॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय १५ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

नयनवंत रघुवरास पाहुनि । होति विशोक जन्म-फल-पावुनि ॥
चरणरजें अचरां सुख भारी । झाले परम पदा अधिकारी ॥
गिरिकानन तें स्वभाव-शोभन । मंगलमय अति पावन-पावन ॥
महिमा त्याचा वदवे कैसा । जिथें करिति सुखसिंधु निवासा ॥
क्षीराब्धीस अयोध्ये त्यागुनि । सिताराम जिथं राह्ति येउनि ॥
वन-सुषमा ना करवे वर्णन । जरि शत सहस्र सहस्र-आनन ॥
ती मज वर्णुं कशी तरि येईं । पल्लव्-कमठ किं मंदर घेई ॥
सेविति लक्ष्मण तनमनवाणीं । शील-स्नेह कोण वाखाणी ॥

दो० :- सिताराम-पद बघ बघुनि अपणांवरती स्नेह ॥
स्वप्निं न लक्ष्मण चित्तिं कधिं बंधु मातृ पितृ गेह ॥ १३९ ॥

नेत्र असणारे जीव रघुवरास पाहून जन्माचे फळ मिळून शोकरहित झाले ॥ १ ॥ जे अचर जीव आहेत ते चरणरजांच्या स्पर्शाने फार सुखी झाले व परम पदाचे ( मोक्षाचे) अधिकारी बनले ॥ २ ॥ ते वन व पर्वत सहज सुन्दर व मंगलमय होऊन अति पावनाना सुद्धा पावन करणारे झाले ॥ ३ ॥ जिथे सुखसागर निवास करतात त्याचा महिमा कसा ( कशा रीतीने) वर्णन करता येईल ? ॥ ४ ॥ क्षीरसागर सोडून व अयोध्येचाही त्याग करुन राम, सीता व लक्ष्मण येऊन जेथे राहीले ( त्याचा महिमा कोण वर्णन करणार !) ॥ ५ ॥ या वनाची परम शोभा ( सुषमा) शतसहस्त्र मुखांना सुद्धा वर्णन करता येणार नाही ॥ ६ ॥ ती मी वर्णन करु शकेन तरी कसा ? डबक्यातील कासवाला ( आपल्या पाठीवर) मंदर पर्वत घेता येईल काय ? ॥ ७ ॥ लक्ष्मण शरीराने, मनाने व वाणीने ( सीता - रामाची) सेवा करु लागले त्यांचे शील व स्नेह कोण वर्णू शकेल ? ॥ ६ ॥ वरचेवर सीतारामचंद्रांच्या चरणाकडे पाहील्याने व त्यांचे आपणावरील प्रेम पाहून लक्ष्मणाच्या चित्तांत बंधू, माता, पिता, घर इत्यादिंची आठवण कधी स्वप्नात सुद्धा होत नाही ॥ दो० १३९ ॥

सुखी सिता रामासह राही । पुर परिजन गृह आठवण नाहीं ॥
प्रियविधुवदना पळ पळ निरखित । जणूं चकोर कुमारी प्रमुदित ॥
पतीस्नेह नव वाढत पाही । कोकी दिनिं तशि हर्षित राही ॥
सियमन रामचरणिं अनुरागे । अमित-अयोध्याप्रिय वन लागे ॥
पर्णकुटी प्रिय प्रियतम-संगें । प्रिय परिवार विहंग कुरंगें ॥
श्वशुर-सासुसम मुनिवर-दपति । अशन मूल फल कंद सुधा अति ॥
नाथ-साथ तृणशय्या सुंदर । मदन-शयन शत समान सुखकर ॥
जिच्या विलोकनिं लोकप होती । विषय-विलास किं तिला मोहिती ॥

दो० :- स्मरतां रामा त्यजति जन तृणसम विषयविलास ॥
राम प्रिय जगजननि सिय विस्मय इथें कशास ॥ १४० ॥

रामचंद्र बरोबर असल्यामुळे सीता ( सदा) सुखी असते नगर, कुटुंबातील मंडळी, घर इ. कशाची तिला आठवण सुद्धा येत नाही ॥ १ ॥ पतीच्या मुखचंद्राकडे क्षणोक्षणी निरखत अशी प्रमुदित राहते की जणू चकोरि कुमारीच ॥ २ ॥ पतीचा ( आपल्यावरील) स्नेह नित्य नवा वाढत आहे हे पाहून, चक्रवाकी जशी दिवसा हर्षित राहते तशी सीता हर्षित राहते आहे ॥ ३ ॥ सीतेचे मन रामचरणी अनुरक्त असलेने तिला वन हजारो अयोध्यसारखे प्रिय वाटत आहे ॥ ४ ॥ अत्यंत प्रिय पतीच्या संगतीत पर्णकुटी प्रिय वाटत आहे व पक्षी व हरणे परिवाराप्रमाणे प्रिय वाटत आहेत ॥ ५ ॥ मुनीवर व मुनीस्त्रिया श्वशुर - सासू सारखी प्रिय वाटतात व कंदमूल फलाहार अगदी अमृताचा आहार वाटतो ॥ ६ ॥ पती - संगतीत सुंदर तृणशय्या शेकडो मदनांच्या शेजेसारखी सुखकर वाटते ॥ ७ ॥ जिच्या विलोकनाने लोकपाल बनतात तिला विषयविलास मोहीत करतील की काय ? ( शक्यच नाही) ॥ ८ ॥ रामाचे स्मरण करताच रामदास ( जन) विषय विलासांचा तृणाप्रमाणे ( सहज) त्याग करतात ( मग सीता तर जगाची जननी व रामप्रिया आहे; ( तिने असा विषय - त्याग केला) यात आश्चर्य ते काय ? ॥ दो० १४० ॥

जशिं सीता लक्ष्मण सुख लभतीं । तेंच करिति रघुनाथ बोलती ॥
कथिति पुरातम कथा कहाणी । श्रवणिं बंधु सीता सुखखाणी ॥
जैं जैं राम अयोध्ये स्मरती । तैं तैं जलें विलोचन भरती ॥
स्मरुनि मातृ पितृ परिजन भावां ॥ भरतस्नेह सुशील सुसेवा ॥
कृपासिंधु दुःखा प्रभु पावति । धरिति धीर ही वेळ नम् जाणति ॥
बघुनि, बंधु सीता व्याकुळई । जेविं तनुस छाया अनुसरती ॥
त्यांची दशा बघुनि रघुनंदन । धीर कृपाल भक्त-उर-चंदन ॥
सांगुं लागले कथा पुनीता । श्रवणिं सुखावति लक्ष्मण सीता ॥

दो० :- राम बंधु-सीते सहित शोभति पर्णकुटींत ॥
शची जयंतासह जसे वासव अमरपुरींत ॥ १४१ ॥

जेणें करून लक्ष्मण व सीता सुखी होतील असे रघुनाथ करतात व बोलतात ॥ १ ॥ पुरातन ( भक्ती) कथा व ज्ञान कहाण्या रघुनाथ सांगतात व त्यांचे श्रवण करण्यात लक्ष्मण व सीता फार सुखी होतात ॥ २ ॥ ज्या ज्यावेळी रामचंद्रांस अयोध्येची आठवण होते त्या त्या वेळी त्यांचे डोळे पाण्याने भरतात ॥ ३ ॥ माता, पिता, परिजन भाऊ आणि भरताचा स्नेह, सुशील व सुसेवा यांचे स्मरण करुन ॥ ४ ॥ कृपासागर प्रभु दु:खी होतात ( पण दु:ख करीत बसण्याची) ही वेळ नाही असे जाणून धीर धरतात ॥ ५ ॥ देहाचे अनुकरण छाया करतात त्याप्रमाणेच रामचंद्रांना दु:खी झालेले पाहून बंधू लक्ष्मण व सीता व्याकुळ होतात ॥ ६ ॥ त्यांची ती दशा पाहून धीर कृपाळू व भक्तांच्या हृदयाचे चंदन असणारे रघुनंदन ॥ ७ ॥ पुनीत कथा सांगू लागले म्हणजे त्यांच्या श्रवणाने सीता व लक्ष्मण सुख पावतात ( सुखी होतात) ॥ ८ ॥ जसे अमरपुरीत वासव ( इंद्र) शची व जयंत यांच्यासह रहात असता शोभतात तसे लक्ष्मण व सीता यांच्यासह राम पर्णकुटीत शोभत आहेत ॥ दो० १४१ ॥

प्रभु सीता लक्ष्मणास रक्षति । बुबुळांना पापण्या जशा अति ॥
सेविति बंधु सिता रघुवीरा । नर अविवेकी जसा शरीरां ॥
प्रभु वनिं असे बसति सुखिं भारी । खग-मृग-सुर-तापस-हितकारी ॥
रामगमन वनिं शोभन कथिलें । ऐका सचिव जसे पुरिं आले ॥
प्रभुस पोचवुनि निषाद फिरला । येतां सचिव सहित रथ दिसला ॥
पंत्री विकल बघूनि निषाद । वदवे ना किती होइ विषाद ॥
राम राम ! सिय ! लक्ष्मण ! वदला । सचिव विकल अति महिवरि पडला ॥
बघुनि दक्षिणे हय खिंकाळति । पंखांविण जणुं विहग विव्हळति ॥

दो० :- तृण न चरति ना पिती जळ ढाळिति लोचन वारि ॥
पाहुनि रघुवर-वाजि, सब व्याकुळ निषाद भारि ॥ १४२ ॥

डोळ्यांच्या पापण्य़ा जशा बुबुळांना अतिशय जपतात तसेच प्रभू सीतेला व लक्ष्मणास रक्षतात ॥ १ ॥ अविवेकी मनुष्य जशी आपल्या शरीराची सेवा करतो तसे लक्ष्मण व सीता रघुवीराची सेवा करतात ॥ २ ॥ खग, मृग, सुर व तपस्वी यांचे हित करणारे प्रभु याप्रमाणे अति सुखात वनात राहू लागले ॥ ३ ॥ ( याप्रमाणे) रामचंद्रांचे सुंदर वनगमन सांगितले, सचिव सुमंत्र अयोध्येत जसे परत आले ते सांगतो ऐका ॥ ४ ॥
सचिवागमन नगरिं नृप मरण - १४२/५ ते १५७/४
प्रभु रामचंद्रांना पोचवून निषादराज परत फिरला ( गांवी) येतो तोच त्यास सचिव रथासहित दिसला ॥ ५ ॥ निषादाला आलेला पाहून सुमंत्र व्याकुळ झाला व त्यास इतका विषाद वाटला की त्याचे वर्णन करवतच नाही व मंत्री व्याकुळ आहे असे पाहून निषादासही विषाद झाला ॥ ६ ॥ राम ! राम ! सीते ! लक्ष्मणा ! असे म्हणून मंत्री अतिशय व्याकुळ होऊन जमिनीवर पडला ॥ ७ ॥ दक्षिणेकडे त्याचेकडे पाहून घोडे असे खिंकाळू लागले की जणूं पंखहीन झालेले पक्षीच विह्वळत आहेत ॥ ८ ॥ ते गवत खात नाहीत की पाणीही पीत नाहीत आणि त्यांच्या नेत्रांतून अश्रू गळत आहेत रघुवराच्या घोड्यांना या दशेत पाहून सगळे निषाद व्याकुळ झाले ॥ दो० १४२ ॥

धैर्य धरुनि तैं वदे निषादू । सोडा अतां सुमंत्र विषादू ॥
तुम्हिं पंडित परमार्थिं शहाणे । गणुनि वाम विधि धीरा धरणें ॥
विविध कथा मृदु वचने सांगुनि । रथिईं बसविले उचलुनि आणुनि ॥
शोक-शिथिल रथ जांकूं शकत न । रघुवर विरह-दुःख हृदिं दारुण ॥
पथिं न चालती हय तडफडले । जणुं वनमृग रथिं अणुनि जोडले ॥
ठेपाळति मग मागें पाहति । रामवियोगिं विकल पीडा अति ॥
’राम सिता लक्ष्मण’ जे वदती । त्यां प्रेमें खिंकाळत बघती ॥
वाजि विरहगति केवीं वदणें । मणिविण फणी विकळ तशि गणणें ॥

दो० :- होई निषाद विषाद वश बघुनिं सचिव-तुरगांस ॥
धाडि तदा सूतासवें चौद्घां सुसेवकांस ॥ १४३ ॥

मग धैर्य धरुन निषादराजा म्हणाला की सुमंत्र ! आता विषाद सोडा ॥ १ ॥ तुम्ही पंडित आहांत व परमार्थात पण ( ज्ञाते) जाणते आहांत; दैव फिरले आहे असे समजून आता धीर धरा ॥ २ ॥ मृदु वाणीने विविध कथा सांगून त्याने सुमंत्राला आणून रथात बसविला ॥ ३ ॥ पण शोकाने शरीर गळल्यासारखे झाल्याने सुमंत्रास रथ हाकता येईना व हृदयात रघुवीराचे दारुण दु:ख होत आहे ॥ ४ ॥ घोडे सुद्धा रस्त्याने चालेनात व असे तडफडू लागले की जणूं वनांतील ( रोही किंवा नीळ नातीच्या) पशूंना पकडून आणूनच रथास जुंपले आहेत ॥ ५ ॥ त्यामुळे ते चालताना ढेपाळू लागले व पुन: पुन्हा मागे वळून पाहू लागले असे रामवियोगी घोडे व्याकुळ व फार पीडीत झाले आहेत ॥ ६ ॥ जो कोणी राम, सीता, लक्ष्मण इ. शब्द उच्चारतो त्याच्याकडे ते प्रेमाने खिंकाळत पाहू लागतात ॥ ७ ॥ या घोड्यांची विरहदशा कशी वर्णन करणार ! मणिविहीत सर्प जसा व्याकुळ होतो तशी दशा झाली असे म्हणता येईल ॥ ८ ॥ सचिवाला व तुरगाला ( घोड्याला) पाहून विषादवश झाला; पण तेव्हा त्याने चार सुसेवकांना सुमंत्र सारथ्या बरोबर पाठवले ॥ दो० १४३ ॥

सूता पोंचवुनी गुह फिरला । विरह-विषाद न जाई वदला ॥
घेउनि रथ पुरिं निषाद निघती । क्षणोक्षणीं अति विषण्ण बनती ॥
चिंति सचिव दुःखाकुल दीन । धिग् जीवन रघुवीर-विहीन ॥
अंतिं न राही अधम शरीर । घेइ न यश वियोगिं रघुवीर ॥
झाले प्राण अयश-अघ-भाजन । तरी न जाती काय किं कारण ? ॥
अहह ! मंद मन अवसर चुकलें । हृदय अझुन तरि कां नहि फुटले ॥
हात चोळि, शिर पिटि पस्तावत । जणूं कृपण धनराशि गमावत ॥
बाणा बांधुनि सुवीर म्हणवुनि । सुभट जाइ जणुं पळुनि रणांतुनि ॥

दो० :- विप्र विवेकी वेदविद संमत साधु सुजाति ॥
जसा सुरा चुकुनी पितां सचिवा ताप तसाऽति ॥ १४४ ॥

सुताला पोचवून गुह परत फिरला ( तेव्हा) त्याला विरहाने जो विषाद झाला तो वर्णन करता येत नाही ॥ १ ॥ ते ( चौघे) निषाद रथ घेऊन अयोध्येस निघाले पण वाटेत क्षणोक्षणी ते सुद्धा ( सचिव व घोडे यांची दशा पाहून) अति दु:खी होत आहेत ॥ २ ॥ दु:खाने व्याकुळ व दीन झालेला सचिव सुमंत्र विचार करु लागला की रघुवीर विहीन झालेल्या जीवनाचा धिक्कार असो ॥ ३ ॥ हे अधम शरीर शेवटी राहणार तर नाहीच मग रघुवीराचा वियोग होताच त्याचा त्याग करुन यश का मिळविले नाही ? ॥ ४ ॥ हे प्राण पापांचे व अपयशाचे पात्र बनले तरी अजून निघून जात नाहीत याचे कारण तरी काय ? ॥ ५ ॥ हाय ! हाय ! या नीच मनाने सुसंधी गमावली अजून ( अयोध्येत जाण्यापूर्वी) या हृदयाचे तुकडे का नाही होत ? ॥ ६ ॥ हात चोळीत, कपाळ पिटीत असा पश्चाताप करीत आहे की जणूं कृपणाने धनाची रासच गमावली ॥ ७ ॥ ब्रीद बांधून व उत्तम वीर म्हणवून सुभटच जणूं रणांतून पळून जात आहे. ॥ ८ ॥ जसा कोणी विवेकी, वेदज्ञ साधुसंमत व चांगल्या कुळातला विप्र चुकून दारु प्यायला म्हणजे अति शोक ( पश्चाताप) संतप्त व्हावा, तसा सुमंत्रास ताप झाला ॥ दो० १४४ ॥

स्त्री कुलीन जशि साध्वी ज्ञानी । पति देवता कर्म-मन-वाणीं ॥
राहि कर्मवश सोडुनि नाहो । तसा सचिव हृदिं दारुण दाहो ॥
सजल विलोचन दृष्टि हि थोडी । कान न ऐकति बुद्धी हि सोडी ॥
शुष्क ओष्ठ मुखिं बसली लाटी । जिव न जाइ, उरिं अवधि कपाटीं ॥
बघवत ना तो विवर्ण भारी । माता पित्यां जणूं कीं मारी ॥
हानी-ग्लानी चित्ता व्यापी । यमपुरिचा पंथिकसा पापी ॥
शब्द न उमटे मनिं पस्तावे । जाउन नगरीं काय पहावें ॥
रामरहित रथ बघतिल जेही । संकोचति मज बघतां तेही ॥

दो० :- धावुनि पुसतिल जईं मला विकल नगर-नर-नारि ॥
उत्तर देणें त्यांस मी घालुनि उरिं पवि भारि ॥ १४५ ॥

कुलीन साध्वी शहाणी ( ज्ञानी) व कर्माने - मनाने व वाणीने पतीला देव मानणारी एखादी स्त्री प्रारब्धाने पतीला सोडून राहीली म्हणजे तिला जसा दारूण दाह होतो तसा दारुण - दाह सचिवाला होत आहे ॥ १-२ ॥ डोळ्यांतून अश्रू वहात आहेत पहाण्याची शक्ती अगदी क्षीण झाली आहे कान ऐकेनासे झाले व बुद्धी जागेवर राहीली नाही ॥ ३ ॥ ओठ सुकून गेले, तोंड कोरडे ठणठणीत पडले चौदा वर्षाची, मुदत रुपी दाराच्या फळ्यांनी हृदयात अडकून ठेवल्यामुळे जीव जात नाही ॥ ४ ॥ सचिव इतका निस्तेज ( काळा ठिक्कर पडला आहे) झाला आहे की त्याचेकडे बघवत नाही; जणू काय आईबापांची हत्याच घडली की काय असा दिसत आहे ॥ ५ ॥ हानीमुळे उत्पन्न झालेल्या ग्लानीने असे व्यापले आहे की जसा यमपुरीला नेला जात असलेला पापी प्रवासी ! ॥ ६ ॥ तोंडातून शब्द निघत नाही, पण मनात पश्चाताप करीत आहे की मी अयोध्येत जाऊन पाहणार तरी काय ? ॥ ७ ॥ जे कोणी रामरहित रथ पाहतील ते सर्व मला पाहून लाजतील. ( माझे तोंड पाहण्यास त्यांना संकोच वाटेल) ॥ ८ ॥ व्याकुळ झालेले नगरातील स्त्री - पुरुष व स्त्रिया धावत येऊन मला विचारतील तेव्हा ( स्वत:च्या) छातीवर मोठे वज्र घालून मी त्या सर्वांना उत्तर देणार ! ॥ दो० १४५ ॥

पुसतिल दीन दुःखि सब माता । काय तया मीसांगुं विधाता ! ॥
यदा विचारिल लक्ष्मण-आई । सांगुं निरोप काय सुखदाई ॥
राम-जननि जई येइ धाउनी । जशी धेनु नव वत्सा स्मरुनी ॥
पुसाअं वदणें मी तीतें ही । गत वनिं राम बंधु वैदेही ॥
जो विचारि त्या उत्तर देणें । जाउनि नगरिं हेंच सुख घेणें ॥
जैं पुसतिल नृप दुःखी दीन यज्जीवन रघुनाथाधीन ॥
उत्तर देऊं कुठुन मुख आणुनि । आलों कुशल कुमार पोचवुनि ॥
लक्ष्मणसिता-राम संदेश । श्रवुनि तजिति तनु-तृण हि नरेश ॥

दो० :- हृदय न भंगत पंकसें अटतां प्रियतम नीर ॥
वाटे विधिनें दिलें मज हें यातनाशरीर ॥ १४६ ॥

दीन व दु:खी झालेल्या ( बाकीच्या) सर्व माता मला विचारतील तेव्हा हाय रे दैवा ! मी त्याना काय सांगू ? ॥१ ॥ लक्ष्मणाची आई विचारील तेव्हा मी तिला कोणता सुखदायक निरोप - संदेश सांगू ? ॥ २ ॥ नवीन वासराच्या आठवणीने धेनू जशी धावत यावी तशी रामजननी जेव्हा ( मला पाहील्यावर) धावत येईल तेव्हा तिला मी हेच उत्तर द्यायचे नां ! की राम - लक्ष्मण - वैदेहीवनांत गेले ( अन मी मात्र जिवंत येऊन तुम्हांस हे सांगतो आहे) ॥ ३-४ ॥ जो जो विचारील त्याला त्याला हेच उत्तर देणे हेच सुख आता नगरात जाऊन द्यायचे राहीले आहे ! ॥ ५ ॥ ज्यांचे जीवन रघुनाथांच्या अधीन आहे ते दिन दु:खी झालेले महाराज जेव्हा विचारतील तेव्हा त्यांना कुठल्या तोंडाने उत्तर देऊं ? - की कुमारांना ( वनांत) पोचवून मी कुशल आलो ? ॥ ६-७ ॥ लक्ष्मण - सीता यांचे संदेश ऐकून नरेश आपल्या देहरुपी तृणाचा त्यागच करतील ॥ ८ ॥ प्रियतम नीर ( पाणी) आटून गेले म्हणजे चिखलाला जशा भेगा पडतात तसे प्रियतम रामाचा विरह होताच माझे हृदय भंग पावले नाही. त्याअर्थी असे वाटते की विधीने मला हे यातना शरीरच दिले आहे ॥ दो० १४६ ॥

पश्चात्तापा करत पथिं असे । तमसातटिं रथ शीघ्र येतसे ॥
विनवुनि दिला निरोप निषादां । जत पदिं वंदुनि विकल विषादां ॥
सचिव संकुचित शिरण्या नगरीं । जणुं गुरु-गो-ब्राह्मणांस मारी ॥
बसुनि विटपतळिं दिवसा गाळी । संधि सापडे संध्याकाळीं ॥
शिरे अयोध्यामधिं अंधारीं । घुसे सदनिं रथ ठेउनि द्वारीं ॥
जयां जयां हें वृत्त मिळालें । नृपद्वारिं रथ बघण्या आले ॥
रथ ओळखति, विकल हय दिसती । गात्रं गरमिं गारांसम गळती ॥
नगर नरिनर विव्हळ तैसे । निघटत नीर मीनगण जैसे ॥

दो० :- ऐकुनि सचिवागमन सब व्याकुळ राणीवास ॥
भवन भयद वाटे तया जणुं कीं प्रेतनिवास ॥ १४७ ॥

सुमंत्र रस्त्याने असे पश्चाताप करीत आहेत तोच रथ त्वरेने तमसातीरावर आला ॥ १ ॥ ( तेव्हा) त्या चार निषादांना विनंती करुन निरोप दिला व सुमंत्रांच्या पाया पडून ते विषादाने व्याकुळ होऊन परत गेले ॥ २ ॥ नगरीं नृप मरण - अयोध्या नगरात शिरण्यास सचिवाला असा संकोच वाटत आहे की जणू काय गुरु, गाय, व ब्राह्मण यांची हत्याच त्याच्याकडून घडली असावी ॥ ३ ॥ ( म्हणून) झाडाखाली बसून ( राहीलेला) दिवस कसातरी घालविला; व मग संध्याकाळी ( योग्य) संधी मिळाली ॥ ४ ॥ सुमंत्र रात्री अयोध्येत शिरला व राजद्वाराजवळ रथ ठेऊन ( चटकन) राजवाड्यांत ( सदनीं) घुसला ॥ ५ ॥ ( रथ आला) ही बातमी ज्यांना ज्यांना कळली ते ते रथ पाहण्यासाठी राजद्वाराजवळ आले ॥ ६ ॥ त्यांनी रथ ओळखला, पण घोडे असे व्याकूळ दिसले की जणूं गरमीच्या दिवसात गारांप्रमाणे त्यांची गात्रे गळत ( विरघळत) आहेत ॥ ७ ॥ ( जलाशयातील) पाणी फारच घटत आले की - माशांचे थवे जसे व्याकुळ होतात त्याप्रमाणे नगरातील स्त्रिया व पुरुष व्याकूळ होंऊ लागले ॥ ८ ॥ सचिव आल्याचे समजतात अंत:पुरातील सर्व राण्य़ा ( सर्व राणीवसा) व्याकुळ झाल्या व सचिवाला तो राजवाडा जणू प्रेताच्या निवासस्थानासारखा भयानक वाटला ॥ दो० १४७ ॥

राण्या सब अति आर्त विचारति । उत्तर ये न विकल वाचा अति ॥
कान न ऐकति नयनिं न दिसतहि । वदा कुठें नृप ज्या त्या पुसतहि ॥
दासी बघुनी विकल सचिवासी । कौसल्यागृहिं नेती त्यासी ॥
जात सुमंत्रा दिसले राजे । अमृत-रहित जणुं इंदु विराजे ॥
भूषण आसन शयन न कांहीं । पतित मलिन अति भूमितळा ही ॥
घेत उसासे असे शोचती । स्वर्गांतुनि जणुं पतित ययाती ॥
घडिं घडिं शोकें भरती छाती । पतित जळुनि छद जणुं संपाती ॥
राम राम हे राम ! स्नेही-- । वदति राम लक्ष्मण वैदेही ॥

दो० :- बघुनि, सचिव जय जिव वदुनि करि दण्डवत् प्रणाम ॥
परिसुनि उठले विकल नृप वद सुमंत्र कुठं राम ॥ १४८ ॥

अति आर्त झालेल्या सर्व राण्या विचारुं लागल्या पण सुमंत्रांची वाचाच व्याकुळ झाल्याने उत्तर ( तोंडातून) निघेना ॥ १ ॥ त्याच्या कानांना ऐकू येईना; तो ज्याला त्याला विचारीत सुटला की नृप कुठे आहेत ते सांगा ॥ २ ॥ सचिव व्याकुळ झाला आहे असे पाहून दासी त्याला कौसल्येच्या घरी ( वाड्यात) घेऊन गेल्या ॥ ३ ॥ अमृतरहित झालेला चंद्र जसा विराजतो तसे दशरथ राजे सुमंत्र ( समोर) गेल्यावर त्यास दिसले ॥ ४ ॥ भूषण, आसन, शय्या इ. काही नसून अत्यंत मलिन स्थितीत नुसत्या जमिनीवर पडले आहेत ॥ ५ ॥ दिर्घ श्वास घेत असी चिंता शोक करीत पडले आहेत की जणू स्वर्गातून परत पावलेला ययाती राजाच ॥ ६ ॥ घडोघडी ( क्षणोक्षणी) शोकाने छाती अशी भरीत आहेत की जणूं पंख जळून पतन पावलेला पक्षीच होय. ॥ ७ ॥ राजा राम ! राम ! हे स्नेही ! राम ! म्हणून राम ! लक्ष्मण ! वैदेही ! असे म्हणत आहेत ॥ ८ ॥ राजाला पाहून सचिवाने ‘ जय जीव ’ म्हणून दण्डवत प्रणाम केला ते शब्द ऐकताच नृपती व्याकुळ होऊन उठले ( व म्हणाले) सुमंत्र ! राम कुठे आहेत सांग ॥ दो० १४८ ॥

भूप सुमंत्रा हृदयीं धरती । बुडत कांहिं जणुं अधार लभती ॥
स्नेहें सन्निध घेति बसवुनी । पुसती नृपति येइ जल नयनीं ॥
राम-कुशल वद मित्रा स्नेही । कुठं रघुपति लक्ष्मण वैदेही ॥
परत् आणले कीं गेले वनिं । ऐकुनि वारा सचिव-विलोचनिं ॥
शोकाकुल ’वद’ म्हणति नरेश । सिता - राम - लक्ष्मण संदेश ॥
रामरूपगुण-शीला स्वभावा । स्मरुनि स्मरुनि शोक हृदिं रावा ॥
राज्य देउं सांगुन दिधलें वन । ऐकुनि हर्ष-विषाद-रहित मन ॥
त्या-सुत विरहें गेलें प्राण न । महा पापि मन समान आन न ॥

दो० :- राम सिता लक्ष्मण जिथें पोचवि मज तेथेंच ॥
सखे ! प्राण जाऊं बघति ना तर, सांगुं खरेंच ॥ १४९ ॥

बुडत असता काहीतरी आधार सापडावा त्याचप्रमाणे राजने सुमंत्राला हृदयाशी धरले ॥ १ ॥ स्नेहाने त्याला जवळ बसवून घेतला व विचारु लागताच नृपतीच्या डोळ्यात पाणी आले ॥ २ ॥ स्नेही मित्रा ! रामाचे कुशल सांग रघुपती, व लक्ष्मण व वैदेही कुठे आहेत ते सांग ॥ ३ ॥ त्यांना परत आणले की गेले वनांत ? हे ऐकतांच सचिवाच्या डोळ्य़ांत पाणी आले ॥ ४ ॥ शोकाकुल होऊन नरेश पुन्हा म्हणाले की सीता राम व लक्ष्मण यांचे संदेश सांग ॥ ५ ॥ रामचंद्रांचे रुप, गुण, शील व स्वभाव यांचे वारंवार स्मरण करीत राजा मनांत शोक करीत आहेत ॥ ६ ॥ राज्य देतो असे सांगून वन दिले तरी ज्याच्या मनाला हर्ष विषाद वाटला नाही ॥ ७ ॥ त्या पुत्राच्या वियोगाने प्राण गेले नाहीत, त्याअर्थी माझ्यासारखा महापापी दुसरा कोणी नसेल, नाही ॥ ८ ॥ मित्रा जेथे राम - सीता व लक्ष्मण असतील तेथे मला पोचव, नाहीतर खरेच सांगतो की माझे प्राण ( आता) जाऊं पाहत आहेत. ॥ दो० १४९ ॥

घडि घडि राव वदति सचिवा गा । प्रियतम-सुत संदेशां सांगा ॥
सखे युक्ति ती करि तरि बरवी । सीता लक्ष्मण राम दाखवी ॥
सचिव स-धीर वदे मृदुवाणी । महाराज ! पंडित नी ज्ञानी ॥
वीर सुधीर धुरंधर देवा । साधुसमाज सदा तुम्हिं सेवां ॥
जन्म-मरण सुखदुःखें भोगहि । विरह लाभहानी प्रिय योगहि ॥
स्वामी ! कालकर्मवश घडती । बलपूर्वक जशिं रात्र दिवस तीं ॥
सुखिं हर्षति जड दुःखीं रडती । धीर मनीं उभयां सम गणती ॥
धीरा धरा विवेक-विदारीं । त्यजा शोक, सकलां हितकारी ! ॥

दो० :- प्रथम वास तमसातटीं गंगातीरिं दुजाहि ॥
स्नान करुनि जलपान, दो वीर वसति सीताहि ॥ १५० ॥

राजा सचिवाला वारंवार म्हणाले की बाबा प्रियतम पुत्रांचा संदेश ( तरी) सांग ॥ १ ॥ मित्रा कांहीतरी चांगला उपाय ( युक्ती) कर व राम-लक्ष्मण - सीता मला दाखव ॥ २ ॥ धीर धरुन सचिव मृदु वानीने म्हणाला की, महाराज ! आपण पंडित नी ज्ञानी आहांत ॥ ३ ॥ आपण वीर, अति-धीर व धर्म धुरंधर आहांत आपण सदा देव व साधुसमाज्याची सेवा करित आला आहांत ॥ ४ ॥ जन्म - मरण, सुख - दु:ख इ. भोग, ( प्रिय) विरह - वियोग, लाभ - हानी इ. ॥ ५ ॥ सर्व गोष्टी स्वामी ! काळाच्या व कर्माच्या प्रभावाने ( इच्छा नसली तरी) रात्र दिवसाप्रमाणे बलपूर्वक घडत असतात ॥ ६ ॥ अडाणी - अज्ञानी ( जड) लोक सुखाने हर्ष पावतात व दु:खाने रडतात, पण आपल्यासारखे जे धीर असतात ते मनात दोन्ही समान मानतात ॥ ७ ॥ म्हणून आपण विवेकाने विचारपूर्वक धीर धरावा आणि शोक सोडावा ( कारण) आपण सर्वांचे हितकर्ते आहांत ( शोक सोडाल तरच हितकारी ठराल) ॥ ८ ॥ दो० पहिली वस्ती तमसा तिरावर झाली, तेथे स्नान व जलपान करुनच सीता व दोघे वीर राहीले, दुसरी वस्ती गंगातीरी झाली ॥ दो०१५० ॥

सेवा बहुत निषादें केली । शृंगवेरिं ती रजनी गेली ॥
मग सकाळिं वटपय मागवती । जटामुकुट निज शिरीं बनवती ॥
रामसखा मग नाव मागवति । प्रिये चढवुनी चढले रघुपति ॥
लक्ष्मण कार्मुकिं बाण लावुनी । चढले प्रभू-आज्ञेस पावुनी ॥
मजला विकल बघुनि रघुवीर । वदले मधुर वचन धृत-धीर ॥
तात ! नमन तातास वदावें । घडि घडि पद-पंकजा धरावें ॥
पाय धरुनि मम विनति वदावी । मम चिंता नच तात करावी ॥
पथिं वनिं मंगल कुशल आमचें । कृपा-अनुग्रह-पुण्यें तुमचें ॥

छं० :- तुमचे कृपेनें तात काननिं जात सुख पावेन मी ।
पाळूनि आज्ञा कुशल, बघणा पाय, येइन् फिरुन मी ॥
जननी सकल सांत्वूनि बहु पदिं नमुनि करुनी विनवणी ।
तुलसी करा तो य‍त्‍न जेणें कुशल राहति पुरधनी ॥ १ ॥
सो० :- वदा गुरुस संदेश धरुनि पद्मपद वार बहु ॥
करा असा उपदेश मज न शोचति किं अवधपति ॥ १५१ ॥

तेथे निषादराज - गुहाने पुष्कळ सेवा केली व ती रात्र शृंगवेरपुरातच गेली ॥ १ ॥ मग सकाळी रघुपतींनी वडाचे दूध ( चीक) मागवून आपल्या मस्तकावर जटामुकुट तयार केला ॥ २ ॥ मग रामसख्याने नाव मागविली तेव्हा आपल्या प्रिय पत्‍नीला नावेत चढवून नंतर रघुपती स्वत: चढले ॥ ३ ॥ लक्ष्मणांनी धनुष्यावर बाण लावला व आपल्या प्रभूची आज्ञा मिळताच त नावेत चढले ॥ ४ ॥ मला व्याकुळ झालेला पाहून रघुवीर धीर धरुन मधुर वचन बोलले की ॥ ५ ॥ तात ! ( माझ्या तर्फे) वारंवार चरण कमल धरुन माझे नमस्कार वडिलांना सांगावे ॥ ६ ॥ ( पुन्हा) पाय धरुन माझी विनंती सांगावी की बाबा ! आपण माझी चिंता मुळीच करु नये ॥ ७ ॥ आपल्या कृपेने, प्रसन्नतेने व आपल्या पुण्याईने प्रवासात व वनात आमचे सर्व मंगल व कुशल आहे ( व सदा असणारच) ॥ ८ ॥ बाबा ! तुमच्या कृपेने वनांत जात असता व गेल्यावर मी सुख पावेन, आपली आज्ञा पालन करुन मी ( आपल्या) पायांच्या दर्शनासाठी कुशल परत येईन सर्व मातांच्या पुन:पुन्हा पाया पडून व त्यांचे पुष्कळ सांत्वन करुन ( त्यांना) हीच विनवणी आहे की, तुलसीदास म्हणतात, जेणे करुन अयोध्याधीश कुशल राहतील तो यत्‍न करा. ॥ छं १ ॥ वारंवार गुरुजींचे चरण कमल धरुन त्यांना संदेश सांगा की जेणे करुन अयोध्यापती माझा शोक करणार नाहीत असा उपदेश त्यांस करावा ॥ दो० १५१ ॥

पुरजन परिजन सकलां प्रार्थुनि । सांगा मम विनती समजाउनि ॥
सर्वपरीं तें मम हितकारी । जे भूपा देती सुख भारी ॥
येतां सांगा निरोप भरता । नीति न सोडा राज्य पावता ॥
पाळा प्रजा कर्म-मन-वाणीं । सेवा जाणुनि सम सब जननी ॥
रक्ष अंतवरि बंधु ! बंधुपण । सेवुनि माता तात नि सज्जन ॥
असे सर्वदा जपा नृपानां । किं कधिं करिति न मम चिंता ना ॥
वदले कांहीं कठोर लक्ष्मण । राम मला विनविति त्या वर्जुन ॥
वारंवार शपथ निज घालुनि । बंधु-बाल-वच वदा न जाउनि ॥

दो० :- नमुनि काहिं वदुं लागतां स्नेह-शिथिल वैदेहि ॥
स्थगित वचन लोचन सजल फुलले पुलकहि देहिं ॥ १५२ ॥

नगरलोक व परिजन या सर्वांना प्रार्थना करुन माझी विनंती समजावून सांगावी की जे राजांना फार सुख देतील तेच माझे सर्व प्रकारे हितकर्ते होत ॥ १-२ ॥ भरत आल्यावर त्यांना निरोप सांगा की राज्य मिळाल्यावर नीती सोडू नका ( किंवा) ही निती आहे की राज्य मिळाल्यावर सोडू नये ॥ ३ ॥ मर्माने मनाने वाणीने प्रजेचे पालन करा व सर्व मातांना समान जाणून त्यांची सेवा करा ॥ ४ ॥ बंधु ! माता - पिता व सज्जन यांची सेवा करुन अंतापर्यंत ( १४ वर्षांपर्यंत) बंधुपणाचे रक्षण करा ( निभवा) ॥ ५ ॥ व राजांना असे जपा की ते माझी चिंता कधीही करणार नाहीत ॥ ६ ॥ लक्ष्मण काही कठोर बोलले त्यांना दाबून ( वर्जून) रामचंद्रांनी वारंवार आपली स्वत:ची शपथ घालून मला विनंती केली की लक्ष्मणाचे बाल - बोल जाऊन सांगू नका ॥ ७-८ ॥ मग वंदन करुन वैदेही काही बोलू लागणार तोच ती स्नेहाने इतकी शिथिल झाली की वाणी रुद्ध झाली, डोळे अश्रूंनी भरले व देह रोमांचांनी फुलून गेला ॥ दो०१५२ ॥

तों रघुवर-कल जाणुनि, होडी । पार जावया नाविक सोडी ॥
रघुकुलतिलक अशापर्तिं जाती । बघत उभा पवि करुनी छाती ॥
कसे सांगुं मी अपले क्लेशां । आणि जिवंत रामसंदेशा ॥
पुढें सचिव-वाचा ना चाले । हानी-ग्लानि-शोकवश झाले ॥
सूतवचन परिसत नरनाहो । महिं पडले उरिं दारुण दाहो ॥
तळमळ दारुण मोह मनाला । बाधी गढुळी जणुं मीनाला ॥
करत विलापा राण्या रडती । कशि वदवे विपदा अति जड ती ॥
श्रवुनि विलाप दुःख दुःखाला । धैर्याचाही धीर पळाला ॥

दो० :- राउळिं आक्रोशा श्रवुनि पुरिं कोलाहल घोर ॥
विपुल-विहगवनिं पतित जणुं कुलिश कठोर ॥ १५३ ॥

इतक्यात रघुवरांची इच्छा जाणून नावाड्याने पलिकडे जाण्यासाठी होडी सोडली चालू केली ॥ १ ॥ याप्रमाणे रघुपति निघून गेले व मी आपल्या छातीचे वज्र करुन बघत उभा राहीलो ॥ २ ॥ मी स्वत:चे क्लेश कसे सांगू ! ( मात्र) मी रामसंदेश घेऊन जिवंत आलो ॥ ३ ॥ इतके म्हटल्यानंतर सचिवाची वाचाच खुंटली व तो हानीच्या ग्लानीने व शोकाने व्याकुळ झाला. ॥ ४ ॥ ( हृदय वज्राचेच झाले असले पाहीजे, म्हणून तर ते दृश्य बघत असता माझी छाती फुटून प्राण गेले नाहीत) सूताचे वचन ऐकताच नरनाथ जमिनीवर पडले व हृदयात दारुण दाह झाला ॥ ५ ॥ माशाला गढुळी ( नव्या पाण्य़ाचा फेस) बाधली म्हणजे त्याचे दारुण मोहाने व्याप्त होऊन तो जसा तळमळत असतो तशीच जणूं राजाची दशा झाली ॥ ६ ॥ सर्व राण्या विलाप करीत रडूं लागल्या ती अति जड ( भारी मोठी) विपत्ती कशी वर्णन करता येणार ? ॥ ७ ॥ तो आक्रोश ऐकून दु:खाला सुद्धा दु:ख झाले आणि धैर्याचाही धीर ( त्याला सोडून) पळाला ॥ ८ ॥ राउळांतील ( राजवाड्यांतील) आक्रोश ऐकून नगरात असा मोठा कोलाहल झाला की जणूं विपुल विहंगांच्या वनांत रात्रीच्या वेळी वज्रच पडले असावे ॥ दो० १५३ ॥

प्राण-कंठगत झाले राउळ । वाळ विना मणि जाणों व्याकुळ ॥
विकल इंद्रियें सगळीं भारी । जणुं सरिं सरसिजवन विण वरी ॥
क्षीण नृपति कौसल्ये भासत । जाणे रविकुल-रवी मावळत ॥
रामजननि उरिं धरि धीराला । बोले समयोचित वचनाला ॥
नाथ ! समजुनी करा विचार किं । राम-वियोग पयोधि अपार किं ॥
तारु अयोध्या नाविक आपण । पांथिक बसले सगळे प्रियजन ॥
धीर धरा तर पावू पारा । ना तर बुडूं सहित परिवारा ॥
मनीं धरा प्रिय ! जर मम विनती । राम नि लक्ष्मण सिता भेटती ॥

दो० :- प्रियावचें मृदु बघति नृप उघडुनि विलोचनांस ॥
म्लान मीन तडफडत जणुं शिंपत शीत जलास ॥ १५४ ॥

राजाचे प्राण कंठांत आले व असे वाटूं लागले की जणूं मणीविहीत झालेला नाग व्याकुळ झाला आहे ॥ १ ॥ सर्व इंद्रिये जशी भारी विकल ( लुळी) झाली की जणूं पाण्यावाचून सरोवरांतील कमळांचा ताटवाच ॥ २ ॥ कौसल्येला दिसले राजा क्षीण झाले आहेत व वाटले की सूर्य कुळाचा सूर्य आता मावळत आहे ॥ ३ ॥ तेव्हा हृदयात धीर धरुन रामजननी त्या प्रसंगाला उचित असे म्हणाले की ॥ ४ ॥ नाथ ! मनात समजून विचार करावा की रामवियोग हा अपार सागर आहे ॥ ५ ॥ अयोध्या जहाज असून आपण नाविक - कर्णधार आहांत व सर्व प्रिय मंडळी त्या जहाजांत बसलेले प्रवासी आहेत. ॥ ६ ॥ आपण धीर धरलात तर सागराच्या पार जाता येईल. नाहीतर सर्व परिवार बुडून जाईल. ॥ ७ ॥ प्रिय स्वामी ! आपण माझी विनंती जर मनावर घेतलीत तर राम लक्ष्मण नी सीता ( पुन्हा) भेटतील ॥ ८ ॥ हे प्रियेचे मृदु वचन ऐकून राजाने डोळे उघडून पाहीले तेव्हा असे वाटले की जणूं मासा पाण्य़ावाचून म्लान होऊन तडफडत असता शितल जलच शिंपडले गेले ॥ दो० १५४ ॥

उठुनि बसति धृतधीर भूपवर । वद् सुमंत्र कुठं राम कृपाकर ॥
लक्ष्मण कुठे राम सुस्नेही । प्रिय सुतवधू कुठे वैदेही ॥
भूप विकल बहुविधा विलपती । युग-सम होइ, न सरत रात्र ती ॥
अंध-तापसी-शाप आठवत । कथा सकल कौसल्ये सांगत ॥
होति विकल वर्णित इतिहासा । रामसहित धिग् जीवन-आशा ॥
ठेउनि काय, काय तो करणें । जेणें प्रेमपण न मम पुरणें ॥
रघुनंदन हा ! प्राणवासरा । तुजविण जगलों फार वासरां ॥
हा जानकि ! लक्ष्मण ! हा रघुवर ! । तात -चित्त-चातक घन हितकर ॥

दो० :- राम राम राम ! हि वदुनि राम राम हें राम ॥
रघुवर विरहें त्यजुनि तनु नृप गांठति सुरधाम ॥ १५५ ॥

धीर धरुन भूपश्रेष्ठ उठून बसले व म्हणाले की सुमंत्र ! कृपालु राम कुठे आहेत सांग ॥ १ ॥ लक्ष्मण कुठे आहे ? सुस्नेही राम कुठे आहेत व प्रियवधू वैदेही कुठे आहे ? ॥ २ ॥ व्याकुळ झालेले भूपती याप्रमाणे नाना विलाप करुं लागले व ती रात्र युगासारखी होऊन संपेचना ॥ ३ ॥ इतक्यात राजाला अंध तापसाच्या शापाची आठवण झाली व राजाने ती सर्व कथा कौसल्येला सांगीतली ॥ ४ ॥ तो इतिहास वर्णित असतां राजा ( पुन्हा) व्याकुळ झाले ( व म्हणाले) रामाशिवाय जगण्याच्या आशेचा धिक्कार असो ॥ ५ ॥ ज्याने माझा प्रेमपण पुरा केला नाही तो देह ठेऊन काय करायचे ? ॥ ६ ॥ हा रघुकुलाला आनंद देणार्‍या प्राणवासरा ! तुझ्यावाचून मी पुष्कळ दिवस जगलो ! ॥ ७ ॥ हा जानकी ! हा लक्ष्मण ! हा रघुवर! हा ! पित्याच्या चित्तरुपी चातकाचे हित करणार्‍या मेघा ! ॥ ८ ॥ राम राम राम व राम राम राम ! असे उच्चारुन रघुवर विरहाने देह त्याग करुन राजाने स्वर्ग गाठला ॥ दो० १५५ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP