॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय ३७ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

भूप बघुनि पुत्रां हृदिं धरती । आज्ञां मिळतां सहर्ष बसती ॥
जमे सभा पाहुनि रामासी । मानुनि नयन-लाभ-सीमासी ॥
मग मुनि वसिष्ठ कौशिक आले । शुभासनीं बसविले नृपालें ॥
पूजुनि सपुत्र पायां प्रणमति । बघुनि राम युग-गुरु अनुरागति ॥
कुल गुरु धर्मेतिहास सांगति । भूप सकल राण्यांसह ऐकति ॥
मुनि-मन-अगम्य गाधिज-करणी । मुदित वसिष्ठ विविध विध वर्णी ॥
वामदेव वदले सब साचें । कलित कीर्ति लोकत्रयिं सांचे ॥
आनंदित तैं होति सकल जण । प्रमुदित अति परि राम सलक्ष्मण ॥

दो० :- मुद-मंगल-नित्योत्सवीं दिन-रजनी पळताति ॥
अयोध्येंत आनंद-भर अधिक अधिक अधिकाऽति ॥ ३५९ ॥

पुत्रांना आलेले पाहताच दशरथ राजांनी त्यास पोटाशी धरले. आज्ञा मिळाल्यावर ते चौघे बंधू बसले ॥ १ ॥ राम सभेत ( जात आहेत असे ) पाहताच नयनलाभाची परम सीमाच मानून सभा ( भराभर ) जमली ॥ २ ॥ मग वसिष्ठ व विश्वामित्र आदि मुनी आले तेव्हा राजाने त्यांना सुंदर आसनावर बसविले ॥ ३ ॥ पुत्रांना बरोबर घेऊन दशरथांनी मुनींची पूजा केली व पायांना प्रणाम केला रामचंद्रांस पाहून दोघेही गुरु अनुरक्त झाले ॥ ४ ॥ वसिष्ठ गुरु धर्म व इतिहास सांगू लागले व सर्व राण्यांसहित दशरथ श्रवण करु लागले ॥ ५ ॥ मुनींच्या मनाला सुद्धा अगम्य वाटणारी गाधिज - विश्वामित्र यांची करणी वसिष्ठांनी विविध प्रकारे वर्णन केली ॥ ६ ॥ वामदेव म्हणाले की वसिष्ठांनी सांगितलेले सर्व सत्य आहे गाधिज - महामुनीची सुंदर कीर्ती तिन्ही लोंकात भरली आहे ॥ ७ ॥ हे ऐकून सर्वांनाच आनंद झाला तसेच लक्ष्मणासह राम सुद्धा अति प्रमुदित झाले ॥ ८ ॥ याप्रमाणे नित्य आनंद मंगलकारक उत्सवात दिवस रात्री भराभर निघून जाऊ लागल्या व अयोध्येत आनंदाला अधिक, अधिक अति अधिक भर येऊ लागला ॥ दो० ३५९ ॥

सुदिन बघुनि सोडिति कलकंकण । मोद विनोद सुमंगल वाण न ॥
पाहुनि नव नव सुख, सुर् ईर्षति । जन्म अयोध्यें विधिसी मागति ॥
प्रतिदिन कौशिक जाऊं पाहति । प्रेमळ राम-विनतिनें राहति ॥
दिन दिन शतगुण भूपति-भाव । वानिति बघुनि महामुनिराव ॥
आज्ञा मागत, नृप अनुरागति । पुढें उभे पुत्रांसह राहति ॥
नाथ ! संपदा अपली सारी । मी सेवक समेत सुत नारी ॥
कृपा सदा बाळांवर ठेवा । देत रहा मज दर्शन-मेवा ॥
म्हणुनि असे नृप स-पुत्र-भार्या । पडति पायिं वच ये न वदाया ॥
आशिस विविध विप्र दे निघतां । प्रीति रीति ना येई वदतां ॥
प्रेमें राम अनुज अनुसरती । पोचवुनी आज्ञेनें फिरती ॥

दो० :- रामरूप भूपति-भक्ति लग्नोत्सव आनंद ॥
मनि वाखाणित चालले मुदित गाधिं कुलचंद ॥ ३६० ॥

शुभ दिवस पाहून सुंदर लग्नकंकणे सोडली, त्यावेळी आनंद, मंगलोत्सव व विनोद यांना तोटाच नव्हता ॥ १ ॥ अयोध्येतील लोकांना मिळणारे नित्य नवे नवे सुख पाहून देव त्यांची ईर्षा करु लागले, विधात्याला प्रार्थना करु लागले की अयोध्येत जन्म दे ॥ २ ॥ रोजच्या रोज विश्वामित्रांनी जाण्यास निघावे - बेत करावा व रामचंद्रांच्या प्रेमळ विनंतीने रहावे असा क्रम सुरु झाला ॥ ३ ॥ दशरथ राजांचा भक्तिभाव रोजच्या रोज शतपट होत चाललेला पाहून महामुनी श्रेष्ठ ( विश्वामित्र ) त्यांची मनात प्रशंसा करु लागले ॥ ४ ॥ मुनी निरोप मागू लागले तेव्हा दशरथ राजा प्रेमविह्वळ झाले व पुत्रासहित मुनीच्या पुढे हात जोडून उभे राहीले ॥ ५ ॥( व विनवितात की ) नाथ ! सर्व संपत्ती आपली आहे, आणि सपत्नीक मी आणि हे माझे मुलगे आपले सेवक आहोत ॥ ६ ॥ या बाळांवर सदा कृपा - स्नेह असो द्यावा व मला ( मधून मधून ) दर्शनाचा लाभ देत असावे ॥ ७ ॥ असे म्हणून पुत्रांसह व भार्यासहित नृप दशरथ पाया पडले व त्यांच्या मुखातून शब्द निघेनासा झाला ॥ ८ ॥ विप्राने ( विश्वामित्रानी ) निघताना विविध आशीर्वाद दिले ( व निघाले ) ती प्रीतीची रीत सांगता येणे शक्य नाही ॥ ९ ॥ राम व रामबंधू प्रेमाने मागोमाग गेले व पोचवून आज्ञेने परत फिरले ॥ १० ॥ रामरुप, भूपतीची भक्ती, विवाह त्यातील उत्सव व आनंद यांची मनातल्या मनांत प्रशंसा करीत गाधिकुल चंद्र आनंदाने चालले ॥ दो० ३६० ॥

ज्ञानी कुलगुरु वामदेव अपि । वानिति गाधिजकथेस पुनरपि ॥
मुनि यश परिसुनि राव निज मनीं । अपला पुण्यप्रभाव वर्णी ॥
आज्ञा होता पुरजन फिरले । तनयांसह नृप भवनीं शिरले ॥
राम-विवाह गाति सर्वत्र । त्रिभुवनिं पसरे सुयश पवित्र ॥
राम येति घरिं यदा विवाहुनि । पुरिं आनंद वसति सब तैंहुनि ॥
प्रभु-विवाहिं जो अति उत्साहो । वर्णुं न शकति गिरा अहिनाहो ॥
कविकुलजीवन-पावन-कारक । सिता-राम-यश मंगल-दायक ॥
जाणुनि मी अल्पचि वाखाणीं । पावन करावया निज वाणी ॥

छं० :- करण्यास पावन निज गिरेला रामयश तुलसी वदे ॥
रघुवीर चरित अपार वारिधि पारगत कवि कोणते ॥
उपवीत लग्नोत्सव सुमंगल श्रवुनि सादर गाति जे ॥
वैदेहि-राम अनुग्रहें सुख सर्वदा लभताति ते ॥ १ ॥
सो० :- सिय-रघुवीर-विवाह जे प्रेमें ऐकति गाति ॥
तयां सदा उत्साह मंगलायतन राम-यश ॥ ३६१ ॥

( रघुकुलाचे ) ज्ञानी कुलगुरु वसिष्ठ आणि वामदेव यानी गाधीपुत्र विश्वामित्राची कथा पुन्हा वर्णन केली ॥ १ ॥ मुनीचे यश श्रवण करुन दशरथराजा आपल्या मनांत आपल्या पुण्याच्या प्रभावाची प्रशंसा करु लागले ॥ २ ॥ आज्ञा होताच ( सभा बरखास्त झाल्याचे ऐकताच ) नगरलोक परतले व दशरथ राजा पुत्रांसह आपल्या घरात गेले ॥ ३ ॥ जिकडे तिकडे ( सर्वत्र ) रामविवाहाचे वर्णन चालू आहे व पावन सुयश त्रिभुवनांत पसरले ॥ ४ ॥ राम विवाह करुन जेंव्हा घरी परत आले तेव्हापासून अयोध्यापुरीत सर्व प्रकारचा आनंद येऊन राहीला आहे ॥ ५ ॥ प्रभूच्या विवाहांत जो अत्यंत उत्साह व उत्सव झाला तो सरस्वती व शेष यांना सुद्धा वर्णन करता येत नाही . ॥ ६ ॥ ( परंतु ) सीताराम यश मंगलदायक व कविकुलाच्या जीवनाला पावन करणारे आहे ॥ ७ ॥ हे जाणून मी माझी वाणी पावन करण्यासाठी अगदी अल्पच विस्ताराने वर्णन केले ॥ ८ ॥ स्वत:च्या वाणीला पावन करण्यासाठी तुलसीदासाने ( अल्पसे ) वर्णन केले. रघुवीर चरित्र एक अपार सागर आहे. कोणते कवि त्याच्या पार जाऊ शकले ? ( कोणीही नाही ) अति मंगलमय ( उपवीत ) उपनयन विवाह व त्यातील उत्सव यांचे सादर श्रवण करुन जो कोणी गान=कथन वर्णन करतील ते वैदेही व राम यांच्या अनुग्रहाने, प्रसादाने सर्वदा सुख पावतील. ॥ छंद ॥ जे कोणी सीता रघुविर-विवाह प्रेमाने गातील व ऐकतील त्यांना सदा उत्साह ( व उत्सव ) प्राप्त होईल, ( कारण ) रामयश सर्वमंगलांचे निवास-स्थान ( आयतन ) आहे ॥ दो० ३६१ ॥

इति श्रीमद् रामचरितमानसे सकल-कलि-कलुष-विध्वंसने
॥ प्रथमः सोपानः ॥
॥ बालकाण्डं समाप्तम् ॥
॥ श्री रामचंद्रार्पितमस्तु ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP