॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ५ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

याज्ञवल्क्य जी वदले मुनिवर । कथा भरद्वाजाला सुंदर ॥
त्या संवादा वदुं विस्तारुनि । ऐका सुजन सर्व सुख मानुनि ॥
शंभु चरित हें सुंदर रचिती । पुढें कृपेनें उमेसि कथिती ॥
तें शिव काकभुशुंडिस अर्पिति । रामभक्त अधिकारि परीक्षिति ॥
तेथुनि लाभ याज्ञवल्क्याला । त्यानीं कथित भरद्वाजाला ॥
ते श्रोते वक्ते सम शीलें । सर्वदर्शि जाणति हरिलीले ॥
त्रिकालज्ञ ते, आत्मज्ञाना । जाणति करिं आमलक समाना ॥
इतर सुज्ञ हरिभक्त कितीतरि । सांगति ऐकति समजति बहुपरि ॥

दो० :- गुरु वदले मज ती कथा सूकरखेतिं सुजाण ॥
बालपणें नुमजे तशी तैं मी फार अजाण ॥ ३० रा ॥
श्रोता वक्ता ज्ञाननिधि रामकथा कीं गूढ ॥
कशि समजे मी जीव जड कलिमल ग्रसित विमूढ ॥ ३० म ॥

कथाक्रम
मुनीश्रेष्ठ याज्ञवल्क्यांनी जी सुंदर कथा मुनीवर भरव्दाजास सांगितली –॥१॥ ती संवाद रुप कथा मी विस्तार करून सांगणार आहे, तरी आपण सर्व सज्जन सर्व सुख मानून ती श्रवण करा (अशी माझी विनंती आहे) ॥२॥ प्रथम शंभूंनी हे सुंदर चरित्र रचले. नंतर त्यांनी ते कृपेने उमेला सांगितले.॥३॥ तेच शिवाने काकभुशुंडीस दिले पण रामभक्त आहे अशी परीक्षा केल्यावर.॥४॥ त्या चरित्राचा लाभ काकभुशुंडीकडून याज्ञवल्क्याला झाला; व त्यानी ते भरव्दाजास सांगीतले.॥५॥ ते सर्व श्रोते वक्ते शीलाने सारखे असून सर्वदर्शी (सर्वज्ञ) व हरिलीलांना जाणणारे आहेत.॥६॥ ते त्रिकालज्ञानी असून त्यांना आत्मज्ञान करतलावरील – हाताच्या तळव्यावरील आवळ्यासारखे साक्षात आहे.॥७॥ इतर बरेच श्रोते वक्ते सुजाण हरीभक्त होते ते अनेक प्रकारे सांगत ऐकत व समजत असत.॥८॥ दोहा- (अशा प्रकारे गुरूशिष्य परंपरेने चालत आलेली) ती कथा माझ्या सुजाण गुरुंनी सूकरखेत या गावी मला सांगीतली. पण त्यावेळी माझे बालपण असल्याने व मी फार अज्ञानी असल्याने ती जशी समजावयास पाहीजे होती तशी समजली नाही.॥३०रा॥ रामकथा गूढ असल्याने वक्ता व श्रोता हे दोघेही ज्ञाननिधी पाहीजेत पण मी कलिमलाने ग्रस्त झालेला व विमूढ असल्याने मला ती (एकदा श्रवण करून) कशी समजणार? ॥दो.३०म॥

वारंवार परि गुरु सांगति । कांहि समजली मला यथामति ॥
ती करीन मी भाषाबद्धहि । जिनें होइ मम मनीं प्रबोधहि ॥
ज्ञान बुद्धिबल अंतरिं जेवीं । प्रेरी हरि मज वदेन तेवीं ॥
भ्रम-संदेह-मोह निज हरणी । करूं कथा भवसरितातरणी ॥
बुध विश्राम सकल जन-रंजनी । रामकथा कलि-कलुष विभंजनि ॥
रामकथा कलि पन्नग भरणी । ज्ञानपावकाला कीं अरणी ॥
रामकथा कलिं-कमधेनुवर । मुळी सुजन-संजीवनि सुंदर ॥
ती वसुधातळिं सुधातरंगिणी । भयभंगा भ्रमभेकभुजंगिनि ॥
असुर सैन्य सम नरक निकंदिनि । साधु विबुधकुलहित गिरिनंदिनि ॥
यमगणमुखिं मसि जगिं यमुनाशी । जीवन्मुक्ति-हेतु जणुं काशी ॥
रामप्रिय पावन तुलसीसी । तुलसिदास-हित हृदिं हुलसीसी ॥
शिवप्रिय मेकलशैल-सुतासी । सकलसिद्धि सुख संपतिरासी ॥
सद्गुरण-सुरगण अंब अदितिसी । रघुपति भक्ति प्रेम परिमितिसी ॥

दो० :- रामकथा मंदाकिनी चित्त चित्रकुट चारु ॥
तुलसी! स्नेहसुभगवनिं सियरघुवीर-विहारु ॥ ३१ ॥

तरीपण गुरुजींनी ती कथा मला वारंवार सांगीतली म्हणून मला ती यथामती थोडी समजली॥१॥ तीच आता मी स्वभाषेत काव्यरुपाने लिहीणार आहे. हेतु हा की त्यामुळे त्या कथेचे पूर्ण ज्ञान मला होईल. ॥२॥ माझ्या ठिकाणी जे काही ज्ञान, बुद्धीबळ आहे त्याच्या आधाराने श्री हरीची जशी प्रेरणा अंतरात होईल तसे लिहीन. (रचना करीन) ॥३॥ स्वत:चे (माझे) संदेह मोह व भ्रम हरण करणारी व भवनदीला नौके सारखी असणारी कथा (भाषाबद्ध) करतो.॥४॥
रामकथा महती – रामकथा बुधांना विश्राम देणारी, सर्व जणांचे चित्तरंजन करणारी व कलिकलुषांचा विध्वंस करणारी आहे.॥५॥ कलिरुपी भुजंगाला रामकथा भरणी पक्षासारखी आहे व ज्ञानपावकाला उत्पन्न करणारी अरणी आहे.॥६॥ रामकथा कलियुगातील सुंदर कामधेनू आहे व ती दासांचे संजीवन करणारी सुंदर मुळी आहे ॥७॥ ती (रामकथा) या पृथ्वीतलावरील सुधामय नदी आहे व ती भवभयाचा भंग करणारी असून (ईश्वरावतार विषयक) भ्रमरूपी बेडकांना खाणारी सापीण आहे.॥८॥ असुर सैन्यासारख्या असलेल्या नरकाचा विनाश करणारी गिरीतनया पार्वती आहे व साधुरुपी देवसमाजाचे हित करणारी ती गंगा आहे.॥९॥ रामकथा ही संतसमाजरूपी क्षीरसागरातल्या लक्ष्मी सारखी आहे व विश्वाच्या भरणाचा भार वाहणारी पृथ्वीसारखी अचल आहे.॥१०॥ यमदूतांच्या तोंडास काजळ फासणारी या जगात यमुने सारखी आहे व जीवनमुक्तीचा हेतू-कारण जणूं काशी आहे.॥११॥ ही रामकथा पवित्र पावन तुलसी सारखी रामचंद्रास प्रिय आहे व तुलसीदासांच्या हितासाठी त्यांच्या हृदयात राहाणारी हुलसी माते सारखी आहे. ॥१२॥ ही रामकथा शंकरांस अमरकंटक पर्वत-कन्या जी नर्मदा तिच्यासारखी प्रिय आहे. ही सर्व सिद्धी, सर्व सुखे व सर्व संपत्तीची रास आहे.॥१३॥ सद्‌गुणरूप देवगणांना जन्म देणार्‍या अंबा अदिती सारखी आहे व रघुपती प्रेमभक्तीच्या परमसीमे सारखी आहे.॥१४॥ दो- रामकथा (चित्रकूटा जवळील) मंदाकिनी नदी आहे, शुद्ध निर्मल चित्त हाच चित्रकूट पर्वत आहे. पर्वत आहे, हे तुलसीदासा ! शुद्ध स्नेह हेच रमणीय वन असून त्यांत सीता-रघुवीर (राम-लक्ष्मण) विहार करीत असतात.॥दो. ३१॥

रामचरित चिंतामणि चारू । संतसुधी - स्त्री - शुभ - शृंगारू ॥
जग-मंगल रामाचे गुणगण । दायक मुक्ती धाम धर्म धन ॥
सद्‍गुरू बोध विरागां योगा । विबुधवैद्य भवभीषण-रोगा ॥
जननि जनक सियराम-प्रेमा । बीज सकल धर्मा व्रतनेमां ॥
शमन पाप=संतापां शोका । प्रिय पालक परलोका लोका ॥
सचिव सुभट विवेक भूपतिचे । कुंभज अपार लोभोदधिचे ॥
काम-कोप-कलि-कलुष करिगणां । केसरिशावक दास मनवना ॥
प्रियतम पूज्य पुरारि-अतिथि हे । कामद घन दारिद्य-दाविं हे ॥
मंत्र महामणि विषयां व्यालां । पुसति कठिण जे कुअंक भालां ॥
हरण मोहतम दिनकर-करसे । सेवक-शालि-पाल जलधरसे ॥
अभिमतदानि देवतरुवरसे । सेवत सुलभ सुखद हरिहरसे ॥
सुकविशरद मन-नभिं उडुगणसे । रामभक्त - जन - जीवन - धनसे ॥
सकलसुकृतफल भूरि भोगसे । जगहित निरुपधि साधु लोकसे ॥
सेवक मन मानस-मराल से । पावन गांगतरंगमालसे ॥

दो० :- कुपथ कुतर्क कुचालि कलि कपट दंभ पाखंड ॥
दहन रामगुण-गण जसा अनल इंधना चंड ॥ ३२ रा ॥
दो० :-रामचरित राकेशकर सदृश सुखद सर्वांस ॥
सज्जन कुमुद चकोर मन हितकर अति लाभास ॥ ३२ म ॥

रामचरित हा चारू चिंतामणी आहे; व संतांच्या सुबुद्धी रूपी स्त्रीचा शुभ शृंगार आहे.॥१॥
रामगुण व २८ नक्षत्रांच्या फलश्रुती – (१) (त्या रामकथेत) रामचंद्रांच्या गुणांचा समूह जगाचे मंगल करणारा आहे व (२) तो मुक्ती, धाम (वैकुंठादि) धर्म व धन देणारा आहे.॥२॥(३) तो ज्ञान, वैराग्य व योग (देणारा) सद्‌गुरू असून (४) भयंकर भवरोगाचा देव-वैद्य आहे.॥३॥(५,६) रामगुणग्राम सीताराम प्रेमाची जननी आहे, आणि सीताराम प्रेमाचा जनक आहे.(७) सर्व धर्मव्रत इत्यादिंचे बीज रामगुणग्राम आहे.॥४॥(८) रामगुणग्राम पापसंताप व शोक यांना ठार मारणारा यमराज आहे.(९) इहलोकाचा व परलोकाचा प्रिय पालक आहे.॥५॥(१०,११) रामगुणग्राम ज्ञान (विवेक) भूपतीचे सचिव आहेत व त्याचे सुभट आहेत.(१२) आणि अपार लोभसागराचे अगस्ती वा कुंभज मुनी आहेत.॥६॥(१३) दासांच्या मनरूपी वनात राहणार्‍या कामक्रोधदि – कलिमलरूपी हत्तींच्या कळपाचा विनाश करणारे त्या वनात राहणारे सिंहाचे छावे म्हणजेच श्रीरामगुणगण.॥७॥(१४)रामगुणग्राम त्रिपुरारिंचे सर्वात प्रिय व पूज्य अतिथी आहेत.(१५) आणि दारिद्र्यरूपी दावानलाला शांत करणारे, इच्छित देणारे मेघ (घन) आहेत.॥८॥(१६) रामगुणगण विषयरूपी नागांना महामणी आहेत व (१७) रामगुणगण प्रारब्धचे भालांवर लिहून ठेवलेले दु:खद लेख पुसून टाकतात॥९॥ रामगुणगण सूर्य किरणांप्रमाणे मोहतमाचे हरण करणारे आहेत व (१९) मेघां प्रमाणे सेवकरूपी साळींचे पालन करणारे आहेत. ॥१०॥(२०) रामचरित देवतरूवरासारखे वांछित फल देणारे आहे व (२१) त्याच्या सेवनाने सर्व सुख देणारे हरी हरासारखे सुलभ होतात ॥११॥ (२२)रामगुणगण सुकवीरुपी शरदऋतूतील मनरूपी आकाशात तारांगणासारखे आहेत (२२) व रामभक्त सेवकांच्या जीवनधनासारखे रामगुणगण आहेत.॥१२॥(२४) ते काव्य (रामभक्तजनांना) सर्व सुकृताच्या फळांच्या पुष्कळ भोगांसारखे आहे. व(२५) जगाच्या हितासाठी (अवतरलेल्या) सर्वोपाधिरहित सर्व कपटादिरहित साधुलोकां सारखे आहे.॥१३॥(२६) सेवकांच्या मनरूपी मानसात ते हंसा सारखे वास करते व (२७) गंगेच्या तरंगमाला प्रमाणे पावन करणारे ते रामचरित होते.॥१४॥दो.(२८) जसा प्रचंड अग्नि इंधनाला जाळून टाकतो, त्या प्रमाणे कुपथ, कुतर्क, कुचाली व कलियुगाचेप्रबल दुर्गुण कपट, दंभ व पाखंड यांचे दहन रामगुणगण करतात.॥दो०-३२रा॥ रामचरित पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणां सारखे असून सर्वांसच सारखे सुखदायक आहे, (तरीपण) सज्जनरुपी कुमुदांना (रात्रविकासी कमळे) व सज्जनांच्या मनरुपी चकोरांना ते अधिक हितकर व अतिशय लाभदयक वाटते.॥दो०-३२म॥

उमा प्रश्‍न करि जशा प्रकारें । शंकर वदले जसं विस्तारें ॥
सकल हेतु तो वदु विस्तारुनि । कथा-प्रबंधाा विचित्र बनवुनि ॥
कथा श्रवणिं ही आली न जया । मानुं नये तेणें आश्चर्या ॥
ज्ञानी कथा अलौकिक ऐकति । जाणूनि असें न विस्मय मानति ॥
राम-कथेला मिति जगिं नाहीं । अशी प्रतीति तयां मनिं राही ॥
नाना रीतिं राम‍अवतारहि । रामायण शतकोटि अपारहि ॥
कल्पभेदिं हरिचरित सुशोभन । मुनिवरिं केलें विविधा गायन ॥
समजुनि असें, न संशय धरणें । श्रवणा प्रेमें सादर करणें ॥

दो० :- राम अनंत अनंत गुण अमित कथाविस्तार ॥
परिसुनि विस्मय करिति ना ज्यांना विमल विचार ॥ ३३ ॥

खंड-२— उमेने ज्या प्रकारे प्रश्न विचारले व शंकरांनी त्याचे उत्तर विस्तारपूर्वक जसे दिले. ॥ १ ॥ त्याचे सर्वकारण मी विचित्र कथा प्रबंध रचना करून विस्तारपूर्वक सांगेन. ॥ २ ॥ ही कथा ज्याने कधी ऐकली नसेल त्याने ही ऐकून आश्चर्य मानू नये ॥ ३ ॥ कारण ज्ञान्यांच्या कानी एखादी अलौकिक अपूर्व कथा आली तर ते आश्चर्य मानीत नाहीत कारण त्यांना असे माहीत असते की-॥४॥ रामकथेला जगात सीमा नाही, त्यामुळे त्यांच्या मनात असा विश्र्वास असतो की-॥५॥रामाचे अवतार नाना प्रकारचे होतात आणि रामायण शंभर कोटी श्लोकांचे असले तरी (रामचरित्र) अपार आहे.॥६॥ कल्पभेदानुसार (घडलेले) नाना प्रकारचे हरि (राम) चरीत्र मुनिश्रेष्ठांनी सुंदर रीतीने विविधा वर्णन केले आहे. ॥७॥ हे असे समजून मनात संशय धरू नये व या कथेचे प्रेमाने व आदराने श्रवण करावे.॥८॥ दो.-रामचंद्र अनंत आहेत तसे त्यांचे गुण अनंत व त्यांच्या कथांच्या विस्ताराला सीमा नाहीत म्हणून ज्यांना विमल विचार असेल ते ही कथा ऐकून आश्चर्य (व संशय) मानणार नाहीत. ॥दो. ३३॥

दूर असे सब संशय करुनी । गुरुपदपंकजरज शिरिं धरुनी ॥
येइ कथेमधिं दोष न कसला । म्हणुनि विनतिकर जोडुनि सकलां ॥
नमुनीं सादर शिवास माथा । वर्णूं विशद रामगुणगाथा ॥
संवत सोळाशें एक्तीसां । करूं कथा नमुं हरिपदिं शीसा ॥
भौमवार नवमी मधुमासीं । येइ अयोध्यें चरित प्रकाशीं ॥
राम-जन्म-दिनिं कीं श्रुति वानति । तीर्थ सकल पुरि चालत ठाकति ॥
दनुज मनुज खग नाग अमर मुनि । करती रघुपतिसेवा येउनि ॥
जन्म महोत्सव रचिति सुजाण । करिति रामकलकीर्ति सुगान ॥

दो० :- मज्जति सज्जन-वृंद बहु पावन शरयू-नीरिं ॥
ध्यात जपति हृदिं राम जे सुंदर शाम-शरीरि ॥ ३४ ॥

याप्रमाणे सर्व संशय दूर करून व गुरूपदकमल धूळ मस्तकावर धारण करुन-॥१॥ या कथेत कोणताही दोष उत्पन्न होऊ नये एवढ्यासाठी मी सर्वांना (पुन्हा) हात जोडून विनंती करतो॥२॥ आता शिवाला आदराने साष्टांग नमस्कार करून रामचंद्रांच्या उज्वल गुणाची कथा वर्णन करतो.॥३॥ हरिचरणांवर मस्तक ठेऊन संवत १६३१ त ही कथा (सुरु) करतो.॥४॥ चैत्र महिन्यात नवमी तिथीला मंगळवारी हे चरित्र अयोध्येत प्रकाशात आले.॥५॥ श्रुती वर्णन करतात की रामजन्माच्या दिवशी सर्व तीर्थे अयोध्येत रघुनायक-सेवा (पूजा जपादिभक्ती) करतात दानव, मानव, नाग, देव, मुनी हे सारे यात सामिल होतात.॥६-७॥ सुजाण लोक जन्माच्या महोत्सवाची सर्व रचना करतात व रामचंद्रांच्या सुंदर कीर्तीचे सुंदर गान करतात.॥८॥ दो.- सज्जनाच्या झुंडी पवित्र शरयू जलात बुड्या मारून स्नान करतात व नंतर सुंदर श्यामवर्ण शरीर असलेल्या रामचंद्राचे ध्यान हृदयात करीत रामनामाचा जप करतात.॥दो. ३४॥

दर्शन मार्जन मज्जन पानें । अघ हरि वदति वेद पुराणें ॥
नदी पुनीत अमित महिमा अति । वदुं न शके शारदा विमलमति ॥
रामधामदा पुरी सुशोभन । लोकीं सकल विदित अति पावन ॥
अमित जीव जगिं खाणीं चारी । त्यजि तनु अवधिं, न ये संसारी ॥
जाणुनि सबपरिं पुरी मनोहर । सकल सिद्धिदा सुमंगलाकर ॥
विमल कथेच्या कृत आरंभा । श्रवत विनाश काम-मद-दंभां ॥
रामचरितमानस हिज नामहि । श्रवणिं पडत पावति विश्रामहि ॥
मन करि विषयवनानलिं जळतां । होइ सुखी या सरांत पडतां ॥
रामचरितमानस मुनि-भावन । विरचित शंभु सुशोभन पावन ॥
त्रिविध दोष दुख दैन्य विदाहक । सकल कलुष कलिकुचालि नाशक ॥
रचुनी महेश मानसीं राखति । सुसमय मिळतां शिवेस भाषति ॥
यास्तव रामचरित मानस वर । हृदिं हेरुनि दे नाम हर्षि हर ॥
वदूं कथा ती सुखदा सुंदर । श्रवा सुजन मन लाउनि सादर ॥

दो० :- जसं मानस, जे परिं घडे जगीं प्रचारा हेतु ॥
तो प्रसंग वदतो सकल स्मरुनि उमा वृषकेतु ॥ ३५ ॥

दर्शन, मार्जन, मज्जन व जलपान यांनी शरयू नदी पापनाश करते असे वेदपुराणे वर्णन करतात. ही नदी अती अमित पुनीत आहे व हिचा महिमा अति अमित आहे व तो वर्णन करणे विमल बुद्धी असलेल्या शारदेला सुद्धा शक्य नाही ॥१-२॥ अयोध्या पुरी अती सुंदर असून रामधाम देणारी आहे व ती अती पावन आहे हे सर्व लोकांत प्रसिद्ध आहे.॥३॥ या जगात चारी खाणींचे अमित जीव आहेत, त्यातील जो कोणी अयोध्येत देहत्याग करतो तो पुन्हा जन्माला येत नाही ॥४॥ अशी ही पुरी सर्व प्रकारे मनोहर आहे व सर्व सिद्धी देणारी असून सर्व मंगलाची खाण आहे हे जाणून-॥५॥ मी या विमल कथेचा आरंभ येथे केला, तिचे श्रवण करताच काम मद दंभांचा नाश होईल. ॥६॥ या रामचरित्र कथेचे नाव रामचरित मानस असे ठेवले आहे. ही श्रवणीं पडताच विश्राम मिळतो.॥७॥ विषयरुपी वणव्यात जळत असणारा मनरुपी हत्ती जर या मानस-सरोवरात शिरला तर तो जीव सुखी होईल.॥८॥ मुनींना आवडणार्‍या या अतिसुंदर व पावन रामचरितमानसाची रचना प्रथम शंकरांनी केली.॥९॥ हे त्रिविध दोष, दु:खे व दरिद्र्य-दैन्य यांना साफ जाळून टाकणारे असून कलिजनित सर्व कुचाली व कलुषे यांचा नाश करणारे आहे.॥१०॥ महेशाने रचून आपल्या मानसातच ठेवले होते व योग्य वेळ आल्यावर ते शिवेला-पार्वतीला सांगितले ॥११॥ म्हणून शंकरांनी हृदयात विचार करून त्या रामचरित्राला “रामचरितमानस” हे उत्तम नांव हर्षाने ठेवले.॥१२॥ तीच सुंदर व सुखदायक कथा मी आता सांगतो. तरी सज्जनांनी ती आदराने मन लावून श्रवण करावी.॥१३॥
मानस प्रसंग- दो.- मानस जसे आहे ते ज्या प्रकारे तयार झाले व ज्या कारणाने जगात प्रचार झाला तो सर्व प्रसंग मी उमा-महेशांचे स्मरण करून सांगतो.॥दो.३५॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP