॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय १६ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

पावति दशरथ जिवन-मरण-फल । ब्रह्मांडें बहु भरि यश निर्मल ॥
जगत राम-विधुवदन विलोकित । राम-व्योगें भरण सुशोभित ॥
शोकाकुल सब राण्या रडती । रुप शील बल तेज वानती ॥
विविधपरीं बहु विलाप करती । वारंवार धरतिवर पडती ॥
विलपति विकल दास नी दासी । घरोघरीं रडती पुरवासी ॥
आज अस्तला रविकुलभानू । धर्म-अवधि गुण-रूप-निधानू ॥
देती सकल शिव्या कैक‍इला । नेत्रहीन जी करी धरणिला ॥
विलपत यापरिं रात्र सरे ती । ज्ञानी सकल महामुनि येती ॥

दो० :- मग वसिष्ठ समयोचितां सांगुनि इतिहासांस ॥
निज-ज्ञानतेजें हरति सकलांच्या शोकास ॥ १५६ ॥

जिवनाचे व मरणाचे फळ दशरथास मिळाले अशा निर्मल यशाने अनेक ब्रह्मांडे भरली ॥ १ ॥ जिवंतपणी रामचंद्रांचा मुखचंद्रावलोकन केला व रामविरहाने मरण सुशोभित केले ॥ २ ॥ सर्व राण्या ( एकी शिवाय) व्याकुळ होऊन शोकाने आक्रोश करीत ( रडत रडत) दशरथांच्या रुप, शील, बल, तेज इ. गुणांचे वर्णन करुं लागल्या ॥ ३ ॥ त्या सर्व नाना प्रकारांनी विलाप करीत आहेत व जमिनीवर लोळण घेत आहेत ॥ ४ ॥ सर्व दास व दासी विलाप करीत आहेत व घरोघरी नगरवासी रडत आहेत ॥ ५ ॥ आज सूर्यकुळाला प्रकाशित करणारा, धर्माची सीमा आणि गुण व रुप यांचे निधान असा भानु अस्तास गेला ॥ ६ ॥ सर्वलोक कैकयीला शिव्या देऊ लागले, कारण तिने जग नेत्रहीन केले ॥ ७ ॥ याप्रमाणे सर्वलोक विलाप करीत असतानाच ( ती रामवनवासाची सहावी) रात्र संपली ( व सकाळी) सगळे ज्ञानी मुनी ( अंत: पुरात) आले ॥ ८ ॥ मग वसिष्ठ मुनींनी प्रसंगानुकूल असे अनेक इतिहास सांगीतले व आपल्या ज्ञानाच्या तेजाने सर्वांचा शोक नाहीसा केला ॥ दो० १५६ ॥

तेल-तरीमधिं नृपतनु ठेवुनि । सांगितलें दूतां बोलावुनि ॥
भरतापाशिं पळत तुम्हिं जाही । सांगुं नका नृपवृत्त कुणाही ॥
जा इतकेंच वदा भरताप्रति । युग बंधुंस गुरु नेण्या धाडति ॥
दूत धावले आज्ञा ऐकत । वरवाजिस वरवेगिं लाजवित ॥
अयोध्येंस जैं अनर्थ चाले । तैंहुनि कुशकुन भरता झाले ॥
रात्रिं भयानक पाहे स्वप्नां । जागत करि कटु कोटि कल्पना ॥
ब्राह्मण भोजन बहु, दिनिं दानां । करि अभिषेक शिवां विध नाना ॥
प्रार्थुनि मनिं मागतात शंभुसि । कुशल मातृ-पितृ-परिजन-बंधुंसि ॥

दो० :- भरत सचिंत असे मनिं तोंच दूत यीतात ॥
गुर्वाज्ञा ऐकत म्न्मुनि गणेशास निघतात ॥ १५७ ॥

मग तेलाने भरलेल्या नावेत राजाचा देह ठेवला आणि दूतांना बोलावून घेवून त्यांस सांगीतले की ॥ १ ॥ भरतापाशी जाऊन सुद्धा इतकेच सांगा की दोघा भावांना नेण्यासाठी गुरुजींनी आम्हांला धाडले आहे ॥ २ ॥ ही आज्ञा ऐकताच दूत धावत निघाले व त्यांनी आपल्या उत्तम वेगाने उत्तम वाजींना सुद्धा लाजविले ॥ ३ ॥
भरतागमन प्रेम प्रकरण १५७/५ ते अ६९/६
ज्यावेळी आयोध्येत अनर्थ चालू झाला तेव्हापासून भरताला अपशकुन होऊ लागले ॥ ४ ॥ रात्री भयानक स्वप्ने पडू लागली व जागा झाल्यावर भरत अनंत प्रकारच्या कल्पना करु लागले ॥ ५ ॥ ( दु:स्वप्न व दोषशांती साठी) रोज पुष्कळ ब्राह्मणांना भोजन घालू लागले, रोज पुष्कळ दाने देऊं लागले व शंकरांस नाना प्रकारांनी अभिषेक करु लागले ॥ ६ ॥ शंभूला मनात प्रार्थना ( नवस) करुन माता - पिता परिजन व भावांचे कुशल मागू लागले ॥ ७ ॥ भरत असे चिंतामग्न झाले आहेत तोच दूत येऊन पोचले व गुरुजींची आज्ञा कानी पडताच ( काही विचारपूस न करतांच) भरत गणेशाला नमून निघाले ॥ दो० १५७ ॥

हय समीर-वेगानें हाकित । बिकट नद्या गिरि वन ओलांडित ॥
चिंता अति मनिं काहिं रुचेना । उडुनिच जावें मनीं भावना ॥
एक निमेष जाइ सम वत्सर । असे निकट पुरि आले सत्वर ॥
नगरिं शिरत किति कुशकुन घडती । काक कुठायीई कटु ओरडती ॥
खर कोल्हे प्रतिकूल ओरडति । श्रवुनि भरत मनिं शूल तदा अति ॥
शीहत वन बागा सर सरिता । नगरी भारि भयाण निरखितां ॥
खग मृग हय गज नाहीं बघवत । राम वियोग-कुरोगे मृतवत ॥
नगरनारिनर विषण्ण भारी । जणुं सब हरले संपत् सारी ॥

दो० :- पुरजन भेटती वदति ना हळुच नमुनि जातात ॥
भरत कुशल पुसुं शकति ना भय विषाद चित्तांत ॥ १५८ ॥

जोराच्या वार्‍याच्या वेगाने घोडे हाकलीत बिकट नद्या पर्वत वने ओलांडित भरत चालले ॥ १ ॥ मन चिंतातूर असल्याने काहीच गोड वाटत नाही व मनांत अशी भावना आहे की उडूनच जावे ॥ २ ॥ ( पण ते अशक्य़ ! त्यामुळे) एकेक निमिष एकेक वर्षासारखे जात आहे, अशा रीतीने भरत त्वरेने अयोध्यापुरीजवळ येऊन पोचले ॥ ३ ॥ नगरात शिरताना पुष्कळ अपशकुन होऊ लागले डोमकावळे प्रतिकूल ठिकाणी कर्णकर्कश ओरडू लागले ॥ ४ ॥ गाढव व कोल्हे प्रतिकूल रडू लागले; तेव्हा ते ऐकून भरताच्या हृदयास फार पीडा होऊं लागली ॥ ५ ॥ वने, बागा, तलाव व नद्या निष्प्रभ अशुभ दिसल्या व नगरीकडे पाहीले तो ती ही भयाण दिसली ॥ ६ ॥ पशुपक्षी, हत्ती, घोडे यांच्याकडे तर बघवत नाही; कारण की रामवियोगरुपी दुष्ट रोगाने ते मेल्यासारखे झाले आहे ॥ ७ ॥ नगरातील स्त्रिया व पुरुष तर असे भारी खिन्न दिसले की जणूं सर्वांची सर्व संपत्तीच नष्ट झाली असावी ॥ ८ ॥ पुरवासी लोक ( तुरळक) भेटतात पण कोणी काहीच न बोलता हळूच ( चोरासारखे) जोहार ( नमन) करुन चटकन निघून जातात भरत लोकांना व लोक भरताला कुशल विचारुं शकत नाहीत; कारण दोघांनाही चित्तांत भय व विषाद वाटत आहे ॥ दो० १५८ ॥

हाटां वाटां बघवत वदति । व्यापि पिरिस जणुं दव दिशिं दाही ॥
श्रवुनि ’येत सुत कैकय नंदिनि । हर्षे रविकुल जलरुह-चांदिणि ॥
आरति सजुनि उदित ये धावत । द्वारिंच भेटुनि ने भवनाप्रत ॥
भरता परिजन दुःखी दिसले । जणूं वनजवन तुहिनें सुकलें ॥
कैकयी हर्षित वचतनमनिं । जणुं दव लावुनि मुदित किरातिनि ॥
बघुनि सचिंत उदास सुतासी । पुसे "कुशल अमचे पितृवासीं" ॥
भरतें सकल कुशल सांगितलें । क्षेम कुशल निज कुलास पुसलें ॥
कुठें तात वद माता सकलहि । सिता कुठें, प्रिय राम-लक्ष्मणहि ॥

दो० :- श्रवुनी प्रेमळ सुतवचन नेत्रिं कपट-जल आणि ॥
भरत-कर्ण-मन-शूलसम । वदे पापिणी वाणि ॥ १५९ ॥

बाजार व रस्ते यांच्याकडे तर भरतास बघवे ना; असे वाटले की नगराला दाही दिशांस वणवा लागला आहे की काय ? ॥ १ ॥ आपला मुलगा येत आहे हे ऐकताच कैकय राजाला आनंद देणारी व सूर्यवंशरुपी जलरुहांना ( पक्षांना) चांदण्या रात्रीसारखी झालेली ( कैकेयी) हर्षित झाली ॥ २ ॥ आरती सजवून ती आनंदाने ( राजद्वाराशीच) धावत आली व ( आरती लोवाळून) राजद्वाराशीच पुत्राला भेटून आपल्या वाड्यात घेऊन आली. ॥ ३ ॥ हिमपाताने जसे कमलांचे ताटवे सुकुन जावे तसाच जणू सर्व परिसर भरतास दु:खी दिसला ॥ ४ ॥ ( पण) कैकेयी मात्र वाणीने शरीराने व मनाने अशी हर्षित दिसली की जणूं ( एखाद्या सुंदर वनास) वणवा लावून एखादी भिल्लिण आनंदित झालेली असावी ॥ ५ ॥ आपल्या सुतास सचिंत व उदास असलेला पाहून ती विचारते की आमच्या वडिलांच्या घरचे कुशल आहे नां ? ॥ ६ ॥ भरताने सर्व कुशल सांगीतले व आपल्या कुळातले क्षेम व कुशल विचारले ॥ ७ ॥ बाबा कुठे आहेत ते सांग सगळ्या माता कुठे आहेत ते पण सांग व सीता कुठे आहे ? प्रिय बंधू राम व लक्ष्मण कुठे आहेत ते सांग ॥ ८ ॥ सुताचे प्रेमळ वचन ऐकून तिने नेत्रांत कपटजल आणले व ती पापीण भरताच्या कानांना व मनाला शूलाप्रमाणे वाटणारी वाणी बोलली ॥ दो० १५९ ॥

तात ! गोष्ट मी सकल जुळवली । साह्य मंथरा विचारि बनली ॥
कार्य बिघडवी मधें विधि जरा । गेले भूपति सुरपति नगरा ॥
भरत ऐकतां विवश विषादा । सभय करी जणुं केसरि-नादा ॥
आत तात हा ! तात पुकारी । पतित भूतळीं व्याकुळ भारी ॥
जातां पाहुं न शकलो तुजला । सोंपविला रामासि न मजला ॥
धीर धरुनि सावरुनी उठले । पितृमृति-हेतु माइ ! वद वदले ॥
सुत-वच ऐकुनि कैकयि कथिते । चिरुनि मर्म जणुं विषा घालिते ॥
अथ पासुनि किति अपली करणी । कुटिल कठोर मुदित-मन वर्णीं ॥

दो० :- भरता विसरे पितृमरण श्रवत राम-वनवास ॥
जाणुनि आपण हेतु हृदिं स्तब्ध धरुनि मौनास ॥ १६० ॥

तात मी सगळी गोष्ट जमवून आणली व बिचारी मंथरा मला साह्य झाली. ॥ १ ॥ पण दैवाने मधें जरासा बिघाड गेला ( इतकेच तो हा की) भूपती इंद्राच्या नगरीला गेले ॥ २ ॥ ( भूपती सुरपती नगरा गेले) हे ऐकताचे भरत विषादाला इतके विवश झाले की, जणूं सिंहाची गर्जना ऐकून हत्तीच घाबरले ॥ ३ ॥ तात ! तात ! हा तात ! असे पुकारले व भरत फारच व्याकुळ होऊन जमिनीवर पडले ॥ ४ ॥ बाबा ! तूं ( स्वर्गात) जाताना मी तुला पाहू शकलो नाही ; की मला रामचंद्रांच्या हाती सोपविला नाही ॥ ५ ॥ ( मग) धीर धरुन सावरुन उठले व म्हणाले की माई ! बाबांच्या मरणाचं ( कारण) तरी सांग ॥ ६ ॥ सुताचे म्हणणे ऐकून कैकयी सांगते म्हणजे जणूं क्षत चिरुन त्यात विषच भरत आहे ॥ ७ ॥ कुटील कठोर कैकेयीने अथपासून इतिपर्यंत आपली कुटील कठोर करणी मुदित मनाने सांगीतली ॥ ८ ॥ रामचंद्रांच्या वनवासाची वार्ता ऐकताच पित्याचे मरणही भरत विसरले आपणच कारण आहोत हे जाणून भरत मौन धरुन स्तब्ध राहीले ॥ दो० १६० ॥

पाहुनि विकल सुता समजावी । क्षतावरी क्षारा जणुं लावी ॥
शोचनीय नहिं नृपति तात हे । भुक्त भोग, यश-सुकृत-संग्रहें ॥
जगतां सकल जन्म-फल पावतिं । अंति अमर पति सदना गांठति ॥
अशा विचारें शोक सोडणें । सह समाज पुर-राज्य भोगणें ॥
राजकुमार सभय अति ऐकत । पिकलेल्या क्षतिं इंगळ लागत ॥
सोडि उसासे हृदयिं धीर धरि । पापिणि कृत कुलनाश सर्वपरिं ॥
होति दुष्ट अशि तुज इच्छा जर । कां मज जन्मतां न वधला तर ॥
तरु तोडुनि शाखेस शिंपलें । मीन जगविण्या नीर उपसलें ॥

दो० :- हंसवंश दशरथ जनक भाऊ लक्ष्मण राम ॥
झालिस जननि जननि तूं स्ववश न जईं विधि वास ॥ १६१ ॥

सुत व्याकुळ झाला आहे असे पाहून कैकेयी त्याची समजूत घालीत आहे म्हणजे जणूं क्षतात मीठच घालीत आहे ॥ १ ॥ तात ! राजांच्या बद्दल शोक करणे योग्य नाही कारण की राजांनी सुकृताचा व यशाचा संग्रह केला आणि भोग ही भोगले ॥ २ ॥ जिवंत असतां जन्माचे त्यांना सर्व फळ मिळाले व शेवटी सुरपतीच्या अमरपतीच्या सदनास गेले ॥ ३ ॥ असा विचार कर व हा शोक सोड व सर्व राजसमाजासह ( मंत्री, कोष, सेना, राजधानी इ.) अयोध्येच्या राज्याचा उपभोग घे ॥ ४ ॥ ( कैकेयीचे हे भाषण) ऐकताच राजकुमार ( भरत) असा घाबरा झाला की जणूं पिकलेल्या जखमेवर निखारेच ठेवले गेले ॥ ५ ॥ उसासे टाकीत धीर धरुन म्हणाला की पापिणी ! तूं सर्वतोपरी कुळाचा विध्वंस केलास ॥ ६ ॥ तुला जर अशी दुष्ट वासना होती तर मी जन्मतांच मला ठार का नाही मारलास ? ॥ ७ ॥ तूं वृक्ष तोडून शाखेला पाणी घातलेस व माशाला जगविण्यासाठी पाणी उपसून टाकलेस ॥ ८ ॥ सूर्यवंशात माझा जन्म, दशरथ राजा जनक ( वडील) लाभले, राम - लक्ष्मणांसारखे भाऊ मिळाले, पण जिच्या उदरातून जन्म झाला ती जन्मदात्री ( जननी) तूं झालीस ! पण दैव प्रतिकूल झाले म्हणजे स्वत:च्या अधीन काही नसते ॥ दो० १६१ ॥

कुमति ! कुमत हृदिं यदा ठरवले । खंड खंड कां हृदय न फुटलें ॥
वर मागत मनिं शूळ न उठले । जीभ झडुनि मुखिं किडे न पडलें ॥
नृपें प्रतीति तुझी कशि धरिली । मरणकाळिं विधिनें मति हरिली ॥
नारि-हृदय-गति नुमजे विधिंही । सकल कपट-अघ-अवगुण-खनिही ॥
सरल सुशील धर्मरत भूपति । ते केवीं स्त्रीस्वभाव जाणति ॥
जीव जंतु जगिं कोण असा ही । प्राणप्रिय रघुनाथ न ज्या ही ॥
तुज ते राम शत्रु अति गमले । कोण सत्य तूं वद मज काळे ! ॥
असश्ल ती अस मुखिं मसि लाउनि । डोळ्यांआड उठुनि बस जाउनि ॥

दो० :- राम-विरोधिनि-पोटचा विधि उपजवि मजला हि ॥
कोण पातकी मज सम वदूं वृथा तुज कांहि ॥ १६२ ॥

गे ! दुर्बुद्धी ! जेव्हा हे दुष्ट मत तू हृदयाने ठरवलेस तेव्हाच तुझ्य़ा हृदयाचे फुटून तुकडे तुकडे का नाही झाले ? ॥ १ ॥ वर मागताना तुझ्या हृदयात शूळ कां उठले नाहीत ? व जीभ झडुन तोंडात किडे कसे पडले नाहीत ? ॥ २ ॥ राजांनी तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवला ? मरणकाळ आल्याने प्रारब्धाने बुद्धी हरुन नेली ( हेच खरे) ॥ ३ ॥ स्त्री हृदयाची गति ब्रह्मदेवाला सुद्धा लागत नाही; व ही तर सर्व कपट, पाप, व अवगुण ( दोष) यांची साणच ! ॥ ४ ॥ आणि भूपती ( तर) सरळ हृदयाचे, सुशील व धर्मरत; ते ( या) स्त्रीचा स्वभाव कसा जाणू शकणार ! ॥ ५ ॥ जगांत असा जीव जंतू कोण आहे की ज्याला रघुनाथ प्राणप्रिय नाहीत ॥ ६ ॥ तेच राम तुला शत्रू वाटले तेव्हा काळे ! तूं आहेस तरी कोण हे मला सत्य सांग ॥ ७ ॥ व जी कोणी असशील ती अस ( मला काय करायचे तुझ्याशी; तुझा माझा संबंध संपला) मात्र आता तोंडाला काजळ फासून उठून दृष्टी आड जाऊन बस ( मला तोंड दाखवूं नकोस; तुझे काळे तोंड पाहण्याची माझी इच्छा नाही) ॥ ८ ॥ विधात्याने रामविरोधिनीच्या पोटी मलाच एकट्याला उत्पन्न केला, तेव्हा माझ्यासारखा पातकी कोण असेल ! पण तुला काही बोलणे व्यर्थ आहे ! ॥ दो० १६२ ॥ ( शेवटी सर्व दोष स्वत:वर घेतला)

श्रवुनि शत्रुहा मातृकुटिलता । क्रोधें जळे परी परवशता ॥
कुबडि तिथें त्या समयिं ठाकली । विविध विभूषणिं वसनीं नटली ॥
रुष्ट लक्ष्मणानुज तिज पाहुनि । जळत अनल घृत-आहुति पावुनि ॥
तडकन् कुबडा लाथ लावली । करत पुकार तोंडघशिं पडली ॥
कुबड भंगले कपाळ फुटलें । दशन पडुनि मुख रुधिरा स्रवलें ॥
हाय ! दैव ! मी काय बुडवलें । इष्ट करत फळ अनिष्ट मिळलें ॥
बघे रिपुघ्न किं खोटि नखशिखां । फरपटवी धर धरुनि तच्छिखा ॥
भरत दयानिधि तिला सोडवति । उभय बंधु गत कौसल्येप्रति ॥

दो० :- म्लान मलिनवसना विकल कृतशनु सुदुःखभारिं ॥
कनक-कल्पवरलता वनिं जाणों शुष्क तुषारिं ॥ १६३ ॥

भरताच्या मातेचा कुटीलपणा ऐकून शत्रुघ्नाचा क्रोधाने जळफळाट झाला आहे पण पराधीनतेमुळे काही करु शकत नाही ॥ १ ॥ त्याच वेळी विविध प्रकारच्या भूषणांनी व वस्त्रानी नटलेली कुबडी तेथे आली ॥ २ ॥ तिला पाहताच पेटलेल्या अग्नित तुपाच्या आहुती पडाव्या त्याप्रमाणे लक्ष्मणाच्या धाकट्या भावास रोष चढला ॥ ३ ॥ व त्याने तिच्या कुबडावर ताडकन लाथ लगावली; त्या बरोबर मोठ्याने ओरडत ती तोंडघशी पडली ॥ ४ ॥ तिचे कुबड भंगले, कपाळ फुटले, दात पडले व तोंडातून रक्त वाहू लागले ॥ ५ ॥ ( तेव्हा ती म्हणाली) हाय दैवा ! मी याच काय बुडवलं ? याचं चांगलं करायला गेले ( केले) त्याचे वाईट फळ मिळाले ! ॥ ६ ॥ शत्रुघ्नाने जाणले की ही नखशिखान्त खोटी आहे म्हणून तिच्या शिखा केसांचा झुपका पुन: पुन्हा धरुन तिला वारंवार फरफटत ओढूं लागले ॥ ७ ॥ दयानिधी भरताने तिला सोडविली व दोघे भाऊ कौसल्येकडे गेले ॥ ८ ॥ ( कौसल्या अशी दिसली) अगदी म्लान झालेली ( निस्तेज, पांढरी फटफटीत) वस्त्रे मलीन झालेली व दु:खाच्या अत्यंत भाराने शरीर कृश झालेली, अशी कौसल्या दिसली की जणूं वनात सोन्याची सुंदर कल्पलता तुषाराने ( = हिम - पाताने) सुकुन गेली आहे ॥ दो० १६३ ॥

माता भरता बघत धावली । घेरि येइ मूच्छित महिं पडली ॥
बघत भरत अतिशय विव्हळता । पडे पायिं तनुभान विसरला ॥
माए ! दाखव तात कुठें ते- । बंधु रामलक्ष्मण सह सीते ॥
जगीं जन्मली क‍इक‍इ कां ही । जन्मे तरि कां वांझ न राही ॥
ती प्रसवे मज स्वकुल-कलंका । अपयश पात्रा प्रियद्रोहका ॥
त्रिभुवनिं मजसा कोण अभागी । तव गति अशि माते ! ज्यालागीं ॥
पिता स्वर्गिं, रघुवर वनिं, केतू- । मी केवळ सब अनर्थ-हेतू ॥
धिग् मजला वेणू-वन-दहना । दोष-दुःख-अति दाह-भजना ॥

दो० :- भरतवचन मृदु परिसुनी उठे सावरुनि माय ॥
घे उठवुनि हृदयीं तया नेत्रांतुनि जल जाय ॥ १६४ ॥

( आशी) माता भरताला पाहताच ( भेटण्यासाठी) उठून धावली व घेरी येऊन जमिनीवर मूर्च्छित पडली ॥ १ ॥ तिला पाहताच भरत अत्यंत व्याकुळ झाला, तिच्या पाया पडला व ( तो ही) देहभान विसरला. ॥ २ ॥ माते ! बाबा कुठे आहेत ते दाखव व सीतेसह दोघे बंधू रामलक्ष्मण कुठे आहेत ते दाखव ॥ ३ ॥ कैकेयी जगात जन्मालाच कां आली ? बरें आली जन्माला तर वांझोटी का नाही राहीली ? ॥ ४ ॥ तिने माझ्यासारख्या स्वकुळाला कलंक लावणार्‍या, प्रियजनांचा द्रोह करणार्‍या व अपयशाचे पात्र बनणार्‍याला जन्म दिला ॥ ५ ॥ माते ! तुझी अशी दशा ज्याच्यामुळे झाली, त्या माझ्यासारख्या अभागी त्रिभुवनात कोण आहे ? ॥ ६ ॥ पिता स्वर्गात ( गेले) रघुवर राम वनात गेले, इत्यादी सर्व अनर्थाचा हेतू केवळ मीच ( धूम) केतू आहे ॥ ७ ॥ वेणूवनात अग्नी झालेल्या व अतिदोष दु:खे व अतिदाह यांचे भाजन स्थान बनलेल्या माझा धिक्कार असो ॥ ८ ॥ भरताचे नम्र मृदु भाषण ऐकून माता सावरुन उठली व तिने भरताला उठवून पोटाशी धरले व तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ॥ दो० १६४ ॥

उजू स्वभाव माय हृदिं घेई- । प्रेमें, राम परत जणुं येई ॥
मग लक्ष्मण-लघु-बंधुसि भेटत । शोक हृदीं स्नेहहि ना मावत ॥
बघुनी स्वभाव सर्वहि म्हणती । कां न असें, अशि राममाय ती ॥
घे निजाम्किं माता भरताला । अश्रु पुसुनिं मृदु वचली बाळा ! ॥
बा ! अझुनिहि धर धीरा वासरा । शोक सोड हा कुसुमयिं न बरा ॥
नको मानुं मनिं हानीग्लानी । काल-कर्म-गति अघटित गणुनी ॥
द्यावा दोष न कुणाहि ताता ! । सर्वस्वीं मज वाम विधाता ॥
या दुःखांतहि मला जगवि तो । न कळे अझुनिहि काय वांछितो ॥

दो० :- पित्राज्ञें भूषण वसन त्यजुनि तात ! रघुवीर ॥
हर्ष विषाद न जरा हृदिं नेसति वल्कल-चीर ॥ १६५ ॥

मग राममाता लक्ष्मणाच्या धाकट्या भावाला ( कडकडून) भेटली आणि शोक व स्नेह तिच्या हृदयात मावेनासे झाले ॥ १-२ ॥ हा तिचा स्वभाव पाहून सर्वच म्हणू लागतात की राममाताच ती ! अशी कां बर असणार नाही ? ॥ ३ ॥ कौसल्येने भरताला आपल्या मांडीवर घेतला ( बसविला), त्याचे अश्रू ( आपल्या पदराने) पुसले व गोड शब्दांनी म्हणाली की बाळा ! ॥ ४ ॥ बा ! वत्सा ! अजूनही धीर धर, कुसमयीं अयोग्य वेळी शोक करणे बरे नाही ( हे जाणून) शोक सोड ॥ ५ ॥ काळाची व कर्माची गती अघटित असते हे जाणून हानीची ग्लानी मनात ( सुद्धा) मानू नकोस ॥ ६ ॥ बाळा ! ( ताता) कोणालाही दोष देऊ नकोस बरें ! विधाता सर्व प्रकारे माझ्यावर उलटला आहे त्याला कोण काय करणार ! ॥ ७ ॥ ( कारण) त्याने अशा या दु:खात ( सुद्धा) मला जगविली आहे; ( तेव्हा) अजूनीही आणखी काय करण्याची त्याची इच्छा आहे ते काही कळत नाही ॥ ८ ॥ बाळा ! ( भरता) रघुविराने वडिलांच्या आज्ञेने वस्त्र व भूषणे यांचा त्याग केला व शोक किंवा हर्ष न मानत वल्कलवस्त्रे नेसले ॥ दो० १६५ ॥

राग रोष ना, प्रसन्न आनन । सकलां विविधपरीं परितोषुन ।
जात वना सीता गत संगीं । राहि न राहि न रामचरण अनुरागी ॥
श्रवत उठुनि गत लक्ष्मण साथ हि । राहि न यत्‍न करित रघुनाथ हि ॥
तैं रघुपति सर्वां शिर नमती । लघुबंधूसीते सह निघती ॥
गत वनिं राम नि सीता लक्ष्मण । गेल्यें ना, पाठविले प्राण न ॥
हें घडलें देखत नयनां या । त्यजि न अभागि जीव तरि काया ॥
लाज न मज मत्प्रेम पहातां । रामसदृश सुत मी तन्माता ॥
जिवन मरण नृप नीट समजले । हृदय कुलिशशत-सम मम घडलें ॥

दो० :- परिसुनि कौसला-वचन भरत नि राणीवास ।
व्याकुळ विलपति, राजगृह जाणों शोक निवास ॥ १६६ ॥

मनांत कशाची आसक्ती ( राग - हिंदी - रंग) नाही व कोणावर रोष नाही; मुख प्रसन्न होते; सर्वांचा विविध प्रकारे परितोष करुन ( रघुनाथ) वनांत जाण्यास निघाले ॥ १ ॥ हे ऐकून सीताही त्यांच्याबरोबर निघाली रामचरणी अनुरागी असल्यामुळे ( सर्वांनी सांगून सुद्धा) राहीली नाही ॥ २ ॥ हे ऐकून लक्ष्मण सुद्धा वनात बरोबर जाण्यास निघाला व रघुनाथाने ( घरी ठेवण्याचा) यत्‍न केला तरीही राहिला नाही ॥ ३ ॥ मग सर्वांना नमन करुन रघुपति निघाले - चालू लागले व त्यांच्या बरोबर धाकटा भाऊ लक्ष्मण व सीताही गेली ॥ ४ ॥ राम सीता व लक्ष्मण वनांत गेले आणि मी गेले नाही तर नाहीच, पण प्राणही ( बरोबर) पाठविले नाहीत ॥ ५ ॥ हे सगळे माझ्या या डोळ्यादेखत घडले तरी माझा अभागी जीव देहाला सोडून गेला नाही. ॥ ६ ॥ माझे प्रेम पाहून मला लाज वाटत नाही ( म्हणण्यास) की रामासारखा पुत्र नी मी त्याची माता ! ॥ ७ ॥ जगणे व मरणे हे महाराजांनाच चांगले समजले, ( पण) माझे हृदय मात्र शंभर वज्रांसारखे ( कठोर) घडलेले आहे ॥ ८ ॥ कौसल्येचे बोलणे ऐकून भरत व सर्व राणीवसा व्याकूळ होऊन असा विलाप करत आहेत की जणू सगळे राजगृह शोक निवासच बनले आहे ॥दो० १६६ ॥

विलपति विकल भरत दो भ्राते । कौसल्या धरिते हृदयातें ॥
नानापरि करि भरत-सांत्वना । किति विवेकमय सांगुनि वचनां ॥
भरत सांत्विती सब मातांना । वदुनि कथा निगमागम नाना ॥
छल विहीन शुचि सरल सुवाणी । भरत बोलले जोडुनि पाणी ॥
जें अघ माय बाप सुत मारुनि । ग् गोष्ठ किं भूसुर पुर जाळुनि ॥
जें अघ नारी बालक मारुनि । मित्र महीपति यां विष घालुनि ॥
जीं पातक उपपातक अस्तीं । कर्म वचन मन-भव कवि वदती ॥
तीं पापें विधि देवो माएं । हें मत जर मज संमत माते ! ॥

दो० :- जे सोडुनि हरिहरचरण भजति घोर भूतांहि ॥
तद्‌गतिं विधि दे जननि मत जर हें मान्य मला हि ॥ १६७ ॥

भरत व शत्रुघ्न हे दोघे व्याकुळ होऊन विलाप करित असता कौसल्येने त्या भावांना पोटाशी धरले ॥ १ ॥ व तिने पुष्कळ विवेकपूर्ण वचने सांगून भरताचे ( व शत्रुघ्नाचे) सांत्वन केले ॥ २ ॥ ( मग) श्रुति व पुराणे यांतील विविध कथा सांगून भरताने सकल मातांचे सांत्वन केले ॥ ३ ॥ नंतर निष्कपट, पवित्र व सरल अशी वाणी भरत हात जोडून बोलू लागले ॥ ४ ॥ माता पिता किंवा पुत्र यांची हत्या केल्याने जे पाप लागते, गाईचे गोठे व ब्राह्मणाचे गाव यांना आग लावण्याने जे पातक लागते ॥ ५ ॥ स्त्री वा बालक यांचा वध केल्याने जे पाप लागते व मित्र किंवा राजा यांना विष घातल्याने जे पाप लागते ॥ ६ ॥ जी कायिक, वाचिक, मानसिक पापे कवींनी वर्णिली आहेत व जी पातके व उपपातके आहेत ॥ ७ ॥ हे माते ! हे मत जर मान्य असेल तर ती सर्व पापे विधाता मला देवो. ॥ ८ ॥ हरि व हर यांचे चरण सोडून ( यांस न भजतां) जे कोणी घोर भूतांना भजतात त्यांना जी दुर्गती प्राप्त होते ती, हे जननीचे मत जर मला मान्य असेल तर विधी मलाही देईल - देवो. ॥ दो० १६७ ॥

वेद विक्रयी धर्मदुही जे । पिशुन पराविं पाप वदती ते ॥
कुटिल ललीप्रिय कपटी क्रोधी । वेद-विदूषक निश्व-विरोधी ॥
लंपट लोभि लोलुपाचारी जे परधनकामी परदारी ॥
त्यांची घोर गती मी पावें । जर माते ! मातें हें ठावें ॥
जे नहिं साधु संग-अनुरागी । पथ परमार्थ-विमूख अभागी ॥
नरतनु मिळुनि न हरिला भजती । हरिहर-सुयशा प्रिय न मानती ॥
श्रुतिपथ तजुनि वाम पथ धरती । वंचक वेषें जगां ठकवती ॥
त्यांची गति मज देवो शंकर । जननि ! भेद हा मी जाणें जर ॥

दो० :- सत्य भरत वच सहज ऋजु परिसुनि वदली माय ॥
ताअ ! रामप्रिय तूं सदा अससि वचन-मन-काय ॥ १६८ ॥

वेदाची विक्री करणारे, धर्माचे दूध काढून घेणारे, दुसर्‍यांची पापे सांगणारे जे पिशुन ( चहाडखोर) ॥ १ ॥ कुटील, कपटी, युद्ध - भांडण - कलह ज्यांना प्रिय वाटतात क्रोधी वेदांची निंदा - थट्टा वगैरे करणारे, विश्वाशी ( सर्वांशी) विरोध करणारे ॥ २ ॥ लोभी विषयलंपट दंभी, परधनाची कामना करणारे स्त्री - लंपट ॥ ३ ॥ यांना जी दुर्गती मिळते ती हे माते ! हे जर मला माहीत असेल तर मला मिळो - मिळेल ॥ ४ ॥ साधुसंगतीबद्दल ज्यांना प्रेम वाटत नाही, जे अभागी परमार्थ मार्गापासून विमुख आहेत ॥ ५ ॥ मनुष्य देह मिळाला असून जे भगवंताचे ( हरीचे) भजन करीत नाहीत; ज्यांना हरि व हर यांचे सुयश प्रिय वाटत नाही ॥ ६ ॥ श्रुतीमार्गाचा त्याग करुन जे वाममार्ग धरतात; आणि जे वंचक असून वेषाच्या बळावर जगाला ( लोकांना) फसवितात ॥ ७ ॥ जननि ! ( माझ्या जननीने केलेला) हा भेद जर मला माहीत असेल तर त्या सर्वाची, गती शंकर मला देवोत ॥ ८ ॥ भरताचे सत्य व सहज सरल भाषण ऐकून माता कौसल्या म्हणाली की बाळ ! तू वाणी, मन, काया यानी सदा रामप्रिय आहेस ॥ दो० १६८ ॥

प्राण राम प्राणाहुनि तुजला । प्रिय तूं प्राणांहुनि रघुपतिला ॥
विधु विषवर्षा करि हिअ आगी । होति वारिचर वार-विरागी ॥
ज्ञान न नाशी जरि मोहासी । तूं रामा प्रतिकुल नहोसी ॥
’तुज हें संमत’ जे जगिं म्हणती । ते स्वप्निं न सुख सुगति पावती ॥
वदुनि असें त्या हृदयीं धरले । स्रवती स्तन पय, नेत्र सजळले ॥
यापरिं करितां विलाप भारी । बसल्या सरली रात्रच सारी ॥
वामदेव तैं वसिष्ठ आले । अणविति सचिव महाजन सगळे ॥
मुनि बहु उपदेशिति भरताला । वदुनि उचित परमार्थ वचांला ॥

राम तर तुला प्राणांहून ( प्रिय) अधिक प्राण आहेत व तू रघुपतीला प्राणांपेक्षा प्रिय आहेस ॥ १ ॥ कदाचित चंद्र विषाचा वर्षाव करील व हिम आगीचा वर्षाव करिल, मासे कदाचित जल - विरागी बनतील ( जलाचा त्याग करतील) ॥ २ ॥ व ज्ञान सुद्धा जरी कदाचित मोहाचा नाश करु शकले नाही तरी सुद्धा तू ( कधी) रामाला प्रतिकूल होणार नाहीस ॥ ३ ॥ हे तुला संमत आहे असे जे कोणी म्हणतील त्यांना स्वप्नात सुद्धा सुख वा सद्‍गती मिळणार नाही ॥ ४ ॥ असे म्हणून कौसल्या मातेने भरतास हृदयाशी धरल्या बरोबर तिच्या स्तनांतून दूध पाझरुं लागले व नेत्र सजल झाले ॥ ५ ॥ या प्रमाणे पुष्कळ विलाप करता करता बसल्या बसल्या ती सारी रात्र संपली. ॥ ६ ॥
नृप क्रिया प्रकरण --
तेव्हा ( सकाळी) वामदेव व वसिष्ठ आले व सचिव आणि सगळे महाजन यांना बोलावून आणविले ॥ ७ ॥ मुनीनी प्रसंगानुरुप परमार्थाच्या चार गोष्टी सांगून भरताला पुष्कळ उपदेश केला ॥ ८ ॥ व ( मग म्हणाले) तात ! हृदयात धीर धरा व या समयी जे करणे उचित आहे ते आज करा गुरुवचनाने ( ते ऐकून) भरत उठले व सर्व तयारी करण्यास सांगीतली ॥ दो० १६९ ॥

दो० :- तात ! धीर हृदिं धरुनि कर समयोचित जें, आज ॥
गुरुवचनें उठूनी भरत करण्या सांगति साज ॥ १६९ ॥

वेद विदित नृप तनुला स्नपविति । परम विचित्र विमाना सजविति ॥
विनवि भरत मातांना राखत । सकल दर्शनाभिलाषि सहत ॥
आले चंदन-अगरु-भार किति । वस्तु सुगंधी रुचिर नसे मिति ॥
चिता शरयुतटिं रचुनि सजवली । जणुं सुरपुर-सोपान शोभली ॥
दाह क्रिया सविधि सब केली । स्नानें करुनि तिलांजलि दिधली ॥
श्रुति-स्मृती अनुसार पुराणां । भरत करति दशगात्र-विधानां ॥
आज्ञा देति जिथें जशि मुनिवर । तिथे तसें कृत सर्व अमित वर ॥
होतिं विशुद्ध देति बहु दानां । धेनु वाजि गज वाहन नाना ॥

दो० :- सिंहासन भूषण वसन अन्न धरणि धन धाम ॥
भरत भुसुरां देति ते झाले प्रपूर्ण काम ॥ १७० ॥

वेदविदीत नृपाच्या तनूला वेदविदित पद्धतीने स्नान घातले व परम विचित्र विमान सजवले ॥ १ ॥ भरताने विनंती करुन सर्व मातांना राहवल्या व त्या रामदर्शनाच्या अभिलाषेने राहिल्या ॥ २ ॥ चंदन, अगरु यांचे भारेच्या भारे व अनेक सुगंधी सुंदर पदार्थ अगणित आले ( महाजनांनी व इतरांनी स्वयंस्फूर्तीने आणले) ॥ ३ ॥ शरयूच्या तीरावर चिता रचून अशी सजविली गेली की जणू काय स्वर्गात जाण्याचा सुंदर जिनाच ॥ ४ ॥ याप्रमाणे सर्व दाहक्रिया विधीपूर्वक केली गेली व सर्वांनी स्नान करुन तिलांजली दिल्या ॥ ५ ॥ श्रुती - स्मृती पुराणोक्त पद्धतीने भरतानी दहा दिवसांची क्रिया यथासांग केली ॥ ६ ॥ वसिष्ठादि मुनिवरांनी जिथे जे जसे करण्याची आज्ञा दिली तेथे ते तसे अनेकपट व उत्तम प्रकारे केले ॥ ७ ॥ ( १२ व्या दिवशी) विशेष शुद्ध झाले व पुष्कळ दाने दिली ती धेनू, घोडे, हत्ती नाना प्रकारची वाहने ॥ ८ ॥ सिंहासने, विविध अलंकार, वस्त्रे धान्यादि पदार्थ जमिन, धन, घरे इ. भरताने ( व शत्रुघ्नाने) ब्राह्मणांना दिली व ते सर्व बाजूंनी पुर्णकाम झाले.

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP