॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय ६ वा



Download mp3

येति एकदां वसिष्ठ मुनिवर । जिथें राम सुखधाम मनोहर ॥
अति आदर रघुनायक देती । धुउनि पाय पादोदक घेती ॥
राम ! कृपाब्धि काहिं मम विनती । ऐका, मुनि कर जोडुनि म्हणती ॥
बघ-बघुनी तुमच्या आचरणा । होइ मोह मम हृदयिं पार ना ॥
महिमा अमित, न वेदां कळतो । भगवन् ! मज कीं वर्णवेल तो ॥
धंदा पौरोहित्य मंद अति । वेद पुराणें स्मृतीहि निंदति ॥
घेइ न तैं विधि वदले मजला । पुढें लाभ आहे सुत तुजला ॥
परमात्मा ब्रह्मच नर बनतिल । रघुकुलभूषण भूपति होतिल ॥

दो० :- तैं हृदिं विचार केला योग मख व्रत दान ॥
ज्यास्तव करणें तो मिळे धर्म न या सम आन ॥ ४८ ॥

श्री वसिष्ठकृत उत्तराभाद्रपदा नक्षत्र स्तुती – जिथे मनोहर श्रीराम, सुखाचे धाम होते तेथे एकदा मुनीवर वसिष्ठ आले ॥ १ ॥ रघुनायकांनी त्यांना आदर सन्मान दिला व त्यांचे पाय धुवून, पायांचे तीर्थ प्राशन केले ॥ २ ॥ मुनी हात जोडून म्हणाले की हे कृपासागरा श्रीरामा ! माझी अल्प विनंती ऐका ॥ ३ ॥ तुमचे आचरण बघ बघून माझ्या मनाला आपार मोह होतो ॥ ४ ॥ तुमचा महिमा प्रमाणातीत आहे व तो वेदांना सुद्धा कळत नाही, मग भगवंता ! तो मला कसा वर्णन करता येईल ? ॥ ५ ॥ पुरोहिताचा व्यवसाय अति नीच आहे, वेद, पुराणे आणि स्मृती सुद्धा त्याची निंदा करतात ॥ ६ ॥ हे जाणून जेव्हा मी रविवंशाचे पौरोहित्य घेण्यास तयार नव्हतो तेव्हा ब्रह्मदेव मला म्हणाले की पुत्रा ! तुला पुढे मोठा लाभ होणार आहे. ॥ ७ ॥ परमात्मा ब्रह्मच मनुष्यरुप घेणार असून ते रघुकुलाचे भूषण – भूपती होणार आहेत. ॥ ८ ॥ तेव्हा मी मनात विचार केला की ज्याच्यासाठी योग, यज्ञ व्रत दानादि करतात तोच प्राप्त होईल म्हणून, याच्यासारखा दुसरा धर्मच नाही. ॥ दो० ४८ ॥

जप तप नियम योग निज धर्म । श्रुति संभव नाना शुभ कर्म ॥
ज्ञान दया दम तीर्थीं मज्जन । वदति धर्म जितके श्रुति सज्जन ॥
आगम निगम पुराण अनेक हि । श्रवुनि पढुनि फल तों प्रभु एकहि ॥
तव पद पद्मीं प्रीति निरंतर । सकल साधनां हें फल सुंदर ॥
मळें धु‍उनि कधिं मळ किं नाशतो । वारि मथुनि कुणि घृत किं पावतो ॥
प्रेम भक्ति जल विण रघुवर तो । अभ्यंतर मल कधीं न जातो ॥
तो सर्वज्ञ तज्ञ तो पंडित । तो गुणगृह विज्ञानि अखंडित ॥
दक्ष सकल नगरांतुनि, तदा । अणविति गज रथ हय संपदा ॥

दो० :- नाथ ! एक वर मागतो राम, कृपेनें द्याहि ॥
प्रतिजन्मीं प्रभुपद कमल स्नेह न घटो कदाहि ॥ ४९ ॥

जप, तप, नियम, योग, वर्णाश्रमधर्म, वेदांनी सांगीतलेली अनेक शुभ कर्मे, ज्ञान, दया, दम, तीर्थयात्रा इ. वेदांनी व संतांनी जितके धर्म सांगीतले आहेत त्यांचे आणि हे प्रभो ! वेद, शास्त्रे, पुराणे इत्यादिंच्या श्रवण – पठनाने मुख्य फल एकच आहे. ॥ १-३ ॥ या व इतर सर्व साधनांचे सुंदर फळ म्हणजे तुमच्या चरण कमलांच्या ठिकाणी प्रगाढ प्रेम होय. ॥ ४ ॥ मळाने धुवून कधी मळ गेला आहे काय ? पाणी घुसळून कधी कोणास तूप मिळाले आहे काय ? ॥ ५ ॥ रघुवरा ! अंत:करणाचा जो मळ आहे, तो, प्रेमभक्ती जलाशिवाय कधी जात नाही ॥ ६ ॥ तोच सर्वज्ञ, तोच तत्वज्ञ, तोच पंडीत, तोच सदगुणांचे धाम, तोच अखंड विज्ञानी होय, तोच चतुर व तोच सकल शुभ लक्षण संपन्न आहे की ज्याचे तुमच्या चरणकमलांच्या ठिकाणी प्रगाढ प्रेम असते. ॥ ७-८ ॥ हे नाथ ! मी एकच वर मागतो. तो रामा ! कृपा करुन द्याच प्रभो ! आपल्या चरणकमलांच्या ठिकाणी माझे प्रेम जन्मोजन्मी कधीही कमी होऊ नये. ॥ दो० ४९ ॥

विनवुनि मुनि वसिष्ठ गृहीं आले । कृपासिंधुला प्रिय अति झाले ॥
हनूमान भरतादी भ्राते । सवें घेति सेवक सुखदाते ॥
गत कृपाल नगरांतुनि, तदा । अणविति गज रथ हय संपदा ॥
बघुनि कृपेनें त्या वाखाणिति । जें ज्या रुचलें तें त्या अर्पिति ॥
श्रमहारी प्रभुला श्रम झाले । शीतल आम्रवनीं तैं गेले ॥
पसरति वसन भरत निज हातें । बसले प्रभु सेविति ते भ्राते ॥
मारुतसुत तैं मारुत घाली । सजल नयन तनु पुलकित झाली ॥
हनुमंता सम नहिं बहुभागी । नहि कुणि राम चरण अनुरागी ॥
गिरिजे ज्याची सेवा प्रीती । स्वमुखें प्रभु बहु वार वानिती ॥

दो० :- त्या अवसरिं मुनि नारद आले करतळिं वीन ॥
गाउं लागले रामकल कीर्ति सदैव नवीन ॥ ५० ॥

अशी विनंती करुन वसिष्ठ मुनी आपल्या घरी परत आले. ते कृपासिंधु प्रभूला अत्यंत प्रिय झाले ॥ १ ॥ सेवकांना सुख देणार्‍या राम प्रभूंनी हनुमान, भरतादि भाऊ व सेवक यांना बरोबर घेतले ॥ २ ॥ आणि कृपालु प्रभु नगराबाहेर गेले तेव्हा त्यांनी हत्ती, घोडे, रथ इ. संपत्ती मागविली ॥ ३ ॥ त्या हत्ती घोडे इ. सर्वाकडे कृपेने पाहून त्यांची प्रशंसा केली व ज्यांना जे आवडले ते त्यांना दिले. ॥ ४ ॥ श्रम हरण करणार्‍या प्रभूला श्रम झाले म्हणून ते शीतल आम्रवनात गेले ॥ ५ ॥ भरताने आपल्या हाताने वस्त्र (आसन) पसरले व प्रभु त्यावर बसले व ते बंधू सेवा करु लागले . तेव्हा वायुपुत्र हनुमान वारा घालू लागला व त्याचे शरीर रोमांचित होऊन डोळे अश्रुंनी भरले ॥ ६ ॥ हनुमंता सारख्या महाभाग्यवान व रामचरण प्रेमी दुसरा कोणी नाही ॥ ७ ॥ गिरीजे ! त्याने केलेल्या सेवेचे व त्याच्या प्रीतीचे वर्णन प्रभुंनी वारंवार आपल्या मुखाने केले ॥ ७ ॥ त्याच समयी हातात वीणा घेतलेले नारद मुनी आले आणि श्रीराम प्रभूंची सदैव नवीन राहणारी सुंदर कीर्ती ते गावू लागले ॥ दो० ५० ॥

मामवलोकय पंकल लोचन । कृपाविलोकनिं शोच विमोचन ॥
नील तामरस शाम, काम अरि । हृदय कंज मकरंद मधुप हरि ॥
यातुधान वरुथ बल भंजन । मुनि सज्जन रंजन अघ गंजन ॥
विप्रसस्य नववृंद बलाहक । अशरण शरण दीनजन पालक ॥
भुजबल विपुल, भार महि खंडित । खर दूषण विराध वध पंडित ॥
रावणारि सुखरूप भूपवर । जय दशरथ कुल कुमुद सुधाकर ॥
सुयश पुराणि कथित निगमागमिं । गाती सुरमुनि संत समागमिं ॥
कारुणीक मिथा मद खंडन । सकल कुशल कोशलपुर मंडन ॥
कलिमल मथन नाम ममताहन । तुलसिदास प्रभु पाहि ! प्रणतजन ॥

दो० :- प्रेमें नारद वर्णुनी राम गुण ग्रामास ॥
धरुनी शोभासिंधु हृदिं गेले विधि धामास ॥ ५१ ॥

नारद मुनिकृत रेवती नक्षत्र स्तुती – कृपाद्दष्टीने शोकापासून मुक्त करणार्‍या कमल – लोचना ! कृपाद्रुष्टीने माझ्याकडे एकदा पहा तरी ! ॥ १ ॥ नील कमलासमान श्याम असणार्‍या हे हरी तुम्ही मदन शत्रु शंकराच्या हृदय – कमलातील (प्रेमरुपी) मकरंद पान करणारे मधुप आहांत ॥ २ ॥ राक्षसांच्या कळपाच्या बळाचा विध्वंस करुन मुनींना व संताना आनंद देणारे व पापांचा संहार करणारे आहांत ॥ ३ ॥ ब्राह्मणरुपी शेतीला वा पिकाला तुम्ही नवीन मेघसमूहा सारखे आहांत, शरण हीनांना शरण देणारे, दीनजनांचे पालक – रक्षक आहांत ॥ ४ ॥ आपले भुजबल अपार असून अपार भूमीभाराचे खंडन आपण केलेत खर – दुषण विराधांचा वध करण्यात प्रवीण, रावणाचे शत्रु, सुखस्वरुप, भूपश्रेष्ठ, दशरथ कुलरुपी कुमुदांचे चंद्र श्रीरामचंद्रा आपला जय असो ! ॥ ५-६ ॥ तुमचे सुंदर यश पुराणात वेदांत व इतर शास्त्रात वर्णिलेले असून देव मुनी आणि संत समागमांत ते गात असतात. ॥ ७ ॥ तुम्ही करुणाशील, मिथ्यामदाचा नाश करणारे, सगळ्यात कुशल, आणि अयोध्या पुरीचे भूषण आहांत ॥ ८ ॥ तुमचे नाम कलियुगांतील पापांचा (सुद्धा) संहार करणारे आहे, आणि ममतेला मारणारे आहे, हे तुलसीदासांच्या प्रभो ! शरणागत दासांचे रक्षण करा. ॥ ९ ॥ नारदांनी रामचंद्रांच्या गुण समूहाचे वर्णन केले आणि शोभासिंधु प्रभुला हृदयात धारण करुन ते ब्रह्मलोकास गेले ॥ दो० ५१ ॥

गिरिजे ऐक, विशद ही कथा । मी सब कथित माझि मति यथा ॥
रामचरित शतकोटि पार न । श्रुती शारदा वर्णनिं शक्त न ॥
राम अनंत, अमित गुण खाणी । जन्म कर्म अगणित नामानी ॥
जलसीकर महि रजहि गणवती । रघुपति चरित न वर्णुनि सरती ॥
विमल कथा हरिपददायिनी । श्रवण भक्ति दे अनपायिनी ॥
उमे कथा सब रुचिर वर्णिली । भुशुंडिनें जी गरुडा कथिली ॥
कथित रामगुण वर्णुनि कांहीं । सांगूं काय भवानि ! अतां ही ॥
श्रवुनि कथा शुभ उमा हर्षली । अति विनीत मृदु वाणी वदली ॥
धन्य धन्य मी धन्य पुरारी । रामगुणां श्रुत भवभयहारी ॥

दो० :- तुमच्या कृपें कृपायतन अतां कृतार्थ, न मोह ॥
विदित राम महिमा प्रभु चिदानंद संदोह ॥ ५२रा ॥
स्रवत नाथ आनन शशी कथा सुधा रघुवीर ॥
श्रवणपुटीं पिउनियां मन तृप्त नव्हें मतिधीर ॥ ५२म ॥

श्रीमानसकथेचा उपसंहार – महेश म्हणाले हे गिरीजे ! ऐक ही उज्वल कथा माझ्या बुद्धी शक्ती प्रमाणे मी सगळी सांगीतली ॥ १ ॥ रामचरित्र तर शतकोटी म्हणजे अपार आहे वेद व शारदा सुद्धा (समग्र) वर्णन करण्यास समर्थ नाहीत. ॥ २ ॥ राम अनंत आहेत, ते अनंत गुणांची खाण आहेत. त्यांचे जन्म – कर्म आणि नावे सुद्धा अनंत – अगणित – असंख्य आहेत ॥ ३ ॥ जलाचे तुषार वा पृथ्वीचे रज:कण कदाचित मोजता येतील पण रघुपतीचे चरित्र वर्णन करुन सरणार नाही. ॥ ४ ॥ ही विमल कथा हरिपद देणारी आहे व हिच्या श्रवणाने अविनाशी भक्ती मिळते ॥ ५ ॥ उमे ! काकभुशुंडीने जी गरुडास सांगीतली, ती सगळी सुंदर कथा मी तुला सांगीतली ॥ ६ ॥ हे भवानी ! मी काही थोडेसे रामगुण वर्णन करुन सांगीतले, आता आणखी काय सांगू ? ॥ ७ ॥ शुभ कथा श्रवण करुन उमेला हर्ष झाला, आणि ती अति नम्र व कोमल वाणीने म्हणाली की ॥ ८ ॥ हे त्रिपुरारी मी धन्य धन्य आहे की मी रामचंद्रांचे भवभय हरण करणारे गुण श्रवण केले ॥ ९ ॥ हे कृपाधाम ! तुमच्या कृपेने मी कृतार्थ झाले व आता मोह राहीला नाही हे प्रभु ! मी रामचंद्रांचा महिमा जाणला की ते सच्चिदानंदघन प्रभु आहेत. ॥ दो० ५२ रा ॥ हे नाथ ! आपला मुखचंद्र रघुवीर कथा रुपी अमृताचा वर्षाव करीत आहे आणि हे धीरमती ! कानरुपी ओठांनी ते पिऊन माझे मन तृप्त होत नाही. आणखी प्यावेसे वाटते ! ॥ दो० ५२ म ॥

राम चरित ऐकुनि जे धाती । त्यां न कळे रस विशेष जाती ॥
जीवन्मुक्त महामुनि जेही । श्रवति निरंतर हरिगुण तेही ॥
भवसागर जो लंघूं पाही । रामकथा त्या दृढ नौका ही ॥
विषयिजनांसहि हरिगुण आगर । श्रवणसुखद हृदया प्रसन्नकर ॥
श्रवणवंत जगिं कोण असा ही । रघुपति चरित जया प्रिय नाहीं ॥
आत्मघातकी जीव हि जड ते । ज्यांना रघुपति कथा न रुचते ॥
हरिचरित्र मानस तुम्हिं गीत । श्रवुनि नाथ सुख मजसि अमीत ॥
तुम्हिं कथिलें किं कथा ही शोभन । करि भुंशुंडि गरुडाप्रति गायन ॥

दो० :- ज्ञान विरति विज्ञान दृढ रामचरणिं सुस्नेह ॥
वायस तनु रघुपति भक्ति मला परम संदेह ॥ ५३ ॥

रामचरित्र ऐकून त्यांना पुरे असे वाटले त्यांना या रसाची गोडी (विशेष स्वाद) कळलीच नाही ॥ १ ॥ जे जीवन्मुक्त महामुनी आहेत ते सुद्धा नेहमी हरिगुण श्रवण करतात. ॥ २ ॥ भवसागराच्या पार जाण्याची इच्छा ज्याला असेल त्याला रामकथा ही अभंग नौका आहे ॥ ३ ॥ श्रीहरीच्या गुणांचा समूह विषयी लोकांनाही कानांना सुख देणारा व मन प्रसन्न करणारा आहे. ॥ ४ ॥ कान असलेला असा जगात कोण आहे की ज्याला रघुपतीचे चरित्र प्रिय वाटत नाही ? ॥ ५ ॥ ज्यांना रघुपती कथा आवडत नाही ते जीव जड आणि आत्मघातकी होत ॥ ६ ॥ हे नाथ ! तुम्ही हरीचरित्र मानस विस्तारपूर्वक सांगीतलेत ते श्रवण करुन मला अपार सुख झाले ॥ ७ ॥
भुशुंडी गरुड संवादाची प्रस्तावना – तुम्ही म्हणालात की ही सुंदर कथा काकभुशुंडीने गरुडास विस्तारपुर्वक सांगीतली ॥ १ ॥ वैराग्य, ज्ञान व विज्ञान द्दढ असून रामचरणीं त्याला अत्यंत स्नेह आहे, कावळ्याचा देह असून त्याला रघुपतीची प्रेमभक्ती कशी काय प्राप्त झाली ? ॥ दो० ५३ ॥

नरसहस्रमधिं पहा पुरारी । कोणि एक धर्मव्रत धारी ॥
धर्मशील कोटिमधिं असतो । विषय विमुख कुणि विरागिं रत तो ॥
कोटि विरक्तीं श्रुति वदताहे । सम्यक ज्ञान एक कुणि लाहे ॥
ज्ञानवंत कोटींत आगळा । जीवनमुक्त एक जगिं विरळा ॥
सहस्रांत त्या सव सुखखाणी । ब्रह्मलीन दुर्लभ विज्ञानी ॥
धर्मशील सुविरागी ज्ञानी । जीवन्मुक्त ब्रह्मपर प्राणी ॥
यांहुनि तो दुर्लभ सुरराया । रामभक्तिरत गत मद माया ॥
ती हरिभक्ति काक कशि पावे । विश्वनाथ ! हें मज सांगावें ॥

दो० :- रामपरायण बोधरत गुणागार मतिधीर ॥
नाथ वदा कारण कवण मिळण्या काक शरीर ॥ ५४ ॥

हे पहा, त्रिपुरारी ! हजारो मनुष्यात कोणी एखादा धर्मव्रतधारी असतो ॥ १ ॥ त्या कोट्यवधी धर्मशीलात असा एखादाच विषय पराड.मुख होऊन वैराग्यरत असा असतो. ॥ २ ॥ वेद म्हणतात की कोटी विरक्तात सत्यज्ञान एखाद्यालाच लाभते ॥ ३ ॥ कोटी ज्ञानीजनांत एखादाच जीवन्मुक्त – श्रेष्ठ असतो ॥ ४ ॥ हजारो जीवन्मुक्तांत सर्व सुखांची खाण, ब्रह्मात लीन राहणारा विज्ञानी फारच दुर्लभ ! ॥ ५ ॥ धर्म शील, अतिविरागी, ज्ञानी, जीवनमुक्त आणि विज्ञानी हे एकापेक्षा एक फार दुर्लभ आहेत पण या सर्व प्राण्यांपेक्षा हे देवाधिदेव ! रामभक्ती रस असणारा मद मायारहित तर अति दुर्लभ ! ॥ ६-७ ॥ असे असता ती अतिदुर्लभ हरिभक्ती कावळ्याला कशी मिळाली हे हे विश्वनाथ ! मला समजावून सांगा ॥ ८ ॥ रामपरायण, ज्ञानरत, गुणांचे धाम, आणि धीरमति असून हे नाथ ! त्याला काकशरीर मिळाले याचे कारण काय ते सांगावे ॥ दो० ५४ ॥

सुंदर हें प्रभुचरित पुनीत कुठें कृपालु ! वायसा प्राप्त ॥
कसें श्रुत हि आपण मदनारी । सांगा मज अति कौतुक भारी ॥
गरुड महाज्ञानी गुण राशि । हरि सेवक अति निकट निवासी ॥
काकापाशीं कवण हेतु तरि । त्यजुनि निकर मुनि कथा श्रवण करि ॥
सांगा केविं घडे संवाद । दो हरिभक्त काक उरगाद ॥
गिरा गौरिची सरल मनोहर । श्रवुनि सुखी वदले शिव सादर् ॥
धन्य सती ! पावन तुझी मति । थोडि न, रघुपति पदीं प्रीति, अति ॥
ऐक परम पुनीत इतिहास । श्रवुनि सकल लोक भ्रम नाश ॥
उपजे राम चरणिं विश्वास हि । नर तरतिल भव विना प्रयास हि ॥

दो० :- असे प्रश्न करि विहगपति काकाप्रति जाऊन ॥
सांगू सादर सब उमे ऐक चित्त लाऊन ॥ ५५ ॥

(पार्वती म्हणाली) हे कृपालु, हे सुंदर आणि पवित्र प्रभु चरित्र कावळ्याला कुठे मिळाले ? ॥ १ ॥ आणि हे मदनारि ! आपण हे चरित्र कसे श्रवण केलेत ? मला त्याबद्दल अत्यंत उत्सुकता व नवल (कौतुक) वाटत आहे ॥ २ ॥ गरुड महाज्ञानी, गुणांचा सागर, श्रीहरीचा प्रत्यक्ष सेवक, व (सदैव) श्रीहरीच्या निकट राहणारा असून सर्व मुनी समूहांना सोडून त्याने कावळ्याकडे जाऊन का व कसे श्रवण केले ? ॥ ३-४ ॥ काक आणि सर्पभक्षक गरुड या दोन हरिभक्तांचा संवाद कसा घडला ते मला सांगा ॥ ५ ॥ गौरीची सरल व मनोहर वाणी ऐकून शंकर सुखी झाले आणि आदराने म्हणाले - ॥ ६ ॥ हे सती ! तु धन्य आणि पावन आहेस आणि तुझी बुद्धी पावन आहे; कारण तुझी रघुपतीपदीं प्रीती खूप आहे ॥ ७ ॥ जो श्रवण केल्याने सर्व लोकांच्या भ्रमाचा नाश होतो असा परम पावन इतिहास सांगतो, ऐक. ॥ ८ ॥ त्याच्या श्रवणाने रामचरणीं विश्वास उत्पन होईल आणि मनुष्य प्रयत्नावाचून भवसागर तरुन जातील ॥ ९ ॥ असेच प्रश्न खगराज गरुडाने काकाकडे जाऊन त्याला विचारले तो सर्व इतिहास मी आदराने तुला सांगतो, उमे ! तूं मन लावून श्रवण कर ॥ दो० ५५ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP