॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय २२ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

यमुना तटिं त्या दिवसिं राहती । यथासमय सुख सकल पावती ॥
घाट घाटिंच्या तरणि न गणना । रात्रिं येति करुं कसें वर्णना ॥
उदयीं एका खेपें उतरति । राम-सखा सेवेनें तोषति ॥
स्नान करुनि यमुने शिर नमती । सहित निषादा भ्राते निघती ॥
उत्तम वाहनिं मुनिवर पुढतीं । मागे राजसमाजहि निघती ॥
त्यां मागें दो भ्राते चालति । भूषण वसन साधिं अति घालति ॥
सेवक सुहृद सचिवसुत साथ हि । लक्ष्मण सिते स्मरत रघुनाथहि ॥
रामवास-विश्राम जिथं इथें । प्रेमें प्रणमन करिति पथिं तिथें ॥

दो० :- त्यजुनि काम गृह नारि नर श्रवुनि येति धावून ॥
छवि बघुनी स्नेहहि, मुद्त जन्मफला पावून ॥ २२१ ॥

त्या ( सातव्या) दिवशी यमुनेच्या तीरी वस्ती केली व समयानुसार सर्वांच्या सुखसोयी लागल्या ॥ १ ॥ रात्री घाटाघाटाच्या अगणित नावा जमल्या त्यांचे वर्णन कसे करता येणार ! ॥ २ ॥ उजाडताच एकाच खेपेत सर्व यमुनेच्या परतीराला आले व रामसख्याच्या सेवेने भरत संतुष्ट झाले ॥ ३ ॥ मग स्नान करुन यमुनेला नमस्कार करुन निषादराजासह भरत - शत्रुघ्न निघाले ॥ ४ ॥ सर्वांच्या पुढे उत्तम वाहनात मुनीवर आहेत त्याच्यामागे सर्व राजसमाज जात आहे ॥ ५ ॥ त्यांच्या मागे अगदी साधी वस्त्रे भूषणे घातलेले दोघे भाऊ पायी चालले आहेत ॥ ६ ॥ त्यांच्याबरोबर सेवक, मित्र व सचिवसुत असून सर्व लक्ष्मण - राम - सीता यांचे स्मरण करीत आहेत ॥ ७ ॥ वाटेत जिथे रामवास व विश्राम स्थळे वृक्ष इ. लागतात तिथे तिथे प्रेमाने प्रणाम करीत चालले आहेत ॥ ८ ॥ ( मार्गावरील गावचे लोक) स्त्रिया व पुरुष ऐकताच कामाचा त्याग करुन व घर - कामे इ. विसरुन धावत येत आहेत व भरत शत्रुघ्नांचे सुंदर रुप व स्नेह पाहून जन्मफळ पावून मुदित होत आहेत ॥ दो० २२१ ॥

प्रेमें वदति परस्पर काहीं । दिसति राम लक्ष्मण सखि ! नाहीं ? ॥
वय वपु वर्ण रूप सखि ! सारखिं । स्नेहशील सम, समान चाल किं ॥
वेष न तो सीता नहिं संगीं । पुढें कटक चाले चतुरंगी ॥
अप्रसन्न मुख मानस-खेदें । सखि ! संदेह येत या भेदें ॥
तर्क तिचा स्त्रीगण-मन मानी । म्हणति सकल तुज सम न शहाणी ॥
खरें म्हणसि तूं, तिज सन्मानी । दुजी, वदे मृदु मधुरा वाणी ॥
प्रेमे सब सांगते प्रसंगा । जो करि राम राज्य रस भंगा ॥
भरता पुन्हां प्रशंसूं लागे । शील स्नेह सुभाव सुभागें ॥

दो० :- त्यजुनि राज्य पितृदत्ततें पायिं पायिं फळ खात ॥
जाती विनवूं रघुवरा कुणि सम भरत जगांत ॥ २२२ ॥

काहीजणी एकमेकीस म्हणू लागल्या की सखी ! राम - लक्ष्मणच दिसतात नाही कां ? ॥ १ ॥ वय, शरीराचा बांधा, वर्ण, रुप अगदी सारखी आहेत; स्नेह व शील पण अगदी तस्सं व अगदी चाल सुद्धा तश्शीच आहे. ( की गं !) ॥ २ ॥ ( दुसरी म्हणाली) वेष मात्र तसा नाही सीता बरोबर दिसत नाही आणि पुढे चतुरंगिणी सेना आहे ॥ ३ ॥ ( आणखी एक जण म्हणाली) मनांतील खेदानेमुख अप्रसन्न दिसत आहे; म्हणून सखी ! या भेदामुळे संदेह वाटतो. ॥ ४ ॥ तिचा तर्क स्त्रीसमुहाच्या मनाला मान्य झाला व त्या सर्व म्हणाल्या की तुझ्यासारखी शहाणी ( आमच्यात खरोखर) कोणी नाही ॥ ५ ॥ तू खरे आहे असे म्हणून दुसर्‍या एकीने तिला शाबासकी दिली ( मान दिला) व मृदु मधुर वाणीने ती बोलू लागली ॥ ६ ॥ ज्याने रामराज्यरसभंग केला तो सगळा प्रसंग तिने प्रेमाने सांगीतला ॥ ७ ॥ मग पुन्हा ती भरताचे शील, स्नेह, सद्‍भाव व उत्तम भाग्य यांची प्रशंसा करु लागली ॥ ८ ॥ पित्याने दिलेल्या त्या राज्याचा त्याग करुन फलाहार करुन पायी अनवाणी चालत रामचंद्राना ( अयोध्येत नेण्य़ासाठी) विनविण्यासाठी जात आहेत जगांत भरतासारखा दुसरा कोण आहे ? ( कोणीही नाही) ॥ दो० २२२ ॥

भरत भक्ति आचरण बंधुपण श्रवण कथन हरि दुःखें दूषण ॥
सखि ! थोडें जितकें सांगावें । रामबंधु कां असे नसावे ॥
आम्हीं सानुज भरत विलोकनिं । गणलों गेलों धन्य युवति जनिं ॥
परिसुनि गुण शोचति गति बघुनी । योग्य न सुत कीं कैकयि जननी ॥
राणिस दोष नसे कुणि सांगति । विधि करि सर्व, अम्हां उजवा अति ॥
आम्हिं कुठें श्रुतिजनविधि-हीना । तुच्छ नारि कुल कर्म मलीना ॥
वसुं कुनारि कुस्थळिं कुग्रामीं । दर्शन कुठें पुण्य-परिणामी ॥
विस्मय मोद असा प्रतिगावा । जणुं मरूंत सुर-तरू उगवावा ॥

दो० :- होत भरत दर्शन खुललें पथ जन भाग्य किं आज ॥
जणूं सुलभ सिंहलजनां भाग्यें प्रयाग राज ॥ २२३ ॥

भरताचा बंधुभाव भक्ती व आचरण यांचे श्रवण व कथन दु:ख व दोष हरण करणारे आहे ॥ १ ॥ सखी ! जितके सांगावे तितके थोडेच ( पण) रामबंधु असे का असणार नाहीत ? ( असणारच) ॥ २ ॥ अनुजासह भरताचे आंम्हाला दर्शन झाले त्यामुळे आम्ही धन्य झालो व धन्य स्त्रियांत आपली गणना झाली ॥ ३ ॥ ( भरताचे हे वर्णन केलेले) गुण ऐकून व त्यांची ती दशा पाहून स्त्रियांना वाईट वाटले की या सुताला जननी कैकेयी नाही ( कैकयीचा हा मुलगा असे म्हणण्यास लाज वाटते) ॥ ४ ॥ कोणी म्हणाल्या की यात राणीचा काही दोष नाही, हे सर्व दैवाने घडविले ( कारण) ते आम्हाला अनुकूल झाले ॥ ५ ॥ आम्ही वेदविधीहीन व लोकविधिहीन, तुच्छ, पापी कुळातल्या व पापकर्म करणार्‍या कुदेशांत व कुग्रामात राहणा‍र्‍या निंद्य स्त्रिया कुठे व पुण्यांचा परिणाम म्हणून हे भरतांचे घडणारे दर्शन कुठे ! ॥ ६-७ ॥ गांवोगावी असे आश्चर्य व असा आनंद होत आहे की जणूं मारवाड देशात कल्पतरुच उगवला असावा ॥ ८ ॥ भरताचे दर्शन होताच मार्गावरील लोकांचे भाग्य खुलले की जणूं सिंहल द्वीपात राहणार्‍या लोकांना भाग्याने प्रयागराजच सुलभ झाला ॥ दो०२२३ ॥

निजगुण सहित रामगुण-गाथा । श्रवत जाति चिंतित रघुनाथा ॥
तीर्थां मुनि आश्रम सुरधामां । स्नान करिति पाहुनी प्रणामां ॥
मनोमनीं या वरास मागति । सीताराम चरण कमलां रति ॥
भेटति भिल्ल कोळि वनवासी । वैखानस बटु यई उदासी ॥
नमुनि पुसति ज्या त्या कुठलेही । वनिं लक्ष्मण राम नि वैदेही ॥
ते प्रभु-समाचार सब कथिती । भरता बघुनि जन्मफळ लुटिती ॥
जे कुणि वदले कुशल बघितले । प्रिय राम नि लक्ष्मण सम गणले ॥
असे पुसति सकलांस सुवाणीं । श्रवति रामवनवास-कहाणी ॥

दो० :- त्या दिनिं वसुनि, सकाळिं ही स्मरुनि निघति रघुनाथ ॥
रामदर्शना लालची भरता सम सब साथ ॥ २२४ ॥

आपल्या गुणांसहित रामगुणगाथा श्रवण करीत व रघुनाथाचे चिंतन करीत भरत जात आहेत ॥ १ ॥ तीर्थ मुनींचे आश्रम व देवस्थाने दृष्टीस पडतांच ( तीर्थात) स्नान व प्रणाम करतात आणि मुनी, आश्रमांना व देवस्थानांना प्रणाम करीत आहेत ॥ २ ॥ आणि मनातल्या मनात वर मागत आहेत की, सीतारामचरण कमलांच्या ठिकाणी रति म्हणजे दृढ प्रेम द्या ॥ ३ ॥ वाटेने जाताना कोळी, भिल्ल वनवासी, वानप्रस्थ यती ( गृहीसाधक) व संन्यासी, उदासी भेटूं लागले ॥ ४ ॥ तेव्हा ज्याला त्याला प्रणाम करुन विचारुं लागले की वनांत लक्ष्मण – राम – वैदेही कुठे आहेत ? ॥ ५ ॥ ते प्रभूंचा सर्व समाचार सांगू लागले व भरताला पाहून जन्मफळ लुटूं लागले ॥ ६ ॥ आम्ही कुशल पाहीले असे जे म्हणतात ते रामलक्ष्मण सारखे प्रिय वाटूं लागले ॥ ७ ॥ याप्रमाणे सर्वांना प्रेमळ, नम्र वाणीने विचारु लागले व रामवनवासाची कहाणी श्रवण करु लागले ॥ ८ ॥ त्या दिवशी ( रात्री) वस्ती करून सकाळीच रघुनाथांचे स्मरण करुन निघाले भरत व त्यांचे सर्व साथीदार या सर्वांना रामदर्शनाची लालसा सारखीच आहे ॥ दो० २२४ ॥

मंगल शकुन होति सकलांनां । स्फुरण सुखद भुज विलोचनानां ॥
सह समाज भरता उत्साहो । दिसतिल राम जाइ दुख दाहो ॥
करिति मनोरथ जें ज्यां सुचति । स्नेह सुरा उन्मत्त चालती ॥
शिथिल अंग पदपथिं लटपटती । प्रेमें विव्हळ वचनें वदती ॥
राम सखा त्या समयिं दाखवित । शैल शिरोमणि सहज सुशोभित ॥
तया समीप पयस्विनी तीरा । सीते सहित वास दो वीरां ॥
बघुनि करिति दण्डवत् प्रणामा । मुखिं जय जानकि जीवन रामा ॥
बुडे प्रेमिं नृपसमाज या परिं । कणुं रघुराज गमन नगरा करि ॥

दो० :- प्रेम भरतमनिं तैं जसें वदवे ना शेषास ॥
कवि अगम्य जस ब्रह्मसुख मी मम मलिन जनास ॥ २२५ ॥

सर्वांना मंगल शकुन होऊ लागले व बाहू व नेत्र यांचे सुखकारक स्फुरण होऊं लागले समाजासहित भरताला उत्साह वाटू लागला की राम भेटतील ( दर्शन होईल) व दु:खजनित दाह शान्त होईल ॥ २ ॥ ज्याला जसे सुचतात तसे मनोरथ करीत, प्रेम मदिरेने उन्मत्त होऊन चालत जात आहेत ॥ ३ ॥ शरीरे शिथिल झाली आहेत, रस्त्याने चालताना पाय लटपटत आहेत व प्रेमाने विह्वळ वचने बोलत आहेत ॥ ४ ॥ त्या समयी रामसख्याने सहज सुशोभित असलेला शैलशिरोमणी सर्वांस दाखवला ॥ ५ ॥ ( आणि सांगीतले की) त्याच्या समिपच पयस्विनी नदीच्या काठी सीतेसहीत दोघा वीरांचे वसतिस्थान आहे ॥ ६ ॥ तो पाहून ‘ जय जय जानकी अजीवन राम ’ असे म्हणत सर्व दंडवत नमस्कार करु लागले ॥ ७ ॥ या प्रमाणे राजसमाज प्रेमात असा मग्न झाला की जणूं रघुराज ( आताच) अयोध्या नगरास परत जाण्यास निघाले आहेत ! ॥ ८ ॥ त्यावेळी भरताच्या मनात जसे प्रेम आहे तसे त्याचे वर्णन शेषालाही करता येणार नाही व कवीला तर ते तसे अगम आहे जसे मी व मम ( अहंता व ममता) यांनी मलिन झालेल्या मनुष्यास ब्रह्मसुख ! ॥ दो० २२५ ॥

रामस्नेह शिथिल सगळे जरि । दोन कोसगत अस्त होय तरि ॥
वसले स्थल जल बघुनि; उजाडत । रघुनाथप्रेमें गमना कृत ॥
राम पहाटें उठले तिकडे । सीता सांगे स्वप्न तिज पडे ॥
सहित समाज भरत आले जणुं । नाथ वियोगज-ताप तप्त-तनु ॥
दुःखी दीन उदास हि सारीं । सासू दिसल्या कशाच भारी ॥
स्वप्न ऐकुनी सजल विलोचन । होति शोचवश शोच विमोचन ॥
स्वप्न बरें हें क्लक्ष्मण ! नाहीं ! । अशुभ खबर कुणि देइल कांही ॥
स्नान बंधुसह करुनी पूजिति । त्रिपुरारिस साधूम्स सन्मान्ति ॥

छं० :- मानूनि सुरमुनि नमुनि बसले उत्तरेला बघति जैं ।
मभिं धूळ खग मृग भूरि पळुनी भीत आश्रम्इं येति तैं ॥
तुलसी उठोनी बघुनि, कारण काय चिंतिति चकिंत जों ।
सब खबर कोळी भिल्ल येउनि सांगति प्रभुलाहि तों ॥ १ ॥
सो० :- श्रवुनि सुमंगल वाणि प्रमुदित मन तन पुलक युत ॥
तुलसी स्नेअज पाणि शरद सरोरुह वोलोचनिं ॥ २२६ ॥

सगळे लोक रामस्नेहाने जरी शिथिल झाले आहेत तरी सूर्यास्त झाल्या नंतर सुद्धा दोन कोस गेले ॥ १ ॥ रात्री जागा व पाणी यांची सोय पाहून राहीले व उजाडताच रघुनाथ प्रेमाने निघाले ॥ २ ॥ तिकडे राम पहाटेच जागे झाले तेव्हा सीतेने तिला पडलेले स्वप्न सांगीतले ॥ ३ ॥ जणूं सर्व समाजासह भरत आले आहेत व नाथ वियोगाच्या तापाने तप्त होऊन ते शरीराने कृश झाले आहेत ॥ ४ ॥ सर्वच मंडळी दु:खी दीन व उदास आहेत व सासवा तर अगदी कशातरीच ( सौभाग्य चिन्ह रहित विधवांसारख्य़ा) दिसल्या ! ॥ ५ ॥ सीतेचे स्वप्न ऐकून रघुनाथांचे नेत्र अश्रूंनी भरले व इतरांची चिंता हरण करणारे स्वत: चिंतातूर झाले ॥ ६ ॥ ( व लक्ष्मणास म्हणाले) लक्ष्मणा ! हे स्वप्न चांगले नाही कोणी काहीतरी अशुभ समाचार सांगणार ॥ ७ ॥ मग बंधूसह स्नान केले आणि त्रिपुरारिंचे व साधूंचे पूजन करुन त्यांचा सत्कार केला ॥ ८ ॥ देवांचा सन्मान व मुनींना नमन करुन प्रभु बसले व ( सहज) उत्तर दिशेकडे जेव्हा पाहीले तेव्हा आकाश धुळीने भरलेले व पुष्कळ पशुपक्षी भयभीत होऊन पळत पळत आश्रमाकडे येत आहेत असे दिसले. तुलसीदास म्हणतात की प्रभूंनी उठून पाहीले व कारण काय बरे असावे अशा चिंतेने जो चकित होतात तोच कोळी भिल्लांनी येऊन प्रभूला सर्व खबर दिली ॥ छंद ॥ ती अति मंगलकारक वाणी ऐकून प्रभूंचे मन प्रमुदित झाले; शरीर रोमांचांनी भरले व शरदातील सरोरुहासारख्या नेत्रांत स्नेहामुळे पाणी भरले ( स्नेहाश्रू आले) असे तुलसीदास सांगतात ॥ दो० २२६ ॥

पुनरपि चिंआ सीतारमणा । कारण कवण भरत आगमना ॥
कोणि येइ सांगे कर जोडी । संगिं चमू चतुरंगि न थोडी ॥
राम सचिंत अती जैं ऐकति । इथ पितृवच इथ बंधुभीड अति ॥
स्मरती स्वभाव भरताचा जै । न मिळे स्थिरता प्रभुचित्ता तैं ॥
समाधान मनिं असे जाणाअं । भरत वचनिं मम साधु, जाणता ॥
प्रभुहृदिं खळबळ लक्ष्मण लक्षिति । नीति विचार समयसम सांगति ॥
स्वामि कांहिं वदुं तुम्हीं न पुसतां । समयीं धृष्ट, न दासधृष्टता ॥
स्वामी तुम्हिं सर्वज्ञ-शिरोमणि । सेवक वदतो जें वाटें मनिं ॥

दो० :- नाथ सुहृद अति सरलधी शील स्नेह निधान ॥
प्रीति सर्विं विश्वास, सब जाणां आत्मस्मान ॥ २२७ ॥

सीतारमणाला पुन्हा चिंता लागली की भरताच्या येण्याचे कारण काय असावे ? ॥ १ ॥ इतक्यात कोणी ( कोळी, भिल्ल) येऊन हात जोडून म्हणाला की बरोबर चतुरंगिणी सेना आहे व ती थोडी थोडकी नाही ( अफाट आहे) ! ॥ २ ॥ हे ऐकून तर रामास फारच चिंता वाटू लागली ( कारण) इकडे पित्याचे वचन व इकडे भावाची अतिभीड ! ॥ ३ ॥ भरताचा ( प्रेमळ) स्वभाव आठवतांच प्रभूच्या चित्ताला क्षणभर सुद्धा स्थिरता येईना ॥ ४ ॥ ( मग) भरत माझ्या वचनांत आहे ( आज्ञा मोडणार नाही) साधु आहे व जाणता ( शहाणा) आहे हे जाणून मन समाधान पावले ॥ ५ ॥ प्रभूच्या हृदयात खळबळ उडाली ( चिंता लागली) आहे हे लक्ष्मणाच्या लक्षात आले तेव्हा समयानुकूल नीतीचा विचार सांगू लागले ॥ ६ ॥ स्वामी ! आपण न विचारतांच मी बोलत आहे, पण प्रसंगी सेवकाने धीटपणा करणे म्हणजे सेवकाने उद्धट बनणे नव्हे ॥ ७ ॥ स्वामी ! आपण सर्वज्ञांचे शिरोमणी आहांत ( आपण सर्व काही सहज जाणतांच) पण या सेवकाला मनात जे वाटते ते हा सांगत आहे. ॥ ८ ॥ नाथ ! आपण अति शुद्ध हृदयी व अति सरळ बुद्धिचे आहांत, शील व स्नेह याचे निवासस्थान आहांत, आपण सर्वांवर प्रीती करता व सगळ्यांचा आपल्याला विश्वास वाटतो व सर्व आपल्यासारखे ( आत्मसमान) आहेत असे आपणांस वाटते ॥ दो० २२७ ॥

विषयि जीव जैं प्रभुता पावति । मूढ मोहवश होती प्रगटति ॥
भरत नीरिरत साधु जाणते । प्रभुपदरत हें विश्व जाणतें ॥
तेही आज राजपद पावुनि । निघति धर्ममर्यादा सांडुनि ॥
कुटिल कुबंधु कुसमय साधुनि । वनीं राम एकाकी जाणुनि ॥
करुनि कुमंत्रा साजा सजति । राज्य अकंटक करण्या धावति ॥
कोटि रीतिं कल्पुनी कुटिलता । कटक जमवुनी येति उभयता ॥
जर नसती मनिं कपट-कुचाळी । कुणा रुचे रथ-वाजि गजाली ॥
कोण दोष दे वृथाच भरता । माजे जगचि राजपद मिळतां ॥

दो० :- शशि गुरु-तल्पग नहुष नृप करी भूसुरां यान ॥
विमुख लोक वेदां बने अधम किं वेन समान ॥ २२८ ॥

विषयी जीवांना जेव्हा प्रभुता ( ऐश्वर्य सत्ता) मिळते तेव्हा ते त्या मोहाला वश होऊन मूढ बनतात व ( आपली सत्ता) प्रगट करुं लागतात ॥ १ ॥ भरत, नीतीरत, साधु, जाणते प्रभूच्या चरणीं रत आहेत हे सर्व जग जाणते ॥ २ ॥ पण ते सुद्धा आज राजाचा अधिकार मिळताच धर्म मर्यादा सोडून निघाले आहेत ॥ ३ ॥ कुटील व दृष्ट भाऊ ही भलतीच वेळ साधून व राम वनात एकटे आहेत हे जाणून ॥ ४ ॥ कुमंत्र ( कुविचार) करुन व सर्व जय्यत तयारी करुन ( मिळालेले) राज्य निष्कंटक करण्य़ासाठी धावत येत आहेत ॥ ५ ॥ अनंत प्रकारांनी ( तुमच्या विषयी) कुटिलता कल्पून ( तूम्ही) कुटिल आहांत अशा कल्पना करुन सर्व सैन्य गोळा करुन दोघे बंधू येत आहेत ॥ ६ ॥ कपटाने दुष्टपणा करण्याची इच्छा जर मनात नसती तर रथ, घोडे व हत्ती यांच्या त्या रांगाच्या रांगा तांडेच्या तांडे घेऊन येणे कोणाला आवडले असते ? ॥ ७ ॥ भरतालाच वृथा दोष कोणी द्यावा ! राजपद मिळाल्याने सर्व जगच मदांध होते ॥ ८ ॥ चंद्र गुरुपत्‍नी – गामी बनला, नहुष राजाने ब्राह्मणांस वाहन बनविले ( आपली पालखी वाहण्य़ास लावले) आणि वेन राजा लोकविरोधी व वेदविरोधी बनला, त्याच्या सारखा अधम कोण असेल ? ( कोणी नाही) ॥ दो० २२८ ॥

दशशत भुज सुरपती त्रिशंकू । कुणा राज्यपद दे न कलंकू ॥
भरत करति या उचित उपावा । रिपु-रिण लेश न कधिं उरवावा ॥
बरें परंतु न भरतें हें कृत । बघुनि राम असहाय अनादृत ॥
समजेलचि परि विशेष आजीं । सरुष राममुख बघतां आजीं ॥
इतकें वदत नीतिरस भुलला । रणरसविटप पुलकमिषिं फुलला ॥
प्रभु-पद वंदुनि रज शिरिं लावत । वदले सत्य सहज बल सांगत ॥
अनुचित माझें माना नाथ ! न । भरत नाल्प करि अपलें पूजन ॥
किति सोसावें तोंड दाबुनी । नाथ साथ धनु हातीं असुनी ॥

दो० :- क्षात्र जाति रघुकुळिं जनन रामानुग म्हणतात ॥
नीच धूळिं सम कोण, शिरिं चढेहि देतां लाथ ॥ २२९ ॥

सहस्त्रार्जुन, देवराज इंद्र, त्रिशंकू इत्यादी कोणाला राज्यपदाने कलंक नाही लावला ? ॥ १ ॥ भरताने हा जो उपाय चालविला आहे तो योग्यच आहे, कारण की शत्रु व ऋण यांचा लेश सुद्धा कधी राहू नये ( अशी नीतीच आहे) ॥ २ ॥ परंतु भरताने एक गोष्ट चांगली केली नाही ( ती ही की) राम असहाय्य आहेत असे पाहून त्यांचा अनादर केला ॥ ३ ॥ पण आज रणांगणात रामचंद्रांचे सरोष मुख दिसतांच ते ही चांगले विशेष प्रकारे समजेल ! ॥ ४ ॥ इतके म्हणताच नीतीरस विसरला गेला व वीर रसरुपी वृक्ष रोमांचांच्या रुपाने फुलला ( नीती सांगता सांगता वीररस एकदम जागृत झाला व आवेगाने अंगावर रोमांच उभे राहीले) ॥ ५ ॥ प्रभूच्या पायांना वंदन करुन पायधूळ मस्तकाला लावीत आपले सहज बळ सांगत सत्यच वदले की ॥ ६ ॥ आपण माझे अनुचित मानू नये; भरताने आपले काही थोडे पूजन नाही केले ( पुष्कळ) छळले आहे आपल्याला ॥ ७ ॥ तोंड दाबून कोठवर व किती सोसावे ! साथ संगतीत आहेत व आमच्या हातात धनुष्य आहे ॥ ८ ॥ जातीने क्षत्रिय आहोत, रघुकुळांत जन्म झाला आहे, आणि रामसेवक म्हणतात जगांत ! धुळीसारखे नीच कोणी आहेत काय ? पण ती सुद्धा लाथ मारताच डोक्यावर चढतेच ॥ दो० २२९ ॥

उठुनि कुळुनि कर आज्ञा मागे । जणूं वीररस निद्रित जागे ॥
बांधि जटा शिरिं कसि कटिं भाता । सज्य शरासन सायक हातां ॥
आज रामसेवक यश घेतो । धडा समरिं भरताला देतो ॥
राम निरादर फळ पावोत किं । रणशय्ये दोघे झोपोत किं ॥
भला योग सब समाज आला । करतो प्रगट पूर्व-रोषाला ॥
करि निकरा मृगराज निर्दळी । जसा ससाणा लाव्यां कवळी ॥
तैसा सानुज ससैन्य भरता । तुडवुनि मारिन रणीं खेळतां ॥
एतिल साह्या शंकर रणिं जरि । राम शपथ मारीन राम अरि ॥

दो० :- रुष्ट तप्त लक्ष्मण बघुनि सत्य शपथ ऐकून ॥
सभय लोक सब लोकपति पाहति पळूं भिऊन ॥ २३० ॥

( असे म्हणून) उठून हात जोडून आज्ञा मागितली ( तेव्हा असे वाटले की) जणू काय झोपलेला वीररसच जागा झाला ॥ १ ॥ मस्तकावर जटा, बांधल्या, कमरेला भाता कसला, व धनुष्य सज्ज करुन बाण हातात घेतला ॥ २ ॥ ( व म्हणाले) आज युद्धात भरताला चांगलाच धडा देतो व रामसेवक म्हणून यश घेतो ॥ ३ ॥ रामाचा निरादर करण्याचे फळ ते दोघे भाऊ पावोत व रणभूमीरुपी शय्येवर दोघे कायमचे झोपोत ( एकदाचे) ! ॥ ४ ॥ आज चांगला योग आला आहे की सर्व समाज ( जमून) आला आहे, आता मागचा रोष प्रगट करतो ॥ ५ ॥ सिंह जसा हत्तींच्या कळपाचे निर्दालन करतो आणि ससाणा जसा लावा पक्ष्यांचा संहार करतो ॥ ६ ॥ तसाच भरताला त्याच्या अनुजासह आणि सैन्यासह खेळत खेळत रणांगणात तुडवून ठार करुन टाकीन ॥ ७ ॥ जरी शंकर साह्य करण्यास आले तरी रामाची शपथ घेऊन सांगतो की – रामवैर्‍यांना रणांगणांत मारीन ॥ ८ ॥ लक्ष्मण रागाने लालीलाल झालेले पाहून व त्यानी घेतलेली सत्य शपथ ऐकून सर्व लोक व लोकपाल भयभीत झाले व घाबरुन पळून जाण्य़ाची तयारी करु लागले ॥ दो० २३०॥

जग भयमग्न, होइ नभवाणी । लक्ष्मण भुजबळ बहु वाखाणी ॥
तव प्रतापा तथा प्रभावा । जाणे कोण, कोणि वर्णावा ॥
अनुचित उचित कार्य कीं बघती । समजुनि करिति बरें त्यां म्हणती ॥
सहसा करुनी मग पस्तावति । ते ना बुध, बुध वेदहि सांगति ॥
श्रवुनि सुरवचा लक्ष्मण लाजति । राम सिता सादर सन्मानति ॥
तात कथित तुम्हिं नीती सुंदर । बंधो ! नृपमद इतरिं कठिणतर ॥
चढे पिउनि मद भूपां त्यां ही । साधुसभा जिहिं सेवित नाहीं ॥
भला भरतसा लक्ष्मण ! कोणी । विधी प्रपंची दृष्ट न कानीं ॥

दो० :- होइ न भरता राज्यमद विधि हरिहर पदिं जात ॥
नासत कांजी सीकरें क्षीर सिंधु कधिं तात ! ॥ २३१ ॥

सर्व जण भयात बुडाले तेव्हा आकाशवाणी झाली व तिने लक्ष्मणाच्या बाहुबळाची खूप प्रशंसा केली ॥ १ ॥ तात ! तुमचा प्रताप आणि त्याप्रमाणेच प्रभाव कोण जाणणार व कोणाला वर्णन करता येईल ? ॥ २ ॥ कार्य अनुचित आहे की उचित आहे हे पाहून व नीट समजून जे करतात त्यांना सर्व चांगले म्हणतात ॥ ३ ॥ ( पण) सहसा ( अविचाराने व उतावळेपणने) करुन पाठीमागून पश्चाताप करतात ते बुध ( शहाणे) नाहीत असे ज्ञानी व वेद सुद्धा सांगतात ॥ ४ ॥ ऐकून लक्ष्मण लज्जित झाले, ( तेव्हा) राम व सीता यांनी त्यांचा आदराने सन्मान केला ॥ ५ ॥ तात ! तुम्ही सुंदर नीती सांगीतलीत बंधू ! इतर मदांपेक्षा राजमद अधिक कठीण ( हे अगदी खरे) ! ॥ ६ ॥ ( पण) त्याचे पान करुन मद त्याच भूपांना चढतो की ज्यांनी साधुसभा ( कधी) सेविलीच नाही ॥ ७ ॥ लक्ष्मणा ! भरतासारखा भला ( माणूस) ब्रम्हदेवाने निर्माण केलेला प्रपंचात कधी कुठे दिसला नाही व कधी ऐकलाही नाही ॥ ८ ॥ ब्रह्मा, हरिहर यांच्या पदीं चढले तरी भरतास कधी राज्यमद होणार नाही कांजीच्या शिंतोड्याने कधी क्षीरसागर नासतो कां ? ॥ दो० २३१ ॥

तिमिर तरुण तरणिला गिळोही । गगन मेधिं एकत्र मिळो ही ॥
गोपद-जळीं बुडो घटयोनी । क्षमा सहज जरि सांडी क्षोणी ॥
मशक-फुंकरें मेरु उडे जरि । नृपमद भरता कधिं न जडे तरि ॥
लक्ष्मण तुझी शपथ पितृ आण । शुचि सु-बंधु नहिं भरत समान ॥
सुगुण दूध अवगुण जल ताता । मिळवुनि रची प्रपंच विधाता ॥
भरत हंस रविवंश तडागां । जन्मुनि कृत गुण दोष दिभागां ॥
पय गुण घे त्यजि अवगुण वारी । स्वयशें कृत जग भास्वर भारी ॥
वदत भरत गुण शिला स्वभावहि । प्रेम पयोधिं मग्न रघुराव हि ॥

दो० :- श्रवुनि बिबुध रघुवर वचन पाहुनि भरतीं स्नेह ॥
स्तविती सकल किं रामसा प्रभु कुणि कृपा सुगेह ॥ २३२ ॥

रामांचा भरताबद्दलचा विश्वास व प्रेमादर घनदाट अंधार मध्यान्हीच्या सूर्याला गिळो, सगळे आकाश एकाच ढगांत राहो, ॥ १ ॥ गाईच्या खुराइतक्या पाण्यात अगस्त्य ऋषी कदाचित बुडोत किंवा पृथ्वी आपल्या अंगची सहज क्षमा सोडून देवो ॥ २ ॥ मशकाच्या फुंकरेने मेरु पर्वत उडून जावो, पण भरताच्या ठिकाणी राज्यपद उत्पन्न होणे कधीही शक्य नाही ॥ ३ ॥ लक्ष्मणा तुझी शपथ व पित्याची आण घेऊन सांगतो की भरतासारखा पवित्र व भला बंधू या जगात नाही ॥ ४ ॥ तात ! सदगुण रुपी दूध व अवगुण रुपी पाणी मिसळून विधात्याने प्रपंच – रचना केली आहे ॥ ५ ॥ रविवंशरुपी ( मानस) सरोवरांत जन्मून भरतरुपी हंसाने गुण व दोष यांची विभागणी केली ( गुणदोषांचे पृथ्थकरण केले आहे) ॥ ६ ॥ ( आणि) सदगुण रुपी दूध घेऊन व अवगुण रुपी पाणी टाकून त्यानी आपल्या यशाचे जगाला फार प्रकाशमय केले आहे. ॥७॥ भरताचे गुण, शील, स्वभाव यांचे कथन करता करता रघुराज ( त्या भरत) प्रेमसागरात बुडाले ॥ ८ ॥ रघुवराचे भाषण ऐकून व त्यांचा भरतावरील स्नेह पाहून सगळ्या देवांनी स्तुती केली की रामचंद्रांसारखा कृपेचे माहेरघर असणारा समर्थ स्वामी दुसरा कोण आहे ? ( कोणीही नाही) ॥ दो० २३२ ॥

होता ना जगिं भरत जन्म जर । कोण धरणि धरि सकल धर्मधुर ॥
भरत गुण कथा कविकुल गम्य न । कळे कुणा रघुनाथ तुम्हांविण ॥
लक्ष्मण राम सिता सुरवचनें । सुख पावति अति शक्य न वदणें ॥
इथें भरत सह सर्वहि मंडळि । स्नान करिति मंदाकिनि शुचि जळिं ॥
लोकां सरिते समीप ठेउनि । माता गुरु सचिवाज्ञा घेउनि ॥
निघति जिथें सीता रघराऊ । साथ निषाद नाथ लघु भाऊ ॥
जननी करणी समजुइ लाजति । कोटि कुतर्क मनीं करुं लागति ॥
राम सीता लक्ष्मण मम नांवा । श्रवुनि न जाती त्यजुनि किं ठावा ॥

दो० :- मातृमतीं मज मानुनी थोडें जें करतील ॥
क्षमुनि दोष अघ, आदरति स्वतःकडे बघतील ॥ २३३ ॥

( देव म्हणतात) जर भराताचा जन्म जगात झाला नसता तर धरणी व सर्व धर्माची धुरा कोणी बरें धारण केली असती ? ॥ १ ॥ कवी व ज्ञानी यांच्या समूहांना सुद्धा अगम्य अशा भरताच्या गुणकथा रघुनाथ ! तुमच्याशिवाय कोण जाणेल ? ॥ २ ॥ देवांच्या वचनाने लक्ष्मण – राम व सीता यांना अति सुख झाले, पण त्याचे वर्णन ( त्यांनासुद्धा) करता येत नाही ॥ ३ ॥इथे भरतानी सर्व मंडळींसह मंदाकिनीच्या पवित्र जलात स्नान केले ॥ ४ ॥ आणि नदीच्या जवळ सर्व लोकांना ठेवून माता ( कौसल्या) व गुरु ( वसिष्ठ) व सचिव यांची आज्ञा घेऊन ॥ ५ ॥ निषादनाथाला साथीला घेऊन जिकडे सीता रघुनाथ राहतात तेथे शत्रुघ्नासह चालले ॥ ६ ॥ जननीच्या करणीचा विचार मनांत येताच लाज वाटली व मनात अनंत कुतर्क करुं लागले की ॥ ७ ॥ माझे नांव ऐकून राम सीता व लक्ष्मण आपले निवास्थान सोडून दुसरीकडे तर जाणार नाहीत नां ? ॥ ८ ॥ मी मातेच्याच मताचा आहे असे मानून जे काही करतील ते थोडेच आहे, पण आपल्या स्वत:कडे बघतील तर माझे सर्व दोष व पापे क्षमा करुन आदर देतील. ॥ दो०२३३ ॥

त्यागिति जरि मन मलिन समजुनी । जरिं सन्मानिति सेवक गणुनी ॥
राम-उपानह सुशरण मजला । स्वामि राम शुभ दोष जनाला ॥
जगीं मीन चातक यश भाजन । प्रेम नेम निज नव पटु पावन ॥
असें म्हणत मनिं मार्गीं जातां गात्रीं लज्जा स्नेह शिथिलता ॥
दोष मातृकृत त्या जणुं फिरवित । धीर भक्ति बल चाहुरिं चालत ॥
स्मरतां स्वभाव रघुनाथाचा । त्वरें पाय पथिं पडतो त्याचा ॥
भरत दशा त्या समयीं तैसी । जल अलिगति जल ओघीं जैसी ॥
बघतां स्नेह खेद भरताचा । होइ निषाद हि विदेह साचा ॥

दो० :- होति शकुन शुभ ऐकुनी चिंतुनि वदे निषाद ॥
शोक नाश होइल अरुष परि परिणामिं विषाद ॥ २३४ ॥

मी मलीन मनाचा ( पापी) आहे असे समजून त्याग केला किंवा सेवक मानून सन्मान केला, तरी मला स्वामींचे जोडेच ( पादुका) योग्य शरण = आश्रय आहेत कारण की राम चांगले स्वामी आहेत व दोष माझा दासाचा आहे ॥ १-२ ॥ जगात चातक व मीन खरे यशपात्र आहेत कारण मीनाचे प्रेम व चातकाचा प्रेमाचा नेम नित्य नवा व पवित्र ठेवण्यात ते निपुण आहेत ॥ ३ ॥ असे मनांत म्हणत मार्गाने जात असता भरताच्या गात्रांत लज्जा व स्नेह यांमुळे शिथिलता आली ॥ ४ ॥ मातेने केलेले दोष जणुं त्यांना मागे फिरवीत आहेत; पण भक्तीबल व धीर या चाहुरीच्या बळावर चालत आहेत ॥ ५ ॥ रघुनाथाच्या स्वभावाची आठवण झाली की मात्र पाऊल रस्त्यावर भराभर पडते ॥ ६ ॥ त्यावेळी भरताची दशा तशी झाली जशी पाण्य़ाच्या प्रवाहांत जलभ्रमराची होते ॥ ७ ॥ भरताचा स्नेह व खेद पाहून निषाद सुद्धा त्या वेळी खराखुरा विदेह बनला ॥ ८ ॥ इतक्यात शुभ शकुन होऊ लागले, ते ऐकून व विचार करुन निषाद म्हणाला की शोकनाश होऊन हर्ष होईल पण शेवटी विषाद होईल ॥ दो० २३४ ॥

सेवक वचन सत्य सब जाणति । निकट आश्रमा जाउनी पोचती ॥
भरत बघत गिरि समूह कानन । क्षुधित मुदित जणुं मिळत सुभोजन ॥
प्रजा जणूं ईती भय दुःखित । मारी, ग्रह, तापत्रय पीडित ॥
जात सुराज-सुदेशिं सुखावे । होइ भरतगति तशी स्वभावें ॥
राम वसति वनिं संपत् भ्राजे । सुखी प्रजा जणुं मिळत सुराजे ॥
सचिव विराग विवेक नरेशहि । विपिन सुशोभन पावन देशहि ॥
भट यम नियम शैल नृपधानी । शांति सुमति, शुचि सुंदर राणीं ॥
उत्तम नृप सर्वांग सुपूरित । रामपदाश्रित मन उत्साहित ॥

दो० :-जिंकुनि मोह महीप दल सहित विवेक भुपाल ॥
करत अकंटक राज्य पुरिं सुख संपदा सुकाळ ॥ २३५ ॥

सेवकाचे सर्व म्हणणे सत्य आहे हे भरतांनी जाणले, तोच ते आश्रमाच्या जवळ जाऊन पोचले ॥ १ ॥ कानन व पर्वत समूहांना पाहताच भरतांस असा आनंद झाला की जणू भुकेल्यास सुग्रास भोजन मिळावे व त्यास आनंद व्हावा ॥ २ ॥ जणूं ईतीच्या भीतीने दु:खी झालेली आणि महामारी ग्रहदशा व त्रिविधताप यांनी पिडलेली प्रजा ॥ ३ ॥ सुराजा असलेल्या सुंदर देशांत जाऊन सुखी व्हावी, तशीच भरताची दशा होत आहे. ॥४॥ राम या वनात वसत असल्याने वनांत श्रीमंती संपत्ती शोभत आहे, जणूं उत्तम राजा मिळाल्याने प्रजा सुखी आहे ॥ ५ ॥ वैराग्य मंत्री आहे ज्ञान ( विवेक) राजा आहे, सुंदर पावन वन हाच त्याचा सुंदर व पावन देश आहे ॥ ६ ॥ गम – नियम हे सैन्यातील वीर आहेत चित्रकूट पर्वत ही त्यांची राजधानी आहे आणि शांती व सुमति या पवित्र व सुंदर राण्या आहेत ॥ ७ ॥ हा उत्तम राजा राज्याच्या सर्व अंगांनी परिपूर्ण उत्तम आहे व रामचरणांचा आश्रित असल्याने मन सदा उत्साही आहे ॥ ८ ॥ मोहरुपी राजा व त्याचे सैन्य यांना विवेक भुपाल आपल्या सैन्याच्या साह्याने जिंकून नगरात निष्कंटक राज्य करीत असून ( त्याचा राज्यांत) सुख, संपत्ती व सुकाळ ( सुभिक्ष) नांदत आहेत. ॥ दो० २३५ ॥

वन सुदेशि मुनि वास किती तरि । जणुं पुर नगर गांव खेडिं वरि ॥
विपुल विचित्र विहग मृग नाना । प्रजा समाज, न शक्ति वर्णना ॥
गेंडे वाघ महिष किरि हरि करि । वृष, बघुनी स्तुति कोण किती करि ॥
त्यजुनि वैर विचरतात संगें । जणुं सर्वत्र चमू चतुरंगें ॥
निर्झर झरति मत्त गज गाजति । मझूं नगारे नाना वाजति ॥
चक चकोर चातक शुक पिक गण । कूजति मंजु मराल मुदित मन ॥
अलिगण गाती नाचति केकी । जणुं सुराज्यिं मंगल सब लोकीं ॥
वेलि विटप तृण सफल सफूलहि । सब समाज मुद मंगल मूलहि ॥

दो० :- रामशैल शोभा बघुनि भरत हृदयिं सुप्रेम ॥
तापस तपफल मिळुनि सुखि जसा संपतां नेम ॥ २३६ ॥

वनरुपी सुंदर देशांत मुनींचे कितीतरी आश्रम आहेत, तीच जणू शहरे, नगरे, गाव व चांगली खेडी आहेत ॥ १ ॥ नाना प्रकारचे विपुल चित्रविचित्र पक्षी व पशु हाच प्रजा समाज आहे; पण त्याचे वर्णन करणे शक्तीच्या बाहेरचे आहे ॥ २ ॥ गेंडे, वाघ, महिष ( रेडे, म्हशी), वृष ( गाई, बैल) वराह ( किरि) सिंह, हत्ती, वगैरेंना पाहून कोण किती प्रशंसा करणार ॥ ३ ॥ हे सर्व पशु आपसातील ( स्वभाव) वैर विसरुन ( सोडून) संगतीने असे फिरत असतात की जणू जिकडे तिकडे ( सर्वत्र) चतुरंगिणी सेनाच फिरत आहे ॥ ४ ॥ निर्झर धो धो वहात आहेत व मत्त हत्ती गर्जत आहेत, हेच जणू नाना प्रकारचे नगारे वाजत आहेत ॥ ५ ॥ चक्रवाक, चकोर, चातक, पोपट, कोकिळ व सुंदर हंस यांचे समूह प्रसन्न चित्ताने कूजन करीत आहेत. ( हीच जणू इतर मंगलवाद्ये वाजत आहेत) ॥ ६ ॥ भुंगे गायन करीत आहेत व मोर नृत्य करीत जणूं सुराज्यात सर्व लोकांकडे मंगलकार्ये चालली आहेत ॥ ७ ॥ वेली, वृक्ष, तृणे ही सर्व फल फूलयुक्त झाली आहेत सर्व समाजच आनंदमंगलाचे मूळ आहे ॥ ८ ॥ श्रीरामगिरीची ही शोभा पाहून भरताच्या हृदयात प्रेम अतिशय वाढले व तापसाला तपाचे फळ मिळाले म्हणजे नियमांची समाप्ती होते व जो जसा सुखी होतो ( तसे भरत सुखी झाले) ॥ दो० २३६ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP