॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय २४ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

हें सब चरित कथित मी गाउनि । पुढिल कथा ऐका मन लाउनि ॥
ज्ञानी विश्वामित्र महा मुनि । विपिनिं वसति आश्रम शुभ जाणुनि ॥
तिथं जप यज्ञ योग मुनि करती । अति मारीच सुबाहुसि डरती ॥
देखत यज्ञ निशाचर धावति । त्रास देति मुनि दुःखां पावति ॥
गाधिज-चित्ता चितां व्यापी । हरिविण मरति न निशिचर पापी ॥
तैं मनिं मुनिवर करिति विचारा । प्रभु अवतीर्ण हरण महिभारा ॥
याचमिषें जाउन पद बघतो । विनति करून दो बंधु आणतो ॥
ज्ञान विराग सकल गुण अयना । प्रभुस बघेन भरुन मी नयनां ॥

दो० :- बहुविध करत मनोरथां जातां न लगे वार ॥
करुनी सरयू-स्नान गत जेथें राजद्वार ॥ २०६ ॥

विश्वामित्रयज्ञ संरक्षण व अहल्योद्धार -
हे सर्व चरित्र विस्तारपूर्वक सांगितले, आता पुढील कथा मन लावून श्रवण करा. ॥ १ ॥ ज्ञानी विश्वामित्र महामुनी शुभ आश्रम आहे हे जाणून अरण्यात रहात असतात ॥ २ ॥ तिथे त्या ( सिद्धाश्रमांत ) जप, यज्ञ, योग ( इ. साधने ) करीत असत पण त्यांना मारीच व सुबाहू यांचे अती भय वाटत असे ॥ ३ ॥ यज्ञाचा धूर दिसताच ते निशाचर धावून येत व त्रास देत असत व मुनीना पुष्कळ दु:ख होत असे. ॥ ४ ॥ गाधिपुत्र विश्वामित्रांना चिंता लागली की हे पापी राक्षस हरीशिवाय मरणार नाहीत ॥ ५ ॥ तेव्हा मुनीवर विश्वामित्राने मनात विचार केला महीभारास हरण करणारे प्रभू अवतरले आहेत ॥ ६ ॥ याच निमित्ताने जाऊन प्रभूचे पाय पाहतो आणि विनंती करून दोघा बंधूंना घेऊन येतो. ॥ ७ ॥ ज्ञान, विराग व सकल, गुण यांचे निवासस्थान असणार्‍या प्रभूला मी डोळे भरून पाहीन ॥ ८ ॥ दो०- असे नाना प्रकारचे मनोरथ करीत चालले ( त्यामळे ) पोचण्यास वेळ लागला नाही शरयूत स्नान करुन दरबारीं गेले. ॥ दो० २०६ ॥

मुनि-आगमन कळे जैं राजा । भेटुं जाति सह विप्र-समाजा ॥
करुनि दण्डवत सन्मानें मुनि । निज आसनिं बसवीले आणुनि ॥
प्रक्षालुनि पद कृत अति पूजा । मजसा धन्य आज नहिं दूजा ॥
भोजन नानाविधा घातलें । मुनिवर मनिं अति हर्ष पावले ॥
तनय चारिं घालिति मग पायां । राम बघुनि मुनि विस्मृत काया ॥
मग्न होति देखत मुख-शोभे । जणुं चकोर राकाशशिं लोभे ॥
नृप हर्षित मनिं, वदले वचना । मुनि अशि केली कृपा न कवणा ॥
कवण आपणां येण्या कारण । वदणें, करण्या लाविन वार न ॥
असुर-समूह सताविति मजसी । आलों याचाया नृप तुजसी ॥
मज सानुज रघुनाथा द्यावें । निशिचर वध मी सनाथ व्हावें ॥

दो० :- भूपति! द्या मनिं हर्षुनी त्यजा मोह अज्ञान ॥
धर्म सुयश ही प्रभु तुम्हां यांचे अति कल्याण ॥ २०७ ॥

विश्वामित्र मुनी आले आहेत असे कळताच ( दशरथ ) राजा आपल्या बरोबर विप्रसमाज घेऊन भेटण्यास गेले ॥ १ ॥ दण्डवत प्रणाम करुन मुनींस सन्मानाने आपल्या सिंहासनावर बसविले. ॥ २ ॥ त्यांचे पाय धुवून अत्यंत प्रेमाने आदराने त्यांची पूजा केली ( व म्हणाले ) आज माझ्यासारखा धन्य दुसरा कोणी नाही ॥ ३ ॥ नंतर नाना प्रकारचे भोजन मुनींवरांना मिळाल्याने ते मनात हर्ष पावले ॥ ४ ॥ मग राजाने आपल्या चारी पुत्रांना मुनींचे पायावर घातले रामचंद्रांना पाहताच मुनी देहभाव विसरले ॥ ५ ॥ पौर्णिमेच्या चंद्रावर चकोराने लुब्ध व्हावे तसेच जणूं विश्वामित्रमुनी राममुख शोभा पाहताच मग्न झाले ॥ ६ ॥ ( ते पाहून ) राजाला हर्ष झाला व म्हणाले की मुने, अशी कृपा आपण कोणावरही केली नाही ॥ ७ ॥ आपल्या येण्याचे जे कारण असेल ते सांगावे, ते करण्यास मी वेळ लावणार नाही ॥ ८ ॥ हे राजा ! असुरांचे समूह मला सतावित असतात म्हणून मी तुझ्याजवळ याचना करण्यास आलो आहे. ॥ ९ ॥ अनुजासह रघुनाथ मला द्यावे, म्हणजे निशाचरांचा वध होईल व मी सनाथ होईन. ॥ १० ॥ अहो भूपती ! तुम्ही हर्षित मनाने द्या, मोह व अज्ञान सोडा; त्यामुळे प्रभो ! तुम्हाला धर्म घडेल व सुयश मिळेल व यांचेही अती कल्याण होईल ॥ दो० २०७ ॥

अति अप्रिय वच नृपें परिसलें । हृदयिं कंप मुख-तेज हरपलें ॥
वृद्धपणीं सुत झाले चारी । विप्र वचन वदलां न विचारीं ॥
मागा भूमि धेनु धन कोषा । देऊं आज सर्वस्व सहर्षा ॥
प्रिय न तनूं-प्राणांहुनि कांही । ते मुनि देउं निमिषिं एका ही ॥
प्रिय मज सुत सगळे प्राणासम । स्वामि! न देणें घडे राम मम ॥
कुठें घोर अति कठोर निशिचर । कुठें किशोर परम सुत सुंदर ॥
प्रेम-रसाळा परिसुनि वाणी । ज्ञानी मुनि मनिं मोदा मानी ॥
तैं वसिष्ठ विविधा समजावति । नृप-संदेह विनाशा पावति ॥
आणवि अति सादर दो तनयां । शिकवी विविधा धरुनी हृदया ॥
माझे प्राण नाथ सुत दोनी । तुम्हिं मुनि पिता आन नहिं कोणी ॥

दो० :- नृप सोपवि सुत मुनिकरीं देउनि बहु आशीस ॥
जननि-भवनिं गेले प्रभु निघति नमुनि पदिं शीस ॥ २०८ रा ॥
सो. :- पुरुषसिंह युगवीर हर्षिं निघति मुनिभयहरण ॥
कृपसिंधु मतिधीर अखिल विश्व-कारण-करण ॥ २०८ म ॥

राजाने ते अति अप्रिय भाषण ऐकले, व त्याच्या हृदयाचा थरकाप झाला, मुखकांती कोमेजली ॥ १ ॥ ( राजा म्हणाला ) हे चारी मुलगे मला अगदी म्हातारपणी झालेले आहेत ( हे जाणून सुद्धां ) हे विप्र ! तुम्ही विचारपूर्वक बोलला नाहीत ! ॥ २ ॥ भूमी, धेनू, धन, खजिना इ. हवे ते मागा मी आजच्या आज सर्वस्व सहर्ष देतो ( पण मुले मागू नका ) ॥ ३ ॥ देह व प्राण यापेक्षा अधिक प्रिय असे जगात काही नाही, ते ही एका निमिषात हे मुने ! मी देऊन टाकीन ॥ ४ ॥ सगळेच पुत्र मला प्राणप्रिय आहेत, तरी पण स्वामी ! माझ्या रामाला देणे माझ्याने होणार नाही. ॥ ५ ॥ ते अति घोर कठोर राक्षस कुठे व माझा परम सुंदर व अति किशोर वयीन पुत्र कुठे ? ॥ ६ ॥ दशरथाची ही प्रेमरसाने भरलेली वाणी ऐकून ज्ञानी मुनींना मनांत आनंद मानला ॥ ७ ॥ ( राम देणे घडणार नाही असे राजाने सांगताच ) वसिष्ठांनी राजाची नाना प्रकारे समजूत घातली तेव्हा त्यांचे सर्व संदेह नाश पावले ॥ ८ ॥ ( मग राजाने ) दोन्ही पुत्रांना अत्यंत आदराने आणविले व त्यांना आपल्या हृदयाशी धरुन विविध प्रकारे शिकविले ॥ ९ ॥ ( मग राजा विश्वामित्रास म्हणाले ) हे नाथ ! हे दोन्ही पुत्र माझे प्राण आहेत; मुने ! तुम्हीच आता यांचे पिता आहांत; इतर कोणी नाही ॥ १० ॥ दो० - पुष्कळ आशीर्वाद देऊन नृपाने पुत्रांना मुनीच्या हाती सोपविले. प्रभू आपल्या आईच्या महालात गेले व तिच्या पायांवर मस्तक ठेऊन निघाले ॥ दो० २०८ रा ॥ दोघे पुरुषसिंहवीर मुनीभय हरण करण्यासाठी उत्साहाने निघाले कारण ते कृपासिंधू धीरमती व सर्व विश्वाचे कारण व करण आहेत. ॥ सो. २०८ म ॥

अरुण नयन उर भुजा विशाला । नील जलज-तनु शाम तमाला ॥
कटिं पटपीत कसित वर भाता । रुचिर चाप सायक दो हातां ॥
श्याम गौर सुंदर दोघे अति । विश्वामित्र महानिधि पावति ॥
प्रभु ब्रह्मण्य देव मी जाणें । त्यक्त मदर्थ पिता भगवानें ॥
पथिं जातां ताडके दावि मुनि । रोषें धावत आली ऐकुनि ॥
एकचि बाणें प्राण हरण करि । निज-पद दिधलें दीन बघुनि तरि ॥
तैं ऋषि हृदिं निज नाथ ओळखिति । विद्यानिधिला विद्या अर्पिति ॥
तिनें न लागे क्षुधा तृषा ही । तनुबल अतुल देइ तेजा ही ॥

दो० :- प्रभुस समर्पुनि आयुधें निजाश्रमीं आणून ॥
देति कंद फल भोजना भक्तिप्रिया जाणून ॥ २०९ ॥

रामचंद्रांचे नेत्र तांबूस असून छाती व बाहू विशाल आहेत. शरीर नीलकमलासारखे व श्याम तमालवृक्षासारखे श्यामवर्णी आहे. ॥ १ ॥ कमरेला पीतांबर धारण केला असून (दोघांच्याही) दोन्ही हातात धनुष्य-बाण आहेत.॥ २ ॥ श्याम व गौर वर्णाचे हे अति सुंदर भाऊ विश्वामित्राला महानिधीच मिळाले ॥ ३ ॥ (विश्वामित्र मनात म्हणाले) प्रभू ब्रह्मण्यदेव आहेत हे मी जाणले कारण त्यांनी माझ्या हितासाठी पित्याचाही त्याग केला ॥ ४ ॥ मार्गाने जात असताना मुनींनी ताडका दाखविली, (शब्द) ऐकून ती रोषाने धावतच आली ॥ ५ ॥ एकाच बाणाने (रामांनी) तिचा प्राण घेतला; पण ती दीन आहे असे जाणून तिला निजपद (निर्वाण) दिले. ॥ ६॥ तेव्हा ऋषींनी आपल्या मनात खूणगांठ बांधली की हे आपले नाथ आहेत, व त्या विद्यानिधीला बलातिबला विद्या अर्पण केली ॥ ७ ॥ तिच्यामुळे तहान-भूक लागत नाही व अतुलित शरीर बल व तेज प्राप्त होते. ॥ ८ ॥ प्रभुला सर्व आयुधे समर्पण करुन, आपल्या आश्रमात आणून प्रभू भक्तिप्रिय आहेत हे जाणून कंद फळे भोजनास दिली . ॥ दो०२०९ ॥

रघुपति वदले सकाळिं, कीं मुनि! । यज्ञ करावा निर्भय जाउनि ॥
मुनिसमूह होमा करूं लागति । आपण मख-संरक्षक राहति ॥
क्रोधी मारीचासुर ऐकत । मुनिद्रोहि ये ससैन्य धावत ॥
तया राम फलविण शर मारिति । शतयोजन सागरतटिं टाकिति ॥
पावकशरें सुबाहुस मारी । निशिचर-कटक अनुज संहारी ॥
असुर-वधें द्विज-निर्भय-कारा । स्तवी देव-मुनि-समाज सारा ॥
तेथें रघुराया दिन कांही । राहति करिति दया विप्रां ही ॥
भक्ति-हेतु बहु कथा पुराणें । कथिलीं विप्रें प्रभु जरिि जाणें ॥
वदति आदरें मुनि समजाउनि । च रित एक बघणें प्रभु जाउनि ॥
कळत धनुर्मख रघुकुलनाथा । निघति हर्षित मुनिवर-साथां ॥
आश्रम एक दिसे मार्गां ही! । खग मृग जीव जंतु तिथं नाहीं ॥
बघुनि शिला प्रभु मुनिस विचारति । कथा विशेष सकल, मुनि सांगति ॥

दो० :- गौतमनारी शापवश धरुनि उपल-वपु धीर! ॥
चरण-कमल-रज वांछिते कृपा करा रघुवीर ॥ २१० ॥

सकाळी रघुपती विश्वामित्रांना म्हणाले की आपण जाऊन निर्भयपणे यज्ञ करावा. ॥ १ ॥ मुनींचे समुदाय होम करुं लागले व राम स्वत: यज्ञ संरक्षणासाठी उभे राहीले. ॥ २ ॥ यज्ञ सुरु झाल्याचा ध्वनी ऐकताच मारीच नावाचा क्रोधी - मुनीद्रोही राक्षस आपल्या सैन्यासह चाल करुन आला ॥ ३ ॥ रामचंद्रांनी त्याला अणुकुचीदार नसलेले बोथट बाण मारुन शंभर योजने दूर सागर तीरावर उडवून दिला ॥ ४ ॥ पावक बाणाने सुबाहूस ठार मारला व लक्ष्मणाने सर्व निशाचर - सैन्याचा संहार केला ॥ ५ ॥ असुरांचा वध करून ब्राह्मणांना निर्भय करण्यास सर्व देव मुनी समाज स्तंवू लागला ॥ ६ ॥ रघुराया काही दिवस तेथे राहीले आणि विप्रांवर दया केली ॥ ७ ॥ भक्तीमुळे विश्वामित्राने पुष्कळ कथा व पुराण सांगीतले व प्रभू सर्व जाणत असूनही त्यांनी श्रवण केले ॥ ८ ॥ मग मुनीने आदराने समजावून सांगितले की प्रभो ! जाऊन एक चरित्र पहावे ॥ ९ ॥ धनुष्य-यज्ञाची हकीकत कळताच रघुनाथ हर्षाने मुनिवरां बरोबर निघाले ॥ १० ॥ ( विश्वांमित्रां बरोबर जात असता ) मार्गात एक ( सुंदर परम पावन ) आश्रम दिसला पण आश्चर्य असे की तेथे पशु, पक्षी किंवा इतर कोणतेही जीव जंतू तिथे नव्हते ॥ ११ ॥ ( तेथेच ) एक शीळा दिसली. तेव्हा प्रभूंनी मुनीस विचारले व मुनींनी ती विशेष कथा सविस्तर सांगितली ॥ १२ ॥ ( व म्हणाले ) गौतमपत्‍नी ( अहल्या ) शापामुळे शिला देह धारण करुन राहीली असून हे धीर ! रघुवीरा ! ती आपल्या चरणकमल रजाची इच्छा करीत आहे, तरी तिच्यावर कृपा करा. ॥ दो०२१० ॥

छं. :- स्पर्शत पदपावन शोक-विनाशन ती प्रगटे तप पुंज खरी
देखत रघुनायक जन सुखदायक राहि पुढें कर जुळुनि; परी ।
सुप्रेमाऽधीरा, पुलक-शरीरा शब्द निघे ना मुखीं बळें ॥
अति महा भागिनी पडली चरणीं युगल नेत्रिं जलधार गळे ॥ १ ॥
मनिं धीरा धरुनी प्रभु ओळखुनी भक्तिलाभ रघुपति कृपया ।
अति निर्मल वाणीं स्तवनें वानी ज्ञानगम्य जय रघुवर्या ॥
मी नारि अपावन प्रभु जग-पावन रावणरिपु जन-सुखदा ही
राजीव-विलोचन भवभयमोचन पाहि शरण मीं प्रभु पाही ॥ २ ॥
मुनि शापा वदले उत्तम घडलें परम अनुग्रह गमे मला ।
दिसले भरलोचन हरि भवमोचन हाच लाभ शंकर-रुचला ॥
विनती प्रभुजवळीं बुद्धि बावळी मी न वरा मागें आना ॥
पद-कमल-परागां रस अनुरागा मम मन-मधुप करो पाना ॥ ३ ॥
ज्या पदिं सुरसरिता परम पुनीता प्रगट होइ शिव शिरीं धरी ।
ते हे पद-पंकज जे पूजिति अज धृत मम शिरीं कृपाल हरी! ।
अशि गौतमजाया निघतां जाया पुनः पुन्हां प्रभुपायिं पडे ।
जो मनिं अति भावे तो वर पावे मुदित गमन पति-लोकिं घडे ॥ ४ ॥

दो० :- दीनबंधु हरि असे प्रभु कारणरहित दयाळ ॥
तुलसिदास शठ भज तयां त्यजुनि कपट जंजाळ ॥ २११ ॥

अहल्याकृत (कृत्तिका नक्षत्र) रामस्तुती ---
शोकविनाश करणार्‍या पावन पायाचा स्पर्श होताच ती - अहल्या खरोखर तपोराशीच प्रगट झाली भक्तजनांना सुख देणार्‍या रघुनायकाला पाहताच हात जोडून पुढे उभी राहीली; परंतु अती प्रेमाने अधीर झालेल्या व शरीररोमांचित झालेल्या तिच्या मुखातून प्रयत्‍न करून सुद्धा शब्द बाहेर पडेना; (तेव्हा) ती अती महाभाग्याची - अहल्या प्रभूच्या पाया पडली व तिच्या दोन्ही नेत्रांतून अश्रुधारा वाहू लागल्या ॥ १ ॥ तिने मनात धीर धरला, प्रभूला ओळखले व रघुपतीच्या कृपेने तिला प्रेमभक्तीचा लाभ झाला. (भक्ती मिळाली) नंतर अती निर्मल वाणीने ती स्तुती करुं लागली की ज्ञानानेच जाणल्या जाणार्‍या रघुवरा ! आपला जय असो. मी अपवित्र स्त्री आहे आणि आपण जगाला पावन करणारे प्रभू आहात आणि रावणाचे शत्रू असून आपल्या सेवकांना सुख देणारे आहांत हे राजीव नेत्रा ! भव-भयातून सोडविणार्‍या प्रभो ! मी आपल्याला शरण आले आहे तरी माझे रक्षण करा. रक्षण करा. ॥ छं २ ॥ मुनींनी शाप दिला हे उत्तम घडले, मी त्या शापाला महान अनुग्रह समजते ( कारण त्यामूळे ) भवभयांतून मुक्त करणारे हरी मला डोळे भरून पाहण्यास सापडले हाच लाभ शंकरास रुचला. प्रभो ! मी बुद्धीने बावळी आहे, पण आपल्या जवळ एक विनंती करते की मला दुसरा कोणताही वर नको असून एवढेच पाहीजे की माझ्या मनरूपी मधुपाने आपल्या पदकमलांतील परागांत असलेला अनुरागरुपी रस पान करीत रहावे ॥ छं ३ ॥ ज्या पायांपासून परम पावन अशी सुरसरिता गंगा प्रगट झाली व तिला शिवाने आपल्या शिरावर धारण केली व ज्या पदकमलांचे ब्रह्मदेव पूजन करतात तो हा पाय हे हरी ! तुम्ही कृपालूपणे माझ्या मस्तकावर ठेवलात ! अशा प्रकारे गौतम पत्‍नी जावयास निघाली असता पुन:पुन्हा पाया पडली, तिच्या मनाला जो वर अत्यंत रुचला होता तो तिला मिळाला व तिने पतिलोकास गमन केले. ॥ छं ४ ॥ दो०- प्रभू रामचंद्र-हरी असे दिनबंधू कारणरहित दयाळू आहेत, म्हणून तुलसीदास सांगतात की हे मना ! सर्व प्रकारचे कपट व जंजाळ सोडून त्यांना भजा- ( भक्ती करा ) ॥ दो० २११ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP