्यांचा गौरव केला व राजदरबारात रघुवीराने त्यांची प्रशंसा केली.॥८॥ दो.- प्रभू रामचंद्र झाडाखाली (बसलेले असत) व वानरे त्याच झाडाच्या फांद्यावर वसत, असे असता त्यास आपल्या समान केले. हे तुलसीदासा ! रामचंद्रांसारखे शीलाचे निधान स्वामी जगात कोठेही नाहीत॥२९ रा॥ हे प्रभो! रामा! आपले चांगुलपण सर्वांनाच चांगले असते हे वाक्य जर सदा खरे तर ते आपले चांगुलपण तुलसीदासाचे सुद्धा भले-चांगले करीलच (यात संशय नाही) ॥२९म॥ याप्रमाणे मी आपले दोष गुण वर्णन करून श्रीरघुवीराचे उज्वल यश वर्णन करतो; त्याच्या श्रवणाने सकल कलि कलुष यांचा (मल, पाप) नाश होईल. ॥ २९ चं ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP