॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय २ राDownload mp3

मुनि अगस्तिचा शिष्य सुजाण हि । भगवंती रति सुतीक्ष्ण नाम हि ॥
राम-सुसेवक कृति-मन-वचनीं । अन्य देव आशा ना स्वपनीं ॥
प्रभु-आगमन खबर जैं पावे । करत मनोरथ आतुर धावे ॥
हे विधि ! दीनबंधु रघुराया । करिति किं मजशा शठा दया या ॥
सानुज मजला राम हृदयपति । निजसेवका तसे कधिं भेटति ॥
मनीं भरंवसा मम दृढ नाहीं । ज्ञान विरति भक्ति न मनिं काहीं ॥
सत्संग न जप योग न याग न । चरण सरोजीं दृढ अनुराग न ॥
एक हि बाणा कृपा निधाना । प्रिय तो ज्यातें गति ना आना ॥
होतिल सुफल आज मम लोचन । बघुन वदन-पंकज भव मोचन ॥
प्रेमपूरिं मुनि बुडले ज्ञानी । वदवे ना ती दशा भवानी ॥
पंथ दशा विदिशा समजे ना । कोण कुठें मी जात कळेना ॥
मागें वळे पुन्हां कधिं फिरतो । कधिं गुणगानीं नृत्या करतो ॥
प्रेमभक्ति अविरल मुनि पावत । तरुमागें लपुनी प्रभु पाहत ॥
प्रीती अति र घुवीर विलोकति । भवभय हारक हृदयीं प्रगटति ॥
मार्गिंच अचल बनुनि मुनि बसले । देहिं पुलक फणसासम उठले ॥
तदा निकट रघुनाथ ठाकले । बघुनि दशा निजजन मनिं रुचले ॥
राम जागविति बहुपरिं मुनिला । ध्यान सुखें येत न जागृतिला ॥
राम भूपरूपा मग लपविति । हृदयीं चतुर्भुज रूप दाखविति ॥
तदा घाबरुनि उठले मुनिवर । व्याकुळ जैसा मणिविण फणिवर ॥
बघुनि पुढे श्यामतनु-रामा । सीता अनुज सहित सुखधामा ॥
पडति छडीसम मग चरणांवर । प्रेममग्न बहु सभाग्य मुनिवर ॥
धरुनि दीर्घभुजिं घेति उचलुनी । प्रेमें अति ठेविति हृदिं धरुनी ॥
मुनिला भेटत कृपाल शोभत । कनकतरूस जणुं तमाल भेटत ॥
रामवदन मुनि बघत राहिले । भासत जणुं चित्रांत काढले ॥

दो० :- तैं हृदि धरुनी धीर मुनि घडि घडि धरी पदास ॥
प्रभुला पूजी विविध परिं, आणुनि निजाश्रमास ॥ १० ॥

अगस्ति मुनींचा एक सुजाण शिष्य आहे. त्याची भगवंताच्या ठिकाणी सुतीक्ष्ण रति आहे व त्याचे नांवही सुतीक्ष्ण आहे. ॥ १ ॥ कृतीने, मनाने व वाणीने तो चांगला रामसेवक असून इतर आशा किंवा इतर देवांची आशा (भरंवसा) त्याला स्वप्नांत सुद्धां नाही. ॥ २ ॥ प्रभूच्या आगमनाची बातमी जेव्हां त्याला मिळाली तेव्हां तो मनोरथ करीत दर्शनातुर व्याकुळ होऊन धावत निघाला. ॥ ३ ॥ अरे देवी ! दीनबंधु रघुराया या माझ्यासारख्या शठावर दया करतील का ? ॥ ४ ॥ हृदयपति (गोसाई, गोस्वामी, हृषीकेश) राम आपल्या आवडत्या निज सेवकास जसे (आलिंगन देऊन) भेटतात तसे अनुजासहित मला कधी भेटतील का ?भेटतील असा दृढ भरवसा माझ्या मनाला वाटत नाही, कारण माझ्याजवळ ना ज्ञान ना वैराग्य वा मनांत थोडीदेखील भक्ति, यांतील काहीच नाही. ॥ ५-६ ॥ सत्संग नाही, जप नाही, योग नाही की यज्ञ याग नाही व चरणकमलांच्या ठिकाणी अनुराग - रति, दृढ स्नेह ही नाही. ॥ ७ ॥ परंतु कृपानिधानाचा एक बाणा आहे की ज्याला दुसरी गति नाही तो प्रिय असतो. ॥ ८ ॥ होणार ~! सुफल होणार ! आज सुफल होणार माझे लोचन ! संसार सागरांतून सोडविणारे मुखपंकज पाहून आज माझे नयन सुफल होणार ! ॥ ९ ॥ (ही आनंदाच्या उद्रकांतील स्वभावोक्ति आहे. सुंदर नाट्य आहे) महेश म्हणाले हे भवानी ! ज्ञानी मुनि प्रेमाच्या पुरांत असे बुडले (मग्न झाले) की त्या दशेचे वर्णन करतां येणे शक्य नाही. ॥ १० ॥ त्यांना दिशा, उपदिशा, रस्ता इत्यादि काही समजत नाहीसे झाले. मी कोण कुठे जात आहे हे सुद्धां कळत नाहीसे झाले. ॥ ११ ॥ केव्हां मागे वळावे, केव्हां पुन्हां परत फिरावे तर केव्हां राम गुण गातां गातां नाचू लागावे असे सुरु झाले. ॥ १२ ॥ अशी प्रगाढ, अविरल प्रेमभक्ति मुनीला प्राप्त झाली आहे आणि हे सर्व प्रभु रामचंद्र तरूच्या आड लपून बघत आहेत. ॥ १३ ॥ अतिशय प्रीति पाहून भवभयहरण करणारे रघुवीर मुनीच्या हृदयांत प्रगट झाले. ॥ १४ ॥ तेव्हां मुनि मार्गांतच अचल होऊन बसले व देहावर फणसाच्या काट्यांसारखे रोमांच उभे राहिले. ॥ १५ ॥ तेव्हां रघुनाथ मुनीच्या जवळ येऊन उभे राहिले व आपल्या भक्ताची ती प्रेममग्न दशा पाहून मुनि प्रभूच्या मनांत भरले, फार आवडले. ॥ १६ ॥ मुनीला जागविण्याचा प्रयत्‍न रामचंद्रानी पुष्कळ प्रकारांनी (बहुपरि) केला पण ध्यानांत मिळणार्‍या सुखामुळे मुनि जागे होईनात. ॥ १७ ॥ शेवटी रामचंद्रांनी ते हृदयांतील भूपरूप लपवून टाकले (गुप्त केले) व त्याच्या जागी मुनीच्या हृदयांत चतुर्भुज रूप दाखविले. ॥ १८ ॥ त्याबरोबर मुनिवर घाबरे होऊन मणि नष्ट झालेल्या फणिवरासारखे व्याकुळ होऊन ताडकन् उठले. ॥ १९ ॥ तोच समोर सीता व अनुज यांच्यासहित सुखधाम, श्यामतनु राम दिसले. ॥ २० ॥ त्याबरोबर महा भाग्यवान मुनिवर प्रेममग्न होऊन छडीप्रमाणे रामाच्या पायांवर पडले. ॥ २१ ॥ रघुवीरानी आपल्या दीर्घ पाहूंनी त्यांस उचलून अति प्रेमाने हृदयाशी धरून ठेवले. ॥ २२ ॥ मुनीला भेटत असतां कृपालु असे शोभत आहेत की जणूं कनक तरूला तमालच भेटत आहे. ॥ २३ ॥ मुनि रामचंद्रांच्या मुखाकडे असे बघत राहिले की जणूं चित्रांतच काढलेले आहेत. (चित्रासारखे बघत राहिले). ॥ २४ ॥ तेव्हां हृदयांत धीर धरून मुनीनी वारंवार पाय धरले आणि प्रभूला आपल्या आश्रमांत आणून विविध प्रकारे पूजा केली. ॥ दो० १० ॥

वदे मुनी ऐक विनंती । स्तुति तुझी मी करुं कोण्यारीतीं ॥
महिमा अमित अल्प माझी मति । जशि रविसंमुख खद्योत्द्युति ॥
श्याम तामरस-दाम शरीर । जटामुकुट वसनं मुनिचीरं ॥
पाणिं चाप शर कटिं तूणीरं । नौमि सर्वदा श्रीरघुवीरं ॥
मोह - गहन् - घन- दहन कृशानुः । संत - सरोरुह - कानन - भानुः ॥
निशिचर-करि-वरुथ मृगराजः । त्रातु सदा नो भवखग बाजः ॥
अरुण नयन राजीव सुवेषं । सीता नयन-चकोर निशेशं ॥
हर हृद मानस राज मरालं । नौमि राम उर बाहु विशालं ॥
संशय - सर्पाशन उरगादः । शमन सुकर्कश - तर्क - विषादः ॥
भवभंजन रंजन सुर यूथः । त्रातु सदा नो कृपावरूथः ॥
निर्गुण - सगुण - विषम - सम - रूपं । ज्ञान-गिरा - गोतीतमनूपं ॥
अमलमखिलमनवद्यमपारं । नौमि राम भंजन महिभारं ॥
भक्त-कल्पपादप आरामः । तर्जन कोप लोभ मद कामः ॥
अति नागर भवसागर-सेतुः । त्रातु सदा दिनकर-कुल-केतुः ॥
अतुलित दोः प्रताप बलधामः । कलिमल विपुल विभंजन नामः ॥
धर्म-वर्म नर्मद गुण-ग्रामः । संतत शं तनोतु मम रामः ॥
विरज जरी व्यापक अविनाशी । सकल-हृदींहि निरंतर वासी ॥
श्रीसह सानुज तरी खरारी । वसो हृदयिं मम काननचारी ॥
जाणोत चि जाणति जे स्वामी । सगुण अगुण हृदयांतर्यामी ॥
कोसलपति राजीव नयन जो । करो राम मम हृदयिं अयन तो ॥
त्यजो न हा अभिमान चुकुन मति । कीं सेवक मी मम रघुपति पति ॥
परिसुनि मुनिवच रामा रुचले । हर्षें पुन्हां हृदयिं मुनि धरले ॥
असें प्रसन्न परम मी जाणुनि । मागसि तो वर देइन तुज मुनि ॥
कधिं न यचिला वर मुनि वदले । काय सत्य वा मिथ्या न कळे ॥
तुम्हां गमे रघुराजा लायक । तो द्या मजसि दास सुखदायक ! ॥
अविरल भक्ति विरति विज्ञान । होशि सकल-गुण-बोध निधान ॥
प्रभु ! जो वर मज दिला पावला । आता द्या जो मला भावला ॥

दो० :- सानुज सह जानकी प्रभु ! चाप बाण धर राम ॥
हृदय-गगनिं मम इंदुसें संतत वसा निकाम ॥ ११ ॥

मुनि म्हणाला की प्रभु ! माझी विनंती ऐक, मी तुझी स्तुति कशाप्रकारें करूं ? ॥ १ ॥ कारण महिमा अमित आहे व माझी बुद्धी रविसमोर काजव्याच्या प्रकाशासारखी अल्प आहे. ॥ २ ॥ नीलकमलांच्या हारासारखे शरीर, मस्तकावर जटामुकुट, मुनिवस्त्रे (वल्कले) नेसलेली, ॥ ३ ॥ हातांत धनुष्यबाण आणि कमरेला भाता, अशा श्री रघुवीराला मी सर्वदा, निरंतर वंदन करतो. ॥ ४ ॥ मोहरूपी घनदाट अरण्याला जाळणारा अग्नि, संतरूपी कमलवनाला प्रफुल्लित करणारा भानु, निशाचर रूपी हत्तींच्या कळपांचा संहार करणारा मृगराज सिंह व संसररूपी पक्ष्यांचा विनाश करणारा बाज (ससाणा) सदा आमचे रक्षण करो. ॥ ५-६ ॥ लाल नेत्रकमल असलेल्या, सुंदर वेषाच्या, व सीतेच्या नेत्रचकोरांचा निशापति, चंद्र व हराच्या हृदयरूपी मानस सरोवरांतील राजहंस व विशाल बाहु व उर असणार्‍या रामचंद्रा, मी आपणांस नमन करतो. ॥ ७-८ ॥ संशय्रूपी सर्पांना खाणारे गरुड (उरगाद=सर्पांना खाणारा=गरुड) अत्यंत कर्कश तर्कापासून होणारा जो विषाद त्याचे शमन करणारे, भवाचा नाश करणारे, देव समूहांना आनंद देणारे, कृपेचे समूह असे प्रभु आमचे सदा रक्षण करोत. ॥ ९-१० ॥ निर्गुणरूप, सगुणरूप, विषमरूप, समरूप, मनबुद्धी वाणी व इंद्रिये यांच्या पलिकडे असलेले उपमारहित (अनूप) मायारूपी मलरहित (अमलं) पूर्ण (अखिल) निर्दोष (अनवद्यं-अनिंद्य) अपार-अनंत (अपारं), भूभार हरण करणारे अशा रामास मी नमस्कार करतो. ॥ ११-१२ ॥ भक्तांना कल्पवृक्षाचा बगीचा, कामक्रोधलोभमद इत्यादींना धमकावणारे (दंड, शिक्षा देणारे) अति चतुर, भवसागरावरील सेतु, दिनकरकुलाचे ध्वज (केतु) आमचे रक्षण करोत. ॥ १३-१४ ॥ ज्यांच्या बाहूंचा प्रताप (दो = प्रताप, दोः = बाहु) अतुलित आहे, जे बळाचे माहेरघर आहेत, ज्यांचे नाम विपुल कलिमलाचा विनाश करणारे आहे ज्यांच्या गुणांचा समूह (ग्राम) धर्माचे कवच असून आनंद सुख (वर्म) देणारा आहे ते राम सदा सर्वकाळ माझ्या सुखाचा व कल्याणाचा विस्तार करोत. (शं. = सुख, कल्याण) ॥ १५-१६ ॥ जरा ते निर्मल (विरज्) व्यापक व अविनाशी सर्वांच्याच हृदयांत निरंतर वास करतात. ॥ १७ ॥ तरी अनुज आणि श्री यांच्या सहित वनांत संचार करणारे खरारी माझ्या हृदयांत निरंतर वास करोत. ॥ १८ ॥ अहो स्वामी ! तुम्हांला निर्गुण (अगुण रूपाने) किंवा सगुण हृदयनिवासी - अंतर्यामी रूपाने जाणणारे असतील ते खुशाल जाणोत ! ॥ १९ ॥ पण जे राजीवनयन कोसलपति राम आहेत तेच माझ्या हृदयांत आपले निवास स्थान करोत. ॥ २० ॥ (आणि) मी सेवक आहे व रघुपति माझे पति (स्वामी) आहेत असा अभिमान माझ्या बुद्धीने कधी चुकून सुद्धां सोडू नये. ॥ २१ ॥ मुनीचे वचन ऐकून ते मुनि रामास प्रिय वाटले (रुचले) व पुन्हां हर्षाने मुनीला हृदयाशीं कवटाळला. ॥ २२ ॥ (व प्रभु म्हणाले की) मुनि ! मी परम प्रसन्न आहे हे जाणून घे. तू मागशील तो वर मी तुला देईन. ॥ २३ ॥ मुनि म्हणाले की मी कधीच वरयाचना केली नाही (वर मागितला नाही). खरे काय व खोटे काय हे काय हे मला कळत नाही. ॥ २४ ॥ (म्हणून) रघुराजा ! दास सुखदायका ! तुम्हांळा जो योग्य (लायक) तो वर मला द्या. ॥ २५ ॥ अविरल भक्ति वैराग्य विज्ञान सर्व सद्‌गुण व ज्ञान यांचे निधान तू होशील हो. ॥ २६ ॥ (असा वर प्रभूनी दिला). प्रभु ! तुम्ही जो वर मला दिलात तो मला मिळाला पण आतां मला जो आवडतो तो द्या. ॥ २७ ॥ प्रभो ! राम ! अनुज व जानकी यांच्या सहित आपण धनुष्यबाण धारण करून माझ्या हृदयरूपी आकाशांत चंद्रासारखे पण सतत (अखंड निरंतर) माझ्या इच्छेप्रमाणे (निकाम, यथेष्ट) वास करा. ॥ दो० ११ ॥

तदा तथास्तु रमापति वदति । घटज ऋषिकडे हर्षित निघती ॥
बहुत दिवस गुरु-दर्शन नाहीं । किति दिन या आश्रमिं आलाही ॥
निघे गुरुकडे प्रभुसह आतां । तुमचेवर उपकार न नाथा ? ॥
बघुनि कृपानिधि मुनिचतुराई । घेति सवें विहसुनि दो भाई ॥
मार्गि कथित अनुपम निजभक्ती । मुनि-आश्रमिं सुरभूप पोंचती ॥
त्वरें निकट गुरु सुतीक्ष्ण गेले । करुनि दंडवत वदते झाले ॥
नाथ कोसलाधीश कुमार । भेटूं आले जगदाधार ॥
राम अनुज समेत वैदेही । निशिदिनिं देव जपतसां जे ही ॥
श्रवत अगस्ती उठून धावले । हरिस बघुनि जल लोचनिं भरलें ॥
पडति बंधुयुग मुनि-पद-कमळीं । प्रेमें अति ऋषि हृदयीं कवळीं ॥
पुसे ज्ञानि मुनि कुशला सादर । आणुनि बसवीले आसनिं वर ॥
मग बहुपरिं करुनी प्रभु-पूजा । भाग्यवंत मजसम नहिं दूजा ॥
जितके तिथें अपर मुनिवृंद । हर्षति सकल बघुनि सुखकंद ॥

दो० :- मुनि समूहिं बसलेले सर्वांसही समोर ॥
विलोकिती सरदेंदुला जणूं निकाय चकोर ॥ १२ ॥

तेव्हां ’तथास्तु’ म्हणून रमापति रामचंद्र हर्षित होऊन घटज (अगस्ति) ऋषिकडे जाण्यास निघाले. ॥ १ ॥ तेव्हां सुतीक्ष्ण म्हणाले की या आश्रमांत आल्याला किती तरी दिवस झाले आणि तेव्हांपासून फार दिवसांत मला गुरुजींचे दर्शन नाही. ॥ २ ॥ म्हणून मी आतां प्रभूच्या बरोबर गुरुजीकडे निघालो आहे. यात नाथा ! तुमच्यावर मी काही उपकार करीत नाही. ॥ ३ ॥ कृपानिधीनी मुनीची चतुरता जाणली व दोघां भावांनी मोठ्याने हसून त्यांस बरोबर घेतले. ॥ ४ ॥ मार्गाने जातां जातां आपल्या अनुपम भक्तीचे कथन करीत सूरभूप राम अगस्ति-मुनिंच्या आश्रमांत पोचले. ॥ ५ ॥ व सुतीक्ष्ण त्वरेने धावत गुरुजवळ गेले व दंडवत नमस्कार करून म्हणाले की, ॥ ६ ॥ नाथ ! कोसलाधीश दशरथांचे कुमार तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत. ॥ ७ ॥ हे देव ! आपण रात्रंदिवस ज्यांचा जप करीत असतां ते राम अनुज व वैदेही यांच्या सहित आले आहेत. ॥ ८ ॥ हे ऐकताच अगस्ति उठून धावले व हरिला पाहून त्यांचे डोळे पाण्याने भरले. ॥ ९ ॥ दोन्ही भावांनी मुनिपदकमलांना दंडवत प्रणाम केला. तेव्हां ऋषीनी त्यांना अति प्रेमाने हृदयाशी कवटाळले. ॥ १० ॥ ज्ञानी मुनीनी आदराने कुशल विचारले व आणून श्रेष्ठ आसनावर बसविले. ॥ ११ ॥ नंतर बहुत प्रकारांनी प्रभूची पूजा केली व म्हणाले की माझ्या सारखा भाग्यवान दुसरा नाही. ॥ १२ ॥ तिथे जितके दुसरे मुनिवृंद होते ते सगळे सुखकंदास पाहून हर्षित झाले. ॥ १३ ॥ प्रभु मुनींच्या समूहांत बसलेले असून सर्वांनाच आपल्या समोर दिसत आहेत. जणूं चकोरांचे समुदायाच शरद ऋतूंतील चंद्राला निरखून पहात आहेत. ॥ १२ ॥

मग रघुवीर मुनीशा सांगति । प्रभु ! न गुप्त कांहीं अपणांप्रति ।
जाणां कारण मम आगमना । तात ! नको सांगणें आपणां ॥
मंत्र अतां प्रभु मज तो देणें । मुनीद्रोही मी मारिन जेणें ॥
प्रभुवच परिसुनि करिती स्मित मुनि । पुसलें नाथ काय मज जाणुनि ॥
भजनबळे आपल्याच अघारी । जाणें महिमा तव तिळभारीं ॥
माया तव, तरु विशाल उंबर । अमित फळें ब्रह्मांडें त्यावर ॥
जीव चराचर जंतुसमान हि । आंत वसति जाणति ना आन हि ॥
भक्षक कठिण कराल तयां जो । काळ सदा तव भीत भया तो ॥
ते तुम्हिं सकल लोकपति-नायक । पुसतां मजला मनुजा लायक ॥
कृपानिकेता मागूं वर हा । श्रीसह सानुज हृदयिं मम रहा ॥
अविरल भक्ति विरति सत्संगा । द्या पदकमलीं प्रीति अभंग ॥
जरिहि ब्रह्म अखंड अनंतहि । अनुभव-गम्य भजति जें संतहि ॥
असेंरूप तव जाणुं वानुं जरि । सगुणरूपिं पळपळ मनिं रति तरि ॥
महती दासां सदा देतसां । म्हणुनी मज रघुराज पुसतसां ॥
परम मनोहर ठिकाण ठावें । पावन पंचवटी प्रभु ! नांवें ॥
प्रभु दंडक वन पावन करणें । मुनिवर-शाप उग्र कीं हरणें ॥
रघुकुलराया तेथ वसावें । दयाछत्र मुनि-निकरिं धरावें ॥
राम घेति मुनि-निरोप निघती । निकट पंचवटि शीघ्र पोंचती ॥

दो० :- होइ गृध्रपति भेट तैं विविधा प्रीति करून ।
प्रभु गोदातटिं राहिले पर्णकुटी बांधून ॥ १३ ॥

मग रघुवीर मुनिश्रेष्ठांस म्हणाले की प्रभो ! आपल्याला अज्ञात असे काहीच नाही. ॥ १ ॥ माझ्या आगमनाचे वनांत व तुमच्याकडे येण्याचे कारण आपण जाणतांच, म्हणून तात ! आपणांस सांगण्याची आवश्यकता नाही. ॥ २ ॥ प्रभू ! मला आतां असा मंत्र द्या की जेणेकरून मी मुनींचा द्रोह करणार्‍यांना मारू शकेन. ॥ ३ ॥ प्रभूचे बोलणे ऐकून मुनीनी मंद हास्य केले व म्हणाले की नाथ ! आपण काय जाणून मला विचारलेत ! ॥ ४ ॥ हे अघनाशना ! आपल्याच भजनाच्या बळाने (प्रभावाने) मी आपला महिमा तिळभर जाणू शकतो. ॥ ५ ॥ नाथ ! तुमची माया हाच विशाल उंबराचा वृक्ष आहे व अगणित ब्रह्मांडे ही त्याला लागलेली अगणित फळे आहेत. ॥ ६ ॥ सर्व चराचर जीव हे जंतू सारखे आहेत ते त्या फळांत राहतात व दुसरें काही सुद्धां जाणत नाहीत. ॥ ७ ॥ त्या सर्व फळांचा भक्षक, कठीण, भयानक असा जो काळ आहे तो तुमच्या भयाला सदा भीत असतो. ॥ ८ ॥ ते तुम्ही सकल लोकपालांचे नायक (स्वामी) मनुष्यानेच विचारणे योग्य असे मला विचारीत आहांत ! (तेव्हां काय म्हणावे !) ॥ ९ ॥ कृपानिकेता ! मी हा वर मागतो की श्री व अनुज यांच्यासह हृदयांत रहा. ॥ १० ॥ अविरल - दृढ, भजन भक्ति वैराग्य, सत्संग आणि चरणकमली अभंग प्रीति द्या. ॥ ११ ॥ ब्रह्म जरी अखंड व अनंत आहे व अनुभवगम्य आहे तरी संत त्याचे सेवन करतात. ॥ १२ ॥ असे जे तुमचे रूप ते मी जाणतो व वर्णन करून सांगतो सुद्धां, तथापि मनांत क्षणोक्षणी सगुणरूपाची आवड आहे. ॥ १३ ॥ आपण नेहमी दासांना सेवकांना मोठेपणा देत असतां म्हणूनहे रघुराज ! आपण मला विचारलेत. ॥ १४ ॥ प्रभु ! एक परम मनोहर व पावन स्थान माहीत आहे, थाचे नांव पंचवटी. ॥ १५ ॥ प्रभु, आपण मुनिवराचा उग्रशाप दूर करून दंडकवन (दंडकारण्य) पावन करावे. ॥ १६ ॥ रघुकुलराया ! आपण तेथे निवास करावा व मुनिसमुदायावर दयेचे छत्र धरावे. ॥ १७ ॥
दंडकवनपावनता, गृध्रमैत्री - पंचवटीनिवास - मुनींचा निरोप घेऊन राम सीतालक्ष्मणांसहित निघाले व लवकरच पंचवटीच्या जवळ येऊन पोहोचले. ॥ १८ ॥ गृध्रराज जटायूची भेट झाली तेव्हां त्याच्याशीं विविध प्रकारें प्रीति करून प्रभु गोदावरीच्या तीरावर पर्णकुटी बांधून राहिले. ॥ दो० १३ ॥

तिथें राम जैं निवास करती । सुखी होति मुनि भया विसरती ॥
छवि पूरित सर सरिता वन । होती प्रतिदिन अतिशय शोभन ॥
खग-मृग-गण आनंदें नांदति । मधुप मधुर गुंजत छवि पावति ॥
वर्णुं न शकति वना अहिराजे । जिथें प्रगट रघुराज विराजे ॥
सुखें एकदां प्रभु आसीन । लक्ष्मण वचन वदति छलहीन ॥
सुरनर मुनि अग जगता स्वामी । प्रभुभावेंचि होय पुसतां मी ॥
वदा तें किं समजाउनि देवा । करिन तजुनि सब पदरज-सेवा ॥
सांगा ज्ञान विराग हि माया । भक्ति हि जीनें करां प्रभु दया ॥

दो० :- जीवेश्वर भेद हि सकल, वांगा समजाऊन ॥
पदरति जेणें उद्‌भवे भ्रम शुच मोह नुरून ॥ १४ ॥

जेव्हां रामचंद्रानी तेथे निवास केला तेव्हांपासून सर्व मुनी सुखी झाले व निर्भय झाले. ॥ १ ॥ पर्वत, तलाव नदी व वन सौंदर्यपूर्ण झाली व दिवसेंदिवस अतिशय सुशोभित दिसूं लागली. ॥ २ ॥ पशुपक्षी आनंदाने विगतवैर नांदू लागले व भृंग गुंजारव करीत असतां सुशोभित दिसूं लागले. ॥ ३ ॥ जिथे रघुराज विराजूं लागले त्या वनांचे वर्णन अहिराज सुद्धां करूं शकत नाहीत. ॥ ३ ॥
अनुपम उपदेश लक्ष्मणा - एकदां प्रभु राम सुखाने, प्रसन्नचित्त बसले होते तेव्हां लक्ष्मण छलहीन वचन बोलले. ॥ ५ ॥ आपण सुरनरमुनि स्थावर व जंगम यांचे स्वामी आहांत. मी भगव‌त् भावनेनेच (बंधु भावनेने नव्हे) विचारू इच्छितो, ॥ ६ ॥ देवा ! मला ते समजाऊन सांगावे की जेणे करून मी सर्व सोडून (सर्वाचा त्याग करून) आपल्या चरणधूलीची सेवा करूं शकेन. ॥ ७ ॥ प्रभु ! ज्ञान, वैराग्य, माया आणि जिने तुम्ही दया करतां ती भक्ति सांगा. ॥ ८ ॥ जीव आणि ईश्वर यांच्यातील भेद हे सगळे असे समजाऊन सांगा, जेणे करून भ्रम मोह व शोक नष्ट होऊन चरणरति उत्पन्न होईल. ॥ दो० १४ ॥

तात समासिं सांगु समजाउनि । ऐका मति मन चित्ता लाउनि ॥
मी माझें तूं तुझें चि माया । करते जी वश जीव निकाया ॥
गो गोचर जोंवर मन जातें । समजा सकल बंधु ! माया ते ॥
ऐका वदें तिचे भेदानां । विद्या अपर अविद्या जाणा ॥
एकदुष्ट जी सुदुःखरूपी । जी वश जीव पडें भवकूपीं ॥
एक रची जग गुण वश जीतें । प्रभु प्रेरिता, स्वबल न तीतें ॥
ज्ञान जिथें मानादिक नाहीं । ब्रह्म समान सकलजगिं पाही ॥
म्हणति तात ! तो परम विरागी । तृण सम सिद्धी त्रिगुणां त्यागी ॥

दो० :- माया ईश न आपणा जाणे, म्हणति जीव ॥
बंध-मोक्षदहि सर्वपर मायप्रेरक शीव ॥ १५ ॥

तात ! मी थोडक्यांतच (संक्षेपाने) समजाऊन सांगतो, तुम्ही बुद्धि मन व चित्त लाऊन श्रवण करा. ॥ १ ॥ मी आणी माझे व तूं आणि तुझे म्हणजेच माया, जी सर्व जीव समुदायाला वश करते. ॥ २ ॥ इंद्रिये (गो), इंद्रियांचे विषय आणि जेथपर्यंत मन जाऊ शकते ते सर्व हे बंधो ! माया आहे असे समजा. ॥ ३ ॥ तिच्या (मायेच्या) भेदांना मी सांगतो ते ऐका. एक विद्या व दुसरी (अपर) अविद्या असे जाणा. एक (अविद्या) दुष्ट व अति दुःखरूप आहे कारण कीं जिला वश झालेला जीव भवकूपांत पडतो. ॥ ४-५ ॥ एक (विद्यामाया) जिला गुण वश आहेत ती प्रभूचा प्रेरणेने जगाची रचना (उत्पत्ती) करते. तिला स्वतःचे बळ नाही. ॥ ६ ॥ जेथे मान (दंभ, हिंसा)आदिकरून नाहीत व सर्व जगांत ब्रह्म समान रूपाने पाहतो ते ज्ञान (त्याला ज्ञान म्हणावे). ॥ ७ ॥ तात ! सर्व सिद्धि व त्रिगुण यांचा जो तृणासमान त्याग करतो त्याला परम बिरागी म्हणतात. ॥ ८ ॥ माया, ईश्वर व आपण स्वतः यांस जो जाणत नाही त्याला जीव म्हणतात. बंध आणि मोक्ष देणारा, सर्वांहून श्रेष्ठ व सर्वांच्या पलिकडे असलेला जो मायेचा प्रेरक आहे त्याला शिव = ईश म्हणजेच ईश्वर म्हणतात. ॥ दो० १५ ॥

विरतिस धर्म योग दे ज्ञाना । ज्ञान मोक्ष दे श्रुति करि गाना ॥
वेगें जिनें द्रवें मी भाई । ती मम भक्ति भक्त-सुखदाई ॥
ती स्वतंत्र अवलंब आन नहि । ज्ञान अधीन तिच्या विज्ञान हि ॥
भक्ति तात अनुपम सुखमूलहि । मिळते संत यदा अनुकूल हि ॥
भक्ति साधनें सांगुं वर्णुनी । सुगम पथें मज पावे प्राणी ॥
प्रथम विप्रपदिं परमा प्रीती । स्व-स्व कर्मिं निरती श्रुतिरीतीं ॥
याचें फल कीं विषय-विराग हि । मग मम धर्मिं होइ अनुराग हि ॥
श्रवणादिक नव भक्ति दृढावति । मनिं ममलीला रति अति पावति ॥
संतचरण-पंकजिं सुप्रेमा । मन-तन वचन-भजन दृढ नेमां ॥
माय बाप गुरु बंधु देव पति । सकल मला जाणुनि दृढ सेवति ॥
मम गुण गातां तनू पुलकते । गद्‌गद गिरा नयनजल गळतें ॥
काम आदि मद दंभ न ज्याला । तात निरंतर वश मी त्याला ॥

दो० :- वचन मन मम गति भजन करिति निष्काम ॥
हृदयकमलिं त्यांचे सदा करतों मी विश्राम ॥ १६ ॥

धर्म वैराग्य देतो, योग ज्ञान देतो व ज्ञान मोक्ष देतो असे श्रुति वेद वर्णन करतात. ॥ १ ॥ हे बंधो ! जिने मी वेगाने द्रवतो ती माझी भक्ति भक्तांना सुख देणारी आहे. ॥ २ ॥ ती स्वतंत्र आहे. तिला दुसरा आधार लागत नाही आणि ज्ञान व विज्ञान तिच्या आधीन आहेत. ॥ ३ ॥ तात ! भक्ति अनुपम सुखाचे मूळ आहे पण ही जेव्हां संत अनुकूल होतात, कृपा करतात तव्हांच मिळते. ॥ ४ ॥ आतां भक्तीचीं साधने वर्णन करून सांगतो म्हणजे तिला सोप्या मार्गाने प्राणी प्राप्त करून घेतो. ॥ ५ ॥ पहिले साधन म्हणजे विप्रचरणी परम म्हणजे अति प्रीति त्याचे फल, (दुसरे साधन) आपापल्या वर्णाश्रमधर्मांत वेदशास्त्र पद्धतीने अत्यंत रति (म्हणजे प्रेम), ॥ ६ ॥ मग त्याचे फळ विषय वैराग्य (अपर वैराग्य) प्राप्ति, मग ममधर्मि म्हणजे भागवत धर्मावर अनुराग, (अर्थात प्रेम) उत्पन्न होतो. ॥ ७ ॥ भगवतधर्मावर प्रेम करू लागल्याने, श्रवण कीर्तनादि नव विधा भक्ति दृढ होते, आणि माझ्या लीलांविषयी मनांत अतिशय प्रीति (रति) उत्पन्न होते. ॥ ८ ॥ मग संतांच्या चरण कमलांच्या ठिकाणी अति प्रेम उत्पन्न होते व नंतर संतकृपेने मनाने शरीराने कृतीने कर्माने व वाणीने दृढ नेमाने भजन करूं लागतात. ॥ ९ ॥ माता, पिता, विद्यागुरु, बंधु, देव व स्वामी इ. सर्व मलाच जाणून माझी दृढ सेवा करतो. ॥ १० ॥ माझे गुण गांत असतां शरीर पुलकित होते, कंठ गद्‌गद होतो व नेत्रांतून पाणी गळूं लागते. ॥ ११ ॥ व ज्याच्या ठिकाणी काम आदि (काम-क्रोध-लोभ) मद आदि (मद-मोह-मत्सर) व दंभ इत्यादि विकार नाहीत त्याला हे तात ! मी निरंतर (सदासर्वदा) वश होऊन राहतो. ॥ १२ ॥ ज्यांना वाणीने कर्माने व मनाने माझ्या शिवाय दुसरी गति नाही व जे निष्काम होऊन माझे (वचन कर्म मनाने) भजन करतात त्यांच्या हृदय कमलांत मी सदा विश्राम करतो. ॥ दो० १६ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP