॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय ५ वा



Download mp3

राम एकदां बंधू संगति । पवनकुमारा सह जो प्रिय अति ॥
गत सुंदर उपवन बघुं जंव । सब तरु कुसुमित नव पल्लव ॥
समय गणुनि सनकादिक येती । तेजपुंज गुण शील शुभ अती ॥
ब्रह्मानंदिं सदा लयलीन । बघतां बालक, बहुकालीन ॥
जणूं रूपधर चारी वेदहि । समदर्शी मुनि विगतविभेदहि ॥
दिशा वसन्; हें व्यसन तयांप्रति । रघुपतिचरित कथिति तिथं ऐकति ॥
होते रे सनकादि भवानी । मुनिवर कुंभज जेथे ज्ञानी ॥
रामकथा मुनिवर बहुवर्णी । ज्ञानयोनि अनला इव अरणी ॥

दो० :- करिति दंडवत राम, जैं मुनि येतां दिसतात ॥
स्वागत पुसुनी पीतपट बसण्या प्रभु देतात ॥ ३२ ॥

सनक सनातन, सनतकुमार, सनंदन आगमन – त्याचे श्रीरामांकडून स्वागत – एकदा रामचंद्र भावांना बरोबर घेऊन अत्यंत प्रिय असलेल्या पवनकुमारासह जेव्हा सुंदर उपवन पाहण्यास गेले तेव्हा सर्व तरु फुललेले व नवी पालवी फुटलेली दिसली ॥ १-२ ॥ नंतर तेथे सनकदिक मुनी समय जाणून आले. ते तेज:पुंज, अति सुंदर, गुण व शील संपन्न सदा ब्रह्मानंदात मग्न असणारे आहेत पाहीले तर बालक दिसतात पण आहेत फार पुरतन काळचे ॥ ३-४ ॥ ते जणू शरीर धारण केलेले चारी वेदच आहेत ते मुनी समदर्शी व भेदरहित आहेत ॥ ५ ॥ दिशा हीच त्यांची वस्त्रे आहेत, आणि त्यांना हे व्यसन आहे जिथे (राम) कथा असेल तेथे हे जाऊन श्रवण करतात ॥ ६ ॥ भवानी ! ज्ञानी मुनीश्रेष्ठ कुंभज जिथे राहतात तिथे हे मुनी होते बरं का ? ॥ ७ ॥ अरणी जशा अग्नीला उत्पन्न करतात तशी मुनीवराने ज्ञान उत्पन्न करणारी रामकथा पुष्कळ वर्णन केली (व त्यांनी ती श्रवण केली व तेथून ते अयोध्येत आले) ॥ ८ ॥ जेव्हा मुनी येत असलेले दिसले तेव्हा रामचंद्रांनी त्यांना दंडवत नमस्कार केला आणि सागत करुन कुशल विचारुन प्रभूंनी त्यांना दंडवत नमस्कार केला आणि स्वागत करुन कुशल विचारुन प्रभूंनी आपल्या खांद्यावरील उत्तरीय (पिवळा शेला) त्यांना बसावयास दिला ॥ दो० ३२ ॥

बंधू तिघें दंडवत् प्रणमति । सहित पवनसुत, सुख अति पावति ॥
मुनि रघुपति छवि अतुल निरखती । मग्न होति मन रोधुं न शकती ॥
श्यामलगात्र सरोरुह लोचन । सुंदरता मंदिर भव मोचन ॥
निर्निमेष टक लावुनि बघतीं । प्रभु कर जुळुनी मस्तक नमती ॥
त्यांची दशा दिसत रघुवीरा । स्रवति नयन जल पुलक शरीरा ॥
प्रभु मुनिवरां धरुनि कर बसविति । परम मनोहर वच उच्चारिति ॥
आज धम्य मी ऐका मुनिवर । तुमचें दर्शन अघराशी हर ॥
बहुभाग्यें सत्संग लाभतो । विना श्रमहि भव भंग पावतो ॥

दो० :- संत संग अपवर्ग पथ कामी भवाब्धि पंथ ॥
वदति संत कवि कोविद श्रुतिं पुराण सद्‌ग्रंथ ॥ ३३ ॥

तिन्ही भावांनी पवनसुतासह मुनींना दंडवत प्रणाम केला व त्यांना अति सुख मिळाले ॥ १ ॥ मुनींनी रघुपतीचे अतुल रुप निरखून पाहीले व त्यात ते इतके मग्न झाले की ते आपले मन आवरु शकले नाहीत. ॥ २ ॥ भवातून सोडविणार्‍या श्यामल शरीर, कमलनयन अशा सुंदरतेच्या मंदिराकडे ते पापणीही न लवता टक लावून बघतच राहीले (त्या आसनावर न बसता) आणि प्रभू त्यांच्यापुढे मस्तक नमवून हात जोडून उभे आहेत ॥ ३-४ ॥ त्यांची ती “ स्त्रवत नयन जल पुलक शरीरा ” दशा रघुवीराला दिसताच रघुवीराच्याही नेत्रांतून प्रेमाश्रू झरुं लागले व देहावर रोमांच फुलले ॥ ५ ॥ प्रभुंनी मुनीवरांना हात धरुन आसनावर बसविले व परम मनोहर वचन बोलले ॥ ६ ॥ अहो मुनीश्रेष्ठ ! ऐका आज मी धन्य झालो कारण तुमचे दर्शन पापराशींचा संहार करणारे आहे ॥ ७ ॥ संतांची संगती महाभाग्याने लाभते काही काही श्रमांशिवायच भवनाश होतो. ॥ ८ ॥ संतांचा संग मोक्षाचा मार्ग आहे, तर कामीजनांचा संग भवसागरांत नेणारा मार्ग आहे, असे संत, कवी, पंडित वेद – पुराणे व इतर (सारे) सदग्रंथ सांगतात. ॥ दो० ३३ ॥

प्रभुवचनें हर्षित मुनि चारी । स्तुति करिती तनु पुलकित सारी ॥
जय भगवंत अनंत अनामय । अनघ अनेक एक करुणामय ॥
जय निर्गुण जय जय गुणसागर । सुखमंदिर सुंदर अति नागर ॥
जय इंदिरा रमण जय भूधर । अनुपम अज अनादि शोभाकर ॥
ज्ञाननिदान अमानहि मानद । पावन सुयश पुराणवेद वद ॥
तज्ञ कृतज्ञ अज्ञता भंजन । नाम अनेक अनाम निरंजन ॥
सर्व सर्वगत सर्वहृदालय । वससि, सदा आम्हां परिपालय ॥
द्वंद्व विपद् भवनाश विभंजय । वस हृदिं, राम काम मद गंजय ॥

दो० :-परमानंद कृपायतन पूरक मनिंचे काम ॥
प्रेमभक्ति अनपायिनी द्या आम्हां श्रीराम ॥ ३४ ॥

सनकादिक कृत शतभिषिक् तथा शततारका नक्षत्र स्तुती –
प्रभुच्या वचनाने चारी मुनींना हर्ष झाला. आणि त्यांचे सर्वांग रोमांचित होऊन ते स्तुती करुं लागले ॥ १ ॥ हे भगवंता ! आपले ऐश्वर्य प्रगट करा, तुम्ही अंतरहित विकार रहित पापरहित (विश्वरुपाने) अनेक आणि (आश्रयरुपाने) एक व करुणामय आहांत. ॥ २ ॥ निर्गुण असून गुणसागर तुम्हीच आहात, तुमचा त्रिवार जय असो, तुम्ही सुखमंदिर अति सुंदर व अति चतुर आहांत. ॥ ३ ॥ हे महालक्ष्मी पती आपला जय असो. हे पृथ्वीला धारण करणार्‍या प्रभो ! तुमचा जय असो तुम्ही उपमारहित अनादि आणि शोभासिंधु आहात. ॥ ४ ॥ तुम्ही ज्ञानाचे भांडार, स्वत: मान रहित, पण इतरांस मान देणारे आहांत, तुमच्या पावन सुंदर यशाचे वक्ते पुराण आणि वेद आहेत. ॥ ५ ॥ आपण तज्ञ, कृतज्ञ व अज्ञानाचा विनाश करणारे आहात आपली अनंत नामे असून नामरहित आहांत आणि माया व मायाजनित सर्व विकाररहित (निरंजन) आहांत ॥ ६ ॥ सर्वरुप, सर्वव्यापक आणि सर्वांच्या हृदयरुपी घरांत वास करणारे आहांत, म्हणून आमचे सर्वप्रकारे पालन करा. ॥ ७ ॥ द्वंदरुपी विपत्ती आणि भवपाश यांचा साफ विनाश करा, आणि हे राम आमच्या हृदयांत वास करा. व काम मदादिकांचा नाश करा ॥ ८ ॥ तुम्ही परमानंद स्वरुप, कृपेचे धाम आणि मनाच्या कामना पूर्ण करणारे अहांत म्हणून हे श्रीराम आम्हाला तुमची अविनाशी प्रेमभक्ती द्या. ॥ दो० ३४ ॥ (सनकाने चौघांसाठी प्रेमभक्ती मागीतली व तिघांनी यास क्रमश: अनुमोदनही दिले)

द्यावि भक्ति रघुपति अति पावनि । त्रिविध ताप भवदर्प विनाशनि ॥
प्रणतकाम सुरधेनु कल्पतरु । व्हावें प्रसन्न द्या प्रभु हा वरु ॥
भववारिधि कुंभज रघुनायक । सेवत सुलभ सकल सुखदायक ॥
दारुण मनसिज दुःख विदारय । दीन बंधु समता विस्तारय ॥
त्रास आस ईर्षादि निवारक । विनय विवेक विरति विस्तारक ॥
भूपमौलिमणि मंडण धरणी । देइ भक्ति संसृति सरि तरणी ॥
मुनि मन मानस हंस निरंतर । चरणकमल वंदित अजशंकर ॥
रघुकुलकेतू श्रुतिपथ रक्षक । प्रकृति काल गुण कर्म विभक्षक ॥
तारण तरण हरण सब दूषण । तुलसिदास प्रभू ! तिभुवन भूषण ॥

दो० :- पुनः पुन्हां करुनी स्तुती प्रेमें शिर नमवून ॥
ब्रह्मभवनिं सनकादि गत वर अति इष्ट मिळून ॥ ३५ ॥

हे रघुपती त्रिविध ताप आणि भवाचा अभिमान यांचा विनाश करणारी तुमची अति पावन भक्ती द्या. ॥ १ ॥ शरणागताच्या कामना पुरविणार्‍या हे सुरधेनू ’ व हे कल्पतरु ! प्रसन्न होऊन हाच वर द्यावा ॥ २ ॥ सेवा करण्यास सुलभ व सकल सुखे देणार्‍या हे रघुनायका ! भवसागराला शुष्क करणार्‍या हे अगस्ती ! मनात उत्पन्न होणा‍र्‍या दारुण दु:खाचा विध्वंस करा आणि मनात समतेचा विस्तार करा ॥ ३-४ ॥ तुम्ही भय, आशा, ईर्षा इत्यादिंचे निवारण करणारे आणि विनय, विवेक व वैराग्य यांचा विस्तार करणारे आहांत ॥ ५ ॥ हे भूप शिरोमणी ! पृथ्वीचे भूषण असणा‍र्‍या श्रीरामा ! या भवनदीत नौकारुप असणारी भक्ती द्या. ॥ ६ ॥ मुनींच्या मानसात निरंतर वास करणार्‍या हंसा ! तुमचे चरण कमल ब्रह्मदेव व शंकर यांनी निरंतर वंदित आहेत. ॥ ७ ॥ तुम्ही रघुकुलाचे केतू, वेदमार्गाचे संरक्षक आणि प्रकृति, काल, गुण व कर्म यांचे विनाशक आहांत ॥ ८ ॥ स्वत: तरुन इतरांस तारणारे आणि तरुन जाण्याचा प्रयत्न करणारे यांच्या सर्व दूषणांचे हरण करता हे तुलसीदासांच्या प्रभो ! तुम्ही त्रैलोक्यविभूषण आहांत ! ॥ ९ ॥ पुन: पुन्हा स्तुती करुन व प्रेमाने मस्तक नमवून, अत्यंत आवडता वर मिळवून सनकादिक ब्रह्मलोकास गेले ॥ दो० ३५ ॥

सनकादिक गत विधि लोकातें । रामचरणिं शिर नमिती भ्राते ॥
पुसण्या प्रभुस सकल संकोचति । सकल मरुतसुत मुख अवलोकति ॥
ऐकुं इच्छिती प्रभु मुख वाणी । होइ सकल जेणें भ्रमहानी ॥
अंतर्यामी प्रभु सब जाणति । हनुमान् ! आहे काय ? विचारति ॥
हनुमान् वदला जुळुनि करांला । श्रुणु भगवंता दीन दयाला ॥
नाथ ! भरत पुसुं इच्छिति कांही । परि मनिं संकोचति पुसण्याही ॥
मत्स्वभाव कपि तुम्हीं जाणतां । कधिं तिळ अंतर मजसी भरता ॥
ऐकुनि वचन भरत धरि चरणां । प्रभु ! ऐका प्रणतार्ती हरणा ॥

दो० :- नाथ ! न मज संदेह मुळिं स्वप्निंहिं शोक न मोह ॥
केवळ तुमच्या कृपें प्रभु ! कृपानंद संदोह ॥ ३६ ॥

सनकादिक ब्रह्मलोकास गेले आणि भरतादिक भावांनी रामचरणीं मस्तक नमले ॥ १ ॥ प्रभूंना विचारण्यास सगळ्यांना संकोच वाटत आहे, म्हणून सारे हनुमानाच्या मुखाकडे पाहू लागले ॥ २ ॥ जेणे करुन सगळ्या भ्रमाचा नाश होईल अशी प्रभुमुखातील वाणी ऐकण्याची सर्वांची इच्छा आहे ॥ ३ ॥ प्रभु अंतर्यामीच असल्याने त्यांनी सर्व जाणले व विचारले हनुमान काय आहे ? ॥ ४ ॥ तेव्हा हात जोडून हनुमान म्हणाला की दीनदयाळा ! भगवंता ऐका ॥ ५ ॥ नाथ ! भरत काही विचारुं इच्छितात, पण त्यांच्या मनांत विचारण्यास संकोच वाटत आहे. ॥ ६ ॥ (राम म्हणाले) कपि ! तुम्ही माझा स्वभाव जाणताच माझ्यात व भरतात कधी तिळभर तरी अंतर आहे कां ? (आमची मने एकच आहेत) ॥ ७ ॥ हे वचन ऐकून भरताने प्रभूंचे पाय धरले व म्हणाले – प्रभु ! शरणागतांची दु:खे दूर करणार्‍या भगवंता ऐकावे ॥ ८ ॥ हे नाथ, मला मुळीच संदेह नाही, किंवा स्वप्नातही शोक, मोह नाहीत पण कृपानंदसमूहा ! प्रभु ! हे तुमच्या कृपेनेच घडले ॥ दो० ३६ ॥

करतो एक कृपाब्धि धिटाई । मी सेवक तुम्हिं जन सुखदाई ॥
संतांचा महिमा बहु रघुपति ! वेद पुराणें बहुविध सांगति ॥
स्वयें श्रीमुखें कथित महत्ता । प्रभू प्रीति त्यांवर, न इयत्ता ॥
ऐकुं इच्छितो त्यांचें लक्षण । कृपासिंधु ! गुण बोध विचक्षण ॥
संत असंत भेद निवडोनी । प्रणतपाल ! सांगा विवरोनी ॥
संत लक्षणें श्रुणु बंधो, तीं । अगणित, वेद पुराणीं ख्याती ॥
संत असंतांची अशि करणी । जशि कुठार चंदन आचरणीं ॥
बंधु ! चंदना कुठार तोडी । तरि दे निजगुण सुगंध गोडी ॥

दो० :- यास्तव चढतो सुर शिरीं प्रिय जगता श्रीखंड ॥
अनलिं दाह, घणघाव मुखिं, परशूला हा दंड ॥ ३७ ॥

तथापि हे कृपासागरा मी एक धिटाई करीत आहे मी एक सेवक आहे व आपण सेवकाचे सुख देणारे आहांत ॥ १ ॥ हे रघुपती ! संतांचा पुष्कळ महिमा वेदपुराणे वर्णन करतात. ॥ २ ॥ आपणही श्रीमुखाने त्यांचे महत्व वर्णिलेत व प्रभूंची त्यांवर नि:रसीम प्रीती आहे. ॥ ३ ॥ तेव्हा मी त्यांची लक्षणे ऐकूं इच्छितो आपण कृपासिंधु असून गुण आणि ज्ञान यात फार निपुण आहांत ॥ ४ ॥ हे शरणागतांचे पालन करणार्‍या प्रभो संत आणि असंत यातील भेद वेगळा करुन मला समजावून सांगा ॥ ५ ॥
राममुखाने संत असंत लक्षणे - हे बंधो ! संतांची लक्षणे ऐक ती अगणित असून वेदपुराणात प्रसिद्ध आहेत. ॥ ६ ॥ कु‍र्‍हाड आणि चंदन जशी आचरणात तशीच असंत आणि संत यांची करणी असते. ॥ ७ ॥ बंधो ! कुर्‍हाड (परशु – कुठार) चंदनाला तोडते तरी सुद्धा चंदन आपला गोड सुगंध हा गुण त्या कापणार्‍या परशुला देतो. ॥ ८ ॥ आणि म्हणूनच चंदन देवांच्या मस्तकावर चढते आणि जगताचा प्रिय झाले पण अग्नित तापवून तोंडावर घणाचे घाव हा दंड परशुला मिळतो. ॥ दो० ३७ ॥

विषयिं अलंपट शील गुणाकर । दुःखि दुःख बघतां सुखि सुख पर ॥
सम अभूतरिपु विमद विरागी ।लोभामर्ष हर्ष भी त्यागी ॥
कोमल चित्त दया दीनांवर । त्रिविध भक्ति मम छलहीना वर ॥
मानद सकलां स्वयें अमानी । भरत ! प्राणसम मम ते प्राणी ॥
विगत काम मम नाम परायण । शांति विरति विनति मुदितायन ॥
शीतलता सरलता म‌इत्री । रीति विप्रपदिं धर्म जनित्री ॥
ज्यांत तात हीं सकल लक्षणें । खरा सतत तो संत जाणणें ॥
शम दम नियम नीति ना सोडती । परुष वचन ना कधींहि बोलति ॥

दो० :- निंदा स्तुति ज्यां सम सदा ममता मम पदकंज ॥
प्राणप्रिय मज संत ते गुणमंदिर सुखपुंज ॥ ३८ ॥

उत्तम प्रकारचे संत विषयांत अलिप्त असतात शीलाची व सदगुणांची खाण असतात परदु:ख पाहून ते दु:खी होतात व परसुखाने सुखी होतात. ॥ १ ॥ ते सम असतात आपला कोणी शत्रु आहे असे त्यांस वाटत नाही. ते निगर्वी व विरागी असतात लोभ, क्रोध, हर्ष आणि भीती यांचा त्यांनी त्याग केलेला असतो. ॥ २ ॥ कोमल मनाचे दिनांवर दया करणारे असतात आणि माझी मन – वाणी व कृतीने छलहीन भक्ती करतात. ॥ ३ ॥ ते सर्वांना मान देतात पण स्वत: मात्र मानाची इच्छा करीत नाहीत भरता ! असे जे असतात ते मला माझ्या प्राणांसारखे प्रिय असतात. ॥ ४ ॥ (मध्यम प्रकारचे संत) अकाम असून माझ्या नामात परायण असतात शांती, वैराग्य, नम्रता, मुदिता यांचे माहेरघर असतात ॥ ५ ॥ शीतलता, सरलता आणि मैत्री आणि धर्माला जन्मदेणारी विप्रपदीं प्रीती ॥ ६ ॥ ही सर्व लक्षणे ज्यांच्यात असतील तो हे तात ! सदा खरा संत जाणावा. ॥ ७ ॥ जे शम, दम, नियम आणि नीतीचा त्याग कधीही करीत नाहीत आणि कठोर शब्द कधीही बोलत नाहीत ॥ ८ ॥ ज्यांना निंदा व स्तुती समान वाटतात आणि ज्यांची सदा माझ्या चरणकमली ममता असते ते गुणमंदिर व सुखराशी संत मला प्राणांसारखे प्रिय असतात. ॥ दो० ३८ ॥

अतां असंत स्वभाव ऐका । चुकुनहि संगति कधीं करुं नका ॥
त्यांचा संग सदा दुखदाई । कपिले नाशिति खट्याळ गायी ॥
ताप विशेष फार खल चित्तीं । सदा बघुनि परसंपद् जळती ॥
जिथें कुठे परनिंदा ऐकति । हर्षति जणूं महानिधि पवति ॥
काम कोप मद लोभ परायण । निर्दय, कपटी कुटिल मलायन ॥
वैर अकारण सर्व जणांसी । जो करि हित वा अहित तयासी ॥
खोटें खाणें खोटें घेणें । खोटें भोजन खोटें देणें ॥
वचन मधुर सम मयूर बोलति । हृदय कठोर महा अहि भक्षति ॥

दो० :- परद्रोहि परदार रत परधन पर अपवाद ॥
ते नर पामर पापमय मनुजरूप मनुजाद ॥ ३९ ॥

आता असंत स्वभाव ऐका – आणि चुकुन सुद्धा त्यांची संगती करु नका ॥ १ ॥ सुशील गरीब गाईला जशा खट्याळ गाई बिघडवितात तसा असंतांचा संग सदा दु:खदायी असतो. ॥ २ ॥ खलांच्या हृदयांत फार ताप असतो कारण ते दुस‍र्‍यांची संपत्ती पाहून सदा जळत असतात. ॥ ३ ॥ जिथे कुठे दुसर्‍यांची निंदा ऐकण्यास सापडते तेथे त्यांना असा हर्ष होतो की जणू मोठा धनाचा ठेवाच सापडला असावा. ॥ ४ ॥ ते काम, क्रोध, लोभ व मद परायण असतात आणि ते निर्दय, कपटी, कुटील व पापांचे निवासस्थान असतात. ॥ ५ ॥ ते सर्व लोकांशी निष्कारण वैर करतात, मग कोणी त्याचे हित करणारे असोत कि अहित करणारे ॥ ६ ॥ खाणे – पिणे यात खोटेपणा, देण्याघेण्यात जेवण्यात खोटेपणा असतो. ॥ ७ ॥ मोराप्रमाणे गोड गोड शब्द बोलतात पण हृदयात मात्र इतकी कठोरता की मोर जसे महाविषारी सर्पाना खातात तसे हे क्रुर असतात ॥ ८ ॥ ते दुसर्‍यांचा द्रोह करतत, परस्त्रिया, परधन, परनिंदा यांतच सदा रममाण असतात. ते नीच पापमय मनुष्य म्हणजे मनुष्यरुपाने जन्मलेले नरभक्षक राक्षसच होत. ॥ दो० ३९ ॥

लोभ पांघरुण लोभ हांतरुण । शिस्नोदरपर यमपुर भीति न ॥
कानिं कुणाची बढती पडतां । श्वास घेति जणुं हीव चि येतां ॥
जैं कोणाची बघति विपत्ति । सुखी होति जणुं विश्व नरपति ॥
स्वार्थ निरत परिवार विरोधी । लंपट काम लोभ सुक्रोधी ॥
माय बाप गुरु विप्र न मानिति । आपण पडुनि दुजानां पाडिति ॥
मोहें द्रोह परावा करती । संतसंग हरिकथा न रुचती ॥
अवगुन सिंधु मंदमति कामी । श्रुति दूषक परवित्तस्वामी ॥
विप्रदोह परांहुनि भारी । दंभ कपट हृदिं, सुवेषधारी ॥

दो० :- असे मनुज खल अधम, युगिं कृत नी त्रेंता नाहिं ॥
द्वापरिं होतिल कांहिं, बहु वृंदचि कलीयुगाहि ॥ ४० ॥

लोभ हेच पांघरुण व तेच त्याचे अंथरुणही असते, ते पशुंप्रमाणेच स्त्री भोग व उदर भरण हीच श्रेष्ठ कर्तव्ये मानतात व यमपुरीचीही त्यांना भीती वाटत नाही ॥ १ ॥ कोणाची बढती भरभराट झालेली ऐकताच दीर्घ श्वास घेतात की जणूं हीवच भरत आहे. ॥ २ ॥ कोणाची विपत्ती दिसताच यांना जगाचे राज्य मिळाल्याचे आसुरी सुख होते. ॥ ३ ॥ सदा स्वार्थपरायण राहून परिवाराशी विरोध करतात. विषयलंपट, अति कामी अतिक्रोधी असतात ॥ ४ ॥ आई, बाप, गुरु ब्राह्मण इ. कोणालाच जुमानत नाहीत व आपला नाश करुन घेऊन इतरांचाही नाश करतात. ॥ ५ ॥ ते मोहाने दुसर्‍यांचा द्रोह करतात व संतसंग, हरिकथा त्यांना आवडत नाहीत ॥ ६ ॥ ते दुर्गुणांचे सागर, मंदबुद्धी, कामी, वेदनिंदक व बलात्काराने दुसर्‍यांचे धन लुबाडून धनिक बनलेले असतात ॥ ७ ॥ इतरांपेक्षा ब्राह्मणांचा फार द्वेष करतात. त्यांच्या मनात दंभ व कपट असते पण बाहेरुन वेष मात्र सुंदर (साधु – संन्याशाचा) धारण करतात. ॥ ८ ॥ असे नीच मनुष्य कृत व त्रेतयुगात नसतात, द्वापर युगात थोडेसे व कलियुगात मात्र अशांच्या झुंडीच्या झुंडी होतील ॥ दो० ४० ॥

बंधु ! धर्म परहितसा नाहीं । परपीडे सम अधम न कांहीं ॥
सकल पुराणीं वेदीं निर्णित । कथित तात ! कोविद नर जाणत ॥
नरतनु पावुनि परां पीडिती । सतत महा भवभया सोशिती ॥
मोहें पाप विविध आचरती । स्वार्थनिरत, परलोक नाशती ॥
कालरूप मी त्यानां भ्राता ! । शुभ नी अशुभ कर्मफल दाता ॥
हें जाणुनि जे परम शहाणे । मज भजती भवभीती ज्ञानें ॥
त्यागिति कर्म शुभाशुभदायक । मज भजती सुर नर मुनिनायक ॥
संत असंत गुणगुण कथिले । ते न पडति भविं जिहिं मनिं धरिले ॥

दो० :- तात ! ऐक मायाकृत गुण नी दोष अनेक ॥
गुण हा, उभय न पाहणें, त्यां बघणें अविवेक ॥ ४१ ॥

हे बंधू ! परहितासारखा धर्म नाही परपीडेसारखे अधम काही नाही ॥ १ ॥ सर्व पुराणातील व वेदातील हा निर्णय मी सांगीतला पंडित लोक हे जाणतात. ॥ २ ॥ मनुष्य शरीर मिळूनही जे इतरांस पीडा देतात त्यांना सतत महाभवभय सोसावे लागते ॥ ३ ॥ मनुष्य मोहाने स्वार्थ परायण विविध पापे करतात व परलोकाचा नाश करुन घेतात. ॥ ४ ॥ हे बंधो ! त्यांना शुभ व अशुभ कर्माचे फळ देणारा ‘ काळरुप ’ मीच आहे. ॥ ५ ॥ हे मनात समजून जे परम शहाणे असतात ते भवभयाला जाणून मला शरण येतात ॥ ६ ॥ पुण्य पापात्मक कर्म देणारे फळ त्यागतात आणि सुर, नर व मुनीश्रेष्ठ मला भजतात (असुर भजत नाहीत) ॥ ७ ॥ संतांचे सदगुण व असंतांचे दुर्गुण मी जे सांगीतले ते जे लक्षात ठेवतात ते भवसागरात पडत नाहीत. ॥ ८ ॥ पण तात ! ऐका सर्वगुण आणि दोष मायेनेच निर्माण केलेले आहेत. त्यामुळे दोन्ही न पाहणे हाच गुण होय आणि गुणदोष पाहणे हा अविवेक होय. ॥ दो० ४१ ॥

श्रीमुख वच ऐकत ते भ्राते । हर्षित, हृदिं ना प्रेम रहातें ॥
स्तुती करिति अति वारंवार । हनूमान हृदिं हर्ष अपार ॥
रघुपति निज मंदिरीं गत तदा । असें चरित करिती नव सदा ॥
पुनः पुन्हां नारद मुनि येती । पावन राम चरित्रा गाती ॥
चरित नित्य नव पाहुनि जाती । कथा ब्रह्मलोकीं सब कथिती ॥
श्रवुनि विरंचि परम सुख पावति । तात ! कुणां गा पुनरपि, सांगति ॥
वाखाणिति सनकादि नारदा । ब्रह्मनिरत मुनि जरी सर्वदा ॥
गुण परिसुनि विसरुनी समाधिहि । श्रवति परम सादर अधिकारि हि ॥

दो० :- जिवन्मुक्त ही ब्रह्मपर, श्रवती त्यजुनी ध्यान ॥
जे न धरितिं हरिकथारति ते हृदयें पाषाण ॥ ४२ ॥

प्रभु मुखातील वचन ऐकताच ते बंधु हर्षित झाले, आणि प्रेम हृदयांत मावेना ॥ १ ॥ त्यांनी वारंवार पुष्कळ स्तुती केली हनुमंताला अपार आनंद झाला. ॥ २ ॥ तेव्हा रघुपती आपल्या मंदिरात गेले अशा प्रकारे रोज नवीन लीला प्रभु करीत आहेत ॥ ३ ॥ नारदमुनी वारंवार अयोध्येत येतात व श्रीरामाचे पावन चरित्र गातात. ॥ ४ ॥ नारद नित्य नवे चरित्र पाहून जातात व ब्रह्मलोकात ती सर्व कथा सांगतात ॥ ५ ॥ गुणगान ऐकून ब्रह्मदेवाला परम सुख होते व सांगतात की तात ! पुन्हा गुणगान कर (पाहूं !) ॥ ६ ॥ सनकादिक मुनी सदा ब्रह्मनिमग्न राहणारे असले तरी ते नारदाची प्रशंसा करतात. ॥ ७ ॥ व गुणगान श्रवण करुन समाधि सुद्धा विसरतात व परम अधिकरी असल्याने आदराने कथा श्रवण करतात ॥ ८ ॥
अत्यंत महत्वाचे सूत्र व सिद्धांत – जीवनन्मुक्त व ब्रह्मनिष्ठ सुद्धा ध्यानाचा त्याग करुन हरीकथा श्रवण करतात, (हे समजून सुद्धा) जे हरिकथा श्रवणाची आवड धरत नाहीत ते हृदयाने पाषाण होत. (त्यांचे हृदय पाषाण आहे) ॥ दो० ४२ ॥

बोलाविति रघुनाथ एकदा । गुरु आले द्विज नगरजन तदा ॥
गुरु मनि बसले ब्राह्मण सज्जन । वदले वचन भक्त भव भंजन ॥
ऐका पुरजन मम वचनासी । सांगुं न ममता धरुन मनासी ॥
ना अनीति ना सत्तें वदतो । ऐका करा रुचे जर मग तो ॥
सेवक तो प्रियतम मम तोही । मम अनुशासन मानी जो ही ॥
जर मी बंधु ! वदेन अनीती । मला निषेधा त्यजुनी भीती ॥
बहु भाग्यें मानुष तनु मिळाली । सुर दुर्लभ सद्‌ग्रंथिं गाइली ॥
साधन धाम दार मोक्षाचें । मिळुनि न मिळविति परलोका जे ॥

दो० :- पावति परत्र ते शोचति शिर बडविति ॥
काळा कर्मा ईश्वरा वृथा दोष लावीति ॥ ४३ ॥

पुरजन गीता/भक्ती गीता -(श्रीरामांनी अयोध्यावासीयांना केलेला विशेष उपदेश) एके दिवशी रघुनाथाने सर्वांस बोलाविले. तेव्हा गुरु (मुनी) द्विज व पुरवासी सर्व लोक आले ॥ १ ॥ गुरुमुनी, ब्राह्मण व इतर सर्व सज्जन सभेत बसले तेव्हा भक्ताच्या भवाचा विनाश करणारे श्रीरघुनाथ बोलू लागले ॥ २ ॥ सर्व पुरवासी लोक हो ! माझे म्हणणे ऐका, मी काही ममता उराशी बाळगून बोलत नाही. ॥ ३ ॥ मी अनीती सांगणार नसून, सत्तेच्या बळावरही सांगत नाही. तुम्ही (शांतपणे सर्व उपदेश) ऐकून घ्या व जर तुम्हाला रुचला तर मग त्याप्रमाणे करा. ॥ ४ ॥ तोच माझा सेवक आणि तोच माझा प्रियतम की जो माझी आज्ञा पाळतो. ॥ ५ ॥ बंधूंनो, मी जर काही अनीती सांगीतली तर तुम्ही अगदी निर्भयपणे माझा निषेध करा ॥ ६ ॥ मनुष्य देह महा भाग्याने मिळालेला आहे, तो देवांनाही दुर्लभ आहे, असे (वेद, पुराणादि) सदग्रंथ वर्णितात. ॥ ७ ॥ साधनाचे घर व मोक्षाचे द्वार असणारा हा नरदेह मिळून सुद्धा जे परलोक = मोक्ष मिळवीत नाहीत. ॥ ८ ॥ ते मेल्यावर परलोकांत दु:ख पावतात. मस्तक बडवीत पश्चाताप करतात आणि काळ – कर्म व ईश्वराला निष्कारण दोष देत राहतात. ॥ दो० ४३ ॥

या तनुचें फळ विषय न भाई । स्वर्गहि अंतिं दुखदाई ॥
नरतनि मिळुनि विषयिं मन देती । सुधा देति ते शठ विष घेती ॥
तया भला कधिं म्हणे न कोणी । गुंजा घेइ परिस टाकोनी ॥
आकरिं चार लाख चौंर्‍यायशीं । योनी भ्रमे जीव अविनाशी ॥
फिरे सदा मायेनें प्रेरित । प्रकृती कालकर्म गुण घेरित ॥
कधिं तरिं करुणेनें नरदेहीं । धाडि ईश, विण हेतू स्नेही ॥
नरतनु भववारिधींत तारूं । सम्मुख मरुत कृपा मम चारू ॥
कर्णधार सद्‌गुरु दृढ नावे । दुर्लभ साज सुलभतें पावें ॥

दो० :- तो न तरे भवसिंधु नर पावुनि यां सर्वांस ॥
तो कृतघ्न जडधी लभे गति जी आत्मघ्नास ॥ ४४ ॥

बंधूंनो, या नरतनुचे फळ विषभोग नाही बरं स्वर्गभोग सुद्धा या नरतनु पुढे अगदी तुच्छ आहेत, व अंती दु:ख देणारेच आहेत. ॥ १ ॥ नरतनु मिळून जे जीव विषयात मन रमवितात, ते महामूर्ख होत. कारण ते अमृताच्या बदल्यात विषच घेतात. ॥ २ ॥ परीस टाकून जो गुजा घेतो त्याला कोणी शहाणा म्हणत नाही ॥ ३ ॥ हा अविनाशी जीव चार खाणी व चौर्‍याऐंशी लक्ष योनी फिरत असतो. ॥ ४ ॥ मायेचे प्रेरणेने प्रकृती, काळ, कर्म आणि गुण यांनी घेरलेला सदा भटकत असतो. ॥ ५ ॥ (सतत अनेक योनीतून भटकणार्‍या जीवाची) क्वचित = केव्हातरी ईश्वराला करुणा येते कारण तो निर्हेतूक स्नेह करणारा सुहृद आहे आणि म्हणून तो त्या जीवाला मनुष्य देहात जन्माला घालतो ॥ ६ ॥ नरदेह भवसागरातील तारु आहे, माझी कृपा हा अनुकूल वारा आहे आणि सदगुरु या द्दढ नौकाचे कर्णधार होत असा हा दुर्लभ असलेला साज सुलभतेने पावतो ॥ ७-८ ॥ आणि जो मनुष्य या सर्व दुर्लभ गोष्टी मिळून सुद्धा भवसागर तरुन जात नाही तो मंदबुद्धी (माझ्याशी) कृतघ्न होय, व त्याला आत्महत्या करणार्‍याची गती मिळते. ॥ दो० ४४ ॥

सुख परलोक इथें वांछा जर । श्रवुनि धरा मम वच हृदिं दृढतर ॥
बंधू ! सुलभ सुखद हा मार्ग हि । वेद पुराण कथित मम भक्ति हि ॥
ज्ञान अगम्य हि विघ्नें पार न । साधन कठिण मना आधार न ॥
करुनि कष्ट बहु मिळे कुणाला । भक्तिहीन तो प्रिय नहि मजला ॥
भक्ती स्वतंत्र सबसुखदानी । विण सत्संग न पावे प्राणी ॥
पुण्यपुंजविण भेट न संतां । सत्संगति करि संसृतिअंता ॥
पुण्य एक जगिं समान आन न । मन कृति वचनिं विप्रपद पूजन ॥
देव मुनी ही प्रसन्न त्यावर । द्विजां सेवि जो त्यजुनि कपट नर ॥

दो० :- अन्य गुप्त मत एक तें कथितो जोडुनि हात ॥
शंकर भजन विना नर भक्ति न मम लभतात ॥ ४५ ॥

जर परलोकात व या जन्मात सुख व्हावे अशी इच्छा असेल तर मी सांगतो ते ऐकून हृदयांत द्दढ धारण करा ॥ १ ॥ बंधूंनो सुलभ आणि सुखदायक असा मार्ग म्हटला म्हणजे वेदपुराणात वर्णिलेली माझी भक्ती हाच आहे. ॥ २ ॥ ज्ञान अगम्य आहे आणि (त्यात) विघ्नेही अपार आहेत. (शिवाय) साधनही कठीण आहे (कारण) मनाला काहीच आधार नसतो. ॥ ३ ॥ ते फार कष्ट करुन कोणाला तरी क्वचित मिळते, पण तो भक्तीहीन ज्ञानी मला प्रिय वाटत नाही. ॥ ४ ॥ भक्ती स्वतंत्र आहे व सर्व सुखे देणारी आहे पण सत्संगाशिवाय कोणाही प्राण्याला ती मिळत नाही ॥ ५ ॥ पुण्यराशी संग्रहाला असल्याशिवाय संताची भेट होत नाही. सत्संगति भवाचा नाश करते ॥ ६ ॥ जगात एकच मुख्य पुण्य आहे ते म्हणजे मन – कृती व वाणीने विप्रपद सेवा करणे, दुसरे काही नाही ॥ ७ ॥ जो कपटाचा त्याग करुन ब्राह्मणांची सेवा करतो त्याच्यावर सर्व देव व मुनी प्रसन्न असतात ॥ ८ ॥ आणखी एक गुप्त मत आहे ते मी तुम्हाला हात जोडून सांगतो की शंकर भजना शिवाय माझी भक्ती मनुष्याला मिळत नाही. ॥ दो० ४५ ॥

वदा भक्तिपथिं कुठें प्रयास हि । योग न जप तप मख उपवास हि ॥
सहज सरलता मनिं न कुटिलता । यथालाभ संतुष्ट चित्तता ॥
म्हणवि दास मम नर आशा करि । वदा कुठें विश्वास खरा तरि ॥
बहुत कशाला हवें विवरणें । मीं वश बंधु !याच आचरणें ॥
वैर न विग्रह भय ना आशा । सुखमय तया सदा दश आशा ॥
अनारंभ अनिकेत अमानी । अनघ अरोष दक्ष विज्ञानी ॥
प्रीति सदा सज्जन संसर्गां । तृण गणि विषय नाक अपवर्गां ॥
भक्तिपक्षिं हठ शठता नाहीं । दूर सारतो दुस्तर्कां ही ॥

दो० :- गुणग्रामिं मम नामिं रत गत ममता मद मोह ॥
जाणे त्याचें तोच सुख परानंद संदोह ॥ ४६ ॥

भक्तीमार्गात साधनांचे कष्ट कुठे आहेत ते तरी सांगा योग, यज्ञ, जप, तप, उपवास काहीही नको. ॥ १ ॥ स्वाभाविक सरळपणा हवा मनात अजिबात कुटिलता (वक्रता – आकस) नको प्राप्त परिस्थितीत संतुष्ट चित्ताने रहावे म्हणजे झाले ॥ २ ॥ मनुष्य माझा दास म्हणवतो पण (इतरांची व साधनांची) आशा बाळगतो तर त्याचा माझ्यावर खरा विश्वास आहे कुठे ? असल्यास सांगा. ॥ ३ ॥ फार विस्तार करुन सांगण्याची काय जरुर आहे ? बंधूनो ! मी तर याच आचरणाने वश होतो.॥ ४ ॥ कोणाशी वैर करीत नाही की विग्रह करीत नाही, कशाचीही आशा नसते (माझ्यावाचून) व कसलेही भय नसते. त्याला दशदिशा सदा सुखमयच असतात. ॥ ५ ॥ सकाम व निषिद्ध कर्माचा तो आरंभच करीत नाही, कोणत्याही वस्तूवर, स्थानावर आसक्ती नसते, मान प्रतिष्ठेची इच्छा नसते, जो निष्पाप, दोष क्रोध रहित दक्ष व विज्ञानी असतो ॥ ६ ॥ संत संगतीची आवड असते, आणि जगातील विषय स्वर्ग व मोक्ष यांना तृणासमान मानतो ॥ ७ ॥ जो भक्ती पक्षात हट्ट धरतो पण शठता (लबाडी) करीत नाही व सर्व दुष्ट तर्काचा त्याग करतो ॥ ८ ॥ जो माझ्या गुणसमूहात व माझ्या नामस्मरणात रत असतो व जो ममता, मद, मोहरहित असतो (त्याला मी वश होतो) व त्याचे सुख तोच जाणतो, तो परमानंद समूह बनतो. ॥ दो० ४६ ॥

श्रवुनि सुधासम वच रामाचें । सब पद धरिति कृपाधामाचे ॥
अमचे जनक बंधु गुरु जननी । कृपानिधी प्रिय प्राणांहूनी ॥
तन धन धाम राम हितकारक । सबपरिं तुम्हिं प्रतार्ती हारक ॥
असें शिकविता कोणि नसेही । माता पिता स्वार्थरत तेही ॥
हेतु रहित जगिं जुग उपकारी । तुम्हिं तुमचे सेवक असुरारी ॥
स्वार्थी मित्र सर्व जगिं असती । स्वप्नीं पभू !परमार्थी नसती ॥
जन वचना प्रेमार्द्र ऐकलें । हृदयी श्रीरघुनाथ हर्षले ॥
आज्ञा घेउन जाति घरोघर । प्रभु भाषण वर्णित अति सुंदर ॥

दो० :- उमे ! अयोध्यावासि नर नारी कृतार्थ रूप ॥
ब्रह्म सच्चिदानंदघन रघुपति जेथे भूप ॥ ४७ ॥

पुरजनकृत पूर्वाभाद्रपदा नक्षत्र स्तुती – श्रीरामाचे अमृतासारखे भाषण ऐकून त्या सर्वांनी कृपाधामाचे पाय धरले ॥ १ ॥ आणि म्हणाले की हे कृपानिधी ! तुम्हीच आमचे आई, बाप, गुरु, बंधू, इ. सर्व आहांत आणि आम्हांस प्राणापेक्षा अधिक प्रिय आहांत ॥ २ ॥ शरणांगताचे दु:ख हरण करणार्‍या रामा ! तुम्हीच आमचे तनू, धन, धाम आणि सर्वतोपरि हितकर्ते आहात. ॥ ३ ॥ असा उपदेश देणारा तुमच्याशिवाय कोणी नाही, माता, पिता, हितकर्ते व उपदेशकर्ते असले तरी ते सुद्धा स्वार्थीच ॥ ४ ॥ हे असुरारि ! तुम्ही आणि तुमचे सेवक असे दोनच हेतूरहित (निस्वार्थ) उपदेश करणारे या जगांत आहेत. ॥ ५ ॥ जगातील बाकीचे सर्व स्वार्थी मित्र आहेत, हे प्रभु ! परमार्थी मित्र कोणी स्वप्नात सुद्धा नाहीत. ॥ ६ ॥ लोकांचे प्रेमरसाल भाषण ऐकले आणि श्रीरघुनाथ हृदयात हर्षित झाले ॥ ७ ॥ सर्व लोक आज्ञा घेऊन आपापल्या घरी चालले , पण जाताना प्रभुचे सुंदर भाषण वाखाणीतच चालले. ॥ ८ ॥ उमे ! जेथे सच्चिदानंदघन ब्रह्म श्रीरघुपति भूप आहेत त्या अयोध्येत राहणारे पुरुष व स्त्रिया कृतार्थ रुप आहेत. ॥ दो० ४७ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP