॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ लंकाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ४ था



Download mp3

दो० :- दशमुख तिकडे क्षोभला म्हणे क्रुद्ध सर्वांस ॥
धरा धरुनि मारा कपिसि अंगद करी स्मितास ॥ ३२म ॥

तिकडे दशानन क्षुब्ध झाला आणि सर्वांस क्रोधाने म्हणाला की – धरा त्या कपिला, धरुन ठार मारा ! तेव्हा अंगदाने स्मित केले. ॥ दो० ३२ म ॥

सुभट बघुनि ह्या वेगें धावा । खा कपि भल्ल जिथें तुम्हिं पावा ॥
मर्कटहीन करा महि जा, ते । तापस जीत धरा दो भ्रातें ॥
पुन्हा क्रुद्ध युवराजा बोलत । व्यर्थ वल्गसी लाज न वाटत ॥
कुलघात्या ! निज काप कंठ मर । बळ बघुनि न निर्लज्ज फुटे उर ॥
रे स्त्री चोरां कुमार्गगामी । खळ ! मळराशि मंदमति कामी ॥
सन्निपातिं जल्पसि दुर्वादां । अससि कालवश खल मनुजादा ॥
याचें फळ तूं पुढें पावशिल । जैं कपिभल्ल चपेटा बसतिल ॥
राम मनुज हें वदतां वाणी । झडति न तव रसना अभिमानी ॥
गळतिल रसना संशय नाहीं । सहित मस्तकां रणांगणां ही ॥

सो० :- तो नर कीं दशशीस एक शरें जिहिं वालि हत ॥
लोचन अंधहि वीस धिक् तव जन्म कुजाति जड ॥ ३३रा ॥
तव शोणिता पिपासु तृषित रामसायक निकर ॥
त्यजुं तुज कीं तो त्रासु कटुजल्पक निशिचर अधम ॥ ३३म ॥

सुभटांनो, ह्याला बघून वेगाने धावत जा, आणि जिथे कुठे तुम्हाला जे कपि सापडतील त्यांना धरुन खा. ॥ १ ॥ जा ( लवकर ) सारी पृथ्वी मर्कटहीन करा. आणि दोघे तापस भ्राते ( गोसावडे ) जिवंत पकडा. ॥ २ ॥ युवराज अंगद पुन्हा कृद्ध होऊन बोलू लागला की व्यर्थ वल्गना करतोस, तुला लाज नाही वाटत ? ॥ ३ ॥ रे कुळघातक्या ! तू आपला स्वत:चाच गळा कापून घे आणि मर निर्लज्जा ! बळ पाहून तुझी छाती कशी फुटली नाही ? ॥ ४ ॥ अरे स्त्री चोरा ! कुमार्गी, दुष्टा ! पापराशी ! मंदबुद्धी ! कामी ! तू सन्निपात ज्वर झाल्यासारखा अद्वातद्वा बोलत – बरळत आहेत, रे नरभक्षका, खला आता तू कालवश झालासच. ! ॥ ५-६ ॥ जेव्हा पुढे वानर, भल्ल यांच्या थपडा बसतील तेव्हा याचे फळ तुला मिळेल. ॥ ७ ॥ राम मनुज आहेत असे तूं वाणीने बोलत असतां तुझ्या सर्व रसना हे अभिमान्या कशा झडल्या नाहीत ? ॥ ८ ॥ सर्व रसना गळून पडतील यात संशय नाही-मस्तकासहित युद्धांत रणांगणांतच गळून पडतील. ॥ ९ ॥ रे दशशीर्षा ! ज्याने एका बाणाने वालीला मारला तो मनुष्य काय ? अरे कुजाति ! अरे जडा ( मूर्खा ) ! धिक्कार असो तुझ्या जन्माचा ! ॥ दो० ३३ रा ॥ रामचंद्रांच्या बाणाच्या समूहास तहान लागली असून तुझे रक्त पिण्याची त्यांना इच्छा आहे ती भीती आहे म्हणून रे ! कठोर बडबडणार्‍या नीच निशाचरा ! तुला मी जिवंत सोडतो. ॥ दो० ३३ म ॥

मी तव दशन पाडण्या लायक । परि न मजसि आज्ञा रघुनायक ॥
असा रोष कीं मुख दश तोडूं । लंका उचलुनि समुद्रिं गाडूं ॥
औदुंबर फल सम तव लंका । मधें वसा तुम्हिं जंतु न शंका ॥
मी वानर फळ खाण्या वार न । देती आज्ञा राम उदार न ॥
रावण हसला श्रवुनि युक्तिसि । मूढ कुठें अनृता अति शिकसी ॥
वालि न कधिं जल्पला असें अति । होसी लबाड तापस संगतिं ॥
वीस भुजा ! मी खरा लबाडहि । जर दश जिभा न उपटिन जाडहि ॥
समजुनि रामप्रताप कोपीं । कपि सभेंत पण करि पद रोपी ॥
उचलुं शकसि शठ मम पायातें । फिरति राम मी हरली सीते ॥
ऐका सुभट दशानन वदला । अपटा कपि महिं धरुनि पदाला ॥
इंद्रजीत आदिक विविधा भट । हर्षित बलवान् उठले पटपट ॥
बिलगुनि बळ बहु उपाय करुनी । पद न ढळे बसले शिर नमुनी ॥
पुन्हां उठुनि झटतात सुरारी । हले न कपिपद अशा प्रकारीं ॥
जेविं कुयोगि नरां उरगारी । मोह विटप उपटवे न भारी ॥

दो० :- कोटि सुभट घननादसम तैं उठले हर्षून ॥
झटति, पद न हाले बसति खाली मान घालून ॥ ३४रा ॥
भूमि न सोडी कपिचरण रिपुमद सोडी ठाय ॥
विघ्न कोटिनें नीतिला सोडि संतमन काय ॥ ३४म ॥

मी तुझे दात पाडण्यास समर्थ आहे, पण काय करुं रघुनायकाची आज्ञा मला नाही नां ! ॥ १ ॥ ( खरंतर ) असा राग आला आहे की, आणि असे वाटते की तुझी दहा तोंडे तोडून टाकावी आणि लंका उचलून समुद्रात गाडावी. ॥ २ ॥ तुझी लंका उंबराच्या फळासारखी आहे व तुम्ही सर्व त्यामध्ये क्षुद्र जंतूंप्रमाणे रहात असल्याने तुम्हांला शंका ( भीती ) वाटत नाही. ॥ ३ ॥ परंतु मी आहे वानर, मला फळ खाण्यास वेळ नाही लागणार, पण उदार रामचंद्रांनी तशी आज्ञा दिलेली नाही. ॥ ४ ॥ युक्ती ऐकून रावण हसला आणि म्हणाला की, मुला तू एवढा खोटेपणा कुठे शिकलास ? ॥ ५ ॥ वाली कधी असे अति बडबडला नाही, तू त्या तापसाच्या संगतीने लबाड झालास ! ॥ ६ ॥ रे वीसभुजा ! जर मी तुझ्या दहा जिभा उपटल्या नाहीत तर मी खराच लबाड ! ॥ ७ ॥ रामप्रताप समजून कपीने क्रोधाने सभेतच पण करुन पाय रोवला. ॥ ८ ॥ रे शठा ! हा माझा पाय उचलूं शकलास तर मी सीतेला हरली व राम परत जातील. ॥ ९ ॥ दशानन, म्हणाला, सुभटांनो ऐका, ( याच्या ) पायाला धरुन आपटा याला जमिनीवर. ॥ १० ॥ इंद्रजित आणि इतर पुष्कळ अनेक प्रकारचे बलवान वीर पटापट आनंदाने उठले. ॥ ११ ॥ पायाला बिलगून पुष्कळ जोर करुन व पुष्कळ उपाय करुन पाहीले पण पाय मुळीच हलला नाही तेव्हा सगळे खाली माना घालून बसले. ॥ १२ ॥ पुन्हा उठून देवशत्रु निशाचर झटून प्रयत्‍न करु लागले पण कपीचा पाय मुळीच हलेना तो प्रकार असा. ॥ १३ ॥ हे उरगारी ( गरुडा ) ! भारी मोहरुपी वृक्ष जसा कुयोगी पुरुषांना उपटवीत नाही तसा ( पाय हलेना ) ॥ १४ ॥ मग मेघनादासारखे कोटी सुभट हर्षाने उठले व झटले पण पाय हलेना तेव्हा खाली माना घालून बसले. ॥ दो० ३४ रा ॥ कपिचरणास भूमी सोडत नाही, तेव्हा रिपुच्या मदाने मात्र स्थान सोडले संतांचे मन कोटी विघ्ने आली तरी नीती सोडील काय ? ॥ दो० ३४ म ॥

हरले सब मनिं कपि बल बघुनी । उठे स्वयें जैं कपि आव्हानी ॥
धरित पदा तो, वदला अंगद । तव उद्धार न धरुनी मम पद ॥
धरिशि न राम चरण शठ ! जाउनि । श्रवुनि फिरे तो मनिं अति लाजुनि ॥
तेजोहत झाला श्री गता । नभिं मध्यान्हीं शशि पाहतां ॥
बसला सिंहासनिं शिर नमवुनि । जणूं सकल संपत्ती गमवुनि ॥
जगदात्मा प्राणधिप राम हि । तद्विमुखा किं मिळे विश्राम हि ॥
उमे राम-भृकुटिच्या विलासें । विश्व उपजुनी पुनरपि नासे ॥
तृणा कुलिश कुलिशा करती तृण । तद्‌दूताचा टळे कसा पण ॥
कपि मग बहुविध नीती वानी । काळ निकट तो कैसी मानी ॥
रिपुमद मथुनी प्रभु यश गाउनि । निघे वालि-नृपसुत हें सांगुनि ॥
खेळवून रणि वधूं तुला ना । तोंच अतां वदुं महति वृथा ना ॥
कपिनें तत्सुत प्रथम मारला । कळतां रावण दुःख पावला ॥
यातुधान अंगदपण बघती । भय विव्हळ सब विशेष होती ॥

दो० :- रिपुबल धर्षुनि हर्षुनी वलितनय बलपुंज ॥
पुलकित तनु लोचन सजल धरी रामपद कंज ॥ ३५रा ॥
सांज बघुनि दशकंधर गेला भवनिं उदास ॥
रावणा मंदोदरिं तैं समजावी स्वहितास ॥ ३५ ॥

कपिचे बळ पाहून सगळे मनात हसले. कपीने आव्हान दिले तेव्हा ( दशमुखी रावण ) स्वत: उठला. ॥ १ ॥ तो पाय धरीत असतां अंगद म्हणाला, की माझे पाय धरल्याने तुझा उद्धार होणार नाही. ॥ २ ॥ शठा, तूं जाऊन रामचरणच कां धरत नाहीस ? हे ऐकून रावण मनात अति लज्जित होऊन परत गेला. ॥ ३ ॥ रावणाचे तेज नष्ट झाले, त्याची सर्व शोभा गेली व मध्यान्हकाळि आकाशात चंद्र दिसावा तसा तो ( निस्तेज ) दिसूं लागला. ॥ ४ ॥ मस्तके नमवून सिंहासनावर बसला तेव्हा असे वाटू लागले की त्याने आपली सर्व संपत्ती गमावली आहे. ॥ ५ ॥ राम जगाचा आत्मा व सर्व प्राण्यांचे स्वामी आहेत, त्याच्याशी वैर करणार्‍यास विश्राम मिळेलच कसा ? ॥ ६ ॥ उमे ! रामाचंद्रांच्या भृकुटी – विलासाने विश्व उत्पन्न होते व पुन्हा लयास जाते ॥ ७ ॥ जे तृणाला वज्र व वज्राला तृण करुं शकतात, त्यांच्या दूताचा पण कसा टळेल ? ॥ ८ ॥ नंतर कपीने अनेक प्रकारांनी नीती सांगीतली, पण रावणाचा काळच जवळ आल्याने तो कसला या नीती मानणार ? ॥ ९ ॥ रिपुचा मद जिरवून प्रभुचे सुयश गावून दाखवून वालिनृपाचा पुत्र परत गेला. ॥ १० ॥ तुला रणांत खेळवीत खेळवीत मारला नाही तो पर्यतच आधीच मोठेपणा सांगणे व्यर्थ आहे ॥ ११ ॥ पहिल्या प्रथमच रावणाच्या मुलाला मारला होता, ते ऐकून रावण दु:खी झाला. ॥ १२ ॥ अंगदाचा पण सिद्धीस गेलेला पाहून सर्व राक्षस विशेष भयाने व्याकुळ झाले. ॥ १३ ॥ बलराशी वालिपुत्राने शत्रुच्या बळाचे मर्दन, करुन, उत्साह व आनंदयुक्त मनाने ( परत येऊन ) श्रीरामचरण पंकज धरले तेव्हा अंगदाचे सारे शरीर रोमांचित झाले व त्याच्या डोळ्यात अश्रु तरळले ॥ दो० ३५ रा ॥ सुर्यास्त झाला असे पाहून दशानन उदास होऊन घरी गेला तेव्हा मंदोदरी त्यास त्याचे हित समजावूं लागली. ॥ दो० ३५ म ॥

कांत ! विचारें त्यजा कुमतिसी । शोभे रण न तुम्हां रघुपतिसी ॥
रामानुज लघु रेघ काढतां । लंघवे न ती अशी शूरता ॥
प्रिय जिंकाल किं त्या संग्रामें । ज्याच्या दूतांची हीं कामें ॥
सिंधु सहज लंघुनि तव लंके । आला कपि केसरी न शंके ॥
रक्षक वधुनी विपिन विनाशी । मारि तुझ्या देखत अक्षासी ॥
जाळुनि भस्म करी पुरि सकला । राहि कुठें बल गर्व आपला ॥
मृषा बढाया पति ना मारा । मम वचना मनिं जरा विचारा ॥
पति रघुपतिस नृपति नच माना । अगजगनाथ अतुलबल जाणा ॥
इषू प्रताप विदित मारीचा । मानिलें न तद्‌वचना नीचा ! ॥
जनकसभें भूपांमधिं अगणित । होतां तुम्हिं बल विशाल अतुलित ॥
भंगुनि धनुष्य वरि जानकिला । तदा करुनि रण कां न जिंकिला ॥
सुरपति सुतबल अल्प समजला । जीवित ठेउनि नेत्र फोडला ॥
शूर्पणखेची दिसत दशा ती । नसे लाज तरि कशी मना ती ॥

दो० :- वधि विराध खर दूषणां मारि सलिल कबंध ॥
एक शरें हत वाली त्या जाणा दशकंधर ॥ ३६ ॥

मंदोदरीचा चौथा उपदेश –
हे कांत ! ( प्रियपती ) तुम्ही विचार करुन कुमतीचा त्याग करा. रघुपतीशी युद्ध करणें तुम्हाला शोभत नाही. ॥ १ ॥ रामाच्या धाकट्या भावाने एक लहानशी रेघ काढलेली साधी तुम्हांला ती ओलांडता आली नाही, अशी तुमची शूराई. ॥ २ ॥ प्रिया, ज्यांच्या दूतांची ही अशी कामे आहेत त्याला तुम्ही युद्धांत काय जिंकणार ? ॥ ३ ॥ एक कपी केसरी सहज सागर ओलांडून तुझ्या लंकेत आला, जरा सुद्धा घाबरला नाही. ॥ ४ ॥ रक्षकांचा वध करुन अशोकवनाचा त्याने विध्वंस केला तुझ्या देखत अक्षकुमाराला ठार मारला ॥ ५ ॥ सगळी लंकापुरी जाळून खाक केली त्याने तुमचे बळ व गर्व राहीला आहे कुठे ? ॥ ६ ॥ हे पति ! व्यर्थ बढाया मारु नका, माझ्या म्हणण्याचा मनांत थोडा विचार करा. ॥ ७ ॥ हे पति, रघुपतीला नृपती मानू नका तो चराचराचा नाथ असून अतुलबली आहे हे जाणून घ्या. ॥ ८ ॥ त्याच्या बाणाचा प्रताप मारीचाला माहीत झाला होता पण नीचा, त्याचे वचन तूं मानले नाहीस. ॥ ९ ॥ जनक सभेत अगणित भूपालांमध्ये अतुलित बलवान तुम्ही होताच पण त्याने धनुष्यभंग करुन जानकीला वरली, तेव्हा तेथेच त्यांच्याशी युद्ध करुन त्याला का जिंकले नाहीत ? ॥ १०-११ ॥ त्याचे बल अल्प आहे असे सुरपति – सुत समजतात अन त्याने आपला एक डोळा फोडून घेतला पण रघुनाथाच्या दयेने तो जिवंत राहीला. ॥ १२ ॥ शूर्पणखेची ती दशा पाहूनही पण अजूनही तुमच्या मनाला लाज कशी ती नाहीच. ॥ १३ ॥ ज्याने विराध – खर – दूषण यांचा वध केला, ज्याने लीलेने कबंधाला मारला, आणि ज्याने एका बाणाने वालीला मारला त्याला ओळखा. ॥ दो० ३६ ॥

जे जलनाथ बांधविति हेलां । प्रभु उतरति सह दला सुवेला ॥
कारुणीक दिनकर कुल केतू । दूत धाडिती तव हित हेतू ॥
जो सभेंत तव बल मथि कसा । करियूथामधिं मृगपति जसा ॥
अंगद हनुमान् ज्याचे अनुचर । रण झुंझार वीर अति दुर्धर ॥
त्याला प्रिय ! घडि घडि नर म्हणतां । मुधा मान ममता मद वहतां ॥
अहह ! कांत ! कृत राम विरोध । काल विवश मनिं नुपजे बोध ॥
काळ न दंडें कुणास वधतो । धर्महि बल मति विचार हरतो ॥
स्वामि ! काळ ज्या निकट येतसे । तो तुमच्या सारखा भ्रमतसे ॥

दो० :- सुत युग मेले दग्ध पुर आतां पुरे करा च ॥
कृपासिंधु रघुपति भजुनि नाथ विमल यश घ्या च ॥ ३७ ॥

ज्यांनी सहजी सागर बंधन करविले व जे सैन्यासह सुवेल पर्वतावा तळ देऊन आहेत. ॥ १ ॥ जे सूर्यवंशाची ध्वजा असून करुणाशील आहेत, त्याने तुझ्या हितास्तव दूत पाठवला होता. ॥ २ ॥ जसा मृगराज – सिंह हत्तीच्या कळपात जसा ( निर्भयपणे ) शिरतो तसा तो तुझ्या सभेत शिरला व त्याने तुमच्या बळाचा संहार केला. ॥ ३ ॥ अंगद व हनुमान हे दोघे रणझुंझार दुर्धर वीर ज्यांचे सेवक आहेत त्यांना सामान्य नर म्हणतां ? ॥ ४ ॥ हे प्रिया, त्याला तुम्ही घडीघडी नर म्हणता व मान – ममता व मद व्यर्थ धारण करता आहांत. ॥ ५ ॥ हाय ! हाय ! कान्ता ! तुम्ही राम विरोध केलात, व काळाला विशेष वश झाल्याने तुम्हाला ज्ञान होत नाही. ॥ ६ ॥ काळ कधी कोणाला दंड करीत नाही, तो धर्म – बल – बुद्धी व विचार यांना नष्ट करतो. ॥ ७ ॥ स्वामी ! ज्याचा काळ जवळ आला आहे, तो तुमच्या सारखा भ्रमिष्ट होऊन बडबडतो. ॥ ८ ॥ दोन पुत्र मारले गेले लंकापुरी जाळली गेली, आता तरी रामविरोध पुरे करा. आणि हे नाथ ! कृपासिंधु रघुपतिला शरण जाऊन विमल यश पदरांत पाडून घ्याच. नाहीतर अपकीर्ती व सर्वनाश आहेच ! ॥ दो० ३७ ॥

नारि वचन विशिखांसम ऐकुनि । उठुनि सभें गत पहाट जाणुनि ॥
बसला सिंहासनिं अति फुलुनी । अति अभिमानें भय सब भुलुनी ॥
इथें राम अंगदा बोलवित । येउनि शिर पदपंकजिं नमवित ॥
अती आदरें समीप बसवुनि । वदति खरारी कृपाल विहसुनि ॥
वालितनय कौतुक अति मजला । तात सत्य वद विचारुं तुजला ॥
यातुधान कुल तिलक रावणा । भुजबल अतुल अशी जगिं गणना ॥
तन्मुकुटां तुम्हिं चार फेकले । सांगा तात कसे सांपडले ॥
श्रुणु सर्वज्ञा प्रणत सुखघना । भूपति गुण ते चार मुकुट ना ॥
साम दान नी दंड विभेदहि । नृप हृदिं वसती वर्णिति वेद हि ॥
चरण नीति धर्माचे चारू । येति नाथ पदिं करुनि विचारू ॥

दो० :- धर्महीन प्रभुपद विमुख काल विवश दशशीस ॥
त्या सोडुनि गुण आले पहा कोसलाधीश ॥ ३८रा ॥
परमचतुरता ऐकुनी विहसति राम उदार ॥
समाचार लंकेंतला सांगे वालिकुमार ॥ ३८म ॥

तीक्ष्ण बाणासारखे स्त्रीचे भाषण रावणाने ऐकून घेतले व पहाट झाली हे जाणून तो सभेत गेला. ॥ १ ॥ सर्व भय विसरुन व अति अभिमानाने अत्यंत फुगून फुलून सिंहासनावर बसला. ॥ २ ॥
श्रीराम अंगदाचे अभिनंदन करतात – इकडे रामचंद्रानी अंगदास बोलावले, त्याने जवळ येऊन चरणकमलांवर मस्तक ठेवले. ॥ ३ ॥ त्याला अति आदराने जवळ बसवून कृपालु खरारी मोठ्याने हसून म्हणाले, ॥ ४ ॥ हे वालितनया, मला अति आश्चर्य वाटते म्हणून विचारतो – तरी हे तात ! सत्य सांग. ॥ ५ ॥ निशाचर कुळटिळक रावणाचे अतुलित भुजबल आहे अशी जगात ख्याती आहे. ॥ ६ ॥ ( असे असून ) त्याचे चार मुकुट तुम्ही इकडे फेकलेत ते तुम्हाला कसे मिळाले ते सांगा पाहूं. ॥ ७ ॥ हे सर्वज्ञा ! शरणागत सुखघना ! ते चार मुकुट नसून राजांचे चार गुण होत. ॥ ८ ॥ साम, दाम, दंड, व भेद हे राजाच्या हृदयात वास करतात असे वेदच म्हणतात. ॥ ९ ॥ ते नीतीधर्माचे सुंदर चरण आहेत, नाथ ! ते असा विचार करुन आपल्या पायाशी आले आहेत. ॥ १० ॥ दशशीर्ष काळाला पक्का वश झाला आहे ( कारण ) तो धर्महीन व प्रभुपद विरोधी आहे हे जाणून हे कोसलाधीशा, पहा, की चारी गुण त्याला सोडून आपल्याकडे आले अंगदाची परम चतुरता ऐकून उदार राम विशेष हसले नंतर वालिकुमाराने लंकेतला सर्व समाचार सांगीतला. ॥ दो० ३८ रा.म.॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP