॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय २७ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

जाऊं सीता-स्वयंवराला । बघुं महती दे ईश कुणाला ॥
लक्ष्मण वदे तोच यशभाजन । ज्यावर नाथ! कृपाकर आपण ॥
हर्षित मुनि सब वर वच ऐकुनि । देती आशिस सब सुख पावुनि ॥
मग मुनिवृंद-समेत कृपालें । कृत गमना बघुं धनुमखशाले ॥
रंगभूमिं आले दो भ्राते । पुरजन सब पावति शोधातें ॥
निघति भुलुनि गृह-कार्यें सारीं । बाल जवान जरठ नरनारी ॥
जनक बघुन बहु गर्दी जमली । शुचि सेवक सब आणवि जवळी ॥
त्वरें निकट लोकां सब जावें । उचितासनिं सकलां बसवावें ॥

दो० :- बोलुनि त्यानीं नम्र मॄदु बसविले नर नारि ॥
उत्तम मध्यम नीच लघु स्थळिं निज पदानुसारिं ॥ २४० ॥

धनुर्भंग (प्रकरण) -
(विश्वामित्र म्हणाले) सीता स्वयंवराला जाऊन पाहू या, ईश कोणाला महती देतात, ते पाहू तर खरे ! ॥ १ ॥ (त्यावर) लक्ष्मण म्हणाले, हे नाथ ! आपण ज्याच्यावर कृपा कराल तोच यशाचा भागीदार होईल ॥ २ ॥ हे सुंदर वचन ऐकून सगळे मुनी हर्षित झाले व सर्वांना सुख होऊन सर्वांनी आशीर्वाद दिला ॥ ३ ॥ पुन्हा कृपालु रघुवीराने धनुर्मखशाला पाहण्यासाठी गमन केले ॥ ४ ॥ दोघे बंधू रंगभूमीत आले असा शोध सर्व पुरजनांस लागला ॥ ५ ॥ त्याबरोबर मुले, तरुण, म्हातारे, पुरूष व स्त्रिया इत्यादी सर्वजण आपापली घरकामे विसरुन वा टाकून भराभर घरातून निघाले. ॥ ६ ॥ लोकांची एकदम फार गर्दी झाली आहे असे पाहून जनकाने सर्व विश्वासू व कार्यतत्पर सेवकांना जवळ बोलावून घेतले ॥ ७ ॥ त्वरा करुन सर्व लोकांजवळ जा व सगळ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार योग्य जागी बसवा ॥ ८ ॥ दो०- त्या शुचि सेवकानी नम्रतेने मृदु व गोड बोलून उत्तम - मध्यम - कनिष्ठ व लहान याना त्यांच्या योग्यते प्रमाणे योग्य स्थळीं बसविले स्त्रियांना त्याचे जागी व पुरुषांना पुरुषांचे जागी बसवले ॥ दो० २४० ॥

राजकुमार आले त्या समयीं । प्रस्तृत मनोहरता जणुं कायीं ॥
गुणसागर नागर वर वीर । सुंदर शामल गौर शरीर ॥
राजसमाजिं विराजति सुंदर । उडुगणिं जणुं युग पूर्ण इंदु वर ॥
मनी भावना ज्यांच्या जैसी । दिसली त्या प्रभु-मूर्ती तैसी ॥
बघती रूप महा रणधीर । जणूं वीररस धरी शरीर ॥
सभय कुटिल नृप प्रभुला पाहत । भारि भयानक मूर्ती भासत ॥
असती असुर कपट-नृप-वेषीं । प्रगट तयां प्रभु काळ विशेषीं ॥
बंधू-द्वया बघति पुरवासी । नरभूषण लोचन-सुख-रासी ॥

दो० :- नारी निरखिति मुदित मन निज निज रुचि अनुसार ॥
मूर्ति परम अनुपम धरुनि जणुं शोभे शृंगार ॥ २४१ ॥

सर्वजण स्थानापन्न झाले व त्याचवेळी दोघे राजकुमार रंगभूमीत प्रवेशले तेव्हा त्यांच्या शरीरावर जणूं मनोहरता पसरलेली आहे असे वाटले ॥ १ ॥ ते गुणसागर, चतुर व श्रेष्ठवीर असून सुंदर श्यामल व गौर शरीराचे आहेत ॥ २ ॥ नक्षत्र-समुहात दोन निर्दोष पूर्णचंद्र (एकाच वेळी) विराजमान व्हावे तसेच जणूं त्या राजसमाजात सुंदरतेने शोभत आहेत ॥ ३ ॥ ज्यांच्या मनात जशी भावना होती तशी त्यांना प्रभूची मूर्ती दिसली ॥ ४ ॥ महारणधीरांनी प्रभूचे रुप पाहीले तो जणू वीररसाने शरीर धारण केले आहे असे वाटले ॥ ५ ॥ कुटिल राजे प्रभूला पाहून असे घाबरले की जणू भारी भयानक रसाची मूर्तीच भासली ॥ ६ ॥ राजांचा कपट वेष घेतलेल्या असुरांना प्रभू विशेष रुपाने आलेल्या काळासारखे दिसले ॥ ७ ॥ दोन्ही भावांना पुरवासी लोकांनी पाहीले त्यास ते नरभूषण व लोचनांच्या सुखाची रासच दिसली ॥ ८ ॥ दो०- स्त्रिया मुदित मनाने आपापल्या रुचीनुसार पाहू लागल्या तो त्यांना शृंगार रसच जणुं परम अनुपम देह धारण करुन शोभत आहे असे वाटले ॥ दो० २४१ ॥

प्रभु-विराटमय पाहति पंडित । बहु पद कर शिर मुखाक्षि मंडित ॥
जनक जाति अवलोकति कैसे । स्वजन सगे प्रिय वाटति जैसे ॥
सहित विदेह विलोकिति राणी- । शिशुसम कशी प्रीति कुणि वानी ॥
परमतत्त्वमय योगि-जनांसी । शांत शुद्ध सम स्वयंप्रकाशी ॥
हरिभक्तां दिसले दो भ्राते । इष्टदेव इव सब सुखदाते ॥
सिता राम ज्या भावें बघते । स्नेह न वा कथनीय सौख्य तें ॥
तिजहि न वदवे हृदयीं अनुभवि । शके कोण कधिं केवीं वदुं कवि ॥
एविं भाव मनिं जेवीं वसले । त्यां कोसल पति तेवीं दिसले ॥

दो० :- राज-समाजिं विराजती कोसलराज-किशोर ॥
सुन्दर शामल गौर तनु विश्व-विलोचन-चोर ॥ २४२ ॥

ज्ञानी पंडित यांना प्रभूचे विराट रुप-दर्शन घडले म्हणजे पुष्कळ पाय हात डोकी, मुखे व डोळे यांनी युक्त असे रुप दिसले ॥ १ ॥ जनकाच्या नातेवाईकांना आपल्या प्रिय सगे-सोयरे रुपात ते दिसले ॥ २ ॥ विदेहासहित सर्व राण्यांना आपल्या लहान बालकांप्रमाणे (दोघे) वाटले, त्यांच्या त्या प्रीतीचे वर्णन कोण कसे करेल ! ॥ ३ ॥ योगी लोकांना परम तत्वमय-शांत-शुद्ध-स्वयंप्रकाशी (आत्मतत्वाचे दर्शन) घडले ॥ ४ ॥ तर दोघे बंधू हरिभक्तांना आपल्या इष्टदेवासारखे सर्व सुख देणारे दिसले ॥ ५ ॥ सीता ज्या भावाने रामाकडे पाहत आहे तो स्नेह व ते सौख्य अकथनीय आहे (नेमक्या शब्दात गवसणारेच नाही) ॥ ६ ॥ (इतकेच नव्हे तर) ते तिलाही सांगता येणार नाही (कारण) ते फक्त ती हृदयात अनुभवत आहे. त्यामुळे तिचे ते अनुभाव्य सुख कोणता कवी शब्दाने वर्णूं शकेल ! ॥ ७ ॥ याप्रमाणे ज्यांच्या मनात जसा भाव तसे त्यांना कोसलपती राम दिसले ॥ ८ ॥ सुंदर श्यामल व गौर शरीराचे विश्वविलोचनांना चोरुन घेणारे कोसल देशच्या राजाचे हे दोन कुमार राजसमाजात विराजत आहेत. ॥ दो० २४२ ॥

दोन्ही सहज मनोहर मूर्ती । कोटि काम उपमा हि अपूर्ती ॥
सुंदर मुख शरदेन्दु-विनिन्दक । नीरज-नयन मना आल्हादक ॥
नजर सुचारु मार-मनहारी । वदवत ना, जीवा प्रिय भारी ॥
श्रुति कल गाल, कुंडलें लोलहि । चिबुक अधर सुंदर, मृदु बोलहि ॥
हास्य निन्दितें कुमुद-बंधु कर । विकट भ्रुकुटि नासिका मनोहर ॥
भालिं विशालीं तिलक झळकती । कच लक्षुनि अलि-अवलि लाजती ॥
पीत चौतनीं शिरीं मनोरम । कुसुम-मुकुल मधिं गुंफित उत्तम ॥
कंबु गळां कल रेखा परमा । त्रिभुवन सुषमेची जणुं सीमा ॥

दो० :- कुंजर-मणि-कंठा कलित हृदयीं तुलसी माळ ॥
वृषस्कंध केसरी-ढब बलनिधि बाहु विशाळ ॥ २४३ ॥

दोन्ही मूर्ती इतक्या सहज मनोहर आहेत की कोटी कामदेवाची उपमा सुद्धा अपुरीच पडते ॥ १ ॥ दोघांचेही सुंदर मुख शारदीय पौर्णिमेच्या चंद्राची निन्दा करणारे (लाजविणारे) आहे. दोघांचेही कमल-नयन मनाला आल्हाद देणारे आहेत ॥ २ ॥ नजर तर फारच सुंदर असून मदनाचे मन चोरुन घेणारी आहे ती जिवाला फार प्रिय वाटते पण वर्णन करता येणे शक्य नाही ॥ ३ ॥ गाल व कान सुंदर आहेत व कानांत कुंडले डोलत आहेत. हनुवटी व ओठ रम्य असून बोलणं सुंदर व मृदु आहे ॥ ४ ॥ दोघांचे हास्य कुमुद बंधूंच्या (चंद्राच्या) किरणांची निन्दा करीत आहे व भिवया वक्र असून नाक मनोहर आहे. ॥ ५ ॥ विशाल कपाळावर तिलक झळकत आहेत केसांकडे पाहून भुंग्यांच्या रांगा लाजत आहेत. ॥ ६ ॥ मस्तकावर पिवळ्या मनोरम टोप्या व त्यावर मधे मधे फुलांच्या कळ्या उत्तम रीतीने गुंफल्या आहेत. ॥ ७ ॥ शंखाकृती गळ्यावर परम रम्य (तीन) रेखा आहेत त्या जणू काय त्रिभुवनातील परम सौंदर्याच्या सीमा होत. ॥ ८ ॥ दो०- गजमुक्तांचे सुंदर कंठे कंठात घातले आहेत. दोघांच्या हृदयावर तुलसीची माळ रुळत आहे. खांदे बैलाच्या खांद्यासारखे भरदार, पुष्ट, उंच, मोठे व सिंहासारखी ढब असून बाहू विशाल बलसागर आहेत. ॥ दो०२४३ ॥

बद्ध पीतपटिं तूण कटीवर । स्कंधीं वाम धनू हातीं शर ॥
सुन्दर यज्ञोपवीत पिवळें । नखशिख मंजु महाछविं नटले ॥
बघुनि, सकल लोकां सुख मिळलें । लोचन खिळले बुबुळ न हलले ॥
हर्षित जनक बघुनि भावांनां । जाति धरिति मुनिपद कमलांनां ॥
विनति करुनि निज कथा निवेदिति । रंग‌अवनि सब मुनिस दाखविति ॥
उभय कुमरवर जाती जेथें । चकित सकल अवलोकति तेथें ॥
निज सन्मुख सब पाहति रामा । कोणि न जाणे विशेष मर्मा ॥
भलि रचना, मुनि नृपा म्हणाले । राजा मुदित, महासुख झालें ॥

दो० :- मंच एक जो उच्चतम सुंदर विशद विशाल ॥
मुनि समेत दो बंधुनां तिथें बसवि महिपाल ॥ २४४ ॥

कमरेला पिवळ्या शेल्याने भाते बांधले आहेत व डाव्या खांद्यावर धनुष्य असून (उजव्या) हातात बाण आहेत (दोघांच्या) ॥ १ ॥ पिवळी सुंदर यज्ञोपवीते आहेत व दोघांची नखापासून शिखेपर्यंतची सर्व अंगे महाशोभेने नटलेली आहेत. ॥ २ ॥ (दोघा भावांची शोभा) पाहून, दोघांना पाहून सर्व पुरवासी लोकांना सुख झाले. त्यांचे नेत्र यांच्या रुपावर खिळून गेले असून, बुबुळे जरा सुद्धा हलत नाहीशी झाली आहेत. ॥ ३ ॥ राम-लक्ष्मणांना पाहून जनकराजास हर्ष झाला व त्यांनी जाऊन मुनींची चरणकमले धरली. ॥ ४ ॥ विनंती करुन आपली सर्व कथा त्यांना निवेदन केली व सर्व रंगभूमी विश्वामित्र मुनींस दाखविली ॥ ५ ॥ दोघे कुमार जिथे जिथे (विश्वामित्रांबरोबर) जातात तिथे तिथे सगळे चकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागतात. ॥ ६ ॥ राम सर्वांनाच आपल्या (अगदी) समोर दिसले पण यातील विशेष मर्म कोणालाच कळले नाही ॥ ७ ॥ मुनि विश्वामित्र नृपास म्हणाले की रचना उत्तम आहे तेव्हा जनक राजा मुदित झाले व त्यांना महासुख झाले ॥ ८ ॥ (मग) सर्व मंचाहून उंच व उंची, सुंदर, उज्वल आणि विशाल असा एक मंच होता त्यावर विश्वामित्रांबरोबर दोघा भावांना महिपालाने बसविले ॥ दो० २४४ ॥

प्रभुस बघुन नृप हरले सारे । जणुं राकेश-उदयिं नभिं तारे ॥
मनीं प्रतीती सर्वांना ही । मोडिल राम चाप शक नाहीं ॥
न भंगुनिहि भव-धनुस विशाला । घालिल सिता राम गळिं माला ॥
हें जाणुनि निज भवनांतें जा । यश प्रताप हरुनि बल-तेजा ॥
विहसति परनृप परिसुनि वाणी । जे अविवेक-अंध अभिमानी ॥
दुस्तर विवाह धनु तुटतां ही । कोण, न भंगुन कुमरि विवाही ॥
एक वेळ काळहि जरि आला । सीतेस्तव रणिं जिंकुं तयाला ॥
सस्मित परनृप ऐकुनि कानें । धर्मशील हरिभक्त शहाणे ॥

सो. :- करूनि भूप-मद चूर राम सितेला पर्णितिल ॥
दशरथ-सुत रणशूर कोण तयां रणिं जिंकितिल ॥ २४५ ॥

प्रभूला पाहून सगळे भूपती (मनात) हरले जणू काय पौर्णिमेचा चंद्र उगवला म्हणजे आकाशातले तारेच ॥ १ ॥ कारण सर्वांच्या मनात अशी प्रतीती वाटू लागली की राम चाप मोडील यात शंका नाही ॥ २ ॥ (कदाचित हे न घडले) तरी भवाचे विशाल धनुष्य न मोडताही सीता रामाच्या गळ्यात माळ घालील ॥ ३ ॥ (म्हणून) हे लक्षात घेऊन आपापल्या घरी जा कसे, नाहीतर यश, प्रताप, बल व तेज गमावून (मग) जावे लागेलच ! ॥ ४ ॥ जे अविवेकाने व अभिमानाने आंधळे झाले आहेत असे दुसरे राजे हे भाषण ऐकून खदखदा हसले ॥ ५ ॥ (व म्हणाले) धनुष्य तुटल्यावर सुद्धा सीतेशी विवाह होणे दुस्तर आहे मग धनुष्य-भंग न करताच कोण विवाह करतो ते पाहू. ॥ ६ ॥ प्रत्यक्ष काळ जरी एक वेळ आला तरी सीतेसाठी आम्ही त्याला लढाईत जिंकल्याशिवाय रहाणार नाही ॥ ७ ॥ जे दुसरे काही राजे धर्मशील, हरीभक्त व शहाणे आहेत त्यांच्या हे कानी पडताच त्यांनी स्मित केले. ॥ ८ ॥ सर्व भूपांचा गर्व-चूर करून राम सीतेशी विवाह करतील, ते दशरथ राजांचे रणशूर पुत्र आहेत. त्यांना रणांगणांत कोण जिंकू शकतील ! ॥ दो० २४५ ॥

शेखी मिरवुनि मरा न वाया । मनमांडे किं भूक शमवाया ॥
ऐका शिक्षा परम पुनीता । जाणा जिविं जगदम्बा सीता ॥
विश्वपिता रघुपतीस जाणुनि । घ्या डोळेभर रूप न्यहाळुनि ॥
सुधा समुद्र समीप न बघतां । मृगजळ बघुनि पळुनि कां मरतां ॥
सुंदर सुखद सकल गुणरासी । हे दो बंधु शंभु उर वासी ॥
करा जसें जा रुचे जयाला । आज जन्मफल लाभ अम्हांला ॥
सांगुनि भले भूप अनुरागति । अनुपम रूप विलोकूं लागति ॥
सुर बघती नभिं बसुनि विमानां । वर्षति पुष्प करिति कल गाना ॥

दो० :- सिते आणण्या धाडि तैं सुसमय जनक बघून ॥
सादर सुंदर चतुर सब सखी निघति घेऊन ॥ २४६ ॥

वृथा शेखी मिरवून विनाकारण मरू नका. भूक शमविण्याला मनातले मांडे का उपयोगी पडतात ? ॥ १ ॥ आमचा परम पुनीत उपदेश ऐका व जिवाशी खूणगांठ बांधा की, सीता परम पुनीत जगदंबा आहे ॥ २ ॥ रघुपती विश्वाचे पिता आहेत हे जाणून त्याचे रुप डोळे भरुन न्याहाळून घ्या. ॥ ३ ॥ हे दोघे सुंदर बंधू सुख देणारे व सकल गुणांचे सागर असून शंभूच्या हृदयात वास करणारे आहेत. ॥ ४ ॥ अमृताचा समुद्र असून त्याच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही व मृगजळ दिसताच त्यांच्याकडे पळत जाऊन धाऊन मरता कां ? ॥ ५ ॥ जा ! ज्याला जे रुचेल ते करा आम्हाला मात्र आज जन्माचे फळ लाभले ॥ ६ ॥ असे म्हणून सज्जन भूप प्रेममग्न झाले व ते अनुपम रुप नीट पाहू लागले ॥ ७ ॥ देव विमानात बसून आकाशातून पहात आहेत, व पुष्पवृष्टी करीत सुंदर गान करीत आहेत ॥ ८ ॥ दो०- तेव्हा शुभ समय आहे असे पाहून सीतेला आणण्याविषयी जनकाने निरोप धाडले आणि सुंदर चतुर सखी सादर सीतेस घेऊन निघाल्या. ॥ दो० २४६ ॥

सीता-रूप न वदवे वाणीं । जगदंबिका रूप-गुण-खाणी ॥
उपमा सकल तुच्छ मज वाटति । प्राकृत-नारि-अंगि अनुरागति ॥
सीते त्या उपमांनीं वर्णुनि । अयश कोण घे कुकवी म्हणवुनि ॥
सीते जर नारींस तुलावी । अशि कमनीया कुठें पहावी ॥
गिरा मुखर, तनुअर्ध भवानी । पति अनंग रति विषाद खाणी ॥
प्रिय वारुणिं विष बंधु जितें ही । म्हणूं रमेसम कशि वैदेही ॥
जर छवि सुधा-पयोधि असे ही । परम-रूपमय कच्छप तेही ॥
शोभागुण मंदर शृंगारू । मथी पाणिपंकजिं निज मारू ॥

दो० :- अशि उपजे लक्ष्म

ी यदा सुंदरता-सुख-बीज ॥
संकोचें तरि कवि वदति सीते समान तीज ॥ २४७ ॥

सीतेच्या शोभेचे वर्णन वाणीने करवत नाही कारण ती रुपगुणांची खाण जगत जननी आहे. ॥ १ ॥ सर्व उपमा मला तुच्छ वाटतात कारण त्या अष्टधा प्रकृतीने निर्मिलेल्या स्त्रियांवर प्रेम करतात ॥ २ ॥ त्याच उपमांनी सीतेचे वर्णन करून कोणता कवी अपकीर्ती घेईल ? ॥ ३ ॥ ज्या स्त्री बरोबर सीतेची तुलना करावी इतकी अपार सुंदर स्त्री जगात आहे कुठे ? ॥ ४ ॥ शारदा बडबडी आहे, भवानी तर काय अर्धेच शरीर ! व रती तर शरीरविरहित पती असल्याने सदैव दु:खी कष्टी ! ॥ ५ ॥ जिला मदिरा व हलाहल विष ही प्रिय भावंडे आहेत, त्या रमेसारखी वैदेही आहे असे म्हणावे तरी कसे ! ॥ ६ ॥ जर छविरुपी अमृताचा पयोनिधि असेल व कूर्म भगवान तेच परमरुपमय असतील, शोभा ही मंथन करण्याची दोरी असेल व शृंगार स्वत: मंदर पर्वत असेल आणि कामदेवाने एकट्याने आपल्या करकमलांनी मंथन केले ॥ ७-८ ॥ आणि अशा प्रकारे सौंदर्य व सुख यांचे बीज (मूळ) लक्ष्मी उत्पन्न झाली तरी कवी मोठ्या संकोचाने तिला सीतेसारखी म्हणतील ॥ दो० २४७ ॥

घेउनि निघती सुज्ञ सखि सवें । गात मनोहर गीत कल रवें ॥
शोभे नवतनुं सुंदर साडी । जगजननी छवि अतुलित गाढी ॥
भूषण सकल सुदेशीं खुललीं । सखिनीं प्रत्यंगीं शुभ सजलीं ॥
जैं सीता करि रंगिं पदार्पण । रूपें मोहित नर, नारी पण ॥
मुदित देव दुंदुभि वाजविती । वर्षुनि कुसुम, अप्सरा गाती ॥
करसरोजिं शोभे जयमाला । बघे अचानक सकल नृपांलां ॥
सीता चकित, बघे रामासी । होति सकल नृप वश मोहासी ॥
मुनि समीप युग बंधू दिसतां । लोचन लुब्ध अचल, निधि मिळतां ॥

दो० :- गुरुजन लाज समाज बहु सिता सलज्ज बघून ॥
बघुं लागे सखिंकडे उरिं रघुवीरा आणून ॥ २४८ ॥

सुंदर गीते मनोहर आवाजाने गात गात सुजाण सखी सीतेला बरोबर घेऊन निघाल्या ॥ १ ॥ रमणीय शरीरावर सुंदर साडी शोभत असून जगजननीची छबी अतुलित व गाढ आहे ॥ २ ॥ सुंदर अवयवांवर सगळी भूषणे खुलली आहेत ती प्रत्येक अंगावर सखींनी चांगली चांगली सजविली आहेत. जेव्हा सीतेने रंगभूमीत पाऊल टाकले तेव्हा तिच्या रुपाने नर मोहित झालेच पण स्त्रिया देखील मोहित झाल्या ॥ ४ ॥ देवांनी पुष्पवृष्टी करून हर्षाने दुंदुभी वाजविण्यास प्रारंभ केला व अप्सरा गाऊ लागल्या. ॥ ५ ॥ सीतेच्या करकमलात जयमाला शोभत आहे (पण) राजेच सगळे तिच्या अचानक दृष्टीस पडले (राम दिसले नाहीत) ॥ ६ ॥ भयचकित होऊन ती राम कोठे आहेत ते पाहू लागली तेव्हा सर्व राजे निराशेने मूर्च्छितसे झाले ॥ ७ ॥ मुनीच्या जवळ दोघे बंधू दिसले तेव्हा तिचे लोचन आपला निधि (ठेवा) सापडल्याने तेथे रामरुपावर लुब्ध होऊन स्थिर झाले ॥ ८ ॥ गुरुजनांची लाज व मोठा समाज आहे हे पाहून सीता लाजली व रघुवीराला हृदयात आणून सखींच्याकडे पाहू लागली ॥ दो० २४८ ॥

राम्ररूप सीता-छवि बघुनी । नरनारी निर्निमेष बनुनी ॥
सकल सचिंत वदूं संकुचती । विधिस विनंति मनोमय करती ॥
वेगिं जनक-जडतेस विधे हर । त्या आम्हां-सम बुद्धी दे बर ॥
विण विचार पण नृपें त्यजावा । सीताराम विवाह करावा ॥
भलें म्हणे जग, रुचतें सर्वां । हट्टें अंतिं दाह उरिं बर्वा ॥
ध्यास हाच लोकांस लागला । जानकि-जोगा सु-वर सावळा ॥
बंदीजनां जनक बोलावति । ब्रीदावलि वर्णित ते ठाकति ॥
वदले नृप जा सांगा मम पण । जाति भाट, मनिं थोडा हर्ष न ॥

दो० :- बोलति बंदी वचन वर ऐका सब महिपाल ॥
आम्हीं सांगुं विदेह-पण, भुज उचलून, विशाल ॥ २४९ ॥

रामरुप व सीतेची छबी पाहून स्त्रिया व पुरुष यांनी आपल्या डोळ्यांच्या पापण्य़ा हलविण्याचे बंद केले ॥ १ ॥ व सर्वजण चिंतातुर झाली आहेत पण बोलून दाखविण्यास संकोच वाटत आहे म्हणून सर्व मनातल्या मनात विधिला प्रार्थना करतात की ॥ ३ ॥ हे विधे, जनकाचा मूर्खपणा अगदी वेगाने नष्ट कर व त्याला आमच्यासारखी चांगली बुध्दी दे ॥ ३ ॥ जनकांनी काहीही विचार न करता आपण केलेला (धनुर्भंगाचा) पण सोडावा आणि सीता व राम यांचा विवाह करावा ॥ ४ ॥ (असे केल्याने कोणी वाईट म्हणणार नाहीच पण) सारे जग शाबासकी देईल कारण ही गोष्ट सर्वांनाच आवडणारी आहे हट्ट चालू ठेवण्याने मात्र शेवटी हृदयाचा दाह होईल. ॥ ५ ॥ हा एकच ध्यास सर्व लोकांच्या मनाला लागला आहे की सावळा सुंदर वर जानकीला अगदी योग्य आहे ॥ ६ ॥ (इतक्यात) जनकाने भाटांना बोलावले व ते ब्रीदावली वर्णन करीत राजाच्या जवळ येऊन उभे ठाकले ॥ ७ ॥ राजाने त्यांना सांगितले की जा व माझा पण मोठ्याने सांगा तेव्हा भाट निघाले (पण) त्यांच्या मनात थोडाही हर्ष नव्हता. ॥ ८ ॥ भाट सुंदर वचन बोलू लागले ऐका ! सकल महिपालांनी ऐका ! आम्ही भुजा वर करुन विदेहाचा विशाल पण सांगतो. ॥ २४९ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP