॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय २३ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

नाविक धावत उंच चढोनी । सांगे भरता भुज उचलोनी ॥
नाथ पहा विटपांस विशालां । पाकरि जंबु रसाल तमालां ॥
त्या तरुवरांमधें वट शोभित । मंजु विशाल बघुनि मन मोहित ॥
नील सघन पल्लव फल लालहि । सुखद दाट छाया त्रय कालहि ॥
जणुं किं तिमिर अरुणमय राशी । विधि रचि संकलुनी सुषमेसी ॥
सरिते सन्निध तरु हे स्वामी । रघुवर पर्णकुटीं तिथं नामी ॥
तुलसी तरुवर विविध सुलक्षण । रोपित सीतें कुठें हि लक्ष्मण ॥
वट छाये वेदिका विरचिली । सुंदर सीतेनें कर-कमलीं ॥

दो० :- बसुनि समुनिगण नित्य तिथं सीता राम सुजाण ॥
श्रवति कथा इतिहास सब आगम निगम पुराण ॥ २३७ ॥

इतक्यात नावाडी ( निषादराज) धावत धावत जाऊन उंच ठिकाणी चढला व हात वर करुन भरतास सांगू लागला की - ॥ १ ॥ नाथ ! त्या विशाल वृक्षांना पहा ! ते पहा – पिंपरी, जांभूळ, आंबा व तमालवृक्ष ॥ २ ॥ त्या श्रेष्ठ तरुंच्या मधोमध वड ( वट) शोभतो आहे तो पहा ! तो वड इतका सुंदर आहे की छाया अगदी गर्द असून तिन्ही ( सर्व) काळी सुखद आहे ॥ ४ ॥ जणू ब्रम्हदेवाने परम शोभेला एकत्र गोळा करुन तिमिर व अरुण यांनी भरलेली एक रासच रचली आहे ॥ ५ ॥ स्वामी ! हे वृक्ष नदीच्या जवळ असून तेथे स्वामी रघुवरांची सुंदर पर्णकुटी आहे ॥ ६ ॥ तिथे तुलसीचे सुंदर विविध तरु कुठे सीतेने लावले आहेत व कुठे लक्ष्मणाने लावले आहेत ॥ ७ ॥ वडाच्या छायेत सीतेने आपल्या करकमलांनी सुंदर वेदिका बनविली आहे ॥ ८ ॥ तिथे ( त्या वेदिकेवर) मुनिगणांसह सुजाण सीताराम ( नित्य) वेदशास्त्र पुराण इतिहास इत्यादी सर्व श्रवण करीत असतात ॥ दो० २३७ ॥

श्रवुनि सखावच विटप विलोकित । भरत विलोचनिं वारी वाहत ॥
प्रणति करित दो बंधु चालती । प्रीति वदत लाजते भारती ॥
हर्षति निरखत राम पदांका । जणूं लाभला परीस रंका ॥
रज शिरिं हृदया नयनां लावति । रघुवर भेटीसम सुख पावति ॥
बघुनि भरत गति अकथ अतीवहि । प्रेममग्न मृग खग जड जीवहि ॥
प्रेम विवश मित्रहि पथ भूले । वदुनि सुपथ सुर वर्षति फूलें ॥
बघुनि सिद्ध साधक अनुरागति । स्नेह सहज तो प्रशंसुं लागति ॥
भरत भाव भूतळीं नसता जर । कोण करत चर अचर, अचर चर ॥

दो० :- प्रेम अमृत मंदर विरह भरत पयोधि गभीर ॥
काढि मथुनि सुर साधु हित कृपासिंधु रघुवीर ॥ २३८ ॥

रामसख्याचे वचन ऐकून त्या वृक्षाकडे पाहताच भरताच्या विशाल लोचनांतून अश्रूंचे पूर वाहू लागले ॥ १ ॥ मग दोघे बंधू दंडवत घालीत जाऊ लागले त्या प्रीतीचे वर्णन करण्यास सरस्वतीला सुद्धा लाज वाटू लागली ॥ २ ॥ रामचंद्राच्या पावलांची चिन्हे बघत असता, ती दिसताच असा हर्ष होत आहे की जणू रंकाला परिसच सापडावा ॥ ३ ॥ त्या ( चरणचिन्हांतील) धूळ मस्तकावर ठेऊन हृदयाला व डोळ्यांना लावीत आहेत आणि रघुवरांच्या भेटीसारखे सुख पावत आहेत ॥ ४ ॥ अतिशयच अकथनीय – अनीर्वचनीय अशी ही भरताची प्रेमदशा पाहून पशु, पक्षी, व जड जिव सुद्धा प्रेममग्न झाले ॥ ५ ॥ प्रेमाला विशेष वश झाल्यामूळे मित्र सुद्धा रस्ता भुलला तेव्हा देवांनी योग्य मार्ग सांगून पुष्पवृष्टी केली ॥ ६ ॥ हे पाहून सिद्ध व साधक अनुरागयुक्त झाले ( त्यांच्यात रामानुराग उत्पन्न झाला) व ते त्या सहज स्नेहाची प्रशंसा करु लागले ॥ ७ ॥ की या पृथ्वीतलावर भरताचा जन्म व भाव जर नसता तर चरांना अचर व अचरांना चर कोणी केले असते ! ॥ ८ ॥ कृपासागर रघुवीरांनी साधुरुपी सुरांच्या हितासाठी भरतरुपी अगाध पयोनिधीचे विरहरुपी मंदर पर्वताचे मंथन करुन प्रेमरुपी अमृत काढले ॥ दो० २३८ ॥

सखा समेत मनोहर युगला । झाडिंत लक्ष्मण बघूं न शकला ॥
भरत बघे प्रभु आश्रम पावन । सकल सुमंगलसदन सुशोभन ॥
प्रविशत दुःख न दाव न राहे । जणुं योगी परमार्था लाहे ॥
दिसे प्रभुपुढें लक्ष्मण भरता । पुसतां अनुरागानें वदतां ॥
शिरीं जटा, कटिं मुनिपट बद्धहि । तून शर करीं स्कंधीं चापहि ॥
वेदीवर मुनि साधु समाज । सीते सह राजतइ तघुराज ॥
वल्कल वसन जटिल तनु शाम हि । जणुं मुनिवेष करुनि रति-काम हि ॥
करकमलीं धनु सायक फिरवित । हृज्ज्वर हरती हसुनी निरखित ॥

दो० :- लसति मंजु मुनि मंडला-मधें सिता रघुचंद ॥
ज्ञानसभें जणुं धृततनू भक्ति सच्चिदानंद ॥ २३९ ॥

रामसख्यासह या मनोहर जोडीला, ते झाडीत असल्यामुळे लक्ष्मण बघू शकला नाही ॥ १ ॥ सकल सुमंगलांचे सदन सुंदर व पावन असा प्रभूचा आश्रम भरतास दिसला ॥ २ ॥ जणू योग्याला परमार्थाची प्राप्ती व्हावी त्या प्रमाणेच त्या आश्रम – भूमीत प्रवेश करताच सर्व दु:ख व दावानल यांचा विनाश झाला ॥ ३ ॥ भरतास दिसले की प्रभुच्या पुढे लक्ष्मण बसलेले असून विचारलेल्या प्रश्र्नाचे उत्तर प्रेमाने देत आहेत ॥ ४ ॥ त्यांच्या मस्तकावर जटा बांधलेल्या असून कमरेला मुनीवस्त्रे व भाता बांधला आहे. हातात बाण व खांद्यावर धनुष्य आहे. ॥ ५ ॥ वेदिवर मुनी साधूंचा ( समाज) बसलेला असून सीतेसहित रघुराज विराजमान झालेले आहेत ॥ ६ ॥ ते वल्कल धारण केलेले, जटाधारी व शाम वर्णाचे आहेत ( त्यामुळे) असे वाटते की जणूं रति व काम ( मदन) यांनीच मनुष्य़ वेष घेतला आहे ॥ ७ ॥ रघुराज आपल्या कमलासारख्या हातात धनुष्य व बाण फिरवित फिरवीत असून हास्य करुन बघत हृदयांतील स्वर हरण करीत आहेत ॥ ८ ॥ वेदिवर मुनीमंडला मध्ये सीता आणि रघुवंशाला चंद्राप्रमाणे प्रसन्न करणारे राम जसे सुंदर विराजत आहेत की जणू ज्ञानसभेमध्ये भक्ती व सच्चिदानंद ( ब्रह्म) व शरीर धारण करुन बसली आहेत ॥ दो० २३९ ॥

सानुज सखासमेत मग्न मन । विस्मृत हर्षशोक सुखदुख गण ॥
पाहि नाथ ! प्रभु पाहि बोलले । छडीसमान महीवर पडले ॥
प्रेमळ वचना ओळखि लक्ष्मण । जाणे करत भरत कीं प्रणमन ॥
बंधूस्नेह सरस अति इकडे । सेवा प्रबल फार परि तिकडे ॥
भेटुं न उपेक्षणा करुं शकती । लक्ष्मण मन गति सुकवि सांगती ॥
राहि भार घालुनि सेवेवरि । उंच पतंग किं ओढि खेळकरि ॥
प्रेमें वदति नमुनि महिं माथा । ’प्रणमन भरत करत रघुनाथा !’ ॥
उठति राम तैं प्रेमाधीर हि । तूण कुठें पट कार्मुक तीर हि ॥

दो० :- बळें धरिति उठवुनि हृदयिं भरता कृपा निधान ॥
राम भरत भेटिस बघुनि सकल भुलति तनुभाव ॥ २४० ॥

धाकटा भाऊ व रामसखा यांसह भरताचे मन इतके मग्न झाले आहे की हर्ष, शोक, दु:ख इ. सर्व द्वंद्वांचा विसर पडला ॥ १ ॥ नाथ पाहि ! प्रभू पाहि ! असे म्हणाले व एखाद्या छडीसारखे भरत जमिनीवर पडले ॥ २ ॥ ते प्रेमळ वचन लक्ष्मणाने ओळखले व भरतच प्रणाम करीत आहेत हे जाणले ॥ ३ ॥ इकडे बंधूस्नेहाचा जोर अधिक आहे तर सेवेची प्रबलता तिकडे अधिक आहे ॥ ४ ॥ भेटताही येत नाही व उपेक्षाही करवत नाही, या लक्ष्मणाच्या मनाच्या दशेचे वर्णन सुकवी करतात ते असे ॥ ५ ॥ उंच चढलेल्या पतंगाला खेळाडू जसा खाली ओढतो तसे लक्ष्मण सेवेवर भार देऊन राहीले ॥ ६ ॥ जमिनीवर डोके टेकून नमन करुन लक्ष्मण म्हणाले की रघुनाथा ! भरत प्रणाम करत आहेत ॥ ७ ॥ ( हे कानी पडते न पडते तोच) राम प्रेमाने इतके अधीर होऊन उठले की भाता कुठे पडला, अंगावरचे वस्त्र कुठे पडले, कुठे ( उजव्या हातातला) बाण गळून पडला व कुठे धनुष्य पडले ( पण याची दाद नाही) ॥ ८ ॥ कृपानिधीने भरतास बळेच उचलून हृदयाशी कवटाळला राम व भरत यांची ही भेट पाहून ( पाहणारे देव, मुनी इ.) सर्वांचेच देहभान हरपले ॥ दो० २४० ॥

प्रीति भेटिची केविं वानणें । कविकुल अगम कर्म मन वचनें ॥
प्रेमें परम पूर्ण दो भाई । मन मति चित्त अहं ही जाई ॥
वदा प्रगट सुप्रेम कोण करि । कोण्या छाये कवि-मति अनुसारि ॥
कविस अर्थ अक्षर बल साचें । नट अनुतालगतिहि कीं नाचे ॥
स्नेह अगम रघुवर भरतांचा । स्पर्श न विधि हरि हर चित्तांचा ॥
तो मी कुमति कशापरिं वदणें । निघे सुराग किं हरळि तंतुनें ॥
बघुनी रघुवर भरत भेट कीं । सुरगण सभय, भरे उरिं धडकी ॥
सुरगुरु समजाविति, जड जागति । सुमन वर्षुनी प्रशंसुं लागति ॥

दो० :- राम रिपुघ्ना भेटती प्रेमें नावाड्यास ॥
प्रणमत लक्ष्मण भेटती भावें भरत तयास ॥ २४१ ॥

श्रीराम भरत भेटेची प्रीती कशी वर्णन करुन सांगणार ! ती तर कवी वर्गाच्या कर्म मन व वाcaaचा यांना अगम्य आहे. ॥ १ ॥ दोघे भाऊ बुद्धी, मन चित्त व अहंकार यांना विसरुन परम प्रेमाने परिपूर्ण झाले आहेत ॥ २ ॥ या अत्यंत प्रेमाला कोण बरें प्रगट करुं शकेल ते सांगा पाहूं ! कवीच्या बुद्धीने तर कोणत्या छायेचे अनुसरण करावे ? ॥ ३ ॥ कवीला केवळ अर्थ व अक्षरे ( शब्द) याचेच खरे बळ असते. नट नाचतो तो तालगतीला अनुसरुन नाचतो ॥ ४ ॥ रघुवरभरताचा स्नेह इतका अगम्य आहे की विधि, हरि, हर यांच्या चित्तांचा सुद्धा त्याला स्पर्श होऊं शकत नाही ॥ ५ ॥ तो स्नेह मी कुमति कशा प्रकारे वर्णन करु शकेन ? हरळीच्या ( गांठ्याळ दूर्वेच्या) तंतूने कधी सुंदर राग निघू ( वाजू) शकेल काय ? ॥ ६ ॥ श्रीरघुवर – भरत भेट पाहून सुरगणांच्या छातीत भयाने धडकी भरली ॥ ७ ॥ मग सुरगुरु बृहस्पतींनी समजावले तेव्हा ते जड ( मूर्ख) जागे झाले ( शुद्धीवर आले) व पुष्पवर्षाव करुन प्रशंसा करु लागले ॥ ८ ॥ नंतर राम प्रेमाने शत्रुघ्नास भेटले व नावाड्यास ( गूहास) ही भेटले लक्ष्मणाने प्रणाम करताच भरत त्यास प्रेमभावाने भेटले ॥ दो० २४१ ॥

लक्ष्मण हौसें अनुजा भेटति । निषादास मग हृदिं कवटाळति ॥
नम्ति भरत शत्रुघ्न मुनिगंआं । मुदित मिळुनि इष्टाशीर्वचनां ॥
सानुज भरत परम अनुरागां । शिरिं ग्धरि सीता चरण परागां ॥
कितिदां प्रणाम करतां उठवी । शिरिं करकमला ठेउनि बसवी ॥
सीता दे आशिस मनिं कांहीं । स्नेह मग्न तनुभाव न राही ॥
अनुकूला अति पाहुनि सीता । भीती स्वकल्पिता गत चिंता ॥
कुणि न कांहिं वदले कुणि कुणि पुसलें । प्रेमभरें मन गतिला मुकलें ॥
नावाडी त्या समयिं धीर धरि । कर जुळुनी प्रणमुनी विनति करि ॥

दो० :- नाथ ! साथ मुनिनाथ कीं माता सब पुरलोक ॥
सेवक सेनप सचिव, सब आले विकल वियोग ॥ २४२ ॥

लक्ष्मण हौसेने ( फार उत्कंठेने) आपल्या धाकट्या भावास भेटले व मग निषादास ( गुहास) आलिंगन दिले ॥ १ ॥ मग भरत व शत्रुघ्न यांनी सर्व मुनी समूहास नमस्कार केला व इष्ट आशीर्वाद मिळाल्याने प्रसन्न झाले ॥ २ ॥ मग अनुजासह भरताने परम अनुरागाने सीतेच्या चरणकमलांची धूळ आपल्या मस्तकी धारण केली ॥ ३ ॥ व कीतीक वेळां ( वारंवार) प्रणाम केला तेव्हा सीतेने त्यास उठवून आपला पद्महस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला व त्यांना खाली बसविले ॥ ४ ॥ सीतेने मनात काही आशीर्वाद दिले व इतकी स्नेहमग्न झाली की देहभानच विसरली ॥ ५ ॥ सीता आपल्याला अत्यंत अनुकूल आहे असे पाहून ( भरताच्या मनातील) स्वकल्पित भीती गेली व चिंता राहीली नाही ॥ ६ ॥ कोणी काही बोलत नाही की कोणी काही विचार पूस करीत नाही. प्रेमाच्या भरात मन आपल्या संकल्प विकल्प करण्याच्या गतीला मुकले आहे ॥ ७ ॥ अशा वेळी नावाडी धीर धरुन हात जोडून प्रणाम करुन विनंती करतो की ॥ ८ ॥ नाथ, मुनीनाथांच्या ( वसिष्ठांच्या) समवेत सर्व माता, सर्व पुरलोक, सेवक, सेनापती, सचिव वगैरे सर्व आपल्या वियोगाने व्याकूळ होऊन आले आहेत. ॥ दो० २४२ ॥

श्रवुनि शीलनिधि गुरु आगमना । सितेपासिं ठेउनि रिपुदमना ॥
चलति सवेग राम तात्काळहि । धीर धर्मधुर दीन दयाळ हि ॥
गुरुस बघुन सानुज अनुरागति । नमन दण्डवत् प्रभु करुं लागति ॥
मुनिवर धावुनि हृदयीं धरती । प्रेमभरें उभयांस भेटती ॥
पुलकित नाविक नामा वदला ॥ दुरुन दण्डवत् प्रणाम केला ॥
रामसख्या ऋषि बळें भेटले । प्रेम लुठत महिं जणुं आवरलें ॥
रघुपति भक्ति सुमंगल मूला । वानिति नभिं सुर वर्षति फूलां ॥
नसे नीच अति असा कुणि महीं । थोर न जगिं कुणि वसिष्ठ समही ॥

दो० :- बघत लक्षणाहुनि अधिक प्रेमें या मुनिराव ॥
भेटति; सीतापति भजन्निं प्रगट प्रताप प्रभाव ॥ २४३ ॥

श्रीरामांचे गुरु मातादिंना जाऊन भेटले
शीलसागराने गुरुजींचे आगमन ऐकले व शत्रुघ्नाला सीतेपाशी ठेऊन ॥ १ ॥ राम तत्काळ वेगाने चालू लागले, कारण ते धीर धर्म धुरीण आणि दीनदयाळ आहेत गुरुंस पाहताच अनुजासहित राम अनुरागाने भेटले व प्रभु असून दंडवत नमस्कार करु लागले तोच मुनीश्रेष्ठांनी धावत येऊन त्यांस प्रेमभराने हृदयाशी धरले व मग प्रेमभराने भरत व लक्ष्मण या उभयांस भेटले ॥ ४ ॥ तोच नावाड्याने प्रेमाने पुलकित होऊन आपले नांव सांगून त्यांस दुरुनच दंडवत प्रणाम केला ॥ ५ ॥ ऋषी रामसख्याला बलात्काराने असे भेटले की जणू जमिनीवर गडाबडा लोळत असलेले ( राम) प्रेमच आवरुन गोळा करुन घेतले ॥६॥ रघुपती भक्ती सुमंगलांचे मूळ आहे अशी प्रशंसा करुन देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली ॥ ७ ॥ ( व म्हणाले की) याच्या सारखा नीच पृथ्वीवर कोणी नाही आणि वसिष्ठांसारखा थोर जगात दुसरा कोणी नाही ॥ ८ ॥ असे असून याला बघतांच मुनीराज लक्ष्मणापेक्षा सुद्धा अधिक प्रेमाने ( गूहकास) भेटले ( हा केवळ) सीतापती भजनाचा ( भक्तीचा) प्रगट प्रताप व प्रभाव होय ! ॥ दो० २४३ ॥

आर्त लोक सब कळे सुजाणा । रामा करुणाकर भगवाना ॥
ज्या ज्या भावें जे अभिलाषिति । त्यांची रुची तशी तशि पुरविति ॥
सानुज सकलां पळांत भेटुन । दुःखद दाह दूर कृत दारुण ॥
हें महत्त्व रामा बहु नाहीं । रवि घटिं कोटि एक कीं राहिई ॥
भेटुनि गुहा परम अनुरागां । पुरजन वानिति सर्व सु-भागा ॥
रामा माता दुःखी दिसल्या । जणुं सुवेलि-अवली हिर्मि सुकल्या ॥
आधिं राम कैकईस भेटति । भावभक्ति ऋजुतें भिजविति मति ॥
पाया पडुनी तिजला सांत्विति । दोष काल विधि कर्मां लाविति ॥

दो० :- मातानां सब भेटले कृत सांत्वन परितोष ॥
अंब ईश्वराधीन जग द्यावा कुणा न दोष ॥ २४४ ॥

सर्व लोक अति दु:खी आहेत हे करुणाकर व सुजाण भगवान रामचंद्रांस कळले ॥ १ ॥ ज्या ज्या भावनेने ज्याची ज्याची भेटण्याची जशी जशी अभिलाषा होती त्यांची त्यांची रुची तशा तशा रीतीने प्रभुंनी पुरविली ॥ २ ॥ एका पळांत अनुजासह सर्वांना भेटून त्यांचा दु:खद दारुण दाह दूर केला. ( दूर केलेली वस्तू पुन्हा जवळ येऊ शकते !) ॥ ३ ॥ हा रामाचा काही विशेष मोठेपणा आहे असे नव्हे कारण की एकच सूर्य जसा कोटी घटांमध्ये एकाच वेळी राहतो – ( तसे प्रभु व्यापक आहेत) ॥ ४ ॥ पुरवासी गूहाला अत्यंत अनुरागाने भेटले आणि त्याच्या व आपल्या सुभाग्याची प्रशंसा करुं लागले ॥ ५ ॥ रामचंद्रांस माता अशा दु:खी दिसल्या की जणूं हिमाने सुंदर वेलींच्या पंक्ती सुकवून टाकल्या असाव्यात ॥ ६ ॥ आधी राम कैकेयीला भेटले आणि भावभक्तीने व सरळपणाने तिची बुद्धी भिजवून चिंब केली ॥ ७ ॥ पाया पडून व सर्व दोष काळ, कर्म व विधी यांच्या माथी मारुन तिचे सांत्वन केले ॥ ८ ॥ मग राम इतर सर्व मातांना भेटले व त्यांचे सांत्वन करून त्यांना परितुष्ट केल्या ( व म्हणाले की) मातांनो ! सर्व जग ईश्वराच्या अधीन आहे म्हणून कोणालाही दोष देऊं नये ॥ दो० २४४ ॥

गुरुपत्‍नी-पद बंधु वंदई । सहित सवें ज्या ब्राह्मणि असती ॥
गंगा गौरीसम सन्मानति । मुदित वचनिं मृदु आशिस् अर्पती ॥
बसले नमुनि सुमित्रे, अंकां । जणुं भेटे संपद् अति रंका ॥
पडति बंधु युग जननी पायां । प्रेमें व्याकुळ त्यांच्या काया ॥
प्रेमें अति अंवा हृदिं धरते । चक्षू स्नेहज सलिलिं न्हाणते ॥
त्या समयींचा हर्ष विषाद । वदवे कविस किं मूला स्वाद ॥
जननिस सानुज भेटति रघुपति । ’करा पदार्पण’ गुरुला विनवति ॥
पुरजन मुनीश आज्ञा पावुनि । उतरुं लागले स्थलजल पाहुनि ॥

दो० :- विप्र सचिव माता गुरु निवडक जन, घेतात ॥
रघुपति लक्ष्मण भरत शुचि आश्रमास जातात ॥ २४५ ॥

दोघा भावांनी गुरुपत्‍नीच्या पायांना व त्यांच्याबरोबर आलेल्या ब्राह्मणांच्या पायांना वंदन केले ॥ १ ॥ गंगा व गौरी प्रमाणे त्या सर्वांचा सन्मान केला व त्यांनी प्रसन्न होऊन गोड शब्दांनी आशीर्वाद दिले ॥ २ ॥ ( मग) सुमित्रेला नमस्कार करुन दोघे तिच्या मांडीवर बसले तेव्हा असे वाटले की जणूं रंकाला संपत्तीच भेटली ॥ ३ ॥ मग दोघे भाऊ कौसल्या जननीच्या पाया पडले तेव्हा त्यांचे देह परम प्रेमाने व्याकूळ झाले ॥ ४ ॥ कौसल्येने त्या दोघांस हृदयाशी धरले व नेत्रांतून स्नेहाने निघणार्‍या जलाच्या प्रवाहात त्यांना स्नान घातले ( न्हाणिले) ॥ ५ ॥ त्यावेळेचा हर्ष व विषाद कविला कसा सांगता येणार ! मुका saसंवाद सांगू शकेल काय ? ॥ ६ ॥ अनुजासह जननीला भेटून रघुराज गुरुजींना विनवितात की आश्रमास पाय लावावे ॥ ७ ॥ मुनीशांची आज्ञा होतांच पुरवासी लोक जागा व पाणी यांची सोय पाहून जिथे तिथे उतरुं लागले ॥ ८ ॥ ब्राह्मण, मंत्री, माता, गुरु, व निवडक लोक यांना बरोबर घेऊन रघुनाथ लक्ष्मण व भरत पावन आश्रमाकडे जाऊ लागले ॥ दो० २४५ ॥

ये सीता नमि मुनिवर चरणां । लभे उचित इष्टाशीर्वचना ॥
गुरुपत्‍नीस मुनिनारीं सहिता । भेटे प्रेम न येई वदतां ॥
पृथक् वंदि सीता सर्वांना । पावे प्रिय आशीर्वादांना ॥
भगे सासुनां सुकुमारी जैं । सीता भीता नेत्र मिटी तैं ॥
वधिक करीं पडल्या किं मराली । काय दैव ही करी कुचाळी ? ॥
त्या अति दुःखि, बघुनि सीतेतें । सहणें दैव साहवी जें तें ॥
जनकसुता मग धरते धीर । नील नलिन नयनीं ये नीर ॥
जाउन भेटे सकल सासुनां । तैं पृथ्वीवर पसरे करुणा ॥

दो० :- भेटे पाया पडुनि अति प्रेमें प्रत्येकीस ॥
चिर सौभाग्या भोगसी प्रेमें मनिं आशीस ॥ २४६ ॥

सीतेने पुढे येऊन मुनीवरांच्या पायांना नमस्कार केला व पाहीजे होता तो समयोचित आशीर्वाद तिला मिळाला ॥ १ ॥ ( नंतर) सीता मुनिस्त्रियांसहित गुरुपत्‍नीला अरुंधतीला भेटली, त्या वेळचे प्रेम सांगता येणे शक्य नाही ॥ २ ॥ सीतेने त्या सर्वांना पृथक पृथक ( व्यक्तिश:) नमस्कार केला आणि आवडीचे आशीर्वाद मिळाले ॥ ३ ॥ सीतेने जेव्हा सासवांना पाहिल्या तेव्हा ती सुकुमारी घाबरली व तिने आपले डोळे मिटले ॥ ४ ॥ ( तिला वाटले की) जणूं हंसिनी व्याधाच्याच हाती सापडल्या की काय ! ( व मनांत म्हणाली) दैवाने काय हा दुष्टपणा केला ! ॥ ५ ॥ सीतेला पाहून त्या ( सर्व सासवा) अति दु:खी झाल्या ( व मनांत म्हणाल्या की) दैव जे सोसायला लावील ते सोसलेच पाहीजे ॥ ६ ॥ मग जनकसुतेने धीर धरला ( पण) तिच्या नीलकमलासारख्या नेत्रांत पाणी आले ॥ ७ ॥ ( तरी) ती सगळ्या सासवांना जाऊन भेटली, त्यावेळी पृथ्वीवर करुणा पसरली ॥ ८ ॥ प्रत्येकीच्या जवळ जाऊन पाया पडून सीता प्रत्येक सासूला भेटली व अखंड सौभाग्य भोगशील असा आशीर्वाद त्यांनी प्रेमाने मनांत दिला ॥ दो० २४६ ॥

स्नेह विकल सीता सब राण्या । ज्ञानी गुरु त्या सांगति बसण्या ॥
सांगुनि जगगति मायिक मुनिवर । कथिति काहिं परमार्थ कथा वर ॥
नृप गमना सुर पुरास वदले । अति दुःखी रघुनाथ जाहले ॥
स्नेह निजहि मृतिकरण जाणति । धीर धुरंधर विकल होति अति ॥
परिसुनि कुलिश कठिण कटु भाषण । विलपति लक्ष्मण सिता राणिगण् ॥
लोक शोक विव्हळ अति सगळे । भूप मरण जणुं आजच घडलें ॥
पुनरपि रामा संत्विति मुनिवर । स्नाति जनांसह सरिते सुंदर ॥
प्रभु दिनिं त्या व्रत निर्जल करती । मुनिं वचनिंहि जल कुणि न सेवती ॥

दो० :- उदयीं रघुनंदना जशि आज्ञा देति मुनिश ॥
श्रद्धा भक्तीं आदरें सकल करिति जगदीश ॥ २४७ ॥

सीता आणि सर्व राण्या स्नेहाने व्याकुळ झाल्या आहेत ( असे पाहून) ज्ञानी गुरुंनी त्या सर्वांना बसण्यास सांगीतले ॥ १ ॥ जगाची गति ( सर्व व्यवहार, घडामोडी) मिथ्या मोहमूलक आहे असे म्हणून मुनीश्रेष्ठांनी काही उत्तम परमार्थाच्या कथा सांगितल्या ॥ २ ॥ नंतर दशरथराजाच्या अमरावतीस गमन करण्याची ( मृत्युची) हकीकत सांगितली ( ती ऐकून) रघुनाथांस अति दु:ख झाले ॥ ३ ॥ मरणाचे कारण आपला स्नेहच आहे हे जाणून धीरगंभीर राहून अति व्याकुळ झाले ॥ ४ ॥ ते अप्रिय ( कटु) व वज्रासारखे कठीण भाषण ऐकून लक्ष्मण, सीता व सर्व राण्या विलाप करुं लागल्या ॥ ५ ॥ सगळे लोक शोकाने अति व्याकुळ झाले ( तेव्हा वाटले की) राजाचे मरण जणूं आजच झाले आहे ॥ ६ ॥ नंतर मुनीवरांनी रामाचे सांत्वन केले नंतर सर्व मंडळींसह रामचंद्रांनी सुंदर सरितेत ( मंदाकिनीत) स्नान केले ॥ ७ ॥ त्या दिवशी प्रभूंनी निर्जल व्रत केले ( सर्वांनी असे व्रत करण्य़ाची आवश्यकता नाही असे) मुनींनी सांगीतले तरी सुद्धा कोणीही पाणी प्यायले नाहीत ॥ ८ ॥ उजाडल्यावर ( दुसर्‍या दिवशी) मुनीश्रेष्ठांनी रघुनंदनास जशी आज्ञा दिली तसे प्रभूंनी विश्वासयुक्त प्रेमादराने सर्व क्रिया कर्मांतर केले ॥ दो० २४७ ॥

क्रिया कृता जैशी श्रुति सरणी । तैं पुनीत पातक तम तरणी ॥
यस्य नाम पावक अघतूला । तत्स्मृति सकल सुमंगल मूला ॥
शुद्धि तया सज्जन मत ऐसें । तीर्थावाहन जंगें जैसें ॥
शुद्ध हौनी दिन दो क्रमले । राम गुरूंना प्रेमें वदले ॥
नाथ ! लोक सब दुःखी भारी । कंदमूल फल नीराहारी ॥
सानुज भरत सचिव मातांतें । बघतां मज पळ युगसम जातें ॥
सह समाज पुरिं बरें पदार्पण । नृप अमरावतिं येथें आपण ॥
बहुत कथित हें करुनि धृष्टते । स्वामी करतिल गमें इष्ट तें ॥

दो० :- धर्मसेतु करुणायतन कां न वदा असं राम ॥
घेति दुःखि जन दोन दिन सुखदर्शन विश्राम ॥ २४८ ॥

( पित्याची उत्तर) क्रिया वेदविधीने केली तेव्हा पातकरुपी अंधाराला सुर्यासारखे असणारे रामप्रभु पुनीत झाले ॥ १ ॥ ज्यांचे नांव पापरुपी कापसाला पावकाप्रमाणे आहे व त्याचे स्मरण सकल सुमंगलांचे मूळ आहे ॥ २ ॥ ते शुद्ध झाले ! ( या विषयी) सज्जनांचे मत असे आहे की शुद्ध होणे गंगेत तीर्थाचे आवाहन करण्यासारखे आहे ॥ ३ ॥ शुद्ध होऊन दोन दिवस गेल्यावर राम गुरुजींना प्रेमाने म्हणाले ( प्रथम संवाद राम – वसिष्ठ) ॥ ४ ॥ नाथ ! सर्व लोक फार दु:खी होत आहेत ( कारण तेथे) कंदमूळ फलाहारी किंवा जलाहारी झाले आहेत ॥ ५ ॥ अनुजासह भरत, सर्व सचिव आणि सर्व माता यांना पाहून मला एकेक पळ युगासारखे जात आहे तरी आपण सर्व समाजासह अयोध्येत पदार्पण करावे हे बरे ( असे मला वाटते) ॥ ७ ॥ उद्धटपणा करुन मी फार बोललो, तरी स्वामींना जे योग्य वाटेल ते स्वामी करतील.॥ ८ ॥ वसिष्ठ म्हणाले राम ! तुम्ही धर्मसेतु व करुणेचे माहेरघर आहांत तुम्ही असे कां बरे म्हणणार नाही ! पण सर्व लोक दु:खी आहेत आपल्या मुखाच्या दर्शनाने त्यांना दोन दिवस विश्राम घेऊं द्या ॥ दो० २४८ ॥

श्रवुनि रामवच सभय समाज । जणुं जलनिधिमधिं विकल जहाज ॥
श्रवुनि गुरुगिरा मंगल मूल । झाला जणूं मारुत अनुकूल ॥
स्नाती त्रिकाखिं पयपावन जळिं । जया बघत अघसंघ पळापळि ॥
मंगलमूर्ति नेत्रिं भर भरुनी । निरखित मुदित नमन कर-करुनि ॥
रामशैल वन बघण्या जाती । दुःख न जिथें सकल सुख हातीं ॥
निर्झर नीर सुधेसम वाहति । त्रिविध ताप हा त्रिविध सदागति ॥
विटप वेलि तृण अगणित जाती । पल्लव पुष्प फळें विविधा हीं ॥
सुंदर शिला सुखद तरुचाया । कोण्या वन-छवि ये वर्णाया ॥

दो० :- सरीं सरोरुह जलविहग कूजति गुंजति भृंग ॥
विगत-वैर विहरति विपिन्ं मृग बहुरंगी विहंग ॥ २४९ ॥

रामवचन ऐकून सर्व समाज असा घाबरुन गेला की जणू सागरात ( बुडण्याच्या भीतीने) जहाजच व्याकुळ झाले ॥ १ ॥ ( पण) गुरुजींचे मंगलमूल भाषण ऐकताच असे वाटले की, जो वारा प्राण घेणार होता तोच जणूं अनुकूल प्राणरक्षक झाला ॥ २ ॥ पयस्विनीच्या ( मंदाकिनीच्या) ज्या जळाला पाहताच पापसंघांची पळापळ होते त्या जळात लोक त्रिकाळ स्नान करतात ॥ ३ ॥ मंगलमूर्ती रामचंद्रांना आपल्या नेत्रांत वारंवार भरुन पुन:पुन्हा नमस्कार करुन आनंदाने निरखून पाहतात ॥ ४ ॥ मग जिथे कोणतेच दु:ख नाही व सर्व सुखच हाती येते अशा रामशैलास व रामवनास पाहण्यास लोक जातात ॥ ५ ॥ निर्झर वहात असून त्याचे पाणी अमृतासारखे आहे त्रिविध ताप हरणारा शीतल मंद सुगंधी वारा सदा वहात आहे. ॥ ६ ॥ वृक्ष, लता, तृण यांच्या अगणित जाती असून नाना प्रकारची पत्र, पुष्प फळे तेथे वनांत आहेत. ॥ ७ ॥ सुंदर व सुखदायक शीला विश्रांतीसाठी असून सुखदायक तरु व छाया आहे अशा वयाचे सौंदर्य कोणाला बरे वर्णन करता येईल ? ॥ ८ ॥ तलावात कमळे फुलली आहेत, जलपक्षी कूजन करीत आहेत, भुंगे गुंजारव करीत आहेत, आणि पशु व बहुरंगी पक्षी वैर विरहित होऊन वनांत विहार करीत आहेत. ॥ दो० २४९ ॥

कोळि किरात भिल्ल वनवासी । मध शुचि सुंदर रुचिर सुधासी ॥
भरुनी पर्णकुटीं बहु सुंदर । कंद मूल फल जुड्या हि अंकुर ॥
देति विनति नति सकलां करुनी । स्वाद नाम गुण भेड सांगुनी ॥
देति लोक बहु मोल, न घेती । रामशपथ, परतवीत देती ॥
स्नेह मग्न मृदु वचनें म्हणती । प्रेम ओळख्नि साधु मानती ॥
आम्हि नीच, अति सुकृती आपण । रामकृपेनें घडलें दर्शन ॥
अम्हां सुदुर्लभ अपलें दर्शन । जशि मरु धरणिं देवधुनि पावन ॥
रामकृपाळु निषाद दयाघन । प्रजा असाविराजसम, परिजन ॥

दो० :- म्हणुनी स्नेहा बघुनि, व्हा विण संकोच कृपाल ॥
आम्हां करण्या कृतार्थ किं फलतृण अंकुर घ्याल ॥ २५० ॥

कोळी, कातकरी, भिल्ल वगैरे वनवासी लोक पवित्र सुंदर व अमृतासारखा चविष्ट मध पानांच्या द्रोणांत, पुष्कळ भरलेली कंदमूळ फळे व अंकुरांच्या जुड्या सर्वांना विनंती व नमस्कार करुन देत आहेत आणि स्वाद, नावे व गुण यांचे भेद सांगत आहेत ॥ ३ ॥ लोक पुष्कळ मोल देऊ लागले पण ते घेईनात व दिलेले पदार्थ परत करु लागले की त्यांना राम – शपथ घालू लागले ॥ ४ ॥ स्नेहमग्न होऊन मृदु वाणीने म्हणाले की साधु प्रेम ओळखून सेवा मान्य करतात ॥ ५ ॥ आम्ही अति नीच व आपण अति पुण्यवान आहांत पण रामकृपेनेच आम्हांला आपले दर्शन घडले ॥ ६ ॥ नाहीतर मारवाड देशात देवनदीचा पावन प्रवाह तसेच आपले दर्शन आम्हाला अति दुर्लभ ! ॥ ७ ॥ पण कृपालु रामचंद्र निषादांचे दयाघन बनले परिजन आणि प्रजा राजासारखीच असावी असणे जरुर आहे ॥ ८ ॥ म्हणून ( हे जाणून) आपण संकोच न करता आमच्या स्नेहाकडे पाहून कृपाळू व्हा व आम्हाला कृतार्थ करण्यासाठी फल, अंकुर, इ. गवताची जी काडी देऊं ती ही आपण ( गोड मानून) घ्यावी ॥ दो० २५० ॥

प्रिय पाहुणे तुम्हीं वनिं आला । सेवे योग्य न भाग्य अम्हांला ।
द्यावें काय तुम्हां जी ! स्वामी ! इंधन पत्र मित्र तों आम्ही ॥
ही अमची अति मोठी सेवा । वस्त्र पात्र कीं चोरुं न देवा ! ॥
अम्हिं जड जीव जीव-गण घती । कुटिल कुचाली कुमति कुजाई ॥
पाप करत रात्री दिन जात हि । नहिं कटिं पट नहि खांचा भरतहि ॥
स्वप्नीं कधिं कोणा रुचि धर्मा । हा रघुनंदन दर्शन महिमा ॥
जिथुनी प्रभुपदपद्म पाहिलें । दुःसह दुःख न दोष राहिले ॥
श्रवन वचन पुरजन अनुरागति । त्यांचे भाग्या वानूं लागति ॥

छं० :- स्तवुं भाग्य लागति सकल वचनें सानुरागें सांगती ॥
ती रीति सीतारामचरणीं स्नेह बघुनि सुखावती ॥
स्नेहास निज नर नारि निंदिति ऐकुनी भिल्लिणि गिरे ॥
तुलसी कृपा रघुवंशमणिची लोह घे पेट्या तरे ॥ १ ॥
सो० :- चहुदिशिं वनिं फिरतात प्रमुदित अनुदिन लोक सब ॥
जसे पीन होतात प्रथम पाउसीं शिखि प्लव ॥ २५१ ॥

तुम्ही प्रिय पाहूणे वनांत आलांत पण तुमची सेवा करण्या योग्य असे भाग्य-वैभव आमच्याजवळ कुठले ? ॥ १ ॥ स्वामी ! आम्ही आपल्याला काय देणार ? ( जे आमच्याजवळ असेल ते) आम्ही किरात सरपण, व पानांचे सोबती ! ॥ २ ॥ तुमची वस्त्रे व भांडी चोरत नाही हीच देवा ! आमची मौठी सेवा आहे ! ॥ ३ ॥ जीवगणांचा घात करणारे आम्ही जड – मूढ प्राणी स्वभावाने कुटील, वाईट चालीचे दुर्बुद्धि व जातीने नीच ॥ ४ ॥ पाप करण्यात रात्रीच जातात असे नव्हे तर दिवससुद्धा त्यातच जातात कमरेला चांगले वस्त्र नाही की पोटाच्या खाचा भरत नाहीत ॥ ५ ॥ ( त्या मुळे) धर्माची आवड कधी कोणाला स्वप्नांतही नाही ! पण हा केवळ रघुनन्दनाच्या दर्शनाचा महिमा, प्रभाव आहे ॥ ६ ॥ जेव्हा पासून प्रभूच्या चरण कमलांचे दर्शन झाले, तेव्हापासून दु:सह दु:ख दोष इ. काही शिल्लक राहीले नाही ॥ ७ ॥ हे बोलणे ( भाषण) ऐकताच पुरवासी त्यांच्यावर अनुरक्त झाले व त्यांच्या भाग्याची प्रशंसा करु लागले ॥ ८ ॥ सगळे लोक कोळी भिल्लांच्या भाग्याची प्रशंसा करु लागले व अनुरागाने परस्परांस सांगू लागले त्यांची ती बोलण्याची रीत व सीतारामचरणीं स्नेह पाहून सर्वाना सुख झाले. कोळी, भिल्लीणींची ती भाषा ऐकून स्त्रिया व पुरुष आपल्या स्नेहाची निंदा करु लागले तुलसीदास म्हणतात ही रघुवंशमणी रामाची कृपा की लोखंड भोपळ्याच्या पेट्या ( आपल्या पृष्ठभागावर) घेऊन तरत आहे ॥ छंद ॥ पहिल्या पावसाने जसे मोर व बेडूक पुष्ट होऊन विहार करतात तसेच याप्रमाणे सर्व लोक दररोज मोठ्या आनंदाने वनात चोहोंकडे विहार करुं लागले ॥ दो० २५१ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP