॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय १८ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

श्रुणु मुनि कथा पुराण पुनीता । जी गिरिजेसि शंभुनीं कथिता ॥
प्रथित एक जगिं केकय देश । सत्यकेतु तेथिला नरेश ॥
धर्मधुरंधर नीतिनिधान । तेजप्रतापशीलबलवान ॥
दोन तयाला तनय सुवीरहि । सब गुण धाम महा रण धीरहि ॥
धनी ज्येष्ठ सुत जो राज्यातें । म्हणती प्रतापभानु तयातें ॥
अवर पुत्र अरि-मर्दननामा । भुजबल अतुल अचल संग्रामा ॥
परम मित्रता त्या भावांची । प्रीति दोषछलवर्जित साची ॥
ज्येष्ठ सुता नृप करि राज्यार्पण । हरिसाठीं वनिं गेला आपण ॥

दो. :- जैं प्रताप रवि होइ नृप फिरली देशीं द्वाहि ॥
प्रजा पाळि अति वेद विधिं अघ लव कुठें हि नाहिं ॥ १५३ ॥

प्रतापभानू आख्यान
- भारद्वाज मुनी ! शंभूंनी गिरिजेला सांगितलेली एक पुनीत पुराण कथा श्रवण करा ॥ १ ॥ जगात प्रसिद्ध असा केकय नावाचा देश होता व तेथला राजा सत्यकेतू होता ॥ २ ॥ तो धर्मधुरंधर, नीतीनिधान, व तेज प्रतापशील व बलसंपन्न होता. ॥ ३ ॥ त्याला दोन मुलगे होते. व ते दोघेही सर्व गुणांचे धाम, सुवीर व महारणधीरही होते. ॥ ४ ॥ ज्येष्ठ पुत्र जो राज्याचा वारस होता त्याचे नाव प्रतापभानू होते ॥ ५ ॥ धाकटा मुलगा अरिमर्दन नावाचा होता, त्याचे बाहुबल अतुल व रणांगणांत तो अचल असे ॥ ६ ॥ त्या दोन भावांमध्ये परम मैत्री होती व त्यांची परस्पर प्रीती निर्दोष, छलहीन व खरी होती ॥ ७ ॥ सत्यकेतू – राजाने ज्येष्ठ पुत्राला राज्य दिले व आपण हरीसाठी वनात गेला. ॥ ८ ॥ दो०.- प्रतापभानू राजा झाला तेव्हा त्या देशात दवंडी पिटली गेली. तो वेदविधीने प्रजेचे पालन उत्तम करू लागला ( त्यामुळे ) राज्यात कुठे लेशमात्रही पाप होईनासे झाले. ॥ दो. १५३ ॥

नृपहितकारक सचिव शहाणा । नाम धर्मरुचि शुक्रचि माना ॥
सचिव सुजाण, बंधु बलवीरहि । स्वतां प्रतापपुंज रणधीरहि ॥
सैन्य संगिं चतुरंग अंत ना । रण झुंझार सुभट ना गणना ॥
सेने निरखुनि हर्षनृपा अति । धडाम् धडाम् धम् भेरी वाजति ॥
दिग्विजया नृप फौज सजवुनी । निघे शुभदिनीं डंके पिटुनी ॥
होति लढाया ठायीं नाना । बळें जिंकिले सकल नृपांनां ॥
द्वीप सप्त वश करुनि भुजबलें । लादुनि कर घे भूप सोडले ॥
अवनि-मंडला तेव्हां सकलहि । भूपति भानूप्रताप एकहि ॥

दो. :- करुनि विश्व वश भुजबळें स्वपुरीं करी प्रवेश ॥
अर्थ धर्म कामादि सुख सेवी समयिं नरेश ॥ १५४ ॥

राजाचे हित करणारा धर्मरुचि नावाचा सचिव होता, तो जणुं दुसरा शुक्रच ! ॥ १ ॥ शहाणा सचिव, भाऊ बलवान वीर, आणि ( राजा ) स्वत: प्रतापुंज व रणधीर, ॥ २ ॥ व त्यांचे बरोबर अपार चतुरंग सैन्य होते व त्या सैन्यात अगणित रणझुंझार उत्तम योद्धे होते. ॥ ३ ॥ त्या सेनेचे निरीक्षण केल्यावर राजाला अति हर्ष झाला व रणभेरी धडाम धम वाजू लागल्या ॥ ४ ॥ प्रतापभानू राजाने दिग्वीजयासाठी फौज सुसज्ज केली व शुभदिवस पाहून डंके पिटून प्रयाण केले. ॥ ५ ॥ नाना ठायी ठिकाणी नाना लढाया झाल्या व त्याने आपल्या बाहुबलाने सर्व नृपांना जिंकले ॥ ६ ॥ साती द्वीपे आपल्या बाहुबळावर वश करुन, सर्व राजांवर खंडणी लादून ती घेतली व राजांना सोडून दिले ॥ ७ ॥ तेव्हा सर्व पृथ्वीचा प्रतापभानु हा एकटा भू-पती बनला. ॥ ८ ॥ दो०- ( याप्रमाणे ) सर्व विश्व त्याने आपल्या बाहुबळावर आधीन करुन घेऊन आपल्या नगरात प्रवेश केला व तो नरेश अर्थ – धर्म – काम व मुख्यत: काम यांचे सुख योग्य समयी भोगूं लागला ॥ १५४ ॥

भानू-प्रताप-नृपबल-शाली । कामधेनु भूमी शुभ झाली ॥
प्रजे न लेश दुःख, सुख भारी । धर्मशील सुंदर नर नारी ॥
सचिव धर्मरुचि हरिपदिं प्रीती । नित्य शिकवि नृपहितार्थ नीती ॥
गुरु सुर संत पितर भूदेवां । पूजी भूप सदा करि सेवा ॥
भूप-धर्म जे वेदीं वानित । सादर सकल करी सुख मानित ॥
प्रतिदिन देइ विविधविध दानां । ऐके श्रुतिवर् शास्त्र पुराणां ॥
विविध कूप कासार वापिका । सुंदर बागा सुमन-वाटिका ॥
विप्रवास सुरसदनें सुंदर । सर्व तीर्थिं नृप निर्मि मनोहर ॥

दो. :- वेद-पुराणीं उक्त जे एक एक सब याग ॥
वार हजार हजार नृप करी सहित अनुराग ॥ १५५ ॥

प्रतापभानू भूपाच्या बलाने बलशाली झालेली भूमी कामधेनूसारखी शुभ झाली ॥ १ ॥ प्रजेला लेशमात्र दु:ख न होता फार सुख मिळूं लागले सर्व नरनारी धर्मशील व सुंदर झाली ॥ २ ॥ धर्मरुचि सचिवाची हरीचरणी प्रीती होती व तो नृपाच्या हितासाठी नित्य राजाला नीती शिकवीत असे. ॥ ३ ॥ प्रतापभानू राजा गुरु, देव, संत, पितर व भूदेव (ब्राह्मण) यांची सदा पूजा व सेवा करीत असे ॥ ४ ॥ राजाचे धर्म म्हणून वेदांनी वर्णिलेले जे जे धर्म आहेत त्या सर्वांचे आचरण राजा आदराने व सुख मानीत करु लागला . ॥ ५ ॥ तो रोजच्या रोज अनेक प्रकारची दाने देई व वेद, उत्तम शास्त्रे, पुराणे यांचे श्रवण करी ॥ ६ ॥ नाना प्रकारचे कूप, वापी तलाव व सुंदर बागा, पुष्पवाटिका ॥ ७ ॥ ब्राह्मणांसाठी घरे, देवांची सुंदर मंदिरे, अती मनोहर अशी सर्व तीर्थांच्या ठिकाणी त्याने निर्माण केली ॥ ८ ॥ दो०-वेद – पुराणांनी जे जे म्हणून यज्ञ ( याग ) सांगीतले आहेत त्यातील एक – एक यज्ञ त्याने हजार हजार वेळां प्रेमाने केला. ॥ दो ० १५५ ॥

हृदयीं कांहि फलाकांक्षा नहि । भूप विवेकी परम सुजाण हि ॥
करि जो धर्म कर्म-मन-वाणीं । वासुदेविं नृप अर्पी ज्ञानी ॥
एकवार वाजीवरिं राजा । बसुनि, सजवुनी शिकार-साजां ॥
विंध्याचल-वनिं गभीर शिरुनी । विविधा पावन मृगां मारुनी ॥
फिरत विपिनिं नृप पाहि वराहू । गिळुनि शशिस, वनिं लपे किं राहू ॥
विधु विशाल वदनीं ना राही । जणूं क्रोधवश ओकित नाहीं ॥
कोल कराल दशनछवि कथिता । तनु विशाल अधिका पीवरता ॥
घुर्घुरतो हय चाहुल लागुनि । चकित बघे श्रवणां टव्‌कारुनि ॥

दो. :- नील महीधर-शिखर सा बघुनि विशाल वराह ॥
सडकि, हाकि हय नृप म्हणे अतां नसे निर्वाह ॥ १५६ ॥

( प्रतापभानू एवढी यज्ञ यागादी कर्मे करीत होता पण ) त्या कर्मांचे काही फळ मिळावे अशी त्याला इच्छा नव्हती तो राजा विवेकी व परम सुजाण होता ॥ १ ॥ कर्माने, मनाने, वाणीने तो जो काही धर्म करी तो सर्व तो वासुदेवाला अर्पण करी, असा तो ज्ञानी होता. ॥ २ ॥ एकदा ( नेहमीप्रमाणे ) शिकारीची सर्व तयारी करुन तो उत्तम घोड्यावर बसून ॥ ३ ॥ विंध्याद्रिच्या घनदाट अरण्यात शिरला, व नाना प्रकारचे पावन पशु मारून ॥ ४ ॥ अरण्यात फिरत असता त्या राजाने एक वराह पाहीला तो जणूं काय चंद्राला गिळून वनात ( येऊन ) लपलेल्या राहू सारखाच भासला ॥ ५ ॥ तो चंद्र विशाल असल्याने जणूं तोंडात राहीना पण तो ओकून टाकावा असेही क्रोधामुळे त्या वराहास वाटेना. ॥ ६ ॥ त्या डुकराच्या कराल दाढांचे रुप सांगितले त्याचा देह विशाल असून तो फारच लठ्ठ होता. ॥ ७ ॥ घोड्याची चाहूल लागताच तो घुरघुर करुं लागला व कान टवकारून ( इकडे तिकडे ) पाहूं लागला ॥ ८ ॥ दो०- नील पर्वताच्या शिखरासारखा तो विशाल वराह पाहून राजाने घोड्याला सडकून हाकला व ( त्या डुकरास ) म्हणाला आता तूं माझ्या तावडीतून सुटत नाहीस ॥ दो० १५६ ॥

बघुनि वाजि ये फार जवानें । पळे वराह समीररयानें ॥
नृप करि सत्वर शरसंधाना । धरि धरणीस विलोकुनि बाणा ॥
नेम धरुनि नृप तीर चालवी । सूकर करि छल देह वाचवी ॥
प्रगटत लपत जात किरि पळला । भूप कोपवश पाठिं लागला ॥
क्रोड दूरगत धन वन-राजीं । जिथें प्रवेश नव्हें गज वाजी ॥
अति एकल, वन अती क्लेशकर । तरि न सोडि मृगमाग नरेश्वर ॥
कोल विलोकुनि भूप-सुधीर । त्वरें शिरे गिरिगुहें गभीर ॥
अगम बघुनि, नृप परितापाकुल । बळे, महावनिं पडे तया भुल ॥

दो. :- क्षुधित तृषित नृप अश्व ही अतिशय असतां श्रांत ॥
फिरे सोधि सरसरिज्जल न मिळे विवळे भ्रांत ॥ १५७ ॥

घोडा फार वेगाने येत आहे असे पाहून तो वराह वायूवेगाने पळूं लागला ॥ १ ॥ राजाने त्वरा करून धनुष्यावर बाण लावून तो सोडला, बाण येत आहे असे दिसताच तो डुक्कर चटकन भुईसपाट पडला ॥ २ ॥ राजाने पुन: पुन्हा नेम धरुन तीर – बाण सोडण्याचा क्रम चालू ठेवला पण तो सूकर कपटाने बाण चुकवून देह वाचवूं लागला. ॥ ३ ॥ तो वराह कधी प्रगट होई, तर कधी गुप्त होई, राजा क्रोधाला वश होऊन पळून त्याचा पाठलाग करुं लागला . ॥ ४ ॥ शेवट तो वराह वनातील अशा घनदाट झाडीत घुसला की तेथे हत्ती घोडे यांना शिरणे अशक्य होते. ॥ ५ ॥ राजा अति एकटा पडला वन अति क्लेशकारक आहे तरी पण त्या नरेशाने त्या पशूचा माग काही सोडला नाही. ॥ ६ ॥ राजाचा हा अति धीर पाहून तो कोल त्वरेने डोंगराच्या एका खोल गुहेत शिरला. ॥ ७ ॥ त्या गुहेत शिरणे अशक्य आहे असे पाहून राजा चिंतेने व्याकुळ झाला व परतला पण त्या महावनात वाट भुलला. ॥ ८ ॥ दो०- राजा व त्याचा घोडा सुद्धा अतिशय थकलेले, भुकेले व तहानलेले होते त्या वनात नदी तलावाचे पाणी शोधित तो हिंडू लागला. पण ते न मिळाल्याने तो भ्रमिष्टासारखा विव्हळूं लागला. ॥ दो० १५७ ॥

फिरत विपिनिं त्या आश्रम दिसला । छल-मुनिवेषिं तिथें नृप बसला ॥
ज्याचा देश नृपें आक्रमला । सैन्य समर सोडुन जो पळला ॥
रविप्रतापा सुसमय जाणुनि । काल आपला फिरला मानुनि ॥
सदनिं न गत अति चित्तीं ग्लानी । साम नृपासि न करि अभिमानी ॥
नृप रंकासम कोपा गिळुनी । वसे वनीं तापस मुनि बनुनी ॥
तत्समीप जैं भूप पोचला । त्यानें प्रतापरवि ओळखला ॥
ओळख नोहे तृषित नरेशा । मानि महामुनि बघुनि सुवेषा ॥
उतरुन तुरगावरुनि वं दिलें । परम चतुर निज नाम न कथिलें ॥

दो. :- तृषित बघुनि भूपास तो दाखवि तया तलाव ॥
स्नान पान करि सह हया हर्षानें नृपराव ॥ १५८ ॥

( पाण्यासाठी ) अरण्यात भटकत असता राजाला एक आश्रम दिसला, तेथे एक राजा कपटमुनीच्या वेषात रहात असे. ॥ १ ॥ त्या नृपाचा देश या प्रतापभानूने घेतला त्यावेळी तो राजा सैन्य व रणांगण सोडून पळाला होता. ॥ २ ॥ प्रतापभानूला काळ अनुकूल आहे असे जाणून व आपला काळ फिरला आहे असे मानून ॥ ३ ॥ तो घरी गेला नाही व मनात खिन्न झाला होता तरी तो अभिमानी असल्याने त्याने प्रतापभानूशी तह केला नाही ॥ ४ ॥ एखाद्या रंकाप्रमाणे क्रोध गिळून तपस्वी मुनीचे सोंग घेऊन तो या अरण्यात येऊन राहीला ॥ ५ ॥ तेव्हा राजा त्या (कपटमुनी) जवळ जाऊन पोचला तेव्हा त्याने प्रतापभानू राजाला ओळखला ॥ ६ ॥ नरेश तृषार्तृ असल्याने त्यास ओळखूं शकला नाही, उलट त्याचा सुवेष पाहून तो महामुनी आहे असे प्रतापभानूने जाणले – मानले ॥ ७ ॥ ( म्हणून ) त्याने घोड्यावरुन उतरून त्याला वंदन केले, पण परम चतुर असल्याने त्याने आपले नाव मात्र सांगितले नाही ॥ ८ ॥ प्रतापभानूला फार तहान लागली आहे हे जाणून त्याने भूपाला तलाव दाखवला राजाने तेथे जाऊन स्नान व जलपान केले घोड्यानेही तसेच केले तेव्हा त्या नृपश्रेष्ठाला हर्ष झाला ॥ दो० १५८ ॥

श्रम गत सकल सुखी नृप झाला । स्वाश्रमिं तापस नेइ तयाला ॥
जाणुनि सूर्यास्ता दे आसन । करी तपस्वी मग मृदु भाषण ॥
कोण फिरां वनिं एकल कां बरं । सुंदर तरुण उदार जिवावर ॥
चक्रवर्ति-लक्षणं तव सारीं । बघुनि दया येई मज भारी ॥
नामें प्रतापभानु महीश्वर । ऐका मी तत्सचिव मुनीश्वर ॥
भुललों मी कीं फिरत शिकारीं । येउनि बघुं पद भाग्यें भारी ॥
आम्हां अपलें दर्शन दुर्गम । सन्निध दिसतो भाग्योदय मम ॥
तात! पडे काळोख वदे तो । सत्तर योजन पुर तुमचें तों ॥

दो. :- निशा घोर गंभीर वन सुज्ञा! दिसे न वाट ॥
रहा आज हें जाणुनी होतां जाल पहाट ॥ १५९ म ॥
तुलसी जशि भवितव्यता तैसें मिळे सहाय ॥
आपण ये त्यापाशिं कीं त्याला घेउनि जाय ॥ १५९ म ॥

( स्नान व जलपानाने ) राजाचे सर्व श्रम गेले व तो सुखी झाला, तेव्हा तो तापस त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला ॥ १ ॥ सूर्यास्ताची वेळ झाली असे पाहून त्याने राजाला बसण्यास आसन दिले व मग तो तपस्वी मृदुवाणीने म्हणाला ॥ २ ॥ तुम्ही कोण इतके सुंदर तरूण असून जीवावर उदार होऊन असे एकटे अरण्यात का बरे हिंडता ? ॥३ ॥ तुझ्या ठिकाणी राजाची सर्व लक्षणे आहेत. ती पाहून मला तुझी फार दया येते. ॥ ४ ॥ ( प्रतापभानू म्हणाला ) ऐका ! प्रतापभानू नावाचा जो महीश्वर आहे त्याचा मी सचिव आहे. मी शिकारीसाठी फिरत असता भूल पडली, पण महाभाग्याने येथे येऊन आपले पाय दिसले ॥ ५-६ ॥ आंम्हाला आपले दर्शन होणे फार कठीण यावरून असे वाटते की माझे काहीतरी भाग्य लवकरच उदयास येणार आहे. ॥ ७ ॥ तो मुनी म्हणाला, बाबा ! आता काळोख पडला व तुमचे नगर तर सत्तर योजने दूर राहीले आहे ॥ ८ ॥ भयंकर रात्र, घनदाट अरण्य, वाट दिसत नाही, याचा विचार करुन पहा, तुम्ही सुज्ञ आहांत आज येथे रहा व पहाट झाली की जाता येईल. ॥ १५९ रा ॥ तुलसीदास म्हणतात की, जसे भवितव्य असेल तसे साह्य मिळते, तो आपण होऊन त्याच्यापाशी येतो किंवा ते ( भवितव्य ) त्याला तेथे घेऊन जाते. ॥ १५९ म ॥

बरें नाथ! आज्ञा शिरिं वंदुनि । तुरग तरुसि नृप बसला बांधुनि ॥
नृप बहुपरी प्रशंसी त्याला । पदिं नमुनी स्तवि निज भाग्याला ॥
होइ रुचिर मृदु वच नृप वदता । गणुनि पिता प्रभु! करूं धृष्टता ॥
मज मुनीश! सुत दास गणावें । नाथ! नाम निज मज सांगावें ॥
जाणि नृपा तो, नृपति तया ना । भूप सुहृद तो कपट-शहाणा ॥
वैरी क्षत्रिय तशांत राजा । साधु पाहि छलबलें स्वकाजा ॥
स्मरुनि राज्यसुख खिन्न अराती । अवा अनल इव जळते छाती ॥
भूप-सरल-वच पडतां कानीं । स्मरे वैर मनिं हर्षा मानी ॥

दो. :- कपटमिश्र वचना म्रुदुल बोले युक्ति समेत ॥
अमचें नाम भिकारि अतां निर्धन रहित निकेत ॥ १६० ॥

नाथ ! ठीक आहे असे म्हणून आज्ञा शिरसामान्य करुन, राजाने घोडा झाडाला बांधला व तो आसनावर बसला. ॥ १ ॥ राजाने त्याच्या पायांना वंदन करुन आपल्या भाग्याची स्तुती केली व नाना परींनी ( त्या मुनीची ) प्रशंसा केली ॥ २ ॥ मग राजा मृदु व सुंदर वाणीने म्हणाला की प्रभु ! मी आपणास पित्यासारखे, मानून थोडी धृष्टता करतो. ॥ ३ ॥ मुनीश ! आपण मला आपला पुत्र वा सेवक मानावा व नाथ ! मला आपले नांव सांगावे ॥ ४ ॥ त्याने नृपाला ओळखले होते पण राजाने त्यास ओळखले नाही. राजा पडला सरळ हृदयीं व तो पडला कपटी, हुशार ! ॥ ५ ॥ एकतर वैरी, त्यात क्षत्रिय व तशातही राजा ( मग काय पहावयाचे ) कपटाच्या बळावर आपले कार्य साधू पहात आहे ॥ ६ ॥ राज्यसुखाच्या स्मरणाने हा शत्रू खिन्न झाला असून कुंभाराच्या आव्यातील आगीप्रमाणे छाती ( आतल्या आत ) जळत आहे. ॥ ७ ॥ राजाचे सरळ भाषण कानी पडताच, वैराचे स्मरण करुन त्याने मनात हर्ष मानला ॥ ८ ॥ व तो कपट मिश्रित अगदी कोमल असे भाषण युक्तीने करु लागला. तो म्हणाला की आता आमचे नाव भिकारी आहे, घर नाही की धन नाही ॥ दो० १६० ॥

नृप वदला विज्ञान-निधान । जे अपणांसम गताभिमान ॥
ते स्वरूप निज सतत लपवती । वसुनि कुवेषीं कुशल पावती ॥
यास्तव पुकारती श्रुति सज्जन । हरिला प्रिय जे परम अकिंचन ॥
अधन भिकारि तुम्हांसम अगृही । होति विरंचि शिवहि संदेही ॥
योसि सोसि तव चरण नमामी । अतां कृपा मज करणें स्वामी ॥
बघुनि नृपाची प्रीती सहजहि । अपणावर विश्वास विशेषहि ॥
बहुपरिं नृप अपलासा करुनी । वदे स्नेह अति दावुनि वरुनी ॥
सत्य सांगतो श्रुणु भूपाला । वसत् इथें घालवुं बहु काला ॥

दो. :- कुणी न आजवर भेटला मी प्रगटिं न अपणास ॥
लोकमान्यता अनलसम जाळी तप-विपिनास ॥ १६१ रा ॥
सो. :- तुलसी बघुनि सुवेष भुलती मूढ न चतुर नर ॥
दिसतो बर्हि सुरेख वचन सुधेसम अशन अहि ॥ १६१ म ॥

राजा म्हणाला की आपल्यासारखे जे विज्ञान निधान असून निरभिमान असतात ते आपले स्वरुप नेहमी लपवून ठेवतात व कुवेषात राहून कुशल पावतात. ॥ १–२ ॥ एवढ्यासाठी वेद व संत कंठरवाने सांगतात की जे अत्यंत अकिंचन असतात ते हरीला प्रिय असतात. ॥ ३ ॥ तुमच्या सारख्या निर्धन भिकारी व गृहहीनाविषयी शिव विरंची सुद्धा संशयी होतील ॥ ४ ॥ तुम्ही जे कोणी असाल ते असा मी आपल्या चरणांना वंदन करतो, स्वामी आता माझ्यावर कृपा करावी ॥ ५ ॥ आपल्यावर राजाची सहज चांगली प्रीती व विशेष विश्वास आहे असे पाहून व राजाला नाना तर्‍हांनी आपलासा करून व वरवर अतिशय स्नेह दाखवून तो वंचक म्हणाला ॥ ६–७ ॥ भूपाला ! मी सत्य सांगतो ऐक - येथे राहून मी कितितरी काळ घालविला पण ॥ ८ ॥ आजपर्यंत मला येथे कोणी भेटला नाही व मी पण कुठे स्वत:स प्रगट केले नाही, कारण की लोकमान्यता अनला सारखी आहे, व ती तप रुप काननाला जाळून टाकते ॥ दो ० १६१ रा ॥ तुलसीदास म्हणतात की, सुंदर वेषाला पाहून मूढ नाही भुलत-फसत, चतुर लोकच फसतात ( हे तुलसीदासा ! ) मोर दिसण्यास किती सुरेख, बोलणे कसे अगदी अमृतासारखे, पण सर्प खातो, हे लक्षात ठेव. ॥ दो० १६१ म ॥

म्हणुन गुप्त वसतो जगिं, कांहीं । हरिविण दुजें प्रयोजन नाहीं ॥
सकळ कळे प्रभुला न कळवितां । सिद्धिकवण वद जनां रिझवितां ॥
तुम्हीं सुमति शुचि मला प्रिय अती । प्रीती मजवर तुला प्रतीती ॥
लपविन तुजसी तात! अतां जर । दोष सुदारुण लागे मज तर ॥
जों जों तापस उदास वदतो । तों तों नृपविश्वास वर्धतो ॥
तनमनवचनें निजव्श दिसला । बकध्यानि तापस तैं वदला ॥
नाम एकतनु अमचें बाळा । पदिं शिर नमुनि नृपाल म्हणाला ॥
नामाचा या अर्थ वदावा । मज निज सेवक परम गणावा ॥

दो. :- आदि-सृष्टि झाली यदा तैं मम उद्‌भव जाण ॥
नाम एकतनु म्हणुन कीं देह न धरला आन ॥ १६२ ॥

( लोकमान्यता तपाचा विनाश करते ) म्हणून मी जगात गुप्त राहतो ( कारण ) हरिशिवाय इतर कोणाचे काही प्रयोजन नाही. ॥ १ ॥ प्रभूला सर्व काही न सांगता न कळविताच कळते व लोकांना खूष करून कोणती सिद्धी मिळणार ते तरी सांगा ॥ २ ॥ तुम्ही सुमती व पवित्र आहांत म्हणून मला अति प्रिय ( झालात ), तुझी माझ्यावर प्रीती आहे ( कारण ) माझी प्रचीती तुला आली आहे . ॥ ३ ॥ ( असे असता ) बाळा ! जर मी तुझ्यापासून काही लपवून ठेवले तर मला अती दारुण दोष लागेल. ॥ ४ ॥ याप्रमाणे तो तापस जो जो उदासीनपणे बोलू लागला तो तो राजाचा विश्वास वाढत गेला. ॥ ५ ॥ राजा कर्माने ( शरीराने ) मनाने व वाणीने आपणास वश आहे असे पाहीले तेव्हा तो बकध्यानी तपस्वी म्हणाला ॥ ६ ॥ बाळा ! आमचे नांव ‘एकतनु’ ते ऐकून पुन्हां नमस्कार करुन राजा म्हणाला की आपला अत्यंत सेवक जाणून या नावाचा अर्थ वर्णन करुन सांगावा ॥ ७-८ ॥ ( दांभिक म्हणाला ) ज्या वेळी अगदी पहिल्याने सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळी माझी उत्पत्ती झाली व त्यानंतर पुन्हा दुसरा देह धारण केला नाही म्हणून एकतनु हे नांव आहे. ॥ दो० १६२ ॥

नको करूं आश्चर्या कांहीं । सुत दुर्लभ नहि कांहिं तपाही ॥
तपोबलें सृजि जगा विधाता । तपोबलें विष्णू परिपाता ॥
तपोबलें करि हर संहारा । कांहिं न अगम तपा संसारा ॥
ऐकुनि भूपति अति अनुरागे । कथा पुरातन तो व्‌दुं लागे ॥
कर्म - धर्म - इतिहासांनेकां । करी निरूपण विरति विवेकां ॥
उद्‌भव पालन प्रलय कहाणीं । वदे अमित आश्चर्यां वानी ॥
श्रवुनि महिप तापस वश बनला । नाम आपलें सांगुं लागला ॥
नृप! तुज तापस म्हणे जाणलें । कपट तुझें मज गोड वाटलें ॥

सो. :- श्रुणु महीश अशि नीति जिथं तिथं नाम न वदति नृप ॥
तुजवर मम सुप्रीति ती बघुनी चतुरता तव ॥ १६३ ॥

मुला ! मनात काही आश्चर्य मानू नकोस, कारण तपाने काहीही दुर्लभ नाही ॥ १ ॥ व तपाच्या बळाने विधाता जगाची उत्पत्ती करतो व तपाच्या बलानेच विष्णू जगाचे परिपालन करतात ॥ २ ॥ तपाच्या जोरावरच हर जगाचा संहार करतात. तपाच्या योगाने या जगात काहीही अगम्य नाही ॥ ३ ॥ हे ऐकून भूपतीचे (त्या वंचकावर) अत्यंत प्रेम बसले व तो वंचक पुरातन कथा सांगू लागला ॥ ४ ॥ कर्माविषयी व धर्माविषयी अनेक इतिहास सांगून तो विवेक वैराग्याचे निरुपण करु लागला ॥ ५ ॥ उत्पत्ती – पालन व प्रलय यांच्या अमित कहाण्या त्याने सागितल्या व अगणित आश्चर्यकारक गोष्टी वर्णन केल्या ॥ ६ ॥ त्या ऐकून महीपती त्या तापसाला ( पक्का ) वश झाला व आपले नाव सांगूं लागला. ( तो ) ॥ ७ ॥ तपस्वी म्हणाला की राजा मी तुला ओळखले आहे . व तू जे कपट केलेस ते मला आवडले ॥ ८ ॥ ( कारण ) ऐक ! महीशा अशी नीती आहे की राजे लोक वाटेल तेथे आपले नांव सांगत नाहीत, हे तुझे चातुर्य पाहून माझे तुझ्यावर अत्यंत प्रेम बसले आहे. ॥ दो० १६३ ॥

नामें तुम्ही प्रताप-दिनेश्वर । सत्यकेतु तव पिता नरेश्वर ॥
नृपा! सर्व गुरुकृपें समजतें । जाणुनि निज हानि न सांगवतें ॥
बघुनि तात तव सहज सरलता । श्रद्धा प्रीती नीति-निपुणता ॥
उपजे तुजवर मनिं मम ममता । कथित कथा निज, बा! तूं पुसतां ॥
निःसंशय मी प्रसन्न आतां । माग मना जें रुचेल ताता ॥
नृप हर्षित परिसुनि शुभ वचना । विविधा विनवी धरुनी चरणां ॥
कृपासिंधु मुनि दर्शनिं तूझें । चारी पदार्थ करतलिं माझे ॥
तरिही प्रभुला प्रसन्न पाहुनि । हो‍उं अशोक अगम वर मागुनि ॥

दो. :- जरा-मरण-रुज-रहित-तनु रणिं अजिंक्य होईन ॥
करिन कल्पशत राज्य महिं एकछत्र रिपुहीन ॥ १६४ ॥

तुम्ही प्रतापभानू नावाचे राजे आहात, व तुझा पिता सत्यकेतू नावाचा राजा होता. ॥ १ ॥ राजा गुरुच्या कृपेने सर्व काही कळते पण स्वत:चे अकल्याण आहे हे जाणून सांगवत नाही ॥ २ ॥ ( पण ) बाळा ! तुझा सहज, सरल स्वभाव, माझ्यावरील श्रद्धा ( विश्वास व प्रतीती ) प्रीती व तुझी नीती निपुणता पाहून माझ्या मनात तुझ्याबद्दल फार ममता उत्पन्न झाली व तू विचारल्यामुळे मी आपली कथा सांगितली ॥ ३-४ ॥ मी आता तुझ्यावर फार प्रसन्न आहे तुझ्या मनास वाटेल ते माग ॥ ५ ॥ ते शुभ वचन ऐकून राजाला हर्ष झाला व त्याने मुनीचे पाय धरले, नाना प्रकारे विनंती केली व म्हणाला की, ॥ ६ ॥ मुनि ! कृपासिंधू ! तुझ्या दर्शनानेच धर्मार्थकाममोक्षरुपी चारी पदार्थ – पुरुषार्थ माझ्या तळहातावर ( मिळाल्या सारखे ) आहेत. ॥ ७ ॥ पण तुझ्यासारखा प्रभु प्रसन्न झाला आहे हे पाहून मी काहीतरी अलभ्य वर मागून शोकरहित होतो. ॥ ८ ॥ माझा देह जरा – मरण व रोग दु:खादि रहित व्हावा, रणांगणांत मला कोणीही जिंकू नये व एकछत्री शत्रुहीन असे पृथ्वीचे राज्य मी शंभर कल्पे करावे ( असा वर द्या ) ॥ दो० १६४ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP