॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ३० वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

नाथ! शंभु-धनु-भंजन जो करि । कुणि असेल अपला सेवेकरि ॥
आज्ञा काय कां न मज सांगा । तैं क्रोधी मुनि वदले रागां ॥
सेवक तोच किं जो सेवा करि । युद्ध करावें करि अरिकृति जरि ॥
बघा राम जो शिवधनुभंजक । सम सहस्रबाहू रिपु मामक ॥
व्हावें तेणें नृपां-वेगळे । ना तर सब नृप जाति मारले ॥
ऐकुनि मुनिवच लक्ष्मण सस्मित । वदले परशुधरा अपमानित ॥
बाल्यिं धनुकल्या भग्न कितीतरि । स्वामि न रुष्ट असे कधिंही परि ॥
या धनुवर कां विशेष ममता । वदति कुपित भृगुनाथ परिसतां ॥

दो० :- रे नृपबालक कालवश वदसी विना विचार ॥
धनुकलि सम किं पुरारि-धनु, जाणे सब संसार ॥ २७१ ॥

परशुराम - राम - लक्ष्मण संवाद -- एक विनोदी प्रहसन प्रकरण -
नाथ ! ज्याने शंभूधनुष्याचा भंग केला तो आपला कोणी सेवेकरीच असणार ॥ १ ॥ (आपली) काय आज्ञा आहे, मला का सांगत नाही ? तेव्हा (हे ऐकून) क्रोधी मुनी रागारागाने म्हणाले ॥ २ ॥ जो सेवा करतो तोच सेवक, शत्रूची कृती करणारा असेल, त्याने युद्ध करावे . ॥ ३ ॥ राम ! हे बघा की ज्याने शिवधनुष्याचा भंग केला तो सहस्त्रबाहू सारखा माझा शत्रू आहे ॥ ४ ॥ त्याने या नृपांतून वेगळे व्हावे, बाहेर निघावे नाहीतर सगळेच राजे मारले जातील ॥ ५ ॥ (भार्गव) मुनीचे भाषण ऐकून लक्ष्मणाने स्मित केले व परशुधराचा अपमान करीत म्हणाले ॥ ६ ॥ स्वामी ! लहानपणी आम्ही अशा किती तरी धनुकल्या मोडल्या पण तेव्हा आपण असे कधी रुष्ट झाला नाहीत ॥ ७ ॥ मग या धनुष्यावरच इतकी विशेष ममता का बरे ? की ते मोडल्यामुळे आपणास एवढा क्रोध यावा ! हे ऐकून भृगुकुल क्रुद्ध होऊन म्हणाले - अरे राजपुत्रा, तू कालवश झालेला दिसतोस म्हणून (असा) विचार केल्याशिवाय बोलतोस, त्रिपुरारींचे धनुष्य काय धनुकलीसारखे आहे ? ते कसे होते हे सर्व जगाला माहीत आहे, समजलास ? ॥ दो० २७१ ॥

लक्ष्मण हसुनि वदति अम्हिं जाणूं । ऐका देव समान सब धनू ॥
का क्षतिलाभ जीर्ण धनु तुटलें । चुकुन नवें रामास भासले ॥
तुटलें स्पर्शत रघुपति दोष न । मुने करां कां कोप अकारण ॥
वदले परशुकडे अवलोकित । शठ रे! स्वभाव मम नहि माहित ॥
वधतो ना तुज बालक समजुनि । कीं केवळ जड समजसि मज मुनि ॥
बालब्रह्मचारि अति कोपक । विश्वविदित नृपकुल-विद्रोहक ॥
भूमि भुजबळें अभूप केली । विपुलवार भूदेवां दिधली ॥
दशशतभुज-भुज-छेदक तो हा । भूप-कुमारा परशु मम पहा ॥

दो० :- मायबाप शोकांबुधीं लोट न महिपकिशोर ॥
गर्भार्भक-निर्दालक परशु महा मम घोर ॥ २७२ ॥

लक्ष्मण हसून म्हणाले की देव ! ऐका (तर खरे) सगळी धनुष्ये सारखी असे आम्ही जाणतो आम्हास माहीत आहे ॥ १ ॥ जीर्ण झालेले धनुष्य मोडले म्हणून त्यात हानी काय व लाभ काय ? रामाला ते चुकून नव्या धनुष्यासारखे दिसले ॥ २ ॥ स्पर्श केल्याबरोबर ते मोडले, म्हणून रघुपतीचा त्यात काही दोष नाही. मुनी महाराज ! विनाकारण कोप का बरे करतां ? ॥ ३ ॥ परशुकडे पहात मुनी म्हणाले की रे शठा ! माझा स्वभाव तुला माहीत नाही काय ? ॥ ४ ॥ तुझा वधच केला असता पण बालक आहेस म्हणून करीत नाही. तू मला नुसता मूर्ख मुनी समजतोस काय ? ॥ ५ ॥ मी बाल ब्रह्मचारी असून अति कोपिष्ट आहे व क्षत्रिय कुळांचा विद्रोह करणारा आहे हे विश्वात प्रसिद्ध आहे ॥ ६ ॥ तो इतका की मी स्वत:च्या बाहुबलाने सर्व भूमी भूपविहिन करून अनेक वेळा ती विप्रांना दान दिली ॥ ७ ॥ अरे, राजकुमारा ! जो सहस्त्रबाहूच्या बाहूंना तोडून टाकणारा तोच हा माझा परशु पहा ॥ ८ ॥ अरे, राजाच्या पोरा ! कार्ट्या ! आई बापांना शोक सागरात ढकलू नकोस, (कारण) गर्भातील अर्भकांचा नि:पात करणारा हा माझा परशु महाभयंकर आहे ॥ दो० २७२ ॥

लक्ष्मण मृदु वदतात विहसुनी । अहो मुनीश! महाभटमानी ॥
मज कुर्‍हाड कितिदां दाखवितां । फुंकुनि उडवुं पहाड किं बघतां ॥
अति लघु डांगर इथें न कोणी । जो किं मरे तर्जनी बघोनी ॥
बघुनि कुठार-शरासन-बाणां । वदलो कांहि सहित अभिमाना ॥
भृगुसुत कळुनि जानवें पाहुनि । सोशिल बोलां तें रुष दाबुनि ॥
धरणी-सुर सुर सुरभी हरिजन । यांवरिं अमचें कुळिं न शूरपण ॥
वधें पाप अपकीर्ति हारतां । पाया पडुं ही तुम्हीं मारतां ॥
कोटी कुलिश सम शब्दां धारा । वृथा धरा धनुबाण कुठारां ॥

दो० :- त्यां पाहुनि अनुचित कथित क्षमा महामुनि धीर ॥
श्रवुनि रुष्ट भृगुवंशमणि वदले गिरा गभीर ॥ २७३ ॥

खदखदा हसून लक्ष्मण हलक्या आवाजाने म्हणाले की अहो मुनीश ! अहो महा भटमानी ! मला कुर्‍हाड किती वेळां दाखवता ? फुंकर मारुन पहाड उडवण्याची का आपली इच्छा आहे ? ॥ १-२ ॥ इथे अगदी कोणी कोवळा भोपळा नाही की जो तर्जनी पाहून सुकून मरून जाईल. ॥ ३ ॥ कुठार, धनुष्य व बाण पाहून मी काही अभिमानाने बोललो ॥ ४ ॥ आपण भृगुवंशातले आहांत हे जाणून व तुमच्या जानव्याकडे पाहून मी तुम्ही जे काही बोलाल ते रोष दाबून (कसेतरी) सोशीन ॥ ५ ॥ कारण की आमच्या कुळात ब्राम्हण, धरणी, देव व गाई व हरिभक्त यांच्यावर (आम्ही) आपला शूरपणा गाजवीत नाही ॥ ६ ॥ कारण की याना आम्ही ठार मारले तर पाप लागणार व आम्ही हारलो तर अपकीर्ती होणार म्हणून तुम्ही आम्हाला मारलेत तरी आम्ही तुमच्या पायाच पडणार (तो आमचा धर्म आहे) ॥ ७ ॥ तुमच्या शब्दांची धार कोटी वज्रासारखी असता तुम्ही धनुष्यबाण व कुर्‍हाड व्यर्थ धारण केली आहेत. ॥ ८ ॥ (धनुष्य, बाण कुठारादिकांना) पाहून मी अनुचित बोललो. ते आपण धीर महामुनी असल्याने क्षमा करावे हे ऐकून भृगुवंश शिरोमणी रुष्ट होऊन गंभीर वाणीने म्हणाले ॥ दो० २७३ ॥

कौशिक पहा मंदा हा बालक । कुटिल कालवश निजकुल-घातक ॥
भानुवंश राकेश कलंकू । निपट निरंकुश अबुध अशंकू ॥
काल कवल होई क्षणिं काहीं । स्पष्ट बजावुं दोष मज नाहीं ॥
गमे जगावा तर किं हटकणें । अमचा प्रताप बल रुष वदणें ॥
लक्ष्मण म्हणति सुयश तुमचें मुनि । तुम्हिं असतां कीं वर्णुं शके कुणि ॥
निजकरणी निजमुखें चि आपण । बहुवेळां वर्णित विविधा; पण ॥
जर संतोष न, आणिक वदणें । दुःसह दुख, न गिळुनि रुष, सहणें ॥
तुम्हिं अक्षोभ धीर वीरव्रत । देतां गाळि न अपणां शोभत ॥

दो० :- शूर समरिं करणी करिति स्वयें न कधिं वदताति ॥
विद्यमान अति बघुनि रणिं भित्रे प्रताप गाति ॥ २७४ ॥

कौशिका, पहा तर खरा हा बालक किती मूर्ख आहे ! हा कुटिल कालवश झाला असून स्वत:च्या कुळाचा घात करणारा आहे ॥ १ ॥ भानुवंशरुपी पौर्णिमेच्या चंद्राला कलंक आहे अत्यंत उच्छृंखल अडाणी व निशंक आहे ॥ २ ॥ काही क्षणात हा काळाच्या मुखात जाणार म्हणून स्पष्ट बजावून ठेवतो की मग दोष माझ्याकडे नाही ॥ ३ ॥ तो जगावा असे तुम्हास वाटत असेल तर त्यास आमचा प्रताप बल व रोष सांगून हटका ॥ ४ ॥ लक्ष्मण म्हणाले की मुनी तुम्ही स्वत: असता तुमचे सुयश कोण वर्णूं शकेल ? ॥ ५ ॥ आपण आपल्या मुखाने स्वत:ची करणी अनेक वेळ विविध प्रकारांनी वर्णन केलीच आहे पण ॥ ६ ॥ तेवढ्याने जर संतोष वाटत नसेल तर आणखी सांगावी की रोष गिळून दु:सह दु:ख सहन करु नये ॥ ७ ॥ आपण धीर, क्षोभहीन, वीर व्रत धारण केलेले आहात (खरे) , परंतु शिव्या देणे काही आपल्याला शोभत नाही ॥ ८ ॥ शूर असतात ते रणांगणात करणी करुन दाखवतात, आपण स्वत:च (स्वत:चे) कधी वर्णन करीत नाहीत शत्रु रणांगणात समोर उभा असता भ्याड असतात तेच आपला प्रताप गात सुटतात. ॥ दो० २७४ ॥

तुम्हिं तर आणा काळा हाकुनि । घडि घडि मजलागीं बोलावुनि ॥
ऐकुनि लक्ष्मण-गिरा कठोरा । धृत करिं परशुस घासुनि घोरा ॥
द्या न दोष मज अतां लोक हो! । वधा योग्य कटुवादि तोक हो! ॥
बाल बघुनि बहु मी वाचवला । आतां निश्चित मुमूर्षु बनला ॥
क्षमा, म्हणति कौशिक, अपराधू । बाल दोष गुण गणति न साधू ॥
करिं कुठार अकरुण मी क्रोधी । पुढें गुरुद्रोही अपराधी ॥
सोडूं, मारुं न, देतां उत्तर । कौशिक केवल शीलें तव बंर! ॥
न तर कुठारें घोर, कापतों । अश्रम गुरुआनृण्य पावतों ॥

दो० :- हसुनि गाधिसुत मनिं वदति मुनिमनिं हिरवळ रान ॥
आयस खङ्ग, न सितामय नुमजें अझुनि अजाण ॥ २७५ ॥

तुम्ही (जणूं) काळाला हाकून आणला व माझ्यासाठी घडोघडी त्याला बोलावता ॥ १ ॥ लक्ष्मणांची ही कठोर भाषा ऐकून घोर परशुला घासून हातात घेतला ॥ २ ॥ (व म्हणाले की) लोकहो, आता मला दोष देऊ नका, हा कटु बोलणारा बालक वध करण्यास योग्य आहे हो ! ॥ ३ ॥ बाळ आहे असे समजून मी आतापर्यंत याला पुष्कळ वाचवला पण आता मात्र हा आसन्नमरण झाला आहे; हे निश्चित ॥ ४ ॥ कौशिक म्हणाले की, अपराध क्षमा करावा कारण की बालकांच्या दोषांकडे किंवा गुणांकडे साधू कधी लक्ष देत नाहीत. ॥ ५ ॥ कौशिक ! माझ्या हातात परशु आहे मी निर्दय व क्रोधी आहे आणि समोर गुरुद्रोही अपराधी आहे ! ॥ ६ ॥ तो उत्तरे देत असून त्याला न मारता सोडतो. हे कौशिका ! केवळ तुमच्या शीलाकडे पाहून बरं ! ॥ ७ ॥ नाहीतर या घोर कुठाराने याला कापला असता, व जरा सुद्धां श्रम न पडता गुरुऋणातून मोकळा झालो असतो. ॥ ८ ॥ गाधिराज पुत्र - विश्वामित्र मनात हसून म्हणतात या मुनीच्या मनाला हिरवे रानच जिकडे तिकडे दिसते आहे, हे खड्ग (लक्ष्मण) साखरेचे नसून पोलादाचे आहे, हे या अडाण्याला अजून कसे समजत नाही ? ॥दो०२७५ ॥

लक्ष्मण म्हणति शील मुनि अपलें । विश्वविदित, कोणा ना कळलें ? ॥
जननिजनक-रिण भलें फेडलें । गुरु-रिण राहि फार मनिं सललें ॥
तें पतिवर अमच्या किं काढलें । व्याज बहू दिन जात वाढलें ॥
घ्या आतां धनको बोलावुनि । शीघ्र देत मी थैली खोलुनि ॥
श्रुत कटुवचन कुठार उगारति । हाय! हाय! सब जन उद्‌गारति ॥
मला दावितां कुठार भृगुवर! । विप्र म्हणुनि तजुं नृपद्रोहि! बरं ॥
सुभट न कधिं रणिं भेटे गाढा । द्विजदेवा! तुम्हिं घरांत वाढा ॥
'अनुचित' असें सकल उच्चारिति । खुणें लक्ष्मणा रघुपति वारिति ॥

दो० :- लक्ष्मण-वचनाहुतीस्तव भृगुवर-कोप कृशानु ॥
भडकत पाहुनि वदति वच जलसम रघुकुलभानु ॥ २७६ ॥

लक्ष्मण म्हणाले की मुनी महाराज ! आपले शील कोणाला नाही कळले ? सर्व जगालाच माहीत आहे ॥ १ ॥ की आपण आई - बापाचे ऋण चांगले फेडलेत, आता राहीले आहे गुरुचे ऋण, ते मनात फार बोचते आहे ॥ २ ॥ ते जणूं आमच्या पतीवर (आम्हाला जामीन ठेऊन) काढलेले दिसते शिवाय पुष्कळ काळ निघून गेल्याने व्याज सुद्धा पुष्कळ वाढले असेलच ॥ ३ ॥ तरी आत्ता या क्षणी आपला कोण सावकार असेल त्याला बोलावून घ्या मी (एकटाच) अगदी वेळ न लावता पैशांची थैली सोडतो (त्यांचे ऋण सव्याज देऊन टाकतो, मग झाले नां ?) ॥ ४ ॥ लक्ष्मणाचे कटु भाषण ऐकले मात्र आणि भृगुपतींनी परशु उगारला (त्या बरोबर) सर्व लोकांनी हाय हाय असे उदगार काढले ॥ ५ ॥ पण लक्ष्मण खवळून म्हणतात, भृगुश्रेष्ठा ! मला परशु दाखवता काय ? नृपद्रोही कुठले ! ब्राम्हण समजून तुम्हाला वाचवतो, बरं कां ! ॥ ६ ॥ आजपर्यत कोणी गाढा सुवीर आपल्याला रणांगणात भेटला नाही (म्हणून चढलात होय) आपण द्विज देव आहात घरातच वाढलेले ॥ ७ ॥ (हे ऐकताच) असे बोलणे अनुचित आहे असे सगळे लोक मोठ्याने म्हणाले तेव्हा रघुपतींनी (केवळ) खुणेने लक्ष्मणास परावृत्त केले ॥ ८ ॥ लक्ष्मणाच्या भाषण रुपी आहुतींनी भृगुवराचा क्रोधरुपी कृशानु भडकत चाललेला पाहून रघुकुलभानु (राम) जलासारखे (शीतल व अग्निशामक) भाषण करतात. ॥ दो० २७६ ॥

नाथ ! कृपा बाळावर करणें । शुद्ध दुग्धमुख कोप न धरणें ॥
प्रभु-प्रभावा जर किं जाणता । तर किं बरोबरि अजाण करता ॥
बाल कांहिं जरि खोड्या करती । गुरु-पितृ-माता मनिं मुद भरती ॥
करा कृपा शिशु सेवक समजुनि । ज्ञानि धीर तुम्हिं सुशील सम मुनि ॥
रामवचनिं कांहींसे निवले । वदुनि कांहिं लक्ष्मण मृदु हसले ॥
हसत बघुनि नखशिख रुट् व्यापी । राम तुझा भ्राता अति पापी ॥
गौर शरीरें श्याम मनां ही । कालकूट-मुख, पयमुख नाहीं ॥
सहज वक्र अनुसरे न तुजला । नीच, मृत्युसमय मानि न मजला ॥

दो० :- लक्ष्मण वदले हसुनि मुनि! क्रोध असे अघमूल ॥
यद्वशजन अनुचित करति चरति जगा प्रतिकूल ॥ २७७ ॥

नाथ ! बालकावर कृपा करावी तो अगदी शुद्ध आहे ओठ पिळले तर दूध निघेल, असा लहान कोमल आहे आपण त्याच्यावर नका हो रागावूं ! ॥ १ ॥ प्रभूचा प्रभाव जर त्याने जाणला असता तर तो अजाण काय आपली बरोबरी करता ? ॥ २ ॥ बालकांनी जरी काही खोड्या केल्या तरी गुरु, पिता, माता यांच्या मनात आनंदाला भरती येते ॥ ३ ॥ याला आपला शिशु व सेवक समजून आपण याच्यावर कृपा करावी आपण ज्ञानी, धीर, सुशील, समदर्शी व मुनी आहात ॥ ४ ॥ रामचंद्रांच्या वचनाने (भृगुपती) थोडेसे शांत झाले. इतक्यात लक्ष्मण काहीतरी बोलले व त्यांनी स्मित हास्य केले ॥ ५ ॥ हसताना पाहून रोषाने भृगुपतींना (पुन्हा) रोषाने नखशिखांत व्यापले (ते म्हणाले की) रामा ! तुझा भाऊ मोठा पापी आहे ॥ ६ ॥ शरीराने गोरा पण मनाने काळा आहे आणि दुग्ध मुख नसून अगदी कालकूट (विषमुखी) आहे ॥ ७ ॥ स्वभावत:च कुटिल आहे, तुझे अनुकरण करणारा नाही. (तुला भाऊ म्हणून शोभत नाही) आणि तो नीच मला मृत्युसारखा समजत नाही ॥ ८ ॥ लक्ष्मण हसून म्हणाले, की मुनी महाराज ऐका, क्रोध हा पापाचे मूळ आहे याला वश झाल्याने लोक अनुचित (कर्मे) करतात व जगाच्या विरुद्ध आचरण करतात ॥ दो० २७७ ॥

मी तुमचा अनुचर मुनि राया । त्यजुनि कोप व्हा सदय अतां या ॥
धनु तुटलें रोषें नहि जुळतें । बसा, दुखत कीं पद असतिल ते ॥
प्रिय जर अति तर करूं उपाया । अति गुणि आणुं सांगुं सांधाया ॥
सभय जनक लक्ष्ण वदतां ही । गप्प बसा अनुचित बरं नाहीं ॥
कांपति थरथर पुर-नर-नारी । लघु कुमार खोटा अति भारी ॥
भृगुपति ऐकत निर्भय वाणी । रुष तनु दाही होइ बलहानी ॥
सांगति रामा उपकृति दावुनि । वाचवुं तुझा बंधु लघु जाणुनि ॥
मन मलीन तन सुंदर केवीं । विषरसपूर्ण कनक-घट जेवीं ॥

दो० :- परिसुनि लक्ष्मण विहसले नेत्र वटारिति राम ॥
गुरु समीप गत लाजुनी वारुनि वाणी वाम ॥ २७८ ॥

मुनिराज ! मी तुमचा सेवक आहे (म्हणून) आता क्रोध टाकून देऊन या दासावर दया करा. ॥ १ ॥ मोडलेले धनुष्य काही क्रोधाने जुळत नाही, आपले पाय दुखत असतील तरी आता बसावे की ॥ २ ॥ धनुष्य जर आपल्याला फारच प्रिय असेल तर उपाय करु या कोणी अत्यंत गुणी कारागीर आणूं आणि सांधण्यास सांगू म्हणजे झाले. ॥ ३ ॥ लक्ष्मणाच्या या बोलण्याने जनक सुद्धा भयभीत झाले (व म्हणाले की), गप्प बसावे असे अनुचित बोलणे बरे नाही ॥ ४ ॥ नगरातील सर्व स्त्री - पुरुष थरथर कापू लागले (व आपसात म्हणतात की) हा छोटा कुमार अति वात्रट आहे ॥ ५ ॥ ते निर्भर बेडर भाषण ऐकता ऐकता क्रोध भृगुपतींच्या तनूला भाजू लागला व शक्ती क्षीण झाली ॥ ६ ॥ तेव्हा रामावर उपकार करण्याचा आव आणून म्हणतात की हा तुझा धाकटा भाऊ आहे, हे मनात आणून याला वाचवितो (नाहीतर एक क्षणभर जिवंत ठेवला नसता) ॥ ७ ॥ मनाने मलीन असून शरीराने असा सुंदर आहे की जणू विषाने पूर्ण भरलेला सोन्याचा कलशच ! ॥ ८ ॥ (भृगुपतीचे भाषण) ऐकून लक्ष्मण खदखदा हसले (तेव्हा मात्र) रामचंद्रानी डोळे वटारले. मग वाकडे बोलण्याचे रहित करुन लज्जित होऊन लक्ष्मण गुरुसमीप गेले. ॥ दो०२७८ ॥

अति विनीत मृदु शीतल वाणी । वदले राम जुळुनि युग पाणी ॥
सहज सुजाण नाथ! ऐकावें । बाल-बोल ना कानीं घ्यावें ॥
गांधिल बालक सम-स्वभावहि । त्यांस संत डिवचीत कधीं नहि ॥
बिघडवि कांहि न तो कार्याला । अपराधी मी नाथ! आपला ॥
कृपा कोप वध बंधन मजला । करणें स्वामी! निज दासाला ॥
वदा काय करुं झट् रुष जाया । मुनि नायक त्या करिन उपाया ॥
राम! म्हणति मुनि जाइ रुष कसा । अझुन अनुज तव बघे वक्रसा ॥
कंठस्नान न यास घातलें । तरी मी क्रोधें काय साधलें ॥

दो० :- स्त्रवति गर्भ अवनिप-रमणी श्रवुनि परशुगति घोर ॥
परशु असून जिवंत बघुं वैरी भूप-किशोर ॥ २७९ ॥

अत्यंत नम्र, मृदु व शीतल अशा वाणीने दोन्ही हात जोडून रामचंद्र बोलू लागले ॥ १ ॥ नाथ ! आपण सहज सुजाण आहांत (म्हणून सांगतो ते) ऐकावे, बालकाचे बोल (आपल्या सारख्यांनी) कानावर घेऊ नयेत ॥ २ ॥ गांधील माश्या व मुले स्वभावाने सारखी असतात म्हणून संत त्यांना कधी डिवचत नाहीत. ॥ ३ ॥ त्याने काही सुद्धा कार्याचा बिघाड केला नाही, नाथ ! मीच आपला अपराधी आहे ! ॥ ४ ॥ कृपा करावी कोप, वध, बंधन जे काही करणे असेल ते मला आपल्या दासाला करा ॥ ५ ॥ आपला रोष झटकन जाण्याला मी काय करु ते सांगावे मुनिनायका ! (आपण सांगाल) तो उपाय मी करीन ॥ ६ ॥ मुनि म्हणाले की रामा ! माझा रोष कसा जाईल ? तो तुझा धाकटा भाऊ अजून वाकड्या नजरेने माझ्याकडे पाहतो आहे ॥ ७ ॥ (परशुने) याची मान छाटून टाकली नाही तर मी क्रोध करून मिळविले तरी काय ? ॥ ८ ॥ ज्या परशूची घोर गती ऐकून अवनिपतींच्या स्त्रीया गर्भ स्त्रवतात तो परशु हाती असता या वैरी महीश पुत्राला काय जिवंत पाहू ? ॥ दो० २७९ ॥

हात धजे न, दाहि रुष छाती । हा कुठार कुंठित नृपघाती ॥
वाम विधाता! स्वभाव वदले । कृपा कधीं कशि हृदयिं मम वळे ॥
आज दया दुख दुःसह सहवी । सौमित्री विहसुनि शिर नमवी ॥
वायु कृपा मूर्ती-अनुकूल । वदतां वचन झरति जणुं फूलं ॥
मुने कृपा जाळी गात्रां जर । क्रोधें राखो तनु धाता तर ॥
जनका बालक जड हट्टें हा । करूं पाहतो यमपुरिं गेहा ॥
डोळ्यांआड शीघ्र कर, छोटा । दिसे परी खोटा नृप-पोर्टा ॥
विहसुनि लक्ष्मण म्हणति मनांही । मिटतां नेत्र कुठें कुणि नाहीं ॥

दो० :- परशुराम रामास तैं वदले हृदिं सुक्रोध ॥
शंभु-धनू भंगूनि शठ करिशी अम्हां प्रबोध ॥ २८० ॥

हात मारण्य़ास धजत नाही पण रोषाने छाती जळते आहे आणि त्यांचा सहज घात करणारा कुठार कुंठित झाला आहे ॥ १ ॥ दैव (च) फिरले कारण माझा स्वभाव बदलला ! कृपा (दया) कशी असते ती माझ्या हृदयात कधी वळली सुद्धा नव्हती ती आज कशी वळली ! ॥ २ ॥ आज दया दु:सह दु:ख सोसावयास लावीत आहे (हे ऐकून) लक्ष्मणाने खदखदा हसून मस्तक नमविले ॥ ३ ॥ कृपारुपी वायू आपण अनुकूलतेची मूर्ती आहांत व आपण जे शब्द बोलता ती फुलेच टपटप गळत आहेत. ॥ ४ ॥ मुनी महाराज कृपा जर आपल्या शरीराला जाळत असेत तर विधाता क्रोधाने आपल्या शरीराचे रक्षण करो ॥ ५ ॥ जनका ! हा जड बालक हट्टाने यमपुरीत घर करुं इच्छितो ॥ ६ ॥ त्याला लवकर डोळ्याआड करा. दिसतो छोटा पण हा राजाचा पोर्टा अगदी खोटा आहे ॥ ७ ॥ लक्ष्मण मोठ्याने हसून मनात म्हणाले डोळे मिटले म्हणजे कुठे कोणी नाही ॥ ८ ॥ (जनक काही बोलत नाहीत असे पाहीले) तेव्हा हृदयात अत्यंत क्रोध आल्यामुळे परशुराम रामास म्हणाले की शठा ! शंभू धनुष्य भंगून पुन्हा आम्हालाच उपदेश करतोस ? ॥ दो० २८० ॥

बंधु वदे कटु तुझी संमती । तूं कर जुळुनि करिशि छल-विनती ॥
मज तोषवि करुनी संग्रामा । ना तर सोड ‘राम’ तव नामा ॥
त्यज छल कर रण शंभुद्रोही । ना तर सानुज तुज वधतो ही ॥
परशु उगारुनि भृगुपति बकती । स्मित मनिं करुनि राम शिर नमती ॥
रोष अम्हांवर दोषी लक्ष्मण । क्वचित् सरलता महा दोष पण ॥
जाणुनि वक्र करिति सब नमना । राहु न करि वक्रेंदू-ग्रहणा ॥
राम म्हणति रुष सोडा मुनिवर । पुढें शीर्ष हें, कुठार करिं वर ॥
क्रोध जाइ तें करणें स्वामी । मजला समजा निज अनुगामी ॥

दो० :- युद्ध कसें प्रभु सेवकीं त्यजा विप्रवर रोष ॥
वेष बघुनि वदला जरा बाळाचाहि न दोष ॥ २८१ ॥

तुझा भाऊ कडू बोलतो ते तुझ्याच संमतीने आणि तू हात जोडून कपटाने प्रार्थना करतोस ॥ १ ॥ माझ्याशी युद्ध करुन मला संतुष्ट कर नाहीतर ‘ राम ’ ते तुझे नाव (लावणे) सोडून दे ॥ २ ॥ शिवद्रोह्या ! कपट सोड व माझ्याशी युद्ध कर, नाहीतर तुझा तुझ्या धाकट्या भावासहित वध करतो ॥ ३ ॥ याप्रमाणे भृगुपती परशु उगारुन बकवाद करु लागले (तेव्हा) रामचंद्रांनी मनात स्मित करुन मस्तक नमविले ॥ ४ ॥ (राम मनात म्हणतात) दोष केला लक्ष्मणाने व रोष आमच्यावर (यावरुन ठरते की), कधी कधी सरलता हा सुद्धा मोठा दोष ठरतो ॥ ५ ॥ चंद्र वाकडा आहे असे जाणून सर्व नमन करतात, राहू (देखील) वक्र चंद्राचे ग्रहण करीत नाही ॥ ६ ॥ राम म्हणाले, मुनीश्रेष्ठा ! आपण रोष सोडून द्यावा हे माझे मस्तक आपल्या पुढे आहे व आपल्या हातात तीक्ष्ण कुठार आहे ॥ ७ ॥ जेणे करुण क्रोध जाईल ते करावे (मात्र) मला आपला सेवक समजावा ॥ ८ ॥ (प्रभू) स्वामी व सेवक यांच्यात युद्ध कसे होऊं शकेल (म्हणून) विप्रोत्तम रोष टाकून द्यावा. (लघुबंधु) आपला वेष पाहून थोडेसे बोलला (म्हणून) त्यात त्या बाळाचा कांही दोष नाही ॥ दो० २८१ ॥

कार्मकबाण-परशुधर बघुनी । कोपे बालक वीर समजुनी ॥
नाम विदित परि तुम्हीं न ठावें । दिलीं उत्तरें कुल-स्वभावें ॥
स्वामी! मुनिवेषें येतां जर । चरण-रजा शिरिं शिशु धरता तर ॥
चूक नेणतां घडे क्षमावी । कृपा विप्र-उरिं फार असावी ॥
अम्हां तुम्हां कशि नाथ! बरोबरि । वदा कुठें पद कुठें शीर्ष तरि ॥
राम मात्र लघु नाम आमचें । नाम परशुसह मोठें तुमचें ॥
देव एक-गुण धनू आमचे । नव-गुण परम पवित्र तु तुमचें ॥
आम्हिं सर्वपरि उणे तुम्हांहुनि । क्षमा विप्र अपराधा लागुनि ॥

दो० :- वरचेवर मुनि विप्रवर वदले रामा राम ॥
वदति रुष्ट भृगुपति हसुनि तूंहि बंधु सम वाम ॥ २८२ ॥

धनुष्यबाण व परशु धारण केलेले पाहून वीर समजून बालक कोपला ॥ १ ॥ आपले नाव त्याला माहीत होते पण ते तुम्हीच हे त्याला कळले नाही व कुलस्वभावाला अनुसरुन त्याने वीरोचित उत्तरे दिली ॥ २ ॥ आपण जर मुनिवेषानेच आला असता तर बालकाने आपली पायधूळ मस्तकावर धारण केली असती ॥ ३ ॥ न जाणता घडलेली चूक आपण क्षमा करावी कारण की विप्राच्या हृदयात अत्यंत कृपा असली पाहीजे ॥ ४ ॥ नाथ ! तुमची बरोबरी कशी होऊ शकेल ? कुठे पाय व कुठे डोके ! सांगा पाहूं ॥ ५ ॥ आमचे लहानसे फक्त ‘राम’ हे नांव, आणि आपले नाव ‘परशु’ सहित असलेले आमच्या नावापेक्षा कितीतरी मोठे आहे. ॥ ६ ॥ देव ! भूदेव ! आमच्या धनुष्याला केवळ एकच गुण तर आपले धनुष्य परमपवित्र नऊ गुणांचे ! ॥ ७ ॥ (याप्रमाणे) आम्ही आपल्याहून सर्व प्रकाराने कमीच आहोत; म्हणून विप्र ! आमचे अपराध क्षमा करावे. ॥ ८ ॥ परशुरामाला (भार्गव) राम वरचेवर ’मुनि, विप्रवर’ असे म्हणाले. त्यामुळे भृगुपती रुष्ट होऊन हसून म्हणाले की तूं सुद्धा भावासारखाच वाकडा (कुटील) आहेस. ॥ दो. २८२ ॥

मानसि मजसि किं विप्र मात्र, तो । कसा विप्र मी तुला सांगतो ॥
स्त्रुवा चाप आहुति शर जाणहि । थोर घोर मम कोप कृशान हि ॥
समिधा शुभ सेना चतुरंग हि । महा महिप पशु बनति येउन हि ॥
या कुठारिं कापुनि बलि अर्पित । म्यां कृत समर यज्ञजप अगणित ॥
तुला प्रभाव न माझा माहित । भ्रमें विप्र वदसी अपमानित ॥
दर्प फार धनु भंगुनि हृदयीं । ताठ उभा जणुं मी जग-विजयी ॥
राम म्हणति मुनि वदा विचारीं । क्षुद्र चूक अमची रुष भारी ॥
स्पर्शत तुटे पिनाक पुराण हि । कशासाठिं मी धरुं अभिमान हि ॥

दो० :- विप्र म्हणुन जर अनादरु सत्य सांगु भृग्वीश ॥
असा सुभट जगिं कोण ज्या नमवूं सभीत शीस ॥ २८३ ॥

मला तू केवळ ब्राह्मण मानतोस काय ? मी कसा ब्राह्मण आहे ते तुला सांगतो, (ऐक) ॥ १ ॥ धनुष्य ही स्त्रुवा (लाकडी पळी) आहे. बाण या आहुती व माझा मोठा भीषण क्रोध हाच अग्नी समज. ॥ २ ॥ राजांची चांगली चतुरंग सेना याच समिधा होत आणि मोठमोठे महीपती येऊन पशु (बळी) बनले ॥ ३ ॥ याच कुठाराने त्यांना कापून बळी दिले गेले (या प्रमाणे) मी रणयज्ञ रुपी अगणित यज्ञ केले आहेत ॥ ४ ॥ माझा प्रभाव तुला माहीत नाही म्हणून भ्रमाने विप्र म्हणून माझा अपमान करीत आहेस ॥ ५ ॥ धनुष्य भंग केल्याने हृदयात दर्प फार वाढला आहे व जणू मी विश्वविजयी मानून ताठ उभा आहेस ॥ ६ ॥ राम म्हणाले - मुनीराज जरा विचाराने बोला; आमची चूक ती किती क्षूद्र व तुमचा रोष किती भयंकर ! ॥ ७ ॥ पिनाक जुने पुराणे असल्याने स्पर्श करताच ते मोडले मग मला अभिमान धरण्याचे कारण काय ? ॥ ८ ॥ भृगुपती ! जर ब्राम्हण म्हणून तुमचा अनादर करतो (असे तुम्हांस वाटत असेल तर सत्य सांगतो की) असा सुभट जगात कोण आहे की ज्याला आम्ही भयाने मस्तक नमवूं ? ॥ दो० २८३ ॥

देव दनुज भट भूप जगांतिल । समबल अथवा अतिबल असतिल ॥
जर कुणि देइ समर-आव्हाना । सुखें लढूं काळासिहि जाणा ॥
क्षत्रिय तनुधर रणा कचरतो । लावि कलंक कुला पामर तो ॥
वदें स्वभाव न कुला प्रशंसीं । कुणि न डरे काळा रघुवंशी ॥
विप्रकुळीं प्रभुता अशि राही । अभय बने जो सभय तुम्हां ही ॥
श्रवुनि गूढ मृदु वच रघुपतिचें । हटलें पटल परशुधर-मतिचें ॥
राम रमापति-धनु घेणें करिं । सज्य करा संदेह फिटे तरि ॥
देत धनू तों स्वयेंचि गेले । परशुराम मनिं विस्मित ठेले ॥

दो० :- रामप्रभुता जैं कळे पुलक देहिं फुलतात ॥
पाणि जुळुनि वदले वचन प्रेम न हृदयिं रहात ॥ २८४ ॥

देव दानव वीर वा जगातील कोणी भूपती, आमच्या पेक्षा अति बलवान असले किंवा आमच्या सारखे बलवान असले ॥ १ ॥ आणि जर कोणी आम्हास युद्धाचे आव्हान दिले तर त्याच्याशी आम्ही सुखाने लढूं मग तो प्रत्यक्ष काळ कां असेना ॥ २ ॥ क्षत्रिय - देह धारण करून जो युद्धाला कचरतो तो पामर आपल्या कुळाला कलंक लावतो. ॥ ३ ॥ मी (कुळाचा) स्वभाव सांगतो, कुळाची प्रशंसा नाही करीत, कोणीही रघुवंशी पुरुष काळाशीही युद्ध करण्यास (कधीच) घाबरत नाहीत ॥ ४ ॥ विप्रकुळात असा प्रभाव असतो की जो तुम्हालाच भितो तो निर्भय बनतो. ॥ ५ ॥ रघुपतीचे गूढ व मृदुवचन ऐकून परशुधराच्या बुद्धीवरील (मोहाचे) पटल बाजूस सरले ॥ ६ ॥ (तेव्हा) ते म्हणाले की राम ! रमापतीचे धनुष्य हाती घ्यावे व ते सज्ज करावे म्हणजे माझा संदेह तरी नष्ट होईल ॥ ७ ॥ परशुराम धनुष्य देऊ लागले तोच ते धनुष्य आपण होऊन स्वत:च रामाच्या हातात गेले ते पाहून परशुराम मनात विस्मित झाले ॥ ८ ॥ जेंव्हा रामचंद्राची प्रभूता कळली तेव्हा शरीर रोमांचांनी फुलून गेले व हात जोडुन बोलू लागले तेव्हा प्रेम हृदयाते मावेनासे झाले ॥ दो० २८४ ॥

जय रघुवंश-वनज-वन-भानू । गहन-दनुज-कुल-दहन-कृशानू ॥
जय सुरविप्र-धेनु-हितकारी । जय भ्रम मोह कोप मद-हारी ॥
विनय-शील-करुणा-गुण-सागर । जयति वचन-रचना अतिनागर ॥
सेवक सुखद सुभग सब अंगां । जय जय तनु छवि कोटि अनंगा ॥
कशी एक मुखिं करूं प्रशंसा । जय महेश-मन-मानस-हंसा ॥
नेणुनि वदलो बहु अनुचित तें । क्षमा क्षमा-मंदिर दो भ्राते ॥
वदुनी, जय जय रघुकुल केतू । भृगुपति वनिं गेले तप हेतू ॥
कुटिल नृपति कल्पित-भय-भरले । पळती कातर गुप्‌चुप् सगळे ॥

दो० :- देव वाजविति दुंदुभी प्रभुवर वर्षति फूल ॥
पुर नरनारी हर्षती नष्ट मोहमय शूल ॥ २८५ ॥

--- परशुरामकृत - रोहिणी नक्षत्र स्तुती --- (रामलक्ष्मण - स्तुती)
रघुवंशरुपी कमलवनाच्या सूर्या ! आपल्या उत्कर्षाचा अविष्कार करा. राक्षसरुपी घनदाट अरण्याला जाळून टाकणार्‍या अग्ने ! आपण उत्कर्षाचा अविष्कार (प्रगट) करा ॥ १ ॥ देव, विप्र व धेनु यांचे हित करणारांचा जय असो मोह, भ्रम क्रोध, व गर्व हरण करणार्‍यांचा विजय असो ॥ २ ॥ विनय, शील व करुणा व गुण यांच्या सागरांनो ! वचन - रचना अत्यंत चतुर असणार्‍यांनो, तुमचा जय असो ॥ ३ ॥ सेवकांना सुख देणार्‍या व सर्वांग सुंदर असणार्‍यांनो, कोटि अनंगांची छबि अंगावर धारण करणार्‍यांचा जय असो. ॥ ४ ॥ मी या एका मुखाने आपली दोघांची प्रशंसा कशी काय करुं ? महेशांच्या मनरुपी मानसात विहरणार्‍या हंसांनो जय असो ॥ ५ ॥ न जाणल्याने (अज्ञानाने) मी पुष्कळ अनुचित बोललो ते ‘ क्षमामंदिर - उभय बंधूंनो ’ मला क्षमा करा. ॥ ६ ॥ जय जय रघुकुलकेतू असे म्हणून भृगुपती तपाचा हेतू मनात धरुन वनात निघून गेले ॥ ७ ॥ कुटिल महीपती मन:कल्पित भयाने घाबरुन भ्याडासारखे गुपचूप पळत सुटले ॥ ८ ॥ देवांनी दुंदुभी वाजविल्या व प्रभूवर पुष्पवृष्टी केली मोहाने उत्पन्न झालेले कष्ट पीडा (शुल) नष्ट होऊन सर्व पुरनरनरींना हर्ष झाला. ॥ दो० २८५ ॥

घटघडाट अति बाजे वाजति । सकल मनोहर मंगल साजति ॥
मिळुन थव्यांनीं सुमुखि सुनयना । गान करिति कल कोकिल वचना ॥
केविं विदेह सुखा वर्णावें । जन्मदरिद्र जणूं निधि पावे ॥
त्रास विगत सीते सुख भारी । जणुं विधु-उदयिं चकोरकुमारी ॥
तदा जनक कौशिक-पदिं वंदिति । प्रभू-प्रसाद! राम धनु खंडिति ॥
मज कृतकृत्य करिति दो भ्राते । स्वामि! सांगणें उचित अतां तें ॥
मुनि वदले श्रृणु नृपा ! प्रवीण । होता विवाह चापाधीन ॥
धनु तुटतांच किं विवाह झाला । विदित नागनरसुर सकलांला ॥

दो० :- तरि जाउनि करणें अतां वंशिं जसा व्यवहार ॥
द्विज-कुलवृद्ध नि गुरुमतें वेद-विदित आचार ॥ २८६ ॥

विवाह (स्वयंवरानंद) - वाद्यांचा अत्यंत घडघडाट सुरु झाला सर्वांनी मनोहर मंगलपदार्थ सजविले ॥ १ ॥ सुंदर मुख व नेत्र असलेल्या स्त्रिया थव्याथव्यांनी जमून कोकिळे सारख्या स्वराने मधूर मंगल - गान करुं लागल्या ॥ २ ॥ विदेहाच्या सुखाचे वर्णन कसे करावे ! जणूं काय जन्मदरिद्रयाला निधीच मिळाला ॥ ३ ॥ सर्व त्रास (भय, विषादादीं) जाऊन सीता फार सुखी झाली, जणू काय चंद्रोदय पाहून चकोर कुमारी सुखी व्हावी तशी ! ॥ ४ ॥ (प्रचलित कोणत्याही रामायणात श्री रघुवीर विवाह इतका विस्तार पूर्वक व इतका निरुपम काव्य सौंदर्याने शृंगारलेला आढळत नाही शृंगार, वात्सल्य, भक्ती, करुणा इत्यादी शुद्ध कोमल, परमसुखदायक रसांचा हा एक अगाध सागरच आहे. मर्यादा पालन पदोपदी दृष्टीस पडतेच.)
परशुराम निघून गेल्यानंतर जनक राजाने कौशिकास वंदन केले (व म्हटले की) प्रभू ! आपल्या कृपा प्रसादाने रामचंद्रांनी धनुष्य मोडले ॥ ५ ॥ या दोन भावांनी मला कृतकृत्य केले (तरी) स्वामी ! आता जे उचित (कर्तव्य) असेल ते सांगावे ॥ ६ ॥ मुनी म्हणाले की प्रवीण राजा ! ऐक विवाह धनुष्याच्या अधीन होता. ॥ ७ ॥ धनुष्य मोडताच विवाह झाला हे नाग, नर व सुर या सर्वांना विदित आहे ॥ ८ ॥ तरी तुम्ही आता (घरी) जाऊन कुलरीतीप्रमाणे ब्राम्हण कुलवृद्ध व गुरु (कुलगुरु पुरोहित) यांच्या मताने अशी वेदविदित व लौकिक पद्धती असेल त्याप्रमाणे आचार करावा. ॥ दो० २८६ ॥

दूत अयोध्ये धाडा जाउनि । आणिति दशरथ नृप बोलावुनि ॥
म्हणे मुदित नृप भलें कृपाला । धाडि दूत अणवुनि ते काला ॥
मग सब महाजनां बोलाविति । येति सकल सादर शिर नमविति ॥
हाट वाट मंदिर सुर-सदनें । चहुं दिशिं पुरि शृंगारुनि सजणें ॥
मुदित निघुनि निज निजगृहिं येती । सेवकांस बोलावुनि घेती ॥
घाला मंडप विचित्र सजुनी । जाति मुदित आज्ञा शिरिं धरुनी ॥
आणविति ते गुणी बहुजनां । सुज्ञ कुशल जे वितान-रचना ॥
वंचुनि विधिस करिति आरंभा । रचिति कनक कदलींचे स्तंभां ॥

दो० :- हरित मण्यांचीं पत्रफलं पद्‌मरागकृत फूल ॥
रचना बघुनि विचित्र अति विरंचिचे मनिं भूल ॥ २८७ ॥

(येथून) जाऊन दुतांना अयोध्येस पाठवा जे जाऊन दशरथ राजास बोलावून आणतील ॥ १ ॥ जनक राजा आनंदाने म्हणाला की, कृपाळा ! ठीक आहे असे म्हणून त्याचवेळी दूतांना बोलावून घेऊन अयोध्येस पाठविले ॥ २ ॥ मग सर्व महाजनांना बोलाविले, ते सर्व आले व त्यांनी आदराने प्रणाम केला. ॥ ३ ॥ राजाने त्यांना सांगीतले की, बाजार, रस्ते शंकराचे राजमंदिर व इतर सर्व देवळे व सर्व नगर चारी बाजूंनी शृंगारुन सजवा ॥ ४ ॥ ते हर्षाने निघून आपापल्या घरी आले व त्यांनी सेवकांना बोलावून घेतले ॥ ५ ॥ (व आज्ञा दिली की) चित्र विचित्र मंडप चांगला शृंगारुन घाला ते सर्व आज्ञा शिरसामान्य करुन आनंदाने गेले ॥ ६ ॥ जे मंडप रचनेत सूज्ञ व कुशल होते अशा पुष्कळ कारागीरांना त्यांनी बोलावून आणले ॥ ७ ॥ ब्रह्मदेवाला वंदन करून त्यांनी (मंडप रचनेस) प्रारंभ केला. प्रथम सोन्याचे केळीचे खांब तयार केले ॥ ८ ॥ त्यांची पाने व घड हिरव्या रत्‍नांचे (पाचूचे) तयार केले व त्यांतील फुले पराग मण्यांची केली ती अत्यंत विचित्र रचना पाहून विरंचीच्या मनात सुद्धा भ्रम उत्पन्न झाला (असता) ॥ दो०२८७ ॥

वेणु हरित-मणिमय कृत सगळे । सरळ सपर्व न जाती काळले ॥
कलित कनक अहिवेलि बनवल्या । चारु सपर्ण न कुणि ओळखल्या ॥
कोरुन त्यांचे बंधहि रचले । मधिं मधिं मुक्तादाम विरचले ॥
माणिक मरकत कुलिश पिरोजें । चिरुनि कोरुनी रचित सरोजें ॥
कृत भृंगां बहुरंगि विहंगां । गुंजति कूजति समीरसंगां ॥
अमरमूर्ति खांबांत विरचिल्या । उभ्या समंगलवस्तु राहिल्या ॥
रंगवल्लि बहु विविध काढल्या । कुंजर मणिमय सहज शोभल्या ॥

दो० :- कृत सौरभ-पल्लव सुभग नीलमणी कोरून ॥
मरकत घड मोहर कनक रेशमिं गुणिं टांगून ॥ २८८ ॥

वेणू वेळू पाचूचे केले ते सगळे सरळ गाठीसहित असून कोणास ओळखू येत नाहीत ॥ १ ॥ सोन्याच्या सुंदर नागवेली बनविल्या त्या सुंदर पानांनी युक्त असल्याने कोणी ओळखल्या नाहीत ॥ २ ॥ कोरुन त्यांचे बंधही घट्ट बांधले गेले व मधे मधे मोत्यांचे हार (दाम) लावले ॥ ३ ॥ माणके, नीलमणी, हिरे (कुलिश) व पिरोज ही रत्‍ने चिरुन कोरुन त्यांची कमळे बनविली ॥ ४ ॥ भृंग व बहुरंगी पक्षी बनविले व ते वायूच्या संगतीने गुंजारव कूजन करु लागले ॥ ५ ॥ खांबात देवांच्या मूर्ती खोदल्या व त्या मंगल वस्तू घेऊन उभ्या राहील्या आहेत ॥ ६ ॥ सहज शोभिवंत अशा नाना प्रकारच्या रांगोळ्या गजमुक्तांच्या काढल्या ॥ ७ ॥ नीलमणी कोरुन त्यांत अत्यंत सुंदर आम्रपल्लव तयार केले. त्यात सोन्याचा आम्रमोहोर केला व त्यातील अत्यंत बारीक कैर्‍या मरकत मण्यांच्या = पाचूच्या केल्या. व हे आम्रपल्लव रेशमी दोर्‍यांनी जागोजागी टांगून ठेवले आहेत. ॥ दो०२८८ ॥

रुचिर तोरणें रचिलीं बहु वर । लावि मनोज किं पाश मनोहर ॥
मंगल कलश विपुल पट चामर । चारु पताका ध्वजा कृता वर ॥
दीप मनोहर मणिमय नाना । वर्णुं न येई विचित्र विताना ॥
नवरी वैदेहि ज्या वितानां । त्या वर्णिल कवि अशि मति कोणां ॥
वर वर राम रूप-गुण-सागर । तो मंडप लोकत्रय-भास्वर ॥
जनक-निकेता शोभा जैसी । नगरीं प्रतिगृहिं शोभे तैसी ॥
जे कुणि मिथिले तदा पाहती । क्षुद्र भुवन दश चार वाटती ॥
जी संपदा नीचगृहिं शोभित । ती पाहुन सुरनायक मोहित ॥

दो० :- लक्ष्मि वसे ज्या नगरिं कृत-कपटनारि-वरवेष ।
त्या पुरिची शोभा वदत गिरा संकुचित शेष ॥ २८९ ॥

सुंदर व श्रेष्ठ (उंची) पुष्कळ तोरणे अशी बनविली की जणू मदनाने मनोहर पाशच लावले आहेत. ॥ १ ॥ अनेक मंगल कलश सजविले, सुंदर व श्रेष्ठ रेशंमी वस्त्रे, चवर्‍या व ध्वजा पताका लावल्या गेल्या ॥ २ ॥ नाना प्रकारचे मनोहर मणिदीप लावले गेले या विचित्र मंडपाचे वर्णन करता येणे शक्य नाही ॥ ३ ॥ ज्या मंडपात वैदेही नवरी असणार त्याचे वर्णन यथार्थ करुं शकेल अशी मती कोणा कवीला आहे ? (कोणालाही नाही) रुप आणि गुणांचे सागर राम ज्या मंडपात नवरदेवाच्या रुपाने विराजमान होणार तो मंडप त्रैलोक्यांत प्रकाशमान आहे ॥ ५ ॥ जशी शोभा राजा जनकाच्या निकेताची आहे तशीच शोभा नगरातील प्रत्येक घराघराची आहे ॥ ६ ॥ त्या समयी ज्यांनी ज्यानी पाहीले त्यांना चौदा भुवने क्षुद्र वाटूं लागली ॥ ७ ॥ (मिथिलेतील) नीचाच्या घरांत जी संपदा शोभत आहे, ती पाहून देवेन्द्र ही मोहित होत आहे. ॥ ८ ॥ ज्या नगरीत कपटलीलेने नारीचा श्रेष्ठ वेष करुन लक्ष्मी निवास करीत आहे, त्या नगरीची शोभा वर्णन करण्यास शारदा व शेष सुद्धां लाजतात ॥ दो० २८९ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP