॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय १० वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

सखे मोह असं समजुनि सोडा । रति रघुवीर-सितापदिं जोडा ॥
होय पहाट राम-गुण गातां । जागे जगमंगल सुख-दाता ॥
शौचा स्नाना राम आटपति । शुचि सुजाण वट-दुग्ध मागवति ॥
अनुजासहित जटा शिरिं वळल्या । सचिव-नेत्रिं जलधारा गळल्या ॥
हृदयिं दाह अति उदास वदनें । वदति जुळुनि कर सुदीन वचनें ॥
नाथ ! म्हणाले कोशलनाथ किं । जा रथ घेउनि सह रघुनाथ किं ॥
दाखवूनि वन गंगे स्नपवुनि । उभय बंधुना आणा परतुनि ॥
लक्ष्मण रामा सीते आणा । हरुनी संशय संकोचांना ॥

दो० :- हें नृप वदले, स्वामि जें म्हणतिल करीन तेविं ॥
विनवुनि पायीं पडुनि रडुं लागे बालक जेविं ॥ ९४ ॥

मित्रा ! असे समजून मोह सोडा आणि सितारघुवीरचरणीं प्रेमभक्ती मिळवा ॥ १ ॥ लक्ष्मण रामगुणगान करीत असताच पहाट झाली ॥ २ ॥ सर्व शौच व स्नानादि करुन शुचि व सुजाण रामचंद्रांनी वडाचा चीक मागविला ॥ ३ ॥ नंतर (त्या चिकाने) अनुजाच्या सहित आपल्या केसांच्या जटा वळल्या (हे पाहून) सचिवाच्या – सुमंत्राच्या नेत्रातून जलधारा गळू लागल्या ॥ ४ ॥ सुमंत्रांच्या हृदयात अति दाह झाला व मुख अति उदास झाले (पण) हात जोडून अति दीन वाणीने म्हणाले की - ॥ ५ ॥ नाथ ! मला कोसलनाथ म्हणाले की रथ घेऊन रघुनाथाबरोबर जा ॥ ६ ॥ वन दाखवून, गंगेचे स्नान घालून दोघा भावांना परत घेऊन या ॥ ७ ॥ लक्ष्मण, राम व सीता यांना (त्यांचे) सर्व संशय व संकोच दूर करून परत आण ॥ ८ ॥ राजांनी असे सांगितले आहे, आता (गो) स्वामी, आपण जसे सांगाल तसेच मी करीन मी हा देह आपणावरुन ओवाळून टाकतो अशी विनंती करुन तो (सुमंत्र) रघुवराच्या पायाशी पडून लहान मुलासारखा हुंदके देऊन रडू लागला ॥ दो० ९४ ॥

कृपा करुनि करणें तें ताता । कीं न अयोध्या होइ अनाथा ॥
राम सुमंत्रा उठवुनि बोधित । तात धर्ममत तुम्हिं सब शोधित ॥
शिबि दधीचि हरिचंद नरेश । धर्मास्तव किति सहती क्लेश ॥
रंतिदेव बलि सुज्ञ भूपती । सहुनि कष्ट किति धर्म राखती ॥
धर्म न दुसरा जगिं सत्यासम । वानिति वेद पुराणें आगम ॥
झाला सुलभ धर्म मज तो कीं । त्यजत अयश पसरे त्रय लोकीं ॥
संभावितास अपयश लाहो । मरण कोटिसम दारुण दाहो ॥
तुम्हां तात बहु काय सांगुं बरं । पाप-लाभ देतां प्रत्युत्तर ॥

दो० :- पितृपद धरुनी कोटि नति सांगा जोडुनि हात ॥
चिंता कसली ही जरा करू नका मम तात ॥ ९५ ॥

हे तात ! जेणे करुन अयोध्या अनाथ होणार नाही असेच आपण कृपा करुन करा ॥ १ ॥ श्रीरामांनी सुमंत्रास उठवून त्याची उत्तम प्रकारे समजूत घातली (ते म्हणाले) हे तात ! तुम्ही सर्व धर्मसिद्धांतांना उत्तम प्रकारे जाणतां ॥ २ ॥ राजा शिबी, दधिची आणि राजा हरिश्चंद्र यानी धर्मासाठी कोट्यवधि (अनंत) कष्ट सहन केले ॥ ३ ॥ सुजाण राजा रंतिदेव आणि दैत्यराज बलि यानीही अनेक कष्ट सोसून धर्माचे संरक्षण केले ॥ ४ ॥ सत्यासारखा दुसरा धर्म नाही, असे वेदपुराणे व तंत्रादि शास्त्रे वर्णन करतात ॥ ५ ॥ तो धर्म मला सुलभ झाला असून (आहे) त्याचा त्याग केल्यास तिन्ही लोकांत अपयश पसरेल की ! ॥ ६ ॥ संभविताला अपयश मिळणे कोटी मरणांसारखे दारुण दाहकारक आहे ॥ ७ ॥ तात ! मी तुम्हाला फार काय सांगावे बरे ! प्रत्युत्तर दिल्याने पाप पदरात पडेल ॥ ८ ॥ वडिलांचे पाय (माझ्यातर्फे) धरुन माझे कोटी नमस्कार सांगा व हात जोडून सांगा तात ! माझी कसलीही जरा सुद्धा चिंता करु नका ॥ दो० ९५ ॥

तुम्हिं तर पितृसम अति हित मातें । तात विनवितो जुळुनि करांतें ॥
तें कर्तव्य सर्वपरि तुमचें । पित्या होइ शुच्-दुःख न अमचें ॥
हा रघुनाथ-सचिव संवादू । श्रवुनि सपरिजन विकल विषादू ॥
वचन कांहि कटु लक्ष्मण वदती । प्रभु अति अनुचित गणुनि वर्जती ॥
संकोचुनी शपथ निज घालुनि । अनुज निरोप न वदणें जाउनि ॥
नृप-संदेश सचिव मग सांगति । वनीं क्लेश सीते न साहवति ॥
सीतेनें घरिं परतुन यावें । असें तुम्हीं रघुवरा करावें ॥
नतर पूर्ण अवलंब-विहीना । मज जगवे न जलाविण मीना ॥

दो० :- सुख सासरिं माहेरिं सब, जसें जिथें मन मानि ॥
सीता राहि सुखेन तशि जोंवर विपत्ति - हानि ॥ ९६ ॥

तुम्ही तर पित्यासारखेच माझे अति हितकर्ते आहात म्हणून तात ! मी हात जोडून विनवितो की ॥ १ ॥ जेणे करून आमच्या पित्यास आमच्या शोकाने दु:ख होणार नाही हे करणे हे तुमचे सर्व प्रकारे कर्तव्य आहे ॥ २ ॥ हा रघुनाथ व सचिव यांचा संवाद ऐकून परिजनांसह निषादराज व्याकुळ झाला ॥ ३ ॥ (मग) लक्ष्मण काही कटु वचने बोलले; असे बोलणे अति अनुचित आहे असे समजून रामचंद्रांनी पुढे बोलण्यास मनाई केली ॥ ४ ॥ राम ओशाळे झाले व आपली शपथ घालून (त्यांनी सचिवास सांगितले की) लक्ष्मणाचा निरोप जाऊन (गेल्यावर) सांगू नये (बरं !) ॥ ५ ॥ सुमंत्र – सचिव मग पुन्हा नृपसंदेश सांगू लागला सीतेला वनातील क्लेश सोसवणार नाहीत ॥ ६ ॥ (म्हणून) रघुवरा तुम्ही असा उपाय करणे जरुर आहे की जेणे करुन सीता घरी परत येईल ॥ ७ ॥ नाहीतर पूर्ण निराधार झालेल्या मला, जलविहीन माशासारखेच जगता येणार नाही ॥ ८ ॥ सासरी व माहेरी सर्व प्रकारचे सुख आहे; जिथे सीतेचे मन मानेल तेथे तसे (तेवढे दिवस) सीतेने विपत्ती हानि होईपर्यंत सुखाने रहावे ॥ दो० ९६ ॥

विनति नृपें केली ज्या रीतीं । वदवे ना ती आर्ती प्रीती ॥
श्रवुनि कृपानिधि पितृसंदेशा । सीतें करिति बहुत उपदेशा ॥
श्वशुर सासु गुरु नी प्रिय परिजन । कष्ट, जाल तर होति निवारण ॥
वदे श्रवुनि पतिवच वैदेही । पहा प्राणपति परमस्नेही ॥
प्रभु करुणामय परम विवेकी । छाया देहा त्यजुनि वसे कीं ? ॥
प्रभा जाइ कुठं भानुस सांडुनि । कुठें चंद्रिका चंद्रा टाकुनि ॥
विनवुनि पतिला प्रेममय असें । सचिवा सुंदर वचन वदतसे ॥
श्वशुर-पित्यांसम तुम्हिं हितकारी । प्रत्युत्तरणें अनुचित भारी ॥

दो० :- झाल्यें सन्मुख आर्तिवश अनुचित गणा न तात ॥
आर्यपुत्र-पद-कमलविण नातीं व्यर्थ जगांत ॥ ९७ ॥

राजांनी ज्या प्रकारे विनंती केली तो प्रकार व त्यावेळची त्याची आर्ती (दु:ख, कष्ट, पीडा) व प्रीती सांगता येणे शक्य नाही ॥ १ ॥ वडिलांचा संदेश ऐकून कृपानिधी रघुविरांनी सीतेला बहुत प्रकारे उपदेश केला ॥ २ ॥ (व म्हणाले की) जर परत जाल तर सासू, सासरा, गुरु (वडील माणसे) प्रियजन व प्रिय परिवार यांचे कष्ट निवारण होतील ॥ ३ ॥ पतीचे वचन (भाषण) ऐकून वैदेही म्हणाली की परमस्नेही प्राणपति ! हे पहा की (ऐकावे) ॥ ४ ॥ आपण प्रभु आहात, करुणामय आहात व परम विवेकी आहात (म्हणून म्हणते की) देहाला सोडून छाया कधी दूर राहते कां ? ॥ ५ ॥ भानूला सोडून प्रभा कुठे जाणार ? व चंद्राला सोडून चंद्रिका कुठे जाणार ? ॥ ६ ॥ याप्रमाणे पतीला प्रेममय विनंती करुन (सीता) सचिवाला सुंदर शब्दांत सांगते की ॥ ७ ॥ तुम्ही सासर्‍यांसारखे व वडिलांसारखे हितकर्ते आहात (म्हणून) उलट प्रत्युत्तर देणे अनुचित आहे ॥ ८ ॥ मी दु:खी आर्त झाल्याने आपल्या समोर येऊन सांगावे लागत आहे पण आपण अनुचित मानू नये आर्यपुत्र पदकमलाशिवाय (मला) जगातील सर्व नाती व्यर्थ आहेत. ॥ दो० ९७ ॥

मज पितृवैभव विलास दिसले । नृपकिरीट पदपीठिं लागले ॥
सुखनिधान मम तातगृह असें । चुकुनि न मनिं पतिहीन रुचतसे ॥
सम्राट् श्वशुरहि कोसलराव । भुवनिं चतुर्दश प्रगट प्रभाव ॥
पुढें येउनी सुरपति नेती । आसन सिंहासनार्थ देती ॥
असे श्वशुर कोसला निवासू । प्रिय परिवार मातृसम सासू ॥
विण रघुपति-पद-पद्म परागहि । स्वप्निंहि कुणि मज सुखद गमे नहि ॥
दुर्गम पथवन भूमि महीधर । करि केसरि अपार सरिता सर ॥
कोळि किरात कुरंग विहंगहि । मला प्राणपति सह सब सुखदहि ॥

दो० :- श्वशुर-सासु-पद धरुनि मम अशी विनति सांगावि ॥
चिंता मम न करावि मुळिं मी वनिं सुखी स्वभाविं ॥ ९८ ॥

ज्यांच्या पदपीठाला (पाय ठेवण्याचे आसन वा खडावा) राजांचे मुकुट स्पर्श करतात अशा पित्याचे ऐश्वर्य मी अनुभवले आहे ॥ १ ॥ माझ्या पित्याचे घर असे सुखनिधान असून पतीशिवाय ते मला चुकून सुद्धा रुचत नाही ॥ २ ॥ सासरे तर कोसलाधीश चक्रवर्ती महाराज असून त्यांचा प्रभाव चौदा भुवनांत प्रगट आहे ॥ ३ ॥ सुरपति – इंद्र त्यांना सामोरे येऊन जातात व स्वत:चे अर्धसिंहासन आसन देतात ॥ ४ ॥ असे सासरे आहेत अयोध्या निवासस्थान आहे. सर्व परिवाराला मी प्रिय आहे; आणि आईसारख्या सासवा आहेत ॥ ५ ॥ परंतु रघुपति चरणकमल रजा वाचून यातील कोणी (व काहीही) मला स्वप्नात सुद्धा सुखदायक वाटत नाही ॥ ६ ॥ दुर्गम रस्ते, दुर्गम वन, (कठिण) भूमी व दुर्गम पर्वत, हत्ती, सिंह, पार जाण्य़ास फार कठिण अशा नद्या व तलाव ॥ ७ ॥ तसेच कोळी, भिल्ल वगैरे (क्रूर, चोर, दु:खद लोक) हरणे व पक्षी इ. सर्व प्राणपती बरोबर असता मला सर्व सुखदायकच वाटतात. ॥ ८ ॥ (माझ्या वतीने) सासू सासर्‍यांचे पाय धरुन माझी विनंती सांगावी की माझी मुळीच चिंता करु नये, मी स्वभावताच वनात सुखी आहे ॥ दो० ९८ ॥

प्राणनाथ-संगें प्रिय देवर । वीर धुरीण तूण-कार्मुकधर ॥
दुःख न मजला भ्रम न पथश्रम । चिंता चुकुन न करा जरा मम ॥
श्रवुनि सचिव सिय शीतल वाणी । होइ विकल जणुं फणि मणि हानीं ॥
कान ऐकति नेत्रिं दिसेना । व्याकुळ अति वाणिस वदवेना ॥
राम बहुप्रिया प्रबोध करिती । होइ न छाती शीतल तरि ती ॥
नेण्या कृत बहु यत्‍न बरोबर । रघुनंदन देती उचितोत्तर ॥
रामाज्ञा कुणि मोडुं न शकती । कठिण कर्मगति नसे स्ववश ती ॥
सानुज-राम-सिता-पदिं नमुनी । फिरे वणिज इव मूळ गमवुनी ॥

दो०:- रथ हाकी हय हेषती रामा बघुन बघून ॥
बघुनि निषाद विषण्ण शिर पिटिती पस्तावून ॥ ९९ ॥

विरांत अग्रगण्य व धनुष्य तूणीर धारण करणारे प्रिय प्राणनाथ व भावोजी (दीर – देवर) बरोबर असण्यामुळे ॥ १ ॥ मला कसलेही दु:ख नाही, की चित्तांत भ्रम नाही की प्रवासाचे श्रम नाहीत, म्हणून माझ्य़ाविषयी कधी चुकूनसुद्धा कोणी जराही चिंता करु नये ॥ २ ॥ मणिहानी झाल्यावर फणी (नाग) जसा व्याकुळ होतो तसाच जणूं सचिव सुमंत्र, सीतेची शीतल वाणी ऐकल्याने व्याकुळ झाला ॥ ३ ॥ त्याला कानांनी ऐकूं येईना डोळ्यांनी काही दिसेना आणि वाणीला काही बोलता येईना असा अति व्याकुळ झाला ॥ ४ ॥ तेव्हा रामचंद्रांनी नाना प्रकारे समजूत घातली तरी ती (सुमंत्रांची) छाती शितल होईना ॥ ५ ॥ (रघुपतीस) बरोबर नेण्यासाठी (सचिवाने) पुष्कळ प्रयत्‍न केले; पण रघुनंदन रामचंद्रांनी उचित उत्तर दिले ॥ ६ ॥ रामाज्ञेचे उल्हंघन कोणीच करुं शकत नाही आणि कर्मगति कठिण आहे व ती कोणाच्याही स्वाधीन नाही (तिच्यापुढे इलाज चालत नाही) ॥ ७ ॥ रामलक्ष्मण व सीता यांच्या पायांना वंदन करुन, सुमंत्र मुद्दल गमावून बसलेल्या व्यापार्‍याप्रमाणे परत फिरला ॥ ८ ॥ (सुमंत्राने) रथ हाकला तेव्हा रथाचे घोडे रामाकडे पाहून पुन:पुन्हा खिंकाळू लागले हे पाहून (सर्व) निषाद विषण्ण झाले व पश्चातापाने आपले कपाळ बडवून घेंऊ लागले ॥ दो० ९९ ॥

यद्विरहें पशु विव्हळ ऐसे । प्रजा माय पितृ जगतिल कैसें ॥
सचिवा राम जबरिनें धाडति । आपण मग सुरसरिं तटिं पावति ॥
मागति नाव नाविक आणित । म्हणें मर्म मज तुमचें माहित ॥
चरण-कमल-रज जन वदताहे । मानुष-करणि कांहिं मुळिं आहे ॥
स्पर्शत होइ शिला स्त्री सुंदर । काष्ठ न दगडाहुनी कठिणतर ॥
तरणिहि मुनि-गृहिणीच होय कीं । नाव उडे मम काय सोय कीं ॥
परिवारा सब हिनें पाळतो । काबाड न मुळिं अन्य जाणतो ॥
जाणें असलें प्रभो पार जर । सांगा मज पदपद्म धुण्या तर ॥

छं० :- पद-कमल धुउनी नाविं चढविन नाथ उतराई-विणें ॥
मज राम आपलि आण दहरथ शपथ सत्यचि बोलणें ॥
जरि तीर लक्ष्मण मारि ही जों धुइन अपले पाय ना ॥
तोंवरीं तुलसी-दास-नाथ कृपालु नेइन पार ना ॥ १ ॥
सो० :- नाविक-वच जैं कानिं प्रेमळ वेडे वाकडें ॥
विहसति करुणाखाणि बघुनि बंधु-जानकिकडे ॥ १०० ॥

(ते निषाद व कवी म्हणतात) ज्यांच्या विरहाने पशु सुद्धा असे व्याकुळ झाले त्यांच्या विरहाने प्रजा, माता व पिता जगतील तरी कसे ! ॥ १ ॥ रामचंद्रांनी सुमंत्र सचिवाला जबरीने परत धाडला व आपण देवनदीच्या तीरावर आले ॥ २ ॥ नाविक – अनुराग – (गंगातीरावर गेल्यावर प्रभूंनी) होडी आणण्यास सांगितले पण तो नावाडी होडी आणीना तो म्हणाला की मला तुमचे मर्म माहीत आहे ॥ ३ ॥ लोक म्हणतात की तुमच्या चरणकमलांची धूळ म्हणजे मनुष्य बनविणारी काहीतरी जडीबुटी (मुळी) आहे ॥ ४ ॥ तिचा स्पर्श झाल्याबरोबर शिलेची सुंदर नारी झाली ! (बरं) लाकूड तर दगडापेक्षा काही जास्त कठीण नाही ॥ ५ ॥ माझी होडीसुद्धा मुनी – स्त्रीच होईल. माझी होडी बुडून जाईल नी मग माझ्या पोटापाण्याची सोय काय ? ॥ ६ ॥ माझ्या सर्व परिवाराचे पालनपोषण मी या होडीनेच करतो व दुसरे काबाडकष्ट मला करता येत नाहीत ॥ ७ ॥ म्हणून (थोडक्यात सांगतो की) प्रभु ! आपल्याला जर (माझ्या होडीतून) पलिकडे जायचे असेल तर मला आपले पाय धुण्यास सांगा ॥ ८ ॥ छंद - नाथ ! मी आपले पाय धुवून (मग) होडीत नेऊन बसवीन व होडीचे भाडे मी घेणार नाही पण राम ! मी आपली आण व दशरथांची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत मी आपले पाय धुवत नाही तोपर्यंत जरी लक्ष्मणाने मला बाण मारला तरीसुद्धा ते कृपालु तुलसीदास – नाथ ! मी आपल्याला पार घेऊन जाणार नाही. नावाड्याचे वेडेवाकडे (पण) प्रेमळ बोलणे जेव्हा ऐकले तेव्हा लक्ष्मण व जानकी यांच्याकडे पाहून करुणेची खाण मोठ्याने हसले ॥ दो० १०० ॥

कृपासिंधु वदले स्मित करुनी । तें कर नाव किं जाइ न उडुनी ॥
आण जला धू शीघ्र पदांला । पार ने किं बहु उशीर झाला ॥
एकवार यन्नामा स्मरती । नर अपार भवसागर तरती ॥
विनविति कोळ्या करुणाकर ते । ज्यांच्या त्रिपदां विश्व न पुरतें ॥
पदनख निरखुनि सुरसरि हर्षित । प्रभुवचनें मोहें मति कर्षित ॥
नाविक रामाज्ञेला पाउनि । काथ्वटभर ये पाणी घेउनि ॥
अति मोदें उसळत अनुरागें । प्रक्षाळुं पदसरोज लागे ॥
स्तविती वर्षुनि सुम सुर सगळे । पुण्यपुंज कुणि असा नाढळे ॥

दो० :- क्षालुनि पद, जलपान करि स्वयें सहित परिवार ॥
तारुनि पितरां प्रभुस मग नेई प्रमुदित पार ॥ १०१ ॥

कृपासिंधु स्मित करुन म्हणाले की तुझी नाव बुडून जाणार नाही ते कर की ॥ १ ॥ जल आण व लवकर पाय धू व एकदा आम्हांला (लवकर) पलिकडे घेऊन जा की; उशीर बराच झाला आहे ॥ २ ॥ ज्यांच्या नावाचे एकदा स्मरण केले असता मनुष्य अपार भवसागर तरुन जातात ॥ ३ ॥ व ज्यांच्या तीन पावलांना सर्व विश्व अपुरे पडले ते करुणाकर एका कोळ्याला, नावाड्याला प्रार्थना करते झाले ! ॥ ४ ॥ प्रभूंच्या पायांच्या नखांना पाहून देवनदी – गंगेला हर्ष झाला पण प्रभु – वचनाने तिच्या बुद्धीला मोहाने ओढून घेतली ॥ ५ ॥ रामाची आज्ञा मिळताच नावाडी काथवट भरून पाणी घेऊन आला ॥ ६ ॥ अति आनंदाने व उसळणार्‍या अनुरागाने पदकमले प्रक्षाळूं लागला ॥ ७ ॥ पुष्पवर्षाव करुन सगळे देव स्तुती करू लागले की यांच्यासारखा पुण्यराशी कोणी नाही ॥ ८ ॥ पाय धुवून ते जल (चरणामृत) परिवारासह स्वत: पिऊन पितरांना तारून मग मोठ्या आनंदाने प्रभूंना पार (परतीरास) घेऊन गेला ॥ दो० १०१ ॥

उभीं उतरुनी सुरसरि रेतीं । सिता राम गुह अनुज समेतीं ॥
नाविक उतरुनि करी दंडवत । दिलें न याला प्रभु संकोचित ॥
सीता पतिमन सुजाणणारी । मणि मुद्रिका काढि मुद भारी ॥
घे उतराई कृपाल वदले । विकल नाविकें चरणां धरले ॥
नाथ ! आज मज काय न लाभत । दोष दुःख दारिद्र्य-दाव गत ॥
केली मी बहुकाळ मजूरी । आज देइ विधि भलि भरपूरीं ॥
नको अतां प्रभु कांही मजला । तुझ्या अनुग्रहिं दीनदयाला ॥
द्याल परत येतां जें कांहीं । तो प्रसाद मी धरिन शिरांही ॥

दो० :- प्रभु लक्ष्मण सीता बहू कथिति न नाविक घेत ॥
देति निरोप कृपायतन भक्ति विमल वर देत ॥ १०२ ॥

सीता व राम व गुह लक्ष्मणासमवेत (होडीतून) उतरून सुरसरितेच्या रेतीत उभी राहीली ॥ १ ॥ (नंतर) नावाडी (होडितून) उतरला व त्याने दंडवत नमस्कार केला; (तेव्हा) याला आपण काही दिले नाही असे वाटून प्रभु संकोचित (ओशाळे) झाले ॥ २ ॥ (प्रिय) पतीच्या मनातील भाव उत्तम प्रकारे जाणणार्‍या सीतेने (आपल्या हातातील) रत्‍नमुद्रिका मोठ्या आनंदाने काढली ॥ ३ ॥ कृपालु (राम) नावाड्याला म्हणाले की उतराई घे (तेव्हा) नावाडी व्याकुळ झाला व त्याने प्रभूंचे पाय धरले ॥ ४ ॥ नाथ ! आज मला कोणता लाभ नाही झाला ? दोष दु:ख व दारिद्रयरुपी दावानल नष्ट झाला ॥ ५ ॥ मी पुष्कळ काळ मजूरी केली व आज विधात्याने मला एकदमच चांगली भरपूर मजूरी दिली ॥ ६ ॥ प्रभु ! दिनदयाळ ! तुझ्या अनुग्रहाने (कृपेने) मला आता काही सुद्धा नको ॥ ७ ॥ वनवासातून परत येताना जे काही मला द्याल ते मी प्रसाद म्हणून मस्तकी धारण करीन ॥ ८ ॥ प्रभु, लक्ष्मण, सीता यांनी पुष्कळ आग्रह करुन पाहीले, पण नावाडी काही घेत नाही (असे ठरले) तेव्हा कृपानिधानाने त्याला विमलभक्ती रुपी वर दिला व निरोप दिला ॥ दो० १०२ ॥

करुनी रघुकुल-नाथ मज्जना । पार्थिव पूजुनि करिती नमना ॥
कर जोडुनि मग सीता विनवी । गंगे माइ ! मनोरथ पुरवी ॥
पति-दीरांसह येतां मागें- । कुशल; करिन कीं तव पूजा गे ॥
प्रेमळ सीता-विनति ऐकली । विमल जलीं वर वाणि जाहली ॥
श्रुणु रघुवीर-प्रिया वैदेही । कोण न महिमा तव जाणे ही ॥
लोकप होति विलोकुनिं तव नर । तुज सेविति सब सिद्धि बद्धकर ॥
तुम्हिं आम्हां जें बहुत विनविलें । कृपा करुनि मज महत्त्व दिधलें ॥
तदपि देवि मी आशिस देतें । सफल व्हावया निज वाचेतें ॥

दो० :- प्राणनाथ दीरासहित कुशल कोसले याल ॥
पुरतिल सब मनकामना सुयश जगीं पसराल ॥ १०३ ॥

रघुकुलनाथांनी स्नान केले व पार्थिव पूजन करुन (शंकरास) नमन केले ॥ १ ॥ मग सीतेने दोन्ही हात जोडून गंगेला प्रार्थना केली की माते गंगे ! माझा मनोरथ पूर्ण कर - ॥ २ ॥ पती व दीर यांच्यासह कुशल परत आले की मी तुझी पूजा करीन ॥ ३ ॥ सीतेने केलेली प्रेमळ विनंती ऐकली व निर्मल जलांत श्रेष्ठ वाणी झाली ॥ ४ ॥ रघुवीर – प्रिया वैदेही ऐक ! तुझा प्रभाव – महिमा जगात कोणाला नाही माहीत ? (सर्व जाणतात) ॥ ५ ॥ तुझ्या (कृपादृष्टीच्या) अवलोकनाने मानव लोकपाल बनतात व सर्व सिद्धी हात जोडून तुझी सेवा करीत असतात ॥ ६ ॥ तुम्ही आम्हाला जी मोठी विनंती केलीत ती माझ्यावर कृपा करुन मला मोठेपणा देण्यासाठीच केलीत ॥ ७ ॥ तथापि माझी वाणी सफल व्हावी म्हणून हे देवी ! मी आशीर्वाद देते की ॥ ८ ॥ प्राणपती व दीर यांच्यासह तुम्ही सुखरुप अयोध्येस याल तुमच्या मनातील सर्व कामना पूर्ण होतील व तुम्ही आपले सुयश सर्व जगात पसराल ॥ दो० १०३ ॥

श्रवुनि गांगवच मंगल-मूल हि । सीते मुद गंगा अनुकूल हि ॥
प्रभु मग म्हणति गुहा, घरिं जावें । सुकलें मुख उर दाहा पावे ॥
वदे दीन गुह जोडुनि हातां । श्रुणु रघुकुलमणि विनंति आतां ॥
नाथ ! साथ राहिन पथ दाविन । करिन चरण-सेवाहि चार दिन ॥
ज्या वनिं जाउनि राहति रघुपति । पर्णकुटी मी करिन चारु अति ॥
तैं कथितिल रघुवीर मज जसें । आण आपली करिन मी तसें ॥
राम बघुनि तत्स्नेह सहज तो । नेति सवें अति होइ मुदित तो ॥
गुहें ज्ञातिजन सकल बाहिले । पारितोषुनि त्यां परत धाडिले ॥

दो० :- स्मरुनी प्रभु गणपति-शिवां गंगें नमुनि शिरास ॥
सखा अनुज सीते सहित गत रघुनाथ वनास ॥ १०४ ॥

गंगेचे मंगलमूल भाषण ऐकून व गंगा प्रसन्न झाली आहे हे जाणून सीतेला आनंद झाला ॥ १ ॥ मग प्रभू गुहाला म्हणाले की आता तुम्ही घरी जावे (हे ऐकताच) त्याचे मुख सुकून गेले व हृदयात दाह होऊं लागला ॥ २ ॥ हात जोडून दीन वाणीने गुह म्हणाला की रघुकुल शिरोमणी ! आता माझी विनंती ऐकावी ॥ ३ ॥ नाथ ! मी आपल्या बरोबर राहून आपणांस वाट दाखवीन व चार दिवस (कांही काळ) आपल्या पायांची सेवाही करीन ॥ ४ ॥ मग रघुपती ज्या वनांत जाऊन राहतील तेथे मी सुंदर पर्णकुटी बांधीन ॥ ५ ॥ तेव्हा मग रघुवीर मला जसे सांगतील त्याप्रमाणे मी करीन हे मी आपली शपथ घेऊन सांगतो ॥ ६ ॥ रामचंद्रानी त्याचा तो सहज स्नेह पाहिला व त्याला बरोबर घेतला तेव्हा त्याला फार आनंद झाला ॥ ७ ॥ गुहाने आपल्या सर्व ज्ञाती बांधवांना बोलावून त्यांचा परितोष करुन त्यांना परत धाडले ॥ ८ ॥ प्रभु रघुनाथांनी गणपती व शिव यांचे स्मरण केले, गंगेला मस्तक लववून नमस्कार केला आणि सखा – गुह व अनुज – लक्ष्मण व सीता यांच्या सह वनात गेले ॥ दो० १०४ ॥

त्या दिनिं होइ विटपतळिं वसती । लक्ष्मण सखा सोइ सब करती ॥
प्रातःकृत्यां रघुपति उरकुनि । तीर्थराज बघती प्रभु जाउनि ॥
श्रद्धा स्त्री प्रिय, सत्य सचिव वर । मित्र माधवा समान हितकर ॥
चारि पदार्थ-पूर्ण भंडारू । पुण्यप्रदेश देश सुचारू ॥
क्षेत्र दुर्ग गड गाढ सुशोभन । प्रतिपक्षी स्वप्नींहि पावति न ॥
तीर्थ सकल सेना वरवीरहि । कलुष-अनीक-दलन रणधीर हि ॥
संगम सिंहासन अति शोभन । अक्षयवट छत्रहि मुनि-मोहन ॥
चामर यामुनि-गांग-तरंग । बघत दुःखदारिद्र्यां भंग ॥

दो० :- सेविति सुकृती साधु शुचि पावति सब मन काम ॥
बंदी वेदपुराणं-गण गाती सुगुणग्राम ॥ १०५ ॥

त्या दिवशी (तिसर्‍या रात्री) झाडाखालीच वस्ती केली; लक्ष्मण व सखा यानी सर्व सोई केल्या ॥ १ ॥ प्रात:कालचे सर्व कर्म रघुपतींनी उरकले व प्रभूंनी जाऊन तीर्थराजाचे दर्शन घेतले ॥ २ ॥ तीर्थराजाची श्रद्धा ही प्रिय पत्‍नी आहे, सत्य हा सचिव आहे वेणीमाधवासारखा हितकर्ता मित्र आहे. ॥ ३ ॥ अर्थ, धर्म, काम व मोक्ष या चार पदार्थांनी भंडार (खजिना) पूर्ण भरला आहे व तेथील पुण्य प्रदेश हाच त्या राजाचा देश आहे ॥ ४ ॥ प्रयाग क्षेत्र (हाच) सुंदर मजबूत व दुर्गम असा किल्ला आहे व तो शत्रू स्वप्नात सुद्धा प्राप्त करु शकत नाहीत ॥ ५ ॥ सर्व तीर्थे हीच उत्तम वीरांची सेना आहे व वीर पापरुपी सैन्याचा धुव्वा उडविण्यात रणधीर आहेत ॥ ६ ॥ संगम (त्रिवेणी संगम) हेच अति पवित्र व सुंदर सिंहासन आहे. अक्षयवट हे छत्र असून ते मुनिमनमोहक आहे ॥ ७ ॥ यमुनेचे व गंगेचे तरंग याच चवर्‍या झुलत आहेत व त्यांना पाहताच दु:ख व दारिद्रय यांचा नाश होतो. ॥ ८ ॥ पुण्यात्मे, साधु व पवित्र लोक या तीर्थराजाची सेवा करतात व त्यांच्या मनातील सर्व कामना पूर्ण होतात वेदपुराणांचा समूह हे भाट असून ते तीर्थराजाच्या शुद्ध, निर्मल गुणसमूहाचे वर्णन करतात ॥ दो० १०५ ॥

वदवे कुणा प्रयाग प्रभाव । कलुष-पुंज-कुंजर मृगराव ॥
असा तीर्थपति पाहुनि सुंदर । सुख पावति रघुवर सुख सागर ॥
सीते अनुजा गुहास सांगति । स्वमुखें तीर्थराज महिमा अति ॥
प्रणमुनि बघत बघत वनबागां । वदति महात्म्यां अति अनुरागां ॥
असे येउनी त्रिवेणि पाहति । स्मरतां सकल सुमंगलदा अति ॥
मोदें स्नान करुनि शिवपूजन । केलें सविधि तीर्थ-देवार्चन ॥
प्रभू भरद्वाजाप्रति येती । करत दंडवत मुनि उरिं धरिती ॥
मुनि-मनिं मोद, न जरा सांगवत । ब्रह्मानंद-राशि जणुं पावत ॥

दो० :- देति अशीस मुनीश हृदिं अति मुद असं जाणून ॥
लोचन-गोचर-सुकृत-फल करि विधि जणुं आणून ॥ १०६ ॥

पापसमूहरुपी हत्तींना मृगराज – सिंहाप्रमाणे असणार्‍या प्रयागाचा प्रभाव कोण वदूं शकेल ? (कोणी नाही) ॥ १ ॥ असा सुंदर तीर्थपती पाहून सुखसागर रघुवरास सुख झाले ॥ २ ॥ स्वमुखाने तीर्थराजाचा महामहिमा सीतेला, अनुजाला व गुहाला सांगितला ॥ ३ ॥ तीर्थराजाला प्रणाम करुन वन व बागा बघत बघत अत्यंत अनुरागाने महात्म्य वर्णन केले ॥ ४ ॥ अशा प्रकारे येऊन त्रिवेणीचे दर्शन घेतले; तिचे स्मरण केले असता ती सर्व प्रकारचे सुमंगल देणारी आहे. ॥ ५ ॥ आनंदाने त्रिवेणीत स्नान करुन, मुदित हृदयाने शिव (पार्थिव) पूजन केले व मग सर्व तीर्थदेवांचे यथाविधी पूजन केले ॥ ६ ॥ मग प्रभु भरद्वाजांकडे आले व ते दण्डवत करीत असता मुनींनी त्यास हृदयाशी धरले ॥ ७ ॥ मुनींच्या मनाला जो आनंद झाला त्याचे जरासुद्धा वर्णन करणे शक्य नाही कारण त्यांना जणूं ब्रह्मानंदाची रासच सहज सापडली ॥ ८ ॥ मुनीश्रेष्ठांनी आशीर्वाद दिला व आपल्या सर्व सुकृतांचे फळ आणून जणू विधात्याने नेत्रांस दाखवले असे जाणून त्यांना हृदयात अति आनंद झाला ॥ दो० १०६ ॥

आसन दिधलें कुशला पुसुनी । प्रेमें पूरित केलें पुजुनी ॥
कंद मूल फल अंकुर सुंदर । दे आणुनि मुनि जणुं अमृत वर ॥
सीता-लक्ष्मण-जन-सह शुभ अति । अति रुचि राम मूल फल भक्षति ॥
राम गतश्रम सुखी जाहले । भरद्वाज मृदु वचन बोलले ॥
आज सुफल तप तीर्थे त्यागहि । आज सुफल जप योग विरागहि ॥
सुफल सकल शुभ-साधन-साज । राम तुम्हां अवलोकत आज ॥
लाभ-सीम सुख-सीम न दुसरी । दर्शनिं तुमच्या आस सब पुरी ॥
अतां कृपेनें वर हा द्यावा । स्नेह सहज पद-सरसिजिं व्हावा ॥

दो० :- त्यजुनी तनुवाङ्मनें छल जोंवरि तुझा न दास ॥
स्वप्निंहि तोंवरि सुख नसे कोटि साधनें भास ॥ १०७ ॥

कुशल विचारुन मुनीशाने आसन दिले व पूजन करुन प्रेमाने परिपूर्ण केले ॥ १ ॥ मुनीने सुंदर कंद, मूळ, फळे व अंकुर आणून दिले व ती सर्व जणू उत्तम अमृतच होती ॥ २ ॥ सीता, लक्ष्मण व दास (गुह) यांच्यासह रामांनी अति पवित्र व अति रुचकर मूल फले वगैरे अति रुचीने भक्षण केली ॥ ३ ॥ श्रम परिहार होऊन राम सुखी झाले तेव्हा भरद्वाज मृदु वाणीने बोलू लागले ॥ ४ ॥
भरद्वाजकृत (पुनर्वसु नक्षत्र) रामस्तुती
- आज तपश्चर्या, तीर्थयात्रादि आणि त्याग सुफल झाला आज सर्व जप – योग – विरागांची सुफलता झाली. ॥ ५ ॥ आज सर्व प्रकारच्या साधन – संपत्तीला सुंदर फळ आले कारण राम ! आज आपले (सीता लक्ष्मणासह) दर्शन घडले ॥ ६ ॥ लाभाची परमावधि व सुखाची सीमा याहून दुसरी नाही तुमच्या दर्शनाने सर्व आशा पूर्ण झाल्या ॥ ७ ॥ आता कृपा करुन इतकाच वर द्यावा की आपल्या चरण कमलांच्या ठिकाणी माझा सहज स्नेह उत्पन्न व्हावा. ॥ ८ ॥ दो० :- कर्माने, वाणीने व मनाने अन्य भरवसा सोडून जोपर्यंत (जीव) तुमचा दास होत नाही तोपर्यंत – कोटी साधने केली तरी तो केवळ भास असून सुख स्वप्नात सुद्धा मिळणे शक्य नाही ॥ दो० १०७ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP