॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय २ राDownload mp3

लंकापति कपीश नलनीलहि । जांबवंत अंगद शुभशीलहि ॥
हनुमदादि सब वानर वीर । धृत सुमनोहर मनुज शरीर ॥
भरत सुशीला स्नेहा नेमां । सादर सब वानिति सुप्रेमां ॥
पाहुनि पुरवासीजन रीती । स्तविती सगळे प्रभुपद प्रीती ॥
रघुपति बोलावुनी सख्या या । त्यां सांगती पडा मुनि पायां ॥
गुरु वसिष्ठ कुल पूज्य आमचे । रणिं हत दनुज कृपेनें यांचे ॥
मुनि ! हे पहा सखे मम सगळे । समर सागरीं जहाज बनले ॥
मम हितार्थ इहिं जन्म वेचला । भरताहुनि हे प्रिय बहु मजला ॥
श्रवुनि वचन सगळे मग्न ते । निमिष निमिष नव सुख उपजतें ॥

दो० :- मम कौसल्या चरणिं ते सगळे नमिती माथ ॥
हर्षित आशिस देइ, तुम्हिं प्रिय मम सम रघुनाथ ॥ ८रा ॥
सुमनवृष्टिं संकुल गगन निघति भवनिं सुखकंद ॥
सौधीं चढुनी पाहती नगर नारि नर वृंद ॥ ८म ॥

लंकापती बिभीषण, कपीश सुग्रीव, नल नील, जांबवान अंगद आणि हनुमान आदि सर्व सुस्वभावी वानरवीरानी चांगले मनोहर मनुष्यदेह धारण केले आहेत. ॥ १-२ ॥ ते सर्व भरताचे सुशील स्नेह व नेम यांची आदराने व अतिप्रेमाने प्रशंसा करीत आहेत. ॥ ३ ॥ व पुरवासी लोकांची रीत पाहून त्यांच्या प्रभुचरणी असलेल्या प्रीतीची ते सर्व प्रशंसा करीत आहेत. ॥ ४ ॥ मग रघुपतींनी आपल्या सर्व मित्रांना (सुग्रीवादिकांना) बोलावून त्यांना वसिष्ठ मुनींच्या पाया पडण्यास सांगीतले व म्हणाले की आमच्या कुळाला पूज्य असलेले वसिष्ठ गुरु म्हणतात ते हे यांच्याच कृपेने राक्षस मारले गेले ॥ ५-६ ॥ अहो ! मुनी ! हे पहा, हे सगळे माझे सखे आहेत हे युद्धसागरात मला जहाज बनले ॥ ७ ॥ हे मला भरतापेक्षाही जास्त प्रिय आहेत. कारण यांनी माझ्या हितासाठी आपला जन्म वेचला ॥ ८ ॥ प्रभूचे वचन ऐकून ते सगळे प्रेममग्न झाले. व त्यांना निमिषा निमिषाला नवसुख होऊं लागले ॥ ९ ॥ मग बिभीषण सुग्रीवादी सर्वांनी कौसल्येच्या चरणांना वंदन केले, तेव्हा हर्षित होऊन तिने सर्वांना अशीर्वाद दिला व म्हणाली की तुम्ही मला रघुनाथासारखे प्रिय आहांत.॥ दो० ८ रा ॥ मग सुखकंद रामचंद्र नगरात जाण्यास निघाले तेव्हा आकाश फुलांच्या वृष्टीने भरुन गेले आणि नगरातील स्त्री पुरुष समुदाय सौधांवर चढचढून प्रभूंचे दर्शन घेऊ लागले ॥ दो० ८ म ॥

कांचन कलश विचित्र सजवले । घरोघरी द्वारांत मांडले ॥
तोरण रुचिर पताका लोकीं विरचित मंगल हेतू ॥
वीथि सुगंधें सकल शिंपल्या । गजमणिं रांगोळ्या बहु रचिल्या ॥
नानाविधा सुमंगल साजति । हर्षें पुरिं बहु डंके वाजति ॥
ठायिं ठायिं ओवाळति नारी । देति अशीस हर्षें हृदिं भारी ॥
कनकपात्रि आरत्यांस नाना । सजुनि करिति युवती शुभ गाना ॥
करिति आरती आर्तिहराची । रघुकुल कमल विपिन सूर्याची ॥
पुरशोभा मंगल संपत्ती । निगम शारदा शेष वानती ॥
बघुनि चरित हें तेहि चकितसे । उमे तस्य गुण वदति नर कसे ॥

दो० :- नारि कुमुदिनी अवध सर रघुपति विरह दिनेश ॥
अस्तंगत तैं विकसती बघुनि राम राकेश ॥ ९रा ॥
होति शकुन शुभ विविध विध वाजति गगनिं निशाण ॥
पुरनरनारि सनाथ कर निघतिं भवनिं भगवान ॥ ९म ॥

सोन्याचे कलश चित्र विचित्र सजविले असून ते लोकांनी आपल्या घराच्या पुढील द्वारांत मांडून ठेवले आहेत. ॥ १ ॥ सुंदर तोरणे, पताका, ध्वज वगैरे मंगलोत्सव चिन्हे सर्व लोकांनी लावली आहेत. ॥ २ ॥ सर्व रस्ते सुगंधित जलाने शिंपलेले असून गजमुक्तांच्या रांगोळ्या जागोजागी काढल्या आहेत. ॥ ३ ॥ नाना प्रकारचे मंगलसाज सजविले असून नगरात हर्षाने पुष्कळ डंके (वगैरे शुभ वाद्ये) वाजत आहेत ॥ ४ ॥ ठिकठिकाणी स्त्रिया (विविध वस्तू) ओवाळून टाकीत आहेत व मनातून हर्षित होऊन आशीर्वाद देत आहेत. (राम लक्ष्मण जानकी यांना) ॥ ५ ॥ पुष्कळ युवती सोन्याच्या तबकातून नाना प्रकारच्या आरत्या सजवून मंगलगान करीत आहेत ॥ ६ ॥ रघुकुलरुपी कमलवनाला प्रफुल्लित करणार्‍या श्रीरामसूर्याची आर्तिहराची आरती करीत आहेत. ॥ ७ ॥ अयोध्या पुरीची शोभा, मंगल व संपत्ती यांची प्रशंसा वेद, सरस्वती व शेष करतात. ॥८॥ परंतु ते सुद्धा हे चरित्र पाहून चकित झाल्यासारखे राहीले आहेत. मग उमे ! त्यांचे गुण मनुष्य कसे वर्णन करुं शकेल ? ॥ ९ ॥ स्त्रिया चंद्रविकासी कमले होत, अयोध्यापुरी हा तलाव होय, रघुपती विरह हा सूर्य होय तो जेव्हा अस्तास गेला तेव्हा रामचंद्ररुपी पूर्णचंद्राला पाहून त्या कुमुदिनी विकसित प्रफुल्लित झाल्या ॥ दो० ९ रा ॥ नाना प्रकारचे शुभ शकुन होत आहेत, आकाशात डंके वाजत आहेत, व अयोध्यावासी नरनारींना सनाथ करणारे भगवान रामचंद्र आपल्या घरी जाण्य़ास निघाले ॥ दो० ९ म ॥

लज्जित कैकेयी, प्रभु जाणति । प्रथम तिचें गृहिं गेले पार्वति ! ॥
तिला प्रबोधुनि बहुसुख दिधलें । मग निजभवना हरि पद वळले ॥
कृपासिंधु मंदिरिं गत यदा । पुर नरनारि सुखी सब तदा ॥
गुरु वसिष्ठ विप्रां बोलावति । आज सुदिन शुभ सकलहि सांगति ॥
द्विज हो ! हर्षें द्या अनुशासन । रामचंद्र भूषिति सिंहासन ॥
मुनि वसिष्ठ वच परम सुशोभन । ऐकुन सगळे मुदित विप्रगण ॥
वचन मधुर बहु वदले ब्राह्मण । जग अभिराम राम अभिषेचन ॥
मुनिवर वेळ न अतां लावणें । महाराज अभिषेका करणें ॥

दो० :- सुमंत्रास मुनि कथिति तैं श्रवत मुदित जातात ॥
रथ अनेक बहु वाजि गज सत्वर ते सजतात ॥ १०रा ॥
धाडिति दूतां मंगल वस्तु विविध आणण्यास ।
हर्षे येति वसिष्ठ पदिं ते नमविती शिंरास ॥ १०म ॥

कैकेयी लज्जित झाली आहे हे प्रभूंनी जाणले असल्याने हे पार्वती ते प्रथम तिच्या महालात गेले ॥ १ ॥ नाना प्रकारे तिची समजूत घालून तिला पुष्कळ सुख दिले व मग हरिचरण आपल्या महालात जाण्यास वळले ॥ २ ॥ कृपासिंधु जेव्हा मंदिरात गेले तेव्हा नगरातील स्त्रिया पुरुष सर्व सुखी झाले ॥ ३ ॥
श्रीराम राज्याभिषेक –
वसिष्ठ गुरुनी विप्रांना बोलावून सांगीतले की आज शुभ दिवस असून सगळे काही शुभ आहे. ॥ ४ ॥ ब्राह्मण हो ! आपण उल्हासाने अनुज्ञा द्यावी म्हणजे रामचंद्र सिंहासन भूषित करतील ॥ ५ ॥ वसिष्ठ मुनींचे परम सुंदर वचन ऐकून सगळे विप्रसमूह प्रसन्न झाले ॥ ६ ॥ आणि ते ब्राह्मण फार मधुर वचन बोलले की रामचंद्रांचा अभिषेक सर्व जगाला आनंददायक आहे. ॥ ७ ॥ हे मुनीश्रेष्ठ ! आता वेळ लावू नये व महाराजांना अभिषेक करावा. ॥ ८ ॥ मग वसिष्ठ मुनींनी सुमंत्रास सांगीतले व ऐकताच ते उल्हासाने गेले व त्यांनी त्वरेने अनेक रथ, घोडे, हत्ती वगैरे शृंगारुन सज्ज केले ॥ दो० १० रा ॥ मग विविध मंगल वस्तु आणण्यासाठी वसिष्ठांनी दूत पाठवले ते सर्व घेऊन आले व हर्षाने त्यांनी वसिष्ठ चरणीं मस्तक नमवले ॥ दो०१० म ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP