॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ३३ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

विधुवदनी सब सब मृगलोचनि । सब निज-तनु-छविं रतिमद मोचनि ॥
नेसुनिं वर्णवर्ण वर चीरां । सकल विभूषणिं सजुनि सरीरां ॥
मंगल सकल सु-अंगिं सुसाजति । कलकंठिंस कलगानिं लाजवति ॥
कंकण किंकिणि नूपूर वाजति । पाहुनि चाल काम-गज लाजति ॥
बाजें वाजति विविध बहुपरिं । मंगल आचारहि नभिं नगरीं ॥
शची शारदा रमा भवानी । सहज शुची सुरयुवती ज्ञानी ॥
कपटनारिवर वेषां धरती । जा‍उनि राणी वसां मिसळती ॥
मंगल गानां करती सुस्वरिं । सकल हर्षवश, कळे कुणा तरि ? ॥

छं० :- मुदमग्न न कळे, ब्रह्मवर ओवाळण्या त्या चालती ।
कलगान मधुरनिशाण, वर्षति सुमन सुर, शोभा अती ॥
आनंदकंद विलोकुनी वर सकल हृदयीं हर्षती ॥
अंभोज-अंबकिं अंबुभरती स्वंगिं पुलकावलि अती ॥ १ ॥
दो० :- जें सुख सीता-जननिला बघुनि राम-वर-वेष ॥
वदुं न शकति तें कल्पशतिं गिरा सहस्रहि शेष ॥ ३१८ ॥

(ओवाळण्यास जात असलेल्या त्या) सर्व स्त्रिया चंद्रमुखी असून सर्वांचे नेत्र हरिणीसारखे आहेत व आपल्या सौंदर्याने रतीचा मद जिरवविणार्‍या आहेत ॥ १ ॥ विविध वर्णाची उंची वस्त्रे नेसल्या असून सर्व प्रकारच्या अलंकार भूषणांनी त्यानी आपले देह शृंगारले आहेत. ॥ २ ॥ सर्व जणींनी सौभाग्यदायक सर्व मंगलसाजांनी आपले सुंदर देह उत्तम सजविले आहेत व आपल्या सुंदर गाण्याने त्या कोकिळास लाजवित आहेत ॥ ३ ॥ कंकणे किंकिणी व नूपूरे यांचा आवाज (चालताना) निघत असून चाल पाहून कामदेवाचे हत्ती सुद्धा लाजत आहेत ॥ ४ ॥ विविध वाद्ये विविध प्रकारांनी वाजत असून आकाशात व नगरात मंगल आचार होत आहेत ॥ ५ ॥ शची, शारदा, भवानी इत्यादी देववनिता ज्या सहज पवित्र व सहज शहाण्या आहेत त्या सुंदर नारींचे उत्तम रुप (वेष) घेऊन गेल्या व राणीवंशात मिसळल्या ॥ ६-७ ॥ व सुस्वराने मंगलगान करुं लागल्या पण राण्या वगैरे सर्व स्त्रिया आनंदात गर्क असल्याने यांना कोण व कशा ओळखणार ? ॥ ८ ॥ सगळ्या आनंदमग्न असल्याने कोणास कळू शकल्या नाहीत व त्या सर्व ब्रह्मवराला ओवाळण्यास जात आहेत मधुर मंगल गीते गात आहेत. मंगलवाद्यांचा मधुर मधुर घोष होत आहे; देव पुष्पवृष्टी करीत आहेत अशी ही अपार शोभा आहे. आनंदकंदवराला पाहताच सर्वांच्या हृदयात हर्ष झाला. कमळासारख्या नेत्रात अश्रुंना भरती आली व सुंदर अंगावर अतिशय रोमांच उभे राहीले. ॥ छं ॥ रामवराचा तो अप्रतिम वेष पाहून सीतेच्या आईला जे सुख झाले ते हजारो शारदा व हजारो शेष यांनाही शंभर कल्पांनी सुद्धा सांगता येणार नाही ॥ दो० ३१८ ॥

दाबि नयनजल मंगल जाणुनि । राणी औक्षण करि मनिं हर्षुनि ॥
वेद विधी सह कुल-आचारहि । सुविधिं सकल केले व्यवहारहि ॥
मंगल गीतें ध्वनि-रव-पंचक । पायघड्या पडल्या बहु रोचक ॥
करुनि आरती अर्घ्य अर्पिती । राम गगन मग मंडपिं करिती ॥
दशरथसहित समाज विराजति । विभव विलोकुनि लोकप लाजति ॥
समयिं समयिं सुर वर्षति फूलां । महिसुर पढति शांति अनुकूला ॥
नभिं मगरीं अति होइ गलबला । निज-पर-शब्द न जा‍इ परिसला ॥
राम मंडपीं असे प्रविशले । आसनिं, देउनि अर्घ्य बसविले ॥

छं० :- बसवूनि आसनिं करुनि आरति बघुनि वर सुख पावती ॥
नारी सुमंगल गाति भूषण वसन मणि ओवाळती ॥
ब्रह्मादि सुरवर विप्रवेषीं परम कौतुक देखती ।
पाहोनि रघु-कुल-कमल-छवि सुफल जीवन लेखती ॥ १ ॥
दो० :- न्हावी बारी भाट नर नट राम-उतारे घेति ॥
हर्ष हृदिं न मावे, शिर नमुनी आशिस देति ॥ ३१९ ॥

मंगल समय आहे हे जाणून राणीने डोळ्यात येऊ पाहणारे अश्रू दाबून टाकले व मनात हर्षित होऊन वराला औक्षण करु लागली ॥ १ ॥ वेद विधी सहित सर्व कुलाचारादि व्यवहार राणीने उत्तम प्रकारे उरकले ॥ २ ॥ पाच ध्वनी (वेद-बंदी-जय-शंख व हुलहुली ध्वनी) व पंचरव (वीणा-ताल-झांजा-नगारा-तुतारी यांचे पंचशब्द) होत आहेत. स्त्रिया मंगल गीते गात आहेत व नाना प्रकारच्या सुंदर पायघड्या पडत आहेत. ॥ ३ ॥ मग राणीने आरती ओवाळून अर्घ्य अर्पण केला व मग रामचंद्रानी लग्नमंडपाकडे गमन केले ॥ ४ ॥ दशरथ आपल्या समाजासह राजद्वाराशी विराजमान झाले. विशेष शोभू लागले त्यांचे वैभव पाहून लोकपाल सुद्धा लाजले ॥ ५ ॥ देव वेळोवेळी पुष्पवृष्टी करु लागले व ब्राम्हण समयानुकूल शांतीपाठ म्हणू लागले ॥ ६ ॥ आकाशात व नगरात इतका गलबला होत आहे की आपला किंवा दुसर्‍याचा शब्द ऐकू येत नाही ॥ ७ ॥ या प्रमाणे रामचंद्र मंडपात आले तेव्हा त्यांना अर्घ्य देऊन आसनावर बसविले ॥ ८ ॥ आसनावर बसवून व आरती करुन त्या वराकडे पाहील्याने राणी वगैरे सर्व स्त्रियांना परम सुख लाभले त्या उत्तम मंगलगीते म्हणू लागल्या व विविध भूषणे, वस्त्रे, धन, रत्‍ने वगैरे पदार्थ रामावरून उतरुन (ओवाळून) देऊन टाकले. ब्रह्मादि देव श्रेष्ठ विप्रवेष घेऊन हे परम कौतुक बघत आहेत. रघुकुल कमल रवीचे सौंदर्य पाहून आपले जीवन सुफल झाले असे त्यास वाटले ॥ छंद ॥ न्हावी, बारी, भाट, नट इत्यादिकांनी ते रामावरुन ओवाळलेले पदार्थ घेतले. त्यांच्या हृदयात हर्ष मावेनासा होऊन नमस्कार करुन आशीर्वाद दिले. ॥ दो० ३१९ ॥

तदा जनक दशरथ सुप्रीतीं । भेटति करुन वेद-जन-रीती ॥
भेटत युग नृप महा विराजति । उपमा अति धुंडुनि कवि लाजति ॥
मिळे कुठें न, हार मनिं मानिति । यांसम हे उपमा उरिं आणिति ॥
पाहुनि भेट देव अनुरागति । वर्षुनि सुमन गाउं यश लागति ॥
जैंहुनि विरंचिनें जगिं सृजलें । बहु परिणय पाहिले परिसले ॥
सर्व-परीं सम साज समाजीं । व्याही सम दिसले परि आजीं ॥
रुचिर सत्य सुर-गिरा परिसली । प्रीति अलौकिक युगदिशिं भरली ॥
पायघड्या शुभ अर्घ्यहि घालित । जनक आदरें मंडपिं आणित ॥

छं० :- मंडप बघोनि विचित्र रचना रुचिरता नुमि-मन हरी ॥
सिंहासनें दे, जनक सकलां सुज्ञ आणुनि निज करीं ॥
कुलदेव-सदृश वसिष्ठ पूजुनि विनविलें; आशीस दे ।
सुप्रीतिं पूजिति कौशिका ती रीति कवि देवीं वदे ॥ १ ॥
दो० :- वामदेव आदिक ऋषी पूजिति मुदित महीश ॥
दिव्यासनं सकलां दिलीं देति सकल आशीस ॥ ३२० ॥

(दशरथ राजद्वाराजवळ आले) तेव्हा जनक व दशरथ हे दोघे वेदविधी व लोकरीती उरकून एकमेकांना अती प्रीतीने भेटले ॥ १ ॥ हे दोन महाराजे परस्परांना भेटताना इतके शोभायमान झाले की त्यांना देण्यासाठी उपमा धुंडून धुंडून कवी लज्जित झाले ॥ २ ॥ कुठेही उपमा सापडली नाही (तेव्हा) मनात हार मानून यांच्या सारखे हेच अशी उपमा मनात आणली ॥ ३ ॥ ही व्याहीभेट पाहून देव त्यांच्यावर अनुरक्त झाले व पुष्पवृष्टी करुन त्यांचे यश गावू लागले ॥ ४ ॥ विरंचीने या जगात आम्हाला निर्माण केल्यापासून पुष्कळ विवाह पाहीले व ऐकले (पण) ॥ ५ ॥ सर्व प्रकारे साज व समाज सारखे असलेले व स्वत: समान असलेले व्याही आम्ही आज पाहीले ॥ ६ ॥ ही देवाची सत्य व सुंदर वाणी ऐकली व दोन्हीकडील समाजात अलौकिक प्रीती पसरली ॥ ७ ॥ सुंदर पायघड्या घालीत व अर्घ्य देत जनकानी दशरथांना मंडपात आणले ॥ ८ ॥ मंडप पाहिल्याबरोबर त्याचे विचित्र रचनेच्या सौंदर्याने मुनींचे मन हरण केले. सगळ्या मुनींना आपल्या हाताने आणून अनुक्रमे त्यांना बसण्यास सिंहासने दिली. कुलदेवा प्रमाणे वसिष्ठांची पूजा केली व त्याची प्रार्थना केली त्यांनी आशीर्वाद दिला. नंतर अति प्रीतीने कौशिकांची पूजा केली ती प्रीतीची रीत कवीला कशी वर्णन करता येईल ? ॥ छंद ॥ मग जनकांने वामदेव आदि करुन ऋषींची पूजा केली सगळ्यांना दिव्य आसने दिली व त्या सर्वांनी आशीर्वाद दिले ॥ दो० ३२० ॥

मग केली कोसलपति पूजा । गणुनि ईशसम भाव न दूजा ॥
स्तुती प्रार्थना कृत कर जोडुनि । भाग्य-विभव-वृद्धी निज वानुनि ॥
पूजिति भूपति सर्व वर्‍हाडा । व्याह्यांसम आदर अति जाडा ॥
उचित आसनें दिधलीं सर्वां एकमुखें वदवे न उत्सवा ॥
सर्व वर्‍हाड जनक सन्मानी । दान-मान विनती-वरवाणीं ॥
विधि-हरिहर दिनराज दिशापति । जे रघुवीर-प्रभाव जाणति ॥
कपट-विप्रवर-वेषां धरुनी । अति सुख पावति कौतुक बघुनी ॥
करिति जनक देवासम पूजन । ओळखिल्याविण देत शुभासन ॥

छं० :- जाणेल कोणा कोण ओळखि राहि ना निज शुद्ध हि ।
आनंद-कंद बघून वर आनंदमय उभ लोकही ॥
सुर कळति रामा सुज्ञ पूजुनि मानसिक दे आसनां ॥
प्रभुच्या सुभावा बघुनि शीला मोद अति विबुधां मनां ॥ १ ॥
दो० :- रामचंद्र मुखचंद्रछवि लोचन चारु चकोर ॥
करिति पान सादर सकल प्रेममोद अति थोर ॥ ३२१ ॥

मग दुसरा कोणताही (ममत्व) भाव मनात न आणत शंकरांसारखे जाणून जनकांनी कोसलपती दशरथांची पूजा केली ॥ १ ॥ हात जोडून स्तुती व प्रार्थना करुन आपल्या भाग्याच्या व वैभवाच्या वृद्धीचे वर्णन केले (आपल्या संबधाने माझे भाग्य उदयास आले व वैभव वाढले) ॥ २ ॥ नंतर सर्व वर्‍हाडाची पूजा राजाने केली ती सुद्धा व्याह्यांसारख्याच अति दृढ आदराने केली ॥ ३ ॥ सर्वांना त्यांच्या त्यांच्या योग्यते प्रमाणे आसने दिली एका मुखाने या उत्सवाचे वर्णन कसे करणे शक्य आहे ? ॥ ४ ॥ जनकराजाने दान - मान विनंती व सुंदर वचनांनी सर्व वर्‍हाडाचा सन्मान केला ॥ ५ ॥ ब्रह्मदेव, विष्णु, शंकर सूर्य व दिक्पाल इत्यादी जे कोणी रघुवीराचा प्रभाव जाणणारे देव होते ते मायेने श्रेष्ठ विप्रांचा सुंदर वेष घेऊन (हे सर्व) कौतुक पाहून अत्यंत सुखी झाले ॥ ६-७ ॥ जनकांनी त्यांचे देवाप्रमाणे पूजन केले व न ओळखताही त्यांना सुंदर आसने दिली ॥ ८ ॥ जिथे स्वत:चीच शुद्ध कोणास राहीली नाही तेथे कोण कोणाला ओळखणार व कसे ? (कारण की) आनंद जलाची वृद्धी करणारा वर पाहून दोन्ही बाजूकडील लोक आनंदमय झाले आहेत. रामचंद्रांनी देवांना ओळखले व मानसिक अर्घ्य देऊन मानसिक आसने त्यांस दिली. प्रभूचा स्वभाव व शील पाहून देवांच्या मनास पुष्कळ आनंद झाला. ॥ छंद ॥ रामचंद्रांच्या मुखचंद्राच्या छबीचे, सर्वांचे सुंदर नेत्र रुपी चकोर आदराने पान करीत आहेत व प्रेम व मोद फार झाला आहे ॥ दो० ३२१ ॥

समय विलोकुनि वसिष्ठ बाहति । सादर शतानंद तैं ठाकति ॥
आणा लौकर कुमारिस अतां । जाति मुदित मुनि आज्ञा मिळतां ॥
राणी श्रवुनि पुरोहित-वाणी । प्रमुदित सखींसमेत शहाणी ॥
विप्रवधू कुलवृद्धा आणुनि । गाति सुमंगल कुलविधि सारुनि ॥
स्त्री वेषीं ज्या सुरवर-वामा । सहज सुंदरी सगळया श्यामा ॥
त्यां देखुनि सुख पावति नारी । प्राणप्रिय परिचयविण भारी ॥
पुनः पुन्हां राणी सन्मानी । सम शारदा रमोमा मानी ॥
सीते सजवुनि समाज सजुनी । मुदित मंडपा निघति घेऊनी ॥

छं० :- सखि घेति सीते निघति सादर सजुनि मंगल भामिनी ॥
नव सप्त सजुनी सुंदरी सब मत्त-कुंजर-गामिनी ॥
गाना श्रवुनि मुनि ध्यान तजिती काम-कोकिल लाजती ॥
मंजीर नूपुर कलित कंकण तालगतिं वर वाजती ॥ १ ॥
दो० :- सहज चारु सीते खुले वनितावृंदिं तदीय ॥
छविललनागण-मध्य जणुं सुषमा स्त्री कमनीय ॥ ३२२ ॥

कार्याची वेळ जवळ आली असे जाणून वसिष्ठांनी शतानंदास बोलावले तेव्हा ते आदराने जवळ येऊन उभे राहीले ॥ १ ॥ वसिष्ठांनी त्यांस सांगितले की आता कुमारीला लवकर आणा. ही मुनींची आज्ञा मिळताच शतानंद आनंदाने गेले ॥ २ ॥ पुरोहितांचे म्हणणे ऐकून सूज्ञ राणीला आपल्या सखींसहित आनंद झाला. ॥ ३ ॥ ब्राम्हणांच्या स्त्रिया व आपल्या कुळातील वृद्ध स्त्रियांना बोलावून मंगलगीते गात गात सर्व कुलरीती पूर्ण केल्या ॥ ४ ॥ स्त्रीवेषात असलेल्या सुरश्रेष्ठांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या सर्व सहज सुंदर व श्यामा (षोडशवर्षीय) आहेत ॥ ५ ॥ त्यांना पाहून सर्व स्त्रियांना सुख झाले व परिचय नसताही त्या सर्वांना अति प्राणप्रिय वाटू लागल्या ॥ ६ ॥ राणीने शारदा, रमा, उमा यांच्यासारख्या मानून त्यांचा पुन:पुन्हा सन्मान केला ॥ ७ ॥ सीतेला सजवून व आपल्या सर्व समाजाची तयारी करुन आनंदाने सीतेला घेऊन मंडपाकडे निघाल्या ॥ ८ ॥ सखी आणि भामिनी यांनी सर्व मंगल वस्तू सजवून सीतेला सादर बरोबर घेतली व (मंडपाकडे) निघाल्या त्या सर्व स्त्रिया सुंदर व मत्तगजा सारखी चाल असलेल्या सोळाही अंगांनि अलंकृत केलेल्या आहेत त्यांचे मंगल गीतगान ऐकताच मुनी ध्यान सोडतात व कामदेवाच्या कोकिळा लाजेने मान खाली घालतात कटि मेखला, सुंदर पैंजणे व सुंदर कंकणे तालाच्या गतीवर मधुर वाजत आहेत ॥ छंद ॥ सहज सुंदर असलेली सीता आपल्या सखी व इतर वनिता समूहात अशी खुलत आहे की छबीरुपी ललनांच्या समूहात जणूं काय कमनीय परम शोभा रुपी स्त्रीच शोभत आहे ॥ दो० ३२२ ॥

सीता-शोभा अवर्णनीया । फार मनोहरता लघु धी या ॥
येतां बघुनि वर्‍हाडी सीते । रूपराशी सबपरीं पुनीते ॥
सर्व मनोमनिं करिती प्रणमन । निरखुन रामा पूर्णकाम जन ॥
दशरथ तनयां-समेत हर्षित । वदवे ना किति हृदिं आनंदित ॥
प्रणमुनि निर्जर वर्षति फूल । मुनि-आशीर्ध्वनि मंगलमूल ॥
गान भेरि कोलाहल भारी । प्रेमाऽऽमोदिं मग्न नर नारी ॥
आली अशि मंडपिं सीता ती । प्रमुदित मुनिवर पढती शान्ती ॥
समयोचित विधिनां व्यवहारां । कुल-गुरु युगल करिति आचारा ॥

छं :- आचार कृत; गुरु गौरि गणपति मुदित विप्रां पुजवती ॥
सुर घेति पूजा प्रगट देति अशीस अति सुख पावती ॥
मंगल वस्तु जी जे समयिं मुनि मनिं वांछती ॥
तैं कनक भाजन कलशभर करिं धरुनि सेवक तिष्ठती ॥ १ ॥
कुलरीति रवि सप्रीति सांगत आदरें संपादिलें ॥
पुजवून देवां एविं, सीते सुभग सिंहासन दिलें ॥
अन्योन्य सीता राम बघती, प्रेम नेणति तें कुणी ॥
मनबुद्धि-वरवाणी-अगोचर कवि वदे कसं वर्णुनी ॥ २ ॥
दो० :- होमिं अग्नि मूर्तचि मुदा अति आहुति घेतात ॥
विप्रवेषधर वेद सब विधि विवाहिं वदतात ॥ ३२३ ॥

सीतेची सुंदरता अवर्णनीय आहे मनोहरता फार असून याला कवीची बुद्धी तर तुच्छ आहे. ॥ १ ॥ रुपराशी व सर्व प्रकारे पुनीत असलेल्या सीतेला वर्‍हाडांनी पाहीली ॥ २ ॥ तेव्हा त्यांनी सर्वांनी तिला मनातल्या मनात नमस्कार केला व रामचंद्रांकडे निरखून पाहून सर्व पूर्ण काम झाले ॥ ३ ॥ भरतादि पुत्रांसहित दशरथांना हर्ष झाला. त्यांच्या हृदयात किती आनंद झाला ते सांगणे अशक्य आहे. ॥ ४ ॥ देवांनी प्रणाम करुन पुष्पवर्षाव करण्यास प्रारंभ केला व मुनींच्या मंगलमूल अशा आशीर्वादाचा ध्वनी होऊ लागला ॥ ५ ॥ मंगलगीतांचे गायन व नगारे वगैरे मंगल वाद्यांचे वादन यामुळे खूप कोलाहल झाला, स्त्रिया व पुरुष प्रेम व आमोद यात मग्न आहेत ॥ ६ ॥ अशा प्रकारे सीता मंडपात आली व मुनीश्रेष्ठ प्रमुदित होऊन शांतीपाठ म्हणू लागले ॥ ७ ॥ यावेळेस जे वेदविधी व व्यवहार (लौकिक व कुलरीती) करावयाच्या असतात ते सर्व दोन्हीकडील कुलगुरुंनी यथासांग पार पाडले ॥ ८ ॥ आचार करुन गुरुंनी (वधुवरांकडून) गौरी, गणपती व विप्र यांची पूजा करविली (तेव्हा) देवांनी प्रगट होऊन पूजा घेऊन आशीर्वाद दिले व देव अत्यंत सुखी झाले मधुपर्क वगैरे ज्या ज्या मंगल द्रव्यांची ज्या ज्या वेळी मुनींच्या मनात इच्छा होते त्या त्या वेळी ते ते द्रव्य सुवर्णाच्या तबकात अथवा सोन्याच्या कलशात हातात घेऊन सेवक उभेच आहेत. ॥ छंद १ ॥ रवीने प्रीतीने सर्व कुलरीतीरिवाज सांगितले व ते सर्व प्रीतीने केले गेले यांप्रमाणे देवाचे पूजन करवून सीतेला बसण्यास दिव्य सिंहासन दिले, मग सीता व राम यांनी परस्परांचे अवलोकन केले. त्यावेळचे त्यांचे ते प्रेम कोणासच कळले नाही (कारण) ते श्रेष्ठ मन, बुद्धी व वाणी यांना अगोचर आहे (तेव्हा) कवी ते कसे वर्णन करुन सांगणार ? ॥ छं २ ॥ होमाच्या वेळी अग्नी प्रत्यक्ष प्रगट होऊन अति आनंदाने आहुती घेत आहेत व जो विवाहविधी आहे तो सर्व वेद विप्रवेष धारण करून सांगत आहेत. ॥ दो० ३२३ ॥

जनक-पट्टराणी जग-विदिता । सीता-माता ये किं वर्णितां ? ॥
सुयश सुकृत सुख सब सुंदरता । संकुलुनी विधि होइ विरचिता ॥
समय बघुनि मुनिवर बोलावति । तदा सुवासिनि सादर आणति ॥
जनम-वामदिशिं खुले सुनयना । शोभे हिमगिरिसह जशि मयना ॥
कांचन कलश सुरत्‍न-परातिंत । शुचि सुगंधि मंगल-जल-पूरित ॥
आणुनि मोदें राजाराणी । ठेविति रामापुढें करांनीं ॥
पढति वेद मुनि मंगलवाणीं गगनिं सुमन-झड समय जाणुनी ॥
वर निरखुनि दंपति अनुरागति । पूत पदां प्रक्षाळूं लागति ॥

छं० :- प्रक्षालती पद-पंकजां प्रेमें वपू पुलकावती ॥
नभिं नगरिं गान-निशाण-जयरवपूर दशदिशिं चालती ॥
जे पद-सरोज मनोज-अरि-उर-सरिं सदैव विराजती ॥
जे स्मरत सकृत हि विमलता मनिं सकल कलिमल पांगती ॥ १ ॥
जे स्पर्शतां मुनि-नारि लाभे सद्‌गती जरि अघवती ॥
मकरंद ज्यांचा शंभुशिरिं शुचितावधी सुर वर्णती ॥
कृत-मधुपमन मुनि योगिजन गतिभजुनि अभिमत पावती ॥
ते क्षालिती पद भाग्य-भाजन जनक, जन जय बोलती ॥ २ ॥
वर कुमरिं-करतल जुळुनि शाखोच्चार कृत कुल-गुरुवरीं ॥
पाहून पाणिग्रहण विधि-सुर-मनुज-मुनि मुद-भरीं ॥
सुखमूल वर पाहून पुलकति दंपती मन मुद-भरीं ॥
युत लोक-वेद-विधान कन्यादान नृपभूषण करी ॥ ३ ॥
हिमवंत दे गिरिजा महेशा सिंधु हरिला श्री जशी ॥
रामा समर्पिति जनक सीता कीर्ति कल नव जगिं तशी ॥
कशि करिति विनति विदेह कृत हि विदेह छविनें श्यामला ॥
कृत होम विधिवत गाठ मारुनि सप्तपदि-विधि चालला ॥ ४ ॥
दो० :- वेदघोष, जय-बंदिं-रव मंगल-गान निशाण ॥
श्रवुनि विबुध वर्षति हर्षिं सुरतरु-सुमन सुजाण ॥ ३२४ ॥

जनकराजाची जगविख्यात पट्टराणी जी सीतेची माता, तिचे वर्णन कसे करता येणार ? ॥ १ ॥ सुयश, सर्व सुकृत, सर्व सुख व सर्व सौंदर्य यांना एकत्र करुनच विधीने तिची विशेष रचना केली आहे ॥ २ ॥ या (कन्यादानाची) वेळ होत आली असे जाणून मुनीवरांनी तिला बोलावली, तेव्हा सुवासिनी तिला आदराने घेऊन आल्या ॥ ३ ॥ हिमगिरीच्या जवळ त्याची पट्टराणी मैना जशी शोभावी तशी सुनयना जनकाच्या डाव्या बाजूस शोभत आहे ॥ ४ ॥ सुंदर रत्नजडित परातीत निर्मल सुगMधी व मांगलिक जलाने भरलेले सोन्याचे कलश (ठेऊन) ॥ ५ ॥ राजाराणींनी त्या पराती आपल्या हातांनी उचलून आणून रामचंद्रापुढे ठेवल्या ॥ ६ ॥ मुनी मंगलवाणीने वेद घोष करु लागले व (कन्यादानाचा) समय जाणून देवानी आकाशातून पुष्पवृष्टीची झड लावली ॥ ७ ॥ वराला निरखून पाहताच दांपत्य प्रेमविह्वल झाले व पावन पायांचे प्रक्षालनास प्रारंभ केला ॥ ८ ॥ दंपती रामचरण कमलास धुऊं लागताच प्रेमाने त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहीले आकाशात व नगरात मंगल गान, नगारे, व जयजयकार यांच्या ध्वनीचे पूर दाही दिशांस आले कामदेवाच्या शत्रूच्या (=शंकर) हृदयरुपी मानस सरोवरात जी पदकमले सदा सर्वदा विराजमान झाली आहेत व ज्यांचे एकदाच स्मरण केल्याने सुद्धा मनाला विमलता येते व सर्व कलिमलांची पांगापांग होते ॥ छंद १ ॥ ज्या पायांचा स्पर्श झाल्याने पापी मुनीपत्‍नीला सदगती मिळाली, ज्या चरणकमलांचा मकरंद शंकर आपल्या शिरावर धारण करतात व जो पवित्रतेची परमावधि आहे असे देव वर्णन करतात, मुनी व योगी लोक आपल्या मनाला मधुप करुन त्यांच्याही सेवनाने उत्तम गती प्राप्त करतात ते चरण महाभाग्यवान जनक प्रक्षालित आहेत व सर्व लोक जयजयकार करीत आहेत. ॥ छं २ ॥ वर व कन्या यांच्या ओंजळी एकावर एक ठेऊन कुलगुरुंनी शाखोच्चार केला पाणिग्रहण विधी झालेला पाहून ब्रह्मदेव, इतर देव, मानव व मुनी आनंद - सागरात पोहू लागले सर्व सुखाचे मूळ अशा वराला पाहून राजा राणी पुलकित झाली व हृदयात आनंदाला भर आला (याप्रमाणे) लोक व वेद विधानाप्रमाणे नृपभूषणाने कन्यादान केले ॥ छं ३ ॥ हिमवंताने जशी गिरीजा महेशांना दिली, व सिंधूने जशी लक्ष्मी हरिला दिली तशी जनकांनी सीता रामास समर्पण केली व विश्वात नवीन-अपूर्व कीर्ती पसरली. विदेह राजा (जावयांची) प्रार्थना कशी करणार ? या श्यामल रुपाने तर त्यांना विदेहच करुन टाकले ! (मग) यथाविधी विवाह - होम करुन, गाठी मारल्यावर सप्तपदी - विधी सुरु झाला. ॥ छं. ४ ॥ वेदघोष, जयजयकाराचा आवाज, भाटांच्या ललकार्‍या, मंगलगीत - गान, व नगार्‍यांचा आवाज ऐकून सुजाण देवांनी हर्षाने कल्पवृक्षाच्या फुलांची वृष्टी केली ॥ दो० ३२४ ॥

करिति सप्तपदी कुमर-कुमरिवर । लोचन-लाभ लुटति जन सादर ॥
वर्णुं न येइ मनोहर जोडी । जी उपमा द्यावी ती थोडी ॥
रुचिर राम-सीता-पडछाया । मणिखांबीं लागति चमकाया ॥
जणुं बहुरूप मदन रति धरती । अनुपम राम-विवाहा बघती ॥
दर्शन-लालुच लाज नाल्प, तीं- । प्रगटति पुन्हां पुन्हां परि लपती ॥
मग्न लोक बघणारे सगळे । जनकासम तनुभान निज गळे ॥
प्रमुदित मुनी सप्तपदि करविति । अहेरादि सब रीती उरकिति ॥
भरिति राम सीता-शिरिं शेंदुर । शोभा वर्णुं न जरा धजे उर ॥
जलज भरुनि वर अरुण परागां भूषवि शशिला सुधा सुरागा ॥
मग विसिष्ठ देतां अनुशासन । भूषविती वरवधू एकासन ॥

छं० :- बसलीं वरासनिं रामजानकि मुदितमन दशरथ अती ॥
तनुपुलक किति निज सुकृत सुरतरुं बघुनि फल नव लागती ॥
उत्साह भरला भुवनिं झाला म्हणति राम विवाह हा ॥
तो वर्णुनी कीं सरत रसना एक हें मंगल महा ॥ १ ॥
मग जनक मिळत वसिष्ठ शासन लग्नसाजां सजवुनी ॥
घे मांडवी श्रुतकीर्ति उर्मीला मुली बोलावुनी ॥
कुशकेतु-कन्या प्रथम जी गुणशील-सुख शोभाथिली ॥
सप्रीति सर्वहि रीति करुनी नृपतिनें भरता दिली ॥ २ ॥
जानकी-लघु भगिनी सकल-सुंदरिशिरोमणि जाणुनी ॥
जनकें दिली ती लक्ष्मणा विधि सर्व करुनि विवाहुनी ॥
श्रुतकीर्ति नामें जी सुलोचनि सुमुखि सर्व-गुणागरी ॥
रिपुसूदना ती देइ भूपति रूप-शील-सुभास्वरीी ॥ ३ ॥
अनुरूप वर नववधु परस्पर बघुनि लाजति हर्षती ॥
सौंदर्य मोदें स्तविति सर्वहि सुमन सुरगण वर्षती ॥
सब सुंदरी सुंदर वरांसह एक-मंडपिं राजती ॥
जणुं जीव‍उरिं चारी अवस्था सह विभू विभ्राजती ॥ ४ ॥
सो० :- मुदित अयोध्याधिप बघुनि वधुंसहित तनयांस ॥
जणुं लाभति भूपाल मणि सक्रिय चार फळांस ॥ ३२५ ॥

सुंदर कुमार व कुमारी सप्तपदी करीत आहेत व सर्व लोक आनंदाने आदराने लोचनांचा लाभ लुटीत आहेत ॥ १ ॥ या मनोहर जोडीचे वर्णन करता येणे शक्य नाही; कारण जी जी उपमा द्यावी ती कमीच पडते ॥ २ ॥ सुंदर राम व सीता यांच्या पडछाया रत्नजडित खांबात झगमग करीत चमकत आहेत. ॥ ३ ॥ (तेव्हा असे वाटते की) जणू काय मदन व रती यांनी अनेक रुपे घेतली आहेत व अनुपम राम विवाह बघत आहेत. ॥ ४ ॥ (मदन व रती यांना) राम सीता दर्शनाची लालूच तर फार आहे, पण लाजही फार वाटते (त्यामुळे) एकदा प्रगट होतात व लपतात व पुन्हा प्रगट होतात, लपतात (असे सारखे चालू आहे) ॥ ५ ॥ हा सप्तपदी विधी पाहणारे सारे लोक (आनंदात व प्रेमात) मग्न होऊन जनकाप्रमाणेच त्यांचेही देहभान गळून गेले आहे. ॥ ६ ॥ मुनीनी सप्तपदी विधी पूर्ण करविला व आहेर व ज्यांचे जे मान हक्क असतील ते देणे वगैरे सर्व रीती उरकल्या ॥ ७ ॥ रामचंद्र सीतेच्या भांगात शेंदूर भरत आहेत या वेळची शोभा जरा सुद्धा वर्णन करण्यास हृदय धजत नाही ॥८ ॥ जणू काय कमलाने लाल पराग उत्तम प्रकारे भरुन घेऊन ते अमृताच्या अत्यंत आसक्तीने (लोभाने) चंद्रास भूषित करीत आहे ॥ ९ ॥ नंतर वसिष्ठांनी आज्ञा दिल्यानंतर वर व वधू यांनी एकच सिहासन भूषित केले ॥ १० ॥ श्रीराम व जानकी सिंहासनावर बसली ते पाहून दशरथाचे मन मुदित झाले, शरीरावर वारंवार रोमांच उभे राहीले, आपला सुकृतरुपी कल्पवृक्ष अपूर्व फळांची वृष्टी करीत आहे असे त्यास दिसले सर्व भुवनात उत्साह भरला व जो तो म्हणू लागला की हा रामविवाह झाला ! या विवाहोत्सवाचे वर्णन किती जरी केले तरी ते सरणार नाही, कारण रसना एकच व हे मंगल कार्य फार मोठे आहे ! ॥ छं १ ॥ (राम विवाह झाला असे सर्वांनी म्हटल्यावर) मग वसिष्ठ ऋषींची आज्ञा मिळताच जनकाने विवाहाची सर्व तयारी करुन मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला या मुलीना बोलावून घेतल्या मग कुशकेतू (कुशध्वज) राजाची पहिली मोठी मुलगी गुण, शील सुख व शोभा संपन्न असलेली प्रीतीने सर्व रीती रिवाज करुन भरताला दिली ॥ छ २ ॥ जानकीची धाकटी बहिण सकल सुंदरी शिरोमणी आहे असे जाणून जनकाने सर्व विवाहविधी करुन ती (उर्मिला) लक्ष्मणास दिली. जिचे नांव श्रुतकीर्ती असून जी सुंदर नेत्र व सुंदर मुखाची, व सर्व गुणांचे आगर आहे व जी रुपशील व अति तेज यांनी संपन्न आहे ती भूपतीने रिपुसुदन = शत्रुघ्नास दिली ॥ छं ३ ॥ चारी वर व चारी नववधू अनुरुप असून एकमेकांस पाहून लाजत आहेत (पण) मनात हर्षित होत आहेत. ते सौंदर्य पाहून सर्व लोक प्रशंसा करीत आहेत. व देवसमाज पुष्पवृष्टी करीत आहे चारी सुंदरी सुंदर वरांसह एकाच मंडपात अशा शोभत आहेत की जणूं चारी अवस्था चारी विभूंसह जीवाच्या हृदयात शोभायमान झाल्या आहेत ॥ छं ४ ॥ ॥ ३२५ ॥ वधूंसहीत पुत्रास पाहून अयोध्याधिपति असे आनंदित झाले की जणूं काय भूप शिरोमणीला क्रियासहित चारी फळे प्राप्त झाली. (शत्रुघ्न-अर्थ-श्रुतकीर्ती-वार्ता, व्यवहार, भरत-धर्म-मांडवी-श्रद्धायुक्त त्रयी विद्या, लक्ष्मण-काम-उर्मीला-राजनीती (त्याग), रामचंद्र-मोक्ष-सीता-योगाक्रिया, चित्शक्ती. राम - मोक्ष हे फळ व योगक्रियाची शक्ती ही क्रिया या पद्धतीने इतरांचे ग्रहण करावे)

विधि रघुवीर-विवाहीं जेवीं । केले सकल मुलांच्या तेवीं ॥
वदणें केविं देज अति अर्पित । मंडप मणि-कांचनीं प्रपूरित ॥
सुती - रेशमी - ऊर्णा - वसनें । नाना-विध बहु मोल न गणणें ॥
गज तुरंग रथ सुदास दासी । धेनु अलंकृत कामदुधांसी ॥
वस्तु अमित कशि गणना करवे । जाणति जिहिं पाहिलें, न वदवे ॥
लोकपाल पाहुनि हापापति । घेति अयोध्यापति सुख मानति ॥
दिलें याचकां जें ज्यां रुचलें । जानोशीं आलें जें उरलें ॥
वदुनि जनक मृदु जुळुनि करांनां । वर्‍हाड्यांस देती सन्माना ॥

छं० :- सन्मानुनी सर्वांस आदर दान महती-विनतिनें ॥
प्रमुदित महामुनि-वृंद वंदित पूजुनी सुप्रीतिनें ॥
शिर नमुनि विनवुनि सकल देवां म्हणति कीं बद्धांजली ॥
सुर साधु इच्छिति भाव सिंधु किं तुष्ट देत जलांजली ॥ १ ॥
मग जनक अनुजासहित कोसलनृपतिनां कर जोडती ॥
सुस्नेहशीलसुभावभरलें वच मनोहर बोलती ॥
संबंधिं राजन् आपले अम्हिं आज महती लाहलों ॥
या राज्य-विभवा सहित सेवक फुकट जाणा जाहलों ॥ २ ॥
या दारिका परिचारिका करुनी सु-करुणें पाळणें ॥
बोलाविलें ही धृष्टता, अपराध पोटीं घालणें ॥
सन्माननिधि केले तदा व्याह्यास रघुकुल भूषणें ॥
सुप्रेम पूरित ती परस्पर-विनति कशि वाखाणणें ॥ ३ ॥
वृंदारकहि बहु सुमन वर्षति राव वासा चालले ॥
जयदुंदुभी ध्वनि वेदरव; नभिं नगरिं कौतूहल भलें ॥
मग सखी मंगल गान करिंत मुनीश-आज्ञा पावुनी ॥
गौरीहराप्रतिं जातिं सुंदरि वर-वधूंना घेउनी ॥ ४ ॥
दो० :- सिता बघे राम किती लाजे, परिं न मनांत ॥
हरतिं मनोहर मीन-छविं चक्षू प्रेम-तृषार्त ॥ ३२६ ॥

रघुवीर विवाहात जे जे विधि जसे केले ते ते सर्व तसेच सर्व पुत्रांच्या विवाहात केले ॥ १ ॥ जे अत्यंत अपार आंदण दिले ते कसे वर्णिता येणार ! सर्व मंडप सोने व रत्ने यांनी भरुन गेला ॥ २ ॥ सुती, रेशमी, व लोकरीची नाना प्रकारची पुष्कळ व बहुमोल वस्त्रे दिली त्यांची गणना करवत नाही ॥ ३ ॥ हत्ती, घोडे, रथ, उत्तम दास-दासी व अलंकृत केलेल्या कामधेनुंच्या सारख्या सवत्स गाई ॥ ४ ॥ व अनेक प्रकारच्या असंख्य वस्तु दिल्या ज्यांनी पाहीले ते जाणूं शकतात (पण) त्यांना सुद्धा वर्णन करता येत नाही ॥ ५ ॥ ते सर्व आंदण पाहून लोकपाल सुद्धा हापापले अयोध्या पतींनी ते सर्व सुखाने स्वीकारले ॥ ६ ॥ ज्यांना जे पाहीजे होते ते त्यातून याचकांना दिले व जे काही उरले ते जानोशाच्या घरी आले ॥ ७ ॥ मग जनकांनी हात जोडून मृदु शब्दांनी सर्व वर्‍हाड्यांचा सन्मान केला ॥ ८ ॥ सगळ्य़ांचा आदर दान विनंती व मोठेपणा देण्याने सन्मान करून, विशेष आनंदाने व अति प्रीतीने महामुनी समूहाची पूजा करुन त्यास वंदन केले देवांना नमस्कार व प्रार्थना करुन, हात जोडून सर्वांस म्हणाले की, देव व साधु भावाचे भुकेले असतात ओंजळभर पाणी दिल्याने का कुठे सागर तुष्ट होत असतो ? ॥ छं १ ॥ मग आपला धाकटा भाऊ जो कुशध्वज त्याच्यासह जनकानी कोसलराज दशरथांना हात जोडले व अत्यंत स्नेह उत्तम शील व सद्‍भावनेने भरलेले मनोहर वचन बोलले की महाराजा ! आपल्याशी हा जो संबंध जडला वा जुळला त्यामुळे आम्हाला आज मोठी प्रतिष्ठा लाभली (तेव्हा) आमच्या सर्व राजवैभवासह सुद्धा आम्ही आपले फुकट सेवक झाले आहोत असे समजावे ॥ छं. २ ॥ या मुलींना दासी समजून त्यांचे आपण करुणेने पालन - पोषण करावे. मी आपणास बोलावणे पाठवले हा उद्धटपणा झाला पण (दास समजून) आपण या अपराधास क्षमा करावी तेव्हा रविकुलभूषण दशरथांनी आपल्या व्याह्यास सन्मानाचे सागर बनविले. अत्यंत प्रेमाने परिपूर्ण असलेले ते परस्परांस प्रार्थना करणे कसे वर्णन करता येणार ? ॥ छं ३ ॥ दशरथ महाराज जानोशाच्या ठिकाणी जाण्य़ास निघाले आणि वृंदारक (=देव) पुष्कळ पुष्पवृष्टी करुं लागले आकाशात व नगरात जयजयकार, नगार्‍यांचा ध्वनी, व वेदघोष होत आहे आणि आकाशात व नगरात चांगले कौतुहूल चालले आहे. तेव्हा मुनीश वरिष्ठांची आज्ञा मिळताच सुंदर सखी मंगल गायन करीत वरांना व वधूंना बरोबर घेऊन गौरीहराकडे जाण्य़ास निघाल्या सीता कितीदां तरी रामाकडे बघते, लाजते पण मनात मात्र लाजत नाही तिचे प्रेमतृषार्त नेत्र मनोहर मीनांची छबी हरण करीत आहेत. ॥ छं. ४ व दो० ३२६ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP