॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ३४ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

श्याम शरीर सहज सुंदर, तें । कोटि काम शोभे लाजवतें ॥
अळिता-युत पदकमल विलसती । मुनि-मन-मधुप करिति जिथं वसती ॥
पावन पीतांबर सुमनोहर । बालभानु - दामिनि - तेजोहर ॥
कल किंकिणि कटिसूत्र मनोहर ॥ बाहु विशाल विभूषण सुंदर ॥
पीत जानवें फार शोभतें । चित्ता करमुद्रिका चोरते ॥
वर शृंगार सकल शुभ शोभति । आयत उर उरभूषण राजति ॥
पीत उपरणें खाके खालुनि । रचित मोति मणि पदरालागुनि ॥
नयन कमल कल कुंडल कानीं । वदन सकल सौंदर्य-सुरवाणी ॥
सुंदर भृकुटी नाक मनोहर । भाल तिलक रुचिरता वास वर ॥
मोर-मुकुट मस्तकीं सुशोभित । मंगलमय मणि मुक्ता विरचित ॥

छं० :- खचिले महामणिं मुकुटिं मंजुल अंग चित्ता चोरती ॥
सुरसुंदरी पुरनारिं सुवरा बघुनिं दृष्टहिं काढती ॥
ओवाळती मणि वसन भूषण गाति मंगल, आरती ॥
सुर सुमन वर्षतिं सूत मागधबंदि सुयशा वानती ॥ १ ॥
गौरीहरां आणीतिं कुमर-कुमारि नारि सुखावती ॥
सुप्रीतिं मंगल गात लौकिक रीतिं सब करुं लागती ॥
रामास शिकवी गौरी सीते घास देउं सरस्वती ॥
राण्याहिं हास-विंलास-रस-वश जन्मफल सब पावती ॥ २ ॥
निज-पाणिं-मणिं-मधिं दिंसतसे मूर्ती स्वरूपनिधान कीं ॥
भुजवल्लिं हलविंत ना विलोचन विंरहभयवश जानकी ॥
कौतुक विंनोदामोद वदवे प्रेम ना, सखि जाणती ॥
वर कुमरि सुंदर सखी घेउन निंघतिं जानोशाप्रती ॥ ३ ॥
त्या समयिं कानिं अशीस चहुं दिशिं नगरिं नभिं मोद हि महा ॥
चिरजीवि जोडे चारु चारी होतु म्हणती सरसहा ॥
सुर सिद्ध मुनि वर योगि बघुनी प्रभुस, दुंदुभि ताडती ॥
गत हर्षिं वर्षुनि सुमन जय जय करित निज लोकाप्रती ॥ ४ ॥
दो० :- सहिंत नववधू कुमर तैं आले तातापासिं ॥
शोभा मंगल मोद भर पूर किं ये जनवासिं ॥ ३२७ ॥

नवपरिणित रामरुप दर्शनशामल शरीर सहज सुंदर असून ते कोटी कामांच्या शोभेस लाजवीत आहे ॥ १ ॥ ज्या पदकमलांच्या ठिकाणी मुनींची मने रुपी मधुकर वस्ती करुन राहीले आहेत ते पदकमलही शोभायमान असून अळित्याने रंगविले आहेत. ॥ २ ॥ पीतांबर मनोहर असून तो बाल सूर्य व वीज यांच्या तेजाला मागे सारणारा आहे ॥ ३ ॥ सुंदर घागर्‍या लावलेला करगोटा मनोहर आहे व बाहू विशाल असून त्यावर सुंदर बाहूभूषणे घातली आहेत. ॥ ४ ॥ पिवळे जानवे फारच शोभत आहे बोटातील मुद्रिका तर चित्त चोरुन घेत आहे ॥ ५ ॥ वराचे सर्व सुंदर शृंगार शोभत आहेत छाती रुंद विशाल असून वर उरभूषणे विराजत आहेत ॥ ६ ॥ पिवळे उपरणे उजव्या खाके खालून घेऊन डाव्या खांद्यावर टाकले आहे व त्याच्या दोन्ही पदरांना व आचळ्यांना मोती व रत्ने गुंफली आहेत ॥ ७ ॥ नेत्र कमलासारखे असून कानांत सुंदर कुंडले आहेत मुख तर सर्व सौंदर्याची उत्तम खाणच आहे ॥ ८ ॥ भिवया सुंदर असून नाक मनोहर कपाळावरील गंध तर उत्तम सुंदरतेचे वसतिस्थान आहे ॥ ९ ॥ मस्तकावर मणि मोती विशेष जडलेला मोर मुकुट शोभतो आहे. ॥ १० ॥ मुकुटावरील मोरात महामणी जडले आहेत व सर्व अंगे चित्तास चोरून घेत आहेत देवस्त्रिया व नगरवनिता सुंदर वराला पाहून दृष्टच काढूं लागल्या मणि, वस्त्रे, भूषणे ओवाळून टाकून आरती ओवाळून मंगल गान करुं लागल्या देव पुष्पवृष्टी करु लागले व सूत मागध बंदी सुयश वर्णू लागले ॥ छं० १ ॥ कुमार - कुमारींना गौरीहराजवळ आणले व सर्व सुवासिनी सुखी झाल्या व अत्यंत प्रीतीने मंगल गीते गात सर्व लौकिक रीती - रिवाज करु लागल्या गौरी रामाला शिकवीत आहे की सीतेला घास द्या (पाहू) व सरस्वती सीतेला सांगते की घास द्या पाहू आता सर्व राणीवसा हास्यविलासात मग्न होऊन आपल्या जन्माचे फळ पावल्या ॥ छं० २ ॥ आपल्या हातातील मणिरत्नांमध्ये स्वरुपनिधान श्रीरामचंद्रांची मूर्ती दिसत आहे (ती सीता पहात आहे) म्हणून जानकी आपली भुजलता किंवा दृष्टी विरहभयाला वश होऊन जरा सुद्धा चाळवीत नाही (यावेळचे) कौतुक, विनोद, आनंद व प्रेम कसे सांगता येईल ते सर्व सखींना माहीती आहे सर्व सुंदर सखी वरांना व कुमारींना घेऊन जानोशाकडे चालल्या ॥ छं० ३ ॥ त्यावेळी नगरात व आकाशात जिकडे तिकडे आशीर्वाद कानावर येऊ लागले व सर्वत्र महाआनंद पसरला सरसहा सर्व लोक म्हणू लागले की हे चार सुंदर जोडे चिरंजीव होवोत देव, सिद्ध, मुनीश्रेष्ठ व श्रेष्ठ योगी यांनी प्रभुला पाहताच नगारे पिटण्यास प्रारंभ केला व हर्षाने पुष्पवर्षाव करून जयजयकार करीत ते सर्व आपापल्या लोकात गेले ॥ छं०४ ॥ त्यावेळची शोभा व मंगल मोदाच्या भराचा जानोशात जणू काय पूर आला. ॥ दो ० ३२७ ॥

स्वयंपाक झाला मग गाढा । धाडि जनक बोलावुं वर्‍हाडा ।
अनुपम पायघड्या पट पडती । नृप पुत्रांसह गमना करती ॥
क्षालित सर्वांचे पद सादर । बसवीले समुचित पाटांवर ॥
क्षालित दशरथ पायां जनकें । स्नेहा शीला कोण वदुं शके ॥
राम पदाम्भोजां तैं क्षालित । जे हरहृदय सरोरुहिं गोपित ॥
तिघे बंधु रामासम गणुनी । क्षालिति चरण जनक निज पाणीं ॥
उचितासन नृप सर्वां देई । वाढप्यांस बोलावुनि घेई ॥
पात्रें सादर मांडुं लागले । कनक कील मणिपानिं लावले ॥

दो० :- सूपोदन सुरभी-सर्पि स्वादु सुरस सुपुनीत ॥
क्षणिं एका परिवेषिती वाढपि चतुर विनीत ॥ ३२८ ॥

मग अनेक प्रकारचा पुष्कळ स्वयंपाक तयार झाला; तेव्हा जनकाने वर्‍हाड्यांस आमंत्रण पाठवले ॥ १ ॥ अति उत्तम रेशमी पायघड्या पडू लागल्या व दशरथ राजांनी पुत्रांसह (व वर्‍हाड्यांसह भोजनासाठी) गमन केले ॥ २ ॥ सर्वांचे पाय आदराने धुतले. सर्वाना यथोचित आसनांवर पाटांवर बसविले त्यावेळचा स्नेह व शील कोण वर्णूं शकेल ! ॥ ३-४ ॥ नंतर ते रामचंद्राचे जे चरणकमल शंकरांच्या हृदयातील सरोरुहात लपविलेले आहेत ते धुतले ॥ ५ ॥ तिघा भावांना रामांप्रमाणे मानून जनकांनी त्यांचेही पाय आपल्या हातांनी धुतले ॥ ६ ॥ राजाने सर्वांना योग्य अशी आसने दिली व वाढप्यांना बोलावून घेतले ॥ ७ ॥ रत्‍नांच्या पानांना सोन्याचे टाके लावून तयार केलेल्या पत्रावळी ते आदराने मांडू लागले ॥ ८ ॥ चतुर व विनीत वाढप्यांनी स्वादिष्ट वरण भात व सुगंधी, सुरस व अत्यंत पवित्र असे गाईचे तूप हे पदार्थ एका क्षणांत सर्वांना वाढले ॥ दो० ३२८ ॥

कृत पंचाहुति जेऊं लागति । श्रवुनि उखाणे अति अनुरागति ॥
नानाविध पक्वान्नं वाढलीं । सुधें समान, न जाति वानलीं ॥
सुज्ञ वाढपी वाढति भावें । बहु शाकादि, न ठा‍उक नांवे ॥
भोजनिं विधिवत चारी जाती । एकिं तर्‍हा ना वदल्या जाती ॥
षड्रस रुचिकर चटण्यादिक अति । एक-एक-रसपरी न गणवति ॥
घालिति मधुर उखाणे नाना । घेउनि पुरुष-नारि-नामानां ॥
समय-सुशोभन-विनोद चाले । सह समाज नृप हसते झाले ॥
यपरिं सकल जेउनी उठले । सादर आचमना जल दिधलें ॥

दो० :- पूजि जनक देउनि विडे दशरथ, वर्‍हाडि यांसि ॥
सकल महीप-शिरोमणी मुदित जाति निजवासिं ॥ ३२९ ॥

पंच आहुती करुन ते जेऊ लागले उखाणे ऐकून सर्वांच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न झाले ॥ १ ॥ नाना प्रकारची अनेक पक्वान्ने वाढू लागले ती सर्व अमृतासारखी असून त्यांचे वर्णन करणे शक्य नाही ॥ २ ॥ हुशार व विनीत वाढपी प्रेमाने भाज्या वगैरे वाढू लागले (ते पदार्थ इतके विविध आहेत की) त्यांची नांवे तरी कोणाला माहीत ? ॥ ३ ॥ जेवणात यथाविधी खाद्य, पेयांचा चारी जातीचे (भक्ष्य, भोज्य, चोष्य, लेह्य) इतके प्रकार वा तर्‍हा आहेत की सांगता येत नाही. ॥ ४ ॥ अति रुचकर षड्‍रसाने युक्त चटण्या कोशिंबिरी वगैरे असून प्रत्येकाच्या रसाच्या अगणित परी (तर्‍हा वा प्रकार) आहेत ॥ ५ ॥ पुरुष जेवीत असता स्त्रिया नाना प्रकारचे मधुर उखाणे घेत आहेत व पुरुषही त्यांची नांवे घेत उखाणे घालीत आहेत ॥ ६ ॥ समयोचित असा हा विनोद असल्याने दशरथ राजे वर्‍हाडासह हसू लागले ॥ ७ ॥ जेऊन सर्व मंडळी उठली. सर्वांना आंचविण्यास व आचमनास पाणी दिले गेले ॥ ८ ॥ (नंतर) जनकांनी सर्वांना विडे देऊन सर्वांचे पूजन (आदर सत्कार) केले व सर्व महीपतींचे शिरोमणी दशरथ राजे आनंदाने आपल्या निवासस्थानी (विश्राम करण्यास) गेले. ॥ दो० ३२९ ॥

नित्य नवें मंगल पुरिं चाले । निमिषासम निशिवासर झाले ॥
उषःकाळिं भूपतिमणि जागति । याचक गुणगण गाऊं लागति ॥
बघुनि कुमारां सहित वधू वर । मोद अमित मनिं कसा वदूं बरं ॥
नित्यकर्म कृत गत गुरु पासीं । प्रेमा महा प्रमोद मनासी ॥
प्रणमुनि पूजन कृत जोडुनि कर । वदले गिरा सुधामय सुंदर ॥
पहा आज मुनि-राज आपले- । कृपें काम मम पूर्ण जाहले ॥
अतां स्वामि आणुनि विप्रांनां । द्या कीं सालंकृत गो-दानां ॥
ऐकुनि गुरु भूपा वाखाणति । मुनिवृंदांस निमंत्रण धाडति ॥

दो० :- वामदेव देवर्षि ही वाल्मीकी जाबालि ॥
आले मुनिवर-निकर तैं कौशिकादि तपशालि ॥ ३३० ॥

जनकपुरीत नित्य नवा मंगलोत्सव सुरु आहे. रात्र व दिवस पळासारखे पळत आहेत ॥ १ ॥ दशरथ उष:काळी जागे झाले व भाट याचक समुदाय त्यांचे गुणगान गावूं लागले ॥ २ ॥ या चारी सुंदर पुत्रांना त्यांच्या सुंदर वधूसहित पाहून दशरथांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ॥ ३ ॥ प्रात:काळचे नित्यकर्म उरकून राजे वसिष्ठ गुरुंकडे गेले (तेव्हाही) त्यांच्या मनात महान आनंद व अत्यंत प्रेम भरलेले आहे ॥ ४ ॥ गुरुंना प्रणाम करुन पूजा केली व हात जोडून अमृतमय सुंदर वचन बोलले ॥ ५ ॥ मुनिराज ! थोडे ऐकावे आपल्या कृपेने माझे सर्व काम आज पुर्ण झाले ॥ ६ ॥ स्वामिराज ! आता सर्व विप्रांना, मुनीवरांना बोलावून अलंकृत केलेल्या गाईचे दान (गोदान) आपण द्यावे ॥ ७ ॥ हे ऐकून गुरुनी राजाची प्रशंसा केली व मुनिवृंदांना बोलावणे पाठविले ॥ ८ ॥ निमंत्रण मिळताच-वामदेव, ऋषी, देवर्षि नारद, वाल्मीकी, जाबाली व कौशिकांसारखे महातपस्वी मुनींचे समुदाय आले. ॥ दो० ३३० ॥

त्यां नृप करुनि दण्डवत् प्रणमन । प्रेमें पूजुनि देइ वरासन ॥
चार लक्ष अणविति धेनू वर । कामसुरभिसम सुशील सुंदर ॥
सर्वहि सविधि अलंकृत करुनी । मुदित महिप महिसुरां अर्पुनी ॥
प्रार्थिति नानापरिं सर्वांला । जीवनलाभ आज मज झाला ॥
आशीर्वचनिं नृपति आनंदित । याचक-वृंदां तदा आणवित ॥
कनक वसनं गज-वाजी स्यंदन । मणि, जशि रुचि दे रविकुलनंदन ॥
जाती पढत गात गुण-गाथा । जय जय जय दिनकर कुलनाथा ॥
ऐसा राम-विवाहोत्साहो । वदुं न शके मुख हजार ज्या हो ! ॥

दो०:- पुनः पुन्हां कौशिकपदीं वदे नमुनि शिर राय ॥
हें अतिं सुख मुनिराज तव कृपा-कटाक्ष-पसाय ॥ ३३१ ॥

दशरथ राजाने त्या सर्व मुनीवरांना दण्डवत नमस्कार केले व प्रेमाने पूजा करुन बसण्यास सिंहासने दिली ॥ १ ॥ कामधेनूसारख्या सुशील, सुंदर व उत्तम धेनू चार लक्ष मागविल्या ॥ २ ॥ व सर्व धेनूंना यथाविधी अलंकृत करुण महीप दशरथांनी त्या सर्व ब्राम्हणांना अर्पण केल्या. (दान दिल्या) ॥ ३ ॥ व सर्वांना अनेक प्रकारे प्रार्थना करुन म्हणाले की आज मला माझ्या जीवनाचा लाभ मिळाला ॥ ४ ॥ मिळालेल्या आशीर्वादांनी राजाला आनंद झाला व त्याने याचकांच्या समूहाला बोलावून आणविले ॥ ५ ॥ सोने, रत्ने, वस्त्रे, हत्ती घोडे, रथ इत्यादि वस्तू रविकुलानंद दशरथ राजाने याचकांच्या आवडी प्रमाणे त्यांना दिल्या ॥ ६ ॥ कोणी (आशीर्वादात्मक) मंत्र पढत, कोणी दशरथ गुण-गाथा गात, तर कोणी जयजयकार करीत परत चालले. ॥ ७ ॥ रामचंद्रांचा (व सर्व भावांचा) विवाहोत्साह अशा रीतीने परिपूर्ण झाला. ज्याला हजार मुखे आहेत तो शेष सुद्धा याचे वर्णन करू शकणार नाही ॥ ८ ॥ दशरथ राजाने कौशिकाच्या पायांवर मस्तक ठेऊन म्हटले की मुनिराज ! हे अपरिमित सुख केवळ आपल्या कृपाकटाक्षाचा प्रसाद आहे ! ॥ दो० ३३१ ॥

जनक शील कर्तृत्व विभूती- । स्नेह, नृपति वानिति बहुरीतीं ॥
गमनाज्ञा कोसलपति मागति- । रोज, भूपती प्रेमें राखति ॥
अधिक नित्य नव आदर-वृद्धी । प्रतिदिन पाहुणचार-समृद्धी ॥
आनंदोत्सव नित्य नवे पुरिं । दशरथ-गमन न कुणा रुचे उरिं ॥
दिवस विगत किति दिवसा आड । स्नेह-रज्जु-बद्ध कीं वर्‍हाड ॥
कौशिक शतानंद मग जाउनि । वदति विदेहनृपा समजाउनि ॥
अतां दशरथां निरोप द्या तरि । स्नेह न आपण सोडुं शकां जरि ॥
बरें नाथ ! नृप बोलवि सचिवां । तिहिं शिर नमिलें वदुनि जय शिवा ॥

दो० :- कोसलेश जातों म्हणती कळवा जाउनि आंत ॥
सचिव विप्र तैं सभा नृप प्रेमविवशहोतात ॥ ३३२ ॥

जनकाचे स्नेह, शील, कर्तुत्व व ऐश्वर्यादि यांची प्रशंसा दशरथ अनेक प्रकारे करुं लागले ॥ १ ॥ रोजच्या रोज अयोध्या पतींनी जाण्याची आज्ञा मागावी व जनकाने त्यांना प्रेमाने ठेऊन घ्यावे असा क्रम सुरु झाला ॥ २ ॥ हा रोज नवनवा वाढणारा आदर व रोजच्या रोज पाहुणचारांची समृद्धी चालूच होती ॥ ३ ॥ नगरात सुद्धा नित्यनवा आनंदोत्सव चालू असून दशरथांचे जाणे कोणालाच मनातून रुचत नाही ॥ ४ ॥ याप्रमाणे दिवसामागून दिवस कितीतरी निघून गेले, व असे वाटू लागले की, सगळे वर्‍हाड स्नेहरुपी दोरीने जणूं बांधूनच ठेवले आहे ॥ ५ ॥ मग (एके दिवशी) कौशिक व शतानंद यांनी विदेह राजास समजावून सांगितले व म्हणाले की ॥ ६ ॥ जरी आपण स्नेह सोडू शकत नाही तरी आता दशरथांना निरोप द्यावा ॥ ७ ॥ बरे आहे नाथ ! असे म्हणून जनकाने सचिवांना बोलावले व त्यानी ‘ जय जीव ’ म्हणून मस्तक नमविले ॥ ८ ॥ (तेव्हा जनक त्यांस म्हणाले) अयोध्यापती म्हणतात की आम्ही आज जातो तरी आत (अंत:पुरात) जाऊन ही खबर द्यावी हे ऐकताच सचिव, सर्व विप्र व सगळी सभा (यांसह) राजा प्रेमविव्हळ झाले ॥ दो० ३३२ ॥

पुरजन परिसुन ’वर्‍हाड जाते’ । पुसति परस्पर विव्हळतां ते ॥
सत्य गमन परिसुनी म्लान अति । सायं सरसिज जणूं कोमेजति ॥
येतां वसले जिथें वर्‍हाडी । तेथें विविध शिधा नृप धाडी ॥
मेवा पक्वान्ने विविधा किति । भोजन-सामग्री नाहीं मिति ॥
भरुनि कावडी, अमित वृषांवर- । धाडि जनक बहु शुभ शय्या वर ॥
तुरग लाख, रथ हजार पंच्वीस । सकल अलंकृत नखादि आशीस् ॥
मत्त अयुत वर सिंधुर राजति । जे दिसतां दिक्कुंजर लाजति ॥
कनक-वसन-मणि यानें भरभर । महिषी धेनु वस्तु विविधा वर ॥

दो० :- आंदण देइ न वर्णवे पुन्हां विदेह अपार ॥
बघत लोक लोकप सकल संपत्ती तृणसार ॥ ३३३ ॥

वर्‍हाड जाणार अशी कुणकुण नगरवासी लोकांच्या कानी येताच ते विव्हळतच एकमेकांस विचारुं लागले (की खरंच का जाणार वर्‍हाडी ? कधी ? केव्हा ? इत्यादी) ॥ १ ॥ खरंच जाणार असे कोणी म्हणताच विचारणारा, उत्तर देणारा व ऐकणारा असे सर्वच विरह व्यथेने सायंकाळी तलावातील कमळे सुकून जावीत तसे सारे मलूल होऊ लागले ॥ २ ॥ वर्‍हाड्यांनी जिथे जिथे वस्ती केली होती तिथे तिथे नाना प्रकारचा शिधा धाडला गेला. ॥ ३ ॥ नानाविध मेवा मिठाई व तर्‍हतर्‍हेची पक्वान्ने किती तरी पाठविली तसेच भोजनाची सामुग्री किती धाडली त्याला मिती नाही ॥ ४ ॥ हे सर्व सामान कावडी भरभरुन व बैलांवर पाठविले, शिवाय जनकाने सुंदर उंची शय्यासामुग्रीही धाडली ॥ ५ ॥ नखशिखांत अलंकृत केलेले एक लाख घोडे व तसेच शृंगारलेले पंचवीस हजार रथ आणि तसेच उत्तम शृंगारलेले दहा हजार मत्तहत्ती इतके सुंदर की त्यांना पाहून दिग्गजांनी सुद्धा लाजेने मान खाली घालावी असे दिले ॥ ६-७ ॥ सोने, रत्ने, वस्त्रे इ. विविध वस्तू गाड्या भरभरून पाठवल्या म्हशी, सवत्स गाई इत्यादी अनेक उत्तम वस्तू विदेहाने पुन्हा पाठविल्या ॥ ८ ॥ विदेहाने इतके आंदण पुन्हा दिले की, त्यास पार नाही व त्याचे वर्णन कोणालाही करता येणार नाही . (कारण) ते सर्व पाहून सर्वलोक लोकपालांची संपत्ती त्यापुढे तृणासमान वाटतात ॥ दो० ३३३ ॥

यापरि सर्वहि साज साजुनी । जनक अयोध्ये देति धाडुनी ॥
’जाई वरात’ परिसुनि राण्या । विकल मीनगण जणुं लघु पाण्यां ॥
सीते कितिदां अंकी घेती । आशीर्वादहि शिकवण देती ॥
संतत पतिला प्रिय बाळे ! हो । चिर सौभाग्य अशीस् अमचे हो ॥
सासु-सासरा-गुरु-सेवा कर । पतिकल बघुन पाळ आज्ञा बरं ॥
स्नेहविवश अति सखि सुज्ञानी । नारिधर्म शिकविति मृदु वाणीं ॥
सादर सब सुतांस समजावति- । राण्या मग कितिदां आलिंगति ॥
भेटति वारंवारहि माता । म्हणति निर्मि कां स्त्रिया विधाता ॥

दो० :- राम भानुकुल-केतु तैं बंधु तिघे त्यां-पाठिं ॥
निघति जनक मंदिरिं मुदित आज्ञा घेण्यासाठिं ॥ ३३४ ॥

याप्रमाणे सर्व सामान सज्ज करुन जनकाने अयोध्येस पाठवून दिले ॥ १ ॥ वर्‍हाडी जाणार असे राण्यांना कळताच जणूं थोड्या पाण्यात मांशांच्या थव्याची दशा व्हावी तशी त्यांची झाली ॥ २ ॥ त्यांनी वारंवार सीतेला मांडीवर घेतली व आशीर्वाद व शिकवण दिली ॥ ३ ॥ बाळे, तू आपल्या पतीला सतत प्रिय होशील बरं ! आणि तुझे सौभाग्य अखंड राहो हे आमचे आशीर्वाद आहेत. ॥ ४ ॥ सासू, सासरे, व वडिलमाणसे यांची सेवा करीत जा, बरं ! व आपल्या पतीचा कल पाहून त्याप्रमाणे आज्ञा पालन कर हो. ॥ ५ ॥ अत्यंत स्नेहवश झालेल्या सुजाण सखी मृदुवाणीने नारी-धर्म शिकवूं लागल्या ॥ ६ ॥ सर्व राण्यांनी आदराने सर्व मुलींची समजूत घातली व कितीदा तरी त्यास (जवळ घेऊन) आलिंगन दिले ॥ ७ ॥ माता जननी वारंवार भेटल्या आणि म्हणाल्या की विधात्याने स्त्रियांना निर्माण केल्या तरी कशाला ? ॥ ८ ॥ त्याचवेळी तिघे भाऊ बरोबर असलेले राम सासवांचा निरोप घेण्यासाठी आनंदाने जनकमंदिराकडे निघाले ॥ दो० ३३४ ॥

सहज चारु बंधूस बघाया । लागति पुरनरनारि पळाया ॥
आज जाउं बघती कुणि सांगत । सब पाठवणि विदेहें सज्जित ॥
रूप बघुन घ्या नयनीं भारी । प्रिय पाहुणे भूप-सुत चारी ॥
सुज्ञे ! कवण सुकृत ज्या-लागुनि । नयन-अतिथिकृत विधिनें आणुनि ॥
मरणशील जशि सुधा पावतो । सुरतरु जन्म-भुकेला लभतो ॥
मिळे नारक्या हरिं-पद जैसें । यांचे दर्शन आम्हां तैसें ॥
बघुनि राम शोभा किं उरिं धरा । निज मन फणि मूर्तीस मणि करा ॥
सकलां असें नयनफल देतां । गत कुमार सब राजनिकेता ॥

दो० :- रूपसिंधु बंधुंस बघुनि सासु मुदित उठतात ॥
ओवाळुनि आरति करति महामोद चित्तांत ॥ ३३५ ॥

स्वभावत:च सुंदर असणार्‍या या बंधूंना पाहण्यासाठी पुर-नरनारींची धावपळ सुरू झाली ॥ १ ॥ कोणी सांगितले की आजच जाऊ बघत आहेत आणि विदेहाने सर्व पाठवणी सुसज्ज केली आहे ॥ २ ॥ हे चारी राजकुमार प्रिय पाहुणे आहेत, त्यांचे रुप डोळ्यांनी चांगले पाहून घ्या ॥ ३ ॥ सूज्ञे, असे आपले कोणते सुकृत असेल की ज्याच्यामुळे यांना येथे आणून विधात्याने आपल्या नेंत्रांचे अतिथी केले आहे ॥ ४ ॥ मरणार्‍याला जसे अमृत मिळावे, जन्मापासून भुकेला असल्यास जसा कल्पतरु मिळावा, व नारकी जीवाला जशी हरिपद प्राप्ती व्हावी तसे यांचे दर्शन आपल्याला झाले ॥ ५-६ ॥ नीट पाहून रामशोभा हृदयात धारण करा की आपले मन नाग करून राममूर्तीला मणि करा. ॥ ७ ॥ याप्रमाणे सर्वांना त्यांच्या नेत्राचे फळ देत देत चौघे राजकुमार राजवाड्याजवळ पोचले देखील ॥ ८ ॥ रुपसागर बंधूंना पाहून सर्व राण्या हर्षाने उठल्या व त्यांचे औक्षण करून त्यांचेवरून अनेक वस्तू ओवाळून टाकून आरती करुन त्या अत्यंत मुदित झाल्या ॥ दो० ३३५ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP