॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ३ रा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

वंदु अयोध्यापुरी सुपावनि । शरयू - सरि कलि - कलुष - विनाशनि ॥
पुन्हां प्रणमतो पुरनारीनर । प्रभु ममता थोडी ना ज्यांवर ॥
सिय-निंदक-अघ-ओघ नाशिले । शोक हरुनि निजलोकिं वसविले ॥
वंदे कौसल्या दिक् पूर्वा । सकल जगीं यत्कीर्ति अपूर्वा ॥
प्रगट जिथुनि रघुपति शशि चारू । विश्व-सुखद खलकमल-तुषारू ॥
दशरथ नृप सह राण्या सकला । गणुनि मूर्ति शुभ पुण्य मंगला ॥
नमन वाङ्‍मनें करांस जोडुनि । कृपा करा सुत-सेवक जाणुनि ॥
ज्यांस निर्मुनी धन्य विधाता । महिमा - सीम राम - पितृमाता ॥

सो. :- वंदुं अयोध्यापाल प्रेम सत्य ज्यां रामपदि ॥
विरहित दीनदयाल प्रिय तनु तृणसम परिहरिलि ॥ १६ ॥

श्रीसीताराम-धाम्-परिवारादि वंदन –
आता मी अतिपावन अशा अयोध्यापुरीला व कलियुगातील सर्व पापांचा विनाश करणार्‍या शरयू - सरयू नदीला वंदन करतो. ॥१॥ मी पुन्हा अयोध्यापुरीला व तेथील नरनारींना वंदन करतो (कारण) त्यांच्यावर प्रभुरामचंद्रांची ममता (प्रीती) थोडी थोडकी नाही ! (अपार आहे)॥२॥ (शरयुसहित त्या पुरीने) सीता निंदकांचे पापांचे प्रवाह नाहीसे केले व रामचंद्रांनी त्यांचा शोक हरण करुन त्यांना आपल्या लोकात वसविले. ॥३॥ जिची अपूर्व कीर्ती सर्व जगात पसरली त्या कौसल्यारुपी पूर्व दिशेला मी वंदन करतो. ॥४॥ कारण तेथूनच रघुपती रूपी चारू (निर्दोष) चंद्र प्रगट झाला. जो सर्व विश्वाला सुख देणारा व खलरुपी कमलांचा हिमा (तुषारा) प्रमाणे नाश करता झाला.॥५॥ दशरथ राजा व त्यांच्या सर्व राण्या यांना पुण्याच्या व शुभ मंगलाच्या मूर्ती मानून मी मनाने वाणीने व हात जोडून (कर्माने) नमस्कार करतो. मी आपल्या पुत्राचा सेवक आहे हे जाणून (तुम्ही सर्व) माझ्यावर कृपा करा.॥६-७॥ मोठेपणाची परमावधि अशा राममातांना व पित्याला निर्माण करून ब्रह्मदेवाला सुद्धा धन्यता मिळाली. ॥८॥ सो. - रामचंद्रंच्या पदांच्या ठिकाणी ज्यांचे सत्य प्रेम होते त्या अयोध्यापती दशरथ राजाला मी वंदन करतो. दीनदयाळू रामाचा विरह होताच त्यांनी आपल्या प्रिय देहाचा तृणाप्रमाणे त्याग केला ॥१६ सो.॥

प्रणमन परिजन सहित विदेहा । गूढ रामपदिं करि जो स्नेहा ॥
योग ठेविला भोगीं लपवुनि । प्रगट सपदिं तो रामा निरखुनि ॥
प्रणमीं प्रथम भरत चरणांनां । वर्णवे न यद्‍व्रत - नेमांनां ॥
यन्मन रामपदांबुजिं राहि । लुब्ध मधुपसें त्यजि न जराही ॥
वंदे लक्ष्मण पदजलजाते । शीतल सुभग भक्त - सुखदाते ।
रघुपति कीर्ति - पताके विमले । ज्यांचें यश दंडासम बनलें ॥
शेष सहस्त्रशीर्ष जग - कारण । जो अवतरला भू-भय-दारण ॥
सदा प्रसन्न असो माझ्यावर । कृपसिंधु सौमित्रि गुणाकर ॥
रिपुसूदन - पदकमल नमामी । शूर सुशील भ्ररत - अनुगामी ॥
महावीर विनवूं हनुमाना । स्वयें राम करि यद्यश - गाना ॥

सो.- प्रणमूं पवनकुमार खल - वनपावक बोध - घन ॥
ज्याचें हृदयिं अगार करिति राम शर - चाप - धर ॥ १७ ॥

ज्यांचे रामचरणीं गुप्त प्रेम होते त्या विदेहराजांना त्यांच्या परिवारासहित मी प्रणाम करतो.॥१॥ त्यांनी आपला योग (ज्ञान) भोगात लपवून ठेवला होता पण रामचंद्रांस पाहताच तो प्रगट झाला.॥२॥ ज्यांच्या व्रतनेमादिकांचे वर्णन करता येत नाही त्या भरताच्या चरणांना प्रथम वंदन करतो.॥३॥ त्यांचे मन रामचंद्रांच्या पदकमलात मधुपाप्रमाणे लुब्ध होऊन राहते व ते त्यांचे सानिध्य कधी जरा सुद्धा सोडत नाही.॥४॥ जे शीतल, सुंदर व भक्तांना सुखदाते आहेत त्या लक्ष्मणाच्या पद-कमलांना मी वंदन करतो.॥५॥ रघुपतीच्या कीर्तीरुपी विमल पताकेला ज्यांचे यश दंडासमान झाले;॥६॥ जे हजार मस्तकांचा शेष किंवा जगाचे कारण असून भूमिभयहरण करण्यासाठी अवतरले ॥७॥ ते कृपासिंधु, गुणसागर सुमित्रातनय माझ्यावर सदा प्रसन्न असोत.॥८॥ शूर सुशील व भरतसेवक अशा शत्रुघ्नाच्या पदकमलांना मी वंदन करतो.॥९॥ रामचंद्रांनी स्वत: ज्यांचे यश वाखाणले त्या महावीर हनुमंताला मी विनवितो. ॥१०॥ दो० - सो-खलरुपी अरण्याला जे अग्निसारखे आहेत, जे ज्ञानघन आहेत व ज्यांच्या हृदयरूपी घरात धनुष्य-बाण धारण करणारे रामचंद्र राहतात त्या पवनकुमाराला मी प्रणाम करतो.॥सो. १७॥

कपि-पति रीस - निशाचर - राजां । अंगदादि सब कीश - समाजा ॥
वंदे शुभचरणीं सर्वांना । प्राप्त राम ज्या अधम तनूनां ॥
रघुपतिचरण - उपासक नाना । खग - मृग देव दनुज मनुजांना ॥
नमितो पदसरसिजिं सर्वांचे । जे अकाम किंकर रामाचे ॥
शुकसनकादि भक्त मुनि नारद । जे मुनिवर विज्ञान विशारद ॥
नमुं सकलां शिर ठेवुं धरणिवर । करा कृपा जन जाणुनि मुनिवर ॥
जनकसुता जगजननि जानकी । कृपानिधान - प्रिय अतिशय कीं ॥
तिचे विनवितो युग - पद-कमलां । जिचे कृपें मति पावुं निर्मला ॥
तन मन वचनिं अतां रघुनायक । चरण - कमल वंदे सब लायक ॥
राजिवलोचन धृत - धनुसायक । भक्तविपद् - भंजक सुखदायक ॥

दो० :- गिरा अर्थ जलवीचि सम म्हणती भिन्न न भिन्न ॥
वंदे सीता - रामपद परम जयां प्रिय खिन्न ॥ १८ ॥

कपिपती सुग्रीव, रीसराजा जांबवान, निशाचर-राजा बिभीषण, अंगद व सर्व वानर समूह यांच्या शुभ पायांना मी वंदन करतो कारण त्या सर्वांचे देह अधम असून सुद्धा त्यांना रामाची प्राप्ती झाली ॥१-२॥ पक्षी, पशु देव, दानव, मानव जे कोणी रघुपतीचे चरणोपासक झाले व जे कोणी रामाचे कामनारहित दास झाले (असतील वा होतील) त्या सर्वांच्या चरण कमलांना मी वंदन करतो. ॥३-४॥ मुनिश्रेष्ठ असून विज्ञान विशारद असून जे भक्त आहेत त्या श्री शुकाचार्य, सनक, सनंदन, सनातन, सनत्कुमार व नारद सर्वांना मी मस्तक महीवर ठेऊन (लऊन) नमस्कार करतो. मुनिश्रेष्ठ हो ! मला सेवक जाणून माझ्यावर कृपा करावी.॥५-६॥ जनकाची मुलगी, जगताची जननी ती जानकी, जी कृपा-निधान रामचंद्रास अतिशय प्रिय आहे (व जिला कृपानिधान रामचंद्र अतिशय प्रिय आहेत) ॥७॥ तिच्या दोन्ही चरणकमलांना मी विनवितो. कारण तिच्या कृपेने मला निर्मल मती प्राप्त होईल. ॥८॥ आता, ज्यांचे नेत्र कमलासारखे आहेत, जे भक्तांच्या विपत्तींचा विनाश करून त्यांस सुख देतात, ज्यांनी धनुष्य बाण धारण केले आहेत व जे सर्व प्रकारे समर्थ आहेत त्या रघुनायकाच्या चरणकमलांना मी मनाने, वाणीने व शरीराने (कर्माने) वंदन करतो॥९-१०॥ दोहा- वाणी व तिचा अर्थ आणि पाणी व त्याच्या लाटा ही जशी बोलण्यातच भिन्न आहेत, पण तत्वत्: भिन्न नाहीत त्या प्रमाणेच असणार्‍या सीतारामांच्या पदांना मी वंदन करतो, त्यांना दीन परमप्रिय असतात. ॥दो. १८॥

वंदे नाम राम रघुवरचे । हेतु कृशानु भानु हिमकरचे ॥
विधिहरिहरमय वेद प्राण तें । अगुण अनूपम गुण-निधान तें ॥
महामंत्र जो महेश जपती । काशीं मुक्ति - हेतु उपदिशती ॥
महिमा जाणति गणपति नामी । प्रथम पूज्य हा प्रताप नामीं ॥
आदिकविहि तत्प्रताप जाणे । उलटा जपुनी विशुद्धि बाणे ॥
‘नामसहस्रासम’ शिववाणीं । जपुनि जेवि पतिसवें भवानी ॥
प्रेम हृदयि हेरुनि हर हर्षति । स्त्री स्त्रीभूषण भूषण बनवति ॥
शंभुस नामीं प्रताप सुविदित । काळकुटें फळ सुधा समर्पित ॥

दो० :- वर्षाऋतु रघुपति - भक्ति तुलसी शालि सुदास ॥
रामनाम - वरवर्णयुग श्रावण भादव मास ॥ १९ ॥

रामनामवंदन - रघुवराचे नाम जे राम त्याला मी वंदन करतो, ते कृशानु (अग्नि), भानु-सूर्य व हिमकर-चंद्र यांचे कारण (हेतू) बीज आहे ॥१॥ ते रामनाम ब्रह्मा वष्णु महेशमय जो वेद प्राण म्हणजे प्रणव-ओंकार तो आहे; व ते गुणरहित व अनुपम गुणांचे निधान आहे ॥२॥ जो महामंत्र महेश (सदा) जपत असतात व काशीत मुक्ती देण्यासाठी ते त्याचा उपदेश करतात तो ’राम’ मंत्रच ॥३॥ (राम) नामाचा महिमा गणपती चांगला जाणतात (कारण) प्रथम पूज्य झाले हा नामाचाच प्रताप होय ॥४॥ आदि कवि वाल्मीकी रामनामाचा प्रताप चांगला जाणतात (कारण) उलट्या रामनामजपाने ते विशुद्ध झाले ॥५॥ रामनाम विष्णुसहस्त्रनामाच्या तोडीचे आहे या शिववचनाने भवानी त्याचा जप करुन आपल्या पतीबरोबर जेवली ॥६॥ पार्वतीच्या हृदयातील रामनामप्रेम पाहून शंकरांना हर्ष झाला व स्त्री भूषण असलेली स्त्री आपले भूषण बनविली (मांडीवर घेतली). रामनामाचा प्रताप शंकरास उत्तम कळला आहे कारण त्यास काळकूट विषाने अमृत फळ दिले॥८॥ दोहा – तुलसीदास म्हणतात की रघुपतीची भक्ती हा वर्षाऋतू आहे, उत्तम रामभक्त हे साळीचे पीक आहे व रामनामातील श्रेष्ठ अशी दोन अक्षरे हे श्रावण व भाद्रपद हे दोन महिने आहेत. (हे दोन कोरडे झाले की साळीचे पीक निष्फळ) ॥दो. १९॥

दोन्हि अक्षरें मधुर मनोहर । वर्ण विलोचन दास - जीव तर ॥
स्मरत सुलभ सकलां सुखदायक । लाभ लोकिं परलोक - निभावक ॥
स्मरत वदत परिसत अतिशोभन । तुलसी-प्रिय सम राम नि लक्ष्मण ॥
वर्णत वर्णा प्रीति न टिकते । ब्रह्मजीव सम सखे सहज ते ॥
नर नारायण सम सुभ्राते । जग - पालक दासां सुत्राते ॥
भक्ति सुस्त्रि कल कर्ण - विभूषण । विश्वहितार्थ विमल विधुपूषण ॥
स्वाद-तोष सम सुगति सुधेचे । कमठ - शेष सम धर वसुधेचे ॥
जन मन कंज मंजु मधुकरसे । जीभ यशोदे हरि - हलधरसे ॥

दो- :- छत्र एक पर मुकुटमणि वर्ण - शिरीं बसतात ॥
रघुवर - नाम - वर्णयुग तुलसी विराजतात ॥ २० ॥

दोन्ही अक्षरे मधुर व मनोहर आहेत. वर्णादिकांत पाहण्यासाठी दोन डोळे असून दासांचे तर जीव की प्राण आहेत ॥१॥ ते स्मरण करण्यात सुलभ असून सर्वाना सुख देणारे आहेतच. या लोकातील (ऐहिक) लाभ देऊन परलोकाचा (मोक्षादिकांचा) निर्वाह करणारे आहेत ॥२॥ ती दोन अक्षरे उच्चार ऐकण्यास व स्मरण करण्यास अतिचांगली आहेत. तुलसीदासाला तर राम आणि लक्ष्मण यांच्या इतके प्रिय आहेत ॥३॥ या अक्षरांचे पृथक पृथक (वेगवेगळे) वर्णन करण्याने प्रीती टिकत नाही. कारण ते वर्ण ब्रह्म व जीव यांच्या सारखे सहज सखे आहेत. ॥४॥(म आणि रा हे दोन वर्ण) नर - नारायणासारखे उत्तम बंधू असून ते जगाचे पालक व हरिभक्ताचे विशेष संरक्षक (त्राते) आहेत.॥५॥ ते भक्तीरुपी सुंदर सौभाग्यवती स्त्रीच्या कानातील कर्णभूषणे आहेत व जगाच्या कल्याणासाठी निर्मल निर्दोष चंद्र व निर्दोष सूर्यासारखे आहेत.॥६॥ सद्‍गती रुपी सुधेच्या स्वाद व तोषासारखे हे दोन वर्ण आहेत आणि कूर्म व शेष यांच्यासारखे वसुधेला धरण करणारे आहेत.॥७॥ दासाच्या मनरुपी सुंदर कमलात हे दोन वर्ण सुंदर मधुकर आहेत आणि जीभरुपी यशोदेला हरी (कृष्ण) व हलधरसारखे (बलराम) आहेत.॥८॥ दोहा – सर्व वर्णांच्या डोक्यावर जे छत्र व मुकुटासारखे बसतात ते, तुलसीदास म्हणतात की रघुवर नामाचेच दोन वर्ण (तसे) विराजतात. ॥दो. २०॥

समजत सदृश नाम नी नामी । प्रीति उभयतां प्रभु - अनुगामी ॥
नामरूप युग ईश - उपाधी । अकथ अनादि विवेकी साधी ॥
गुरु लघु कोण वदत अपराधू । श्रवत भेद गुणिं समजति साधू ॥
नामाधीन रूप परि राही । रूप - समज नामाविण नाहीं ॥
रूपविशेष, न नाम जाणतां । करतलगतहि, न ये ओळखतां ॥
रूप न दिसतां स्मरण नाम करि । स्नेहें हृदयीं रूप येत तरि ॥
नाम-रूप गति अकथ, कहाणी । समजत सुखद, न वदवे वाणीं ॥
अगुणीं सगुणीं नाम सुसाक्षी । उभां प्रबोधक चतुर दुभाषी ॥

दो० :- रामनाम मणि दीप धर जीभ देहलीं द्वार ॥
तुलसी अंतर्बाह्य जर इच्छा प्रकाश फार ॥ २१ ॥

नाम आणि नामी हे दोन्ही सारखे वाटतात (पण) दोघांमध्ये स्वामी व सेवक यांच्यासारखे परस्पर प्रेम आहे.॥१॥ नाम व रुप या दोन्ही ईशाच्या उपाधि आहेत व त्या अकथनीय व अनादि आहेत हे विवेकी मनुष्य समजतो या दोहोत श्रेष्ठ कोण व कनिष्ठ कोण हे सांगणे हा अपराध आहे, पण गुणांतील भेद ऐकला म्हणजे साधूंना कळेल.॥३॥ पण रुप नामाच्या आधीन असते कारण रुपाचे ज्ञान नामाशिवाय होत नाही.॥४॥ एखादे विशेष रुप (पदार्थ) हाताच्या तळव्यावर जरि असेल तरी नाम माहित नसेल तर ते ओळखता येत नाही. ॥५॥ (उलट) रूप न पाहता सुद्धा जर स्नेहाने नाम स्मरण केले तर त्या स्नेहाच्या योगाने ते रुप हृदयात येते प्रगट होते.॥६॥ नाम व रुप यांची गति अकथनीय आहे ती कहाणीने समजते आणि समजल्याने (अनुभव आला म्हणजे) सुखद आहे; पण शब्दांनी वर्णन करता येणे शक्य नाही ॥७॥ अगुण ब्रह्म व सगुण ब्रह्म (राम) यांच्यात नाम सुंदर साक्षी आहे व दोघांचा प्रबोध करणारा चतुर दुभाषी आहे.॥८॥ दोहा – तुलसीदास म्हणतात (हे मना !) आत व बाहेर पुष्कळ प्रकाश पडावा अशी तुला इच्छा असेल तर जीभरुपी दाराच्या उंबरठ्यात रामनामरुपी मणिदीप सदैव धर, (ठेव) ॥दो. २१॥

नाम जपुनि मुखिं जागे योगी । विरत विरंचि प्रपंच वियोगी ॥
ब्रह्मसुखा अनुभवि अनुपम जें । अकथ अदोष, न नाम रूप तें ॥
गूढ गती जे जाणूं पाहति । नाम जिभेनें जपतां जाणति ॥
नाम जपति साधक लय लावुनि । होति सिद्ध अणिमादिक लाहुनि ॥
भक्त आर्त अति नामा जपती । होती सुखी सुसंकट टळती ॥
रामभक्त जगिं चतुः प्रकारीं । सुकृती अनघ उदारहि चारी ॥
नामाधार चहूं चतुरांप्रति । ज्ञानी प्रभुस विशेषें प्रिय अति ॥
नामप्रभाव वेदिंहि चहुंयुगिं । आन उपाय न विशेष कलियुगिं ॥

दो० :- सकलकामनाहीन जे रामभक्तिरसलीन ॥
नाम प्रेमसुधार्‍हदी त्यानिंहि कृत मन मीन ॥ २२ ॥

मुखाने (जिभेने) नामजप करुन योगी (जपयोगी) जागा होतो आणि विरक्त विरंचीच्या प्रपंचापासून वियोगी होतो.॥१॥ तो अनिर्वचनीय मायादी दोष रहित व नामरुपरहित अशा अनुपम ब्रह्मसुखास अनुभवतो. ॥२॥ गूढ गतीना जाणण्याची ज्यांची इच्छा असेल ते जर जिभेने नामजप करतील तर त्या गतीस जाणू शकतील॥३॥ साधक जर लय लावून नामजप करतील तर अणिमादिक अष्टमहासिद्धी मिळून ते सिद्ध होतील ॥४॥ अति आर्त झालेले भक्त जर अति नामजप करतील तर अतिसंकटे टळून ते सुखी होतील॥५॥ जगात चार प्रकारचे रामभक्त असतात व ते चौघेही पुण्यवान, निष्पाप व उदार आहेत.॥६॥ (कारण) या चतुरांना (चौघांना) नामाचाच आधार असतो; तथापि या चौघात ज्ञानीभक्त प्रभूला विशेष करुन अति प्रिय असतो ॥७॥ चारी वेदांमध्ये चारी युगात नामाचा प्रभाव आहेच; तरीपण कलियुगात दुसरा विशेष उपाय नाही.॥८॥ दोहा- जे सर्व कामनांपासून मुक्त झाले असून रामभक्तीरसात लीन असतात, त्यांनीही नामाच्या प्रेमाच्या अमृत डोहात आपले मन मासा बनविलेले असते. (मग इतरांनी नाम न घेतले तर त्यांस सुख कसे होणार?) ॥दो. २२॥

ब्रह्मरूप दो निर्गुण सगुणहि । अनुपम अकथ अनादि अगाधहि ॥
दोघांहुनि गुरु नाम मम मतें । जें उभयां निजबलवश करतें ॥
प्रौढि सुजन माना न जनाची । रति रुचि वदें प्रतीति मनाची ॥
एक दारुगत दिसतो एक । पावकयुगसा ब्रह्मविवेक ॥
उभय अगम युग नामें सुगमचि । ब्रह्म राम यांहुनि गुरु नामचि ॥
व्यापी ब्रह्म एक अविनाशी । सच्चिद्‍घन आनंदसुराशी ॥
असुनि असा प्रभु हृदिं अविकारी । दुःखदैन्य जग - जीवां भारी ॥
नाम निरूपण सुयत्‍न घडतो । होई मणिमूल्यसा प्रगट तो ॥

दो० :- अगुणाहुनि नामीं असा महा प्रभाव अपार ॥
नाम थोर रामाहुनी वदूं स्वमतिअनुसार ॥ २३ ॥

ब्रह्माची निर्गुण व सगुण अशी दोन स्वरुपे आहेत. दोन्ही अनुपम, अनिर्वचनीय, अनादि व अगाध आहेत.॥१॥ त्या दोघांहुन माझ्या मताने नाम मोठे आहे, कारण ते आपल्या बळाने दोघांनाही वश करते.॥२॥ सज्जन हो ! मी ही प्रौढी मिरवितो असे वाटून घेऊ नका, (कारण) मी आपल्या मनाची रुचि, प्रीती व प्रतीती सांगितली. (एवढेच.)॥३॥ एक अग्नि काष्ठात असतो, व एक दिसूं शकतो हे जसे तसेच निर्गुण ब्रह्म व सगुण ब्रह्म यांचा विवेक वा ज्ञान आहे.॥४॥ दोन्ही ब्रह्म अगम्यच आहेत; पण नामाने दोन्ही सुगम होतात; म्हणून म्हटले की राम नाम ब्रह्म (निर्गुण) व राम (सगुण) या दोहोहून मोठे आहे.॥५॥ ब्रह्म एक व्यापक अविनाशी सच्यिदधन व आनंदाची श्रेष्ठ रास (आनंदघन) आहे.॥६॥ असा अविकारी प्रभु सर्वांच्या हृदयात असता जगातील सर्व जीव फार दीन व दु:खी आहेत. ॥७॥ तो हृदयात असणारा प्रभु नाम निरुपण व उचित यत्‍न केला म्हणजे प्रगट होतो, जसे मण्याचे मूल्य प्रकट होते (मिळते). ॥८॥ दो. याप्रमाणे नामाचा प्रभाव निर्गुण ब्रह्माहुन मोठा अपार आहे आता अवतारापेक्षा रामापेक्षा सुद्धा नाम मोठे आहे हे माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतो. ॥दो. २३॥

रामभक्तहित मानवतनुधर । सहुनि संकटें भक्तां सुखकर ॥
प्रेमें जपतां नाम. विनाश्रम । भक्त बनति मुदमंगल‍आश्रम ॥
राम एक मुनि - नारी तारी । नाम कोटिखलकुमति सुधारी ॥
ऋषिहित रामें सुकेतुतनया । सहित सैन्य सुत नेली विलया ॥
दास दुराशा सदुःखदोषां । ध्वंसी नाम जसा रवि दोषा ॥
रामें स्वतां भग्न भवचापहि । भवभयभंजन नामप्रतापहि ॥
प्रभु दंडकवन करिति सुशोभन । जनमन‍अमित नाम करि पावन ॥
निशिचरनिकर दलिति रघुनंदन । नाम सकल कलि कलुष निकंदन ॥

दो० :- शबरी गृध्र सुसेवकां सुगति देति रघुनाथ ॥
नाम अमित खल उद्धरी वेद वदति गुणनाथ ॥ २४ ॥

रामानी भक्तांच्या हितासाठी नरशरीर धारण केले व अनेक संकटे सोसून भक्ताना-संतांना सुखी केले.॥१॥ पण नामाचा जप प्रेमाने केल्यास काही श्रम न पडता जापक आनंदमंगलांचे निवासस्थान बनतात॥२॥ रामांनी एका मुनीच्या स्त्रीचा उद्धार केला तर नामाने कोट्यावधी खलांच्या कुमतिरुपी स्त्रिया सुधारल्या.॥३॥ विश्र्वामित्र ऋषीच्या हितासाठी रामाने सुकेतूची मुलगी ताडका तिला तिच्या सैन्यासह व मुलांसह विलयास नेली.॥४॥ पण सूर्य जसा रात्रीचा विध्वंस करतो त्याप्रमाणे रामनाम दासांच्या दुराशेचा दोष व दु:खांसह नाश करते.॥५॥ रामाने स्वत: भवाचे (शिवाचे) धनुष्य मोडले (पण) नामाचा प्रताप भव-भयाचा विनाश करतो.॥६॥ प्रभु रघुवीराने (एक) दंडकारण्य सुशोभित केले. पण रामनामाने अगणित दासांची मनरुपी दंडकारण्ये पावन केली.॥७॥दंडकारण्यात रामाने निशाचर समूहाचा नाश केला, पण नाम सर्वच कलिमलांचा नि:शेष नाश करणारे आहे. ॥८॥ दो.-रघुनाथाने गृध्र जटायू व भिल्लिण शबरी या चांगल्या सेवकांना सद्गती दिली पण नामाने अगणित खलांचा उद्धार केला. अशा गुणकथा वेदांमध्ये सुद्धा वर्णिल्या आहेत.॥दो. २४॥

राम सुकंठा बिभीषणासी । राखिति शरण विदित सर्वांसी ॥
करि गरिबीं बहु नाम कृपा, जें । ब्रीद लोकिं वर वेदिं विराजे ॥
राम भल्लकपिकटक जमवती । श्रम सेतूस्तव अल्प न करती ॥
नाम घेत सुकती भव सागर । सुजन विचार करा मनिं नागर ॥
रामें निहत सकुल रणिं रावण । कृत सह सीते स्वपुरिं पदार्पण ॥
राजाराम अवध नृप-धानी । गुण गाती सुर मुनिवर वाणीं ॥
प्रेमें सेवक नामा स्मरती । प्रबल मोहदल अश्रम जितती ॥
प्रेम-मग्न फिरती स्वेच्छेनें । स्वप्निंहि शोक न नामकृपेनें ॥

दो० :- ब्रह्मरामगुरु नाम दे वरदांत्या वरदान ॥
रामचरित शतकोटितुनि गणि महेश घे प्राण ॥ २५ ॥

रामचंद्रांनी सुग्रीव व बिभीषण या दोन शरणागतांचे रक्षण केले, हे सर्वांना माहीत आहे.॥१॥ पण नामाने कितीतरी गरीबांवर दया कृपा केली आहे, हे नामाचे उत्तम ब्रीद लोकांत व वेदांतही विराजत आहे.॥२॥ रामांनी रीस वानरांचे सैन्य गोळा केले, आणि सेतू बांधण्यासाठी थोडे थोडके श्रम नाही पडले !॥३॥ पण नाम घेतल्याने भवसागरच सुकून जातात तेव्हा सुजनहो, तुम्ही आपल्या मनीच चांगला विचार करा ॥४॥ रामचंद्रांनी रावणाचा त्याच्या सर्व कुलासह लढाईत नाश केला व मग सीतेसहीत आपल्या नगरीत प्रवेश केला.॥५॥ रामचंद्र राज्यावर बसले व अयोध्या त्यांची राजधानी झाली व सुर व मुनीवर त्यांचे उत्तम गुण सुंदर वाणीने गाऊ लागले.॥६॥ परंतु रामसेवक जर प्रेमाने नामस्मरण जप करतील तर कोणत्याही प्रकारचे श्रम न करता, प्रबल मोह-मद-कामादिक राक्षस त्यांच्या सैन्यासह सहज जिंकले जातात.॥७॥ व ते सेवक प्रेममग्न होऊन स्वेच्छेने वाटेल तेथे विहार करूं लागतात, त्यास नामकृपेने स्वप्नात सुद्धा शोक होत नाही.॥८॥ दोहा- ब्रह्म (निर्गुण) व राम (सगुण व अवतार) या दोघांहून नाम मोठे आहे. ते वरदात्यांनाही वरदान देणारे आहे; म्हणून महेशांनी शतकोटी रामायणातून आपला जीव की प्राण जाणून फक्त ’राम’ हे नाम घेतले.॥दो.२५॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP