॥ श्रीगणेशाय नमः ॥

॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीजानकीपतये नमः ॥

॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ तृतीय सोपान ॥

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय १ लाDownload mp3

अनुवादककृत मंगलाचरण

शा. वि.:- वामे यस्य शरासनं सुरुचिरं बाणः करे दक्षिणे ।
पृष्ठे यस्य विभाति भूमितनया तत्पृष्ठतो लक्ष्मणः ॥
वृक्षत्वक्कृतनिर्मलाम्बधरो यो वै जटाजूटधृग् - ।
भक्तानामभयप्रदो रघुवरो नः पातु कान्तारगः ॥ १ ॥
पृथ्वी :- गुरोश्चरणमानसं सुविमलं सुमुक्त-प्रदम् ।
पदं परमहंसगं परमपावनं पूरितम् ॥
निजात्मसुखवारिणा भवभयाग्नि-निःसारिणा ।
त्रितापदववारिणा जनिनिवारिणा पातु माम् ॥ २ ॥

मूळ मंगलाचरण

शा. वि. :- मूलन्धर्मतरोर्विवेकजलधेः पूर्णेन्दुमानन्ददम् ॥
वैराग्याम्बुजभास्करं ह्यघघनध्वान्तापहन्तापहम् ॥
मोहाम्भोधरपूगपाटनविधौ स्वःसम्भवं शङ्करं ॥
वन्दे ब्रह्मकुलं कलङ्कशमनं श्रीरामभूपप्रियम् ॥ ३ ॥
सान्द्रानन्द-पयोद-सौभगतनुं पीताम्बरं सुन्दरं ॥
पाणौ बाण-शरासनं कटिलसत्तूणीरभारं वरम् ॥
राजीवायत-लोचनं धृतजटाजूटेन संशोभितम् ॥
सीतालक्ष्मणसंयुतं रामाभिरामं भजे ॥ ४ ॥
सो० :- उमे ! रामगुण गूढ पंडित मुनि पावति विरति ।
धावति मोह विमूढ जे हरिविमुख, न धर्मरति ॥ ५ ॥

अनुवादककृत मंगलाचरण

ज्याच्या डाव्या हातात अति तेजस्वी धनुष्य आहे व उजव्या हातात बाण आहे, ज्यांच्या पाठीमागे भूमीकन्या (सीता) शोभत आहे व तिच्या पाठीमागे लक्ष्मण उभे आहेत, ज्यांनी वृक्षांच्या सालींची बनविलेली निर्मळ वस्त्रे (वल्कले) धारण केली आहेत, ज्यांनी जटामुकुट धारण केला आहे व जे भक्तांना अभय देणारे आहेत, ते अरण्यात जात असलेले रघुवर राम आमचे रक्षण करोत. ॥ १ ॥ सद्‌गुरुचरणरूपी मानस-सरोवर अति निर्मल असून उत्तम मुक्त (मोती) पुरविणारे, जेथे परमहंस जातात (राहतात) असे परम पवित्र स्थान (पदं) आहे जे भवभयरूपी आगीला विझविणार्‍या, त्रिविध ताप रूपी दावानल (वणवा) निवारण करणार्‍या व जन्मनिवारण करणार्‍या नित्य आत्मसुखरूपी जलाने परिपूर्ण आहे तें माझे रक्षण करो. ॥ २ ॥

गोस्वामी तुलसीकृत मंगलाचरण -
धर्मरूपी तरुचे मूळ, विवेकरूपी सागराला भरती आणणारा ( आनंद देणारा) पूर्णचंद्र, पाप आणि घनदाट अंधार यांचा अपहार करणारा, तापहरण करणारा व वैराग्यरूपी कमलांना सूर्याप्रमाणे आनंद देणारा, मोहरूपी मेघांच्या समुदायाचा विनाश करण्याच्या विधित वायुसारखा, ब्रह्मदेवाचा गोत्रज, कलंकांचा विनाश करणारे श्रीरामभूपती ज्यांना प्रिय आहेत व जे श्रीरामभूपतीला प्रिय आहेत त्या शंकरास मी वंदन करतो. ॥ १ ॥
जे सदा आनंदघन आहेत व ज्यांचा देह मेघाप्रमाणे सुंदर आहे, पिवळे वस्त्र (वल्कले) धारण केलेले व सुंदर आहेत, ज्यांच्या हातात धनुष्यबाण आहेत, ज्यांच्या कमरेला भात्याचा भार शोभत आहे, ज्यांचे नेत्र उत्तम कमलासारखे विशाल आहेत व जे धारण केलेल्या जटामंडलाने सुशोभित दिसत आहेत, जे सीता-लक्ष्मणांसह मार्गाने जात आहेत व जे आपल्या सुंदर स्त्रीला (सीतेला) आनंद देणारे आहेत अशा रामचंद्रास मी भजतो (शरण जातो). ॥ २ ॥
उमे ! रामगुण गूढ आहेत. पंडितमुनि (त्यांच्यामुळे) वैराग्य पावतात. पण विमूढांना (पढतमूर्खांना) व जे हरिविमुख आहेत व ज्यांना धर्मरति नाही, अशांना मोह होतो. ॥ सो. १ ॥

पुर-नर-भरत-प्रीती वर्णित । अनुपम मति अनुरूप सुशोभित ॥
आतां प्रभुचरिता अति पावन । श्रुणु, कृत वनिं सुर नर मुनि भावन ॥
रुचिर एकदां सुमनं जमविलीं । स्वकरिं भूषणें रामें रचिलीं ॥
प्रभु घालुनि सीतेला सादर । बसले स्फटिक शिलेवरि सुंदर ॥
काकरूप सुरपतिसुत धरतो । शठ रघुपति बल पाहूं बघतो ॥
पिपीलिका जशि सागरठावा । महा-मंदमति म्हणते घ्यावा ॥
पळे चरणिं चोंचुनि सीतेप्रति । कारण-काक हि मूढ मंदमति ॥
स्रवे रुधिर रघुनायक जाणति । कुशधनुवरि सायक संधानिति ॥

दो० :- अति कृपालु रघुनायक संतत दीनीं स्नेह ॥
त्यासी छलकरि येउनी मूर्ख हि अवगुण-गेह ॥ १ ॥

सीतेचा पुष्पशृंगार व सुरपति सुत-करणी - पुरवासी लोक व भरत यांच्या अनुपम व सुंदर प्रीतीचे मी यथामति वर्णन केले. ॥ १ ॥ सुर, नर व मुनी यांना आवडणारे वनांत केलेले अति पावन चरित्र आता सांगतो, उमे ते ऐक. ॥ २ ॥ एकदा रामचंद्रांनी सुंदर फुले गोळा केली व आपल्या हातांनी त्यांची सुंदर भूषणे बनविली. ॥ ३ ॥ ती प्रभूंनी आदराने सीतेच्या अंगावर घातली व प्रभु सुंदर स्फटिक शिळेवर बसले. ॥ ४ ॥ देवराज इंद्राच्या सुताने कावळ्याचे रूप घेतले व तो शठ रघुपतीचे बळ जाणू पहात आहे. ॥ ५ ॥ मुंगीने सागराचा ठाव घेण्याची जशी इच्छा करावी तसेच त्या महामंदमतीला वाटले. ॥ ६ ॥ तो मूढ, मंदमती, कारण-काक सीतेच्या पायावर चोच मारून पळाला. ॥ ७ ॥ रक्त वाहूं लागले तेव्हा रघुनायकाने जाणले व दर्भाच्या धनुष्यावर दर्भाचा बाण लावला. ॥ ८ ॥ रघुनाथ अतिकृपालु व नेहमी दीनांवर स्नेह करणारे असून त्याने येऊन त्यांच्याशी कपट केले. कारण तो मूर्ख व अवगुणांचे माहेरघरच ! ॥ दो० १ ॥

सुटे ब्रह्मशर मंत्रे प्रेरित । वायस सभय सुटे पळ काढित ॥
जाइ धरुनि निजरूप पित्यासी । राखि न राम विमुख तनयासी ॥
अति सभीत मनिं होइ निराशा । यथा चक्रभयिं ऋषि दुर्वासा ॥
ब्रह्मधामिं शिवपुरीं सब लोकीं । श्रमित फिरे व्याकुळ भय शोकीं ॥
कोणि तया बस असें वदेना । रामद्रोह्या कोणि रक्षि ना ॥
पितृ यम माता मृत्यु समाना । सुधा विष बने श्रुणु हरियानाा ॥
करी मित्र शतशत्रू-करणी । त्याला विबुधनदी वैतरणी ॥
अनलाहुनि जग तप्त तयाला । जो रघुवीर विमुख कुणि झाला ॥
नारद देखति विकल जयंता । येइ दया कोमलमन-संता ॥
तत्क्षण रामापाशिं पाठवित । ’त्राहि ! प्रणतहित’ म्हण किं पुकारित ॥
आतुर सभय जाइ धरि पाय हि । पाहि पाहि दयाल रघुराज हि ॥
प्रभुता अतुलित बल अतुलित ही । अति मतिमंदा विदित मज नही ॥
निजकृत-कर्मज फळ मी ल्यालों । पाहि अतां प्रभु शरण निघालों ॥
श्रवुनि कृपाल आर्त अति वाणी । त्यजिति करुनि एकाक्ष भवानी ! ॥

सो० :- करी द्रोह मोहून जरी तयाचा वध उचित ॥
प्रभु सोडिती द्रवून कुणि कृपाल रघुवीर सम ॥ २ ॥

मंत्राने प्रेरित तो ब्रह्मशर सुटला, चालला, तेव्हा कावळा भयभीत होऊन पळत सुटला. ॥ १ ॥ आपले नेहमीचे रूप घेऊन (जयंत) तो पित्याकडे गेला पण रामविरोधी पुत्राला त्याने सुधा आश्रय दिला नाही. ॥ २ ॥ चक्राच्या भयाने दुर्वास ऋषी जसे घाबरले तसाच तो अतिशय घाबरला व निराश झाला. ॥ ३ ॥ श्रांत, भयाने व शोकाने व्याकुळ झालेला तो ब्रह्मलोक, शिवलोक इ. सर्व लोकात फिरला. ॥ ४ ॥ पण कोणी त्याला ’बस’ सुद्धा म्हणाले नाहीत. रामाचा द्रोह करणार्‍याचे कोणीही रक्षण करू शकत नाहीत (कोण करणार !). ॥ ५ ॥ हे हरियाना गरुडा, ऐक रामद्रोह्याला बाप यमासारखा, आई मृत्युसारखी व अमृत विषासारखे होते. ॥ ६ ॥ मित्र शेकडो शत्रूंची करणी करतो, आणि त्याला देवनदी गंगा वैतरणी नदी सारखी होते. ॥ ७ ॥ जो कोणी रामविमुख होतो त्याला सर्व जगच अग्निपेक्षा तापदायक होते. ॥ ८ ॥ व्याकुळ झालेला जयंत नारदांच्या दृष्टीस पडला, तेव्हा कोमल मनाच्या संताना त्याची दया आली. ॥ ९ ॥ त्यांनी त्याला तत्क्षणी रामापाशी पाठवला व सांगितले ’त्राहि प्रणतहित’ असे पुकारित रहा. ॥ १० ॥ व्याकुळ व भयभीत झालेला तो जवळ गेला व पाय धरून म्हणाला, दयाळा रक्षण करा, (रघुराज पाहि). ॥ ११ ॥ आपली प्रभुता अतुलित आहे व आपले बळसुद्धा अतुलित आहे, पण मला मतिमंदाला कळले नव्हते. ॥ १२ ॥ प्रभो ! मी आपल्या कर्माचे (दुष्कृत्याचे) फळ पावलो. तथापि मी आता आपल्याला शरण आलो आहे, मला वाचवा (त्या अस्त्रापासून). ॥ १३ ॥ भवानी ! त्याची ती आर्त वाणी प्रभूंनी ऐकली आणि त्याला एकाक्ष करून सोडून दिला (ठार मारला नाही). ॥ १४ ॥ मोहवश होऊन द्रोह केला म्हणून त्याचा वध करणेच उचित होते तरी पण प्रभूंनी दया करून त्याला जिवंत सोडला ! तेव्हां रघुवीरासारखा कृपालु कोण आहे ? ॥ दो० २ ॥

वसुनि चित्रकुटिं रघुपति नाना । करिती श्रुति-पीयुष चरितानां ॥
असें राम मग मनिं अनुमानिति । होइल गर्दि सकल मज जाणिति ॥
मुनिगण-निरोप घेते झाले । भ्राते सीते सहित निघाले ॥
अत्रि-आश्रमा प्रभु जैं गेले । श्रवत महामुनि हर्षित झाले ॥
वपु पुलकित मुनि उठुनि धावले । बघुनि शीघ्रगति राम पावले ॥
करत दंडवत मुनि उरिं धरिती । प्रेमजलें उभयां स्नपवीती ॥
बघुन रामछवि लोचन निवले । स्वाश्रमिं सादर तदा आणले ॥
पूजन करुनि वचन शुभ वदले । दिलें मूल फल प्रभुमनिं रुचलें ॥

सो० :- प्रभु आसनिं आसीन नेत्र भरुनि शोभा बघुनि ॥
मुनिवर अती प्रवीण स्तुती करिति पाणी जुळुनि ॥ ३ ॥

चित्रकूटला राहून रघुपतींनी कनांना अमृतासारखी वाटणारी अनेक चरित्रे केली. ॥ १ ॥ मग रामचंद्रांनी मनात असा विचार केला की मला सर्वांनी ओळखले - जाणले आहे. त्यामुळे आता येथे गर्दी होईल. ॥ २ ॥ मुनिगणांचा निरोप घेऊन दोघे भाऊ सीतेसहित निघाले. ॥ ३ ॥
प्रभु - मुनि अत्रि भेट प्रकरण - प्रभु जेव्हा अत्रिंच्या आश्रमात शिरले तेव्हा ही बातमी ऐकून महामुनि हर्षित झाले ॥ ४ ॥ त्यांच्या अंगावर रोमांच उठले, व अत्रिमुनि स्वागत करण्यासाठी उठून धावत पुढे आले, आणि हे पाहून राम शीघ्रगतीने चालत आले. ॥ ५ ॥ राम - लक्ष्मण दंडवत करीत असतांच मुनींनी त्यांना हृदयाशी धरले व प्रेमाश्रूंनी दोघांना स्नान घातले. ॥ ६ ॥ रामचंद्रांचे रूप पाहून मुनींचे नेत्र निवले व नंतर त्यांना आदराने आपल्या आश्रमात पर्णकुटीत आणले. ॥ ७ ॥ पूजा करून सुंदर शुभ वचने बोलून कंदमूल फळे दिली व ती प्रभूंच्या मनाला रुचली. ॥ ८ ॥ प्रभु लक्ष्मण व सीतेसह आसनावर बसलेले आहेत , त्यांची शोभा डोळे भरून पाहून अति प्रवीण मुनीवर हात जोडून स्तुती करू लागले. ॥ दो० ३ ॥

छं० :- प्रमाणिका० नमामि भक्त वत्सलं । कृपालु शील कोमलं ॥
भजामि ते पदांबुजं । अकामिनां स्वधामदं ॥
निकाम श्याम सुंदरं । भवाम्बुनाथ मंदरं ॥
प्रफुल्ल कंज-लोचनं । मदादि दोष मोचनं ॥
प्रलंब बाहु विक्रमं । प्रभोऽप्रमेय वैभवं ॥
निषंग चाप सायकं । धरं त्रिलोक नायकं ॥
दिनेश वंश मंडनं । महेश चाप खंडनं ॥
मुनींद्र संत रंजनं । सुरारि वृंद भंजनं ॥
मनोज वैरि वंदितं । अजादि देव सेवितं ॥
विशुद्ध बोध विग्रहं । समस्त दूषणापहं ॥
नमामि इंदिरा-पतिं । सुखाकरं सतां गतिं ॥
भजे सशक्ति सानुजं । शची पति प्रियानुजं ॥
त्वदंघ्रि-मूल ये नराः । भजंति हीन-मत्सराः ॥
पतंति नो भवार्णवे । वितर्क वीचि संकुले ॥
विविक्त-वासिनः सदा । भजंति मुक्तये मुदा ॥
निरस्य इंद्रियादिकं । प्रयांति ते गतिं स्व-कं ॥
तमेकमद्‌भुतं प्रभुं । निरीहमीश्वरं विभुं ॥
जगद्‌गुरुं च शाश्वतं । तुरीयमेव केवलं ॥
भजामि भाववल्लभं कुयोगिनां सुदुर्लभं ॥
स्वभक्त कल्प-पादपं । समं सुसेव्यमन्वहं ॥
अनूप रूप भूपतिं । नतोऽहमुर्विजा पतिं ॥
प्रसीद मे नमामि ते । पदाब्ज-भक्ति देहि मे ॥
पठंति ये स्तवं इदं । नरादरेणे ते पदं ॥
व्रजंति नात्र संशयं । त्वदीय भक्ति संयुताः ॥

दो० :- विनति करुनि मुनि नमुनि शिर वदती जोडुनि हात ॥
कधीं बुद्धि मम ना त्यजो चरण-सरोरुह नाथ ॥ ४ ॥

अत्रिकृत अश्लेषा नक्षत्र स्तुति - भक्तवत्सल, कृपालु व कोमल स्वभावाच्या आपणांस मी नमन करतो. निष्काम भक्तांना आपले धाम देणार्‍या आपल्या चरणकमलांना मी भजतो (त्यांचा आश्रय करतो) ॥ १ ॥ आपण अत्यंत श्याम सुंदर, भवसागर मंथनासाठी मंदराचलरूप, पूर्ण विकसित कमळाप्रमाणे नेत्र असणारे आणि मद, मोह, मत्सर आदि दोषांपासून मुक्त करणारे आहांत. ॥ २ ॥ प्रभो, आपला दीर्घ बाहूचा पराक्रम प्रमाणांनी जाणता न येणारा असा आहे, व आपले ऐश्वर्य प्रमाणातीत आहे. आपण भाता, बाण व धनुष्य धारण केलेले त्रैलोक्याचे नायक (ईश्वर) आहांत. ॥ २ ॥ आपण सूर्यवंशाला विभूषित केलेत. महेशाचे धनुष्य मोडलेत व आता संत व मुनीश्रेष्ठ यांना आनंद देण्यासाठी देवांच्या शत्रूसमूहाचा, राक्षसांचा नाश करणारे ठरणार आहांत. ॥ ४ ॥ कामदेवाचे वैरी महादेव द्वारा वंदित व ब्रह्मदेव वगैरे देवांनी सेवित, विशेष निर्मल ज्ञानमय देह असणार्‍या व समस्त दोषांचा अपहार विनाश करणार्‍या आपणांस मी नमन करतो. आपण लक्ष्मीपती, सुखाचे सागर, संतांची एकमात्र गति, व शचीपती इंद्राचे प्रिय धाकटे भाऊ आहांत. आपली शक्ति सीता व अनुज लक्ष्मण यांच्यासहित आपणांस मी भजतो. ॥ ५-६ ॥ मनुष्य मत्सर रहित होऊन आपल्या चरणमूलांचे भजन करतात ते नाना तर्कवितर्करूपी तरंगांनी भरलेल्या भवसागरात पडत नाहीत. ॥ ७ ॥ जे एकांतवासी पुरुष मुक्तीच्या इच्छेने इंद्रियादिकांचा निरास करून सदा आनंदाने तुमचा आश्रय करतात ते आत्मसुखरूपी गतिला जातात. ॥ ८ ॥ त्या एक (अद्वितीय) अद्‌भुत सर्व समर्थ प्रभु, इच्छा-कामादि रहित, सर्वांचे ईश्वर, सर्वव्यापक, जगद्‌गुरु, शाश्वत, परात्पर (तुरीय) केवल स्वरूपालाच मी भजतो. ॥ ९ ॥ त्याच भावप्रिय, कुयोगी लोकांना अति दुर्लभ, आपल्या भक्तांना कल्पवृक्षासारखे सम, सदा सुलभतेने सेवा करण्यास योग्य अशांना मी नमन करतो. ॥ १० ॥ अनुरूप रूपसौंदर्य असलेले, ज्यांनी भूपतीरूप घेतलेले आहे व जे भूकन्या सीतेचे पती आहेत, त्यांना मी नत झालो आहे, शरण आलो आहे. माझ्यावर प्रसन्न व्हा ! मी आपल्याला नमस्कार करतो. मला तुमच्या चरणकमलांची भक्ति द्या. ॥ ११ ॥ जे नर या स्तुतीचे आदराने पठण करतील, ते तुमच्या भक्तिने उत्तम प्रकारे युक्त होऊन तुमच्या पदाला जातील यात संशय नाही. ॥ १२ ॥ या प्रमाणे स्तुती करून मुनींनी मस्तक नमवून हात जोडून पुन्हा म्हटले की नाथ ! माझी बुद्धी कधीही आपल्या चरण कमलांना न सोडो. ॥ दो० ४ ॥

अनसूया-पद धरुनी सीता । मग भेटली सुशील विनीता ॥
सुखा समृद्धी ऋषिपत्‍नीमनिं । बसवि निकट आशीर्वच देउनि ॥
लेववि वसनें दिव्य विभूषण । नित्य अमल तीं सुंदर नूतन ॥
ऋषिवधु वदुनि वाणि मृदु सरसा । वर्णिं मिषें स्त्री-धर्म अल्पसा ॥
माता पिता बंधु हितकारी । सकल मितप्रद राजकुमारी ! ॥
वैदेही ! अमित-द भर्ता ही । अधम नारि जी सेवित नाहीं ॥
धैर्य धर्म सन्मित्र नि नारी । आपत्कालिं परीक्षित चारी ॥
वृद्ध रोगवश निर्धन जडमति । अंध बधिर कोपिष्ट दीन अति ॥
करि अशाहि पतिच्या अपमाना । नारि भोगि यमलोकिं यातना ॥
हें व्रत एक धर्म हा नेमहि । पतिपदिं तनुमनवचनें प्रेम हि ॥
पतिव्रता हि चतुर्विध जगतीं । वेद पुराण संत सब वदती ॥
भाव उत्तमें मनीं असा ही । स्वप्निंहि अन्य पुरुष जगि नाही ॥
मध्यम परपति भाविति तैसे । भ्राता पिता पुत्र निज जैसे ॥
धर्मविचारिं बघुनि कुल राहे । स्त्री निकृष्ट ती श्रुति वदताहे ॥
भयें राहि अवसर मिळतां ना । अधम नारि ती जगांत जाणा ॥
पतिवंचक परपति रति करते । रौरव नर्किं कल्पशत पडते ॥
क्षणिक सुखा जन्मांतरि कोटी । दुःख न समजे ती अति खोटी ॥
मिळवि परमगति नारी श्रमविण । धर्म पतिव्रत पाळी छलविण ॥
पतिस विरोधी जिथें जन्मते । तरुणपणीं ती विधवा बनते ॥

सो० :- सहज अपावन नारि पति-सेवें शुभ मति मिळवि ॥
यश गाती श्रुति चारि अझुनि तुलसिका प्रिय हरिसि ॥ ५रा ॥
श्रुणु सीते तव नाम स्मरुनि पतिव्रत करिति वधु ॥
प्राणप्रिय तुज राम कथा जगहिता मी कथित ॥ ५म ॥

अनसूया - सीता भेट आणि पतिव्रता गीता - सुशील व विशेष नम्र असणार्‍या सीतेने अनसूयेचे पाय धरले व मग तिला मिठी मारली. ॥ १ ॥ ऋषीपत्नीच्या मनात सुखाची समृद्धी झाली व तिने आशिर्वाद देऊन सीतेला आपल्याजवळ बसविली. ॥ २ ॥ अनसूयेने दिव्य वस्त्रे (वल्कले) व दिव्य विभूषणे घेऊन सीतेच्या अंगावर घातली. ती नित्य निर्मल, नित्य नवी व नित्य सुंदर राहणारी आहेत. ॥ ३ ॥ मग ऋषीपत्‍नीने काहीतरी निमित्त करून मृदु व रसाळ वाणीने स्त्री धर्माचे थोडे वर्णन केले. ॥ ४ ॥ हे राजकुमारी ! माता, पिता व भाऊ हितकर्ता असला तरी ही सर्व मोजून मापून अल्पच देणारी आहेत. ॥ ५ ॥ अमित, अगणित देणारा फक्त भर्ताच आहे, म्हणून जी स्त्री पतीची सेवा करीत नाही ती अधम होय. ॥ ६ ॥ धैर्य, धर्म, चांगला मित्र आणि पत्‍नी - स्त्री या चौघांची परीक्षा आपत्काळीच होते. ॥ ७ ॥ वृद्ध, रोगी, निर्धन, मूर्ख, आंधळा, बहिरा, कोपिष्ट, अति दीन अशा पतीचा सुद्धा जी स्त्री अपमान करते तिला यमलोकांत यातना भोगाव्या लागतात. ॥ ८-९ ॥ शरीराने, मनाने व वाणीने पतिचरणी (दासीभावाने) प्रेम करणे हा स्त्रियांचा एक मुख्य नेम, हाच धर्म व हेच त्यांचे एक मुख्य व्रत आहे. ॥ १० ॥ जगात चार प्रकारच्या पतिव्रता असतात असे वेद, पुराणे, संत इत्यादि सर्व म्हणतात. ॥ ११ ॥ आपल्या पतीशिवाय जगांत दुसरा पुरुष स्वप्नांतही नाही अशी भावना उत्तम पतिव्रतेच्या मनांत असते. ॥ १२ ॥ आपला भाऊ, पिता किंवा पुत्र यांच्या विषयी जशी भावना असते तशीच भावना मध्यम पतिव्रतेला परपुरुषांविषयी असते. ॥ १३ ॥ धर्माच्या विचाराकडे व आपल्या कुळाकडे पाहूनच जी बिघडत नाही, शुद्ध राहते, ती निकृष्ट पतिव्रता स्त्री आहे असे वेद म्हणतात. ॥ १४ ॥ संधी न मिळाल्याने किंवा भयाने जी शुद्ध राहते ती स्त्री जगांत अधम पतिव्रता आहे असे समजावे. ॥ १५ ॥ पतिवंचना करून जी परपुरुषाशी रत होते ती शंभर टक्के नरकात पडते. ॥ १६ ॥ क्षणिक सुखासाठी कोट्यावधी जन्मात भोगाव्या लागणार्‍या दुःखाचा जी विचार करीत नाही तिच्यासारखी दुष्ट स्त्री नाही. ॥ १७ ॥ जी स्त्री छल न करता पतिव्रता धर्म पाळते ती इतर कोणत्याही श्रमांवाचून परमगति मिळवते. ॥ १८ ॥ पतिला विरोध करणारी स्त्री जिथे जन्मते, तिथे ती तरुणपणीच विधवा होते. ॥ १९ ॥ स्त्री स्वभावतःच (जन्मापासूनच) अपवित्र असते पण पतिसेवेने ती शुभ गति मिळवते. चारी वेद पतिव्रतांचे यश गातात व तुळस अजुनसुद्धा श्रीहरिला प्रिय आहे. ॥ दो० ५ रा ॥ सीते ! ऐक, तुझे नामस्मरण करून स्त्रिया पतिव्रत धर्माचे पालन करण्यास समर्थ होतील. तुला राम प्राणप्रिय आहे हे जाणते. ही कथा मी जगाच्या हितासाठी सांगितली. ॥ दो० ५ म ॥

श्रवुनि परम जानकि पावे । तिच्या चरणिं शिर नमवी भावें ॥
कृपानिधान मुनिस मग विनवति ॥ जाउं अनुज्ञें अन्य वनाप्रति ॥
कृपा मजवरी संतत करणें । दास समजुनी, प्रीति न तजणें ॥
धर्मधुरंधर प्रभुवच परिसुनि । प्रेमानें वदले ज्ञानी मुनि ॥
मत्कृपेसि अज शिव सनकादि हि । वांछिति परमार्थवादि सर्वहि ॥
राम ! अकामप्रिय आपण ते । दीन बंधु मृदु-वचना वदते ॥
श्रीचातुरी अतां मज कळली । त्यजुनि देवगण तुम्हांस भजली ॥
ज्यांसम अतिशय कोणी नाहीं । शील असें कां नसेल त्यांही ॥
कसें सांगु ’जा आतां स्वामी’ । वदा नाथ तुम्हिं अंतर्यामीं ॥
प्रभुला मग मुनि धीर विलोकित । लोचनिं जल वाहे वपु पुलकित ॥

छं० :- वपु पुलकिं फुलली प्रेमपूरित नयन मुखकंजीं स्थित ॥
मन-बुद्धि-गुण-गो-पर बघें मी प्रभुसि जप तप किति कृत ? ॥
जपयोग धर्म-समूहिं मनुजा भक्ति अनुपम मिळतसे ॥
रघुवीर चरित पुनीत निशिंदिन दास तुलसी गातसे ॥ १ ॥
दो० :- कलिमल-शमन दमन मना राम सुयश सुकमूल ॥
सादर ऐकति जे तयां राम राहि अनुकुल ॥ ६रा ॥
सो० :- कठिण काल मल रास ज्ञान न धर्म न योग जप ।
सांडुनि सर्व हि आस भजति राम ते चतुर नर ॥ ६म ॥

अनसूयेचे भाषण ऐकून जानकीला परम सुख झाले व तिने अनसूयेच्या चरणांवर मस्तक ठेऊन तिला नमस्कार केला. ॥ १ ॥ मग कृपानिधान राम मुनीला विनवितात की आपल्या अनुज्ञेने आम्ही दुसर्‍या वनांत जाऊं इच्छितो. ॥ २ ॥ मला सेवक समजून माझ्यावर संतत कृपा करावी व प्रीती असो द्यावी (सोडूं नये). ॥ ३ ॥ धर्मधुरंधर प्रभुचे वचन ऐकून ज्ञानी मुनि म्हणाले की, ॥ ४ ॥ ज्यांची कृपा ब्रह्मदेव, शिव आणि सनकादिकांना सुद्धा सर्वच परमार्थवादी इच्छितात. ॥ ५ ॥ ते अकामप्रिय राम, रामा ! आपणच दीनबंधु मृदुवचन बोलणारे आहांत. ॥ ६ ॥ आता मला लक्ष्मीची चतुरता कळली, की तिने सर्व देवसमुदाय सोडून आपलाच आश्रय का केला. ॥ ७ ॥ ज्यांच्या सारखा किंवा अधिक श्रेष्ठ कोणी नाही त्यांचे शील असे कां नसेल बरे ! (असणारच) ॥ ॥ ८ ॥ स्वामी ! आता जा असे मी कसे सांगू, हे नाथ ! आपणच सांगावे (कारण) आपण अंतर्यामी आहांत. ॥ ९ ॥ मग धीर मुनी प्रभुकडे बघत राहिले तेव्हां नेत्रातून जल वहात आहे, व देह पुलकित झाला आहे. ॥ १० ॥ शरीर रोमांचाने फुलुन गेले आहे, हृदय प्रेमाने परिपूर्ण आहे व प्रेमपरिपूर्ण नेत्र मुखकमलावर खिळले आहेत (व मनांत म्हणतात की) मी असे किती जप तप केले की मन बुद्धी गुण व इंद्रिये यांना अगम्य असे प्रभु मी बघत आहे ? जप योग इत्यादि धर्मसमूहाने मनुष्याला अनुपम भक्ति मिळत असते. तुलसीदास म्हणतात की, तुलसीदास रघुवीराचे पुनीत चरित्र रात्रंदिवस गात असतो. ॥ छं ॥ श्रीरामचंद्रांचे निर्मल यश (सुयश) कलिमलाचे शमन करणारे, मनाचे दमन करणारे, व सुखाचे मूळ आहे. जे कोणी आदराने श्रवण करतील / करतात त्यांना राम सदा अनुकूल राह्तात, त्यांच्यावर कृपा करतात. ॥ दो० ६ रा ॥ हा कलिकाल कठिण असून पापांची रासच आहे. यांत धर्म नाही, की जप नाही की योग नाही की ज्ञान नाही (हे मुख्य आधार नाहीत). म्हणून इतर सर्व आस = आशा, भरंव्सा सोडून जे रामचंद्रास भजतील तेच चतुर (शहाणे, स्वहितज्ञ) समजावे. ॥ दो० ६ म ॥

मुनिपद-कमलीं नमुनी शीर्ष । चालति वनिं सुरनर-मुनि-ईश ॥
पुढें राम लक्ष्मण माघारी । मुनिवर-वेष शोभतो भारी ॥
मध्यें श्री शोभतसे कैसी । ब्रह्म-जिवामधिं माया जैसी ॥
सरिता वन गिरि घाटहि अवघड । पतिं जाणुनि देतात वाट धड ॥
जाती जिथें देव रघुराया । तेथें करिति गगनिं घन छाया ॥
असुर विराध दिसे, पथिं जातां । येत करिति रघुवीर निपाता ॥
त्वरित रुचिर रूपासि पावला । दुःखि बघुनि निज-धामिं धाडला ॥
येति निकट मग मुनि-शरभंगा । सुंदर अनुज जानकी संगा ॥

दो० :- बघुनि राम-मुख-पंकजा मुनिवर-लोचन-भृंग ॥
करिति पान आदरें अति, धन्य जन्म शरभंग ॥ ७ ॥

विराध-वध प्रकरण - अत्रिमुनींच्या चरणकमलांवर आपले मस्तक ठेऊन मुनिवर व सुर यांचे ईश्वर वनांत चालूं लागले. ॥ १ ॥ राम पुढे आहेत व लक्ष्मण मागे आहेत व दोघांनी केलेला सुंदर मुनिवर वेष फारच शोभत आहे. ॥ २ ॥ दोघांच्या मधे श्री (सीता) कशी शोभत आहे म्हणाल तर ब्रह्म व जीव यांच्यामधे जशी माया. ॥ ३ ॥ नद्या, वन, पर्वत व अवघड घाट इ. सर्व आपले स्वामी (जगाचे पति) आहेत हे ओळखून चांगली धड वाट देऊं लागले. ॥ ४ ॥ देव रघुराया जिथे जिथे जातात तिथे तिथे मेघ आतां घनदाट छाया करूं लागले. ॥ ५ ॥ राम मार्गाने जात असतां विराध नांवाचा राक्षस वाटेत दृष्टीस पडला. तो अंगावर चाल करून येतांच रघुवीराने त्याचा निःपात केला. ॥ ६ ॥ रामबाणाने मरण येताच त्याला ताबडतोब सुंदर रूप प्राप्त झाले, पण त्याला दुःखी दीन पाहून प्रभूनी आपल्या धामास धाडले. ॥ ७ ॥
तनु-त्याग शरभंग प्रकरण - मग प्रभु सुंदर बंधु व जानकी यांच्या सहित मुनि शरभंगाच्या जवळ आले. ॥ ८ ॥ श्रीरामाचे मुखकमल पाहून मुनिश्रेष्ठाचे नेत्ररूपी भुंगे (रूप मकरंद) अति आदराने पान करू लागले. शरभंगाचा जन्म अति धन्य होय. ॥ दो० ७ ॥

वदले मुनि रघुवीर ! कृपाला । शंकर मानस राजमराला ॥
निघति चि होतो विरंचि-सदना । राम वनीं येतिल ये कानां ॥
होतो वाट बघत दिनराती । बघुनि अतां प्रभु निवली छाती ॥
नाथ ! सकल साधन मी हीन । कृता कृपा गणुनी जन दीन ॥
देव ! न हा उपकार मज करा । जनम न चोरा ! स्वपण कृत खरा ॥
तोंवर दीन-हितार्थ रहावें । जो तनु तजुनि तुम्हां न मिळावें ॥
योग यज्ञ जप तप कृत देई- । प्रभुसि भक्तिवर मागुन घेई ॥
मग शरभंग मुनी शर रचती । हृदयिं संग सब सोडुन बसती ॥

दो० :- सानुज सह सीते प्रभो नील जलदसे श्याम ॥
वसा सगुण रूपें सतत मम हृदयीं श्रीराम ॥ ८ ॥

मुनि म्हणाले - हे रघुवीरा ! कृपाला ! शंकरांच्या मनरूपी मानसांतील राजहंसा ! ॥ १ ॥ मी विरंचि सदनास (ब्रह्मलोकास) जाण्यासाठी निघतच होतो पण कानी आले की राम वनांत येतील (म्हणून गेलो नाही. ॥ २ ॥ आणि रात्रंदिवस आपली वाट बघत होतो. आतां आज प्रभूला पाहून (दर्शनाने) छाती निवली, शीतल झाली. ॥ ३ ॥ नाथ ! मी सकल - साधन हीन आहे. दीन सेवक समजून आपण कृपा केलीत. ॥ ४ ॥ पण देवा ! हा काही आपण माझ्यावर उपकार नाही केलात. जनमनचोरा ! आपण आपला पण खरा केलात. ॥ ५ ॥ जो पर्यंत देहत्याग करून मी तुमच्यांत मिळणार नाही तो पर्यंत आतां दीनाच्या हितासाठी आपण येथे थांबावे. ॥ ६ ॥ योग, जप, तप इत्यादि जे काही केले होते ते सर्व प्रभूला समर्पण केले व मुनीने भक्ति वर मागून घेतला. ॥ ७ ॥ मग शरभंग मुनीनी बाण (शर) रचले व हृदयांतील सर्व संग सोडून त्यांवर बसले. ॥ ८ ॥ आणि प्रभो ! सीता व अनुज यांच्यासहित नीलमेघाप्रमाणे श्याम श्रीराम ! सगुळ रूपाने माझ्या हृदयांत सतत निवास करा, रहा अशी प्रार्थना केली. ॥ दो० ८ ॥

मग योगाग्निंत देह जाळला । राम कृपें वैकुंठा गेला ॥
परि हरिलीन न झाला मुनिवर । आधिं घेतला भेदभक्ति वर ॥
ऋषि निकाय मुनिवर-गति बघती । हृदयिं विशेष सुखा ये भरती ॥
स्तुति करति मुनिवृंद बहु तदा । प्रणतहिता जय करुणा-कंदा ॥
मग रघुनाथ पुढें वनिं निघती । मुनिवर निकर सवें बहु चलती ॥
अस्थिराशि रघुराया दिसती । येइ दया अति, मुनींस पुसती ॥
जाणुनीहि कां पुसतां स्वामी । सर्वदर्शि तुम्हिं अंतर्यामी ॥
निशिचरगण भक्षित मुनि सगळे । तैं रघुवीरनेत्रिं जल भरलें ॥

दो० :- निशिचर-हीन करीन महि पण कृत भुज उचलून ॥
सकल मुनींना सुख दिलें तदाश्रमीं जाऊन ॥ ९ ॥

मग योगाग्नीने देह जाळला व मुनि रामकृपेने वैकुंठास गेला. ॥ १ ॥ मुनिवर हरिलीन झाला नाही याचे कारण त्याने आधीच भेदभक्ति वर मागून घेतला होता. ॥ २ ॥ ऋषिसमुदायांनी मुनिवराला मिळालेली गति पाहिली व त्या सर्वांच्या हृदयांत सुखाला विशेष भरती आली. ॥ ३ ॥ तेव्हां त्या पुष्कळ मुनिवृंदानी प्रभूची स्तुति केली व 'जय प्रणतहिता करुणाकंदा' असा जयजयकार केला. ॥ ४ ॥
शरभंगकृत मघानक्षत्र स्तुति - मग रघुनाथ वनांत पुढे निघाले तेव्हां मुनिवरांचे पुष्कळ समुदाय त्यांच्या बरोबर चालू लागले ॥ ५ ॥ वाटेने ठिकठिकाणी रघुरायांस हाडांच्या राशी दिसल्या तेव्हा अतिशय दया उपजली आणिमुनींना विचारले. ॥ ६ ॥ मुनि म्हणाले की स्वामी ! आपण सर्वदर्शी व अंतर्यामी आहांत, मग जाणून सुद्धां कां बरे विचारतां ? ॥ ७ ॥ निशाचरगणांनी खाल्लेले हे सगळे मुनि आहेत तेव्हां ते ऐकून रघुवीराचे डोळे पाण्याने भरले. ॥ ८ ॥ हात वर उचलून प्रतिज्ञा केली की मी पृथ्वी निशाचररहित करीन व नंतर सगळ्या मुनींच्या आश्रमात जाऊन त्यांना सुख दिले. ॥ दो० ९ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP