॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय १३ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

सुंदर शंभुचरित्रा परिसुनि । सरस, सुखी अति भरद्वाज मुनि ॥
कथालालसा वाढे भारी । तनु पुलकित अति लोचनिं वारी ॥
प्रेमविवश मुखिं नुमटे वाणी । दशा बघुनि मुनि हर्षे ज्ञानी ॥
अहो! धन्य तव जन्म मुनीश्वर । तुम्हां प्राणसे प्रिय गौरीश्वर ॥
शिवपदकमलीं रति ना ज्यांसी । ते स्वप्निंहि ना प्रिय रामासी ॥
विश्वानाथपदिं प्रेम छलाविण । हेंच रामभक्ताचें लक्षण ॥
शिवसम कुणि रघुपतिचें व्रतधर । अनघ सतीशी स्त्री परिहत वर ॥
दावि करुनि पण रामभक्तिला । कोणि किं शिवसा प्रिय रघुपतिला ॥

दो. :- प्रथमहि सांगुनि शिवचरित जाणें तव मर्मास ॥
रहित समस्त विकार शुचि तुम्हिं रामाचे दास ॥ १०४ ॥

कैलास प्रकरण – उमा शंभु संवाद – हेतू कथन (प्रस्तावना) शंभूचे सुंदर व सरस चरित्र श्रवण करुन भरद्वाज मुनींना अतिसुख झाले ॥ १ ॥ (त्यांची) कथा ऐकण्याची उत्कंठा फार वाढली, शरीर पुलकित झाले आहे व डोळ्यात अतिशय पाणी आले आहे. ॥ २ ॥ प्रेमविवश झाल्याने मुळातून शब्द उमटेना. ती ( प्रेममग्न ) दशा पाहून ज्ञानी याज्ञवल्क्य मुनींना हर्ष झाला. ॥ ३ ॥ अहाहा ! हे मुनिश्रेष्ठ भरद्वाज ! धन्य आहे तुमचा जन्म, कारण तुम्हाला गौरिश्वर प्राणांसारखे प्रिय आहेत. ॥ ४ ॥ शिवांच्या चरण कमली ज्यांचे प्रेम नाही, ते रामचंद्रांस स्वप्नातही आवडत नाहीत. ॥ ५ ॥ विश्वनाथाच्या चरणीं निष्कपट प्रेम हेच तर रामभक्ताचे लक्षण आहे. ॥ ६ ॥ शिवासारखा रघुपतिचे व्रत धारण करणारा दुसरा कोणी आहे काय ? कारण त्यांनी निष्पाप अशा सतीसारख्या पत्‍नीचा त्याग केला. ॥७ ॥ पण करुन रामभक्ती दाखविली, म्हणून रघुपतीला शिवासारखा कोणी प्रिय आहे काय ? कोणी सुद्धा नाही. ॥ ८ ॥ मी प्रथमच शिवचरित्र सांगून तुमचे मर्म जाणले की तुम्ही सकल विकार-रहित पवित्र-शुद्ध असे रामाचे दास ( सेवक ) आहांत. ॥ दो० १०४ ॥

मी जाणें तुमचे गुण शीला । सांगु अतां श्रृणु रघुपतिलीला ॥
मुनि घडतां तव आज समागम । कसें सांगु सुख मिळे मना मम ॥
रामचरित अति अमित मुनीशा! । वदवे ना शतकोटि अहीशां ॥
तदपि यथाश्रुत सांगुं सविस्तर । स्मरुनि गिरेशा प्रभुसि धनुर्धर ॥
दारुनारिसम वाणी, स्वामी । राम सूत्रधर अंतर्यामी ॥
ज्या जन जाणुनि कृपाधार दे । नाचवि कवि-उर‍अजिरिं शारदे ॥
कृपाकरा प्रणमुनि रघुनाथा । विशद वर्णितो तद्‍गुण-गाथा ॥
परम रम्य गिरिवर कैलासीं । सदा जिथें शिव उमा निवासी ॥

दो. :- सिद्ध तपोधन योगिजन सुर किंनर मुनिवृंद ॥
तिथें वसति सुकृती सकल सेविति शिव सुखकंद ॥ १०५ ॥

तुमचे गुण व शील मी जाणले. आता रघुपतीलीला सांगतो, त्या ऐका ॥ १ ॥ मुनी ! आज तुमच्या समागमात माझ्या मनाला जे सुख झाले त मी कसे सांगू ! ॥ २ ॥ अहो मुनिश्रेष्ठ ! रामचरित्र अति-अमित आहे, शतकोटी शेष सुद्धा ते सांगू शकणार नाहीत. ॥ ३ ॥ तथापी धनुर्धारी प्रभु वाणीपति ( गिरेश ) श्रीरामचंद्र त्यांचे स्मरण करुन मी जे श्रवण केले आहे ते सविस्तर सांगतो ॥ ४ ॥ वाणी ( शारदा ) ही काष्ठपुतळीसारखी आहे, तिचे स्वामी राम असून ते सूत्रचालक अंतर्यामी आहेत. ॥ ५ ॥ आपला सेवक जाणून ते ज्यावर कृपा करतात त्या कवीच्या हृदयरुपी अंगणात ते शारदेला नाचवितात. ॥ ६ ॥ त्या कृपासागर रघुनाथाला प्रणाम करून मी त्यांच्या उज्वल गुणांची गाथा वर्णन करतो. ॥ ७ ॥ परम रमणीय पर्वतश्रेष्ठ कैलासावर जेथे शिव व उमा नेहमी निवास करतात ॥ ८ ॥ तिथे सिद्ध तपोधन ( मोठे तपस्वी ) योगी, मुनी, सुर, व किंन्नर यांचे समुदाय राहतात व ते सगळे सुकृती असून सच्चिदानंद घन शिवाची सेवा – भक्ती करतात. ॥ दो० १०५ ॥

हरिहर विमुखी धर्म रती ना । नर ते स्वप्निं तिथें जाती ना ॥
तिथें विटपवट विशाल, गिरिवर । नित्य नवा त्रय काळीं सुंदर ॥
त्रिविध पवन शीतल छाया अति । शिव-विश्राम विटप गाती श्रुति ॥
प्रभु एकदां तया-तळिं गेले । अति सुख उरिं तरु बघुनि उदेलें ॥
स्वकरिं नागरिपुचर्म पसरलें । शंभु कृपालु सहज वर बसले ॥
कुंद-इंदु-दर-गौर शरीरहि । दीर्घबाहु, मुनिपट परिधानहि ॥
चरण तरुण अरुणांभोजा सम । नखभा भक्तहृदयगत हरि तम ॥
भुजग-भूतिभूषण त्रिपुरारी । आनन शरदचंद-छवि हारी ॥

दो. :- जटामुकुट सुरसरित शिरिं लोचन नलिन विशाल ॥
नीलकंठ लावण्यनिधि भालिं चारु विधु बाल ॥ १०६ ॥

हे हरिहरभक्त नाहीत व ज्यांच्या ठिकाणी धर्मरती नाही ते लोक स्वप्नात सुद्धा तेथे जाऊ शकत नाहीत ॥ १ ॥ शिवरूप ध्यान - त्या कैलास पर्वतावर एक विशाल वडाचा वृक्ष आहे, तो नित्य नवा व तिन्ही काळी सुंदर असतो. ॥ २ ॥ तेथे शीतल – मंद – सुगंधी वायू वहात असतो. त्या वडाची छाया अतिशीतल असते. त्या वृक्षाला ‘ शिवविश्राम विटप ’ असे श्रुती महणतात ॥ ३ ॥ प्रभु (शिव) एकदा त्याच्या खाली गेले व तो तरु पाहून हृदयात अतिसुख उत्पन्न झाले ॥ ४ ॥ ( त्या विश्रामतरुखाली ) आपल्या हातांनी व्याघ्रचर्म पसरले व कृपाळु शंकर ( शंभू ) सहज त्याच्यावर बसले ॥ ५ ॥ त्यांचे शरीर कुंदाची फुले, चंद्र व शंखाप्रमाणे गौरवर्णाचे असून, बाहू दीर्घ (आजानु) आहेत व ते मुनिवस्त्र नेसले आहेत. ॥ ६ ॥ नवीन फुललेल्या लाल कमलासारखे पायांचे तळवे आहेत व बोटांच्या नखांचे तेज भक्तांच्या हृदयातील तमाचे हरण करणारे आहे. ॥ ७ ॥ त्रिपुरारिंनी भुजंग व भस्म ही भूषणे घातली असून मुखाचे लावण्य शरदऋतूतील चंद्राच्या सौदर्याला लाजविणारे आहे. ॥ ८ ॥ मस्तकावर जटांचा मुकुट व सुरसरिता गंगा आहे, नेत्र कमलासारखे असून विशाल आहेत, कण्ठ निळा आहे व कपाळावर सुंदर बालविधु ( व्दितीयेचा चंद्र ) आहे; शंकर असे लावण्याचे सागर आहेत. ॥ दो० १०६ ॥

बसलेले शोभति कामारी । जेविं शांतरस शरीरधारी ॥
संधि पार्वति सुयोग्य मानी । शंभुपाशिं गत जननि भवानी ॥
प्रिया जाणुनी कृत अति आदर । वामभागिं दे शुभासना हर ॥
हर्षित ती शिवसमीप बसली । मागिलजन्मकथा आठवली ॥
प्रेम अधिक पतिमनिं अनुमानी । विहसुनि वदे उमा मृदु वाणी ॥
कथा सकल लोकां हितकारी । तीच बघे पुसुं शैलकुमारी ॥
विश्वनाथ मम नाथ पुरारी । त्रिभुवन जाणे महिमा भारी ॥
देव नाग नर अग जग जगतीं । सकल कमलपद सेवा करती ॥

दो. :- प्रभु समर्थ सर्वज्ञ शिव सकल कला गुणधाम ॥
ज्ञानयोगवैराग्यनिधि प्रणतकल्पतरुनाम ॥ १०७ ॥

शांतरसाने शरीर धारण करून बसावे त्याप्रमाणे तिथे वसलेले कामरिपु ( शिव ) शोभत आहेत. ॥ १ ॥ पार्वतीला वाटले की ही अगदी योग्य संधी आहे, म्हणून माता भवानी शंभूंच्या जवळ गेली. ॥ २ ॥ प्रिया आहे हे जाणून तिला अतिआदर दिला व हरांनी आपल्या वामभागी तिला शुभासन दिले ॥ ३ ॥ ती ( भवानी ) हर्षाने शिवांच्या जवळ बसली व तिला पूर्वजन्मातील गोष्टींची आठवण झाली. ॥ ४ ॥ पतिच्या मनात आपल्या विषयी अधिक प्रेम आहे असे तिने अनुमान केले व उमा मोठ्याने हसून मृदु भाषण करती झाली. ॥ ५ ॥ (याज्ञवल्क्य भरद्वाजांस म्हणतात) उमा शंभुसंवाद : शैलकुमारी जी कथा पुसुं इच्छित आहे ती सकल लोक हितकारी कथाच आहे. ॥ ६ ॥ हे विश्वनाथा ! माझ्या नाथा ! हे त्रिपुर संहारका आपला महामहिमा त्रिभुवनात प्रसिद्ध आहे. ॥ ७ ॥ या जगातील चर, अचर जीव मनुष्ये, नाग व देव हे सगळे आपल्या चरण – कमलांची सेवा करतात. ॥ ८ ॥ हे प्रभो, आपण समर्थ, सर्वज्ञ, ब्रह्मस्वरूप, सकल कला व गुणांचे धाम आहांत, आपण वैराग्य, योग, व ज्ञान यांचे सागर असून आपणास प्रणत-कल्पतरू म्हणतात. ॥ दो० १०७ ॥

मजसी प्रसन्न जर सुखरासी । समजा सत्य मला प्रिय दासी ॥
तर हरणें प्रभु! मम अज्ञाना । वदुनि विविध रघुनाथ कथांनां ॥
ज्याचें घर सुरतरुतळिं राही । तो दारिद्र्य दुःख कधिं साही ॥
शशिभूषण हें हृदयिं धरावें । महा भ्रमा मम नाथ! हरावें ॥
प्रभु! परमार्थवादि मुनि असती । ब्रह्म अनदि राम, ते म्हणती ॥
शेष शारदा वेद पुराणें । सकल करिति रघुपतिगुणगानें ॥
तुम्हिं तर राम राम दिनरातीं । सादर जपा अनंगाराती ॥
राम अयोध्यानृपसुत तो ही । कुणि किं अगुण अज अलक्षगतिही ॥

दो. :- ब्रह्म कसा जर भूपसुत स्त्रीविरहें धी भ्रान्त ॥
बघुनि चरित महिमा श्रवुनि मम मतिला भ्रम नान्त ॥ १०८ ॥

सुखसागर जर माझ्यावर प्रसन्न असतील व खरोखरीच मला आपली प्रिय दासी मानीत असतील तर हे प्रभो ! विविध रघुनाथ कथा सांगून माझे अज्ञान हरण करावे. ॥ १ ॥ ज्याचे घर कल्पतरुच्या खाली असेल त्यास दारिद्र्य दु:ख कधी तरी सोसावे लागेल काय ? ॥ २ ॥ हे शशिभूषणा ! याचा विचार करुन हे नाथ ! माझ्या महाभ्रमाचे आपण हरण करावे ॥ ३ ॥ शिवगीतेची प्रस्तावना - प्रभो ! जे परमार्थवादी मुनी आहेत ते म्हणतात की जे अनादी ब्रह्म तोच राम ॥ ४ ॥ शेष्, शारदा, वेद, पुराणे इत्यादि रघुपतीचे गुणगान करतात. ॥ ‍६ ॥ तुम्ही तर अनंगाचे शत्रू असून सुद्धा रात्रंदिवस राम राम जपत असता. ॥ ७ ॥ ( म्हणून संशय हा की )असा जो राम तोच का अयोध्यानृपाचा पुत्र, की अजन्मा, अगुण व ज्याची गती जाणता येत नाही असा कोणी ( राम ) निराळा आहे ? ॥ ८ ॥ ज्या रामाच्या नामाचा तुम्ही जप करता तोच जर भूपपुत्र असेल तर तो ब्रह्म कसा असूं शकेल ? ( सगुण निराकार ब्रह्माचा अवतार म्हणावा तर ) स्त्रीविरहाने त्याच्या बुद्धीला भ्रम कसा झाला ते चरित्र पाहीले व महिमा ऐकला त्यामुळे माझ्या बुद्धीला सुद्धा अपार भ्रम झाला ( मागील जन्मातील हकीकत सांगत आहे. ) ॥ दो० १०८ ॥

व्यापक अनीह विभु जर कोणी । नाथ वदा मज समजावोनी ॥
अज्ञ गणुनि हृदिं रोष न धरणें । जाइ मोह मम तेवीं करणें ॥
वनिं मज राम प्रभुत्व दिसलें । अति भय विकल, न तुम्हांस वदले ॥
तदपि मलिन मन्, बोध न येई । तत्फल उचित पदरिं मी घेई ॥
अझुन कांहिं मम मनिं संशय ते । कृपा करा कर जुळुनि विनवतें ॥
बोध विविध मज कृत तैं प्रभुनीं । नाथ! न रोष धरा तें स्मरुनी ॥
आतां तसला विमोह नाहीं । रामकथा मम रुचे मना ही ॥
वदा पुनीत रामगुणगाथा । भुजगराजभूषण सुर-नाथा ॥

दो. :- नाक घासुनी नमुनि पदिं विनवीं कर जोडून ॥
विवरा रघुवरविशदयश श्रुतिसिद्धान्त पिळून ॥ १०९ ॥

व्यापक, अनीह व विभू असा आणखी कोणी ( राम ) असेल तर मला तसे समजावून सांगावे ॥ १ ॥ मी अज्ञानी आहे हे जाणून मनात माझ्यावर रोष ( मात्र ) धरुं नये आणि जेणेकरुन माझा मोह नष्ट होईल असे करावे ॥ २ ॥ मला ( मागील जन्मात ) रामाचे प्रभुत्व वनात दिसले; पण अतिभयाने विकल होऊन मी ते आपणास सांगीतले नाही ॥ ३ ॥ तथापि माझ्या मलिन मनात बोध काही उत्पन्न झाला नाही व त्याचे योग्य फळ माझ्या पदरात पडले ॥ ४ ॥ अजून सुद्धा ते संशय माझ्या मनात थोडे आहेतच. ( म्हणुन ) मी हात जोडून विनविते की आपण माझ्यावरकृपा करा.( आपण कृपा केल्याशिवाय त्यांचे निर्मूलन होणार नाही ). ॥ ५ ॥ त्यावेळी प्रभूंनी मला नाना प्रकारे बोध केला ( पण त्याचा काही उपयोग झाला नाही ). हे मनात आणून नाथ ! आपण रोष धरुं नये ॥ ६ ॥ ( कारण ) आता तसा विशेष मोह नाही व ( आता ) रामकथा श्रवण करण्याची अभिरुची पण मनात उत्पन्न झाली आहे. ॥ ७ ॥ म्हणून हे सुरनाथा ! भुजंगराज भूषणा ! ( आता ) पावन रामगुणगाथा आपण मला सांगावी ॥ ८ ॥ मी जमिनीवर नाक घासून , पायांना नमस्कार करुन , हात जोडून विनवणी करते की रघुवर विशद यश व श्रुतीना पिळून ( सार काढून ) त्यांचा सारभूत सिद्धान्त मला सांगांवा. ॥ दो०१०९ ॥

अधिकारी नारी नाहीं जरि । प्रभुदासी मनवच-कर्में तरि ॥
गूढहि तत्त्व न साधू लपवति । आर्त यदा अधिकारी पावति ॥
पुसतें अति आर्ता सुरराया! । रघुपतिकथा वदावी सदया ॥
प्रथम विवंचुनि वदा कारणहि । ब्रह्म अगुण कां धरि वपु सगुणहि ॥
प्रभु मग वदा राम‍अवतारा । पुढें बालचरिताहि उदारा ॥
वदा जानकिस कशी विवाही । त्यजि राज्या त्या दूषण कांहीं ॥
वसुनिं वनीं कृत चरित्र पार न । वदा नाथ हत केवीं रावण ॥
राज्यीं बसुनि कृत बहुलीला । वदा सकल शंकर सुखशीला ॥

दो. :- वदा कृपाकर कृत कसें रामें आश्चर्यास ॥
गत सप्रज रघुवंशमणि कैसे निजधामास ॥ ११० ॥

श्रुतिसिद्धांत श्रवण करण्यास स्त्री अधिकारी नाही असे जरी असले तरी मी मनाने – वाणीने व कर्माने आपली दासी आहे ॥ १ ॥ (शिवाय) जेव्हा आर्त अधिकारी मिळतो तेव्हा साधू गूढ तत्वे सुद्धा लपवून ठेवीत नाहीत. ॥ २ ॥ हे सुरश्रेष्ठा ! मी तर अतिआर्त असून विचारते आहे; म्हणून माझ्यावर दया करून मला रघुपतीकथा सांगावी ॥ ३ ॥
पार्वतीचे प्रश्न : (१) निर्गुण ब्रह्म सगुण देह का धारण करते हे प्रथम नीट विचार करून सांगावे ॥ ४ ॥ (२) हे प्रभो, मग रामाचा अवतार कसा झाला ते सांगा व (३) मग त्यांनी उदार अशा बाललीला कशा केल्या ते सांगा. ॥ ५ ॥ (४) मग जानकीशी विवाह कसा केला ते सांगावे व (५) मग राज्याचा त्याग केला तो कोणत्या दोषास्तव तेही सांगावे ॥ ६ ॥ (६) नंतर वनात राहून अपार लीला केल्या त्या व नाथ ! रावणाच वध कसा केला ते सांगा ॥ ७ ॥ ()७ (नंतर) राज्यावर बसून ज्या पुष्कळ सुखशील लीला केल्या असतील त्या सर्व हे सुखशीला शंकरा ! आपण सांगाव्या. ॥ ८ ॥ (८) मग हे कृपासागरा (कृपाकर) रघुवंशमणी राम प्रजेसह निजधामास गेले हे आश्चर्य कसे केले ते सांगावे ॥ दो० ११० ॥

मग तें तत्त्व वदावें विवरुनि । यद्विज्ञानीं ज्ञानि मग्न मुनि ॥
ज्ञानभक्तिविज्ञानविरागा । सकल सांगणें सहित विभागां ॥
रामरहस्यां अनेक अपरां । प्रभु! अति विमलविवेकी! विवरा ॥
नाथ! न जें मज पुसतां आलें । ठेवुं नये तें गुप्त दयाळे ॥
त्रिभुवनगुरु तुम्हिं वेद वानती । क्षुद्र जीव किति आन जाणती ॥
प्रश्न उमेचे सहज मनोहर । कपटहीन शिवचित्ता रुचिकर ॥
हर-हृदिं रामचरित सब आलें । प्रेमपुलक लोचनिं जल भरलें ॥
श्रीरघुनाथ - रूप हृदिं आलें । परमानंद अमित सुख झालें ॥

दो. :- बुडे ध्यानरसिं दुघडि मन मग भानावर नेति ॥
रघुपति चरित महेश तैं हर्षे वर्णूं घेति ॥ १११ ॥

(९) तसेच ज्या तत्वाच्या विशेष ज्ञानात (विज्ञानात – स्वानुभवात, साक्षात्कारात) ज्ञानी मुनी मग्न असतात ते तत्व विवरण करून सांगावे ॥ १ ॥ (१०) तसेच वैराग्य, ज्ञान, विज्ञान व भक्ती यांचे विवरण सुद्धा त्यांच्या विभागांसह सांगावे ॥ २ ॥ (११) हे विमल विवेकी प्रभो ! इतर जी अनेक राम रहस्ये असतील ती विवरण करुन सांगावी ॥ ३ ॥ (१२) नाथ ! (प्रभू, स्वामी) जे मला विचारता आले नसेल ते सुद्धा आपण दयाळु असलेने गुप्त ठेवूं नये ॥ ४ ॥ आपण त्रिभुवनाचे गुरु आहांत असे वेदच म्हणतात, (तेव्हा) इतर क्षुद्र जीव ते काय व किती जाणणार ! ॥ ५ ॥ हे उमेचे सहज व मनोहर प्रश्न कपटहीन असल्यामुळे शिवचित्तास रुचकर वाटले. ॥ ६ ॥ हरांच्या हृदयात सर्व रामचरित्र आले (आठवले) प्रेमाने शरीरावर रोमांच आले व डोळे पाण्याने भरले ॥ ७ ॥ नंतर श्री रघुनाथाचे रुप हृदयात आले व परमानंद मग्न होऊन अमित अपार सुख झाले. (त्या अमित सुखाच्या विचारात भान न राहील्याने की काय कोण जाणे !) त्या विशाल तेजस्वी रघुनाथ रुपाच्या ध्यानरसात शंकरांचे मन दोन घटका बुडाले, मग त्यांनी ते भानावर आणले आणि महेशांनी हर्षाने रघुपतिचरित्र वर्णन करण्यास प्रारंभ केला ॥ दो० १११ ॥

मिथ्यहि सत्य गमे ज्या नेणुनि । जसा भुजंग, न रज्जु ओळखुनि ॥
लया जाइ जग जया जाणतां । स्वप्नींचा भ्रम जसा जागतां ॥
वंदु बालरूपा त्या रामा । सिद्धि सुलभ जपतां यन्नामा ॥
मंगलभवन अमंगलहारी । तो द्रवु दशरथ-अजिर विहारीं ॥
प्रणमुनि रामाला त्रिपुरारी । हर्षित सुधागिरा उद्‍गारी ॥
धन्य धन्य गिरिराज-कुमारी । तुम्हां समान न कुणि उपकारी ॥
पुसिले रघुपति कथा-प्रसंगां । सकललोक पावनि जग गंगा ॥
तुम्हि रघुवीरचरणिं अनुरागी । पुसले प्रश्‍न जगत-हित-लागी ॥

दो. :- रामकृपेनें पार्वती स्वप्निंहि तव मनिं कांहिं ॥
शोक मोह संदेह वा भ्रम मज वाटे नाहिं ॥ ११२ ॥

शिवगीता – रज्जू = दोरी न ओळखल्याने जसा भुजंग खरा वाटतो, तसेच ज्याला न जाणल्यामुळे मिथ्या असलेले जग सुद्धा सत्य वाटते. ॥ १ ॥ ज्यास जाणल्याने सर्व जग लयास जाते तसा स्वप्नातला भ्रम जागृती आल्याने – जागृत झाल्याने जातो. ॥ २ ॥ ज्याच्या नामाचा जप केल्याने सर्वसिद्धी सुलभ होतात त्याच रामाच्या बालरुपाला मी नमस्कार करतो. ॥ ३ ॥ अमंगलाचा नाश करणारे, व मंगलाचे माहेरघर असे जे दशरथाच्या अंगणात विहार करणारे (राम) ते दया करोत. ( त्यांना द्रव फुटो. ) ॥ ४ ॥ त्रिपुरारींनी रामाला प्रणाम करुन हर्षित होऊन अमृतरुप वाणी उद्गारली ॥ ५ ॥ अहो गिरिराजकुमारी ! तुम्ही धन्य आहांत, धन्य आहांत, कारण तुमच्यासारखा उपकारी कोणी नाही. ॥ ६ ॥ तुम्ही जे रघुपती कथा – प्रसंग विचारलेत ती सकल लोकांना पावन करणारी जंगम ( जग ) गंगा आहे. ॥ ७ ॥ तुमचा रघुवीर चरणाच्या ठिकाणी अनुराग आहे, पण तुम्ही जगाच्या हितासाठी प्रश्न विचारलेत ॥ ८ ॥ पार्वती ! मला तर वाटते की राम कृपेने तुमच्या मनात शोक मोह संदेह किंवा भ्रम इत्यादि काही नाही ॥ दो० ११२ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP