॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय २५ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

निघति रामलक्ष्मण मुनि संगें । प्राप्त सकल जगपावन गंगे ॥
गाधिज वदले सकल कथेला । सुरसरिता जशि येइ धरेला ॥
प्रभु ऋषिंसह तैं स्‍नाना करती । विविध दान महिदेव पावती ॥
सह मुनिवृंद सहर्ष निघाले । उ पविदेहपुर सुशीघ्र आले ॥
पुररम्यता राम जैं पाहति । सानुज हर्षा विशेष पावति ॥
कूप सरित सर वापी नाना । सलिल सुधा-सम मणि-सोपाना ॥
भृंग मंजु रसमत्त गुंजती । विविधवर्णि कल विहग कूजती ॥
वर्ण वर्ण विकसित वनजातें । त्रिविध पवन दे सदा सुखातें ॥

दो० :- सुमनवाटिका बाग वन विपुल विहंग निवास ॥
पुष्पित सफल सुपल्लवित शोभति पुर चौपास ॥ २१२ ॥

रघुवीरांचे जनकपुरी गमन व नगरदर्शन -
( मग ) रामलक्ष्मण विश्वामित्र मुनींबरोबर निघाले व सर्वजण जगाला पावन करणार्‍या गंगेजवळ आले ॥ १ ॥ सुरनदी ज्या प्रकारे पृथ्वीवर आली ती सर्व कथा गाधिपुत्र विश्वामित्राने सांगितली ॥ २ ॥ तेव्हा रामलक्ष्मणांनी ऋषींसह स्नान केले व ब्राह्मणांना विविध प्रकारची दाने मिळाली. ॥ ३ ॥ ( नंतर गंगेपलिकडे जाऊन ) मुनिवृंदांसह राम उत्साहाने निघाले व अती त्वरेने विदेह नगराच्या जवळ येऊन पोचले ॥ ४ ॥ रामचंद्रांनी जेव्हा विदेहनगराची रम्यता पाहीली तेव्हा त्यांस व लक्ष्मणांस विशेष हर्ष झाला ॥ ५ ॥ कूप ( आड ) नद्या, तलाव विहीरी इत्यादि जलाशय मण्यांचे घाट व पायर्‍यांनी युक्त असून त्यांचे पाणी सुधेसारखे आहे. ॥ ६ ॥ पुष्परसाने मत्त झालेले सुंदर भृंग मंजुळ गुंजारव करीत आहेत व विविध वर्णाचे सुंदर पक्षी मधुर कूजन करीत आहेत ॥ ७ ॥ विविध रंगांची कमळे फुलली असून शीतल मंद सुगंधी वारा सतत सुखदायक वाहतो आहे ॥ ८ ॥ दो०- पुष्पवाटिका, बागा व उपवने असून त्यांत पक्षांची विपुल निवासस्थाने आहेत. फुलबागा फुलल्या आहेत फळबागांतील वृक्षांना फळे लगडली आहेत व उपवनातील वन-वृक्षांना सुंदर पालवी फुटली आहे अशी ही शोभा विदेहपुरीच्या चारी बाजूस आहे ॥ दो० २१२ ॥

न घडे नगर-रुचिरता वर्णन । जेथें जाई तिथें लुब्ध मन ॥
सुंदर हाट विचित्रित सज्जे । मणिमय निजकरिं रचित जणुं अजें ॥
धनिक वणिकवर धनद समानहि । स्थित घेऊनि सब वस्तू विविधहि ॥
चारु चव्हाटे उपपथ सुंदर । सतत सुगंधें सिक्त मनोहर ॥
मंगलमय मंदिर सब भासत । जणुं रतिनाथ चितारी चित्रित ॥
पुर-नर नारि सुभग शुचि संतहि । ज्ञानी धर्मशील गुणवंतहि ॥
अतिशय अनुपम जनक निवासा । बघुनी विबुध थकीत विलासा ॥
चित्त चकत जैं कोट विलोकित । सकल भुवन शोभा जणुं रोखित ॥

दो० :- धवलधाम मणि-पुरट-पट नानापरिं सुघटीत ।
सियनिवास सुंदर सदन शोभा अकथ अमीत ॥ २१३ ॥

नगराच्या सौंदर्याचे वर्णन करता येणे शक्य नाही, कारण मन जेथे जेथे जाते तेथेच ते लुब्ध होऊन राहते ॥ १ ॥ बाजार सुंदर असून तेथील सज्जे मणिमय आहेत व इतके चित्रविचित्र बनवले आहेत की जणूं ब्रह्मदेवाने आपल्या हातांनीच ही रचना केली आहे ॥ २ ॥ श्रीमंत व्यापारी श्रेष्ठ कुबेरच जणूं, व ते अनेक प्रकारचे पदार्थ दुकानात मांडून बसले आहेत. ॥ ३ ॥ चव्हाटे सुंदर आहेतच पण गल्ली-बोळ, छोटे रस्तेही सुंदर आहेत व मनोहर सुगंधी द्रव्यांचे सडे सदा सर्वकाळ शिंपलेले दिसतात. ॥ ४ ॥ सर्वांची हृदये प्रभूची मंदिरे आहेत, व सर्वांची घरे मंगलमय असून जणू रतीपती मदनाने चितारी बनून ती चित्रित केली आहेत. ॥ ५ ॥ नगरातील पुरुष व स्त्रिया सुंदर संत, धर्मशील, ज्ञानी व गुणवंत आहेत. ॥ ६ ॥ अत्यंत अनुपम अशा जनकनिवासस्थानाला व तेथील भोग विलासांना पाहून स्वर्गातील देव सुद्धा चकित होतात. ॥ ७ ॥ ( जनकाच्या राजवाड्याच्या भोवतालचा ) कोट किंवा तटबंदी पाहून मन थक्क होऊन जाते व जणूं सर्व भुवनांची शोभा ( तेथे ) रोखून ठेवली आहे असे वाटते. ॥ ८ ॥ दो०- शुभ्र महालांना रत्‍नजडित सुवर्णाची दारे व भरजरी रत्‍नजडित पडदे यांनी विभूषित केले असून अनेक प्रकारांनी सुंदर रचना केली आहे. सीतेचे निवासस्थान असलेल्या सुंदर महालाची शोभा अपार व अकथनीय आहे ॥ दो० २१३ ॥

द्वार सुभग सब कुलिश-कपाटी । भूप - भाट - नट - मागध - दाटी ॥
तुरग-नाग-शाला सुविशाला । हय-गज-रथ-संकुला त्रिकालां ॥
शूर सचिव सेनप बहु वसती । नृप-गृह-सम सम सदनें असती ॥
पुरा-बाह्य सर समीप सरिते । विविध उतरले नृप कितितरि ते ॥
बघुनि एक अनुपम अमराई । रुचिर सर्वपरिं सब सुखदाई ॥
कौशिक वदले रुचे मम मना । इथे उतरुं रघुवीर सुजाणा ॥
बरें नाथ! तैं कृपाब्धि वदले । मुनिवृंदांसह तिथें उतरले ॥
विश्वामित्र महामुनि आले । मिथिलापतिला वृत्त मिळालें ॥

दो० :- सवें सचिव शुचि भूरि भट भूसुर वर गुरु जाति ॥
मुदित असे मुनिनायका नृप भेटाया जाति ॥ २१४ ॥

सर्वही दरवाजे सुंदर असून त्यांच्या दाराच्या फळ्या हिरेजडित आहेत राजे आणि भाट, नट, मागध यांची गर्दी झाली आहे ॥ १ ॥ अश्वशाळा सुविशाल असून त्या घोडे, हत्ती व रथ यांनी सदा सर्वदा भरुन गेलेल्या असतात ॥ २ ॥ शूरवीर, सचिव व सेनापती यांची पुष्कळ वस्ती असून त्या सर्वांची घरे राजमहालासारखी आहेत. ॥ ३ ॥ नगरीच्या बाहेर तलावांच्या व नद्यांच्या काठी विविध देशातील कितीतरी राजे उतरले आहेत. ॥ ४ ॥ सर्व प्रकारे सुंदर व सर्व सुखदायक अशी एक अनुपम आमराई पाहून ॥ ५ ॥ कौशिक मुनी म्हणाले की सुजाण रघुवीरा ! माझ्या मनाला वाटते की येथे आपण उतरावे ॥ ६ ॥ तेव्हा कृपासागर रघुवीर म्हणाले नाथ ! बरे ( ठीक ) आहे, आणि मुनी समूहासह तेथे उतरले. ॥ ७ ॥ विश्वामित्र महामुनी आले आहेत असा समाचार जनक राजाला कळला ॥ ८ ॥ दो०- राजाने आपल्या बरोबर पवित्र सचिव, प्रामाणिक असे पुष्कळ योद्धे, श्रेष्ठ ब्राह्मण गुरु शतानंद व आपल्या जातीचे अनुभवी वृद्ध लोक घेतले व अशा प्रकारे आनंदित मनाने मुनिनायकास भेटण्यास निघाले .॥ दो० २१४ ॥

प्रणमति नृप शिर ठेवुनि पायां । देति मुद्ति आशिस मुनिराया ॥
विप्रवृंद सब सादर वंदति । महाभाग्य जाणुनि आनंदति ॥
वारंवार पुसुनि कुशलाला । बसविति विश्वामित्र नृपाला ॥
आले बंधूद्वय समया या । गेलेले फुलबाग बघाया ॥
श्याम-गौर मृदु वयें किशोर । नयन सुखद जग-चित्ता चोर ॥
येतां रघुपति सर्वहि उठले । विश्वामित्रें निकट बसवले ॥
सकल सुखी दोघांस निरखितां । वारि विलोचनिं वपू पुलकिता ॥
मूर्तिस मधुर मनोहर देखे । होइ विदेह विदेह विशेखें ॥

दो० :- प्रेममग्न मन बघुनि नृप धरुनि विवेकें धीर ॥
शिर मुनिपदिं वंदुनि वदे गद्‌गद गिरा गभीर ॥ २१५ ॥

मिथिलापतींनी मुनींच्या पायावर मस्तक ठेऊन प्रणाम केला. मुनीश्रेष्ठाने आनंदाने आशीर्वाद दिला ॥ १ ॥ ( राजाने ) सर्व विप्रसमूहास आदराने वंदन केले व आपले महाभाग्य उदयास आले असे जाणून राजाला आनंद झाला ॥ २ ॥ वारंवार कुशल विचारुन विश्वामित्राने राजास बसावयास सांगितले.॥ ३ ॥ फुलबाग बघण्यास गेलेले दोघे याचवेळी ( परत ) आले ॥ ४ ॥ श्यामवर्णी राम व गौरवर्णी लक्ष्मण दोघेही कोमल व किशोर वयीन असून नेत्रांना सुख देणारे व जगाचे चित्तचोर आहेत ॥ ५ ॥ ( असे ) रघुपति येताच सर्वजण ( ताडकन ) उठून उभे राहीले; ( मग ) विश्वामित्राने दोघांना आपल्या जवळ बसविले ॥ ६ ॥ दोघांना निरखून सगळे सुखी झाले. सर्वाच्या डोळ्यांस अश्रू आले व देह रोमांचित झाले ॥ ७ ॥ त्या मधुर व मनोहर मूर्तींना पाहून विदेह तर विशेषच वि-देह झाले. ॥ ८ ॥ दो०- आपले मन प्रेममग्न झाले आहे असे पाहुन राजाने विवेकाने धीर धरून विश्वामित्र मुनींच्या पायांना मस्तक नमवून गद्‍गद् व गंभीर वाणीने म्हणाले ॥ दो० २१५ ॥

नाथ! वदा द्वय सुंदर बालक । मुनिकुलतिलक किं नृप-कुलपालक ॥
ब्रह्म नेति जें निगमिं गाइलें । उभय वेष कीं धरुनि पावलें ॥
सहज विरागरूप मम चित्तहि । चंद्रि चकोरासम अति थक्कहि ॥
पुसतो प्रभु! यास्तव सद्‌भावें । वदा नाथ! कांहिं न लपवावें ॥
यांस विलोकित अति अनुरागी । ब्रह्मसुखा मन जबरीं त्यागी ॥
वदति हसुनि मुनि, वदलां ठीक । नृप! तुमचें वच नव्हें अलीक ॥
हे प्रिय सर्वां जितके प्राणी । श्रवुनि राम सस्मित मनिं, वाणी ॥
हे रघुकुलमणि दशरथ-आत्मज । धाडि भूप ममहिता सवें मज ॥

दो० :- राम नि लक्ष्मण बंधुवर् रूप-शील-बल-धाम ॥
मख रक्षित जग साक्षि; रणिं जिंकुनि असुर ग्राम ॥ २१६ ॥

नाथ ! हे दोघे सुंदर बालक मुनिकुलतिलक आहेत की नृपकुलपालक आहेत हे कृपा करून सांगावे ॥ १ ॥ नेति नेति म्हणून वेद ज्याचे वर्णन करतात ते ब्रह्मच ही दोन रुपे धारण करुन आले आहे की काय ? ॥ २ ॥ ( कारण ) स्वभावत:च विरागरुप असणारे माझे मन ( यांना पाहताच ) चंद्रास पाहून चकोर स्तंभित व्हावा तसे झाले आहे. ॥ ३ ॥ यासाठी हे प्रभो ! मी सद्‌भावनेने ( मनापासून ) विचारत आहे तरी नाथ ! आपण ते सांगावे, काहीही गुप्त ठेवू नये ॥ ४ ॥ यांचे दर्शन घडताच मन यांच्यावर अतिशय अनुरक्त झाले असून त्याने जबरीने ब्रह्मसुखाचा त्याग केला . ॥ ५ ॥ मुनी हसून म्हणाले की राजा ! तुमचे म्हणणे योग्य आहे तुमचे बोलणे कधीही असत्य नसते ॥ ६ ॥ जितके म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना हे प्रिय आहेत ही वाणी ऐकून रामचंद्रांनी मनात स्मित केले ॥ ७ ॥ हे दोघे रघुकुलमणी दशरथ राजाचे पुत्र असून राजाने माझ्या हितास्तव यांना माझ्या बरोबर पाठवले.॥ ८ ॥ दो०- राम आणि लक्ष्मण ( नावाचे ) हे दोघे श्रेष्ठ बंधू रुप शील व बल यांचे निवासस्थान आहेत व यांनी रणात असुर समूहांना जिंकून माझ्या यज्ञाचे रक्षण केले याची साक्ष सर्व जग देत आहे. ॥ दो० २१६ ॥

राव वदति मुनि! तव पद बघुनहि । पुण्यप्रभाव निज वदवत नहिं ।
श्याम गौर सुंदर हे भ्राते । आनंदा आनंदहि दाते ॥
यांची प्रीति परस्पर पावन । वदवेना, शोभन मनभावन ॥
मुदित विदेह वदे श्रुणु मुनिवर । ब्रह्म जीवसे स्नेहि सहज वर ॥
प्रभुसि बघति बहुदां नर-नाहो । पुलक गात्रिं मनिं अति उत्साहो ॥
स्तवुनि मुनिस शिरपदीं ठेवुनी । निघति नगरिं अवनीश घेउनी ॥
सुखद सर्वदा सुंदर सदनीं । नेइ, निवासा देइ नृपमणी ॥
बहुविध सेवा पूजन केलें । आज्ञा घेउन नृप घरि गेले ॥

दो० :- ऋषिं समेत रघुवंशमणि कृत भोजन विश्राम ॥
प्रभु सानुज बसले तदा एक उरे दिन-याम ॥ २१७ ॥

जनक म्हणाले मुनी आपल्या पायांचे दर्शन घडल्यानेच मला माझ्या पुण्याचा प्रभाव वर्णन करता येत नाही ! ॥ १ ॥ श्याम व गौर वर्णाचे हे दोघे बंधू आनंदालाही आनंद देणारे आहेत. ॥ २ ॥ यांची परस्परांची पवित्र प्रीती सांगता येण्यासारखी नाही, परंतु सुंदर असून मनात गोड वाटणारी आहे. ॥ ३ ॥ विदेह राजा आनंदाने म्हणाले मुनिवर ! असे पहा की हे ब्रह्म आणि जीव यांसारखे उत्तम सहज स्नेही आहेत ॥ ४ ॥ जनकराज पुन:पुन्हा प्रभूकडे पाहू लागले तो तो त्यांच्या अंगावर पुन:पुन्हा रोमांच उभे रहात आहेत व हृदयात अत्यंत उत्साह वाढत आहे. ॥ ५ ॥ मुनीची स्तुती करून व पायांवर मस्तक ठेऊन राजे त्यांना नगरात घेऊन गेले ॥ ६ ॥ सर्वदा सुखदायक अशा एका सुंदर सदनात नेऊन नृपश्रेष्ठाने त्यांना रहाण्यास जागा दिली. ॥ ७ ॥ अनेक प्रकारे सेवा व पूजन करुन आज्ञा घेऊन जनकराजे आपल्या घरी गेले. ॥ ८ ॥ do0- रघुवंशमणी रामलक्ष्मणांनी ऋषींच्या बरोबर भोजन केले व विश्रांती घेतली व प्रभू बंधूंसह बसले तेव्हा एक प्रहर दिवस उतरला होता. ॥ दो०२१७ ॥

हौस लक्ष्मणा मनीं आगळी । येऊं जनकपुरि पाहुन सगळी ॥
प्रभु-भय मुनि-संकोचहि वाटे । सस्मित मनिं न निघे मुखवाटें ॥
अनुज-मनो-गति रामा कळली । हृदयिं भक्तवत्सलता स्त्रवली ॥
अति विनयें, लाजतां स्मितानन । वदले पावुनि गुरु-अनुशासन ॥
नाथ! नगर लक्ष्मण बघुं इच्छिति । प्रभु-संकोच भयें ना प्रगटति ॥
आज्ञा आपली मिळेल मज जर । नगर दाखवुनि आणिन सत्वर ॥
तैं मुनीश वदले सप्रीती । राम तुम्हिं न कशि राखा नीती ॥
धर्म-सेतु-पालक तुम्हिं ताता । प्रेम-विवश सेवक सुख-दाता ॥

दो० :- सुख-निधान युग बंधु जा या नगरी पाहून ॥
करा सुफल जननेत्र सब सुंदर मुख दावून ॥ २१८ ॥

नगर दर्शन प्रकरण -- लक्ष्मणाच्या मनात विशेष हौस उत्पन्न झाली आहे की सगळी जनकपुरी पाहून यावी ॥ १ ॥ ( परंतू ) प्रभूचे भय व मुनींच्या मुळे संकोच वाटत असल्याने मनातल्या मनात ( लक्ष्मण ) हसले पण तोंडातून शब्द निघेना ॥ २ ॥ ( पण ) भावाच्या मनात काय आहे ते रामचंद्रांना कळले व भक्तवत्सल रसास हृदयात पाझर फुटला. ॥ ३ ॥ गुरुची अनुज्ञा घेऊन, अत्यंत नम्रतेने लाजत लाजत व सस्मित मुखाने ( राम ) म्हणाले ॥ ४ ॥ नाथ ! नगर पहावे अशी लक्ष्मणाची इच्छा आहे, पण आपल्या संकोचाने व भयाने प्रगट करुन सांगत नाहीत. ॥ ५ ॥ ( तरी ) आपली आज्ञा मिळाली तर मी नगर दाखवून चटकन घेऊन येईन ॥ ६ ॥ तेव्हा मुनीश प्रीतीने म्हणाले की राम ! तुम्ही नीतीचे पालन करणार नाही असे होईल कां ? ( कधीच नाही ) ॥ ७ ॥ तात ! तुम्ही धर्म - मर्यादा पालक असून प्रेमाला विशेष वश होणारे व सेवकांना सुख देणारे आहांत ॥ ८ ॥दो०- सुख - निधान असे तुम्ही दोघे भाऊ जा व नगरी पाहून या, आपले सुंदर मुख ( कमल ) दाखवून सर्व लोकांचे नेत्र सुफल करा ॥ दो०२१८ ॥

वंदुनि मुनिपद-कमलां भ्राते । निघति लोक-लोचन सुखदाते ॥
बालकवृंद बघुनि अति शोभे । येति सवें लोचन-मन-लोभे ॥
पीत वसन परिकर कटिं भाता । चारु चाप शर शोभति हातां ॥
तनु-अनुसार उटी चंदन वर । जोडी श्यामल गौर मनोहर ॥
केसरि-कंधर भुजा विशाला । उरिं अति रुचिर नागमणिमाला ॥
सुभग सोन-सरसीरुह लोचन । मुख-मृगांक तापत्रय-मोचन ॥
कानीं कनकफुलें छवि देती । बघत चित्त चोरुन जणुं घेती ॥
भृकुटि कुटिल वर दृष्टि मनोहर । तिलक रेख शोभति जणुं मोहर ॥

दो० :- रुचिर चौतनी सुभग शिरिं मेचक कुंचित केश ॥
नख-शिख सुंदर बंधु दो शोभे सकल सुदेश ॥ २१९ ॥

लोकांच्या नेत्रांना सुख देणारे ते दोघे भाऊ विश्वामित्र मुनीच्या पदकमलांना वंदन करुन नगर पाहण्यास निघाले. ॥ १ ॥ त्यांच्या अत्यंत शोभेला पाहून बालकांच्या झुंडी नेत्रांच्या व मनाच्या लोभाने त्यांच्या बरोबर येऊ लागल्या ॥ २ ॥ पीतांबर व कमरेला दुपट्याने बांधलेले भाते व हातात सुंदर धनुष्य - बाण शोभत आहेत. ॥ ३ ॥ व त्यांच्या शरीराच्या वर्णानुसार सुंदर चंदनाची उटी लावलेली आहे, अशी ही श्यामगौर वर्णाची जोडी (सर्वांचे) मनहरण करीत आहे. ॥ ४ ॥ सिंहासारखी भरदार मान असून बाहू व छाती विशाल आहे व त्यावर अती सुंदर नागमण्यांच्या माळांनी त्या शरीरसौंदर्यात भरच घातली आहे ॥ ५ ॥ सुंदर सुवर्ण कमळासारखे डोळे लालसर आहेत व मुखरुपी चंद्रमा तापत्रयांचा विनाश करणारा आहे. ॥ ६ ॥ कानांत सुवर्ण फुले (कुंडले) शोभा देत आहेत व जणूं बघणार्‍याचे चित्त चोरुन घेत आहेत ॥ ७ ॥ भुवया सुंदर बाकदार असून दृष्टी मनोहर आहे व टिळा (कपाळीचा चंदन तिलक) व त्याची रेषा जणूं सुंदरतेची मोहर उठवीत आहेत ॥ ८ ॥ दो०- सुंदर मस्तकावर सुबक चौकोनी टोपी आहे (त्यातून डोकावणारे) केस काळे व कुरळे आहेत - असे हे दोघेही बंधू नखाशिखान्त सुंदर असून त्याच्या अंग प्रत्यंगांतून सर्वत: सौदर्यच डोकावते आहे ॥ दो० २१९ ॥

बघण्या नगर भूप-सुत आले । समाचार पुरजना मिळाले ॥
धावति धामां कामां त्यागुनि । जणूं रंक निधि लुटण्या लागुनि ॥
बंधु सहज सुंदर दो पाहुनि । सुखी होति लोचन-फल पावुनि ॥
युवती भवन-गवाक्षीं बसती । रामरूप अनुरागे बघती ॥
परस्परां म्हणती सुप्रेमें । कोटि काम छवि जित इहिं नेमें ॥
सुर मुनि मनुज दनुज नागांमधि । श्रुत न कुठें अशि अति शोभा कधिं ॥
विष्णु चतुर्भुज विधि चतुरानन । विकट वेष पुररिपु पंचानन ॥
असा देव दुसरा कोणी नहि । ही छवि सखी! तुलणें जयासहि ॥

दो० :- वय किशोर सुषमा-सदन श्याम गौर सुखधाम ॥
ओवाळा प्रत्यंगिं तरि कोटि कोटि शत काम ॥ २२० ॥

दशरथ राजाचे राजपुत्र नगर पाहण्यास निघाले आहेत ही बातमी सर्व नगरभर पसरली ॥ १ ॥ (हा दर्शन) निधी लुटण्यासाठी रंक धनराशी लुटण्यासाठी धावत सुटावेत तसे सारे लोक धावत सुटले ॥ २ ॥ सहज सुंदर अशा या दोन भावांना पाहून सर्वांचेच नेत्र सुफल व सुखी होऊ लागले ॥ ३ ॥ तरूण स्त्रिया घरांच्या खिडक्यांत बसून अनुरागाने रामरुप न्याहाळूं लागल्या ॥ ४ ॥ (गवाक्षांशी बसलेल्या युवती) अती प्रेमाने एकमेकीस म्हणतात - यांनी कोटी कामदेवांच्या रुपाला जिंकले आहे, यात संशय नाही ॥ ५ ॥ देव, मुनी, मनुष्य, असुर व नाग यांमध्ये अशी शोभा कधी कुठे ऐकली नाही (तर पाहणे दूरच !) ॥ ६ ॥ (कारण) विष्णूला हात चार, तर ब्रह्मदेवाला तोंडे चार, शंकर तर भयानक वेषधारी व पांच मुखांचे, पुरारी आहेत. ॥ ७ ॥ सखी ! असा दुसरा कोणीच देव नाही की ज्याच्या रुपाशी यांच्या रुपाची तुलना करावी ! ॥ ८ ॥ हे दोघे किशोर - वयीन, परम शोभेचे माहेरघर, श्यामगौर वर्णाचे सुखाचे धाम आहेत, त्यांच्या एकेका अंगावरुन शेकडो नव्हे तर कोट्यवधी मदन ओवाळून टाकावेत ! (असे यांचे अनुपमेय सौंदर्य आहे !) ॥ दो०२२० ॥

वद सखि कवण असे तनुधारी । जो छवि, बघुनि न मोहे, भारी ॥
प्रेमें कुणि मृदु वचनें म्हणते । सुज्ञे कळलें मला ऐक तें ॥
दोघे सुत दशरथ राजाचे । हे कल युगल बाल-हंसांचें ॥
कौशिक-मुनि-मख-रक्षण कर्ते । रणाजिरीं निशिचर संहर्ते ॥
श्याम-गात्र कल कंज विलोचन । जो मारीच सुभुज-मद-मोचन ॥
तो कौसल्या सुत सुखखाणी । नाम राम धनु सायक पाणी ॥
गौर किशोर वेष वर धारी । करिं शरचाप राम अनुसारी ॥
लक्ष्मण नाम राम लघु-भाई । सखे सुमित्रा त्याची आई ॥

दो० :- करुनि विप्रहित बंधुयुग पथिं मुनि वधूद्धरून ॥
आले बघण्या चाप-मख त्या हर्षित ऐकून ॥ २२१ ॥

(दुसरी तरूणी म्हणते) सखी ! असा देहधारी कोण आहे, सांग पाहू, की जो यांचे भारी रुप पाहून मोहित होणार नाही ! ॥ १ ॥ ( तिसरी ) कोणी एक ( युवती ) मृदुवाणीने प्रेमाने म्हणाली की जे मला कळले आहे ते हे सुज्ञे मी सांगते तू ऐक. ॥ २ ॥ हे दोघे दशरथ राजाचे पुत्र आहेत, व ही एक बालहंसाची सुंदर जोडी आहे ॥ ३ ॥ हे विश्वामित्र मुनींच्या यज्ञाचे रक्षण करणारे, व रणांगणांत निशाचरांचा संहार करणारे ( शूर वीर आहेत बरं ! ) ॥ ४ ॥ श्यामवर्णी, कमलनयनी जो आहे नां तो मारीच व सुबाहू यांचा मद उतरविणारा असून, सर्व सुखाची खाण असणारा कौसल्येचा पुत्र आहे. त्याच्या हातात धनुष्य - बाण आहेत, त्याचे नांव राम आहे. ॥ ५-६ ॥ ( दुसरा गौरवर्णी, किशोरवयीन, सुंदर वेषधारी हातात शरचाप घेऊन रांमांच्या मागे चालणारा आहे नां - तो रामचंद्राचा धाकटा भाऊ ‘ लक्ष्मण ’ असून त्याच्या आईचे नांव आहे सुमित्रा ! (ऐकलस नां सखी !) ॥ ७-८ ॥ दो०- (याप्रमाणे) या दोन भावांनी विप्रहित (विश्वामित्र मख - रक्षण) केले व वाटेत रामाने मुनीस्त्रीचा उद्धार केला व (हे दोघे) धनुर्यज्ञ पाहण्यासाठी नगरात आले आहेत - हे ऐकून सर्व स्त्रियांना हर्ष झाला . ॥ दो० २२१ ॥

बघुनि राम छवि एक म्हणाली । योग्य जानकिस हा वर आली! ॥
जर सखि यां पाहिल नरनाहो । हटें त्यजुनि पण करिल विवाहो ॥
अपर वदे यां नृपें जाणिले । मुनिसह सादर बहुत मानिले ॥
सखि! परंतु पण नृप ना त्यजतो । विधिवश हटि अविवेका भजतो ॥
कोणि म्हणे जर भला विधाता । सकलां म्हणति, उचित फळदाता ॥
मिळे जानकिस तर वर हाही । आलि! यांत संदेहचि नाहीं ॥
दैवे हा येईल योग जर । होतिल सब कृतकृत्य लोक तर ॥
कारण अशि अति आर्ति अम्हांतें । कधिं तरि यां आणिल हें नातें ॥

दो० :- ना तर सखि बघ आपणां यांचें दर्शन दूरिं ॥
येइ सुयोग किं हा यदा पुण्य पुराकृत भूरि ॥ २२२ ॥

रामरुपाकडे पाहून कोणी एक (चौथी) म्हणाली की सखी ! हा वर अगदी (आपल्या) जानकीला साजेसा (अनुरुप) आहे (नाही का ?) ॥ १ ॥ जर हे जनक राजांच्या दृष्टीस पडले तर ते हट्टाने आपला पण सोडून देऊन यांच्याशीच जानकीचा विवाह करतील ॥ ३ ॥ आणखी एक कोणी युवती म्हणाली की राजाने यांना पाहीले असून मुनींबरोबर याचे आदरातिथ्य (मान - सन्मानही) केला आहे. ॥ ३ ॥ तरी सुद्धा राजा पण सोडीत नाही व प्रारब्धवशात हट्टाने अविचारीपणाने वागत आहे ॥ ४ ॥ तर कोणी एक (सहावी) म्हणाली - विधाता जर चांगला आहे व तो सर्वांना आपापल्या कर्माचे योग्य फळ देतो म्हणतात ॥ ५ ॥ तर जानकीला हाच वर मिळेल सखी ! यात मुळीच संशय नाही ॥ ६ ॥ सुदैवाने हा योग जर जुळुन आला तर सर्वच लोक कृतकृत्य होतील ॥ ७ ॥ आंम्हाला अशी अत्यंत आर्ती वाटते याचे कारण इतकेच की हे नाते यांना पुन्हा केव्हा येथे आणील ॥ ८ ॥ दो०- नाहीतर हे सखी ! असे पहा की आपणांस यांचे दर्शन पुन्हा घडणे दुरापास्त आहे. जेव्हा पूर्वजन्मीचे पुष्कळ पुण्य गाठी असेल तेव्हाच हा सुयोग जुळून यावयाचा (न् काय !) ॥ दो०२२२ ॥

म्हणे अपर कीं कथिलें समुचित । या विवाहिं सर्वांचें अति हित ॥
कोणि म्हणे शिवचाप कठोर । हे श्यामल मृदु-गात्र किशोर ॥
सुज्ञे! सगळें दुर्घट गमतें । ऐकुनि अपर सखी म्रुदु वदते ॥
कोणि कोणि सखि यां असं म्हणती । महा प्रभावी जरि लघु दिसती ॥
यत्पद-पंकज धूळ लागली । अति पापीण अहल्या तरली ॥
तो कि न तोडी शिवधनुला ही । त्यज न चुकुन विश्वास असा ही ॥
जो विरंचि रचि सीते सुंदर । तो सुविचारिं रची श्यामल वर ॥
श्रवुनि तिचे वच सकल हर्षल्या । घडो असेंच सकल मृदु वदल्या ॥

दो० :- हृदिं हर्षति वर्षति सुमन सुमुखि सुलोचनि-वृंद ॥
बंधू जाति जिथें जिथें तेथें परमानंद ॥ २२३ ॥

तर ( सातवी ) म्हणाली की तूं सांगतेस ते योग्य आहे या विवाहाने सर्वांचेच अति हित होणार आहे ॥ १ ॥ आठवी म्हणते - की अगं शिवधनुष्य़ कठोर आहे व हे श्याम शरीराचे कोमलांग असून वयाने बालक आहेत ॥ २ ॥ म्हणून सुज्ञे, हे फार कठीण दिसते हे तिचे भाषण ऐकून आणखी कोणी एक नववी म्हणाली की ॥ ३ ॥ सखी ! कोणी कोणी यांच्याविषयी असे म्हणतात की हे लहान दिसत असले तरी यांचा प्रभाव फार मोठा आहे ॥ ४ ॥ ज्याच्या कमलासारख्या ( कोमल ) पायांची धूळ लागताच अती पापीण अहल्या तरली ॥ ५ ॥ तो काय शिवधनुष्य़ मोडणार नाही, तेव्हा असा विश्वास चुकून सुद्धा सोडू नकोस ॥ ६ ॥ विरंचीने सुंदर सीतेची रचना केली त्यानेच सुविचाराने या श्यामल वराची रचना ( तिच्यासाठीच ) केली आहे ॥ ७ ॥ तिचे हे म्हणणे ऐकून सगळ्या जणी आनंदित झाल्या व मृदुस्वराने म्हणाल्या की असेच घडो ( तुझ्या तोंडात साखर पडो ) ! ॥ ८ ॥ दो०- जिथे जिथे हे दोघे बंधू जातील तिथे तिथे ( या प्रमाणेच ) सुमुखी व सुलोचनी अशा पुरवधू हृदयात हर्षीत होऊन सु-मनांचा ( यांच्यावर ) वर्षाव करीत आहेत व तेथे तेथे परमानंद लुटला जात आहे. ॥ दो०२२३ ॥

जाति बंधु पुर-पूर्व दिशेला । जिथें धनुर्मख-मंडप केला ॥
अति विस्तृत वर फरशि बसविली । विमल वेदिका रुचिर सजविली ॥
भंवति कनक-मंचां सुविशालां । निर्मित बसावया महिपालां ॥
भोंवति मागें निकट तयां अति । अपर मंच-मंडले विराजति ॥
उंच कांहिशीं विविधा सुंद र । बसतिल पुरजन येतां ज्यांवर ॥
त्यांचे निकट विशाल सुशोभित । धवल धाम बहुवर्णी निर्मित ॥
जिथें बसुनि बघतिल पुरनारी । यथा योग्य निजकुल अनुसारीं ॥
पुर-बालक अति मृदुमृदु वचनें । प्रभुस दाखविति सादर रचने ॥

दो० :- प्रेमविवश शिशु या मिषें स्पर्शति मनहर गात्र ॥
पुलकित बंधुंस बघबघुनि हृदयें प्रमोद-पात्र ॥ २२४ ॥

जनकपुरीच्या पूर्व दिशेला जेथे धनुर्यज्ञासाठी रंगभूमी बनवली होती तेथे दोघे बंधू गेले ॥ १ ॥ ही जागा अति विस्तृत असून जमिनीवर सुंदर पक्की फरशी बनविली आहे व ( तिथेच ) एक सुंदर विमल वेदिका तयार केली आहे ॥ २ ॥ त्या वेदीच्या सभोवती ( चारी बाजूंस ) सुवर्णाचे अति विशाल मंच ( कोच ) तयार केले आहेत - ते राजे लोकांना बसण्यासाठी आहेत ॥ ३ ॥ त्यांच्या मागे अगदी जवळ कोचांची दुसरी मंडले शोभत आहेत ॥ ४ ॥ ( त्यांच्या मागे ) एकापेक्षा एक किंचित उंच व नाना प्रकारे सुंदर मंचमंडले आहेत, नगरीतील पुरुषांसाठी या जागा आहेत ॥ ५ ॥ यांच्या जवळच मागील बाजूस विशाल व सुशोभित अशी चुनेगच्ची सदने असून ती अनेक रंगी आहेत ॥ ६ ॥ या जागी नगरीतील स्त्रीवर्ग आपापल्या कुळानुसार यथा योग्य ठिकाणी बसून धनुर्यज्ञाचे कार्य पाहतील ॥ ७ ॥ नगरातील मुले गोड गोड शब्दांनी पुन:पुन्हा सांगून सर्व रचना आदराने दाखवीत आहेत. ॥ ८ ॥ दो०- नगरीतील ही सर्व बालके प्रेमाला विशेष वश झाली असून या ( रंगभूमीची रचना दाखविण्याच्या ) निमित्ताने दोघांच्या मनोहर गात्रांस स्पर्श करीत आहेत; व दोघा भावांकडे पाहून पुन:पुन्हा त्यांच्या अंगावर रोमांच उठत आहेत व हृदये प्र-मोदाने ( विशेष आनंदाने ) भरली आहेत ॥ दो० २२४ ॥

प्रेमविवश शिशु राम जाणती । निकेतांस सप्रीति वानती ॥
बोलावति सब जशि रुचि ज्यातें । स्नेहें जाती दोघे भ्राते ॥
राम दाखविति अनुजा रचने । वदुनि मधुर मृदु मनहर वचनें ॥
लव निमिषामधिं भुवन-निकायां । ज्याचे अनुशासनिं रचि माया ॥
दीन दयाळू भक्तीस्तव तो । चकित चापमख-शाला बघतो ॥
बघुनि कौतुका निघति गुरुकडे । उशिर जाहला भीति मनिं पडे ॥
भीतिस भिववी धाक जयाचा । तो प्रभाव दाखवि भजनाचा ॥
रुचिर मधुर मृदु बोलुन वचनां । बळें बालकां धाडिति सदनां ॥

दो० :- प्रेमें, सभय, विनीत अति संकोचित दोघेहि ॥
गुरु-पद-पंकजिं नमुनि शिर आज्ञेनें बसले हि ॥ २२५ ॥

सर्व बालके प्रेमवश झाली आहेत हे जाणून रामचंद्रांनी रंगभूमीतील स्थानांची प्रेमाने प्रशंसा केली ॥ १ ॥ ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे सर्व मुले रामलक्ष्मणांस बोलवीत आहेत, व त्यांच्या स्नेहामुळे दोघे भाऊ जात आहेत ॥ २ ॥ (रंगभूमीची) सर्व रचना रामचंद्रांनी मृदु, मधुर व मनोहर वचने बोलून धाकट्या भावास दाखविली ॥ ३ ॥ ज्याच्या आज्ञेने माया अनेक भुवनांच्या समुदायास लवनिमिषांत निर्माण करते तो दीन दयाळू भक्तीमुळे चापमखशाळा चकित होऊन पहात आहे ॥ ४-५ ॥ कौतुक पाहून गुरुकडे जाण्यास परतले. पण उशीर झाला हे जाणून मनात भीती वाटली ॥ ६ ॥ ज्यांच्या धाकाने भयाला सुद्धा भय वाटते तेच भजनाचा प्रभाव दाखवीत आहेत ! ॥ ७ ॥ मृदु, गोड व सुंदर भाषण करुन मुलांना (मारून मुटकून) जबरदस्तीने घरी पाठवून दिले ॥ ८ ॥ दो०- अती प्रेमाने, भयाने, विशेष विनयाने, व संकोचाने दोघा भावांनी गुरुचरणकमलांवर मस्तक नमविले व आज्ञा मिळाल्यावर खाली बसले ॥ दो० २२५ ॥ ( तोपर्यंत उभेच होते )

निशामुखीं दे मुनि अनुशासन । सर्वांनीं कृत संध्या-वंदन ॥
वदत कथा इतिहास पुराणां । क्रमिति रुचिर युग निशियामांना ॥
मग मुनिवर जाऊन झोपले । दाबिति पायां बंधु युग भले ॥
ज्यांच्या चरण-सरोजां-लागीं । करिति विविध जप योग विरागी ॥
बंधू जणुं ते प्रेमें जितले । गुरुपद-पंकज-सेवे रतले ॥
वारंवार देति आज्ञा मुनि । रघुवर करिती शयना जाउनि ॥
चेपि चरण लक्ष्मण हृदिं लावुनि । प्रेमें सभय परम सुख पावुनि ॥
कितिदां प्रभु वदले निज बाळा! । पडे धरुनि हृदिं पद-जलजांला ॥

दो० :- उठले लक्ष्मण गत निशा कुक्कुट-रव ये कानिं ॥
गुरुचे पूर्वीं जगत्पति राम जागले ज्ञानि ॥ २२६ ॥

रात्र होण्यापूर्वी सायंकाळी मुनीने आज्ञा दिली व सर्वांनी संध्यावंदन केले ॥ १ ॥ मग इतिहास पुराणातील कथा सांगत असता रमणीय रात्रीचे दोन प्रहर निघून गेले (कोजागिरी पौर्णिमा ) ॥ २ ॥ ( मग ) मुनिश्रेष्ठ विश्वामित्र जाऊन झोपले व दोघे भले भाऊ त्यांचे पाय चेपीत बसले ॥ ३ ॥ ज्यांच्या चरणकमलांच्या ( दर्शना ) साठी विरागी बनून जपयोगादि विविध साधने करतात ॥ ४ ॥ तेच दोघे बंधू जणूं प्रेमाने जिंकले गेलेले गुरुचरणसेवा करण्यात रममाण झाले आहेत ॥ ५ ॥ मुनीने वारंवार आज्ञा दिली तेव्हा रघुवराने जाऊन शयन केले. ॥ ६ ॥ ( मग ) लक्ष्मण रामाचे चरण आपल्या उराशी धरुन प्रेमाने व भीतभीत चेपू लागले व त्यांस परमसुख मिळूं लागले ॥ ७ ॥ बाळा ! नीज आता असे प्रभू किती तरी वेळा म्हणाले तेव्हा त्या पदकमलांना हृदयात धारण करून ( त्यांचे ध्यान करीत ) लक्ष्मण आडवे झाले ॥ ८ ॥ दो०- रात्र संपली व कोंबडे आरवण्याचा आवाज कानांवर आला तेव्हा लक्ष्मण उठले व जगत्पती राम ज्ञानी असल्याने गुरुच्या आधी जागे झाले . ॥ दो०२२६ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP