॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ८ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

ती रघुवीर प्रभाव जाणे । तरि करि कपट शिवासि भयानें ॥
कृता परीक्षा कांहीं ना मी । नमिलें आपण तेंवीं स्वामी ॥
तुम्हिं जें कथिलें नव्हे मृषा तें । ही प्रतीति मम अती मनातें ॥
ध्यान धरुनि तैं शंकर पाहति । सर्व सतीकृत चरिता जाणति ॥
तदा राम-माये शिर नमिलें । जिनें सतीमुखिं मृषा वदविलें ॥
हरिइच्छा भावी बलवान् अति । हृदयीं शंभु सुजाण विचारति ॥
सीतावेष सतीनें धरला । शिवहृदिं खेद विशेषचि भरला ॥
जर करु अतां सतीशीं प्रीती । भग्न भक्तिपथ होइ अनीती ॥

दो० :- परम पुनीत, न टाकवे प्रेम करिन अति पाप ॥
प्रगट महेश न जरि वदति हृदयिं अधिक संताप ॥ ५६ ॥

सती परीत्यागादी प्रकरण -
सतीने रघुविराचा प्रभाव जाणला तरी सुद्धा भयाने शिवाजवळ कपट केले.॥१॥ ती म्हणाली की स्वामी ! मी काही सुद्धा परीक्षा घेतली नाही, आपण नमस्कार केलात तसाच मी केला.॥२॥ (कारण) तुम्ही म्हणालात ते खोटे असणे शक्य नाही ही माझ्या मनाला पक्की प्रचिती आहे. ॥३॥ मग शंकरांनी ध्यान धरून पाहीले तेव्हा सतीने केलेले सर्व चरित्र त्यास कळले ॥४॥ तेव्हा जिने सतीच्या तोंडून असत्य वदविले त्या राममायेला त्यांनी मस्तक नमविले.॥५॥ सुजाण शंभू मनात विचार करूं लागले की हरी इच्छा व भावी अती बलवान आहेत. ॥६॥ सतीने सीतेचे रुप घेतल्यामुळे शिवाच्या हृदयात विशेषच खेद भरला ॥७॥ (ते विचार करू लागले) जर आता (यापुढे) मी सतीशी प्रीति केली तर भक्तीमार्ग भग्न होईल व अनीती होईल. ॥८॥ दोहा – ती (सती) परम पुनीत असल्याने त्याग करता येत नाही व प्रेम करावे तर मोठे पाप घडते (अशा धर्मसंकटात शिव सापडले आहेत.) महेश जरी उघड बोलून दाखवित नसले तरी त्यांच्या हृदयात दाह होत आहे.॥दो. ५६॥

तैं प्रभुपदि शंकर शिर नमती । स्मरत राम, मनिं विचार उठती ॥
सतीभेट या तनुनें नाहीं । चित्ति करिति शिव संकल्पा ही ॥
शंकर ठरवुनि असें धीरमति । निघति रघुविरा स्मरत गृहाप्रति ॥
जातां होइ गिरा नभिं सुंदर । जय महेश कृत भक्ति दृढा वर ॥
अन्य असा पण कोणि न कर्ता । रामभक्त भगवंत समर्था ॥
सती सचिंत नबोवाग् ऐकुनि । तदा शिवास पुसे संकोचुनि ॥
पण केला कोणता कृपाला । प्रभो सत्यनिधि दीनदयाला ॥
होइ सती पुसती विविधा जरि । त्रिपुराराती सांगति ना तरि ॥

दो० :- सती करी अनुमान हृदिं जाणति सब सर्वज्ञ ॥
म्यां कृत कपटा शंभुसी नारि सहज जड अज्ञ ॥ ५७ रा ॥
सो० :- पयसम भाव जलास बघा प्रीतिची रीति बरि ।
भिन्न होइ रसनास आम्ल कपट पडतांच परि ॥ ५७ म ॥

(जेव्हा काही मार्ग सापडेना तेव्हा) शंकरांनी प्रभूच्या चरणांना मस्तक नमविले व राम नामोच्चार करताच मनात विचार आले ॥१॥ या देहाने सतीची भेट होणे शक्य नाही, शिवांनी लगेच मनात तसा संकल्प केला.॥२॥ असे ठरवून धीर बुद्धी शंकर रघुवीराचे स्मरण करीत घरी जाण्यास निघाले. ॥३॥ मार्गाने जात असता सुंदर आकाशवाणी झाली की हे महेश ! तुमचा जय असो ! आपण उत्तम प्रकारे भक्ती दृढ केलीत. ॥४॥ असा पण आपणाशिवाय कोण करुं शकणार ! आपण समर्थ भगवान असून रामभक्त आहांत ! ॥५॥ नभोवाणी ऐकून सती सचिंत झाली, मग संकोचित होऊन (लाजून) तिने शिवाला विचारले की, ॥६॥ कृपाळा ! सत्यनिधी ! दिनदयाळा ! प्रभो ! आपण कोणता पण केलांत ? ॥७॥ सतीने जरी नाना प्रकारांनी विचारले तरी त्रिपुरारिंनि काहीही सांगीतले नाही. ॥८॥ दो. – (शंकर काहीच बोलत नाहीत असे पाहून) मग सतीने आपल्या मनात अनुमान केले की सर्वज्ञांनी सर्वकाही जाणले आहे. मी शंभूंजवळ कपट केले ! आमची स्त्रियांची जात स्वभावताच अज्ञानी आणि मूर्ख ! ॥दो.५७ रा॥ (कवी सार सांगतात) प्रीतीची ही सुंदर तर्‍हा पहा की पाण्याला दुधाचा भाव येतो (पाणी दुधाच्या भावाने विकले जाते), पण (एकरुप झालेल्या दूधपाण्यात) कपटरुपी आंबट पदार्थ पडला की दोन्हीही वेगळेी होऊन रसाचा नाश होतो. ॥सो. ५७ म॥

शोक हृदयिं निज चरित चिंतितां । चिंता अमित, न येइ वर्णितां ॥
कृपासिंधु शिव परम अगाधहि । प्रगट न वदले मम अपराधहि ॥
शंकर-रोख भवानिस कळला । व्याकुळ, त्यजिली प्रभुनीं मजला ॥
निज अघ समजुनि वदवत नाहीं । ताप अव्यासम उरिं अति दाही ॥
बघुनि सशोक सती वृषकेतू । कथिति कथा सुंदर सुखहेतू ॥
पथिं वर्णित विविधा इतिहासां । विश्वनाथ पोचति कैलासा ॥
तिथें शंभु समजुनि अपला पण । वटतलिं बसले कृत-कमलासन ॥
शंकर सहज स्वरूप चिंतित । लग्न समाधि अपार अखंडित ॥

दो० :- सती वसे कैलासिं तैं शोक अधिक चित्तांत ॥
मर्म न जाणति कांहि कुणि युग सम दिन जातात ॥ ५८ ॥

सती आपल्या आचरणाचा जो जो विचार करुं लागली तो तो तिच्या चित्तात चिंता व शोक यांची वाढ इतकी झाली की वर्णन करता येणे शक्य नाही.॥१॥ शिव कृपासागर असून परम अगाध असल्यामुळे माझे अपराध सुद्धा त्यांनी उघड बोलून दाखवले नाहीत. ॥२॥ शंकरांचा एकंदर रोख काय आहे याचा अदमास भवानीस लागला व प्रभूंनी माझा त्याग केला असे जाणून ती मनात व्याकुळ झाली ॥३॥ आपणच पाप केले आहे हे माहित असल्याने बोलायला तोंड उरले नाही (त्यामुळे) शोकचिंतेचा दाह कुंभाराच्या आव्याप्रमाणे तिच्या छातीत निर्माण होऊन तिला भाजू लागला. ॥४॥ सति शोकाकुल झाली आहे हे वृषकेतू शंकरांनी जाणले व तिला सुख व्हावे म्हणून त्यांनी सुखमूलक सुंदर कथा सांगीतली ॥५॥ रस्त्याने (जाता जाता) विविध इतिहास वर्णन करीत विश्वनाथ कैलासास पोचले. ॥६॥ तिथे पोचल्यावर आपला पण समजून शंभू वडाच्या झाडाखाली बसले. व त्यांनी पद्मासन घातले ॥७॥ शंकरांनी सहजस्वरुपाचे चिंतन करताच त्यांची अपार अखंड अशी समाधी लागली ॥८॥ दो.- (शंकर समाधी लावून बसल्या) नंतर सती कैलासावरच राहीली. पण तिचा शोक चित्तात अधिक वाढत गेला. मात्र यातील काही सुद्धा मर्म कोणालाही कळले नाही. सतीला मात्र एकेक दिवस युगासारखा जाऊ लागला. ॥दो. ५८॥

नित्य सतीं-मनिं शोकभार नव । कधिं जाइन पारा दुःखार्णव ॥
मी जें रघुपतिला अपमानीं । पति-वचना ही मिथ्या मानीं ॥
देइ विधाता मजला तत्फळ । उचित कांहिं जें तें कृत केवळ ॥
अतां विधे, हें अनुचित करिसीं । शंकरविमुखी मला जगविसी ॥
वदवेना मुळिं चित्तीं ग्लानी । मनिं रामा ती स्मरे शहाणी ॥
प्रभु जर दीन दयाळू म्हणविति । आर्ति-हरण यश वेदहि वर्णिति ॥
तर मी कर जोडुन तुज विनवीं । या देहा मम शीघ्र टाकवी ॥
असे स्नेह जर मम शिवचरणीं । हेंच खरें व्रत तन-मन-वचनीं ॥

दो० :- तर सबदर्शी प्रभो श्रुणु करा किं शीघ्र उपाय ॥
जेणें अश्रम मरण ये दुःसह विपत्ति जाय ॥ ५९ ॥

रोजच्या रोज सतीच्या हृदयातील चिंतेचा भार अधिकाधिक वाढत चालला. या दु:खसागराच्या परतीराला मी जाणार तरी कधी ही चिंता वाढतच गेली ॥१॥ मी जो रघुपतीचा अपमान केला व पतिवचन सुद्धा खोटे मानले –॥२॥ त्याचे फळ विधात्याने मला दिले, (त्यात) जे काही उचित होते तेच केवळ केले गेले. ॥३॥ हे विधे ! आता मात्र तूं हे बरे करीत नाहीस की शंकरविमुख (विरोधी) झालेल्या मला अजून जगविली आहेस ! ॥४॥ तिच्या हृदयाला ग्लानी आल्यामुळे तोंडाने काही बोलवे ना, तेव्हा त्या शहाण्या सतीने मनात रामाचे स्मरण केले ॥५॥ हे प्रभो ! आपण दीनदयाळू म्हणविता आणि आपण आर्तिहरण करणारे आहांत असे आपले यश वेद सुद्धा वर्णन करतात ॥६॥ हे जर खरे असेल तर मी तुम्हांस हात जोडून विनविते की या माझ्या देहाला लवकर टाकवा (या देहातून मला सोडवा).॥७॥ जर शिवचरणांच्या ठिकाणी माझा स्नेह असेल आणि तन-मन-वाणीने हेच माझे खरे व्रत असेल तर - ॥८॥ दो. – तर हे सर्वदर्शी प्रभो ! ऐका ! जेणे करून विना श्रम मरण येईल व ही दु:सह विपत्ती नष्ट होईल असा उपाय शीघ्र करा. ॥ दो. ५९ ॥

दुःखी अशी प्रजेशकुमारी । अकथनीय दारुण दुख भारी ॥
गत सत्यायशीं हजार वत्सर । त्यजि समाधि अविनाशी शंकर ॥
रामनाम तैं स्मरुं शिव लागति । जाणे सती जगत्पति जागति ॥
जाउनि शंभुपदीं कृत वंदन । देती शंकर सन्मुख आसन ॥
वदुं लागति हरिकथा रसाला । दक्ष समयिं त्या प्रजेश झाला ॥
विधिमतिं अति तो दिसला लायक । दक्षा करी प्रजापतिनायक ॥
होतां दक्ष महा अधिकारी । हृदिं अभिमानें फुगला भारी ॥
जगिं न जन्मला कोणि असाही । ज्या प्रभुता पावुनि मद नाही ॥

दो० :- बोलावुनि मुनि सब महा आरंभी तो याग ॥
सादर सकल निमंत्रि सुर जे पावति मखभाग ॥ ६० ॥

दक्षप्रजापतीची कन्या या प्रमाणे इतकी दु:खी झाली आहे की तिचे दारूण दु:ख वर्णन करता येणे शक्य नाही.॥१॥ अशा प्रकारे सत्याऐंशी हजार वर्षे निघून गेली व अविनाशी शंकरांनी समाधी त्याग केला. ॥२॥ शिव रामनामाचा उच्चार करूं लागले, तेव्हा सतीने जाणले की जगत्पती शिव जागे झाले. ॥३॥ तिने जाऊन शंभूचरणांना वंदन केले. तेव्हा शंकरांनी तिला आपल्या समोर (बसण्यासाठी) आसन दिले.॥४॥ व ते रसाळ हरीकथा सांगू लागले, त्याच समयास दक्ष प्रजेश झाला होता. ॥५॥ ब्रह्मदेवाच्या मते दक्ष सर्व प्रजापतीत अती लायक दिसला तेव्हा त्यास प्रजापतींचा नायक बनविला. ॥६‍॥ मोठा अधिकार मिळाल्याबरोबर दक्ष हृदयात अभिमानाने फुगून गेला.॥७॥ या जगात सत्ता मिळाल्यावर मद झाला नाही असा कोणी जन्माला आला आहे ? (नाही) दो. – अधिकार मिळाल्यावर दक्षाने सर्व मुनींना बोलावून घेतले व एका मोठ्या यज्ञाचा आरंभ केला. ज्या देवांना यज्ञभाग मिळणे योग्य आहे त्या सर्वांना आदराने आमंत्रणे पाठविली. ॥दो. ६०॥

नागसिद्ध गंधर्व हि किंनर । वधूं सहित निघती सगळे सुर ॥
विष्णु विरंचि महेशांवाचुनि । जाति सकल सुर यानें साजुनि ॥
सती विलोकी व्योमिं विमानां । नानविध सुंदर जातानां ॥
सुर-सुंदरी करिति कलगानहि । श्रवत मुनींचें सुटतें ध्यानहि ॥
सती विचारी सांगति शिव जंव । परिसुनि मरव पितृगेहिं हर्ष लव ॥
जर किं अनुज्ञा देति महेश्वर । जाउं राहुं या मिषें कांहि तर ॥
पतित्यक्त हृदिं दुःखी भारी । वदे न निजअंपराध विचारीं ॥
बोले सती मनोहर वाणी । भय - लज्जा - प्रीती - रसखाणी ॥

दो० :- पितृगृहिं उत्सव परम मी सादर पहावयास ।
जाइन संमति देति जर प्रभु मज कृपानिवास ॥ ६१ ॥

नाग, सिद्ध, गंधर्व, किन्नर इत्यादी सगळे देव आपापल्या पत्‍नीसह निघाले ॥१॥ विष्णु, ब्रह्मदेव इत्यादि सगळे देव महेशावाचून आपापली वाहने शृंगारून चालले. ॥२॥ सतीने पाहीले की नाना प्रकारची सुंदर विमाने आकाशातून जात आहेत ॥३॥ व सुरसुंदरी इतके सुंदर गान करीत आहेत की ऐकताच मुनीचे सुद्धा ध्यान सुटावे ॥४॥ सतीने विचारल्यावरून शिवांनी जेव्हा सर्व सांगीतले तेव्हा बापाच्या घरी यज्ञ आहे हे ऐकून तिला थोडासा हर्ष झाला. ॥५॥ (व सती मनात म्हणते) जर महेश्वरांनी मला जाण्यास परवानगी दिली तर या निमित्ताने तरी जाऊ व राहू थोडे दिवस. ॥६॥ पतीने परित्याग केल्यामुळे हृदयात भारी दु:खी आहे, पण आपल्याच अपराधांचा विचार करता तिला बोलवत नाही. ॥७॥ (तरीपण) भय, लज्जा, प्रीती या रसांची खाणच अशी मनोहर वाणी सती आता बोलते ॥८॥ दो.- प्रभो ! वडिलांच्या घरी परम उत्सव आहे म्हणून आपण जर परवानगी द्याल तर मी आदराने पाहण्यास जाईन (म्हणते); आपण कृपानिवास आहांत ! अनुज्ञा देण्याची कृपा करालच ॥दो.६१॥

उचित वदां मम मान्य करी मन । परि अनुचित कीं नाहिं निमंत्रण ॥
मुली दक्ष बोलावित सकलां । मम वैरें वगळल्या तुम्हांला ॥
ब्रह्मसभें मज विरुद्ध मानिति । यास्तव अद्यापहि अपमानिति ॥
जाल भवानी निमंत्रणाविण । स्नेह-शील-मर्यादा राहि न ॥
मित्र - पिता - प्रभु -गुरु - सदनाही । जावें जरि आमंत्रण नाहीं ॥
तदपि विरोध जिथें कुणि मानी । जात तिथें कल्याणा हानी ॥
शंभु विविधपरि जरि समजावी । बोध ठसेना मनिं, वश भावी ॥
म्हणती प्रभु अनिमंत्रित जां जर । बरें दिसेना मम चित्ता तर ॥

दो० :- करुनि यत्‍न हर बघति बहु राहि न दक्षकुमारि ॥
दिले प्रमुख गण तैं सवें देति निरोप पुरारि ॥ ६२ ॥

तुम्ही म्हणालात ते योग्य आहे, माझ्या मनालाही मान्य आहे, पण बोलावणं नाही म्हणून अनुचित आहे ॥१॥ दक्षांनी आपल्या सगळ्या मुलीना बोलावले, पण आमच्या वैरामुळे तुम्हांलाच तेवढ्या वगळले. ॥२॥ ब्रह्मदेवाच्या सभेत त्यांनी मानले की आम्ही विरुद्ध आहोत. म्हणून अजून सुद्धा अपमान करीत आहेत. ॥३॥ भवानी ! बोलावणे नसता तुम्ही जर गेलांत तर स्नेह, शील व मर्यादा राहणार नाही. ॥४॥ पिता, प्रभू मित्र, गुरु यांचे घरी बोलावल्याशिवाय जावे, यात संशय नाही. ॥५॥ तथापी जिथे कोणी विरोध मानीत असेल तेथे गेल्याने कल्याणाची हानी होते. ॥६॥ शंभूंनी नाना प्रकारे समजाऊन पाहीले परंतु ती प्रारब्धवश झालेली असल्याने केलेला बोध मनात ठसेना ॥७॥ तेव्हा प्रभू म्हणाले की, निमंत्रण (बोलावणे) नसता जर गेलात तर बरे होईल असे मला (आंम्हास) वाटत नाही. ॥८॥ दोहा- हरांनी पुष्कळ प्रयत्‍न करून पाहिला पण दक्षकुमारी काही राहीना, तेव्हा आपल्या मुख्य मुख्य गणांना बरोबर देऊन त्रिपुरारीनी तिला निरोप दिला. ॥दो.६२॥

पितृभवनीं जै गता भवानी । दक्षभये कोणि न सन्मानी ॥
सादर भेटे केवळ जननी । स्वसा भेटल्या विहसत वदनीं ॥
दक्षें नहि पुसलें कुशलाही । बघुनि सतिस अंगाची लाही ॥
सती जाइ मग यागा पाही । कुठें शंभुचा भागाच नाहीं ॥
तैं शंकर-वच चित्तिं उमटलें । प्रभु-अपमान गणुनि मन जळलें ॥
पूर्व-दुःख बोचे न मनिं असें । जाळि महा परिताप हा जसें ॥
दुःखे दारुण जरि जगिं नाना । तीं न कठिण सम जात्यवमाना ॥
समजुनि हेंच सती सक्रोधा । जननी बहुविध करी प्रबोधा ॥

दो० :- शिव-अपमान न साहवे हृदयिं न शिरे प्रबोध ॥
सकल सभे हटकुनि हठें वदली अति सक्रोध ॥ ६३ ॥

भवानी ( दक्षाच्या ) पित्याच्या भवनात गेली तेव्हा दक्षाच्या धाकाने मान सन्मान आदर कोणी केला नाही. ॥१॥ तिची आई तेवढी आदराने भेटली; सगळ्या बहिणी (१५) भेटल्या खर्‍या, पण फार हसत हसत (दात काटीत) ॥२॥ दक्षाने कुशल सुद्धा नाहीच विचारले. पण सतीला (आलेली) पाहताच त्याच्या सर्व अंगाची लाही लाही झाली. ॥३॥ मग सतीने यागात जाऊन पाहीले तों शंभूचा यज्ञभाग कोठेच आढळला नाही. ॥४॥ तेव्हा मात्र शंकरांचे वचन चित्तात चांगले उमटले व हा प्रभूचा अपमान आहे असे जाणून तिच्या चित्ताची आग झाली. ॥५॥ हा महापरिताप तिला जितका दाहक झाला तितके पूर्वीचे (पति परित्याग) दु:ख सुद्धा त्रासदायक झाले नव्हते. ॥६॥ जगात नाना प्रकारची दारुण दु:खे जरी असली तरी ती स्वजनांनी केलेल्या अपमाना इतकी कठीण नाहीत. ॥७॥ सतीला असेच वाटले व तिला फार क्रोध आला. ( तो पाहुन ) तिच्या आईने तिला नानापरींनी पुष्कळ बोध केला; पण---- ॥८॥ दोहा – शिवाचा अपमान असह्य झाला व त्यामुळे जननीच्या उपदेशाचा प्रवेश तिच्या हृदयात होईना, व सर्व सभेला हट्टाने हटकून ती अती क्रोधाने म्हणाली ॥दो. ६३॥

ऐका सर्व मुनींद्र सभासद । ज्यांनी शंकर निंदा श्रुत कृत ॥
सकलां तत्फल मिळेल सत्वर । पित्यासही अनुताप पोटभर ॥
संत - शंभु - मापति - अपवादा । ऐकति तेथें अशि मर्यादा ॥
जीभ कापण्या शक्त असावें । नातर कान मिटून पळावें ॥
जगदात्माच महेश पुरारी । जगज्जनक सर्वां हितकारी ॥
पिता मंदमति निंदी त्यांही । दक्ष-शुक्र-संभव काया ही ॥
त्यजितें त्वरित देह त्या-हेतू । हृदिं शशिमौलि धरुनि वृषकेतू ॥
मग योगाग्निंत देह जाळला । मखिं सब हाहाकार जाहला ॥

दो० :- श्रवुनि सती-मृति शंभुगण करुं लागति मखनाश ।
यज्ञ-विनाश बघुनि भृगु रक्षि मुनीश तयास ॥ ६४ ॥

सती देहत्याग - अहो मुनींद्रांनो, ऐका ! सर्व सभासदांनो ऐका ! ज्यांनी शंकरांची निंदा केली वा ऐकली ॥१॥ त्या सगळ्याना त्याचे फळ सत्वर मिळेल ! बापालाही पोटभर पश्चाताप करावा लागेल. ॥२॥ (कारण) जेथे संत शंभू वा विष्णू यांची निंदा ऐकू येते तेथे अशी मर्यादा आहे की, निंदा करणाराची जीभ कापण्यास समर्थे व्हावे, नाहीतर कानात बोटे घालून तेथून पळून जावे ॥३-४॥ (शंकर, शिव तर) जगताचे आत्माच असून महा ईश, त्रिपुरासुरांचा नाश करणारे जगाचे जनक व सर्वांचे हितकर्ते आहेत. ॥५॥ (असे असून हा) मंदबुद्धी पिता त्यांचीच निंदा करतो. व हा देह दक्षाच्याच तेजापासून उत्पन्न झाला आहे. (हा देह दक्षाला नेत्ररोग उत्पन्न करणारा झाला आहे) ॥६॥ त्याच हेतूस्तव – तेवढ्या कारणानेच चंद्रमौलि वृषकेतूंना हृदयात धारण करुन मी आता त्वरेने देहाचा त्याग करते ॥७॥ असे म्हणून तिने आपली तनू योगाग्नीने जाळली. त्यावेळी त्या यज्ञात सर्वत्र हाहाकार उडाला. ॥८॥ दो. – सतीचे मरण ऐकून शंभूगण यज्ञाचा विध्वंस करू लागले, पण यज्ञाचा विध्वंस होतो असे पाहून मुनीश्रेष्ठ भृगुंनी त्याचे रक्षण केले. ॥दो. ६४॥

समाचार सब शंकर पावति । वीरभद्रकोपोद्‌भव धाडति ॥
तो जाउन करि मख-विध्वंसन । समुचित फल लाभले अमरगण ॥
गति जगविदित होइ दक्षाची । होई जशि किं शंभु-विमुखाची ॥
हा इतिहास सकल जग जाणें । यास्तव वर्णित संक्षेपानें ॥
सती हरिशि वर मागे मरणीं । जन्मोजन्मीं रति शिवचरणीं ॥
म्हणुनी जाउनि हिमगिरि-गेहा । जन्मे पावुनि पार्वति-देहा ॥
यदा उमा गिरिगेहिं जन्मली । तिथें सिद्धि सब संपत् जमली ॥
जिथं तिथंशुभ आश्रम मुनि करिती । उचित वास हिमभूधर देती ॥

दो० :- सदा सुमन-फल-युत नवे द्रुम नाना होतात ॥
प्रगटति सुंदर पर्वतीं मणि खाणी बहु तात ॥ ६५ ॥

हा सर्व समाचार शंकरांस मिळाला; तेव्हा त्यांनी क्रोधाने वीरभद्राला उत्पन्न करुन त्यास धाडला. ॥१॥ त्याने जाऊन यज्ञाचा विध्वंस केला व सर्व देवगणांना यथा योग्य फळ दिले- मिळाले. ॥२॥ शिवविमुखाची या जगात जशी गती होते तशीच दक्षाची गती झाली व ती जगात सर्व जाणतात. ॥३॥ हा इतिहास सर्व जग जाणते म्हणून मी संक्षेपाने वर्णन केले. (असे याज्ञवल्क्य भरद्वाजांस म्हणाले ). ॥४॥ सतीने मरणसमयी हरी (रामा) जवळ असा वर मागितला की जन्मोजन्मी माझे शिवचरणी परम प्रेम (रति) असावे. ॥५॥ पार्वतीजन्म – म्हणून ती जाऊन पार्वती देह पावून हिमालयपर्वताच्या घरी जन्मली. ॥६॥ शैलाच्या घरी उमा जन्मल्यापासून तिथे सर्व सिद्धी व सर्व संपत्ती जमल्या. ॥७॥ मुनींनी जिथे तिथे आपले शुभ आश्रम केले (व त्यासाठी) हिमगिरीने त्यांस उचित जागा दिली. ॥८॥ दो. – त्या सुंदर पर्वतावर नाना जातींचे वृक्ष ताजेतवाने ( नवे ) होऊन त्यांना सर्व काळ फळे फुले येऊ लागली, व नाना प्रकारच्या रत्‍नांच्या खाणी हे तात ! तेथे प्रगट झाल्या.॥दो. ६५॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP