॥ श्रीगणेशाय नमः ॥

॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीजानकीवल्लभे नमः ॥

॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ षष्ठः सोपान ॥

॥ लंकाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय १ ला
अनुवादककृत मंगलाचरण

अहं दशास्यं घटकर्णमोहं कामाभ्रनादं परिवारयुक्तान् ॥
हत्वा रिपून् मैथिलराजपुत्र्या शान्त्या समेतोऽभयदोऽस्तु रामः ॥ १ ॥
पृथ्वी :- निपीय मनुजोऽमृतं यदि भवेद्‌विमुक्तो रुज-
तथापि न निवारयेञ्जनिभयं प्रपञ्चं हि तत् ॥
महद्‌भयनिवारकं गुरुपदाब्ज निर्णेजनं ।
सुपुण्यधन तोषित प्रभुकृपांकितैर्लभते ॥ २ ॥

अनुवादककृत मंगलाचरण –
१) अहंकार रुपी दशानन, मोह हा कुंभकर्ण व कामरुपी मेघनाथ या शत्रुंना परिवारासहित मारुन मिथिला राजकन्येने शान्तीमुक्त झालेले राम आम्हाला अभय देवोत. २) मनुष्य पुष्कळ अमृत पिऊन जरी रोगांपासून मुक्त झाला, तरी ते ( स्वर्गीय अमृत ) जन्मभय व प्रपंच यांचे निवारण करू शकत नाही महाभयाचे निवारण करणारे श्रीगुरु चरणकमलांचे प्रक्षालनोदक अतिपुण्यरुपी धनाने तोषविलेल्या प्रभूच्या अंकित झालेल्यांनाच मिळते.

मूळ मंगलाचरण

स्रग्धराः :- रामं कामारि सेव्यं भवभयहरणं काम मत्तेभ सिंहम् ।
योगीन्द्रं ज्ञानगम्यं गुणनिधिमजितं निर्गुणं निर्विकारम् ॥
मायातीतं सुरेशं खलवध निरतं ब्रह्मवृन्दैकदेवं ।
वन्दे कन्दावदातं सरसिजनयनं देवमुर्वीशरूपम् ॥ ३ ॥
श. वि. :- शंखेन्द्‌वाभमतीवसुंदर तनुं शार्दूलचर्माम्बरं ।
कालव्यालकराल भूषणधरं गंगाशशांकप्रियम् ॥
काशीशं कलिकल्मषौघशमनं कल्याणकल्पद्रुमं ।
नौमीड्यं गिरिजापतिं गुणनिधिं कन्दर्पहं शंकरम् ॥ ४ ॥
श्लोक :- यो ददाति सतां शंभुः कैवल्यमपि दुर्लभम् ।
खलानां दण्डकृद्योऽसौ शंकरः शं तनोतु मे ॥ ५ ॥
दो० :- लव निमेष परमाणु युग वर्ष कल्प शर चंड ! ।
भजसि न मन रामास त्या काल यस्य कोदंड ! ॥ मं. दो. १ ॥
सो० :- श्रवुनि सिंधुवच राम अणवुनि सचिवां प्रभु म्हणति ॥
काय विलंब कामा रचा सेतु कटकें तरति ॥ मं सो. १ ॥
पहा भानुकुलकेतु वदे जांबवान् जुळुनि कर ॥
नाथ ! नाम तव सेतु चढुनी भवनिधि तरति नर ॥ मं. सो. २ ॥

गोस्वामी तुलसीदासकृत मूळ मंगलाचरण
१) कामदेवाचे शभू-शंकर ज्यांची सेवा करतात, जे भव-भयाचे हरण करणारे आहेत, काळरुपी उन्मत्त हत्तीला सिंहरुप असणारे, सर्व योगीजनात श्रेष्ठ, ज्ञानाने जाणले जाणारे, गुणसागर, अजिंक्य, निर्गुण, निर्विकार, मायेच्या पलिकडील, सर्व देवांचे स्वामी, दुष्टांचा वध करण्यात तत्पर, ब्राह्मणवृंद हा ज्यांचा एकमात्र देव आहे, जलद-मेघा-सारखे निर्मल व सुंदर, ( कंद- अवदात ), कमल-नयन, पृथ्वीपती असलेले देव जे राम त्यांना मी वन्दन करतो.
२) शंख व चंद्र यांच्यासारखे कान्तीमान अत्यंत सुंदर शरीर असलेले, शार्दूल ( सिंह वाघ ) यांचे चर्म ( कातडे ) परिधान केलेले, काळासारखे भयानक सर्प व भयानक, ( मुंडमालादि ) भूषणे धारण केलेले, गंगा व चंद्र प्रिय असणारे काशीपति, कलीच्या पापसमूहांचा नाश करणारे, कल्याणाचे कल्पवृक्ष, गिरीजेचे पती, गुणसागर, मदनाला मारणारे जे शंकर स्तुती करण्यास योग्य आहेत त्यांना मी नमन करतो.
३) जे शंभु दुर्लभ असलेले कैवल्यसुद्धा सज्जनांना देतात व जे दुष्टांना दंड करणारे आहेत, ते शंकर मला (शं=) रामभक्ती देवोत ( माझ्या सुखाचा विस्तार करोत )
४) लव, निमेष, परमाणु युग, वर्ष, कल्प हे ज्यांचे भयंकर बाण आहेत, आणि काळ ज्यांचे धनुष्य आहे, त्या रामास हे मना, तू कां भजत नाहीस ? ॥ मं दो.१ ॥
सागराचे वचन ऐकून सचिवांना आणवून प्रभु राम म्हणाले की आता विलंब करण्याचे काय कारण ? सेतु तयार करा म्हणजे सैन्य तरुन जाईल ॥ सो० १ ॥
तेव्हा जांबुवान हात जोडून म्हणाला, की हे भानुकुल केतू ! हे नाथ ! पहा-ऐका आपले नामच सेतू आहे, त्यावर चढून मनुष्य भवसागर सुद्धा तरुन जातात. ॥ सो० २ ॥


हा लघु जलधि तरत किति वारहि । श्रवुनि वदे मग पवन कुमारहि ॥
प्रभु प्रताप वडवानल भारी । शोषी प्रथम पयोनिधि वारी ॥
तव रिपु नारि रुदन जलधारा । त्यानीं भरुनि होय मग खारा ॥
पवनतनय अत्युक्तिस परिसति । रघुपतिकडे बघुनि कपि हर्षति ॥
अणवि जांबवान् दो भावांसी । वदे कथा सब नल नीलांसी ॥
प्रभूप्रतापा स्मरुनि मनां ही । सेतू करा प्रयास न काहीं ॥
मग बोलावुनि घे कपि निकरा । ऐका विनती सकल मम जरा ॥
रामचरण पंकजा उरिं धरा । एक कौतुका भल्ल कपि करा ॥
धावा मर्कट विकट वरूथ । आणा विटप गिरींचे यूथ ॥
गत कपि भल्ल करित तैं हूं हा । जय रघुवीर प्रताप समूहा ॥

दो० :- गिरि पादप उत्तुंग अति घेति सलील तुकून ॥
आणुनि देती, नील नल रचिति सेतु घेऊन ॥ १ ॥

जांबवान पुढे म्हणाला – हा लहानसा ( रामांचे द्दष्टीने ) सागर तरुन जाण्य़ास वेळ असा कितीसा लागेल ? हे ऐकून मग पवनकुमार म्हणाला की ॥ १ ॥ प्रभुचा प्रताप भारी वडवानल आहे त्याने प्रथमच सागरजल शोषून टाकले होते ॥ २ ॥ पण तुमच्या शत्रुस्त्रियांच्या रडण्याच्या अश्रुंनी पुन्हा तो खारा झाला आहे ॥ ३ ॥ पवन-तनयाची अतिशयोक्ती ऐकली व सर्व कपी रघुपतीकडे पाहून हर्षित झाले ॥ ४ ॥ जांबवंताने नल व नील या दोघा भावांना बोलावून आणले आणि त्यांना सर्व कथा सांगीतली ॥ ५ ॥ व म्हणाला – प्रभु रामचंद्रांच्या प्रतापाचे मनात स्मरण करीत सेतु तयार करा, त्यांत तुम्हांला काहीच कष्ट नाहीत ॥ ६ ॥ मग जांबवताने सर्व कपींना बोलावून घेतले व म्हणाला की तुम्ही सर्व माझी थोडीशी विनंती ऐका ॥ ७ ॥ रामचरणकमले हृदयात धरुन हे भल्ल कपी हो ! तुम्ही एक खेळ करा पाहू ॥ ८ ॥ अक्राळ-विक्राळ मर्कटांचे तुम्ही सर्व समूहचे समूह पळत जा आणि मोठमोठे वृक्ष व पर्वत – समूह घेऊन या. ॥ ९ ॥ तेव्हा कपी व भल्ल हूं हां ! करीत व ‘ जय रघुवीर प्रताप समूहा ’ करीत गेले ॥ १० ॥ अति उंच पर्वत व अति उंच वृक्ष लीलेने ( सहज ) उचलून घेऊन आणून देऊ लागले व नल-नील ते घेऊन सेतूची रचना करु लागले ॥ दो० १ ॥

गिरि विशाल कपि आणुन देती । चेंडु जसे नलनीलहि घेती ॥
परम रम्य उत्तम ही धरणी । महिमा अमित कोण किति वर्णी ॥
करिन इथें शंभू स्थापना । माझे हृदयिं परम कल्पना ॥
तै कपीश बहु दूत धाडिती । सकल मुनिवरां घेउन येती ॥
स्थापुनि लिंग सविधि कृत पूजा । प्रिय मज शिवसम नहीं दूजा ॥
शिवद्रोहि मम भक्त म्हणवितो । स्वप्निंहि तो नर मज न पावतो ॥
शंकर विमुख भक्ति मम वांछति । तो हि नारकी मूढ अल्पमति ॥

दो० :- मद्‍द्रोही, प्रिय शंभु ज्यां शिवद्रोहि मम दास ॥
ते नर करती कल्पभर नरकीं घोर निवास ॥ २ ॥

कपि मोठ मोठे पर्वत आणून देत आहेत, आणि नल-नील चेंडूसारखे झेलून घेत आहेत ॥ १ ॥ सेतूची अति सुंदर रचना होत असलेली पाहून कृपासागर मोठ्याने हसून म्हणाले की ॥ २ ॥ ही धरणी परम रम्य व उत्तम आहे तिचा महिमा अपार असल्याने कोण किती वर्णन करेल ? ॥ ३ ॥ येथे शंभूची स्थापना करावी अशी परम कल्पना माझ्या हृदयात आहे तेव्हा सुग्रीवाने पुष्कळ दूत जिकडे तिकडे पाठवले व ते समस्त मुनिवरांना घेऊन आले.
रामेश्वर स्थापना व महात्म्य – लिंगाची स्थापना करुन रामचंद्रांनी त्याची यथाशास्त्र पूजा केली आणि नंतर सांगीतले की, शिवासारखा प्रिय मला दुसरा कोणी नाही. ॥ ६ ॥ शिवाचा द्रोह ( विरोध ) करणारा असून जो स्वत:स माझा भक्त म्हणवतो तो स्वप्नात सुद्धां माझी प्राप्ती करु शकत नाही. ॥ ७ ॥ शंकरविमुख असून जो माझ्या भक्तीची इच्छा करतो तो महामूर्ख अल्प बुद्धी नरकाचा अधिकारी होय. ॥ ८ ॥ माझा द्रोह करणारे असून ज्यांना शंकर प्रिय वाटतात आणि शंकरांचा द्रोह करणारे असून माझे दास म्हणवतात ( ते दोन्ही प्रकारचे भक्त ) कल्पभर नरकांत निवास करतात ॥ दो०२ ॥

जे रामेश्वर दर्शन करतिल । त्यजतां तनु मम लोकीं जातिल ॥
जे गंगाजल आणुनि घालति । ते सायुज्यमुक्ति नर पावति ॥
निष्कामहि निष्कपट सेवितिल । शंकर त्यांस भक्ति मम देतिल ॥
मम कृत सेतु दर्शना करतिल । ते अश्रम भवसागर तरतिल ॥
रामवचन सकलां मनिं रुचलें । मुनिवर निज निज आश्रमिं आले ॥
गिरिजे रघुपतिची ही रीती । संतत करिती प्रणतीं प्रीती ॥
सेतु बद्ध नागर नल नीलें । रामकृपें यश जगिं उजळिलें ॥
आपण बुडुनी दुजां बुडवती ।उपल जहाजा सम ते बनती ॥
महिमा हा न जलधिचा म्हणती । कपिकृति ना, न उपलगुण गणती ॥

दो० :- श्री रघुवीर प्रतापहि तारि जलधिं पाषाण ॥
मतिमंदचि रामा त्यजुनि भजति वृथा प्रभु आन ॥ ३ ॥

जे कोणी रामेश्वर-दर्शन करतील ते देहत्यागानंतर वैकुंठास ( माझ्या लोकास ) जातील ॥ १ ॥ गंगाजल आणून जे रामेश्वरावर घालतील त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त होईल ॥ २ ॥ जे निष्काम व निष्कपट होऊन रामेश्वराची सेवा करतील त्यांना शंकर माझी भक्ती देतील. ॥ ३ ॥ माझ्या बनविलेल्या सेतूचे जे दर्शन करतील ते काही श्रम न पडता भवसागर तरुन जातील ॥ ४ ॥ रामवचन सर्वांच्या मनाला आवडले व मुनीवर आपापल्या आश्रमांत परत आले. ॥ ५ ॥ गिरीजे, रघुपतीची ही रीत आहे की ते सतत प्रणतावर प्रीती करतात. ॥ ६ ॥ चतुर नलनीलांनी सेतू बांधला व रामकृपेने त्यांचे यश जगात उज्वल झाले ॥ ७ ॥ जे स्वत: बुडून दुसर्‍यांना बुडवतात ते पाषाण जहाजांसारखे ( सर्वांना तारक ) बनले ॥ ८ ॥ हा महिमा सागराचा असे कोणी म्हणत नाहीत, किंवा ही कपीचीही करणी नाही, किंवा त्या पाषांणांचा गुणही कोणी मानत नाहीत ॥ ९ ॥ ज्याने सागरात पाषाण तारले तो श्रीरघुवीराचा प्रताप होय. जे मतिमंद असतात तेच रामाला सोडून व्यर्थ इतर प्रभुला ( क्षूद्र देवतांना ) भजतात. ॥ दो० ३ ॥

बद्ध सेतु अति सुदृढ बनवला । बघुनि कृपानिधिचें मनिं भरला ॥
चाले कटक न वदले जाय । गर्जति मर्कट भट समुदाय ॥
सेतुबंध तटिं रघुपति चढती । सिंधु विपुलता कृपालु बघती ॥
देखाया प्रभु करुणा कंद । प्रगट होति सब जलचर वृंद ॥
मकर नक्र झष नाना व्यालहि । शत योजन तन परम विशालहि ॥
कांहिं असे गिळतीहि अशांनां । तेहि घाबरति परी दुजानां ॥
प्रभुस बघति, ना हटति हटवले । सर्व सुखी बहु मनीं हर्षले ॥
त्यांच्या आड न दिसते वारी । मग्न बघुनि हरिरूपा भारी ॥
कटक निघे प्रभु आज्ञा मिळतां । कोण वर्णि कपिकटक विपुलता ॥

दो० :- सेतुबंधिं गर्दी अति कपि नभपथिं उडतात ॥
चढ चढुनी जलचरांवरि अपर पार जातात ॥ ४ ॥

सेतू बांधून झाला व तो अति सुद्दढ बनविलेला पाहून कृपानिधी रघुवीरांच्या तो मनांत भरला “ कपिचमू जाई सागरपार ” कपिसेना सेतूकडे चालू लागली ॥ १ ॥ त्या सेनेचे वर्णन करता येणे शक्य नाही, वानर वीरांच्या झुंडीच्या झुंडी गर्जना करीत आहेत ॥ २ ॥ कृपालु रघुपती सेतुबंधाच्या तटावर चढून सागराचा ( अफाट ) विस्तार पाहूं लागले ॥ ३ ॥ करुणाकंद प्रभु रामचंद्रांच्या दर्शनासाठी सर्व जलचरांचे वृंद प्रगट झाले. ( सागराच्या पृष्ठभागावर आले ) ॥ ४ ॥ अनेक जातींच्या मगरी सुसरी, मासे, सर्प, सर्व प्रगट झाले त्यांचे देह शतयोजन लांबीचे व फार विशाल आहेत ॥ ५ ॥ अशांना सुद्धा गिळून टाकतील असे काही आहेत, पण ते सुद्धा ज्यांना घाबरतात, असे दुसरे आहेतच. ॥ ६ ॥ परंतु हे सर्व ( एकमेकांची भीती सोडून ) प्रभूकडे बघत राहीले आहेत. व इतरांनी हटवून सुद्धां बाजूस हटत नाहीत. सर्वाच्या मनांत हर्ष झाला असून सगळे फार सुखी झाले आहेत. ॥ ७ ॥ या जलचरांनी आच्छादले गेल्यामुळे सागराचे जल दिसेनासे झाले आहे हरीचे रुप निरखून ते सर्व अति प्रेममग्न झाले आहेत. ॥ ८ ॥ प्रभूंची आज्ञा होताच सैन्य सेतूवरुन कूच करु लागले, ते किती अफाट होते याचे वर्णन कोण बरे करेल ? ( कोणालाही ते शक्य नाही ॥ ९ ॥ सेतुबंधावर बेसुमार गर्दी झाली तेव्हा काही कपी आकाशमार्गाने उडत चालले व दुसरे काही ज्या जलचरांवर पुन:पुन्हा चढून पार जाऊं लागले ॥ दो० ४ ॥

उभय बंधु हें कौतुक बघती । विहसति रघुपति कृपालु निघती ॥
उतरलेहि रघुवीर ससेना । कपि यूथप दाटी बदवेना ॥
तळ देती प्रभु पार सागरा । आज्ञा दिधली सकल कपिवरां ॥
रवा जाउनि फल मूल सुशोभन । श्रवण धावले भल्ल कीशगण ॥
सब तरु फळले रामालागुनि । कालगती ऋतु कुऋतू त्यागुनि ॥
खाति मधुर फळ विटपां हलविति । लंके सम्मुख शिरवरें फेकिति ॥
फिरत कुठें जैं निशिचर निरखिति । घेरिति सगळे नाच नाचविति ॥
दशनीं कापुनि नाकां कानां । प्रभुयश वदवुनि सोडिति त्यानां ॥
ज्यांचे नासा कर्ण कापले । ते जाउनि रावणास वदले ॥
श्रवणीं पडतां वारिधि बंधन । दशमुखिं उद्‍गारला व्याकुळुन ॥

दो० :- बद्ध नीरनिधि वननिधि जलधि सिंधु वारीश ॥
सत्य ? तोयनिधि कंपति उदधि पयोधि नदीश ॥ ५ ॥

रामलक्ष्मणांनी हे कौतुक पाहीले व दोघे मोठ्याने हसले व मग कृपालु रघुपतीही निघाले ॥ १ ॥ रघुवीर सेनेसह उतरले सुद्धा, कपी यूथपतींची गर्दी इतकी झाली आहे की ती सांगणे शक्य नाही ॥ २ ॥ “ समाचार हा मिळे रावणा ” – सागराच्या पार जाऊन प्रभुंनी तळ दिला आणि सर्व कपीवरांना आज्ञा दिली की ॥ ३ ॥ जाऊन सुंदर फलमूले खा. हे ऐकताच भल्ल कपिगण सर्वत्र धावत गेले ॥ ४ ॥ अनुकूल प्रतिकूल ऋतू व कालगति यांना सोडून रामचंद्रांसाठी सर्व वृक्ष फळले ॥ ५ ॥ वानर मधुर फळे खाऊ लागले व गदगदा वृक्ष हालवूं लागले आणि गिरीतरु लंकेकडे फेकू लागले ॥ ६ ॥ कुठे फिरत असलेला निशाचर दिसला की त्याला सगळे घेरुन घेरुन नाच नाचवितात. ॥ ७ ॥ दातांनी नाक-कान कापून घेऊन प्रभु सुयश वदवून मग सोडून देतात.॥ ८ ॥ ज्यांचे नाक कान कापले गेले त्यांनी लंकेत जाऊन रावणास सर्व हकीकत सांगीतली ॥ ९ ॥ वारिधिबंधन कानी पडताच तो व्याकुळ होऊन एकदम दहा मुखांनी उदगारला ॥ १० ॥ काय खरोखरच नीर-वन-जल-निंधी, सिंधु, वारीश, तोयनिधि, कंपति, उदधि, पयोधि, नदीश बद्ध केला ? ( त्यावर सेतू बांधला ? ) ॥ दो० ५ ॥

व्याकुळता मग अपली बघुनि । विहसुनि जाइ गृहीं भय भुलुनी ॥
मंदोदरि ऐके प्रभु आला । सिंधु कौतुकें बद्ध करविला ॥
पतिस धरुनि कर निज गृहिं आणी । बोले परम मनोहर वाणी ॥
पसरी पदर पदीं शिर नमुनी । प्रिय ! ऐका वच कोप टाकुनी ॥
नाथ ! वैर तों त्यासी करणें । बुद्धि, बळें ज्या शक्य जिंकणें ॥
तुम्हिं रघुपति मधिं अंतर कैसे । खलु खद्योत दिनकरीं जैसें ॥
अतिबल मधु कैटभ जो मारी । महावीर दितिसुत संहारी ॥
बलि बांधुनि दशशतभुज वधला । तो भूभार हरण अवतरला ॥
त्यासि विरोध नका करूं नाथा । जीव काल कर्मे ज्या हातां ॥

दो० :- रामा सोपुनि जानकी नमुनि कमलपदिं माथ ॥
सुता राज्य अर्पुनि भजा जाउनि वनिं रघुनाथ ॥ ६ ॥

मग आपली व्याकुळता पाहून ( मनात ) विचार करुन मोठ्याने हसून भय विसरुन घरी गेला.॥ १ ॥
मंदोदरीचा रावणास ( दुसरा ) उपदेश - मंदोदरीने ऐकले की प्रभु आले, आणि त्यांनी सहज लीलेने समुद्र बद्ध केला ॥ २ ॥ पतीचा हात धरुन तिने त्याला स्वत:च्या महालात नेला आणि परम मनोहर वाणीने ती बोलली ॥ ३ ॥ पायांवर डोके ठेऊन पदर पसरुन ती म्हणाली, हे प्रिया ! क्रोध बाजूला ठेऊन ( न रागावता ) माझे म्हणणे ऐका. ॥ ४ ॥ नाथ ! ज्याला बुद्धीने व बळाने जिंकणे शक्य आहे त्याच्याशी वैर करावे ॥ ५ ॥ रघुपतीत व तुमच्यात अंतर कसे आहे म्हणाल तर सूर्य व काजवा यांच्याइतकं ! ॥ ६ ॥ ज्याने अति बलवान मधु-कैटभांना मारले, हिरण्याक्ष – हिरण्यकशिपु यांचा संहार केला ॥ ७ ॥ ज्याने बळीला बांधला व ज्याने सहस्त्रबाहूला मारला तोच पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी अवतरला आहे ॥ ८ ॥ नाथा ! जीव काळ व कर्म ज्यांच्या हातात आहेत, त्यांच्याशी वैर करु नका ॥ ९ ॥ रामचंद्रांस जानकी देऊन त्यांच्या चरणकमलांवर मस्तक नमवून ( त्यांना शरण जाऊन ) पुत्रांना राज्य देऊन वनांत जाऊन रघुनाथांचे भजन करा ॥ दो० ६ ॥

नाथ ! दीन दयाळु रघुराजहि । जातां शरण, न खाई वाघहि ॥
केले सगळ्या कर्तव्याला विजित सुरासुर चरांचरांला ॥
संत वदति अशि नीति दशानन । वृद्ध नृपें सेवावें कानन ॥
तिथें करा तद्‌भजना भर्ता ! । जो कर्ता धर्ता संहर्ता ॥
रघुविर तो अनुरागी प्रणतां । नाथ भजा त्यागुनि सब ममता ॥
मुनिवर य‍त्न करिति ज्या लागीं । त्यजुनि राज्य नृप होति विरागी ॥
तो कोसलाधीश रघुराया । आला करण्या तुझ्यावर दया ॥
प्रिय जर माना माझी शिकवण । त्रिभुवनिं भरे सुयश अति पावन ॥

दो० :- विनवत नयनीं नीर ये धरि पद कंपत काय ॥
नाथ भजा रघुनाथ हि मम सौभाग्य चिराय ॥ ७ ॥

नाथ ! रघुराज दीनदयाळू आहेत वाघाला शरण गेल्यावर तो सुद्धा खात नाही तर ते क्षमा करतील यात नवल ते काय ! ॥ १ ॥ आत्तापर्यत जे करणे योग्य होते ( कर्तव्य ) ते सारे केले आहे सर्व देव-असुर-विश्व जिंकलेत ॥ २ ॥ हे दशानना ! संत अशी नीती सांगतात की वृद्ध राजाने वनात जाऊन रहावे ॥ ३ ॥ म्हणून हे भर्ता ( पतीराज ), तिथे वनांत जाऊन जो सर्वांचा कर्ता-धर्ता व संहर्ताही आहे त्याचे भजन करा. ( परब्रह्माचे = रघुवीराचे ) ॥ ४ ॥ नाथ ! तोच प्रणतांवर अनुराग – कृपा करणारा रघुवीर आहे बरं ! म्हणून सर्व ममता व सर्व ( संपत्तीस ) सोडून त्याला शरण जा. ॥ ५ ॥ ज्याच्या प्राप्तीसाठी मुनीवर प्रयत्‍न करीत असतात ( पण मिळत नाही ) व ज्याच्यासाठी राज्याचा त्याग करुन विरागी बनतात तोच कोसलधीश रघुराया आहे, अन, केवळ तुझ्यावर दया करण्यासाठी इतका जवळ आला आहे. ॥ ६-७ ॥ हे प्रिया ! माझी शिकवण जर तुम्ही मान्य केलीत तर त्रिभुवनात तुमचे अति पवित्र सुयश पसरेल. ॥ ८ ॥ असे विनवीत असता तिचे डोळे पाण्याने भरले व तिचा देह थरथर कापत असताना तिने पाय धरले व ती म्हणाली नाथ ! रघुनाथाला शरण जाच म्हणजे माझे सौभाग्य चिरकाल टिकेल. ॥ दो० ७ ॥

तैं रावण उठवुनी मय सुते । खल वदुं लागे अपल्या प्रभुते ॥
श्रुणु तूं प्रिये ? वृथा भय धरसी । कोण वीर जगिं समान मजसी ॥
वरुण कुबेर पवन यम कालां । विजित भुजबळें सब दिक्पालां ॥
देव दनुज नर सब वश मजला । कवण देतु भय उपजे तुजला ॥
समजाउनि नानापरिं तिजला । सभेमाजिं मग जाउन बसला ॥
कळलें मंदोदरि हृदयाला । कालविवश अभिमान किं झाला ॥
येउनि सभे पुसे सचिवांसी । युद्ध कशापरि करणें रिपुशी ॥
सचिव वदति कीं निशिचरपाला । प्रभु ! पुसणें बहुवार कशाला ? ॥
वदा कवण भय करूं विचार । अमचा नरकपिभल्ल अहार ॥

दो० :- तैं प्रहस्त ऐकुनि सकल बोले करयुग जोडि ॥
नीतिविरोध न करा प्रभु मंत्र्यां मति अति थोडि ॥ ८ ॥

( मंदोदरीला शोकविव्हल झालेली पाहून ) रावणाने मयकन्येला उठवली व तो दुष्ट आपली प्रभुता प्रभाव सांगू लागला ॥ १ ॥ प्रिये ऐक, तू कारण नसतानाच भय मानीत आहेस. माझ्यासारख्या वीर जगात कोण आहे ? ॥ २ ॥ मी वरुण, कुबेर, वायु, यम काळ इ. सर्व दिक्पालांना बाहुबळाने जिंकले आहे. ॥ ३ ॥ देव, दानव व मनुष्य हे सर्वच मला वश आहेत ( असे असतां ) तुला ( कोणाचे व कसले ) भय वाटते, सांग बरें ? ॥ ४ ॥ नाना परीनी समजूत घालून मग रावण सभेत जाऊन बसला. ॥ ५ ॥ मंदोदरीच्या हृदयाला कळले की काळाला विशेष वश झाल्यामुळे पतीला अभिमान झाला आहे. ॥ ६ ॥ सभेत विचार – सभेत येऊन त्याने सचिवांना विचारले की शत्रूशी कशा प्रकारे युद्ध करावे ते सांगा ॥ ७ ॥ सचिव म्हणाले हे निशिचर नायका ! हे प्रभु वारंवार कशाला विचारतां ॥ ८ ॥ सागावं की खरं भय कोणत, आणि विचार कशाचा करायचा ! नर कपि व अस्वले हा तर आपला आहार आहेत. ॥ ९ ॥ ते सगळे ऐकून प्रहस्ताने हात जोडले व म्हणाला, प्रभु ! नीती विरोध करु नका, कारण हे मंत्री महामूर्ख आहेत. ॥ दो० ८ ॥

वदति सचिव शठ तोंडपुजे अति । नाथ ! न पुरें पडे या पद्धतिं ॥
लंघुनि सिंधु एक कपि आला । स्मरति सकल मनिं तच्चरिताला ॥
तैं न भूक मुळिं तुम्हां कुणाला । जाळित पुर कां धरुन न खाल्ला ॥
श्रवणिं सुखद अंतीं दुःखद जें । मत सचिवानीं प्रभुस कथित तें ॥
बांधविला जिहिं वारिधि हेलां । सेनेसह उतरले सुवेला ॥
म्हणे ’मनुज तो खाऊं’ म्हणती । गाल फुगवुनी वृथा वल्गती ॥
श्रुणु मम वचन तात ! अति सादर । समजुं नका मनिं मजला कातर ॥
प्रिय वाणी जे ऐकति, वदती । ऐसे जगिं नर निकाय असती ॥
वचन परम हित कर्णकठोर हि । श्रोते वक्ते प्रभु नर अल्पहि ॥
प्रथम धाड दूतां श्रुणु नीती । सीता देउनि करणें प्रीती ॥

दो० :- नारी मिळतां जाति जर तर न वाढवा वैर ॥
ना तर सम्मुख करा रणिं झुंझ तात कीं स्वैर ॥ ९ ॥

हे सगळे सचिव तोंडपुजेपणा करुन बोलत आहेत हे अगदी शठ आहेत, नाथ ! या पद्धतीने शेवटपर्यंत आपला निभाव लागणार नाही. ॥ १ ॥ एक कपि सागर लंघून आला तर त्याची करणी अजून सर्वांच्या उरात धडकी भरवीत आहे ॥ २ ॥ तेव्हा तुम्हांला कुणाला मुळीच भूक नव्हती कां ? तो जेव्हा नगर जाळत होता तेव्हा त्याला धरुन का नाही खाल्लांत, कोणी ? ॥ ३ ॥ प्रभु सचिवानी जे मत सांगीतले ते ऐकण्यास गोड असले तरी परिणामीं दु:खदायक आहे. ॥ ४ ॥ ज्यांनी सहज खेळ म्हणून सागरावर सेतू बांधविला व जे सुवेल पर्वतावर उतरले ॥ ५ ॥ तो म्हणे मनुज ( मानव ! ) आणि त्याला खाऊ असे हे म्हणतात गाल फुगवून ( वीराचा आव आणून ) वृथा वल्गना करीत आहेत, झालं ! ॥ ६ ॥ तात ! मी म्हणतो ते आदराने ऐका, पण मनात असे समजूं नका मी भ्याड वा कातर आहे ॥ ७ ॥ प्रिय वाणी जे ऐकतात व बोलतात असे नर जगात पुष्कळ आहेत ॥ ८ ॥ परम हितकारक पण कर्णकठोर असे वचन ऐकणारे व बोलणारे नर हे प्रभु ! फारच थोडे असतात. ॥ ९ ॥ नीती ऐका – प्रथम वकील पाठवा व मग सीता देऊन त्यांच्याशी मैत्री करा. ॥ १० ॥ स्त्री मिळाल्यावर जर परत जात असले तर वैर वाढवूं नये नाही तर तात ! रणांगणांत समोरासमोर पाहीजे तसे युद्ध करावे. ॥ दो० ९ ॥

प्रभु जर हें मम मत मानवलें । तर जगिं सुयश उभयपरिं अपलें ॥
म्हणे रुष्ट दशकण्ठ सुतासी । शिकवि कोण अशि मति शठ ! तुजसी ॥
इतक्यांतचि उरिं संशय होई । वेणुमूळिं सुत जात घमोई ॥
परिसुनि पितृवच खर अति घोर । जाई भवनिं वच वदुनि कठोर ॥
मत हितकर तुज रुचे न तैसें । कालवशा कटु भेषज जैसें ॥
संध्या समय बघुनि दशशीस । जाइ भवनिं निरखत भुज वीस ॥
लंका शिखरावर आगार । तिथें अखाडा विचित्र फार ॥
जाइ बसे त्या मंदिरिं रावण । गावुं लागले किंनर गुणगण ॥
वाजति पखवाज टाळ वीणा । नृत्य करिति अप्सरा प्रवीणा ॥

दो० :- सुनासीर शत सदृश तो संतत करी विलास ॥
प्रबल परम रिपु शिरिं जरि तरी न चिंता त्रास ॥ १० ॥

प्रभु ! हे माझे मत जर तुम्हांला मानवले तर दोन्ही प्रकारांनी जगात तुमचे सुयश होईल. ॥ १ ॥ दशकंठाने रागावून मुलाला विचारले – शठा, ही बुद्धी तुला कुणी रे सुचविली ? आत्तापासूनच तुझ्या मनांत ज्या अर्थी संशय निर्माण झाला आहे त्याअर्थी हे मुला, तूं वेणूच्या वनांत घमोई ( कटिधोत्रा ) असा विपरीत जन्माला आला आहेच. ॥ ३ ॥ बापाचे ते अति कर्कश व घोर वचन ऐकून प्रहस्त कठोर वचन बोलून घरी गेला ॥ ४ ॥ ( जाता जाता म्हणाला की ) काळ वश झालेल्या माणसाला जसे कडू औषध रुचत नाही तसे माझे हितकर वचन तुला रुचले नाही ॥ ५ ॥ संध्यासमय झाला आहे असे पाहून रावण आपल्या वीस बाहूंकडे निरखीत घरी गेला. ॥ ६ ॥ लंका शिखरावर एक सुंदर भवन होते तेथे ( गाण्या बजावण्याचा ) फार विचित्र आखाडा असे ॥ ७ ॥ रावण जाऊन त्या मंदिरात बसला व किंनर गुणगण गावू लागले. ॥ ८ ॥ टाळ, परवाज, वीणा इ. वाद्ये वाजू लागली व प्रवीण अप्सरा नृत्य करु लागल्या ॥ ९ ॥ तो रावण शेकडो इंद्रांसारखा सतत भोगविलास करीत आहे. अत्यंत प्रबल शत्रू शिरावर आहे तरीही त्याला काहीही चिंता नाही वाटत की त्रास नाही वाटत ! ॥ दो० १० ॥

इथें सुवेल शैलिं रघुवीर । उतरति सचमू गर्दी फार ॥
शिखर एक अति तुंग बघोनी । परम रम्य, सम शुभ्रा क्षोणी ॥
तरु किसलय बहु सुमनें शोभन । रुचिर विरचिती स्वकरें लक्ष्मण ॥
मृदुल मृगाजिन रुचिर तयावर । त्या आसनिं आसीन कृपाकर ॥
प्रभुचें शिर कपिपति उत्संगीं । चाप निषंग वाम दक्षांगीं ॥
युग करकमलिं निरीक्षित बाणां । वदे मंत्र लंकेश्वर कानां ॥
महाभाग्य अंगद हनुमानां । चरण कमल चेपिति परि नाना ॥
मागें लक्ष्मण कृत वीरासन । कटिं निषंग करिं बाण शरासन ॥

दो० :- ऐसे कृपा रूप गुण धाम राम आसीन ॥
धन्य मनुज या ध्यानिं जे असति सद लयलीन ॥ ११रा ॥
पूर्व दिशे प्रभु पाहतां दिसला उदित मयंक ॥
वदति पहा सकलहि शशिसि मृगपति सदृश अशंक ॥ ११म ॥

सुवेल शैलावर श्री रघुवीर – इकडे रघुवीर सुवेल शैलावर सेनेसह उतरले व तेथे फार गर्दी झाली ॥ १ ॥ ( त्याचे ) एक शिखर अति उंच आहे व येथील भूमी ( क्षोणी ) परम रम्य, सम, व परम शुभ्र आहे असे पाहून लक्ष्मणाने कोमल तरु पल्लव व सुंदर फुले यांची आपल्या हातांनी सुंदर विशेष रचना केली ॥ २-३ ॥ व त्यावर मृदु व सुंदर मृगचर्म घातले व त्या आसनावर कृपासागर आसीन झाले. ॥ ४ ॥ प्रभुंचे मस्तक कपिपती सुग्रीवाच्या मांडीवर आहे प्रभुच्या डाव्या बाजूस धनुष्य व उजव्या बाजूस भाता आहे ॥ ५ ॥ प्रभु दोन्ही हातात बाण घेऊन त्यांचे निरीक्षण करीत आहेत. व लंकेश्वर बिभीषण प्रभूच्या कानांत काही गुप्त मंत्र ( सल्ला ) सांगत आहेत. ॥ ६ ॥ अंगद, हनुमंतांना महाभाग्य लाभले आहे की ते दोघे नाना परींनी चरणकमल चेपीत आहेत ॥ ७ ॥ प्रभुच्या मागे लक्ष्मण वीरासन घालून कमरेला भाता व हातात धनुष्यबाण घेऊन बसले आहेत. ॥ ८ ॥ कृपा, रुप आणि गुण यांचे धाम श्रीराम या प्रमाने विराजमान झालेले आहेत या ध्यानात जे मनुष्य सदा लयलीन ( निमग्न ) असतात ते धन्य होत ॥ दो० ११ रा ॥ प्रभूंनी पूर्व दिशेकडे पाहीले तो त्यांस चंद्र उगवलेला दिसला तेव्हा म्हणाले की, सर्वजण त्या शशीला पहा, कसा सिंहासारखा निर्भय दिसतो आहे. ॥ दो० ११ म ॥

पूर्वदिशा गिरिगुहा निवासी । परम प्रताप तेज बल राशी ॥
मत्त नाग तमकुंभ विदारी । शशि केसरी गगन वनचारी ॥
नभिं विकीर्ण मुक्ताफल तारा । निशा सुंदरी करि शृंगारा ॥
प्रभु वदले शशिमधिं मेचकता । कसली, सांगा तुम्हीं निज मता ॥
ऐका रघुपति सुकंठ सांगत । शशिमधिं तों भूछाया प्रगटत ॥
मारी राहु शशिस कुणी वदला । काळा डाग हृदयिं तो पडला ॥
कोणि म्हणे विधि रति वदनाला । रचि तेव्हां हरि शशिसाराला ॥
छिद्र इंदु उरिं दिसे प्रगट तें । त्यांतुन नभपडछाया दिसते ॥
प्रभु वदले विष शशिचा बंधुहि । प्रिय अति निज हृदयीं त्या ठेविहि ॥
विषसंयुत कर निकर पसरतो । विरहवंत नर नारि जाळतो ॥

दो० :- ऐका प्रभु हनुमान् म्हणे शशि तुमचा प्रिय दास ॥
विधु हृदिं तव मूर्ती वसे तो मेचकताऽऽभास ॥ १२रा ॥

पूर्व दिशारुपी गिरीगुहेत निवास करणारा प्रताप, तेज व बल यांचा परम सागर ॥ १ ॥ अंधार रुपी मदोन्मत्त हत्तीच्या गंडस्थळांना विदीर्ण करणारा शशीरुपी सिंह गगनरुपी वनांत संचार करीत आहे ॥ २ ॥ आकाशात विखुरलेल्या या तारा या मोती आहेत व तो निशारुपी सुंदरीने केलेला शृंगार आहे ॥ ३ ॥ प्रभु म्हणाले की शशीमधे जी श्यामता आहे ती कसली आहे ? तुम्ही आपापले मत सांगा पाहूं ॥ ४ ॥ सुग्रीव म्हणाला रघुपती ऐका – शशीमध्ये तर भूमीची छाया प्रगट झाली आहे ॥ ५ ॥ बिभीषण म्हणाला की – राहूने शशीला जो मार दिला त्याचा तो काळा डाग त्याच्या छातीवर पडला आहे. ॥ ६ ॥ अंगद म्हणाला - विधिने रतीचे मुख बनविले तेव्हा त्याने शशीचे सार काढून घेतले, त्याच्यामुळे चंद्राच्या हृदयात छिद्र पडले ते प्रगट दिसत असून त्यातून नभाची पडछाया दिसत आहे. ॥ ७-८ ॥ प्रभु म्हणाले की विष शशीचा अति प्रिय भाऊ आहे, म्हणून त्याने त्यास आपल्या हृदयातच ठेवला आहे. ॥ ९ ॥ तो विषारी किरण समूहास पसरवतो व विरही नर-नारींना जाळतो ॥ १० ॥ हनुमान म्हणाला – प्रभु ! ऐका शशी तुमचा प्रिय दास आहे, व विधुच्या हृदयांत तुमची मूर्ती वास करते, त्या श्यामतेचा तो आभास आहे ॥ दो० १२ रा ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP