॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय २६ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

शौचां करिती स्नानहि जाउनि । मुनि-पदिं नमिती स्वकर्म सारुनि ॥
बघुनि समय गुरु-आज्ञा मिळतां । बंधु चालले कुसुमां करतां ॥
भूपबाग वर जाउनि बघती । लुब्ध वसंत जिथें करि वसती ॥
विटप मनोहर विविध लागले । लताकुंज वर चित्र बनवले ॥
नव पल्लव फल सुमन सुशोभित । निज संपदिं सुर-रुखां लाजवित ॥
चातक कोकिल कीर चकोर । कूजति विहग नटति कल मोर ॥
मध्यबाग सर रुचिर शोभले । मणि सोपान विचित्र बनवले ॥
विमल सलिल सरसिज बहु-रंगित । जल-खग कूजति भृंग विगुंजित ॥

दो० :- प्रभु तडाग बागे बघुनि हर्षति बंधु समेत ॥
परम रम्य आराम हा जो रामा सुख देत ॥ २२७ ॥

सर्व शौच क्रिया करून जाऊन स्नान केले व ( दोघा बंधूनी ) आपले नित्य कर्म उरकून मुनींच्या पायांना वंदन केले ॥ १ ॥ योग्य वेळ आहे असे पाहून गुरुंची आज्ञा मिळताच दोघे बंधू फुले आणण्याकरीतां निघाले ॥ २ ॥ जिथे वसंत ऋतू लुब्ध होऊन राहीला आहे अशी राजाची श्रेष्ठ बाग त्यांनी पाहीली. ॥ ३ ॥ विविध प्रकारचे वृक्ष लावलेले असून सुंदर चित्रविचित्र वर्णांचे लताकुंज बनविले आहेत. ॥ ४ ॥ नवनवीन सुंदर पालवी फळे व फुले यांनी सुशोभित झालेले वृक्ष आपल्या संपत्तीने देवतरुंना लाजवीत आहेत. ॥ ५ ॥ चातक, कोकिळ, पोपट व चकोर हे पक्षी मधुर कूजन करीत आहेत व मोर सुंदर नाच करीत आहेत. ॥ ६ ॥ बागेच्या मध्यभागी रम्य तलाव शोभत असून चित्रविचित्र मणी रत्‍नांच्या पायर्‍या बांधलेल्या आहेत ॥ ७ ॥ जल निर्मल असून विविध रंगांची कमळे फुलली आहेत. जलपक्षी कूजन करीत असून भुंगे विशेष गुजारव करीत आहेत ॥ ८ ॥ बाग व तलाव पाहून प्रभू बंधुसहित हर्षित झाले जो रमाला सुख देतो तो हा आराम ( बगीचा ) परमरम्य असलाच पाहीजे ॥ दो० २२७ ॥

चहुं दिशिं बघुनि पुसुनि माळ्यानां । प्रमुदित जमविति दल-फूलांना ॥
येइ तिथें सीता समया ते । गिरिजा-पूजे प्रेषित मातें ॥
सवें सखी सब सुभग जाणत्या । मधुर मनोहर गात गान त्या ॥
सर-समीप गिरिजा-गृह शोभत । वर्णवे न देखत मन-मोहत ॥
मज्जन करि सरिं सखीं-समेता । गेली मुदित गौरि-निकेता ॥
पूजा करुनि अधिक अनुरागें । निज अनुरूप सुभग वर मागे ॥
एक सखी सोडुनि सियसंगति । गेलेली बघुं फुलबागे प्रति ॥
जातां पाहि, उभय भावांसी । प्रेमविवश ये सीतेपासी ॥

दो० :- दिसत सखिंस तद्दशा तनु पुलकित लोचनिं पाणि ॥
वद कारण कां हर्ष तुज पुसति सकल मृदु-वाणिं ॥ २२८ ॥

चहुकडे दृष्टी टाकून माळ्यांच्या परवानगीने राम-लक्ष्मण प्रसन्न मनाने दले व फुले ( खुडून ) जमवूं लागले ॥ १ ॥ सीताप्रवेश - त्याच वेळी गिरीजा पूजनासाठी तिच्या आईने पाठवलेली सीता त्या बागेत आली ॥ २ ॥ तिच्या बरोबर तिच्या सर्व सखी सुंदर व जाणत्या असून मधुर मनोहर गाणी गात येत आहेत ॥ ३ ॥ तलावाच्या काठी पार्वतीचे देऊळ आहे व ते इतके शोभिवंत आहे की त्याचे वर्णन करणे अशक्य आहे, पण ते पाहताच मन मोहून जाते ॥ ४ ॥ सीतेने सखींसह तलावात बुडी मारून स्नान केले व प्रमुदित मनाने ती गौरीच्या निकेती गेली ॥ ५ ॥ देवीचे पूजन प्रेमाने केले व अधिक प्रेमाने स्वत:ला अनुरुप ( योग्य ) असा सुंदर वर मिळावा अशी प्रार्थना केली. ॥ ६ ॥ ( सीतेबरोबर आलेल्या सखींपैकी ) एक सखी सीतेची संगत सोडून फुलबाग पाहण्यासाठी न सांगताच गेली होती. ॥ ७ ॥ तेथे दोघे बंधू ( राम - लक्ष्मण ) तिच्या दृष्टीस पडले, तेव्हा ती प्रेमविवश झाली व सीतेजवळ परत आली . ॥ ८ ॥ देह रोमांचित झालेला डोळ्यात पाणी अशी तिची दशा सखींना दिसताच त्या सगळ्यांनी मृदु वाणीने विचारले की या तुझ्या आनंदाचे कारण काय ? सांग पाहूं ॥ दो० २२८ ॥

प्राप्त कुमर युग बघण्या बागे । वय किशोर सुंदर सर्वांगें ॥
श्यामल गौर कवण वाखाणी । गिरा अनयन नयनविण वाणी ॥
ऐकुनि सब सखि सुजाण हर्षित । जाणति सीता अति उत्कंठित ॥
एक म्हणे आली! नृप सुत ते । श्रुत आले मुनिसवें काल जे ॥
जिहिं निजरूप-मोहनी घालुन । कृत निजवश पुर-नर-नारीजन ॥
जिथें तिथें छवि वर्णिति लोकहि । बघणें, अवश्य बघण्या-योग्यहि ॥
तिचें बचन सीते अति रुचलें । दर्शनार्थि लोचन आकुळले ॥
निघे पुढें करि त्या प्रिय सखितें । प्रीति पुरातन कुणि न लक्षि ते ॥

दो० :- नारद वच सीता स्मरे उपजे प्रीति पुनीत ॥
निरखि सकल दिशिं चकित ती जणुं शिशु मृगी सुभीत ॥ २२९ ॥

( त्यावर ती म्हणते ) दोन राजकुमार बाग बघण्यास आले आहेत ते किशोर वयाचे असून सर्वांगानी सुंदर आहेत ॥ १ ॥ एक श्यामवर्णी आहे तर एक गौरवर्णी आहे, याहून वर्णन ते ( मी ) काय करणार; कारण की वाणीला डोळे नाहीत व डोळ्यांना वाचा नाही ! ॥ २ ॥ हे ऐकून सर्व सुजाण सखी आनंदित झाल्या व सीता ( त्या कुमारांना पाहण्य़ास ) अती उत्कंठित झाली आहे ते त्यांनी जाणले ॥ ३ ॥ एक सखी म्हणाली - अग सखी ! मुनींच्या बरोबर काल आले म्हणून जे ऐकले ना तेच हे राज पुत्र असावेत ॥ ४ ॥ ज्यांनी आपल्या रुपाची मोहिनी घालून स्त्रियांनाच काय नगरीतील सर्व पुरुषांना देखील वश केले आहे ( तेच असावेत ) ॥ ५ ॥ पुरुष सुद्धा जिथे तिथे त्यांच्याच रुपाची प्रशंसा करीत आहेत, ( त्यावरुन ) बघण्यास योग्य आहेत, व बघणे जरुरच आहे ॥ ६ ॥ ( व पाहण्याचा योगही सहज आला आहे ) तिचे बोलणे सीतेला फार(च) आवडले आणि दर्शनाच्या इच्छेने तिचे नेत्र आसुसले ॥ ७ ॥ ( तेव्हा ) त्या प्रिय सखीला पुढे करून सीता निघाली. ( त्यावेळची सीतेच्या हृदयातील ) पुरातन प्रीती कोणाच्याही लक्षात आली नाही. ॥ ८ ॥ सीतेला नारदांच्या वचनाची आठवण झाली व पुनीत प्रीती उपजली व जणूं हरिण पाडसीप्रमाणे भयभीत होऊन, सर्व दिशांकडे चकित होऊन निरखून पाहूं लागली. ॥ दो० २२९ ॥

कंकण किंकिणि नूपुर रुणझुण । परिसुनि अनुजा म्हणति विवंचुन ॥
जणूं मदन दुंदुभि वाजवितो । मनिं आणत करि विश्व-विजय तो ॥
वळुनि बघति जिकडे मन चोर । सीतामुखशशिं नयन चकोर ॥
होति विलोचन चारु अचंचल । त्यजि जणुं निमि संकोचिं दृगंचल ॥
सीतारूप बघुनिं सुख झालें । स्तविती हृदयीं वचनिं न आले ॥
जणुं विरंचि निज पाटव साठवि । विरचुनि विश्वीं प्रगटुनि दाखवि ॥
सुंदर सुंदरतेला करते । छविगृहिं दीपशिखा जणुं जळते ॥
कवि-उच्छिष्टचि उपमा सारी । उपमुं कुणासि विदेह कुमारी ॥

दो० :- वानुनि सीतारूप हृदिं स्वदशा घेति विचारिं ॥
प्रभु शुचिमन बंधुस वदति वचन समय-अनुसारि ॥ २३० ॥

कंकणे, कमरपट्ट्यातील घागर्‍या, पायातील पैंजण, वाळे यांचा रुणझुण रुणझुण नाद ऐकून मनाशी विचार करुन राम अनुज लक्ष्मणास म्हणतात ॥ १ ॥ मदन जणूं काही दुंदुभी वाजवीत आहे व त्याने मनात विश्वविजयाचा संकल्प केला आहे ॥ २ ॥ मनाला चोरणारा तो ध्वनी जिकडून आला तिकडे पाहीले तो समोरच सीता मुखचंद्र दिसला व त्यावर रामनेत्र चकोर बनले ॥ ३ ॥ रामांचे ते सुंदर विशाल लोचन निश्चल झाले, जणू निमीला संकोच वाटून त्याने नेत्र पटलांचा त्याग केला. ( नेत्र निर्निमेष झाले ) ॥ ४ ॥ सीतेचे सौंदर्य निरखून पाहिल्यावर सुख झाले व त्या लावण्याची हृदयात प्रशंसा करूं लागले, पण ते वर्णन शब्दात सापडेना ॥ ५ ॥ जणूं काय विरंचीने आपली सर्व निपुणता एकत्र साठवून एक विशेष रचना केली व या विश्वात प्रगट करून दाखविली - तीच ही सीता होय ! ॥ ६ ॥ ( सीता ) सुंदरतेला सौंदर्य बहाल करणारी आहे. आणि लावण्यरुपी सदनात सतत शांतपणे तेवणारी दीपज्योतीच आहे ॥ ७ ॥ सर्व उपमा कवींनी ( वापरुन ) उष्ट्या केल्या असल्यामुळे विदेह कुमारीला उपमा तरी देऊं कुणाची ? ॥ ८ ॥ सीतेच्या सौंदर्याची हृदयात प्रशंसा करुन व आपली दशा विचारात घेऊन पवित्र मनाचे प्रभु पवित्र मनाच्या आपल्या धाकट्या भावास समयानुसार सांगतात -- ॥ दो० २३० ॥

हीच जनक-तनया ती ताता! । होइ धनुर्मख जीचे करतां ॥
गौरि पूजना सखि तिज आणित । फुल बागेला फिरे प्रकाशित ॥
पाहुनि तिचे अलौकिक शोभे । सहज पूत मन माझे क्षोभे ॥
जाणे कारण सकल विधाता । स्फुरति शुभांगे मम बघ ताता! ॥
सहज रघुकुळीं स्वभाव राया! । मन कुमार्गिं कधिं टाकि न पाया ॥
मला प्रतीति मनाची भारी । स्वप्निंहि दृष्ट न कधिं परनारी ॥
रणिं रिपु ज्यांची पाठ न पाहति । मन किं नजर परनारि न पावति ॥
याचक कधिंहि न ऐकति ‘नाहीं’ । ते नरवर थोडे जगिं पाही ॥

दो० :- बंधुसि वार्ता करत मन लोलुभ सिता छवींत ॥
मुख सरोज मकरंद छवि तें मधुपा-सम पीत ॥ २३१ ॥

बाळा ! जिच्यासाठी धनुष्य़ यज्ञ होणार आहे ती जनकतनया हीच, बरं ! ॥ १ ॥ गौरी पूजनासाठी सखींनी तिला आणली असून ती या फुलबागेला प्रकाशित करीत फिरत आहे ॥ २ ॥ तिची अलौकिक शोभा पाहून माझे सहज पवित्र असलेले मन विचलित झाले आहे. ॥ ३ ॥ कारण काय असेल ते विधाता जाणे ! पण ताता ! ही पहा माझी शुभ - सूचक अंगे स्फुरण पावत आहेत ॥ ४ ॥ भाऊराया ! रघुवंशातील पुरुषांचा हा सहज स्वभाव आहे की त्यांचे मन कधीही कुमार्गावर पाऊल टाकीत नाही ॥ ५ ॥ मला तर माझ्या मनाची पूर्ण प्रतीती ( विश्वास ) आहे की त्याने कधी स्वप्नातही परस्त्री पाहीली नाही ॥ ६ ॥ रणांगणात शत्रू ज्यांची पाठ पाहूं शकत नाहीत, ज्यांचे मन किंवा नजर परस्त्रियांना मिळत नाही व ज्यांच्याकडून ‘ नाही ’ हा शब्द याचकास ऐकण्यास सापडत नाही असे नरश्रेष्ठ ( राजे ) जगात फारच थोडे असतात. ( रघुवंशी राजे असे असतात. हा भाव ) ॥ ७-८ ॥ अनुजाबरोबर वार्तालाप करीत आहेत ( पण ) मन सीतेच्या रुपावर लुब्ध झाले आहे. ते मुखरुपी कमलातील शोभारुपी मकरंद मधुपाप्रमाणे पीत आहेत. ॥ दो०२३१ ॥

बघते चकित् चहूं दिशिं सीता । कोठें गत नृपकिशोर चिंता ॥
जिथं मृग-शावक-नयनि विलोकी । वर्षि कमल सित पंक्ति तिथें कीं ॥
लते आड सखि खुणें दाखवित । श्यामल गौर किशोर सुशोभित ॥
लालचि लोचन रूपा बघतां । हर्षति जणुं निज निधि ओळखतां ॥
नयन बघत रघुपतिछवि थक्कित । मिटण्याचें पापण्याहि सोडित ॥
स्नेह अधिक वपुभान न राहे । शरद-शशिस जणुं चकोरि पाहे ॥
नयन-मार्गिं रामा उरिं आणी । पक्ष्म कवाडें लावि शहाणी ॥
प्रेमविवश सीता, सखि जाणति । वदवेना, मनिं संकुचिता अति ॥

दो० :- बंधु उभय तों प्रगटले लतगृहाआंतून ॥
निघे विमल विधु युगल जणुं जलदपटल सारून ॥ २३२ ॥

सीता भयचकित होऊन चोहोकडे बघत आहे व नृपकिशोर कोठे गेले ही चिंता तिला लागली आहे ॥ १ ॥ हरिणाच्या पाडसासारखे डोळे असलेली ( सीता ) जिथे जिथे बघते तिथे तिथे जणूं काय कमलांसारखी श्वेत पंक्ती ‘ श्रेणी ’ वर्षत आहे ( असे वाटते ) ॥ २ ॥ अशा वेळी लतांच्या आड असलेले श्यामल गौर व सुंदर किशोर सखींनी तिला खुणेने दाखवले ॥ ३ ॥ ( नृप किशोरांस पाहण्याची) लालुच उत्पन्न झालेल्या नेत्रांना ते रुप दिसताच इतका हर्ष झाला की जणू काय आपला स्वत:चा ठेवा ( स्वप्नात ) ओळखला असावा. ॥ ४ ॥ रघुपतीचे रुप पाहून सीतेचे नेत्र तेथेच स्थिरावले; इतके की पापण्यांनी उघडझाप करण्याचे सोडले ॥ ५ ॥ अधिक स्नेह उत्पन्न झाला व त्यामुळे देहभान विसरली व चकोरीने शरद ऋतूतील ( पौर्णिमेच्या ) चंद्राकडे पहावे तसे बघत राहीली ॥ ६ ॥ ( नंतर ) नयनरुपी रस्त्याने रामचंद्राला हृदयात आणले व त्या मार्गाच्या दाराच्या फळ्या - ज्या पापण्या त्या, शहाण्य़ा सीतेने लावून टाकल्या. ( मिटल्या ) ॥ ७ ॥ सीता प्रेमवश झाली आहे हे तिच्या सखींनी जाणले पण त्या मनात अती संकोचित झाल्या व काही बोलवेना. ॥ ८ ॥ तोच एका लतागृहाच्या आतून दोघे बंधू जणू मेघपटलाला बाजूला सारुन दोन विमल चंद्र बाहेर पडावे तसे बाहेर पडले ( प्रगट झाले ) ॥ दो० २३२ ॥

शोभा-शीव सुभग युग वीर । नील - पीत - जलजाभ - शरीर ॥
काकपक्ष शिरिं शोभति त्यांचे । गुच्छमधीं मधिं कुसुमकळ्यांचे ॥
भाळिं टिळे श्रमबिंदु विराजति । सुभग भूषणें श्रवणीं भ्राजति ॥
विकट भ्रुकुटि कच काळे कुरळे । लोचन अरुणकंज नव खुलले ॥
चारु चिबुक नासिका कपोलहि । हास-विलास घेत मन मोलहि ॥
केवि वर्णवे मुख छविं मातें । बघुनि लाज बहु किति कमांतें ॥
हृदिं मणि-माल सु-कम्बू-ग्रीवा । कामकलभकर भुज बल-शीवा ॥
द्रोण सुमनयुत रुचिर वाम करिं । श्याम कुमर सखि! फार रुचिर तरि ॥

दो० :- केसरि कटि, पतपीतधर सुषमा-शील-निधान ॥
बघुनि भानुकुल-भूषणा विसरति सखि निज भान ॥ २३३ ॥

दोघे बंधू वीर असून सुंदर आहेत, शोभेची परमावधि आहेत दोघे अनुक्रमे नील व पीत वर्णी कमलाच्या शरीर ( कांतीचे ) आहेत ॥ १ ॥ त्यांच्या मस्तकावर काक पक्ष ( विशिष्ट केशरचना ) शोभत असून त्यात मधे मधे फुले व कळ्या असलेले गुच्छ खोवलेले आहेत. ॥ २ ॥ कपाळी गंधाचे तिलक असून श्रमाने आलेले घामाचे बिंदू विराजत आहेत; कानात सुंदर भूषणे चकाकत आहेत. ॥ ३ ॥ भिवया धनुष्याकार असून केस काळे व कुरळे आहेत आणि डोळे ताज्या फुललेल्या लाल कमलासारखे खुलत आहेत ॥ ४ ॥ हनुवटी, गाल व नाक सुंदर आहेत व हास्याची विशेष शोभा तर मनच जिंकून घेते ॥ ५ ॥ मुखाच्या शोभेचे वर्णन मला कसे करवेल ! कारण ते पाहिल्यावर अनेक कामदेवांना सुद्धा ( आपल्या सौदर्याची ) लाज वाटते ॥ ६ ॥ छातीवर मण्यांची माळा रुळते आहे, गळा शंखासारखा सुंदर ( रेखीव - प्रमाणबद्ध ) आहे, व बाहू कामदेवाच्या बालहत्तीच्या सोंडेसारखे असून बळाची सीमा आहेत तरी पण हे सखी ! श्याम कुमार फारच सुंदर आहे ॥ ८ ॥ सिंहकटिवर पीतांबर परिधान केला आहे व परम शोभेचे व शीलाचे निधान ( श्याम - कुमार ) आहे, भानुकुल भूषणास पाहून त्या सर्व सखी स्वत:चे भान विसरल्या ॥ दो० २३३ ॥

धरुनि धीर सखि एक शहाणी । सांगे सीते धरूनी पाणी ॥
मग गौरीचे करणें ध्याना । भूप किशोर बघुनि कां ध्याना ॥
सिता नयन संकोचें उघडित । सन्मुख दो रघुसिंह विलोकित ॥
रघुपतिशोभा नखशिख निरखुन । स्मरुनि पितृपणा क्षोभे अति मन ॥
परवश दिसतां सखींस सीता । झाला उशिर म्हणति सब भीता ॥
येउं उद्यां किं पुन्हां या कालीं । वदुनि. एक मनिं हसली मानित ॥
गूढ गिरें सीता संकोचित । समजुनि उशिर मातृभय मानित ॥
बहु धरि धीर राम हृदिं आणी । वळे, तातवश अपणां जाणी ॥

दो० :- खग मृग तरु बघण्या मिषें फिरते वारंवार ॥
बघबघुनी रघुवीर छवि वाढे प्रीति अपार ॥ २३४ ॥

( नंतर ) एक सुजाण सखी धीर धरुन सीतेचा हात धरुन तिला सांगते की- ॥ १ ॥ गौरिचे ध्यान मग केलेत तरी चालेले, भूपकिशोरांना ( आधी ) पोटभर पाहून घ्या ॥ २ ॥ ( तेव्हा ) सीता लाजत लाजत डोळे उघडते तोच दोन रघुसिंह तिच्या दृष्टीस पडले. ॥ ३ ॥ तिने रघुपतीची शोभा नखशिखान्त निरखून पाहीली व वडिलांनी केलेल्या पणाचे स्मरण होऊन तिचे मन अत्यंत व्याकुळ झाले ॥ ४ ॥ सीता परवश झाली आहे असे तिच्या सखींस कळताच त्या सर्व ( आपापसात ) भीत भीत ( पण मोठ्याने ) म्हणाल्या की किती उशीर झाला हा ! ॥ ५ ॥ ( नंतर ) आपण याच वेळी उद्या येऊ असे म्हणून एक सखी मनात हसली ॥ ६ ॥ या गूढ वाणीने सीता लाजली व उशीर झाला आहे हे जाणून तिला आईची भीती वाटली ॥ ७ ॥ ( मग ) खूप धीर धरुन तिने रामचंद्रास हृदयात आणले व आपण पित्याच्या आधीन आहोत हे जाणून ती तेथून परतली ॥ ८ ॥ सीता पशु पक्षी वृक्ष इत्यादि पाहण्याचे निमित्य करुन वारंवार मागे वळून पाहू लागली. रघुवीराची शोभा पुन:पुन्हा पाहुन अपार प्रीती वाढली ॥ दो० २३४ ॥

जाणुनि शिवधनु कठिण, कळवळे । राखुनि शामल मूर्ति उरिं वळे ॥
प्रभु जैं जात जानकी जाणी । सुख - स्नेह - शोभा - गुण - खाणी ॥
परम प्रेममय मृदु मसि करिती । चारु चित्त-भित्तीवर लिहिती ॥
पुन्हां भवानी-भवनीं आली । पदिं वंदुनि कर जुळुनि म्हणाली ॥
जयजय गिरिवर-राज किशोरी । जय महेश-मुख-चंद्र-चकोरी ॥
जय गजवदन-षडानन-माये । जगतजननि दामिनि-दुति-काये ॥
आदि मध्य ना तव अवसान न । श्रुती प्रभावा अमित जाणत न ॥
भवभव - विभव - पराभव - करिणि । विश्वविमोहिनि स्ववशविहारिणि ॥

दो० :- पति-देवता-सुनारिमधिं प्रथम अंब तव रेख ॥
महिमा अमित न वदुं शकति अयुत शारदाशेष ॥ २३५ ॥

शिवधनुष्य कठीण आहे हे जाणून जानकी व्याकूळ झाली पण श्यामल मुर्ती हृदयात ठेऊन परतली ॥ १ ॥ सुख, स्नेह, शोभा व गुण यांची खाण अशी ती जानकी जात आहे हे प्रभूंनी जाणले ॥ २ ॥ तेव्हा परम प्रेमाचीच मृदु शाई करुन त्या शाईने तिला आपल्या सुंदर व शुद्ध चित्तरुपी भिंतीवर रेखाटली ॥ ३ ॥ सीता पुन्हा भवानीच्या देवळात आली व चरणांना वंदन करुन हात जोडून म्हणाली ॥ ४ ॥ हे गिरीश्रेष्ठ राजाच्या कन्ये ! तुझे ऐश्वर्य प्रगट कर. महेशांचे मुखरुपी चंद्राच्या चकोरी तुझे ऐश्वर्य प्रगट कर. ॥ ५ ॥ हे गजाननाच्या व षडाननाच्या माते ! तुझे ऐश्वर्य प्रगट कर. विजे प्रमाणे तेजस्वी देह असणार्‍या हे जगज्जननी ॥ ६ ॥ तुला आदि - मध्य व अन्त नाही व वेद सुद्धा तुझा अगणित - अमित प्रभाव जाणत नाहीत ॥ ७ ॥ तू विश्वाची उत्पत्ती - स्थिती व लय करणारी, विश्वाला विशेष मोहित करणारी, व स्वतंत्रपणे विहार करणारी आहेस. ॥ ८ ॥ पती हेच दैवत मानणार्‍या श्रेष्ठ स्त्रियांत हे अंबे ! तुझी गणती प्रथम होते व हजारो शारदा व हजारो शेष सुद्धा तुझा अमित महिमा वर्णन करुं शकत नाहीत ( तिथे मी लहान बालिका काय वर्णन करणार ! ) ॥ दो० २३५ ॥

तुज सेवतां सुलभ फल चारी । वरदायिनी पुरारी-प्यारी ॥
देवि पूजुनी तव पद-पद्मां । पावति मुनि नर सुर सुखसद्मा ॥
मनोरथा मम नीट जाणसी । सर्व-हृदय-पुरिं सदा राहसी ॥
म्हणुनि प्रगट न मी वदलें ही । असें वदुनि पद धरि वैदेही ॥
प्रेम विनति वश भवानि झाली । सस्मित मूर्ती माळ गळाली ॥
सादर सीता प्रसाद शिरिं धरि । वदे गौरि, हर्षित अति अंतरिं ॥
श्रुणु आशीस सत्य मम सीते । पुरि होइ कामना मनीं ते ॥
नारदशब्द सदा शुचि साचा । तो वर मिळे ध्यास मनिं ज्याचा ॥

छं. :- मनिं ध्यास ज्याचा तो मिळे वर सहज सुंदर सावळा ॥
करुणानिधान सुजाण शीलहि स्नेह जाणत आपला ॥
हा गौरि-आशीर्वाद परिसुनि हर्ष सखिंसह पावली ॥
तुलसी भवानिस पूजि घडि घडि मुदित मंदिर चालली ॥ १ ॥
सो. :- बघुनि गौरि अनुकूल हर्ष सिते मनिं कसा वदुं ॥
मंजुल मंगल-मूल वामांगें लगलीं स्फुरुं ॥ २३६ ॥

त्रिपुरारींना प्रिय असणार्‍या हे वरदामिनी तुझ्या सेवेने धर्म - अर्थ - काम व मोक्ष या चारी फळांची प्राप्ती अगदी सुलभ होते. ॥ १ ॥ हे देवी ! तुझ्या चरणकमलांच्या पूजेने ( सेवेने ) सुर, नर, मुनी इ. फार सुखी होतात ॥ २ ॥ माझा मनोरथ काय आहे हे तू चांगले जाणतेस कारण तू सर्वाच्या हृदयात निवास करतेस. ॥ ३ ॥ म्हणून मी ते प्रगट करुन सांगितले नाही; असे म्हणून वैदेहीने पार्वतीचे पाय धरले ॥ ४ ॥ भवानी सीतेच्या विनंतीला व प्रेमाला वश झाली, मूर्तीने स्मित केले व माळ गळून ( सीतेच्या गळ्यात ) पडली ॥ ५ ॥ ( ती माळ ) सीतेने प्रसाद म्हणून मस्तकावर धारण केली, तेव्हा गौरीच्या हृदयात अति हर्ष झाला व ती बोलू लागली. ॥ ६ ॥ सीते आमचा सत्य आशिर्वाद ऐक, तुमच्या मनात जी कामना आहे ती पूर्ण होईल ॥ ७ ॥ नारदांचा शब्द ( वचन ) सदा पवित्र व सत्य असतो, तुमच्या मनात ज्याचा ध्यास लागला आहे तो वर मिळेल ॥ ८ ॥ तुमच्या मनीं जो ध्यास लागला आहे तो सहज सुंदर सावळा वर तुम्हांस मिळेल ते करुणानिधान व सुजाण असून तुमचे शील व स्नेह जाणतात. हा गौरीचा आशीर्वाद ऐकून सीता व तिच्या सखी यांना आनंद झाला तुलसीदास म्हणतात की मग तिने पुन:पुन्हा भवानीचे पूजन केले व आनंदित होऊन मंदिरात ( आपल्या राजवाड्यात ) चालली ॥ छं० ॥ गौरी ( भवानी ) आपणास प्रसन्न आहे हे पाहून जाणून सीतेच्या मनात जो हर्ष झाला तो कसा सांगता येणार ! ( तो अवर्णनीय आहे ) सुंदर मंगलमूल अशी तिची वामांगे स्फुरण पावूं लागली. ॥ सो० २३६ ॥

वनित मनिं सीता-रूपासी । गेले अनुजासह गुरुपासीं ॥
राम कौशिका सगळें सांगत, । सहज सरल, छल नाहीं स्पर्शत ॥
मिळत सुमन मुनि करिति पूजना । मग देती आशिस उभयांनां ॥
होतिल सुफल मनोरथ तुमचे । रामलक्ष्मणां मनि सुख संचे ॥
क्रुत-भोजन मुनिवर विज्ञानी । सांगुं लागले कथा पुराणी ॥
विगत दिवस गुरु-आज्ञा मिळतां । उभय बंधु गत संध्ये करतां ॥
प्राचीं दिशिं शशि सुभग उगवला । सीता-मुखसम सुखदचि दिसला ॥
पुनरपि करिति विचार मनांही । सीता-वदन सम हिमकर नाही ॥

दो० :- जन्म सिंधुमधिं बंधु विष, दिनमलीन सकलंक ॥
सीतामुख समता किं या चांद बापुडा रंक ॥ २३७ ॥

मनांत सीतेच्या सौंदर्याची प्रशंसा करीत राम-लक्ष्मणसह गुरु विश्वामित्राजवळ गेले ॥ १ ॥ व त्यांनी सर्व काही कौशिकास सांगितले ( कारण ) स्वभावत:च सरळ असल्याने छल-कपट त्यांना स्पर्श सुद्धा करीत नाही ॥ २ ॥ सुमने मिळताच मुनींनी पूजा केली व मग दोघा भावांना आशीर्वाद दिला की ॥ ३ ॥ तुमचे मनोरथ सुफल होतील ( तेव्हा ते ऐकून ) रामलक्ष्मणांच्या मनांत सुख साठले ॥ ४ ॥ भोजन केल्यानंतर विज्ञानी मुनिवर पुरातन कथा सांगू लागले. ॥ ५ ॥ दिवस गेल्यावर मुनीची आज्ञा मिळताच दोघे भाऊ संध्या करण्यासाठी गेले. ॥ ६ ॥ पूर्व दिशेला सुंदर चंद्रमा उगवला व तो सीतेच्या मुखासारखाच ( रामास ) सुखदायक दिसला. ॥ ७ ॥ पुन्हा विचार केला मनात की छे ! हिमकर सीतेच्या वदनासारखा नाही ॥ ८ ॥ याचा जन्म सागरात, याचा भाऊ हलाहल विष, हा दिवसा म्लान असतो व कलंकित आहे. तेव्हा सीतेच्या मुखाची सर का याला येणार आहे ? चंद्र बापडा रंक आहे ॥ दो०२३७ ॥

घटे चढे विरही-दुखदायक । ग्रासि राहु निजसंधी साधक ॥
द्रोहि पंकजां शोकद चक्रां । अवगुण बहु तुजमाजीं चंद्रा! ॥
वैदेही मुख तुजसी तुलतां । दोष घडे कृति करुनि अनुचिता ॥
सीता मुख छवि शशिमिषिं वानुनि । निघति गुरुकडे निशाऽति जाणुनि ॥
मुनिवर चरण-सरोजीं प्रणमुनि । कृत विश्रामा आज्ञा पावुनि ॥
सरे रात्र रघुनायक जागति । बंधुस बघुनि असें वदुं लागति ॥
बघ अरुणोदय झाला ताता । पंकज - कोक - लोक - सुखदाता ॥
प्रभुचा प्रभाव सूचक भाषण । मृदु करती कर जोडुन लक्ष्मण ॥

दो० :- म्लान कुमुदं अरुणोदयीं उडुगण तेजें क्षीण ॥
तव आगमना ऐकुनी जसे नृपति बलहीन ॥ २३८ ॥

चंद्र घटतो व वाढतो, विरही जनांना दु:ख देतो, आपली संधी साधून राहू याला ग्रासतो ॥ १ ॥ कमलांचा द्रोह करतो व चक्रवाकांना शोक देतो, हे चंद्रा तुझ्यात फार अवगुण आहेत ॥ २ ॥ वैदेहीच्या मुखाची उपमा देण्याने अनुचित कर्म केल्याचा दोष लोक देतील ॥ ३ ॥ चंद्राच्या निमित्ताने सीतेच्या मुखाचे सौंदर्य वाखाणून रात्र फार झाली आहे हे जाणून पाहून गुरुकडे गेले ॥ ४ ॥ मुनिवर विश्वामित्रांच्या चरणकमलांना प्रणाम करून त्यांची आज्ञा मिळाल्यावर दोघेजण विश्राम करूं लागले. ॥ ५ ॥
धनुर्यज्ञ प्रकरण ---
रात्र संपली तेव्हा रघुनायक जागे झाले व भावास पाहून म्हणू लागले की ॥ ६ ॥ बाळा ! पंकजांना, चक्रवाकांना व लोकांना सुख देणारा अरुणोदय झाला बघ ! ॥ ७ ॥ तेव्हा लक्ष्मण हात जोडून प्रभाव सुचविणारे मृदु भाषण करुं लागले ॥ ८ ॥ तुमचे आगमन ऐकून सर्व राजे जसे बलहीन झाले आहेत तशीच अरुणोदयाने चंद्र कमले कोमेजली व नक्षत्रगणांचे तेज क्षीण झाले ॥ दो०२३८ ॥

नृपगण-उडुगण-तेजें सारीं । ढळवुं न शकति चापतम भारी ॥
कमल कोक मधुकर खग नाना । हर्षित सगळे निशावसानां ॥
भक्तां प्रभु तव असें समस्तां । सुख होइल बहु धनू भंगतां ॥
भानु उदित तम अश्रम सरला । तारे लपले प्रकाश भरला ॥
रघुराया! निज-उदय-मिषें रवि । प्रभू-प्रताप नृपांनां दाखवि ॥
तव भुजबल-महिमा उद्‌घाटित । धनु-विघटन-परिपाटीं प्रगटित ॥
परिसुनि हें प्रभु सुस्मित करती । सहज पूत शुचि होति मज्जती ॥
नित्यकर्म कृत येति गुरूप्रति । चरण सरोजिं सुभग शिर नमवति ॥
जनक शतानंदा तैं अणविति । शीघ्र कौशिकापाशिं पाठविति ॥
येउन जनकविनति ते सांगति । हर्षित मुनि बंधुस बोलावति ॥

दो० :- शतानंद पद नमुनि गुरूपाशीं प्रभु बसतात ॥
चला वदति मुनि निमंत्रण जनकें प्रेषित तात ॥ २३९ ॥

नृप समूहरुपी साध्या नक्षत्रगणांची तेज ( एकत्र झाली तरी ) धनुष्यरुपी भारी अंधाराला ढळवूं शकत नाहीत ( त्यांना धनुष्य जागचे हलणार नाही ) ॥ १ ॥ कमले, चक्रवाक, भुंगे व दुसरे इतर पक्षी रात्र संपल्याने हर्षित झाले आहेत ॥ २ ॥ असेच हे प्रभो ! आपल्या सर्व भक्तांस धनुष्यभंग झाल्याने सुख होईल ॥ ३ ॥ सूर्य उगवला व श्रमावाचून सर्व अंधार नाहीसा झाला. तारे लपून राहीले व ( जगात ) सर्वत्र प्रकाश भरला ॥ ४ ॥ रघुराया ! रवीने आपल्या उदयाच्या निमित्ताने प्रभूचा प्रताप नृपांना चांगला दाखवला. ॥ ५ ॥ तुमच्या भुजबलाचा महिमा उदघाटित करून धनुष्यभंग समाचार सर्वत्र प्रसृत करून तो महिमा प्रगट केला आहे ॥ ६ ॥ लक्ष्मणाचे हे भाषण ऐकून प्रभूंनी मधुर सु-स्मित केले व सहज पुनीत असून शौचादि करुन स्नान केले ॥ ७ ॥ नित्यकर्म उरकून गुरुसमीप आले आणि त्यांच्या चरणकमलांवर सुंदर मस्तक नमविते झाले ॥ ८ ॥ तेव्हा जनकानी शातानंदास बोलावून आणविले व त्यास त्वरेने कौशिक मुनींकडे पाठविले. ॥ ९ ॥ त्यांनी येऊन जनकाची विनंती निवेदन केली तेव्हा मुनी प्रमुदित झाले व त्यांनी दोघा बंधूना बोलावले ॥ १० ॥ शतानंदाच्या पदांना वंदन करुन प्रभू गुरुजवळ जाऊन बसले. तेव्हा मुनी म्हणाले की तात ! चला ! जनकांनी निमंत्रण पाठवले आहे. ॥ दो०२३९ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP