॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय १७ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

हेतु दुजा श्रुणु शैलकुमारी । वदूं विचित्र कथा विस्तारीं ॥
ब्रह्म अरूप अजहि जें निर्गुण । कोसल पुरनृप होण्या कारण ॥
तुम्हां फिरत वनिं जे प्रभु दिसले । बंधुसहित मुनिवेष घेतले ॥
बघुनि भवानी यच्चरिताला । सतीशरीरीं भ्रमिष्ट झालां ॥
ती छाया तव अझुनि न गता । भ्रमरुज हारी श्रुणु तच्चरिता ॥
लीला कृत जी त्या अवतारीं । सकल सांगुं मग मतिअनुसारीं ॥
भरद्वाज ! शंकरवच ऐकुनि । उमा सस्मिता प्रेमें लाजुनि ॥
वर्णुं लागले मग वृषकेतू । तो अवतार धराया हेतू ॥

दो. :- तो मी वदतो सब मुने श्रृणु मन लावुनि भारि ॥
रामकथा कलिमलहरणि सुंदर मंगलकारि ॥ १४१ ॥

मनु शतरुपाख्यान - शैलकुमारी ! दुसरा हेतू ऐक ! विचित्र कथा विस्ताराने सांगतो. ॥ १ ॥ अज, अरुप व निर्गुण असणारे जे ब्रह्म ते कोसलपुरभूप होण्यास काय कारण झाले ते ऐक. ॥ २ ॥ बंधूसह मुनीवेष घेतलेले जे प्रभू तुम्हास वनात हिंडताना दिसले ॥ ३ ॥ व ज्यांचे चरित्र पाहून तुम्ही भवानी असून सती शरीरात भ्रमिष्ट झालात ॥ ४ ॥ अजूनही तुमच्यावरील ती ( भ्रमरोगाची ) छाया गेलेली नाही, तरी भ्रमरोगाचे हरण करणारे त्यांचे चरित्र ऐका ॥ ५ ॥ त्या अवतारात ज्या लीला केल्या त्या मी आपल्या बुद्धीप्रमाणे मग सांगेन ॥ ६ ॥ भरद्वाजा ! ही शंकरांची वाणी ऐकून उमा लाजली; व तिने प्रेमाने स्मितहास्य केले ॥ ७ ॥ मग तो अवतार घेण्यातील हेतू वृषकेतू वर्णन करु लागले ॥ ८ ॥ मुने ! तो सर्व हेतू मी तुम्हांस सांगतो, तुम्ही अगदी मन लावून श्रवण करा. रामकथा कलिमल हरण करणारी, मंगल कारक व सुंदर आहे ॥ दो० १४१ ॥

स्वायंभू मनु नी शतरूपा । ज्यां पासुनि नरसृष्टि अनूपा ॥
दंपति धर्माचरणीं उत्तम । वेद गाति यत्सुयशा अनुपम ॥
नृप उत्तानपाद सुत त्यांचा । ध्रुव हरिभक्त होइ सुत ज्याचा ॥
तया प्रियव्रत मुलगा साना । प्रशंसिला जो वेदपुराणां ॥
देवहूति त्यांचीच कुमारी । कर्दममुनिची जी प्रियनारी ॥
आदिदेव प्रभु दीन-दयाला । जठरिं धरी ती कपिल कृपाला ॥
सांख्य शास्त्र वर्णिते प्रगट ते । भगवान् तत्त्वविचारनिपुण ते ॥
तो मनु राज्य करी बहुकाळीं । प्रभु आज्ञा सगळ्या प्रतिपाळी ॥

सो. :- नव्हे विरति विषयांत भवनिं वसत ये वृद्धपण ॥
बहुत दुःख हृदयांत जन्म गत किं हरिभक्तिविण ॥ १४२ ॥

ज्यांच्यापासून अनुपम मनुष्यसृष्टी उत्पन्न झाली ते स्वयंभू मनू व ( त्यांची पत्‍नी ) शतरुपा होत. ॥ १ ॥ या दांपत्याचे धर्माचरण उत्तम होते ( म्हणून ) त्यांच्या अनुपम सुयशाचे गान वेदपुराणे ( अद्याप ) करीत आहेत. ॥ २ ॥ नृप उत्तानपाद त्यांचा पुत्र होता व त्याचा पुत्र ध्रुव हरीभक्त झाला. ॥ ३ ॥ त्यांचा ( मनु शतरुपा यांचा ) धाकटा मुलगा प्रियव्रत नावाचा होता व त्याची प्रशंसा सुद्धा वेद पुराणे करतात. ॥ ४ ॥ त्यांचीच मुलगी जी देवहुती ती कर्दम मुनींची प्रिय पत्‍नी झाली. ॥ ५ ॥ दीनदयाल आदिदेव प्रभूला तिने कृपाल कपिल रुपाने आपल्या उदरात धारण केले. ॥ ६ ॥ ते भगवान असून तत्वविचार निपुण होते व त्यांनीच सांख्य शास्त्राचे प्रगटपणे वर्णन केले. ॥ ७ ॥ त्या मनुने पुष्कळ काळपर्यत राज्य केले व प्रभूच्या सगळ्या आज्ञांचे प्रतिपालन केले ॥ ८ ॥ घरी राहता राहता म्हातारपण आले तरी विषयात वैराग्य उत्पन्न झाले नाही आणि हरिभक्तीवाचून सर्व जन्म फुकट गेला ! ( असे वाटून ) मनुला हृदयात फार दु:ख वाटूं लागले ॥ दो० १४२ ॥

बळें सुता राज्यार्पण केलें । काननिं नारी समेत गेले ॥
प्रथित तीर्थवर नैमिष कानन । साधक-सिद्धिद जें अति पावन ॥
वसति सिद्धमुनिसमाज जेथें । मनु नृप हर्षित निघती तेथें ॥
जात पथीं शोभति मतिधीर । ज्ञान-भक्ति जणुं धरुनि शरीर ॥
यदा पोचले गोमतितीरीं । मुदित मज्जले निर्मल नीरीं ॥
भेटूं आले ज्ञानि सिद्ध मुनि । धर्मधुरंधर नृपर्षि जाणुनि ॥
होतीं पावन तीर्थे जेथें । मुनि करविति विधि सादर तेथें ॥
कृश शरीर मुनिपट परिधाना । श्रवण नित्य सत्संगिं पुराणां ॥

दो. :- अनुरागें द्वादशाक्षरी मंत्रा मग जपतात ॥
वासुदेवपदपंकरुहिं दंपति-मनं जडतात ॥ १४३ ॥

( तेव्हा ) त्यांनी जबरीने मुलाला राज्य अर्पण केले व पत्‍नीसह वनवासास निघाले ॥ १ ॥ साधकांना सिद्धी देणार अतिपावन तीर्थ श्रेष्ठ जे नैमिषारण्य म्हणून प्रसिद्ध आहे ॥ २ ॥ व जेथे सिद्ध व मुनी यांचे समाज निवास करीत होते तेथे मनुराजा निघाले ॥३ ॥ मार्गाने जात असता ते धीर बुद्धी दांपत्य जणू मूर्तीमान ज्ञान ( मनु ) भक्ती ( शतरुपा ) प्रमाणे शोभत होते. ॥ ४ ॥ जेव्हा गोमती नदीच्या काठी जाऊन पोचले तेव्हा तिच्या निर्मल जलात मुदित मनाने स्नान केले ॥ ५ ॥ ( मनु ) ते धर्मधुरंधर राजर्षी आहेत असे जाणून ज्ञानी व सिद्ध मुनी त्यास भेटावयास आले. ॥ ६ ॥ जिथे जिथे पावन तीर्थे होती तेथे मुनींनी त्यांच्याकडून आदराने तीर्थविधी करविला ॥ ७ ॥ मनुशतरुपांचे देह कृश झाले असून त्यांनी वल्कले धारण केली आहेत व नित्य संतसमागमात ते दांपत्य पुराण – श्रवण करूं लागले ॥ ८ ॥ मग ते दांपत्य प्रेमाने ( ॐ नमो भगवते वासुदेवाय ! ) व्दादशाक्षरी मंत्राचा जप करूं लागले व त्या दोघांचे मन वासुदेव पदकमलांच्या ठिकाणी जडूं लागले ॥ दो० १४३ ॥

कंद मूल फल शाक भक्षती । ब्रह्म सच्चिदानंदा स्मरती ॥
मग हरिसाठिं करिति तप भारी । त्यजुनि फलादिक सेविति वारी ॥
वसे निरंतर अभिलाषा मनिं । तो पभु परम बघावा लोचनिं ॥
अगुण अखंड अनादिहि अंत न । ज्या चिंतिति परमार्थवादि जन ॥
नेति नेति जें वेदिं निरूपित । निजानंद निरुपाधि निरुपमित ॥
शंभु विरंचि विष्णु भगवानां । उद्‌भव अंशें ज्यांच्या नाना ॥
असा प्रभुहि सेवकवश असतो । भक्तांस्तव लीला-तनु धरतो ॥
सत्य असे जर ही श्रुतिभाष । तर पुरेल अमची अभिलाषा ॥

दो. :- षट्‌सहस्त्र गत वर्ष अशिं करुनि वारि-आहार ॥
संवत सप्तसहस्त्र मग केवल् पवनाधार ॥ १४४ ॥

कंद, मूळ, फळे व भाज्या खाऊन सच्चिदानंद ब्रह्माचे स्मरण करु लागले ॥ १ ॥ मग हरीसाठी भारी तप सुरु केले, कंदमूलफलादी सोडून पाण्यावर राहण्यास प्रारंभ केला ॥ २ ॥ ( हे करण्यात ) त्यांच्या मनात ( हृदयात ) अशी अभिलाषा आहे की जो-अगुण, अखंड, अनादी, व अनंत ( अंत न ) आहे, व परमार्थवादी लोक ज्याचे चिंतन करतात तो परम श्रेष्ठ प्रभू डोळ्यांनी पाहावा ॥ ३-४ ॥ नेती नेती म्हणून वेदांनी ज्याचे निरुपण केले आहे, जे आत्मानंदस्वरुप, उपाधिरहित, व उपमारहित आहे. ॥ ५ ॥ ज्यांच्या अंशाने अनेक भगवान शंभू, अनेक भगवान विरंची, व अनेक भगवान विष्णू यांचा उद्‌भव होतो ॥ ६ ॥ ते असे समर्थ ( प्रभु ) असलेले सेवकांना वश होतात व भक्तासाठी लीलादेह धारण करतात. ॥ ७ ॥ हे श्रुतींनी सांगितलेले जर खरे असेल तर आमची अभिलाषा पूर्ण होईल ( यात संशय नाही ) ॥ ८ ॥ अशा प्रकारे जलाहार करीत सहा हजार वर्षे गेली मग ( त्याचाही त्याग करुन ) केवल पवनावर सात हजार वर्षे काढली ॥ दो० १४४ ॥

त्यजुनि अयुत संवत्सर तोही । उभी एकपदिं राहति दोहीं ॥
विधिहरिहर तप अपार पाहुनि । बहुवेळां मनुसमीप पावुनि ॥
किती प्रलोभिति घ्या वर वदती । चाळविता अतिधीर, न चळती ॥
अस्थिमात्र तनु हो‍उनि राहि । तरि पीडा मनिं मनाग नाहीं ॥
प्रभु सर्वज्ञ दास निज जाणति । नृपराणी तापस अनन्य गति ॥
माग माग वर होइ नभगिरा । मिश्र कृपामृत परम गंभिरा ॥
मृत संजीवनि सुंदर वाणी । हृदिं ये श्रवणरंध्रिं जैं शिरुनी ॥
हृष्टपुष्टतनु सुंदर झालीं । जणुं आतांच घराहुनि आली ॥

दो. :- श्रवणामृत वच ऐकुनी पुलकीं प्रफुल्ल देह ॥
वदति दंडवत करुनि मनु हृदयिं न मावे स्नेह ॥ १४५ ॥

( वायूचा आधार होता ) तो सुद्धा सोडून दोघेजण दहा हजार वर्षे एका पायावर उभी राहीली ॥ १ ॥ हे अपार तप पाहून ब्रह्मदेव, विष्णू व हर अनेक वेळा मनूजवळ आले ॥ २ ॥ व वर मागा वगैरे सांगून अनेक तर्‍हांनी प्रलोभन दाखवले आणि तपश्चर्येपासून चलित करण्याचा प्रयत्‍न केला. पण अत्यंत धैर्यसंपन्न असल्यामुळे ते दांपत्य चलित झाले नाही. ॥ ३ ॥ त्यांचे देह नुसते अस्थिपंजर होऊन राहीले पण मनात जरासुद्धा दु:ख वाटले नाही . ॥ ४ ॥ प्रभू सर्वज्ञ असल्याने तपस्वी राजा- राणी अनन्यगतिक आहेत हे पाहून आपले निजदास आहेत असे जाणले ॥ ५ ॥ वर माग वर माग अशी कृपामिश्रित परम गंभीर आकाशवाणी झाली ॥ ६ ॥ मेलेल्यास सुद्धां जिवंत करणारी ती सुंदर वाणी कानांच्या रंध्रात शिरुन जेव्हा हृदयात आली ॥ ७ ॥ तेव्हा त्या दोघांचीही तनू इतकी हृष्टपुष्ट व सुंदर झाली की जणूं आताच आपल्या घरुन आले आहेत ( असे वाटले ). ॥ ८ ॥ कानांना अमृतासारखी वाटणारी ती वाणी ऐकून त्यांचे देह रोमांचांनी फुलून गेले, मग दण्डवत नमस्कार करुन मनु बोलूं लागले तेव्हा हृदयात प्रेम – स्नेह मावेना ॥ दो० १४५ ॥

श्रुणु सेवकसुरतरुसुरधेनू । विधिहरिहरवंदितपदरेणू ॥
सेवत सुलभ सकल सुखदायक । प्रणत पाल सचराचर नायक ॥
जर अनाथहित स्नेह अम्हांवर । द्यावा प्रसन्न हो‍उनि हा वर ॥
जें स्वरूप शिवमानसिं राही । ज्यास्तव मुनि करिती यत्‍नां ही ॥
जें भुशुंडिमनमानसिं हंसहि । सगुण अगुण जे वानिति वेदहि ॥
आम्हिं रूप तें बघुं भर लोचन । कृपा करा प्रणतार्तिविमोचन ॥
प्रिय वाटे दंपतिक्च फार हि । मृदुल नम्र तें प्रेमरसार्द्रहि ॥
कृपानिधी प्रभु भक्तवत्सलहि । प्रगटति विश्ववास भगवानहि ॥

दो. :- नील सरोरुह नीलमणि नीलनीरधरशाम ॥
लाजति तनु-शोभा बघुनि कोटि कोटि शतकाम ॥ १४६ ॥

ऐका ! सेवकांच्या सुरुतरु ! व सुरधेनू ! ऐका आपल्या पायांच्या धुळीला विधिहरिहर वंदन करतात ॥ १ ॥ सेवन केल्याने सुलभ असलेल्या व सकल सुखदायक ! प्रणतांचे पालन करणार्‍या व सर्व चराचर नायका ॥ २ ॥ अनाथांचे हित करणार्‍या जर आपला आमच्यावर स्नेह असेल तर प्रसन्न होऊन हा वर द्या ॥ ३ ॥ जे स्वरुप शंकरांच्या मानसात राहते व ज्याच्यासाठी मुनीसुद्धा यत्‍न करीत असतात ॥ ४ ॥ जे भुशुंडीच्या मनरुपी मानसात ( मानस – सरोवरात ) हंसासारखे असते व जे सगुण व निर्गुणही आहे असे वेदसुद्धा वर्णन करतात ॥ ५ ॥ ते रुप आम्हां उभयतांस डोळे भरुन पाहण्यास सापडेल, अशी हे प्रणतांची आर्ती हरण करणार्‍या ( प्रभो ) आपण कृपा करावी ॥ ६ ॥ अतिमृदु, नम्र व प्रेमरसाने थबथबणारे हे दंपतीचे वचन फारच प्रिय वाटले ॥ ७ ॥ ( तेव्हा ) कृपानिधी भक्तवत्सल व विश्ववास भगवान प्रभू प्रगट झाले ॥ ८ ॥ रामरूपवर्णन - नीलकमल, नीलमणी व नील मेघाप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या त्या तनूची शोभा पाहुन कोटी कोटिशत काम ( मदन ) लज्जित होतात. ॥ दो०१४६ ॥

शरद-मृगांकवदन छवि सीवा । चारु गाल हनु कंबुग्रीवा ॥
अधर अरुण, रद रुचिर नासिका । विधुकर निकर विनिंदि हासिका ॥
नव अंबुज अंबक छवि सुंदर । दृष्टि ललित पडतां चेतोहर ॥
भृकुटि मदन धनुशोभाहारक । तिलक ललाटपटीं द्युतिकारक ॥
कुंडल मकर मुकुट शिरिं राजें । कुटिल केस मधुपावलि लाजे ॥
श्रीवत्सोरिं रुचिर वनमाला । पदिक हार भूषित मणिजालां ॥
चारु जानवें केसरि-कंधर । बाहु-भूषणें तींहि मनोहर ॥
करिकरसदृश सुभग भुजदंड । कटि निषंग, शर करिं कोदंड ॥

दो. :- तडित्-विनिंदक पीतपट त्रिवली वर उदरास ॥
नाभि मनोहर हरि छवि जी यमुना भंवर्‍यास ॥ १४७ ॥

मुख शरद ऋतुतील चंद्राप्रमाणे शोभेची सीमा आहे. गाल व हनुवटी सुंदर असून गळा शंखासारखा आहे. ॥ १ ॥ ओठ लाल आहेत आणि दात व नाक सुंदर आहे व हास्य जणूं चद्रं किरण सुमुदायाची निंदाच करीत आहे. ॥ २ ॥ नवीन फुललेल्या कमलासारख्या नेत्रांची शोभा सुंदर आहे व दृष्टी ज्यांच्यावर पडेल त्याचे चित्त हरण करणारी आहे. त्याच्या जीवाला आवडणारी ॥ ३ ॥ भुवया मदनाच्या धनुष्याची शोभा हरण करणार्‍या असून भाल पटलावरील तिलक कांतीकारक आहे ॥ ४ ॥ ( कानात ) मकर कुंडले व मस्तकावर मुकुट तळपते आहे केस कुरले असून भुंग्याच्या समूहाला लाजविणारे आहेत ॥ ५ ॥ हृदयावर श्रीवत्स चिन्ह आहे रमणीय वनमाल आहे. पदकाचा हार व रत्‍न मोत्यांची जाळी यांनी छाती विभूषित झाली आहे. ॥ ६ ॥ सुंदर जानवे असून सिंहासारखी गर्दन आहे आणि बाहूभूषणे सुद्धा मनोहर आहेत. ॥ ७ ॥ हत्तीच्या सोंडेसारखे सुंदर भुजदंड असून कमरेला भाता व हातात बाण व धनुष्य आहेत. ॥ ८ ॥ पीतांबर जणूं विद्युल्लतेची विशेष निंदा करीत आहे व सुंदर पोटावर तीन सुंदर वळ्या ( घड्या ) पडल्या आहेत मनाचे हरण करणारी नाभी जणूं यमुनेच्या भोवर्‍याचे सौंदर्य हरण करीत आहे. ॥ दो० १४७ ॥

पदराजीव न वचनिं गवसती । तेथें मुनिमन - मधुप निवसती ॥
वामभागिं शोभे अनुकूला । आदिशक्ति छविनिधि जगमूला ॥
जिचे अंश उपजति गुण खाणी । अगणित रमा उमा ब्रह्माणी ॥
भृकुटिं-विलसिं जिचे जग होती । रामवाम दिशिं सीता हो! ती ॥
छबि-समुद्र हरि-रूप विलोकुनि । टकमक बघति नयनपट रोखुनि ॥
सादर निरखिति अनुपम रूपा । तृप्ति न मानति मनु शतरूपा ॥
हर्षविवश तनुभान विसरुनी । पडाति दंडवत करिं पद धरुनी ॥
प्रभु निज कर-कंजा शिरिं ठेविति । सत्वर करुणानिधान उठविति ॥

दो. :- वदति कृपानिधि पुन्हां अति मी प्रसन्न जाणून ॥
मागा वर जो रुचे मनिं महादानि मानून ॥ १४८ ॥

प्रभूंची पदकमले शब्दांनी वर्णिली जाणे शक्य नाही तेथे मुनींची मने रुपमधुप बनून निवास करुन असतात. ॥ १ ॥ प्रभूच्या वामभागी, रुपनिधान जगाचे मूळ – कारण जी आदिशक्ती, प्रभूला अनुकूल असणारी ती शोभत आहे ॥ २ ॥ जिच्या अंशांपासून गुणांच्या खाणी असणार्‍या अगणीत लक्ष्मी, उमा व ब्रह्माणी, शारदा – सरस्वती उपजतात व जिच्या भृकुटीच्या विलासानेच अनेक जगतांची उत्पत्ती होते अशी जी तीच सीता रामाच्या डाव्या बाजूस आहे हो ! ॥ ३–४ ॥ शोभासमुद्र हरीचे ते रुप दिसताच डोळ्यांचे पडदे ( पापण्या ) रोखून टक लावून बघत राहीली. ॥ ५ ॥ अति आदराने त्या अनुपम रुपाला निरखून पहात आहेत तरी मनु-शतरुपांना पुरे असे वाटतच नाही ॥ ६ ॥ आनंदाला विशेष वश झाल्यामुळे देहभान राहीले नाही व हातांनी पाय धरुन दोघेही दंडाप्रमाणे पडली ॥ ७ ॥ प्रभूंनी आपला कमलहस्त त्या दोघांच्या मस्तकावर ठेवला. व करुणानिधींनी दोघांना त्वरेने उठविले ॥ ८ ॥ तेव्हा कृपानिधी पुन्हा म्हणाले की मी अतिप्रसन्न आहे असे जाणून व मी महादाता आहे हे लक्षात आणून, तुमच्या मनाला जो आवडेल तो वर मागा ॥ दो० १४८ ॥

प्रभु-वच परिसुनि जोडुनि पाणी । धीर धरुनि वदले मृदुवाणीं ॥
नाथ बघुनि पदकमला अपले । अमचे काम पूर्ण कीं सगळे ॥
एक लालसा महा मना ही । सुगम अगम वदवत ती नाहीं ॥
दान सुगम अति गोस्वामींनां । अगम वाटते परि मज कृपणा ॥
रंक विबुधतरु जसा लाभतां । लाजे बहु संपत्ति मागतां ॥
तो न तयाचा प्रभाव जाणे । तसें हृदयिं मम संशयठाणें ॥
तो तुम्हिं जाणा अंतर्यामी । मनोरथा मम पुरवा स्वामी ॥
माग मजसि नृप, संकोचाविण । तुला अदेय असें मम कांहिं न ॥

दो. :- दानि-शिरोमणि कृपानिधि नाथ वदें सद्‌भाव ॥
इच्छीं तुम्हां समान सुत प्रभुशि किं कपटा ठाव ॥ १४९ ॥

प्रभूचे भाषण ऐकून हात जोडून धीर धरुन मृदुवाणीने म्हणाले ॥ १ ॥ नाथ ! आपल्या चरणकमलांचे दर्शन झाले व त्याने आमच्या सर्व कामना पुर्‍या झाल्या आहेत ॥ २ ॥ माझ्या मनात एक मोठी लालसा आहे, ती सुगम आहे व अगम ( दुर्लभ ) ही आहे. पण बोलवत ( सांगवत ) नाही ॥ ३ ॥ गोस्वामी ( हृषिकेश ) ती देणे आपणास जरी सुगम असले तरी मला कृपणाला वाटते की ती अगम आहे ॥ ४ ॥ भिकार्‍याला सुरतरु सापडला तरी तो जसा फार संपत्ती मागण्यास लाजतो ॥ ५ ॥ कारण तो त्याचा प्रभाव जाणत नाही तसेच माझ्या हृदयात संशयाचे ठाणे बसले आहे. ॥ ६ ॥ ( माझा मनोरथ काय आहे ) ते आपण अंतर्यामी असल्याने जाणताच ( तरी ) स्वामी, माझा मनोरथ पूर्ण करावा ॥ ७ ॥ ( भगवान म्हणाले ) राजा ! संकोच न धरता मजजवळ माग कारण तुला न देण्यासारखे माझ्याजवळ काहीच नाही ॥ ८ ॥ हे दानी-शिरोमणी ! हे कृपासागरा ! हे नाथ ! मी सद्‌भावनेने सांगतो की तम्हा समान सुत व्हावा अशी मी इच्छा करतो प्रभूच्याजवळ कपट ( लपवालपवी ) करुन कसे भागेल ! ॥ दो० १४९॥

प्रीति बघुनि वच अमोल ऐकुनि । वदति कृपानिधि ‘तथास्तु’ बोलुनि ॥
शोधुं कुठें मी सम मज जाउनि । नृप तव तनय होइं मी येउनि ॥
शतरूपे पाहुनी बद्धकर । देवि रुचे जो तुजसि माग वर ॥
नाथ चतुर नृप याचित जो वर । कृपानिधे तो मजला प्रियतर ॥
प्रभु परंतु अतिधार्ष्ट्यचि घडते । भक्तहिता जरि तुम्हांस रुचतें ॥
जगत्स्वामि तुम्हिं अजादितातहि । ब्रह्म सकल-चालक हृदयांत हि ॥
अस समजुन मन संशय धरते । परी प्रमाण असे प्रभुवच तें ॥
जे निजभक्त नाथ तव असती । जें सुख पावति जी गति लभती ॥

दो. :- तें सुख ती गति भक्ति ती निजपदिं त्या स्नेहास ॥
तो विवेक ती राहणी द्या प्रभुकृपें अम्हांस ॥ १५० ॥

राजाची प्रीती पाहूनच अमोल वचन ऐकून ‘तथास्तु’ म्हणून कृपानिधी म्हणाले ॥ १ ॥ माझ्यासारखा मी कुठे जाऊन शोधू ! मी ( च ) येऊन तुझा पुत्र होईन ॥ २ ॥ शतरुपा हात जोडून उभी आहे, असे पाहूने ( प्रभू म्हणाले ) देवी ! तुला जो रुचेल तो वर माग ॥ ३ ॥ ती म्हणाली नाथ ! चतुर नृपांनी जो वर मागितला तो हे कृपासागरा ! मला फार प्रिय आहे. ॥ ४ ॥ प्रभो ! भक्तांच्या हितासाठी जरी तुम्हांस आवडत असले तरी यांत अत्यंत धृष्टाता घडते ॥ ५ ॥ तुम्ही ब्रह्मादिकांचे जनक असूने जगाचे स्वामी आहात व तुम्ही ब्रह्म असून सर्वांच्या हृदयात चालक आहांत ॥ ६ ॥ अशा विचाराने मनात संशय येतो ( की, हे पुत्र कसे होणार ! ) पण प्रभूचे ते वचन प्रमाण आहे ॥ ७ ॥ नाथ ! तुमचे जे निजभक्त आहेत ते ज्या सुखाला व गतीला पावतात ॥ ८ ॥ तेच सुख, तीच गती, तीच भक्ती, तोच आपल्या चरणीं स्नेह, तोच विवेक, तीच राहणी हे प्रभू आपण आपल्या कृपेने आम्हां दोघांना द्यावी ॥ दो० १५० ॥

ती मृदु गूढ रुचिर वचरचना । श्रवुनि कृपाब्धि वदति मृदु वचना ॥
जी रुचि तुमच्या मनांत काहीं । दिली सकल मी संशय नाहीं ॥
ज्ञान अलौकिक तुझें, न माते । कधिं मदनुग्रहिं जाइ लयार्तें ॥
चरणिं नमुनि मनु पुनरपि वदती । प्रभु मम अपर असें कीं विनती ॥
सुतविषयिक रति असो तव पदीं । मूढ म्हणें ना मज कुणि अगदीं! ॥
मणिविण फणिसम जलविण मीना । मम जीवनमिति तव आधीना ॥
वर मागुन पद धरून बसले । एवमस्तु करुणानिधि वदले ॥
आतां मम आज्ञा तुम्हिं मानुनि । रहा अमरपति नगरीं जाउनि ॥

सो. :- भोगुनि सुखां विशाल तात कांहिं काळें जंव ॥
व्हाल अयोध्यापाल तुमचा सुत मी होइ तव ॥ १५१ ॥

ती मृदु, गुढ, व सुंदर वचनरचना श्रवण करून कृपासागर मृदुवचन बोलले ॥ १ ॥ तुमच्या ( दोघांच्या ) मनात जी रुची आहे ती सर्व मी पुरविली, यात मुळीच संशय नाही. ॥ २ ॥ माते ! तुझे अलौकिक ज्ञान माझ्या अनुग्रहाने कधी ( ही ) लयाला जाणार नाही. ॥ ३ ॥ प्रभूंच्या पायांना नमन करुन मनु पुन्हा म्हणाले की प्रभो ! माझी आणखी एक विनंती आहे की ॥ ४ ॥ तुमच्या पायांच्या ठिकाणी माझे पुत्रभावानेच प्रेम असावे ( त्यामुळे ) मला कोणी अगदी मूढ म्हणे ना कां ! ॥ ५ ॥ मण्याशिवाय जशी सर्पाची, दशा व जलाविना जशी माश्याची स्थिती तशी माझी जीवन – मर्यादा तुमच्या आधीन असावी ॥ ६ ॥ असा वर मागून मनू पाय धरुन राहीले तेव्हा करुणासागर एवमस्तु घडो असे म्हणाले ॥ ७ ॥ आता तुम्ही माझी आज्ञा मानून अमरपती नगरांत ( इंद्राच्या राजधानीत ) जाऊन राहा ॥ ८ ॥ बाबा ! तेथे विशाल सुखे भोगीत काही काळ निघूने गेल्यावर जेव्हा तुम्ही अयोध्यापती व्हाल तेव्हा मी तुमचा सुत होईन. ॥ दो० १५१ ॥

इच्छामय नरवेषा घेइन । प्रगट निकेतीं तुमच्या होइन ॥
तात! धरुनि देहा अंशांसह । करिन चरित भक्तांस सुखावह ॥
जें सुभाग्य नर सादर ऐकुनि । तरतिल भव ममता मद टाकुनि ॥
आदि शक्ति जी निर्मि जगा या । ती ही मम अवतरेल माया ॥
मी पुरवीन मनोरथ तुमचा । सत्य सत्य पण सत्य आमचा ॥
कितिदां असें कृपाब्धि म्हणाले । भगवान् अंतर्धान जहाले ॥
भक्तकृपाला स्मरत दंपती । कांहि काळ त्या आश्रमिं वसती ॥
त्यजुनि समयिं तनु विण आयासां । जाउनि सुरपुरिं करिति निवासा ॥

दो. :- अति पुनीत इतिहास हा कथित उमे वृषकेतु ॥
भरद्बाज ऐका दुजा रामजन्मिं जो हेतु ॥ १५२ ॥

मी इच्छामय नररुप घेऊन तुमच्या घरी प्रगट होईन ॥ १ ॥ बाबा ! अंशांसहित देह धारण करून भक्तांना सुख देणारे चरित्र करीन ॥ २ ॥ त्या चरित्रांचे जे कोणी अतिभाग्यवान लोक आदराने श्रवण करतील ते ममता व अहंता यांचा त्याग करून या संसारातून तरतील ॥ ३ ॥ ज्या आदिशक्तीने हे जग निर्माण केले ती ही माझी माया सुद्धा अवतार घेईल.॥ ४ ॥ मी तुमची इच्छा पूर्ण करीन, मी त्रिवार सांगतो की आमचा पण सत्य असतो ॥ ५ ॥ असे कृपासागर वारंवार म्हणाले व भगवान अंतर्धान झाले . ॥ ६ ॥ भक्तकृपालाचे स्मरण करीत ते दांपत्य काही काळ त्या आश्रमात राहीले ॥ ७ ॥ मग योग्य समयी अनायासाने देहत्याग करून ते दांपत्य सुरपुरीत अमरावतीत गेले व तेथे निवास केला. ॥ ८ ॥ वृषकेतूंनी उमेला सांगितलेला हा अतिपुनीत इतिहास आहे भरद्वाजा ! ( आता ) रामजन्माचा आणखी एक हेतू सांगतो तो ऐका. ॥ दो० १५२ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP