॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय ८ वा



Download mp3

दो० :- शिव विरंचिनां मोहते कोण बापुडा आन ॥
हें हृदिं जाणुनि भजति मुनि मायापति भगवान ॥ ६२म ॥

केवळ कल्याण स्वरुप शिव व विश्वाची विशेष रचना करणारे विरंची यांना सुद्धा जी मोहते त्या हरिमाये पुढे इतर बिचार्‍या जीवांची किंमत काय ? असे हृदयात जाणून मुनी ज्ञानी सुद्धा मायापती भगवान श्रीरघुपतीचे भजन करतात. ॥ दो० ६२ म ॥

जाइ गरुड जिथं वास भुशुंडा । मति अकुंठ हरिभक्ति अखंडा ॥
मन गिरि दिसतां प्रसन्न झालें । माया मोह शोक सब पळले ॥
करुनि तडागीं मज्जन पाना । वटतळिं गेला हर्ष बहु मना ॥
वृद्ध वृद्ध जमले हि विहंगम । श्रवणा राम चरित्रहि उत्तम ॥
कथारंभ तो करुं पाहे जैं । गेला विहंगपति तेथें तैं ॥
येतां बघुनि सकल खगराजा । हर्षे वायस सहित समाजा ॥
अति आदर खगपतिचा करुनी । शुभासना दे स्वागत पुसुनी ॥
अनुरागें खगराज पूजला । मधुर वचन मग वदे कावळा ॥

दो० :- झालो नाथ कृतार्थ मी तव दर्शनिं खगराज ! ॥
आज्ञा द्या तें करुं अतां कां येणें ! प्रभु आज ॥ ६३रा ॥
तुम्हि कृतार्थरूपचि सदा मृदु वदला विहगेश ॥
ज्याची स्तुति अति आदरें स्वमुखें करिति महेश ॥ ६३म ॥

काक उरगाद संवाद कसा घडला – अकुंठित बुद्धी व अखंड हरिभक्ती असलेला भुशुंडी जेथे वास करतो तेथे गरुड गेला ॥ १ ॥ तो नील पर्वत दिसताच मन प्रसन्न झाले. कारण शोक, मोह इ. पळून गेले ॥ २ ॥ त्या तलावात स्नान व जलपान करुन गरुड वडाच्या झाडाखाली जाण्यास निघाला तेव्हा त्याच्या मनाला फार हर्ष झाला ॥ ३ ॥ सुंदर रामचरित्राचे श्रवण करण्यासाठी वृद्ध पुष्कळ पक्षी तेथे जमले आहेत ॥ ४ ॥ आणि भुशुंडी कथारंभ करणार तोच पक्षीराज गरुड तेथे गेला. ॥ ५ ॥ सर्व खगांचा राजा येत असलेला पाहून त्या पक्षीसमाजासहित त्या वायसालाही हर्ष झाला. ॥ ६ ॥ भुशुंडीने व सर्व पक्षिसमाजाने पक्षीराजाचा अति आदर सत्कार केला स्वागत करुन भुशुंडीने कुशल विचारले बसण्यास सुंदर आसन दिले. ॥ ७ ॥ त्याने प्रेमाने खगराजाची पूजा केली व मग तो कावळा मधुर वचन बोलला ॥ ८ ॥ हे नाथ ! खगराज ! मी आज तुमच्या दर्शनाने कृतार्थ झालो. आता आज्ञा द्याल ते मी करतो. प्रभु ! आज इथे आपण कोणत्या हेतूने आलांत ? ॥ दो० ६३ रा ॥ खगराज कोमल वाणीने म्हणाला की ज्यांची प्रशंसा महेशांनी आपल्या मुखाने केली ते तुम्ही सदा कृतार्थरुपच आहांत ॥ दो० ६३ ॥

तात ऐकणें आलों ज्यास्तव । तें झालें, घडलें दर्शन तव ॥
बघुनि परम पावन तव आश्रम । विगत मोह संशय नाना भ्रम ॥
आतां रामकथा अति पावन । सदा सुखद दुःखाद्रि विनाशन ॥
तात ! ऐकवा सादर मजला । पुनः पुन्हां प्रभु ! विनंति तुजला ॥
ऐकत गरुड गिरा सुविनीता । प्रेमळ सरळ सुखद सुपुनीता ॥
परमोत्साह तया मनिं भरला । रघुपति गुणगण सांगुं लागलां ॥
अति अनुरागें प्रथम भवानी । राम चरित सर सुंदर वानी ॥
मग नारद मोहास अपारा । वदे पुढें रावण अवतारा ॥
प्रभु अवतार कथा मग सांगे । मग शिशुलीला अति अनुरागें ॥

दो० :- वदे बाल चरिता विविध मनीं परम उत्साह ॥
ऋषि आगमना वदे मग श्री रघुवीर विवाह ॥ ६४ ॥

हे तात ! ऐकावे मी ज्या हेतूने आपणाकडे आलो ते कार्य झाले व तुमचे दर्शन घडले ॥ १ ॥ तुमचा परम पावन आश्रम पाहूनच माझा मोह नाना संशय व नाना भ्रम नष्ट झाले ॥ २ ॥ आता हे तात ! आपण श्रीरामचंद्रांची अत्यंत पावन करणारी, सदा सुख देणारी, आणि दु:ख – पर्वताचा विनाश करणारी कथा आदरपूर्वक मला सांगा, प्रभु मी तुला पुन:पुन्हा एवढीच विनंती करतो ॥ २-४ ॥ गरुडाची अत्यंत नम्र प्रेमळ, सरळ, सुखदायक आणि अति पवित्र वाणी ऐकताच त्या काकाच्या मनात परम उत्साह भरला व तो रघुपती – चरित्र सांगू – लागला ॥ ५-६ ॥
भुशुंडी कथित श्रीरामचरित मानस – हे भवानी ! भुशुंडीने प्रथम श्रीरामचरिताचे सुंदर मानस सरोवराच्या रुपकाने अत्यंत प्रेमाने वर्णन केले ॥ ७ ॥ मग नारदास झालेला अपार मोह वर्णन केला, व नंतर रावण – अवताराची कथा सांगीतली ॥ ८ ॥ त्यानंतर प्रभूच्या अवताराची कथा सांगीतली व मग अतिशय प्रेमाने शिशुलीला कथन केल्या ॥ ९ ॥ नंतर विविध प्रकारचे बालचरित्र अत्यंत उत्साहाने सांगीतले. नंतर विश्वामित्र ऋषींचे आगमन व श्रीरघुवीर विवाह या कथा सांगीतल्या ॥ दो० ६४ ॥

वदे राम अभिषेक प्रसंगा । मग नृप वचन राज्य रस भंगा ॥
पुरवासीजन विरह विषादा । पार सुरनदी वास प्रयागा ॥
विपिन गमन, नाविक अनुरागा । पार सुरनदी वास प्रयागा ॥
प्रभु वाल्मीकी मिलन वर्णिलें । चित्रकूटिं भगवंत राहिले ॥
सचिवागमन नगरिं मृपमरणा । भरतागमना प्रेम वर्णना ॥
करुनि भूपती क्रिया, सपरिजन । गेले भरत जिहें प्रभु सुखघन ॥
कृत रघुपतिनीं बहुविध सांतवन । सहित पादुका नगरिं निवर्तन ॥
भरत राहणी, सुरपतिसुत कृति । प्रभु मनि अत्रि भेट मग वर्णिति ॥

दो० :- मग विराधवध ज्यापरीं तनू त्यजी शरभंग ॥
प्रीति सुतीक्ष्णाची कथित प्रभु अगस्ति सत्संग ॥ ६५ ॥

मग रामाभिषेकाचा प्रसंग वर्णन केला मग दशरथ राजाच्या वचनामुळे झालेल्या राज्याभिषेकाचा विरस वर्णन केला ॥ १ ॥ अयोध्यावासी लोकांचा विरह विषाद वर्णन केला. मग राम – लक्ष्मण संवाद सांगीतला ॥ २ ॥ रामचंद्रांचे वनात गमन आणि नाविकाचे प्रेम वर्णन केले गंगानदी उतरुन पलिकडे जाणे व रामचंद्रांची (एकरात्र) वस्ती यांचे वर्णन केले ॥ ३ ॥ प्रभु वाल्मीकी भेट वर्णून भगवान चित्रकुटावर राहिल्याचे सांगीतले ॥ ४ ॥ सुमंत्र सचिवाचे अयोध्येत परत येणे व दशरथाचे मरण अन् भरताचे मामाकडून परत येणे व त्याचे रामप्रेम वर्णन केले ॥ ५ ॥ दशरथ राजांची क्रिया केली आणि जिथे सुखधन रामचंद्र होते तेथे पुरवासी लोकांसह भरताचे गमन वर्णन केले ॥ ६ ॥ रघुपतींनी नाना परींनी भरताचे सांत्वन केले आणि पादुकांसहित अयोध्येस परत आले व भरताची राहणी वर्णन केली. पुढे सुरराजपुत्राची करणी आणि प्रभु रामचंद्र व अत्रि मुनी यांची भेट वर्णन केली. ॥ ७-८ ॥ मग ज्या प्रकारे विराध वध केला व शरभंगाने देह त्याग केला ते सांगीतले मग सुतीक्ष्णाची प्रिती व प्रभु व अगस्ती यांचा सत्संग वर्णन केला ॥ दो० ६५ ॥

मग दंडकवन करणें पावन । नंतर जटायू मैत्री वर्णन ॥
प्रभु मग पंचवटी मधि वसले । मुनि निकाय भय सकल निरसलें ॥
मग अनुपम उपदेश लक्ष्मणा । शूर्पणखा श्रुति नाक खंडणा ॥
त्रिशिरा खर दूषण वध कथिला । मर्म जसें दशकंठ समजला ॥
दशमुख् मारीचां संभाषण । कसें जाहलें केलें वर्णन ॥
मग माया सीतेच्या हरणा । रघुवीराचे विरह वर्णना ॥
क्रिया करिति गृध्राची रघुपति । वधुनि कबंध दिली शबरिस गति ॥
पुन्हां विरह वर्णित रघुवीरा । येणें जसें सरोवर तीरा ॥

दो० :- प्रभु नारद संवाद मग मारुति मिलन सुयोग ॥
मैत्री सुग्रीवाशि मग वाली प्राण वियोग ॥ ६६रा ॥
राज्य सुकंठा, प्रभुकृत गिरींप्रवर्षण वास ॥
वर्णन वर्षाशरद मग प्रभुरुष कीशभयास ॥ ६६म ॥

मग दंडकवन पावन करणे सांगून जटायू मैत्रीचे वर्णन केले ॥ १ ॥ प्रभुंनी पंचवटीत वास करुन सर्व मुनीसमूहाचे भय दूर केले ते सांगीतले ॥ २ ॥ लक्ष्मणाला अनुपम उपदेश केला व शूर्पणखेचे कान – नाक कापून तिला कुरुप कसे केले ते सांगीतले ॥ ३ ॥ मग त्रिशिरा खर दुषणांचा वध केला, दशाननाला मर्म कसे समजले ते सांगीतले ॥ ४ ॥ मग दशमुख व मारीच संवाद वर्णन केला ॥ ५ ॥ मग मायासीतेचे हरण व रघुवीरांचा विरह वर्णन केला ॥ ६ ॥ मग रघुपतींनी जटायूची क्रिया केली आणि कबंधाचा वध करुन शबरीला गती दिल्याचे वर्णन केले ॥ ७ ॥ पुन्हा विरह वर्णन करीत रघुवीराचे पंपा सरोवराच्या तीरी जसे येणे झाले ते वर्णन केले ॥ ८ ॥ मग प्रभु व नारद यांचा संवाद वर्णन केला. नंतर मारुतीच्या भेटीचा सुयोग वर्णन केला. सुग्रीवाशी मैत्री व वालीवध सांगीतला ॥ दो० ६६ रा ॥ सुग्रीवाचा राज्याभिषेक व प्रभूंचा प्रवर्षण गिरीवर निवास सांगून, वर्षा व शरद ऋतूचे वर्णन केले नंतर प्रभु रघुनाथाचा रोष व कीश भय यांचे वर्णन केले ॥ दो० ६६ म ॥

पाठवि केवीं कपीश कीशां । सीता शोधा जाति सब दिशां ॥
कसे कपी ते विवरीं जाती । मग कपीस भेटे संपाती ॥
ऐकुनि कथा समीर कुमार । उल्लंघीहि पयोधि अपार ॥
लंका प्रवेश कपिनें केला । कसा धीर दिधला सीतेला ॥
वन भंगुनि रावणा प्रबोधी । पुर जाळुनि लंघिला पयोधी ॥
रघुपतिपाशिं सकल कपि आले । वैदेही कुशलाला वदले ॥
कटकासहित यथा रघुवीरा । घडे आगमन जलनिधि तीरा ॥
येउनि भेटें कसा बिभीषण । केले सागर निग्रह वर्णन ॥

दो० :- सेतु बांधुनी कपि चमू जाई सागर पार ॥
जाइ दूत मग वीरवर जैसा वालिकुमार ॥ ६७रा ॥
निशिचर कीश लढाई वर्णी बहू प्रकार ॥
कुंभकर्ण घननाद बल पौरुष कृत संहार ॥ ६७म ॥

कपीश सुग्रीवाने सीता शोधासाठी कपींना कसे पाठवले व ते सर्व दिशांस कसे गेले ते सांगीतले ॥ १ ॥ कपिंचा विवरात प्रवेश, मग संपाती भेट, व हनुमंताने (संपाती व जांबवान यांनी सांगीतलेली सर्व कथा कशी ऐकली ते वर्णन केले. त्यानंतर पवनकुमार सागर उल्लंघून गेला ॥ २-३ ॥ मग कपीने लंकेत कसा प्रवेश केला सीतेला, सीतेला धीर कसा दिला व लंकापुरी जाळून पुन्हा समुदोल्लंघन करुन ते सर्व कपी रघुपतीपाशी आले व वैदेहीचे कुशल श्रीरामांना कसे सांगीतले याचे वर्णन केले. ॥ ६ ॥ सैन्यासह रघुवीराचे सागर तीरी येणे, बिभीषणाचे रामास भेटणे, सागर निग्रह हे सारे वर्णन केले ॥ ७-८ ॥ सेतू बांधून कपिसेना सागर पार कशी गेली, वीरश्रेष्ठ वालिकुमाराने शिष्टाई कशी केली, निशाचर कपी यांची लढाई कशी झाली नंतर कुंभकर्ण व मेघनाद यांचे बल, पौरुष वर्णून त्याच्या संहाराचेही सविस्तर वर्णन केले ॥ दो० ६७ रा. म ॥

नाना निशिचर निकाय मरणा । रघुपति रावण समर वर्णना ॥
रावणवध मंदोदरि शोक । भूप बिभीषण, देव अशोक ॥
सीता र्रघुपति मीलन, नंतर । जोडुनि कर करती स्तुति निर्जर ॥
बसुनि पुष्पकीं कपी समेत । निघति अयोध्ये कृपा निकेत ॥
जसे राम निज नगरीं आले । वायस विशद चरित सब वदले ॥
वदले पुढें राम अभिषेका । पुर वर्णित नृपनीति अनेका ॥
कथा समस्त भुशुंडी वानी । जी मी वदलो तुम्हां भवानी ॥
ऐकुनि रामकथा खगनाहो । वदला मनीं परम उत्साहो ॥

सो० :- गेला मम संदेह श्रुत सगळें रघुपति चरित ॥
रामपदाब्जीं स्नेह तवचि कृपें वायस तिलक ॥ ६८रा ॥
झाला मज अति मोह प्रभुबंधन समरीं बघुन ॥
चिदानंद संदोह राम विकल कारण कवण ॥ ६८म ॥

नाना प्रकारे राक्षस – समूहांचे मरण, रघुपती व रावण यांचे युद्ध, रावण – वध, मंदोदरी शोक, बिभीषणाचा राज्याभिषेक, देवांना दु:खशोक मुक्त करणे इ. वर्णन केले ॥ १-२ ॥ सीता – रघुपती भेट, देवांनी केलेली रघुपतींची स्तुती, व रघुनाथांचे कपींसह पुष्पकातून अयोध्येस जाणे – वर्णन केले ॥ ४ ॥ रामचंद्र आपल्या नगरात जसे आले ते सर्व उज्वल चरित्र वायसाने विस्ताराने वर्णन केले ॥ ५ ॥ पुढे रामचंद्रांच्या राज्याभिषेकाचे, अयोध्यापुरीचे व रामराज्य – आणि राजनीतीचेही वर्णन केले. ॥ ६ ॥ हे भवानी ! जी कथा मी तुम्हांला सांगीतली ती सगळी भुशुंडीने याप्रमाणे वर्णन केली ॥ ७ ॥ ती सर्व रामकथा ऐकून खगनाथ मनात परम उत्साहित होऊन म्हणाला की ॥ ८ ॥ मी सगळे रामचरित्र श्रवण केले आणि माझा संदेह गेला. आणि हे वायसटिळका ! राम चरणकमलीं स्नेह उत्पन्न झाला तो तुमच्याच कृपेने झाला ॥ दो० ६८ रा ॥ युद्धांत प्रभूंना बंधनात पाहून मला अतिशय मोह झाला होता की सच्चिदानंद घन राम व्याकुळ झाले त्यांचे कारण काय ? ॥ दो० ६८ म ॥

बघुनि चरित अति नर अनुसारी । आले हृदिं मम संशय भारी ॥
अतां गमे तो भ्रम मज हितकर । करिती अनुग्रहास कृपाकर ॥
अति आतपिं जो व्याकुळ झाला । तरु छाया सुख कळतें त्याला ॥
जर ना होता मोहच मजला । तात ! भेटतो कैसा तुजला ॥
सुंदर कशि परिसतो हरिकथा । अति विचित्र बहुपरिं तुम्हिं कथिता ॥
निगमागम पुराणमत हें हो ! । वदति सिद्ध मुनि नहिं संदेहो ॥
भेटति संत विशुद्ध तयाला । रामकृपें अवलोकिति ज्याला ॥
रामकृपें तव दर्शन घडलें । अनुग्रहें तव संशय उडले ॥

दो० :- श्रवुनि विहगपति वाणी सहित विनय अनुराग ॥
पुलक गात्रिं लोचन सजल मनिं हर्षित अति काग ॥ ६९रा ॥
श्रोता सुमति सुशील शुचि कथा रसिक हरिदास ॥
मिळतां प्रगटति गोप्यही सज्जन उमे ! तयास ॥ ६९म ॥

अगदी प्राकृत मनुष्यासारखे चरित्र पाहून माझ्या मनात भारी संशय आले. ॥ १ ॥ परंतु आता तो भ्रम मला हिताचा वाटला आणि कृपासागर प्रभूंनी तो माझ्यावर अनुग्रहच केला असे वाटते. ॥ २ ॥ उन्हाच्या अतितापामुळे जो व्याकुळ झाला असेल त्यालाच तरुछायेचे सुख कळते. ॥ ३ ॥ जर मला तो मोह झालाच नसता तर हे तात ! तुझे दर्शन मला कसे झाले असते ? ॥ ४ ॥ आणि अति विचित्र व उंदर अशी हरिकथा जी तुम्ही अनेक प्रकारांनी सांगितलीत ती मला कशी ऐकता आली असती ? ॥ ५ ॥ वेद, पुराणे व तंत्रादि शास्त्रे यांचे हेच मत आहे आणि अहो ! सिद्ध व मुनि निःसंदेहपणे हेच सांगतात की - ॥ ६ ॥ श्रीराम ज्याला कृपादृष्टीने अवलोकन करतात त्यालाच विशुद्ध संत भेटतात. ॥ ७ ॥ रामकृपेने तुमचे दर्शन् घडले व तुमच्या अनुग्रहाने सर्व संशय नष्ट झाले. ॥ ८ ॥ विनय आणि प्रेम यांनी युक्त अशी पक्षिराज (विहगपति) गरुडाची वाणी ऐकून काकभुशुंडीचे शरीर पुलकित झाले. डोळ्यात अश्रु आले आणि त्याला मनात हर्ष झाला ॥ दो. ६९रा ॥ हे उमे ! सुद्ध बुद्धि सुशील, पवित्र कथारसिक आणि हरिदास (हरिसेवक, भक्त) असा श्रोता मिळाला म्हणजे अत्यंत गुप्त ठेवण्यासारखे रहस्य सुद्धा सज्जन = संत त्याच्याजवळ प्रहट करतात. ॥ दो. ६९म ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP