॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय २३ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

कामकोटि-छवि शाम शरीर । नीलकंज वारिद-गंभीर ॥
अरुण चरण पंकज नख जोती । कमलदलीं बसलीं जणुं मोतीं ॥
ध्वज रेखांकुश कुलिश तळपती । मुनि मनं नूपुर-नादिं मोहती ॥
कटीं किंकिणी उदरीं त्रिवली । नाभि गभीर कळे ज्या दिसली ॥
भुज विशाल बहूभुषणयुत वर । हृदिं हरि-नखशोभा अति सुंदर ॥
उरिं मणिहार पदक अति शोभे । विप्रचरण देखत मन लोभे ॥
कंबु कंठ अति चिबुकहि सुंदर । अमित मदन-छवि वसे मुखावर ॥
दो दो दशन नि अधर अरुण धर । वर्णिंल नासा तिलक कोण बरं ॥
सुंदर कर्ण सुचारु कपोल । प्रिय अति मधुर तोतरे बोल ॥
चिक्कण काळे कुरळे जावळ । मातें रचित करुनि विविधा कळ ॥
वपुवरि पिवळें पातळ झबलें । रांगत दुड्‌दुड् प्रिय मज गमले ॥
छवि न वर्णवे श्रुति-शेषां ही । तो जाणे स्वप्निंहि जो पाही ॥

दो० :- सुख-संदोह मोह-पर-ज्ञान-गिरा गोऽतीत ॥
दम्पति-परम-प्रेम-वश करि शिशुचरित पुनीत ॥ १९९ ॥

बाल राम रुप वर्णन – नीलकमलासारखे व जलदेणार्‍या मेघाप्रमाणे गंभीर अशा श्याम वर्णाचे शरीर असून शोभा कोटी मदनांसारखी आहे. ॥ १ ॥ पायांचे तळवे लाल कमलासारखे असून नखांची कांती (तेज) जणू कमळांच्या पाकळ्यांवरील मोत्यांप्रमाणे ॥ २ ॥ ध्वज, ऊर्ध्व रेखा, अंकुश व वज्र (ही चिन्हे) तळपायावर तळपत आहेत व नूपूरांच्या नादाने मुनींची (ही) मने मोहित होत आहेत. ॥ ३ ॥ कमरेला घागर्‍यांचा करगोटा असून उदरावर तीन रेषा आहेत व नाभी इतकी खोल आहे की ज्याने ती पाहीली तोच जाणे ॥ ४ ॥ बाहू विशाल ( आजानु ) असून अनेक उत्तम भुषणांनी (बाजूबंद इ.) युक्त आहेत व हृदयावर वाघनख फारच शोभून दिसत आहे. ॥ ५ ॥ छातीवर मण्यांचा हार व पदक अत्यंत शोभिवंत असून विप्रचरणांकडे बघत असलेले पाहून मन लुब्ध होते ॥ ६ ॥ कंठ शंखासारखा अति सुंदर असून हनुवटीही अतिशय सुरेख आहे आणि मुखावर अनंत मदनाचे सौंदर्य वसत आहे. ॥ ७ ॥ (नुकतेच उगवलेले) दोन दोन दात असून ओठ लालचुटुक व सुंदर आहेत. नाक व तिलक (गंध - टिळा) यांचे सौंदर्य कोण बरे वर्णन करूं शकेल ? ॥ ८ ॥ कान सुंदर तर गाल अति रम्य आहेत आणि तोतरे मधुर बोलणे तर (हृदयाला सुखविते - निवविते) इतके प्रिय आहे. ॥ ९ ॥ तुकतुकीत काळे - कुरळे जावळ मातेने विविध युक्तीपूर्वक सुंदर शृंगारले आहे. ॥ १० ॥ अंगात झिरझिरित (पारदर्शक) पिवळे झबले घातले आहे (त्या पीतवर्णातून नीलवर्णाची अंग कांती प्रकाशित होत आहे.) दुडु दुडु रांगणारे ते सुरेख रुपडे कोणाचेही मन मोहून घेईल त्यात आश्चर्य ते काय ? ॥ ११ ॥ श्रुती व शेष यांना देखील अशा या साजर्‍या रुपाचे वर्णन शब्दात सांगता येणार नाही. ज्याने कोणी स्वप्नात पाहीले असेल तोच ते जाणूं शकेल.(वर्णन करणे शक्यच नाही) (अशा या बालरुपाचा स्वप्नात वा ध्यानात वा सगुण साक्षात्काराचा अनुभव चाखणारा अति महान पुण्यात्मा होय ! महाभक्त भागवत !) ॥१२॥ केवळ सुखाचा समूह (सुख - आनंदघन) मोहातीत, मनबुद्धी वाचातीत,व इंद्रियातीत असलेले प्रभू दांपत्याच्या परम प्रेमाला वश होऊन पावन बाललीला करीत आहेत. ॥ दो०१९९ ॥

या परिं राम जगत्पितृमाता । कोसलपुर-लोकां सुखदाता ॥
जे मानिति रघुनाथ-पदां रति । अशी भवानी! प्रगट तयां गति ॥
रघुपति-विमुख यत्‍न करि कोडी । शक्त कवण भवबंधन् सोडी ॥
जी वश जीव चराचर करते । ती माया प्रभुचें भय धरते ॥
तिला नाचवी भूकुटि-विलासें । भजणें कोणा त्यजुनि प्रभु असे ॥
मन-कृति-वचनिं चतुरता त्यजतां । करिति कृपा रघुराजा भजतां ॥
अशापरीं प्रभु शिशु-लीलांसी । करुनि सुखवि सब नगरनिवासी ॥
घेउनि उत्संगीं कधिं डोलवि । पाळण्यांत कधिं घालुनि हालवि ॥

दो० :- प्रेम मग्न कौसल्या निशिदिन जाति न भान ॥
सुतस्नेहवश माता बालचरित करि गान ॥ २०० ॥

जगाचे मातापिता असलेले राम याप्रमाणे कोसलपुरीतील लोकांना ( शिशुलीलांनी ) सुख देत होते ॥ १ ॥ जे रघुनाथ - पदांच्या ठिकाणी परम प्रेम करतात त्यांना हे भवानी, अशी दुर्लभ गती ( स्थिती ) प्राप्त होते हे उघड झाले ॥ २ ॥ रघुपती विमुख राहून कोणी कोट्यवधी प्रयत्‍न केले तरी असा कोण समर्थ आहे की तो भवबंधन सोडील ? ॥ ३ ॥ जी चराचर जीवांना वश करते ती माया प्रभूला घाबरत असते ॥ ४ ॥ त्या मायेला आपल्या भृकुटी विलासाने जो नाचवितो त्या प्रभूला सोडून इतर कोणाचे भजन करावे ? ॥ ५ ॥ मनाने कृतीने व वाणीने शहाणपणा सोडून भजन केले म्हणजे रघुराज कृपा करतात.॥ ६ ॥ अशा प्रकारे शिशुलीला करून प्रभूंनी सकल अयोध्या निवासींना सुखी केले ॥ ७ ॥ कौसल्या माता बाल रामाला मांडीवर घेऊन कधी डोलवीत बसते, तर कधी पाळण्यात घालून झोके देत बसते ॥ ८ ॥ कौसल्या रामप्रेमात इतकी मग्न होऊ लागली की रात्र केव्हा सरली व दिवस केव्हा उजाडला व गेला याचे भान तिला राहीनासे झाले व पुत्र स्नेहाला वश होऊन ती बालचरित्राचे गान करुं लागली ॥ दो० २०० ॥

एकवेळ जननिनें न्हणिला । शृंगारुनि पर्यंकिं निजविला ॥
निजकुल-इष्टदेव भगवाना । पूजायास्तव करुनी स्नाना ॥
पूजन करि नैवेद्य समर्पी । स्वयें पाकगृहिं पदांस अर्पी ॥
पुनरपि आले देवघरासी । खात दिसे सुत नैवेद्यासी ॥
सभय पाळण्यापाशिं पळाली । सुप्त तिथें सुत बघती झाली ॥
येइ फिरुनि, सुत दिसला तो ही । हृदयिं कंप मनिं धीर न राही ॥
इथें तिथें दो बालक पाही । भ्रम मम मतिचा, दुजें किं कांहीं ॥
जननी व्याकुळ राम निरखती । मधुर सुस्मिता प्रभु तैं करती ॥

दो० :- दाखविलें मातेसि निज अद्‌भुतरूप अखंड ॥
प्रतिरोमीं किति कोटी लागलिं हो ब्रह्मांड ॥ २०१ ॥

( नेहमी प्रमाणेच ) एकदा कौसल्या मातेने रामास न्हाऊ घातले व विविध शृंगार करुन पाळण्यात निजविले ॥ १ ॥ मग आपल्या कुळातील इष्टदेव भगवंताची पूजा करण्यासाठी तिने स्वत: स्नान केले ॥ २ ॥ ( नंतर ) पूजा करून नैवेद्य समर्पण केला व स्वत: स्वयंपाकघरात ( स्वयंपाक झाला की नाही ते पहावयास ) गेली ॥ ३ ॥ पुन्हा देवघराशी येऊन बघते तो आपला मुलगाच नैवेद्य खात आहे असे दिसले ॥ ४ ॥ ( तेव्हा ) घाबरुन पुन्हा पाळण्याजवळ पळतच आली व पाहते तर मुलगा पाळण्यात शांत झोपलेला ! ॥ ५ ॥ पुन्हा देवघरात आली तो तिथे तोच पुत्र दिसला, तेव्हा मात्र छाती धडधडू लागली व मनाचा धीर सुटला ॥ ६ ॥ इथे ( देवघरात ) व तिथे ( पाळण्यात ) असे दोन मुलगे दिसले ! हा माझ्या बुद्धीचा भ्रम आहे की दुसरेच कांही आहे ? ( चेटूक, भुताटकी इ. - अशी चिंता उत्पन्न झाली ) ॥ ७ ॥ जननी भय - चिंता यांनी व्याकुळ झाली आहे असे रामास दिसताच प्रभूंनी चटकन मधुर मनोहर स्मित केले ॥ ८ ॥ आपल्या मातेला आपले अदभुत अखंड रुप ( विश्वरुप - विराटरुप ) दाखवले, प्रत्येक रोमारोमात कित्येक कोटी ब्रह्मांडे लागलेली आहेत. ॥ दो० २०१ ॥

अगणित रविशशि शिव चतुरानन । बहु गिरि सरित सिंधु महिकानन ॥
काल कर्म गुण दोष स्वभावहि । बघे तें हि जें कानीं कधिं नहि ॥
माया विविधा प्रबल पाहिली । सभय जुळुनि कर उभी राहिली ॥
पाहि जीव, नाचवि ती ज्याला । दिसे भक्ति सोडी जी त्याला ॥
तनु पुलकित मुखिं शब्द न आला । मिटी नयन पदिं ठेवि शिराला ॥
पाहुनि माते विषण्ण भारी । होति पुन्हां शिशुरूप खरारी ॥
स्तुति करवे ना, मानि भयाला । जगत्पिता मी पुत्र मानला ॥
बहुपरिं हरि जननिस समजावी । अंब! गोष्ट कोठें न वदावी ॥

दो :- पुनः पुन्हां कौसल्या विनवी जोडि करां हि ॥
प्रभु न अतां कधिं लागो तव माया मजला हि ॥ २०२ ॥

अगणित सूर्य, चंद्र, शंकर, ब्रह्मदेव, पुष्कळ पर्वत, सरिता, सागर, पृथ्वी व अरण्ये तिला दिसली ॥ १ ॥ काल, गुण दोष, स्वभाव इत्यादी दिसले व जे कधी कानांवर सुद्धा आले नव्हते तेही पाहीले ॥ २ ॥ सर्व प्रकारे अती प्रबल अशी माया भयाने हात जोडून उभी असलेली पाहीली ॥ ३ ॥ ती ज्याला नाचविते तो जीव ( स्वत:चा ) पाहिला व त्याच जीवाला जी सोडविते - मुक्त करते ती भक्ती सुद्धा तिला दिसली. ॥ ४ ॥ ( हे सर्व पाहिल्यामुळे ) तिच्या अंगावर रोमांच उभे राहीले व तोंडातून शब्द निघेना, ( तेव्हा ) डोळे मिटले व पायांवर मस्तक ठेवले ॥ ५ ॥ मातेला फार खिन्न झालेली पाहून स्वारी पुन्हा शिशुरुप धरती झाली. ॥ ६ ॥ कौसल्येला स्तुती करता येईना व मी जगत्पित्यास पुत्र मानला असे वाटून तिला भीती वाटली ॥ ७ ॥ हरीने जननीची नाना परींनी समजूत घातली व म्हणाले की आई ! ही गोष्ट कोठेही कोणालाही सांगू नको हं ! ॥ ८ ॥ कौसल्या पुन:पुन्हा हात जोडते आहे आणि विनवित आहे की हे प्रभो ! आता तुझी माया मला कधीही लागू देऊ नको. ॥ दो० २०२ ॥

हरि करि विविध बालचरितांला । परमानंद दिला दासांला ॥
कांहिं काळ लोटत ते भ्राते । वाढति ही परिजन-सुखदाते ॥
जाउनि गुरु कृत चूडाकरणा । विप्र पुन्हां बहु लभति दक्षिणा ॥
परम मनोहर चरित अपार । करत फिरति चारिहि सुकुमार ॥
मन-तन-वचन अगोचर जो ही । दशरथ-अजिरिं फिरे प्रभु तोही ॥
बोलावति जेवत जैं राजा । त्यजुनि येत ना बाल समाजा ॥
कौसल्या बोलावुं जात जैं । ठुमुक् ठुमुक् प्रभु जाति पळत तैं ॥
निगम जेति शिव अंत न पावे । जननि हटें त्या धरण्या धावे ॥
धूलि धूसरित-तनु तैं आले । हसुनि अंकिं नृप घेते झाले ॥

दो० :- जेवत चंचल मन इथें तिथें सुसंधि बघून ॥
पळति हर्षरव करत मुखिं दहीभात लावून ॥ २०३ ॥

त्याप्रमाणे भगवंताने ( हरी-राम ) विविध प्रकारच्या बाललीला केल्या व दासांना ( भक्तांना - मातापित्यांना ) परमानंद दिला. ॥ १ ॥ असा काही काळ गेल्यावर ते चौघे बंधू परिजनांना सुख देण्याइतके मोठे झाले ॥ २ ॥ ( नंतर ) गुरु वसिष्ठांनी ( राजवाड्यात ) जाऊन चुडाकरण ( चौल संस्कार = शेंडी ठेवणे ) विधीमुळे विप्रांना पुन्हा भरपूर दक्षिणा मिळाली ॥ ३ ॥ परम मनोहर अशा अपार चरित्रलीला करीत ते चौघेही अति सुकुमार राजपुत्र हिंडू फिरु लागले ॥ ४ ॥ जो प्रभू तन, मन, वाणी यांना अगोचर आहे तो दशरथ राजाच्या अंगणात फिरत ( खेळत ) आहे. ॥ ५ ॥ दशरथ राजा जेवत असता जेव्हा रामास बोलवीत असे तेव्हा आपल्या बालसमाजाला सोडून प्रभू येण्यास तयार नसत. ॥ ६ ॥ मग कौसल्या बोलावण्यास गेली म्हणजे ठुमक् ठुमक् करीत प्रभू पळू लागत ॥ ७ ॥ ( याज्ञवल्क्य म्हणतात ) वेद ज्याचे नेति नेति म्हणून वर्णन करतात व शिवाला सुद्धा ज्याचा अंत लागत नाही, त्या प्रभूला धरण्यासाठी कौसल्या जननी हट्टाने धावत गेली ॥ ८ ॥ तेव्हा मग धुळीने अंग धूसर झालेले प्रभू आले; ( त्यास पाहून ) दशरथांस हसू आले व त्यांनी ( रामास ) मांडीवर घेतले ॥ ९ ॥ जेवत असता मन अगदी चंचल आहे, इकडे तिकडे बघून सुसंधी सापडताच ( आपल्या ) मुखाला दहीभात लावून हर्षाने ओरडत पळाले ॥ २०३ ॥

बालचरित अति सरल मनोहर । शेष गिरा श्रुति सुगीत शंकर ॥
यांत नव्हें ज्यांचें मनरंजन । केलें त्यांचें विधिनें वंचन ॥
यदा चारि ते कुमार बनती । गुरु पितरौ व्रतबंधा करती ॥
गत गुरुगृहिं रघुराव पढाया । अल्पकालिं विद्या सब आल्या ॥
श्वास सहज ज्याचा श्रुति चारी । हरि तो पढतो कौतुक भारी ॥
विद्या-विनय-निपुण गुण शीलां । रुचती खेळ सकल नृपलीला ॥
चापबाण करतलिं अति शोभति । देखत रूप चराचर मोहति ॥
ज्या पथिं विहरति भाऊ चवघे । थक्क होति नरनारी अवघे ॥

दो० :- कोसलपुरवासी नर नारि वृद्ध आबाल ॥
प्रिय सर्वां प्राणांहुनिहि वाटति राम कृपाल ॥ २०४ ॥

रामचंद्रांचे बालचरित अती सरळ ( साधे - सुधे ) व मनोहर असून ते शेष शारदा, श्रुती व शंकर यांनी चांगले गाईले आहे. ॥ १ ॥ ज्यांचे मन यात रमत नाही त्यांना दैवाने फसविले म्हणून समजावे ॥ २ ॥ ते चौघे जेव्हा कुमार झाले तेव्हा गुरु व मातापिता यांनी त्यांची मुंज केली ॥ ३ ॥ राम शिकण्यासाठी गुरुगृहीं गेले ( वसिष्ठाश्रमात ) व अल्पकाळातच त्यांना सर्व विद्या आल्या ॥ ४ ॥ ज्याचा सहज श्वास म्हणजे चारी वेद तो हरी वेदादिक पठण करतो ही एक लीला आहे. ॥ ५ ॥ विद्या, नम्रता, गुण व शील यांत निपुण झालेल्या त्या चौघांना राजांच्या लीलांचेच खेळ आवडू लागले ॥ ६ ॥ हातात धनुष्य - बाण अती शोभू लागले व ते रुप पाहून सर्व चराचर मोहीत होऊ लागले ॥ ७ ॥ ते चौघे भाऊ ज्या ज्या रस्त्यात विहार करीत जातात त्या त्या रस्त्यांतील सर्व नरनारी थक्क होतात. ॥ ८ ॥ अयोध्यापुरीत राहणारे पुरुष व स्त्रिया आबाल वृद्ध ( कोणीही असोत ) सर्वांना कृपाळु राम प्राणांपेक्षाही प्रिय वाटू लागले ॥ दो० २०४ ॥

घेति सवें मित्रा भावांला । जाति नित्य मृगयेस वनाला ॥
पावन मृग मारिति जिविं जाणुनि । नित्य दाखविति भूपा आणुनि ॥
राम शरानीं मृग जे वधले । तनू त्यजुनि सुरलोकीं वसले ॥
भोजन सानुज समित्र करती । ताताम्बा आज्ञां अनुसरती ॥
जेणें पुरजन सुखां पावती । असे कृपाकर योग आणती ॥
श्रुति पुराण ऐकति मन लावुनि । स्वयें कथिति अनुजा समजाउनि ॥
उषःकालिं रघुनायक उठती । माय पिता गुरूं यां शिर नमती ॥
आज्ञा घेति करिति पुरकाजा । बघुनि चरित हर्षित मनिं राजा ॥

दो० :- व्यापक अकल अनीह अज निर्गुण नाम न रूप ॥
भक्तांस्तव विविधा चरित अनुपम करत अमूप ॥ २०५ ॥

भावांना व मित्रांना बरोबर घेऊन (राम) शिकारीसाठी नित्य वनात जाऊं लागले ॥ १ ॥ मृग (पशू, शिकारीचे प्राणी) पावन आहेत असे मनात जाणून राम त्यांना मारीत असत. व नियमाने ते राजाला आणून दाखवीत ॥ २ ॥ रामचंद्रच्या बाणांनी जे मृग (वनपशू) मारले गेले ते देहत्याग करुन सुरलोकात जाऊन राहीले ॥ ३ ॥ भावांना व मित्रांना बरोबर घेऊन रामचंद्र भोजन करीत असत व आईबापांच्या आज्ञांचे पालन करीत असत. ॥ ४ ॥ जेणे पुरवासी लोक सुखी होतील अशा प्रकारचे सुयोग कृपासागर जुळवून आणूं लागले ॥ ५ ॥ वेद इतिहास पुराण इत्यादिंचे मन लावून श्रवण करतात व नंतर तेच भावांना समजावून सांगतात. ॥ ६ ॥ रघुनाथ पहाटेस उठून माता - पिता व गुरु यांना वंदन करतात. ॥ ७ ॥ राजांची आज्ञा घेऊन नगराची कामे असतील ती उरकतात असे हे सर्व चरित्र पाहून दशरथराजांना मनात फार हर्ष होऊं लागला ॥ ८ ॥ जे (ब्रह्म) व्यापक, पूर्ण (अकल, निरंश) निक्रिय (अनीह) जन्मादिरहित, निर्गुण, नामरहित, व रुपरहित आहे तेच भक्तांसाठी (मनुष्य बनून) नाना प्रकारचे अनुपम व अपार (अमाप) चरित्र करीत आहे. ॥ दो० २०५ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP