॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ५ वा



Download mp3

दो० :- कपट-कुरंगा-संगिं गत पळत जसे श्रीराम ॥
सीता हृदिं धरि रूप तें जपत राहि हरिनाम ॥ २९ म ॥

कपटमृगाच्या संगाने (त्याच्या पाठोपाठ) श्रीराम जसे धावत गेले ते रूप हृदयांत धारण करून सीता हरिनाम जपत तेथे राहिली. ॥ दो० २९म ॥

रघुपति अनुजा येतां पाहति । चिंता बाह्य विशेषें दावति ॥
त्यजुनि एकली जनकसुतेसी- । तात वचन मम मोडुन येसी ॥
फिरती निशाचर निकर काननीं । सिता न आश्रमिं गमे मम मनीं ॥
धरि पदकमल अनुज कर जोडी । म्हणे नाथ ! मम कांहिं न खोडी ॥
प्रभु गेले अनुजासह तेथें । गोदावरि-तटिं आश्रम जेथें ॥
बघुन जानकीविहीन आश्रम । व्याकुळले प्राकृत दीनासम ॥
हा गुणखाणि जानकी सीते । व्रत-सुशील-छवि-नेम पुनीते ॥
लक्ष्मण नानापरिं समजावित । लता-तरूनां जाति विचारित ॥
मधुकर-गण हो ! पशुपक्षी हो ! । दिसली सीता हरिणाक्षी हो ? ॥
शुक कपोत खंजन मृग मीन । मधुप निकर कोकिला प्रवीण ॥
कुंदकळी दाडिंम दामिनी । कमलशरदशशि अहि भामिनी ॥
वरुणपाश मनिसिजधनु हंसा- । गज-हरि-कानीं निज प्रशंसा ॥
श्रीफल कांचन-कदली हर्षति । भय न लाज लव मनांत धरती ॥
श्रुणु जानकि ! तुजविण हे सगळे । प्रमुदित राजपदीं जणुं चढले ॥
स्पर्धा सोसे कशी तुला ही । प्रिये शीघ्र कां प्रगटत नाहीं ॥
शोधित विलपति ऐसे स्वामी । जणूं महा विरही अति कामी ॥
राम अवाप्तकाम सुखराशी । मनुज चरित करि अज अविनाशी ॥
सम्मुख पतित गृध्रपति बघति । स्मरत रामपदिं चिन्हें असतीं ॥

दो० :- कर सरोज शिरिं लाविति अति रघुवीर कृपाल ॥
बघुनी राम-छवि धाम-मुख गत पीडा सब हाल ॥ ३० ॥

अनुजाला येताना पाहून बाह्यतः (वरवर) विशेष चिंता दाखविली. ॥ १ ॥ व म्हणाले की तात ! जनकसुतेला एकटी टाकून माझी आज्ञा मोडून आलास ? ॥ २ ॥ राक्षसांच्या टोळ्या वनांत हिंडत आहेत. तुला बजावले होते तेव्हां माझ्या मनाला वाटते की सीता आश्रमांत नाही. ॥ ३ ॥ अनुजाने चरणकमल धरले व हात जोडून म्हटले की नाथ ! माझा काहीही दोष नाही. ॥ ४ ॥ गोदावरीतटी जेथे आश्रम होता तेथे प्रभु अनुजासह गेले. ॥ ५ ॥ आश्रमांत जानकी नाही असे पाहून प्रभु प्राकृत दीनासारखे व्याकुळ झाले. ॥ ६ ॥ हा ! गुणखाणी जानकी ! हा सीते ! पतिव्रते सुशील, रूप व नेम पवित्र असलेल्या सीते ! ॥ ७ ॥ लक्ष्मणाने नाना प्रकारे समजून घातली पण, प्रभु वृक्षांना व लतांना विचारीत चालले. ॥ ८ ॥ हे मधुकरपंक्तीनो ! अहो पशूनो ! अहो पक्ष्यांनो ! हरिणाक्षी, मृगनयनी सीता तुम्हांला कुठे दिसली कां ? ॥ ९ ॥ पोपट, कबुतर, खंजनपक्षी, हरिण, मीन, मधुपांचे थवे, प्रवीण कोकिळा ॥ १० ॥ कुंदाच्या कळ्या, डाळिंब, वीज, कमल, शरद ऋतूंतील चंद्र, नागीण ॥ ११ ॥ वरुणपाश, मदन धनुष्य, हंस, हत्ती व सिंह यांच्या कानी आज त्यांची स्वतःची प्रशंसा येत आहे. ॥ १२ ॥ बेलफळ (श्रीफळ) सोने, सोनकेळ यांना आज हर्ष होत आहे व जरा सुद्धां लाजलज्जा, भय नाही वाटत कोणाचे ! ॥ १३ ॥ जानकी ! ऐक ! हे सगळे तू नाहीस म्हणून असे अति आनंदित झाले आहेत की जणूं काय त्यांना राज्यपदच मिळाले आहे. ॥ १४ ॥ सीते ही स्पर्धा तुला कशी सहन होते ? प्रिये तू लवकर का प्रगट होत नाहीस ? ॥ १५ ॥ जगाचे व इंद्रियांचे स्वामी जणूं महा विरही अति कामी पुरुषाप्रमाणे शोधित असे विलाप करीत आहेत. ॥ १६ ॥ राम अवाप्त काम = पूर्णकाम, सुखराशि, अजन्मा, अविनाशी असून नरलीला करीत आहेत. ॥ १७ ॥ विलाप करीत शोधीत असतां समोरच गृध्रराज पडलेला दिसला. राम-चरणांवर जी सामुद्रिक चिन्हे आहेत त्यांचे तो स्मरण करीत पडलेला आहे. ॥ १८ ॥ अतिकृपालु रघुवीराने आपला कमलहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. रामचंद्रांच्या शोभाधाम मुखाकडे पाहिल्यावर त्याची सर्व पीडा व हाल यांचा नाश झाला. ॥ दो० ३० ॥

वदे गृध्र करि धीरा धारण । राम ! ऐकणें भव-भय-भंजन ॥
नाथ ! दशमुखें ही गति केली । खळें जानकी हरुनी नेली ॥
प्रभु ! तो गत घेउन दक्षिण दिशिं । होती ती विलपत अति कुररिशि ॥
प्रभो ! राखिले प्राण दर्शना । जाउं बघति कीं कृपानिधाना ॥
राम म्हणति ताता ! तनु ठेवा । सस्मित मुख खग वदला देवा ! ॥
ज्यांचें नाम मरत मुखिं ये जरि । मुक्त अधमही वेद वदे तरि ॥
ते लोचन-गोचर मम संमुख । नाथ ! ठेउं तनु मिळवुं कवण सुख ॥
सजल नयन रघुराजा सांगति । तात पावलां निजकर्मे गति ॥
परहित मनिं वसतें ज्यांच्या ही । त्यांस कांहिं जगिं दुर्लभ नाही ॥
त्यजुनि तात तनु जा मम धामा । देउं काय तुज पूरित-कामा ॥

दो० :- सीताहरण तात नच वदा पित्या जाऊन ॥
मी जर राम दशास्य तें वदे सकुल येऊन ॥ ३१ ॥

मग धीर धारण करून गृध्र जटायू म्हणाला की रामा ! भवभंजना ! ऐका. ॥ १ ॥ नाथ ! दशमुखाने ही अशी माझी दशा केली आणि त्या खळाने जानकीला हरून नेली. ॥ २ ॥ प्रभु ! तो तिला दक्षिण दिशेला घेऊन गेला. ती टिटवीसारखी अति विलाप करीत होती. ॥ ३ ॥ प्रभो ! आपल्या दर्शनासाठी प्राण कसेतरी रक्षण करून ठेवले होते कृपानिधाना ! ते आतां जाऊं बघतात तेव्हां राम म्हणाले, ’हे तात ! शरीर धारण करा.’ तेव्हां जटायु सस्मित मुखाने म्हणाला की ॥ ५ ॥ ज्यांचे नाम मरतानां जरी मुखांत आले तरी अधम सुद्धां मुक्त होतात असे वेद म्हणतात. ॥ ६ ॥ ते प्रभु माझ्यासमोर डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत असतां नाथ ! मी देह ठेवून कोणते सुख मिळवू ? (कोणत्या सुखाच्या आशेने देह ठेवू ? ॥ ७ ॥ नेत्र अश्रूनीं भरलेले रघुराज म्हणाले कीं तात ! तुम्ही आपल्या स्वतःच्या कर्मानेच सद्‌गति पावलांत ॥ ८ ॥ ज्यांच्या मनांत परहितच वसतें त्यांना या जगांत काहीच दुर्लभ नाही. ॥ ९ ॥ तात ! तुम्ही देहत्याग करून माझ्या धामाला जा (ते मी तुम्हाला देतो). मी आपणास काय देऊं ! आपण पूर्णकाम आहांत. ॥ १० ॥ तात ! सीताहरणाची गोष्ट मात्र जाऊन माझ्या पित्याला सांगू नका. मी जर राम असेन तर ते दशानन कुळासहित येऊन सांगेल. ॥ दो० ३१ ॥

त्यजुनि गृध्रतनु धरि हरिरूपा । पीतांबर भूषणां अनूपां ॥
श्याम गात्र विशाल भुज चारी । स्तुती करी लोचनिं बहु वारी ॥

छं० :- जय राम अनुपम रूप निर्गुण सगुण गुण-चालक खरे ।
दशशीस बाहु प्रचंड खंडण चंड शर, मंडण धरे ॥
पाथोद-गात्र, सरोज मुख, राजीव-आयत लोचनं ।
नित नौमि राम कृपाल बाहु विशाल भवभयमोचनं ॥ १ ॥
ब ल म प्र मे य म ना दि म ज म व्य क्त मे क म गो च रं ।
गोविंद गोपर द्वंद्वहर विज्ञानघन धरणीधरं ॥
जे राममंत्र जपति संत अनंत जनमन-रंजनं ।
नित नौमि राम अकाम-प्रिय कामादि-खलदलगंजनं ॥ २ ॥
ज्या श्रुति निरंजन विरज अज ही ब्रह्म विभु वाखाणती ।
जें ध्यान विरतीज्ञान-योगानेकिं कधिं मुनि पावती ॥
तें प्रगट करूणाकंद शोभावृंद अगजग मोहती ।
मम हृदय-पंकज-भृंग, अंगिं अनंग बहु छवि शोभती ॥ ३ ॥
जो अगम सुगम हि सहज निर्मल असम सम शीतल सदा ।
बघती जया योगी सुयत्‍नें करित मन गो वश सदा ॥
तो राम रमानिवास संतत दास-वश तिभुवन धनी ।
मम वसतु हृदिं तो शमन संसृति कीर्ति ज्याची पावनी ॥ ४ ॥
दो० :- मागुनि अविरल भक्तिवर गृध्र गाठि हरि-धाम ॥
त्याची क्रिया यथोचित स्वकरें करिती राम ॥ ३२ ॥

गृध्र देहाचा त्याग करून त्याने हरिरूप धारण केले; अनुपम पीतांबर परिधान केला असून अनुपम भूषणे अंगावर आहेत. ॥ १ ॥ शरीर श्यामवर्णाचे असून चारीबाहू विशाल आहेत त्याचे डोळे पाण्याने भरले आहेत व तो रामाची स्तुति करूं लागला. ॥ २ ॥ राम आपला जय असो; आपले रूप अनुपम असून आपण निर्गुण व सगुणही आहांत आणि आपणच खरे गुणांचे चालक-प्रेरक आहांत. दशशीर्षाच्या प्रचंड शिरांचे व बाहूंचे खंडण करण्यासाठी हातांच चंड बाण व धनुष्य धारण करणार्‍या, भूमीचे विभूषण असलेल्या, पाण्याने भरलेल्या मेघासारखे श्याम शरीर, कमळाप्रमाणे मुख, लाल कमळासारखे विशाल नेत्र व विशाल बाहू असलेल्या, भवभयांतून सोडविणार्‍या कृपालु रामा ! मी आपणांस नित्य नमस्कार करतो. ॥ छं १ ॥ आपले बल प्रमाणातीत (अप्रमेय, अपरिमित) आहे; आपण अनादि, अज (जन्मरहित), अव्यक्त, एक, अगोचर, वेदांतवेद्य (गो. विन्द), इंद्रियातीत, सुख-दुःख, लाभ-हानि, जन्म-मरण इ. द्वंद्वाचा नाश करणारे, केवळ विज्ञानघनस्वरूप, व पृथ्वीला धारण करणारे आहात. जे राममंत्र जपतात अशा अनंत संतांच्या व दासांच्या मनाला आनंद देणारे अनंत आपण असून आपल्याला अकाम सेवक प्रिय आहेत आणि कामादि खलांच्या समुदायाचा विनाश करणारे आपण आहांत. हे राम ! मी आपल्याला नित्य नमस्कार करतो. ॥ छं २ ॥ ज्याचे वर्णन श्रुति निरंजन, गुणातीत (विरज), अज, ब्रह्म, विभु (व्यापक) इत्यादि प्रकारे करतात व ज्याची प्राप्ति ध्यान, ज्ञान, वैराग्य, योग इ. अनेक साधनानी कधीतरी मुनींना होते तेच ब्रह्म करुणारुपी जलाची वृष्टि करणारे, लावण्यनिधान (शोभावृंद) रूपाने प्रगट होऊन सर्व चराचराला मोहित करीत आहेत व माझ्या हृदयरूपी कमळांत भृंगाप्रमाणे विराजमान होणार्‍या त्यांच्या प्रत्येक अंगाच्या ठिकाणी अनेक अनंगाचे सौंदर्य शोभत आहे. ॥ छं ३ ॥ जो अगम्य ही आहे व सुगमही आहे, सहज निर्मल आहे, विषम आणि सम आहे, व सदा शीतल आहे. योगी मन व इंद्रिये यांना सदा वश करून ठेऊन याला पाहतात (अनुभवतात) तोच त्रिभुवनांचा स्वामी राम, रमानिवास, आपल्या दासांना निरंतर वश होऊन जातो व ज्याची पावन कीर्ति संसृतीचे शमन करते तो माझ्या हृदयांत निवास करो. ॥ छं ४ ॥ अविरल भक्तिचा वर मागून जटायू (हरिरूपाने) हरिधामास गेला. (त्याने हरिधाम गाठले). नंतर रामचंद्रानी आपल्या हातानी त्याची क्रिया योग्य रीतीने केली. ॥ दो० ३२ ॥

कोमल मन अति दीन दयालू । कारण विण रघुनाथ कृपालू ॥
गृध्र अधम खग आमिष भोगी । गति दिधली जी याचिति योगी ॥
ऐक उमे ते लोक अभागी । त्यजुनि हरिस विषयीं अनुरागी ॥
मग सीते सोधित दो भ्राते । जाति विलोकित सघन वनातें ॥
लता विटप-संकुल घन कानन । बहु खग मृग वृक गज पंचानन ॥
येतां पंथिं कबंधा वधला । सकल शाप वार्ता तो वदला ॥
शाप मला दिधला दुर्वासें । अघ तें प्रभुपद-दर्शनिं नासे ॥
श्रुणु गंधर्वा तुला सांगतो । ब्रह्मकुलद्रोहि न मज रुचतो ॥

दो० :- त्यजुनि कपट तनमनवचनिं जो भूसुर सेवील ॥
मी विधि शिव सुर सर्व ही त्याला वश होतील ॥ ३३ ॥

रघुनायक अति कोमल मनाचे व दीनांवर अति दया करणारे व कारणाशिवायच कृपा करणारे आहेत. ॥ १ ॥ गिधाड व अधम पक्षी व मांसभक्षक असून त्याला अशी गति दिली की जिच्या साठी योगी याचना करीत असतात, पण त्यांना मिळत नाही. ॥ २ ॥ उमे ! ऐक, जे लोक हरिला सोडून विषयांवर प्रेम करतात ते अभागी होत. ॥ ३ ॥ मग ते दोघे भाऊ सीतेला शोधीत घनदाट अरण्य अवलोकन करीत चालले. ॥ ४ ॥ ते अरण्य लतावृक्षांनी अगदीं घनदाट कोंदलेले होते व त्यांत पुष्कळ पशू पक्षी लांडगे, हत्ती व सिंह होते. ॥ ५ ॥ मार्गांत आड आलेल्या कबंध राक्षसाला मारला तेव्हां त्याने शापाची सर्व हकीकत सांगितली. ॥ ६ ॥ दुर्वास ऋषींनी मला शाप दिला होता, आतां ते पाप प्रभुचरणांच्या दर्शनाने नष्ट झाले. ॥ ७ ॥ हे गंधर्वा मी तुला सांगतो ते ऐक. ब्रह्मकुळाचा द्रोह करणारा मला मुळीच आवडत नाही. ॥ ८ ॥ जो शरीराने (कृतीने) मनाने व वाणीने कपट सोडून ब्राह्मणांची सेवा करील त्याला मी स्वतः, ब्रह्मदेव शंकर व सगळे देव वश होतील. ॥ दो० ३३ ॥

शापिति ताडिति परुष भाषती । विप्र पूज्य असं संत सांगती ॥
विप्र पूज्य गुण-शील-विहीन हि । ज्ञानिं गुणगणीं निपुण शूद्र नहि ॥
सांगति निजधर्मा समजाउनि । स्वपदीं प्रीति बघुनि भावे मनिं ॥
नमुनी रघुपति पद-कमलांला । निज गति पावुनि नभीं निघाला ॥
देउनि राम उदार तया गति । पद शबरी आश्रमास लावति ॥
शबरी बघुनि राम घरिं आले । स्मरुनी मुनिवचना मनिं भरले ॥
सरसिज लोचन भुजा विशाला । जटा मुकुट शिरिं उरिं वनमाला ॥
श्याम गौर सुंदर दो भाई । शबरीं चिकटुनि पडली पायीं ॥
प्रेम मग्न मुखिं वचन येत ना । घडि घडि नमि शिर सरसिज चरणां ॥
जल घे प्रक्षाळी पद सादर । मग बसविले आसनिं सुंदर ॥

दो० :- कंद मूल फल सुरस अति दे रामा आणून ॥
प्रेमानें प्रभु खाती पुन्हां पुन्हां वानून ॥ ३४ ॥

शाप देत असोत, ताडन करणारे असोत किंवा कठोर भाषण करणारे असोत, विप्रच पूज्य आहेत असे संतही सांगतात. ॥ १ ॥ ब्राह्मण शीलहीन व गुणहीन असला तरी तो पूज्य आहे पण गुणगणांत व ज्ञानांत निपुण असा शूद्र असला तरी तो पूज्य नाही. ॥ २ ॥ प्रभूनी आपला धर्म (भागवत धर्म) त्याला समजाऊन सांगितला व आपल्या चरणांच्या ठिकाणी त्याची प्रीति पाहून तो प्रभूला प्रिय वाटला. ॥ ३ ॥ रघुपतींच्या चरण कमलांना नमन करून तो आपली गति पावून आकाशमार्गाने गेला. ॥ ४ ॥ उदार रामचंद्र त्याला गति देऊन शबरीच्या आश्रमास पाय लावते झाले. ॥ ५ ॥ राम घरी आलेले पाहिले, व मुनीचे वचन आठवले तेव्हां तिच्या मनंत भरले; ॥ ६ ॥ कमललोचन आजानुभुज, मस्तकावर जटामुकुट, व हृदयावर वनमाला रुळत आहे अशा श्याम व गौर वर्णाच्या दोन्ही सुंदर भावांच्या पायांना मिठी घालून शबरी पाया पडली. ॥ ७-८ ॥ प्रेमांत मग्न झाल्यामुळे मुखांतून शब्द येत नाही पण वारंवार चरणकमलांवर शिरकमल ठेऊन नमन करूं लागली. ॥ ९ ॥ पाणी घेऊन आदराने पाय धुतले व मग दोघांना सुंदर आसनावर बसविले. ॥ १० ॥ अति सुरस कंदमूलफले रामचंद्रास आणून दिली व प्रभु त्यांची पुनः पुन्हां प्रशंसा करीत प्रेमाने खाऊ लागले. ॥ दो० ३४ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP