॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय १३ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

ज्या स्वप्निंहि कधिं आन मनीं जर । पथिक बंधु सीता वसती तर ॥
रामधाम-पथ तयास फावे । जो कोणी मुनि विरळा पावे ॥
सीता श्रान्त दिसत रघुवीरा । बघुनि निकटवट शीतल नीरा ॥
कंदमूल फल खाउनि रघुवर । वसुनि निघति उदयीं स्नानोत्तर ॥
निरखत वन सर पर्वत सुंदर । वाल्मीकि आश्रमिं आले प्रभुवर ॥
राम बघति मुनि-वास सुशोभन । सुंदर गिरि कानन जल पावन ॥
सरीं सरोज विटप वनिं फुलले । गुंजति मंजु मधुप रस-भुलले ॥
खग मृग बहु कोलाहल करती । विरहित वैर मुदित मन चरती ॥

दो० :- शुचि सुंदर आश्रम बघुनि हर्ष राजिवाक्षास ॥
श्रवुनि रघुवरागमन मुनि पुढें येति नेण्यास ॥ १२४ ॥

आजसुद्धा ज्याच्या हृदयात प्रवासी बंधू व सीता स्वप्नात कां होईना वास करतील ॥ १ ॥ तर जो मार्ग कोणी विरळा मुनी पावतो तो रामधामाचा मार्ग ( भक्तीमार्ग) त्याला सहज लाभतो ॥ २ ॥ ( मग) सीता श्रान्त झाली आहे असे राघुवीरास दिसतांच वडाच्या झाडाजवळच शीतल पाणी असलेले दिसतांच ॥ ३ ॥ कंदमूळफळे खाऊन तेथे वस्ती केली व सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर रघुवर ( वाल्मीकी आश्रमाकडे जाण्यास निघाले) ॥ ४ ॥
वाल्मीकी भेट ( मुख्य) प्रकरण - ( १२४/५ ते १३२)
सुंदर वन, तलाव व पर्वत प्रभू - श्रेष्ठ ( सीता लक्ष्मणांसह) वाल्मीकी मुनींच्या आश्रमासमीप आले ॥ ५ ॥ ते मुनीचे सुंदर निवासस्थान रामचंद्रांनी पाहीले तो ( दिसले की) त्यांतील पर्वत, वन व जल सुंदर व पावन आहेत. ॥ ६ ॥ तलावा मध्ये कमळे व वनांत वृक्ष फुलले असून मधुप रस पिवून मत्त झाल्याने मधुर गुंजारव करीत आहेत. ॥ ७ ॥ पशुपक्षी गणांचा एकच कोलाहल होत असून ते आपसांतील वैर विसरुन प्रसन्न मनाने चरत व संचार करीत आहेत ॥ ८ ॥ पवित्र व सुंदर आश्रम पाहून राजीवाक्षास हर्ष झाला आनंद झाला रघुवराचे आगमन ऐकून ( त्यांस) घेऊन जाण्यासाठी मुनी सामोरे आले ॥ दो० १२४ ॥

रामें मुनिस दण्डवत नमलें । आशीर्वाद विप्रवर वदले ॥
बघुनि राम-छवि लोचन निवले । सन्मानुनि आश्रमीं आणले ॥
प्राणप्रिय अतिथी मुनि पावती । कंदमूल फल मधुर मागवति ॥
सीता अनुज राम फळ भक्षिति । तैं मुनि रुचिर आश्रमा अर्पिति ॥
वाल्मिकी मनिं अति आनंदित । मंगल मूर्तिस नयनी निरखत ॥
रघुपति तदा जुळुनि कर-कमलें । श्रवण-सुखद वचना या वदले ॥
तुम्हिं त्रिकालदर्शि मुनिनाथा । विश्व बदरसम तुमचे हातां ॥
तैं प्रभु सगळा प्रसंग वानित । ज्या प्रकारिं राणी वन अर्पित ॥

दो० :- तात वचन नी मातृहित भाउ भरतसा भूप ॥
प्रभु दर्शन मज हा मम पुण्यभाव खूप ॥ १२५ ॥

रामचंद्रानी मुनीवरास दंडवत नमस्कार घातला व विप्रश्रेष्ठाने त्यांस आशीर्वाद दिला ॥ १ ॥ रामचंद्रांस पाहून मुनींचे नेत्र निवले ( तेव्हा) त्यास सन्मानाने आपल्या पर्णकुटीत ( आश्रमात) आणले ॥ २ ॥ आज प्राणांसारखे प्रिय अतिथी म्हणून प्राप्त झाले असल्याने मुनींनी मधुर कंदमूळे फळे इ. मागविली व अतिथींना अर्पण केली ॥ ३ ॥ सीता - लक्ष्मण व राम यांनी कंदमूळे खाल्ली तेव्हा मग मुनीने त्यांस सुंदर ‘ आश्रम ’ दिले ॥ ४ ॥ मंगलमूर्तीला ( रामाला) डोळ्यांनी निरखून पाहून वाल्मीकी मनांत अति आनंदित झाले ॥ ५ ॥ तेव्हा दोन्ही करकमले जोडून रघुराज कानांना सुख देणारे हे वचन बोलले ॥ ६ ॥ मुनिनाथ ! आपण त्रिकालदर्शी असून हे विश्व बोरासारखे आपल्या तळहातावर आहे ॥ ७ ॥ ( असे म्हणून) मग ज्या प्रकाराने राणीने वन दिले तो सगळा प्रसंग प्रभूंनी वर्णन सांगीतला ॥ ८ ॥ वडिलांच्या वचनाची पूर्तता करणे, त्यातही मातेचे हित साधणे, आणी भरतासारखा भाऊ राजा होणार, व त्यातही प्रभू ! मला आपले दर्शन हा सर्व माझ्य़ा पुष्कळ पुण्याचा प्रभाव आहे ( राणीने) माझ्य़ा पुण्याचे चतुर्विध फळ माझ्या पदरात टाकले व माझ्यावर अनंत उपकार केले ॥ दो० १२५ ॥

बघुनि पाय मुन्राय आपले । अमचें सकलहि सुकृत सुफळलें ॥
अतां जिथें प्रभु आज्ञा देतिल । मुनि उद्वेग न कोणि पावतिल ॥
ज्या कारण मुनि तपी कष्टती । ते नरेश-विण पावक जळती ॥
मंगलमूल विप्र-परितोषू । जाळि कोटिकुळ भूसुर-रोषू ॥
असं मनिं जाणुनि थळ सांगावें । सह सौमित्रि सिता जिथ जावें ॥
तिथें रुचिर रचुनी तृणशाला । कांहिं काळ करूं वास कृपाला ॥
सहज सरल रघुवर वच परिसुनि । साधु साधु वदले ज्ञानी मुनि ॥
कसं न वदां असं रघुकुल केतू । पालक सतत तुम्हीं श्रुति-सेतू ॥

छं० :- श्रुति-सेतु-पालक राम तुम्हिं जगदीश माया जानकी ।
जग निर्मि जी पाळी हरी करुणानिधी-कल बघुन कीं ॥
जो अमितशीर्ष अहीश महिधर लक्ष्मणहि अगजगधनी ।
सुरकाजिं जातां नृपति तनुधर दलन खल निशिचर-अनी ॥ १ ॥
सो० :- रामा तवस्वरूप वचनाऽगोचर बुद्धि-पर ॥
व्यत न अकथ अपार नेति नेति वदती निगम ॥ १२६ ॥

मुनिराज ! आपल्या पायांच्या दर्शनाने आमचे सर्व सुकृत चांगले फळास आले ॥ १ ॥ आता जिथे आपली आज्ञा होईल तिथे ( आमच्यामुळे) कोणाही मुनीला उद्वेग वाटणार नाही ( असे स्थळ सांगावे) ॥ २ ॥ ज्या नरेशांमुळे मुनी व तपस्वी यांना कष्ट होतात ते पावका - अग्निवाचूनच जळून जातात ॥ ३ ॥ विप्रांचा परितोष हे सर्व मंगलांचे मूळ आहे, पण भूसुरांचा - ब्राह्मणांचा क्रोध कोटि कुळांना जाळून टाकतो ॥ ४ ॥ असे मनात आहे हे जाणून आपण असे स्थळ सांगावे की जेथे सीता व सौमित्रासह मी जावे ॥ ५ ॥ तिथे सुंदर पर्णकुटी बांधून हे कृपाला ! आम्ही काही काळ वास करु. ॥ ६ ॥ रघुवराची ही सहज सरल भाषा ऐकून ज्ञानी मुनी म्हणाले की साधु ! साधु ! ॥ ७ ॥ रघुकुल केतू ! तुम्ही असे का बरे म्हणणार नाही ! तुम्ही सतत श्रुतीसेतू ( वेद व धर्म मर्यादा) पालन करणारे आहांत ॥ ८ ॥ छं : राम ! तुम्ही श्रुतीसेतूपालक जगदीश आहांत, व जानकी माया आहे जी करुणानिधीचा कल ( मनोगत) पाहून जग निर्माण करते, त्याचे पालन करते व त्याचा संहार करते हजार शीर्षांचा पृथ्वीला धारण करणारा जो शेष तो चराचराचा स्वामी तोच लक्ष्मण आहे तुम्ही सुरकार्य करण्यासाठी नृपती देह धारण करुन दुष्ट निशाचर समूहांचा विनाश करण्यासाठी जात आहांत ॥ १ ॥ सो : रामा ! तुमचे स्वरुप वाणीचा विषय नाही बुद्धीच्या पलिकडे आहे ते व्यक्त नाही, अथक - अनिर्वचनीय आहे व अपार आहे, व वेद नेहमी नेति नेति म्हणूनच त्याचे वर्णन करतात ॥ दो० १२६ ॥

विश्व दृश्य आपण बघणारे । विधि हरि शंभुस नाचविणारे ॥
मर्म न तुमचें त्यांसहि कळतें । तुम्हां जाणतिल अन्य कवण ते ॥
तो जाणे ज्या जाणूं देतां तुम्हिंच होइ तो तुम्हां जाणतां ॥
तुमचे कृपें तुम्हां रघुनंदन । जाणति भक्त भक्त-उर-चंदन ॥
चिदानंदमय अपली काया । विगत विकार कळे अधिकार्‍या ॥
धृत नरतनू संत-सुर-काजा । कृति वच जशिं कीं प्राकृत राजा ॥
राम ! चरित तव ऐकुनि पाहुनि । सुख बुधांस जड जाती मोहुनि ॥
योग्य चि तुमचें वचन वागणें । सोंगा योग्य किं नटें नाचणें ॥

दो० :- राहुं कुठें पुसलेंत मज संकोच किं पुसण्यास ॥
जिथें नसां तें वदा स्थळ मग सांगुं स्थानास ॥ १२७ ॥

हे सर्व विश्व दृश्य असून तुम्ही पाहणारे ( द्राष्टे) आहांत आणि तुम्ही ब्रह्मा, विष्णू व शंभु यांना सुद्धा ( नट - मर्कटा प्रमाणे) नाचविणारे आहांत ॥ १ ॥ ते सुद्धा तुमचे मर्म जाणू शकत नाहीत मग इतर कोण असतील की जे तुम्हांस जाणूं शकतील ! ॥ २ ॥ तुम्ही ज्याला जाणू देता तोच तुम्हांला जाणतो व तुम्हाला जाणल्या बरोबर तो तुम्हीच होतो ॥ ३ ॥ हे रघुनंदना ! भक्तांच्या हृदयाच्या चंदना ! तुमच्याच कृपेने भक्त तुम्हांला जाणतात - ओळखतात ॥ ४ ॥ राम ! आपला देह सच्चिदानंदमय व सर्व विकार रहित आहे विकार रहित अधिकारी असतील त्यांना हे मर्म कळते ॥ ५ ॥ संत व सुर यांचे कार्य करण्यासाठी मनुष्य देह धारण केला असून पांचभौतिक देह असलेल्या राजासारखे आपण बोलता व करता ॥ ६ ॥ राम ! तुमचे ( असले) चरित्र - लीला पाहून वा ऐकून बुधां ( ज्ञानी) ना, सुख होते व जडमूढ मोहित होतात ॥ ७ ॥ पण तुम्ही जे बोलता व करता ते योग्यच आहे, कारण जसे सोंग ( नाटकातले) असेल त्याला योग्य असे नाचलेच पाहीजे ॥ ८ ॥ कुठे राहूं असे आपण मला विचारलेत, मला विचारण्यास संकोच वाटतो की जिथे आपण नसाल ते स्थान मला सांगावे म्हणजे मी ( आपणास राहण्यास) स्थान सांगेन ॥ दो० १२७ ॥

ऐकुनि वचना प्रेमरसमया । राम संकुचित, सस्मित हृदया ॥
हसुनि पुन्हां वाल्मीकी वदले । वचन सुमधुर सुधारस-भरलें ॥
राम अतां श्रुणु सांगुं निकेतन । तिथें वसा सह सीता लक्ष्मण ॥
श्रवण जयांचे समान अर्णव । नाना सरिता सुभग कथा तव ॥
भरति निरंतर पूर्ण नहोती । त्यांचें ह्/ऋदय तुम्हां शुभ वसती ॥
लोचन चातक करुनी राखति । जे दर्शन-जलधर अभिलाषति ॥
सर सरिता सागरीं निरादर । रूप-बिंदुजल मिळत सुखाकर ॥
त्यांचे हृदय सदन सुखदायक । वसा स-सीतानुज रघुनायक ॥

दो० :- यश तुमचें मानस विमल हंसिनि जिव्या ज्याचि ॥
मुक्ताफण गुणगण तिपी राम रहा हृदिं त्याचि ॥ १२८ ॥

( मुनींचे) प्रेमरसमिश्रित वचन ऐकून रामचंद्रांस संकोच वाटला व त्यांनी मनात स्मित केले ॥ १ ॥ वाल्मिकी हसून पुन्हा अमृतरसाने भरलेले फार मधुर असे बोलू लागले ॥ २ ॥ १) राम लक्ष्मण सीता निवासार्थ चौदा भुवने - ( फारच सुंदर भाग आहे) कथा श्रवणरति - राम ! आता निवासस्थान ( निकेतन) सांगतो, ऐका ! व तेथे सीता व लक्ष्मणांसह रहा ॥ ३ ॥ ज्यांचे कान सागरासारखे आहेत व तुमच्या सुंदर कथारुपी पावन सरिता असून ॥४ ॥ त्या निरंतर ज्या सागरास भरीत असतात पण जे कधी पूर्ण होत नाहीत, त्यांचे हृदय तुम्हांला चांगले वस्तीस्थान आहे ॥ ५ ॥ २) दर्शन रुप - रति - ज्यांनी आपल्या लोचनांना चातक करुन ठेवले आहेत व ज्यांना तुमचे दर्शनरुपी जलधराची - मेघाचीच अभिलाषा आहे ॥ ६ ॥ व जे तलाव, नद्या व सागरांसारख्या जलाशयाचा सुद्धा अनादर करतात; पण तुमचे रुप - दर्शन रुपी एक जलाचा बिंदू मिळताच जे सुखसागर ( सुखकर) बनतात ॥ ७ ॥ त्यांचे हृदय रघुनायक ! तुम्हाला सुखदायक सदन आहे तेथे तुम्ही सीता व बंधु - लक्ष्मण यांसह निवास करावा ॥ ८ ॥ ३) वाणी रति - तुमचे निर्मल यश हे निर्मल मानससरोवर असून त्यात ज्याची जिव्हा हंसिनी झाली व तुमचे गुणगण रुपी मुक्ताफळे जी टिपून वेचून घेते, त्याच्या हृदयात राम तुम्ही ( सीता - लक्ष्मणांसह) रहाच ॥ दो० १२८ ॥

प्रभू-प्रसाद सुभग शुचि वासा । घेइ सदा सादर यत्रासा ॥
तुम्हां निवेदित भोजन करिति । प्रभू-प्रसाद वसन मणि धरिती ॥
बघत विप्र गुरु सुर शिर नमतें । प्रेमें बहु करुनी विनतीतें ॥
कर नित करिति रामपद-पूजा । राम-भरंवसा हृदिं ना दूजा ॥
रामतीर्थि पदिं चालत जाती । राम करा मनिं त्यांच्या वसती ॥
मंत्रराज रव नित्यचि जपती । परिवारासह तुम्हां पूजती ॥
करिति होम तर्पण विधिं नाना । विप्रां भोजन् देति सुदानां ॥
मनिं गुरु अधिक तुम्हांहुन जाणति । सर्वभाविं सेविति सन्मानति ॥

दो० :- सर्व करुइ रति रामपदिं मागति एक फळा हि ॥
तन्मन-मंदिरिं रहा युग रघुनन्दन सीता हि ॥ १२९ ॥

४) सर्वेंद्रिय रति - ज्यांची घ्राणेंद्रिये प्रभुच्या सुंदर व पवित्र प्रसादाचा सुवास नेहमी आदराने घेते ॥ १ ॥ तुम्हांला निवेदन ( समर्पण) केलेल्या पदार्थांचेच जे सेवन करतात आणि प्रभूचा प्रसाद म्हणून वस्त्रे भूषणे वगैरे धारण करतात ॥ २ ॥ देव, ब्राह्मण व गुरु दिसतांच बहुत प्रेमाने प्रार्थना - विनंती करुन ज्यांचे मस्तक सहज नमते ॥ ३ ॥ ज्यांचे हात नित्यकर्म व रामपद पूजा करतात व ज्यांच्या हृदयाला दुसर्‍या कोणाचा भरवसा न वाटता रामाचाच भरवसा वाटतो ॥ ४ ॥ व जे पायांनी चालत ( अनवाणी) रामतीर्थांस जातात; त्यांच्या हृदयांत - मनात राम तुम्ही सीता - लक्ष्मणासह निवास करा ॥ ५ ॥ ५) मंत्र - तंत्रयुक्त रति - तुमच्या मंत्रराजाचा ( “राम”मंत्रराजाचा) नित्य नियमाने जप करतात व तुमच्या परिवारासह तुमचे नित्य नियमाने पूजन करतात ॥ ६ ॥ होम तर्पण वगैरे सर्व विविध विधी यथाविधी करतात व विप्रांना भोजन घालून पुष्कळ दाने देतात ॥ ७ ॥ मनात गुरुला तुमच्यापेक्षा श्रेष्ठ जाणून सर्व भावाने सेवा व सन्मान करतात ॥ ८ ॥ इ. सर्व करुन रामचरणीं ( विविध) प्रेम हे एकच फळ मागतात त्यांच्या मनरुपी मंदिरात तुम्ही तिघे रहा ॥ दो० १२९ ॥

काम क्रोध मद मान न मोहहि । क्षोभ न लोब राग ना द्रोहहि ॥
ज्यामधिं कपट दंभ नहि माया । त्यांचे हृदयिं रहा रघुराया ॥
सर्वां प्रिय हितकर सर्वांही । सम सुख-दुःख स्तुति निंदाही ॥
वदति विचारिं खर्‍याअ प्रिय वचना । स्वप्न जागृतीं शरण आपणां ॥
तुमच्याविण दुसरी गति नाहीं । राम रहा हृदयीं त्यांच्याही ॥
जननी-सम जाणति परनारी । परधन विषाहुनी विष भारी ॥
हर्षति पाहुनि परसंपत्ती । दुःखी बहु पर बघुनि विपत्ती ॥
प्राणप्रिय तुम्हिं राम जयाला । ज्यांचें मन शुभ सदन तुम्हांला ॥

दो० :- स्वामि सखा पितृ माय गुरु तुम्हिंच तात ! सब ज्यांस ॥
तन्मनमंदिरिं करा सह सीते सानुज वास ॥ १३० ॥

६) बालकाप्रमाणे ज्ञानोत्तर भक्त वारदांसारख्यांची रति - ज्यांच्या ठिकाणी काम, क्रोध, मद, मान व मोह नाहीत तसेच क्षोभ, लोभ, राग ( आसक्ती) नाही व द्रोहही नाही ॥ १ ॥ व ज्यांच्यात कपट, दंभ व माया नाहीत त्यांच्या हृदयांत हे रघुराया ! तुम्ही तिघे रहा ॥ २ ॥ ७) सुग्रीवाप्रमाणे रामभक्त - जे सर्वांना प्रिय असतात, व सर्वाचे हितकर्ते असतात ज्यांना सुख दु:खे, स्तुती - निंदा, इ. द्वन्द्वे सारखी वाटतात ॥ ३ ॥ जे खरे व प्रिय वचन विचार करुन बोलतात, जे झोपेत व जागृतीत तुम्हाला शरण गेलेले असतात ॥ ४ ॥ ज्यांना तुमच्याशिवाय अन्य गती नाही त्यांच्या हृदयात राम ! तुम्ही तिघांनी रहावे ॥ ५ ॥ ८) रामदूत बनून गेलेले वानरगण - जे परस्त्रियांना मातेसमान मानतात व ज्यांना दुसर्‍यांचे धन विषापेक्षा भयंकर विष वाटते ॥ ६ ॥ जे दुसर्‍यांची संपत्ती पाहून हर्षित होतात व दुस‍र्‍यांची विपत्ती पाहून फार दु:खी होतात ॥ ७ ॥ आणि राम ! ज्यांना तुम्ही प्राणांपेक्षा प्रिय वाटता त्यांचे हृदय ( मन) तुम्हांला राहण्यास चांगले घर आहे ॥ ८ ॥ ९) लक्ष्मण व हनुमानासारखे अधिकारी भक्त - ज्यांना गुरु, आई, बाप, मित्र, धनी, इ. सर्व तुम्हीच आहांत; तात ! त्यांच्या मनरुपी मंदिरात तुम्ही सीता व बंधूंसह नित्यवास करा - रहा ॥ दो० १३० ॥

अवगुण तजुनि सबगुणां ग्रहती । विप्र-धेनु-हित संकट सहती ॥
निइति निपुण आदर्श जगाला । तन्मन-शुभ निद सदन तुम्हांला ॥
गुण तुमचे समजे निज दोषां । ज्या तुमचा सर्वस्विं भरोसा ॥
रामभक्त वाटती प्रिय जया । वसा ससीता त्याचे हृदयां ॥
जात गोत धन धर्म महत्ता । प्रिय परिवार सुखद गृह सत्ता ॥
जो त्यजि सकल तुम्हां हृदयीं धरि । त्याचे हृदिं रघुराज रहा तरि ॥
स्वर्ग नर्क अपवर्ग समानहि । बघे सर्व थळिं धृत धनुबाण हि ॥
किंकर तुमचा मनकृति वचनें । राम ! हृदीं त्या डेता करणें ॥

दो० :- नको कधिंहि कांहीं जया तवपदिं सहजीं स्नेह ॥
वसा निरंतर तया मनिं जें अपलें निज गेह ॥ १३१ ॥

१०) बिभीषणासारखे भक्त - जे अवगुणांचा त्याग करुन सर्वांच्या ( इतरांच्या) गुणांचे ग्रहण करतात आणि विप्र व धेनूंच्यासाठी संकटे सहन करतात ॥ १ ॥ व नीती निपुण म्हणून जे जगाला आदर्श असतात त्यांचे शुभ हृदय तुमच्यासाठी जणूं स्वत:चेच घर आहे ॥ २ ॥ ११) जलनिधी ( सागर) - स्वत: मधील सर्व गुण तुमचे व दोष तितके स्वत:चे असे जो समजतो व ज्याला ( सर्व बाबतीत) तुमचाच भरवंसा वाटतो ॥ ३ ॥ व ज्याला रामभक्त प्रिय वाटतात त्याच्या हृदयात तुम्ही सीता अनुजासह रहा ॥ ४ ॥ १२) वानरगण - जात, गोत, धन, धर्म, मोठेपणा ( प्रतिष्ठा) प्रियजन, परिवार, सौख्य दायक घर, सत्ता. ॥ ५ ॥ इत्यादी सर्व सोडून ज्याने तुम्हाला हृदयात धारण केले असतील त्यांच्या हृदयात रघुराज तुम्ही रहा. ॥ ६ ॥ १३) सनकादिक - ज्याला स्वर्ग, नर्क व अपवर्ग = मोक्ष सारखे वाटतात व जो सर्वत्र धनुर्धारी ( धनुष्य - बाणधारी) आपल्यालाच पाहतो, आणि कर्म - मन व वाणीने जो तुमचा दास आहे त्याच्या हृदयात राम ! आपण डेरेदाखल व्हा ॥ ७-८ ॥ १४) ज्ञानोत्तर भक्तीने सर्वश्रेष्ठ ( तुलसीदास दृष्या) - काकमुशंडी - ज्याला कधीही काहीही नको असते व तुमच्या चरणी ( तुमच्यावर) ज्याचा सहज स्नेह असतो त्याच्या हृदयात तुम्ही निरंतर रहा, ते तुमचे स्वत:चेच घर होय. ॥ दो० १३१ ॥

अशि भवनें मुनिवरें दाविलीं । प्रेमळ वचनें रामा रुचलीं ॥
मुनि म्हणई श्रुणु रवि-कुलनायक । आश्रम सांगुं समयिं सुखदायक ॥
चित्रकूट गिरिं करणें वसती । सब सुख सोइ तुम्हां तिथं असती ॥
शैल सुशोभन कानन चारू । करि केसरि मृग विहग विहारू ॥
नदी पुनीत पुराणीं वानित । अत्री-प्रिया तपें निज आणित ॥
सुरधुनि-धार नांव मंदाकिनि । जी सब पातक-पोतक-डाकिनि ॥
अत्रि आदि मुनिव्र बहु वसती । जप तप योग करित तौ कसती ॥
श्रमां सफल सकलांच्या करणें । चलणें राम गिरिहि गौरविणें ॥

दो० :- चित्रकूट महिमा अमित महामुनी कथितात ॥
येउनि बंधू सिते सह नदी-स्नान करितात ॥ १३२ ॥

मुनीवराने अशा प्रकारे भवने ( १४) दाखविली व मुनीची प्रेमळ वचने रामास आवडली ॥ १ ॥ मुनी म्हणाले रघुकुलनायक ऐका, आता मी सर्व समयी सुखदायक असा आश्रम सांगतो ॥ २ ॥ आपण चित्रकूट पर्वतावर निवास करावा ( कारण) तेथे तुम्हाला सर्व प्रकारच्या सुखसोई आहेत. ॥ ३ ॥ पर्वत सुंदर असून तेथे सुंदर वन आहे व हत्ती, सिंह हरणे इ. पशू पक्षी यांचे ते विहार स्थान आहे ॥ ४ ॥ तिथे पुराण प्रसिद्ध व अत्रिपत्‍नी अनसूयेने स्वत:च्या तपोबलाने ( स्वर्गातून) आणलेली अशी एक पावन नदी आहे ॥ ५ ॥ ती पातके रुपी शिशूंना भक्षण करणारी डाकीणच आहे ॥ ६ ॥ अत्रि आदि पुष्कळ मुनीवर तेथे रहात असून ते जपतपयोगादि साधनांनी देह झिजवीत आहेत ॥ ७ ॥ राम ! तेथे चलावे, व सर्वांचे श्रम सफल करावेत व त्या गिरीचाही गौरव करावा ॥ ८ ॥ वाल्मीकी महामुनींनी चित्रकूटचा अपार महिमा वर्णन करून सांगितला व मग सीतेसहीत दोन्हीभावानी येऊन मंदाकिनी नदीत स्नान केले ॥ दो० १३२ ॥

राम म्हणति लक्ष्मण ! शुभ घाट । करा कुठें तरि निवास-थट ॥
दिसे लक्ष्मणा पय-तटिं उत्तर । फिरला धनुसम चौदिशिं निर्झर ॥
सरिता ज्या, शर शम दम दानहि । सकल कलुष कलि सावज भिन्नहि ॥
चित्रकूट जणुं अचल शिकारी । नेम चुकेना, समोर मारी ॥
वदुनि दाखवीं स्थाना लक्ष्मण । बघुन् सुखी झाले रघुवर-मन ॥
रमे राम मन देव जाणती । स्थपति नायका सह सुर निघती ॥
कोळि-किरात-वेषिं ये सुरगण । रचिति पर्णतृण-गृहांस शोभन ॥
वर्णवती न मंजु युग शाला । एक ललित लघु एक विशाला ॥

दो० :- सह लक्ष्मण जानकी प्रभु राजति रुचिर गृहांत ॥
शोभे मुनिवेषीं जणूं मदन स-रति-ऋतुनाथ ॥ १३३ ॥

’चित्रकूटि भगवंत राहीले’ प्रकरण १३३/१ ते १४२/४
रामचंद्रांनी म्हटले की लक्ष्मणा ! आता कुठे तरी राहण्याची सुव्यवस्था केली पाहीजे कारण की हा घाट चांगला आहे ॥ १ ॥ लक्ष्मणाने पयस्विनी नदीच्या उत्तर तटावर पाहीले तो एक निर्झर धनुष्यासारखा चारी बाजूंनी फिरला आहे ॥ २ ॥ मंदाकिनी नदी ही त्या धनुष्याची प्रत्यंचा ( दोरी) आहे शम, दम, दान हे बाण आहेत. सकल पापे व कलि ही भिन्न भिन्न सावजे आहेत ॥ ३ ॥ चित्रकूट जणूं अचल शिकारी आहे व तो समोरुन मारा करतो आणि त्याचा नेम कधीही चुकत नाही ॥ ४ ॥ असे म्हणून लक्ष्मणाने स्थान दाखवले ते पाहून रघुवराचे मन सुखी झाले ॥ ५ ॥ रामाचे मन ( या जागी) रमले आहे हे देवांनी जाणले व शिल्पज्ञांचा जो नायक ( त्वष्टा) त्याच्या बरोबर देव चित्रकूटास येण्यास निघाले ॥ ६ ॥ व कोळी भिल्लांच्या रुपाने ते देवगण आले व त्यांनी सुंदर दोन पर्णतृणगृहे निर्माण केली ॥ ७ ॥ त्या दोन पर्णशाला इतक्या सुंदर बांधल्या की त्यांचे वर्णन करवत नाही त्यातील एक लहान पण विशेष सुंदर व दुसरी विशाल ( विस्तृत पुष्कळ मोठी) आहे ॥ ८ ॥ लक्ष्मण व जानकीसह प्रभु त्या विशेष सुंदर पर्णकुटीत असे शोभत आहेत की जणू मदनच रति व ऋतुराज वसंतासह शोभत आहे ॥ दो० १३३ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP