॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय १ ला



Download mp3

अनुवादककृत मंगलाचरण

स्र० :- यो द्रष्टुं नैव शक्यःकथमपि मनस चक्षुषा वा कदाचित् ।
मिथ्यामायाऽऽवृतःसन् घनपटलगतो भास्करः खे दिवेव ॥
श्रीरामप्रेरितेन प्रबलगुरुकृपा मारुतेनाऽऽहृतेस्मिन् ।
अज्ञानभ्रान्तिमेघे प्रगट इव भवेदात्मरूपः स रामः ॥ १ ॥
श्लोक :- वैराग्यं लक्ष्मणं वन्दे विवेकं वायुनन्दनम् ॥
शमादिषटकं भरतं शत्रुघ्नं च मुमुक्षुता ॥ २ ॥
पं चामर :- विंदेहराजनन्दिनी निजात्मशान्ति रूपिणी ।
निजस्वरूपभद्रगांक-सुस्थितार्ति हारिणी ॥
विमोहता विशोकता विरागताऽऽद्यलंकृता ।
ह्यनन्त सौख्य दिव्यदीप्ति संयुता हि पातु माम् ॥ ३ ॥

मूळ मंगलाचरण

स्र० :- केकी कण्ठाभनीलं सुरवर विलसद् विप्रपादाब्ज चिन्हम् ।
शोभाढ्यं पीतवस्त्रं सरसिजनयनं सर्वदासुप्रसन्नम् ॥
पाणौ नाराच चापं कपिनिकर युतं बंधुनासेव्यमानम् ।
नौमीड्यं जानकीशं रघुवरमनिशं पुष्पकारूढरामम् ॥ ४ ॥
रथो० :- कोसलेंद्र पदकञ्ज मंजुलौ कोमलावजमहेश वन्दितौ ।
जानकीकरसरोजलालितौ चिन्तकस्य मनभृंगसंगिनौ ॥
कुन्द इंदु दर गौर सुन्दरं अंबिकापतिमभीष्टसिद्धिदम् ।
कारुणीककलकंजलोचनं नौमि शंकरमनंगनोचनम् ॥ ५ ॥

दो० :- उरे एक दिन अवधिचा आर्त अती पुर लोक ॥
चिन्तिति सर्व हि नारिनर कृशतनु रामवियोग ॥ मं १ ॥
शकुन होति सुंदर सकल जन हर्षित चित्तांत ॥
नगर रम्य चौफेर जणुं सुचवी प्रभु येतात ॥ मं २ ॥
माता कौसल्यादि सव अशा मुदित चित्तांत ॥
प्रभु आले श्री अनुज युत कोणि सांगुं बघतात ॥ मं ३ ॥
भरत नयन भुज दक्षिण स्फुरती वारंवार ॥
हर्षति अति जाणुनि शकुन लागति करूं विचार ॥ मं ४ ॥

अनुवादकृत मंगललाचरण –

१) दिवस असून सुद्धा मेघपटलाच्या आड असलेला सूर्य जसा दिसत नाही तसा जो मिथ्या मायेच्या आवरणात असल्यामुळे कधीही व काही केले तरी मनाने किंवा डोळ्याने पाहता येणे शक्य नाही, पण श्रीरामाने प्रेरिलेल्या प्रबल गुरुकृपारुपी वायूने अज्ञान आणि भ्रांतीरुपी मेघाला पळवून लावला म्हणजे जो प्रगट झाल्यासारखा वाटतो, तोच आत्मारुपी राम होय.
२) वैरग्यरुपी लक्ष्मणाला, विवेकरुपी वायुपुत्रला, शमादिषट्करुपी भरताला आणि मुमुक्षुतारुपी शत्रुघ्नाला मी वंदन करतो.
३) आत्मस्वरुपरुपी सिंहासनस्थाच्या मांडीवर अचल बसलेली, सर्व क्लेश हरण करणारी, विदेहस्थिती, विशोकस्थिती व विरक्ती इत्यादि अलंकारांनी विभूषित असलेली, अनंत सौख्यरुपी दिव्य तेजाने युक्त असलेली, स्वात्मशांतीरुपी विदेह राजकन्या (वैदेही) माझे रक्षण करो.

गोस्वामी तुलसीदासकृत मूळ मंगलाचरण –

१) मोराच्या कंठाच्या कांतीसारखे नीलवर्ण सर्व देवात श्रेष्ठ असून विप्रचरण कमलचिन्हाने सुशोभित, अत्यंत शोभासंपन्न, पीतांबरधारी, कमल नयन, सदा सर्वदा सुप्रसन्न, हातात धनुष्यबाण धारण केलेले, वानर समुदायाने युक्त, बंधु लक्ष्मणाने सेवित, पुष्पकविमानात बसलेले, जानकीपती, स्तुती करण्यास योग्य, रघुकुलश्रेष्ठ जे राम, त्यांना मी निरंतर नमस्कार करतो.
२) कोसलपुरीचे स्वामी कोसलेद्र श्रीरामचंद्रांचे सुंदर व कोमल दोन्ही चरणकमल ब्रह्मदेव अज व महादेवद्वारा वंदित आहेत, जानकीच्या करकमलांनी गोंजारलेले आहेत व चिंतकाचा मनरुपी भ्रमर त्यावर आसक्त झालेला आहे.
३) कुंदाच्या फुलासारखे (कोमल), चंद्रासारखे (तेजस्वी) व शंखासारखे (गंभीर), व गौरवर्ण व सुंदर असलेले अंबिकेचे – पार्वतीचे पती इच्छिलेले फळ देणारे, करुणाशील व सुंदर कमलासारखे नेत्र असलेले, कामापासून सोडविणारे जे शंकर त्यांना मी नमस्कार करतो.
राम – रघुनाथ परत येण्याच्या मुदतीचा अवघा एक दिवस बाकी राहीला आहे, त्यामुळे सर्व नगर – लोक अति आर्त झाले आहेत, व रामविरहाने देह कृश झालेले सर्व स्त्री पुरुष चिंतातुर झाले आहेत (की प्रभु का आले नाहीत !) ॥ मं. दो.१ ॥ इतक्यात सर्व सुंदर शकुन होऊं लागले व (ते पाहुन) सगळे लोक चित्तांत हर्षित प्रसन्न होऊं लागले नगर चारी बाजूंनी रमणीय दिसू लागून जणूं सुचवूं लागले की प्रभु रामचंद्र येत आहेत. ॥ मं.दो.२ ॥ कौसल्यादि सर्व माता मनात अशा आनंदित झाल्या आहेत की प्रभु सीता व अनुज लक्ष्मण यांच्यासह आले असे कोणी तरी सांगू पहात आहेत, असे त्यांस वाटूं लागले ॥ मं.दो.३ ॥ (नंदिग्रामी) भरताचा उजवा डोळा व उजवा बाहू वारंवार स्फुरुं लागले शकुनांचा अर्थ जाणून भरत मनांत विचार करु लागले ॥ मं.दो.४ ॥

राहि एक दिन अवधि अधार । जाणुनि दुःख मनास अपार ॥
नाथ न कां अद्याप परतले । कुटिल गणुनि कीं मला विसरले ॥
अहह ! धन्य लक्ष्मण बहुभागी । राम पदारविन्द अनुरागी ॥
कपटी कुटिल हि मी प्रभु जाणति । म्हणून नाथ मज सवें न राखति ॥
कृतीकडे प्रभु बघतिल मम जर । कल्पकोटि शत सुटका नच तर ॥
प्रभु जन अवगुण मनीं न आणति । स्वभावेंच मृदु दीनबंधु अति ॥
हाच भरंवसा मना दृढ अती । होति शकुन शुभ राम भेटती ॥
प्राण राहि जर अवधि संपतां । कोण अधम जगतीं मज परता ॥

दो० :- रामविरह-सागरिं असें मग्न भरत मन होत ॥
विप्र रूप धर पवनसुत तों आला जणुं पोत ॥ १रा ॥
बसले दिसति कुशासनीं जटामुकुट कृशकाय ॥
राम राम रघुपति जपत कमलनयनिं जलजाय ॥ १म ॥

जसे राम निज नगरी आले –
आता फक्त मुदतीतील एक दिवस (प्राणांना) आधार राहीला आहे, हे जाणून भरताच्या मनाला अपार दु:ख झाले ॥ १ ॥ नाथ आज परत आले नाहीत, याचे कारण तरी काय ? का मला कुटील समजून विसरले ? ॥ २ ॥ अहाहा ! लक्ष्मण खरोखर अति धन्य ! आणि महाभाग्यवान आहे, तो रामचरणकमली अनुरक्त आहे (प्रेमी आहे म्हणून तर तो त्यांना सोडून राहीला नाही) ॥ ३ ॥ मी कपटी आणि कुटील आहे हे प्रभूंनी जाणले म्हणून तर नाथांनी मला त्यांच्याबरोबर ठेऊन घेतला नाही ॥ ४ ॥ प्रभु जर माझ्या कृतीकडेच पाहतील तर शतकोटी कल्पे गेली तरी सुद्धा या भवसागरातून माझी सुटका होणार नाही. ॥ ५ ॥ पण प्रभू दासांच्या अवगुणांकडे लक्ष देत नाहीत ते स्वभावानेच अति कोमल व दीन बंधू आहेत. ॥ ६ ॥ हाच माझ्या मनाला मोठा भरवसा आहे, म्हणून वाटते की राम भेटतील (उद्या), शिवाय शुभ शकुनही होत आहेत.॥ ७ ॥ पण जर मुदत संपल्यावर (प्रभु आले नाहीत आणि) माझे प्राण जर राहीले (आपोआप गेले नाहीत) तर माझ्यापेक्षा नीच जगात कोण ? (कोणीच नाही) ॥ ८ ॥ रामविरह सागरात याप्रमाणे भरताचे मन बुडत आहे तोच विप्ररुप धारण केलेला पवनसुत पोत=जहाज बनून आला ॥ दो० रा.॥ मस्तकावर जटा मुकुट, देह कृश झालेला असे भरत कुशासनावर बसलेले दिसले. राम ! राम ! रघुपति ! असा जप करीत असून कमलनयनांतून जल वहात आहे ॥ दो.१ म ॥

बघतां हनूमान अति हर्षे । पुलक गात्रिं लोचनिं जल वर्षे ॥
चित्तीं बहुपरीं सुख मानी । बोले श्रवणसुधासम वाणी ॥
यद्विरहानें निशिदिन झुरतां । गुणगण गाना संतत करतां ॥
रघुकुलतिलक सुजन सुखदाते । प्राप्त कुशल मुनि देवां त्राते ॥
रिपु रणिं विजित सुयश सुर गाती । सानुज सीता प्रभु येताती ॥
श्रवत वचन सब दुःखा विस्मृत । जसा तृषित पीयुषा पावत ॥
तात ! कोण तुम्हिं कोठुन आलां । वचन मला प्रिय परम बोललां ॥
मारुतसुत मी आहे वानर । हनूमान मम नांव कृपाकर ! ॥
दीनबंधू रघुपतिचा किंकर । उठुनी भरत भेटले सादर ॥
भेटत हृदयीं प्रेम न मावत । तनु पुलकित लोचनिं जल धावत ॥
कपि तुज बघुनि दुःख सब मिटलें । आज मला प्रिय राम भेटले ॥
वारंवार विचारिति कुशला । बंधु ! काय मी देऊं तुजला ॥
या संदेशासम जगिं कांहीं । बघत करून विचारा माहीं ॥
येइ न तव ऋण मला फेडतां । प्रभु चरिता मज सांग बघुं अतां ॥
तैं हनुमंत नमुनि पदिं माथा । वदे सकल रघुपति गुण गाथा ॥
वद कपि कधिं कीं स्वामि कृपाघन । दासासम मम करिति आठवण ॥

छं० :- निजदाससम रघुवंशमणि मम करिति आठवण कधि तरी ।
या भरतवचनें नम्र अति, कपिं पुलकुनी चरणां धरी ॥
रघुवीर निजमुखिं यस्य गुणगुण गाति अगजग नाथ जे ।
होती न कां हि विनीत परम पुनीत सद्‌गुण-सिंधु ते ॥ १ ॥
दो० :- प्राणाप्रिय रामास तुम्हिं सत्य वचन मम नाथ ! ॥
घडि घडि भेटति भरत तैं हर्ष न हृदयिं रहात ॥ २रा ॥
सो० :- भरतपदीं प्रणमून गत रामाप्रति शीघ्र कपि ॥
वदे कुशल जाऊन यानिं निघति प्रभु हर्ष युत ॥ २म ॥

भरताची ती दशा पाहताच हनुमंताला अति हर्ष झाला, त्याच्या देहावर रोमांच उभे राहीले व नेत्रातून अश्रूंचा वर्षाव होऊ लागला. ॥ १ ॥ त्याने मनात बहुत प्रकारे सुख मानले व कानांना अमृतासारखी ठरणारी वाणी बोलला ॥ २ ॥ तुम्ही रात्रंदिवस ज्यांच्या विरहाने झुरत आहात व ज्यांच्या गुणगणांचे सतत गान करीत आहात ॥ ३ ॥ ते रघुकुलटिळक सज्जनास सुख देणारे व सर्व देव मुनींचे त्राते रक्षणकर्ते कुशल आले आहेत ॥ ४ ॥ ज्यांनी शत्रुंना युद्धात जिंकले व ज्याचे सुयश देव सुद्धा गात आहेत ते प्रभु सीता व अनुज यांच्यासह येत आहेत. ॥ ५ ॥ हे वचन ऐकताच भरत सर्व दु:ख असे विसरले की जसे तृषार्त अमृत मिळाल्यावर विसरतो. ॥ ६ ॥ (भरत म्हणाले) हे तात ! तुम्ही कोण व कोठून आलांत ? मला परम प्रिय अशी बातमी तुम्ही सांगीतलीत ॥ ७ ॥ (हनुमान म्हणाला) मी मारुतसुत, जातीचा वानर आहे व हे कृपासागरा माझे नाव हनुमान आहे ॥ ८ ॥ दिनबंधू रघुपतीचा मी दास आहे. (हे ऐकताच) भरत उठले व त्याला आदराने भेटले ॥ ९ ॥ कपीला भेटताना प्रेम हृदयात मावेना, शरीर रोमांचित झाले व नेत्रातून घळघळा अश्रू वाहू लागले ॥ १० ॥ (भरत म्हणाले) हे कपि ! तुझ्या दर्शनाने माझे सर्व दु:ख हरपले, मला आज प्रिय रामच भेटले (असे वाटले) ॥ ११ ॥ भरताने वारंवार कुशल विचारले भरत म्हणाले की हे बंधो ! मी तुला काय बक्षिस देऊं ? या संदेशासारखे जगात काही नाही हे मी विचार करुन पाहता ठरले ॥ १२ ॥ म्हणून तुझ्या ऋणाची फेड मला करता येण्यासारखी नाही आता मला सर्व प्रभुचरित्र सांग पाहूं॥ १४ ॥ तेव्हा हनुमंताने भरताच्या पायावर मस्तक नमवून रघुपतीच्या सर्व कथा सांगीतल्या ॥ १५ ॥ (तेव्हा भरत म्हणाले) हे कपी ! कृपाघन स्वामी (राम) कधी काळी आपल्या एखाद्या दासासारखी माझी आठवण काढतात कां ? सांग पाहू.॥ १६ ॥ रघुवंश शिरोमणींनी आपल्या निकटच्या दासासारखी माझी कधी तरी आठवण केली काय ? हे भरताचे अति नम्र वचन ऐकून कपि रोमांचित होऊन भरताच्या पाया पडला (मनात म्हणतो की) जे स्थावर जंगम जगाचे नाथ आहेत ते रघुवीर आपल्या मुखाने ज्याचे गुणगण गातात तो अत्यंत पुनीत सदगुणसागर असा अत्यंत नम्र कां असणार नाही ? ॥ छं १ ॥ हे नाथ ! तुम्ही रामाला प्राण प्रिय आहांत हे माझे वचन सत्य आहे हे ऐकून भरत त्याला वारंवार भेटले व हृदयात हर्ष मावेना ॥ दो०२रा ॥ भरत चरणांना प्रणाम करुन कपी त्वरेने रामाकडे गेला जाऊन सर्व कुशल सांगीतले तेव्हा मग प्रभू विमानात बसून हर्षाने निघाले ॥ दो० २ म ॥

मुदित भरत कोसलपुरिं वळले । गुरुसि वृत्त सगळें सांगितलें ॥
मग मंदिरिं कळविति वृत्तासी । येति कुशल रघुपति नगरासी ॥
ऐकुनि माता उठुनि धावती । प्रभु कुशला सब भरत सांगती ॥
समाचार पुरवासी पावति । नर नारी सब हर्षित धावति ॥
दधि दूर्वा रोचन फलफूल । नव तुलसी दल मंगलमूल ॥
हेमपात्रिं भरुनी भामिनी । गात निघति सिंधुर-गामिनी ॥
उठुनि जसे जे तसे धावले । बाल जरठ नहिं संगिं घेतले ॥
एक विचारिति दुजास काका ! । दिसले दयालु रघुराजा का ? ॥
प्रभु येती हें जाणुनि नगरी । होइ सकल सौंदर्य आगरी ॥
सुंदर वाहे त्रिविध समीर । होइ शरयु अति निर्मल नीर ॥

दो० :- हर्षित गुरु पुरजन अनुज भूसुर वृंद समेत ॥
प्रेमें अति निघती भरत सम्मुख कृपा निकेत ॥ ३रा ॥
सौधीं चढुनी बहुतशा निरखिति गगनिं विमान ॥
दिसत, हर्ष अति, सुस्वरें करिति सुमंगल गान ॥ ३म ॥
राकाशशि रघुपति बघुनि नगर सिंधु हर्षीत ॥
वाढे, कोलाहल किं करि नारितरंग सहीत ॥ ३चंद्र ॥

हनुमान परत गेल्यावर भरत अयोध्येत आले आणि प्रथम वसिष्ठ गुरुंना सर्व समाचार सांगीतला. ॥ १॥ मग राजवाड्यातील अंत:पुरात समाचार कळविला की रघुपती कुशल असून अयोध्येत येत आहेत ॥ २॥ ऐकताच सर्व माता उठून भरताजवळ धावत आल्या. तेव्हा भरताने प्रभुचे सर्व कुशल सांगीतले ॥ ३ ॥ पुरवासी लोकांना हा समाचार कळला. तेव्हा स्त्रिया पुरुष इ. सर्व हर्षाने धावत सुटते. ॥ ४ ॥ दही, दूर्वा, गोरोचन, फळे, फुले आणि सर्व मंगलांचे मूळ असणारी ताजी तुलसीपत्रे, तुलसीमंजिरी इ. वस्तू सोन्याच्या तबकात भरुन सुंदर स्त्रिया गात (थव्या थव्याने) गजगतीने निघाल्या ॥ ५-६ ॥ जे जसे होते ते तसेच धावत निघाले, पण लहान मुले व फार म्हातारी माणसे मात्र बरोबर घेतली नाहीत ॥ ७ ॥ एक दुस‍र्‍यास विचारुं लागले की काका ! तुम्ही दयालु रघुराज येताना पाहीलेत कां ? ॥ ८ ॥ प्रभु येत आहेत हे जाणून अयोध्या नगरी सकल सौंदर्याची खाण बनली ॥ ९ ॥ सुंदर त्रिविध वायू वाहू लागला, आणि शरयूचे जल अति निर्मल झाले ॥ १० ॥ गुरु वसिष्ठ, कुटुंबातील लोक, अनुज शत्रुघ्न आणि ब्राह्मणसमूह यांच्याबरोबर हर्षित होऊन भरत अति प्रेमाने कृपाधाम श्रीरघुनाथास सामोरे झाले. ॥ दो०३ रा ॥ बहुतेक स्त्रिया सौधावर चढून आकाशाकडे दृष्टी लावून विमान दिसते का ते पहात आहेत, विमान आकाशात दिसताच त्यांना अति हर्ष झाला व त्या सुस्वराने सुमंगल गीते गावूं लागल्या ॥ दो० ३म ॥ रघुपती पौर्णिमेचा चंद्र आहे, अयोध्यानगर सागर आहे, त्या पूर्ण चंद्राला पाहून त्याला भरती आली आणि नारीरुपी तरंगांसहित तो जणूं खळाळूं लागला ॥ दो. ३ चंद्र ॥

इथें भानुकुल कमल दिवाकर । कपिंस दाखवित नगर मनोहर ॥
श्रुणु कपीश अंगद लंकेश हि । पावन पुरी रुचिर हा देशहि ॥
यदपि सकल वैकुंठा वानति । वेद पुराण विदित जगिं जाणति ॥
प्रिय न अयोध्येसम मज तेंही । या मर्मा विरळा जाणे ही ॥
जन्मभूमि मम पुरी सुशोभन । शरयु उत्तरे वाहे पावन ॥
तीच्या स्नानें विना प्रयासां । मम समीप नर पावे वासा ॥
प्रिय अति मज येथले निवासी ॥ मम धामदा पुरी सुखराशी ॥
मुदित कपी श्रवुनी प्रभु वाणी । धन्य अयोध्या राम हि वानी ॥

दो० :- येतां पाहुनि लोक सब कृपासिंधु भगवान ॥
प्रभु पुरिजवळीं प्रेरिती उतरे खालिं विमान ॥ ४रा ॥
त्या प्रभु उतरुनि सांगती तुम्हिं जा धनदापाशि ॥
रामशासनें तें निघे हर्ष विरह अति त्याशि ॥ ४म ॥

इकडे भानुकुलरुपी कमलांना (प्रकाशित व प्रफुल्लित करणारा) सूर्य कपींना मनोहर नगर दाखवूं लागला ॥ १ ॥ हे कपीश ! हे अंगदा ! हे लंकापती ! ऐका, ही पुरि पवित्र आणि सुंदर आहे आणि हा देशही सुंदर आहे ॥ २ ॥ जरी सर्व वैकुंठाची प्रशंसा करतात, वेदपुराणात प्रसिद्ध आहे आणि जगातही सर्व जाणतात ॥ ३ ॥ तरी मला ते वैकुंठ ही अयोध्येसारखे प्रिय वाटत नाही, पण हे मर्म कोणी विरळाच जाणतो ! ॥ ४ ॥ ही अति सुंदर नगरी माझी जन्मभूमी आहे, व जीवांना पावन करणारी शरयू नदी तिच्या उत्तरेस वाहते. ॥ ५ ॥ तिच्या स्नानानेच काहीही प्रयास न करता मनुष्यांना समीपता मुक्ती मिळते. ॥ ६ ॥ येथले रहिवासी मला अति प्रिय वाटतात व ही पुरी सर्व सुखाची राशी असून माझे धाम देणारी आहे ॥ ७ ॥ प्रभूची वाणी ऐकून सर्व कपींना आनंद झाला व ते म्हणू लागले की स्वत: राम जिची प्रशंसा करतात ती अयोध्या धन्य होय.॥ ८ ॥ सगळे लोक येत आहेत असे पाहून कृपासिंधु भगवान प्रभूंनी पुरिजवळ येताच विमानाला आज्ञा दिली तेव्हा ते भूमीवर उतरले ॥ दो० ४ रा ॥ विमानातून उतरुन प्रभूंनी त्यास सांगीतले की तुम्ही कुबेरापाशी जा रामाज्ञेने ते निघाले पण त्याला अति हर्ष व अति विरह विषाद वाटला ॥ दो० ४ म ॥

आले भरता सवें सकल जन । श्रीरघुवीरवियोगें कृशतन ॥
वामदेव नी वसिष्ठ मुनिवर । दिसतां, प्रभु महिं ठेउनि धनुशर ॥
धाउनि धरिती गुरुपद जलरुह । अनुजा सह अति पुलकित तनुरुह ॥
भेटुनि कुशल मुनिवरें पुसलें । अमचे कुशल दयेनें अपले ॥
द्विजां सकल भेटुनि नत मस्तक । धर्म धुरंधर रघुकुल नायक ॥
धरिति भरत तैं प्रभुपदपंकज । ज्यांस नमिति सुरमुनि शंकर अज ॥
पडले महिं उठवता न उठती । बळें कृपानिधि हृदयीं धरती ॥
श्याम गात्रिं रोमांच सुगाढे । नवराजीव नयनिं जल वाढे ॥

छं० :- राजीव लोचनिं पाझरे जल ललित पुलकावलि घनी ।
सुप्रीतिं अनुजा हृदयिं धरुनी भेटले त्रिभुवन धनी ॥
प्रभु अनुज भेटत केविं शोभति मज न उपमा देउं ये ।
कीं प्रेम नी शृंगार भेटत सतनु त्यां सुषमा च ये ॥ १ ॥
पुसती कृपानिधि कुशल भरता शब्द शीघ्र न उमटती ।
सुख तें शिवे ! श्रुणु वचन मन पर जाणती जे लाभती ॥
तैं कुशल कोशलनाथ ! जाणुनि आर्त जन दर्शन दिलें ।
जैं बुडत विरहाब्धीं कृपालें धरुनि कर मज काढिलें ॥ २ ॥
दो० :- प्रभु शत्रुघ्ना भेटले हर्षें हृदयिं धरून ॥
भेटति लक्ष्मणभरत अति प्रेममग्न होऊन ॥ ५ ॥

भरताच्या बरोबर सर्व लोक आले आहेत व ते सर्व रघुविराच्या वियोगाने शरीराने कृश झालेले आहेत. ॥ १ ॥ वसिष्ठ वामदेवादि मुनिश्रेष्ठ दिसताच प्रभूंनी धनुष्यबाण जमिनीवर ठेवले ॥ २ ॥ आणि लक्ष्मणासह धावत जाऊन गुरुजींचे चरणकमल धरले, व त्यावेळी त्यांचे देह रोमांचित झाले ॥ ३ ॥ मुनिराज वसिष्ठ त्यांना भेटले व कुशल विचारले, प्रभु म्हणाले की आपल्या दयेने आमचे कुशल आहे ॥ ४ ॥ वामदेवादि सगळ्या द्विजांना भेटून मस्तक नमवून नमस्कार केला, कारण की रघुकुलनायक धर्मधुरंधर आहेत. ॥ ५ ॥ ज्यांना सुर, मुनी, शंकर व ब्रह्मदेव नमन करतात ते प्रभुचे चरणकमल मग भरताने धरले ॥ ६ ॥ आणि भरत भूमीवर दंडवत पडले ते उठविता उठेनात, तेव्हा कृपासिंधु रामचंद्रानी त्यांस बळाने उचलून हृदयाशी धरले ॥ ७ ॥ तेव्हा श्याम शरीरावर अगदी दाट रोमांच उभे राहीले व नव्या कमलासारख्या नेत्राना जलाला भरती आली ॥८॥ कमलासारख्या नेत्रातून जल पाझरत आहे आणि देहावर सुंदर दाट पुलकावली उठल्या आहेत असे त्रिभुवनाचे धनी अनुजाला हृदयाशी धरुन अत्यंत प्रेमाने भेटले प्रभू व अनुज भेटत असता कसे शोभले हे मला उपमा देऊन सांगता येत नाही पण जणू प्रेम (भरत) आणि शृंगार (राम) देह धारण करुन भेटावे तशी परम शोभा आली॥छ० १ ॥ कृपासागराने भरतास कुशल विचारले पण भरताच्या मुखातून शब्द चटकन उमटत नाहीत शिवे, ऐक ! ते सुख मनवाणीच्या पलीकडचे आहे ज्यांना ते लाभले तेच जाणतात हे कोशलनाथ ! आर्त सेवक जाणून जेव्हा दर्शन दिलेत व मी विरह सागरात बुडत असता हात धरून मला बाहेर काढलात तेव्हा आता कुशल आहे. ॥ छंद २ रा॥ (राम भरतास भेटल्यावर) प्रभू शत्रुघ्नाला हृदयाशी धरुन हर्षाने भेटले. तो लक्ष्मण आणि भरत अतिप्रेममग्न होऊन भेटले ॥ दो० ५ ॥

भरतानुज लक्ष्मण मग भेटति । विरहज दुःसह दुःखें आटति ॥
सीताचरणिं भरत शिर नमविति । अनुज समेत, परम सुख पावति ॥
प्रभुस बघुनि हर्षित पुरवासी । गत वियोगविपदा प्रलयासी ॥
प्रेमातुर जाणुनि जन भारी । कौतुक करिति कृपाल खरारी ॥
तत्क्षणि अगणित रूपे प्रगटति । सकलां उचित कृपालू भेटति ॥
मग रुघुवीरें कृपावलोकीं । कृत सगळे नर नारि विशोकी ॥
भेटति भगवान् न लागतां क्षण । उमे ! मर्म ना कळे कुणा पण ॥
रामें सर्वां असे सुखविले । शील गुणाकर पुढें चालले ॥
धावति माता कौसल्यादिक । बघुनि वत्स जणुं गो नवसूतिक ॥

छं० :- जणुं धेनु नव शिशु तजुनि गृहिं परवश वनीं चरण्या गता ।
सूर्यास्तिं नगरा स्रवत सड हुंकारित धावति कीं अतां ॥
प्रेमें सकल मातांस भेटुनि मृदु वचां प्रभु बोलले ॥
गत विषम विपदा विरहभव; त्यां हर्ष सुख अति लाभलें ॥ १ ॥
दो० :- भेटे सुता सुमित्रा रत रामांघ्रिं बघून ॥
रामा कैक‍इ भेटे हृदयिं फार लाजून ॥ ६रा ॥
लक्ष्मण भेटुनि जननिनां हृष्ट अशीस मिळून ॥
भेटे घडि घडि कैक‍इस क्षोभ न मनिंचा न्यून ॥ ६म ॥

मग भरतानुज शत्रुघ्न आणि लक्ष्मण भेटले तेव्हा विरहाने उत्पन्न झालेली दु:खे नष्ट झाली ॥ १ ॥ मग भरताने शत्रुघ्नासह सीतेच्या चरणांवर मस्तक नमविले तेव्हा त्यांना परम सुख झाले ॥ २ ॥ प्रभूला पाहून सर्व पुरवासी लोक हर्षित झाले व वियोगाने उत्पन्न झालेल्या सर्व विपत्ती लयास गेल्या ॥ ३ ॥ प्रभूंनी जाणले की तो सर्व जनसमाज प्रेमविव्हळ झाला आहे तेव्हा कृपालु खरारींनी एक कौतुक केले ॥ ४ ॥ तत्काळ अगणित रुपे प्रगट केली व कृपालु राम प्रभु सर्वांना योग्य प्रकारे भेटले ॥ ५ ॥ मग रघुवीराने कृपादृष्टीने अवलोकन करुन सर्व स्त्रीपुरुषांना शोकरहित केले ॥ ६ ॥ भगवान एका क्षणात सर्वांना भेटले, पण उमे ! हे मर्म कोणाला कळले नाही ॥ ७ ॥ याप्रमाणे रामचंद्रांनी सर्वांना सुखी केले व मग शील व गुण सागर राम पुढे चालले ॥ ८ ॥ वासराला पाहून जशी नविन व्यालेली गाय धावते तशाच जणू कौसल्यादी माता राम, सीता व लक्ष्मण यांस पाहताच धावल्या. ॥ ९ ॥ जणूं लहान नव्या वासरांना घरी टाकून परवशतेमुळे वनात चरण्यास गेलेल्या गाई, सूर्यास्ताच्या समयास, सडांतून दूध गळत असलेल्या, हुंडहुं करीत नगराकडे धावत आहेत. प्रभु प्रेमाने सगळ्या मातांना भेटले व कोमल वचनांनी त्यांची समजूत घातली. रामविरहाने उत्पन्न झालेल्या कठीण विपत्ती नष्ट झाल्या व सर्व मातांना अत्यंत हर्ष झाला व अत्यंत सुख झाले ॥ छंद ॥ आपला पुत्र रामचरणीं रत आहे हे पाहून सुमित्रा प्रेमाने लक्ष्मणाला भेटली कैकेयी रामचंद्रांना भेटली, पण मनात फार लाजली ॥ दो० ६ रा ॥ लक्ष्मण सर्व मातांना भेटले व आशीर्वाद मिळून हर्षित झाले मग लक्ष्मण पुन: पुन्हा कैकेयीला भेटले पण तिच्या बद्दलचा मनातील क्षोभ कमी झाला नाही. ॥ दो० ६ म ॥

भेटे सब सासुंस वैदेही । पाया पडुनि अति हर्षे ही ॥
देती आशिस कुशल विचारुन । असो अचल तुमचें अहेवपण ॥
सब रघुपति मुख कमल विलोकिति । मंगल म्हणुन नयन जल रोढिति ॥
कनक पात्रिं ओंवाळिति आरति । प्रभु गात्रां घडिघडी न्यहाळति ॥
नानाविध ओंवाळणि करती । परमानंद हर्ष उरिं भरती ॥
कौसल्या घडि घडि रघुवीरा । निरखी कृपासिंधु रणधीरा ॥
हृदयीं वारंवार विचारी । लंकापतिस कसा तरि मारी ?
अति सुकुमार युगल मम बाळ । राक्षस सुभट महाबळ काळ ॥

दो० :- लक्ष्मण नी सीतेसहित प्रभुस विलोकी माय ॥
परमानंदीं मग्न मन घडि घडि पुलके काय ॥ ७ ॥

सर्व सासवांच्या पाया पडली तेव्हा सीतेला अति हर्ष झाला व ती सर्व सासवांना भेटली तेव्हा वैदेही झाली ॥ १ ॥ कुशल विचारुन त्यांनी आशीर्वाद दिला की तुमचे सौभाग्य अचल असो. ॥ २ ॥ सर्व माता रघुपतीच्या मुखाकडे पहात आहेत आणि मंगल वेळ जाणून नेत्रात येणारे आनंदजल दाबून अडवून धरीत आहेत. ॥ ३ ॥ सोन्याच्या तबकात आरती ओवाळून पुन:पुन्हा प्रभुच्या देहाकडे न्हाहाळून पहात आहेत ॥ ४ ॥ नाना प्रकारचे जिन्नस ओवाळून टाकीत आहेत व हृदयांत परमानंद व हर्ष भरीत आहेत ॥ ५ ॥ कृपासागर रणधीर रघुवीराला कौसल्या वारंवार निरखून पहात आहे ॥ ६ ॥ आणि वारंवार मनात विचार करीत आहे की याने लंकापती – रावणाला मारला कसा ? ॥ ७ ॥ (कारण की) माझे हे दोघे बाळ अत्यंत सुकुमार आहेत आणि सारे राक्षस तर महाबलवान महावीर काळच ! ॥ ८ ॥ लक्ष्मण आणि सीता यांच्यासहित प्रभूला माता कौसल्या न्याहाळून पहात आहे, व तिचे शरीर वारंवार रोमांचित होत आहे ॥ दो० ७ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP