॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय २९ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

प्रातः स्नान करुनि जन जमती । भरत भूमिसुर तिरहुति नृपती ॥
शुभ दिन आज मनामधिं जाणति । राम कृपाल वदत संकोचति ॥
गुरु नृप भरत सभे अवलोकति । राम संकुचुनि अवनि विलोकति ॥
शीला स्तवुनि सभा सब चिंती । कुणि न रामसम भिडस्त नृपती ॥
भरत सुजाण रामरुचि बघुनी । प्रेमें उठले सुधीर धरुनी ॥
वदति जुळुनि कर करुनि दंडवत । नाथ रुची मम सकल पूर्णकृत ॥
कष्ट बहुत मजमुळें चि सकलां । आपण नाना दुःखीं पडलां ॥
आज्ञा दुआवी अतां स्वामिवर । जाउन सेविन अवध अवधिभर ॥

दो० :- ज्या उपायिं पद पुन्हां जन पाहिल दीनदयाल ॥
तो अवधीस्तव शिकविणें कोसलपाल कृपाल ॥ ३१३ ॥

दरबार - चित्रकूटचा तिसरा – प्रात:स्नान ( संध्यादि) करुन भरत वसिष्ठादि महिसुर, तिरहुति=मिथिला राजे जनक व सगळे लोक जमले ॥ १ ॥ कृपालु रामचंद्रानी मनांत आणले की आज प्रयाणास शुभ दिवस आहे पण सांगण्यास संकोच वाटत आहे ॥ २ ॥ गुरु, जनकराजा, भरत व सगळी सभा यांच्याकडे पाहीले, व राम संकोचाने जमिनीकडे पाहू लागले ॥ ३ ॥ शीलाची प्रशंसा करुन सर्व लोक विचार करु लागले की रामासारखा भिडस्त राजा कोणी नाही ॥ ४ ॥ सुजाण भरत रामचंद्रांची इच्छा जाणून फार धीर धरुन प्रेमाने उठले ॥ ५ ॥ दण्डवत करुन हात जोडून म्हणाले की नाथ ! माझ्या सर्व रुची आपण पूर्ण केल्यात ॥ ६ ॥ माझ्यामुळेच सगळ्यांना कष्ट झाले व माझ्यामुळेच आपण नाना प्रकारच्या दु:खांत पडलांत ॥ ७ ॥ स्वामीवर ! आता मला आज्ञा द्यावी म्हणजे मी जाऊन अबाधी भरेपर्यंत अयोध्येची सेवा करेन ॥ ८ ॥ पण दीनदयाल ! कोसलपाल कृपाल ! ज्या उपायाने हा दास हे पाय पुन्हा पाहील तो उपाय अवधीसाठी याला शिकवावा ॥ दो० ३१३ ॥

प्रभो ! प्रजा सब पुरजन परिजन । स्नेहीं शुचि सब सरस आप्तपण ॥
अपणांस्तव भवदाव हि सुखकर । प्रभुविण वृथा परमपद दुष्कर ॥
स्वामी जाणुनि गति सकलांची । रुचि राहणि लालसा जनची ॥
प्रणतपाल सकलांही पाळिति । दोन्हिकडे प्रभु सकल निभाविति ॥
असा सर्व मज भूरि भरंवसा । करत विचारा शोच न लवसा ॥
नाथ कृपा आणी मम आर्ती । उभय, बळें मज धीट बनविति ॥
स्वामि हरुनि या अति दोषाला । विना भीड शिकवा दासाला ॥
भरत विनतिला सभा प्रशंसी । क्षीर नीर विवरणगति हंसी ॥

दो० :- दीनबंधु हें बंधुवच श्रवुनि दीन छलहीन ॥
देशकाल समयोचित वदले प्रभू प्रवीण ॥ ३१४ ॥

प्रभो ! सर्व प्रजा अयोध्यावासी व परिवार ही सर्वच आपल्या स्नेहांत पवित्र आहेत व आप्तपणाही सरस आहे ॥ १ ॥ आपल्यामुळे भवदावानल सुद्धा सुखकर वाटतो व आपल्याशिवाय ( मिळविण्यास) कठीण असे परमपद व्यर्थ चाटते ! ॥ २ ॥ स्वामी ! सर्वांची गती व या दासाची रुची, राहणी व लालसा जाणून ॥ ३ ॥ प्रणतपाल सर्वांचेच पालन करतील व प्रभू ( सर्व समर्थ) दोन्हीकडे सर्व गोष्टी निभावून नेतील ॥ ४ ॥ असा मला सर्व प्रकारे खूप भरवसा वाटतो व विचार करतां लवलेश सुद्धा शोकचिंता रहात नाही ॥ ५ ॥ नाथ ! आपली कृपा व माझी आर्ती या दोघांनी मला बलात्काराने धीट बनवला ॥ ६ ॥ स्वामी ! या माझ्या मोठ्या दोषाला दूर करुन भीड न धरता मला दासाला शिकवा ॥ ७ ॥ दूध पाणी निरनिराळे करण्यात हंसिनी प्रमाणे गति असलेल्या भरताच्या विनंतीची सभा प्रशंसा करुं लागली ॥ ८ ॥ दिनबंधू, प्रवीण, प्रभु रामचंद्र बंधूचे दीन व छलहीन भाषण ऐकून देशकाल परिस्थितीस अनुसरुन म्हणाले की ॥ दो० ३१४ ॥

तुमची तात ! माझि सकलांची । चिंता गुरु, नृप या गृह वनिंची ॥
शिरावरी गुरु मुनि मिथिलेशहि । स्वप्निंहि अम्हां तुम्हां ना क्लेश हि ॥
मम तुमचा हि परम पुरुषार्थ । स्वार्थ सुधर्म सुयश परमार्थ ॥
दोघांनी पित्राज्ञा पालन । भलें वेदिं जनिं नृपां भलेपण ॥
स्वामि मातृ पितृ गुरु वच पाळिति । चालत कुपथिंहि पाय न घसरति ॥
या विचारिं चिंता सब सांडुनि । पाळा पुरी अवधिभर जाउनि ॥
देश कोष परिजन परिवार हि । यांचा गुरुपदरजिं सब भारहि ।
तुम्हिं मुनि मातृ सचिव वच पाळा । मही प्रजा नगरी सांभाळा ॥

दो० :- मुख्य मुखासम पाहिजे खाण्या पिप्यास एक ॥
पाळि पोषि अंगां सकल तुलसी सहित विवेक ॥ ३१५ ॥

तात ! तुमची माझी सकलांची घराची व वनाची चिंता गुरु व नृप यांस आहे ॥ १ ॥ ( आपल्या तुमच्या) शिरावर गुरु, मुनी व मिथिलेश असल्याने आंम्हाला व तुम्हांला स्वप्नांत सुद्धा क्लेश नाहीत ॥ २ ॥ माझा आणि तुमचा परम परमार्थ, स्वार्थ, सुधर्म, सुयश, आणि परमार्थ म्हणजे दोघांनी पित्याची आज्ञा पालन करणे हा आहे. याने वेद व लोक यांत आपले भले व राजांना भलेपणा आहे ॥ ३-४ ॥ स्वामी, माता, पिता, व गुरु यांचे वचन पाळतात ते आडमार्गाने चालत असले तरी त्यांचे पाऊल घसरत नाही ॥ ५ ॥ या विचाराने सर्व चिंता सोडून तुम्ही जाऊन अवधि पर्यत अयोध्यापुरीचे पालन करा ॥ ६ ॥ देश, कोष, पुरवासी व परिवार यांचा सर्व भार गुरुपद रजावर आहे ॥ ७ ॥ तुम्ही ( फक्त) मुनी, माता व सचिव यांचे वचन पाळा आणि पृथ्वी, प्रजा व नगरी यांचा सांभाळ करा म्हणजे झाले ॥ ८ ॥ तुलसीदास म्हणतात रामचंद्र म्हणाले की मुख्य ( मुखिया) मुखासारखा असला पाहीजे खाण्यापिण्यास तर एकटेच, पण सगळ्या अंगाचे – अवयवांचे पालन – पोषण विवेकाने करते ॥ दो०३१५ ॥

इतकें राजधर्म सर्वस्वही । गुप्त मनोरथ जसे मनांतहि ॥
बंधुस केला प्रबोध बहुपरि । विण आधार, न तोष शांति परि ॥
भरत शील गुरु सचिव समाज । लज्जा स्नेह विवश रघुराज ॥
प्रभु परि कृपें खडावा देति । सादर भरत धरुनि शिरिं घेती ॥
करुणा निधिचें चरणपीठ जें । प्रजा प्राण यामीक धीट तें ॥
भरत स्नेह रत्‍न संपुट तें । जीव उअतनिं जणु अक्षर युग तें ॥
कुल कपाट, कर कुशल कर्मि ते । विमल नयन सेवा सुधर्मि ते ॥
भरतां मुद अवलंब लाभतां । सुख जसं सीताराम राहतां ॥

दो० :- मागति आज्ञा नमुनि पदिं राम धरिति हृदयासि ॥
सुरपति उचाटित जनां कुटिल कठिण समयासि ॥ ३१६ ॥

जसे सर्व मनोरथ मनांतच गुप्त असतात तसे राजधर्माचे सर्वस्व इतकेच आहे ( त्यात) सर्व राजधर्म गुप्त आहेत ॥ १ ॥ रामचंद्रांनी बंधूला अनेक प्रकारे उपदेश ( प्रबोध) केला; परंतु आधारावाचून त्यास संतोष व शांती प्राप्त होईनात ॥ २ ॥ भरताचे शील व स्नेह आणि गुरु सचिव व समाज यांची लज्जा यांना रघुराज विशेष वश झाले ॥ ३ ॥ परंतु प्रभूंनी कृपेने ( आपल्या) खडावा दिल्या व भरताने त्या आदराने शिरावर धारण करुन घेतल्या ॥ ४ ॥ जे करुणासागर रामचंद्रांचे चरणपीठ ( चालण्याचे आसन = खडावा) आहेत ते प्रजा प्राणाचे धीट मयिक – पाहरेकरी – संरक्षक आहेत ॥ ५ ॥ ते भरताच्या स्नेहरुपी रत्‍नाचे संपुट – डबी ( डबा) आहेत व ते जीवाच्या यत्‍नांत साधनांत जणूं दोन अक्षरे ( रा म) आहेत ॥ ६ ॥ रघुकुलाचे कपाट आहेत आणि कुशल कर्मात ते हात आहेत व सेवा रुपी सुधर्मात ते नयन आहेत ॥ ७ ॥ अवलंब मिळाल्यामुळे भरतांस असा आनंद झाला व असे सुख झाले की जसे सीताराम ( घरी येऊन) राहिल्याने झाले असते ॥ ८ ॥
सहित पादुका नगरिं निवर्तन – रामचरणीं प्रणाम करुन भरतांनी आज्ञा ( निरोप) मागितली ( तेव्हा) रामचंद्रानी त्यास हृदयाशी धरले ( मिठी मारली) अशा या कठिण समयीं सुरपतीने लोकांचे उच्चाटन केले ॥ दो० ३१६ ॥

ती कुचाळि सर्वांना उत्तम- । जीवनि जीवा अवधि आस सम ॥
न तर सिता प्रभु लक्ष्मण विरहीं । मरते हाय ! कुरोगिं सर्वही ॥
रामकृपेनें संकट टळलीं । गुणद साह्य सुर-धाडचि हरली ॥
कवळिति भाउ भुजानीं भरता । रामप्रेम रस न ये वदतां ॥
तन मन वचनीं प्रेमा भरती । धीर धुरंधर धीरा त्यजती ॥
वारिज लोचन वारी मोचति । बघुनि दशा सुर सभा दुःखि अति ॥
मुनि गुरु धीर ध्रीण जनकसे । ज्ञानानलिं मन कसित कनकसें ॥
जे विधिनें निर्लेपचि सृजलें । पद्म पत्र समजग जलिं जगलें ॥

दो० :- तेहि बघुनि रघुवर भरत प्रीत्यनुपमा अपार ॥
होति मगन तनमन वचनिं सहित विराग विचार ॥ ३१७ ॥

ही कुचाळी ( दुष्टपणा) अवधीच्या आशेप्रमाणे जीवाला उत्तम संजीवनी ठरली ॥ १ ॥ नाहीतर सीता, प्रभुराम व लक्ष्मण यांच्या वियोगरुपी कुरोगाने सर्व लोक हाय ! हाय ! करीत गेले असते ॥ २ ॥ रामकृपेने सर्व संकटे टळली व देवांनी घातलेली धाड गुणकारक व साह्यच ठरली ॥ ३ ॥ भाऊ राम भरताला दोन्ही बाहूंत कवटाळून भेटले तो रामप्रेमरस वर्णन करता येणे नाही ॥ ४ ॥ तनुमनवाणीत प्रेमाला भरती आली व धीरधुरंधर असून त्यांनी धीर सोडला ॥ ५ ॥ कमल नेत्रांतून अश्रू वाहू लागले तेव्हा ही दशा पाहून देव व सर्वसभा यांस फार दु:ख झाले ॥ ६ ॥ विश्वामित्र वामदेवादि मुनी गुरु, वसिष्ठ व ज्यांचे मन ज्ञानरुपी अग्नित सोन्यासारखे तावून सुलाखून निघाले आहे ( कसले गेले आहे) असे जनकांसारखे धीरधुरीण ॥ ७ ॥ ज्यांना ब्रह्मदेवाने जन्मताच निर्लेप उत्पन्न केले व जे या जगरुपी जलांत पद्म पत्रासारखे ( नेहमी) जगले ( राहीले) आहेत ॥ ८ ॥ ते सुद्धा रघुवर भरतांची अनुपम अपार प्रीती पाहून ज्ञान वैराग्यांसहित तनुमन वाणीने दु:ख शोक मग्न झाले ॥ दो० ३१७ ॥

जिथें जनक गुरु मति गति कुंठित । प्राकृत प्रीती वदणें अनुचित ॥
रघुवर भरत वियोग वर्णतां । कवि कठोर, जन म्हणति ऐकतां ॥
तो लज्जा रस अकथ सुवाचें । स्नेह समयिंचा स्मरुनि संकुचे ॥
रघुवर भरता भेटुनि सांत्विति । रिपुदमना हर्षित हृदिं कवळिति ॥
सेवक सचिव भरतमत बघुनी । लागति निज निज काजिं जाउनी ॥
ऐकुनि दारुण दुःख समाजां । गमनाच्या सजिती सब साजां ॥
युगबंधू प्रभुपदीं प्रणमुनी । निघति शिरीं रामाज्ञा धरुनी ॥
मुनि तापस वनदेवां विअनवुनि । पुनः पुन्हां सन्माना देउनि ॥

दो० :- लक्ष्मणास भेटति; नमुनि श्रिं सीतापद धूळ ॥
निघती प्रेमळ आशिषा श्रवुनि सुमंगल मूळ ॥ ३१८ ॥

जिथे जनक व गुरु वसिष्ठ यांच्या मतीची गति कुंठित झाली तिला प्राकृतांची प्रीती म्हणणे अनुचित आहे ॥ १ ॥ रघुवर व भरत यांचा वियोग वर्णन केला असता तो ऐकताच लोक म्हणतील की कवी कठोर आहे - होता ॥ २ ॥ तो लज्जा रस सुद्धा सुंदर वाणीला अकथनीय आहे ( म्हणून) त्या समयीचा स्नेह आठवून ती लाजली ॥ ३ ॥ रघुवर भरतांस भेटले व मग त्यांचे सांत्वन केले व हर्षित होऊन शत्रुघ्नाला हृदयाशी धरुन कवटाळला ॥ ४ ॥ सेवक व सचिव भरताची इच्छा ( मत) पाहून गेले व आपापल्या कामाला लागले ॥ ५ ॥ ( आता निघावयाचे हे) ऐकून दोन्ही ( राज) समाजात दारुण दु:ख पसरले; व सर्व लोक निघण्याची तयारी करु लागले ॥ ६ ॥ प्रभूच्या पदकमलांना प्रणाम करुन रामाची आज्ञा शिरसावंद्य मानून दोघे भाऊ निघाले ॥ ७ ॥ लक्ष्मणास भेटले व सीतेला नमस्कार करुन तिची पायधूळ मस्तकी धारण केली व सुमंगलमूल असे सीतेचे प्रेमळ आशीर्वाद ऐकून ( भरत शत्रुघ्न) निघाले ॥ दो० ३१८ ॥

सानुज राम नृपा शिर नमती । नाना विध करती स्तुति विनती ॥
चेव ! दयेनें सुदुःखिं झाला- । सहित समाजी काननिं आला ॥
पुरिं वळणें आशीस देउनी । गमन करिति नृप धीरा धरुनी ॥
मुनि महिदेव साधु सन्मानुनि । बोळविले हरिहर सम जाणुनि ॥
सासु समीप बंधु युग जाउनि । वंदुनि वळले आशिस पावुनि ॥
कौशिक वामदेव जाबाली । पुरजन परिजन सचिव सुचाली ॥
उचित विनंति करोनी वंदन । बोळविती सानुज रघुनंदन ॥
श्रेष्ठ मध्य लघु नारि नरांना । कृपानिधी धाडिति सन्मानां ॥

दो० :- भरत मातृपदिं नमुनि प्रभु स्नेहें शुचि भेटून ॥
बोळविती मेणा सजुनि लज्जा शुच निरसून ॥ ३१९ ॥

अनुजासह रामचंद्रांनी जनकराजांच्या पायांवर मस्तक ठेऊन नमस्कार केला व मग त्यांची नानाप्रकारे प्रशंसा करुन प्रार्थना केली ॥ १ ॥ देव ! आपण दयेने सर्व समाजांसह वनांत आलांत व फार दु:खी झालांत ॥ २ ॥ आता आम्हाला आशीर्वाद देऊन नगरास वळावे धीर धरुन राजांनी प्रणाम केले ॥ ३ ॥ मुनी, ब्राह्मण, व साधू यांचा सन्मान करुन त्यांस हरिहरांसमान मानून निरोप दिला ॥ ४ ॥ नंतर दोघे भाऊ सासवांकडे गेले व नमस्कार करुन आशीर्वाद घेऊन आले ॥ ५ ॥ कौशिक, वामदेव, जावाली, सदाचारी सचिव, पुरजन व परिवार ॥ ६ ॥ यांना यथायोग्य प्रकारे विनंती वंदनादि करुन अनुजासह रघुनंदनांनी निरोप दिला ॥ ७ ॥ श्रेष्ठ, मध्यम, कनिष्ठ अशा सर्व नारीनरांना कृपानिधींनी सन्मानाने परत धाडले ॥ ८ ॥ प्रभूंनी भरत मातेच्या पायांना वंदन केले व पवित्र स्नेहाने भेटून शोकलज्जा यांचे निरसन करुन, सजवून आणलेल्या मेण्यांत बसवून तिला पोचविली ॥ दो० ३१९ ॥

सीता परिजन पितरां भेटुनि । पूत पति प्रेमा ये परतुनि ॥
प्रणमि सासुनां भेटति सकलां । प्रीति कथनिं उल्हास न कविला ॥
शिकवण अभिमत आशिस घेई । स्नेहीं उभय मग्न ई होई ॥
रघुपति मेणे रुचिर मागविति । समजाउनि मातानां बसविति ॥
घडि घडि दोघे मिळुनी भेटति । स्नेहें सम जननींस पोंचवति ॥
सजुनि वाजि गज वाहन नाना । भरत भूप दळ करी प्रयाणा ॥
हृदयिं राम सीता सह लक्ष्मण ॥ जाती सगळे लोक अचेतन ॥
वृष हय गज पशु हृदय भंगले । परवश मारुनि मना चालले ॥

दो० :- गुरु गुरुनारिस नमुनि प्रभु लक्ष्मण सिता समेत ॥
परतुनि हर्षविषादयुत पर्ण निकेतीं येत ॥ ३२० ॥

( राम जनकांस भेटत असतां) माहेरचा परिवार, माता व पिता यांना भेटून पवित्र पतिप्रेम असणारी सीता परत आली ॥ १ ॥ ( नंतर) सीतेने सर्व सासवांना प्रणाम केला व त्या सगळ्या तिला भेटल्या त्या प्रीतीचे वर्णन करण्यास कवीला उल्हास वाटत नाही ॥ २ ॥ शिकवण व मनोवांधित आशीर्वाद घेतले – मिळाले व ती दोन्ही स्नेहांत मग्न झाली ॥ ३ ॥ रघुपतींनी सुंदर मेणे मागविले व समजूत घालून सर्व मातांना मेण्यात बसविल्या ॥ ४ ॥ दोघे भाऊ मिळून मिसळून वारंवार भेटले, समान स्नेहाने भेटले व सर्वजननींना पोचविल्या ॥ ५ ॥ हत्ती, घोडे, वगैरे नाना वाहने सजवून भरत व राजा जनक यांचे सैन्य व समाज यांनी प्रयाण केले ॥ ६ ॥ सर्वांच्या हृदयांत लक्ष्मणासह रामसीता आहेत व सगळे लोक अचितंन – जडासारखे होऊन जात आहेत. ॥ ७ ॥ बैल, घोडे, हत्ती व इतर ( उंट, खेचरे) पशु भग्नहृदय झाले आहेत पण परवशतेमुळे मन मारुन चालले आहेत ॥ ८ ॥ सीता व लक्ष्मण यांच्यासह प्रभूंनी गुरु वसिष्ठ व गुरु पत्‍नी अरुंधरी यांना वंदन केले व हर्ष विषाद युक्त होऊन पर्णकुटीत परत आले ॥ दो० ३२० ॥

सन्मानें धाडिला निषादा । जाइ भरुनि हृदिं विरहविषादा ॥
कोळि किरातादिकां फिरविले । घडि घडि जोहारुनी परतले ॥
प्रभुसिय लक्ष्मण वटतळिं बसती । प्रिय परिजन विरहें व्याकुळती ॥
भरत स्नेह सुशील सुवाणी । प्रिये हि अनुजा वदति वानुनी ॥
मनवचकर्मीं प्रतिती प्रीती । प्रभु निजमुखें प्रेमवश गाती ॥
त्या अवसरिं खग मृग जल जलचर । चित्रकूटचे म्लान चराचर ॥
विबुध बघून दशा रघुपतिची । कथिति सुमन वर्षुनि गति घरची ॥
प्रभुनी नमुनि दिलें आश्वासन । फिरले प्रमुदित, मनिं भय भास न ॥

दो० :- सानुज सह सीते प्रभु राजति पर्ण कुटीरिं ॥
भक्ती ज्ञान विराग जणुं सह शोभती शरीरि ॥ ३२१ ॥

सन्मानाने निषाद राजाला परत पाठविला, त्याचे हृदय विरह दु:खाने भरुन आले व तो परत निघाला ॥ १ ॥ कोळी, किरात, भिल्ल ( इ. वनवासी) यांना परत पाठवले व ते वारंवार जोहार करुन परत गेले ॥ २ ॥ प्रभू सीता व लक्ष्मण वडाच्या खाली बसले व प्रिय परिजनांच्या विरहाने व्याकुळ झाले ॥ ३ ॥ भरताचा स्नेह, सुस्वभाव व सुंदर वाणी प्रियेला व अनुजाला वर्णन करुन सांगू लागले ॥ ४ ॥ मन, वाणी आणि कर्म यातील भरताची प्रतीती व प्रीती प्रभु प्रेमवश होऊन आपल्या मुखाने वाखाणूं लागले ॥ ५ ॥ त्या प्रसंगी पशुपक्षी जल जलचर इ. चित्रकूटचे सर्व चराचर म्लान – खिन्न झाले ॥ ६ ॥ रघुपतीची ही दशा पाहून शहाणे देव पुष्पवृष्टी करुन आपल्या घरची दुर्दशा सांगू लागले ॥ ७ ॥ प्रभूंनी प्रणाम करुन त्यांना आश्वासन दिले तेव्हा ते प्रमुदित होऊन परतले, कारण मनांत भयाचा भासही राहिला नाही ॥ ८ ॥ अनुज सीता व लक्ष्मण यांच्या सह प्रभु पर्णकुटीत असे विराजन आहेत की जणू ज्ञान वैराग्य आणि भक्ती शरीर धारण करुन एकत्र शोभत आहेत ॥ दो० ३२१ ॥

मुनी भरत गुरु भूप विप्रकुळ । रामविरहि जन सगळे व्याकुळ ॥
गणिती प्रभुगुण गणां मनानें । सब चुपचाप जाति मार्गानें ॥
यमुना उतरुनि समाज नेला । तो वासर विण भोजन गेला ॥
गंगा उतरुनी वस्ती दुसरी । रामसखा सुखसोयि सब करी ॥
सई उतरुनी स्नान गोपतीं । चौथे दिवसिं अयोध्ये येती ॥
जनक चार वासत पुरिं राहति । राज्य कार्य सब साजां पाहति ॥
राज्य सचिव गुरु भरतां सोंपुनि । जाती मिथिले समाज घेउनि ॥
मगर नारि नर गुरु वचनानीं । बसती सुखें राम नृप धानी ॥

दो० :- रामदर्शना सर्वजन अक्रिति नेम उपवास ॥
त्यागिति भूषण भोग सुख जगवी अवधी आस ॥ ३२२ ॥

मुनी भरत, गुरु वसिष्ठ भूप जनक सर्व विप्रसमुदाय आणि बाकीचे सर्व लोक रामविरहाने व्याकुळ झाले ॥ १ ॥ प्रभुंच्या गुणसमूहांचे मनात चिंतन करीत सर्व मंडळी चुपचाप मार्गाने जात आहेत ॥ २ ॥ ( पहिल्या दिवशी) सर्व समाज यमुनेच्या पलिकडे नेला गेला व दिवस भोजनावाचूनच गेला ॥ ३ ॥ गंगा उतरुन ( शृंगवेरपुर) दुसरी वस्ती केली; तेथे रामसखा गुहाने सर्व सुखसोय केली ॥ ४ ॥ सईनदी उतरुन गोमतीत स्नान केले ( तिसरी वस्ती) व चौथे दिवशी अयोध्येत आले ॥ ५ ॥ जनकराजा चार दिवस नगरात राहीले, सर्व राज्यकार्य व सर्व साज संच ( सैन्य, कोष इ.) पाहिला ॥ ६ ॥ नंतर सचिव, गुरु व भरत यांच्या ताब्यांत राज्य देऊन ( सोपवून) आपण सर्व समाजासह मिथिलेस गेले ॥ ७ ॥ अयोध्येतील सर्व स्त्रिया व पुरुष गुरु वसिष्ठांच्या वचनांनी ( उपदेशामुळे) रामचंद्रांच्या राजधानीत सुखाने राहीले ॥ ८ ॥ श्रीरामदर्शनासाठी सर्व लोक नेम व उपवास वगैरे करु लागले; भूषणे व भोगसुखांचा त्यांनी त्याग केला आणि ( १४ वर्षाच्या) अवधीच्या आशेने त्यांना जगविले ( ते जिवंत राहीले) ॥ दो० ३२२ ॥

भरत सुसेवक सचिवां बोधिति । आज्ञें निज निज कायीं लागति ॥
बोलावुनि लघु बंधु शिकविती । सकल मातृसेवा सोपविती ॥
भूसुर अणवुनि भरत जुळुनि कर । नमुनी प्रार्थिति विनयानें वर ॥
कार्यि शुभाशुभ उच्च कि नीच हि ॥ आज्ञा द्यावि विना संकोचहि ॥
प्रजा नि पुरजन परिजन अणविति । समाधानयुत सुखांत वसविति ॥
सानुज मग गुरुगेहिं पोचले । करुनि दण्डवत करयुग जुळले ॥
जर आज्ञा राहीन सुनेमें । तनु पुलकुनि मुनि वदले प्रेमें ॥
समजां वदां करां तुम्हिं जें ही । धर्मसार जगिं होइल तेंही ॥

दो० :- शिक्षा आशीर्वच महा मिळत दिवस बघवीति ॥
निरुपाधी प्रभु पादुका सिंहासनिं बसवीति ॥ ३२३ ॥

सचिव व उत्तम सेवक यांना भरतांनी उपदेश केला व आज्ञेप्रमाणे ते आपापल्या कार्याला लागले ॥ १ ॥ ( मग) धाकट्या भावाला ( शत्रुघ्नाला) बोलावून उपदेश केला आणि सर्व मातांची सेवा त्याचेकडे सोपवली ( मग) भुसुरांना आणवून नमस्कार करुन हात जोडून फार विनयाने प्रार्थना केली की - ॥ ३ ॥ चांगले वाईट, उच्च-नीच ( हलके) कोणतेही कार्य असो आपण संकोच न बाळगतां आज्ञा देत जावी ॥ ४ ॥ प्रजा पुरवासी व परिजन यांना बोलावून समाधानाने सुखांत वसविले ( राहतील असे सांगीतले) ॥ ५ ॥ अनुजासह गुरुगृही जाऊन दण्डवत करुन हात जोडून म्हणाले ॥ ६ ॥ जर आपली आज्ञा मिळाली तर मी उत्तम नेमाने राहीन म्हणतो ( ऐकून) शरीर पुलकित होऊन मुनी प्रेमाने म्हणाले की ॥ ७ ॥ जे काही तुम्ही समजता व समजाल ( मनांत आणाल बोलाल कराल ते या जगात सर्व धर्माचे सार होईल हे निश्चित ! ॥ ८ ॥ ( याप्रमाणे) उपदेश व मोठा आशीर्वाद मिळाल्यावर ( भरत घरी परत आले) व शुभ दिवस पाहविला आणि निरुपाधि प्रभुपादुका सिंहासनावर बसविल्या – स्थापन केल्या ॥ दो० ३२३ ॥

राममातृ गुरुपदिं शिर ठेउनि । प्रभुपदपीठ अनुज्ञा घेउनि ॥
नंदि गांविं कृत पर्ण कुटीर । निवसति धर्म धुरंधर धीर ॥
जटाजूट शिरिं मुनिपटधारी । खणुनि मही घालिति कुश हतरीं ॥
अशन वसन पात्रें व्रत नेमां । प्रेमें करिति कठिण ऋषिधर्मां ॥
भूषण वसन भोग सुख भूरी । वचतनमनिं तृणसम कृत दूरी ॥
अवधराज्यिं सुरराजा ईर्षित । धनद कळत दशरथधन लज्जित ॥
त्या पुरिं वसती भरत अ-रागें । जसा चंचरिक चंपक बागें ॥
रमाविलास, राम अनुरागीं । त्यजिति वमनसम जन बहुभागीं ॥

दो० :- रामप्रेमास्पद भरत बडे न या करतूतिं ॥
चातक हंसां भशंसिति टेक विवेक विभूतिं ॥ ३२४ ॥

भरत राहणी – राममाता कौसल्या व गुरु यांच्या पायावर मस्तक ठेऊन, प्रभु पादुकांची अनुज्ञा घेऊन ॥ १ ॥ नंदिगांवी पर्णकुटी बांधवली व तिथे धर्म धुरंधर धीर अशा भरतांनी निवास केला ॥ २ ॥ मस्तकावर जटा बांधल्या, मुनीवस्त्रे-वल्कले धारण केली व जमिन खणून तेथे कुश ( गवताची) चटई घातली ॥ ३ ॥ अशन, ( आहार) वस्त्रे, पात्रे, व्रते व नेम आणि इतर कठिण ऋषीधर्म यांचे प्रेमाने पालन करुं लागले ॥ ४ ॥ भूषणे, इतर वस्त्रे व विषयभोग यांचे भरपूर सुख शरीराने-मनाने व वाणीने तृणासमान टाकून दिले दूर केले ॥ ५ ॥ अयोध्येच्या राज्यावर सुरराजा हर्षित होतात व दशरथांचे धन पाहून कुबेरही लज्जित होतात ॥ ६ ॥ भुंगा जसा चंपक बागेत राहतो तसे भरत त्या नगरीत अनासक्त होऊन वसतात ॥ ७ ॥ रामप्रेमी महाभाग्यवान भक्त लक्ष्मीच्या विलासांचा वमना (ओकारी) प्रमाणे त्याग करतात ॥ ८ ॥ ( मग) भरत तर रामचंद्रांच्या प्रेमाचे पात्र ! या कर्तृत्वाने ते मोठे ठरत नाहीत चातक व हंस याची त्यांच्या दृढनेम व विवेक या विभूतीमुळे काय म्हणून प्रशंसा करावी ? ( तो तर त्यांचा ईश्वरदत्त जन्मजात स्वभाव आहे) ॥ दो० ३२४ ॥

दिन दिन होई शरीर दुबळे । घटे मेद, बल मुख छवि न ढळे ॥
रामप्रेमपण तु नव पीन हि । वृद्धि धर्मदल, मन न मलीनहि ॥
जसं जल आटे शरत्प्रकाशत । विलसति वेतस वनज विकासत ॥
शम दम संयम नियम उपासहिं । भगण, भरत-हृद् विमलाकाशहि ॥
ध्रुव विश्वास अवधि राकासी । स्वामी स्मृति सुर-वीथि विकासी ॥
रामप्रेम अचलविधु दोष न । सहितसमाज नित्य अति शोभन ॥
भरतभाव सकल सुकवि कर्तूती । भक्ति विरति गुण विमल विभूती ॥
वर्णत सकल सुकवि संकोचति । कुंठित शेष बणेश गिरा पति ॥

दो० :- प्रभू खडावा सदार्चिति हृदयिं न मावे प्रीति ॥
घे-घेउनि आज्ञा करिति राज्यकार्य बहिरीति ॥ ३२५ ॥

दिवसें दिवस शरीर कृश होऊ लागली ( कारण) मेद घटू लागला, पण बल व मुखकांती जरासुद्धा ढळत नाहीत ॥ १ ॥ रामप्रेमाचा पण मात्र नित्य नवा व पुष्ट होत चालला व धर्माचे सैन्य वाढूं लागले, पण मन मलीन होत नाही ॥ २ ॥ ज्याप्रमाणे शरद ऋतू प्रकाशूं लागताच जल आटत जाते व बेत सुशोभित होत जातात व कमले विकासू लागतात ॥ ३ ॥ शम, दम, संयम, नियम व उपवास ही भगण=नक्षत्रे होत व भरताचे हृदय हे विमल आकाश होय ॥ ४ ॥ विश्वास हा ध्रुवतारा आहे, अवधि पौर्णिमेसारखी आहे, स्वामींची ( रामाची) विकासणारी स्मृती ही आकाश गंगा आहे ॥ ५ ॥ आणि रामप्रेम हा अचल व दोषरहित चंद्र आपल्या समाजासह नित्य अति शोभायमान आहे ॥ ६ ॥ भरताची भावना, राहणी, कर्तृत्व, भक्ती, वैराग्य विमल गुण व विमल विभूती ॥ ७ ॥ यांचे वर्णन करण्यास सगळे सुकवी संकोचतात ( कारण) शेष, गणपती व सरस्वती यांच्या बुद्धीची गती सुद्धा कुंठित होते ॥ ८ ॥ भरत नित्यनेमाने ( दररोज) प्रभूंच्या खडावांची पूजा करतात ( व त्यावेळी) प्रीती हृदयात मावत नाही वेळोवेळी खडावांची ( राम समजून) आज्ञा घेऊन बहुत प्रकारची राज्य कार्ये करतात ॥ दो० ३२५ ॥

पुलकित, हृदिं सीता रघुवीर । जीभ नाम जपि लोचनिं नीर ॥
लक्ष्मण राम सिता वनिं वसती । भवनीं भरत तपें तनु कसती ॥
बघुनि उभय दिशिं वदति सर्व जन । भरत किं सर्वपरीं स्तुतिभाजन ॥
ऐकुनि नेमां साधु संकुचित । दशा बघुनि मुनिराज हि लज्जित ॥
भरतचरण पुनीत परम ही । मधुर मंजु मुद मंगल कर ही ॥
हरण कठिण कलि कलुषें क्लेशहि । महा मोह तमिं दलन देनेशहि ॥
पापपुंज कुंजर मृगराजा । शमन सकल संताप समाजा ॥
जन-रंजन भंजन भवभार हि । रामस्नेहिं सुधाकर सारहि ॥

छं० :- श्रीराम सीता प्रेम पीयुषमय न जन्मत भरत कीं ॥
व्रत विषम शम दम नियम यम मुनि मन अगम कुणि करत कीं ॥
दारिद्र्य दूषण दंभ दुःखानल सुयशमिर्षि हरत कीं ॥
लकिकालिं तुलसीं सम शठां कुणि राम संमुख करत कीं ॥ १ ॥
सो० :- भरतचरित युत नेम तुलसी सादर जे श्रवति ॥
सिताराम पदिं प्रेम होइ नक्कि भवरस विरति ॥ ३२६ ॥

शरीर पुलकित झालेले आहे हृदयांत सीता व रघुवीर आहेत, जीभ नामजप करीत आहे व नेत्रांतून अश्रूधारांचा अभिषेक होत आहे ! ॥ १ ॥ लक्ष्मण राम व सीता वनांत राहतात व भरत भवनांत राहून सर्व प्रकारे तपाने तनू कष्टवितात ॥ २ ॥ दोन्हीकडे पाहून सर्वलोक म्हणूं लागले की भरत सर्व प्रकारे स्तुतीस पात्र आहेत ॥ ३ ॥ भरताच्या नेमादिकांना ऐकून भक्त संकोचित होतात व भरतांची प्रेमदशा पाहून मोठमोठे मुनीराज लज्जित होतात ॥ ४ ॥ भरताचे आचरण परमपुनीत आहे आणि मधुर मनोहर ( मंजु) व आनंद मंगलकारक आहे ॥ ५ ॥ कठिण कलिकालांतील दुष्कृतांचा व क्लेशांचा नाश करणारे आहे व महामोहरुपी रात्रीचा विनाश करणारा दिनेश-सूर्य आहे ॥ ६ ॥ पापरुपी हत्तींना सिंहासारखे असून सर्व संतापांच्या समूहांचे नाश करणारे यमराजा सारखे आहे ॥ ७ ॥ भक्तांचे मनोरंजन करणारे व भवभार भंजन करणारे असून रामस्नेहात सुधाकराचे सार ( चंद्रामृताचे सार सत्य) आहे ॥ ८ ॥ श्रीसीताराम प्रेमरुपी अमृतमय असे भरत जन्मले नसते तर मुनिमनांस अगम असे कठिण व्रत शम – दम – यम – नियम यांचे आचरण कोणी केले असते काय ? आपल्या सुयशाच्या निमित्ताने दारिद्र्य ( मोह), दोष, दंभ व दु:ख रुपी आग यांना कोणी दूर केली असती काय ? व या कलिकालांत तुलसी दासासारख्या शठांना कोणी राम-संमुख केले असते काय ? ॥ छंद ॥ तुलसीदास ( आशीर्वादरुपाने) म्हणतात की जे कोणी भरत चरित्राचे आदराने व नेमाने श्रवण करतील त्यांना सीतारामपदीं प्रेम नक्की मिळेल व संसारिक विषयात वैराग्यही नक्की प्राप्त होईल ॥ दो० ३२६ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP