॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय १२ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

कोटि मनोजां लाजविणारे । सुमुखि कोण हे तव, वद सारें ॥
प्रेमळ मंजुळ वचनां परिसा । मनिं सस्मित सीता संकोचन ॥
तयां विलोकुनि विलोकि धरणी । उभयीं संओचित वरवर्णी ॥
प्रेमें लाजुनि मृग-शिशुनयनी । वदली मधुर वचन पिकवचनी ॥
सहज सुशील गौर तनु सुंदर । लक्ष्मण नाम सान मम देवर ॥
वदन विधुस मग पदरें झांकुनि । प्रिय पति निरखुनि भृकुटि वाकवुनि ॥
खंजन-मंजुल वक्र-अपांगें । तयां खुणेनें निजपति सांगे ॥
मुदित गांवच्या अवघ्या युवती । रायराशि जणुं रंकचि लुटती ॥

दो० :- प्रेमें अति सीते मनुनि देति इविध आशीस ॥
सदा सुवासिनि व्हा तुम्हीं जों धरि शेष महीस ॥ ११७ ॥

त्यांचे ते प्रेमळ व मंजुळ ( सुंदर) भाषण ऐकताच सीतेला संकोच वाटला व तिने मनात स्मित केले ॥ १ ॥ त्यांच्याकडे ( रामलक्ष्मण व स्त्रिंयाकडे) पाहून ती जमिनीकडे पाहू लागली व ती वरवर्णिनी दोन्ही बाजूंनी संकुचित झाली ॥ २ ॥ हरीण पाडसासारखे डोळे असलेली सीता प्रेमाने व लाजत लाजत कोकिळेसारख्य़ा मधुर वाणीने म्हणाली ॥ ३ ॥ स्वभावताच सुंदर शील असलेले व सुंदर गोरी तनु असलेले ज्यांचे नांव लक्ष्मण आहे ते माझे धाकटे दीर आहेत ॥ ४ ॥ मग आपला मुखचंद्र पदराने झाकून भिवया तिरक्या करुन प्रिय पतीकडे पाहून ॥ ५ ॥ खंजन पक्षासारख्या सुंदर नेत्रांच्या वक्र कटाक्षाने तिने त्यास खुणेने सांगीतले की हे माझे पती आहेत ॥ ६ ॥ त्या सगळ्या ग्रामतरुणी इतक्या आनंदित झाल्या की जणूं रंकांना धनराशीच लुटण्यास सापडल्या ॥ ७ ॥ अतिप्रेमाने सीतेच्या पाया पडून त्यांनी विविध आशीर्वाद दिले की जोपर्यंत शेष पृथ्वीला धारण करील तोपर्यंत तुम्ही सदा सौभाग्यवती व्हा. ( तुमचे सौभाग्य अखंड राहो !) ॥ दो० ११७ ॥

पतिला प्रिय पार्वतिसम व्हावें । प्रेम अम्हांवर उणें नसावें ॥
कर जोडुन बहु करूं विनवणी । पुन्हां भूषवा जर पथ चरणीं ॥
या दर्शन जाणुनि निज दासी । कळे सिते त्या प्रेम-पिपासी ॥
वचनिं मधुर मृदु बहु परितोषित । जणुं कौमुदि कुमुदिनींस पोषित ॥
तैं रघुवर-कल बघुनि लक्ष्मणें । पुसला पंथ मनाझ् मृदु वचनें ॥
ऐकत दुःखी सब नर नारी । पुलकित वपू विलोचनिं वारी ॥
चित्त उदास मोद मनिं नुरला । जणूं दिधला निधि विधिनें हरला ॥
जाणुनि ’कर्म’ धरुनि धीराला । सांगति ठरवुनि सुगम पथाला ॥

दो० :- लक्ष्मण जानकि सहित तैं गमन करिति रघुनाथ ॥
प्रियवचनें फिरवुनि सकल मनां सवें नेतात ॥ ११८ ॥

देवी ! तुम्ही पार्वतीसारख्या पतिला प्रिय व्हा. ( मात्र) आमच्यावरचे प्रेम कमी होऊ देऊ नका ( हं) ( सतत आमच्यावर कृपा असावी) ॥ १ ॥ आम्ही हात जोडून पुष्कळ वारंवार विनवणी करतो की जर हा मार्ग आपल्या पायांनी पुन्हा विभूषित केलात ॥ २ ॥ तर आम्ही आपल्या आवडत्या ( प्रेमातल्या निज) दासी आहोत हे जाणून आंम्हाला दर्शन द्या. सीतेला कळले की यांना प्रेमाची तहान लागली आहे ॥ ३ ॥ गोड गोड कोमल वचनांनी सीतेने त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट केल्या व त्या अशा आनंदित झाल्या की जणूं चंद्रिकेने कुमुदिनींना प्रफुल्लित करुन पुष्ट केल्या ॥ ४ ॥ तेव्हा रघुवराच्य़ा मनातील हेतू जाणून लक्ष्मणाने मृदु वाणीने लोकांना ( वाल्मीकी आश्रमाचा) रस्ता विचारला ॥ ५ ॥ ऐकताच सर्व स्त्री-पुरुषांना दु:ख झाले त्यांच्या अंगावर रोमांच उठले व डोळ्यात पाणी आले ॥ ६ ॥ मनांत आनंद मुळीच उरला नाही व चित्त असे उदास झाले की जणू दिलेली निधी ( ठेवा, सुखाचा, आनंदाचा) विधीने हिरावून नेला ॥ ७ ॥ ‘ आपले कर्म ’ असे समजून त्यांनी धीर धरला व सुगम मार्ग कोणता ते ( आपसात) ठरवून तो सांगितला व दाखविण्य़ासाठी पुरुष निघाले. ॥ ८ ॥ तेव्हा लक्ष्मण व जानकी यांच्यासह रघुनाथांनी गमन केले. प्रिय वचनांनी त्या सर्वांना परत वळवून त्यांच्या मनाला मात्र बरोबर घेऊन गेले ॥ दो० ११८ ॥

नारी नर विव्हळ फिरतां अति । देती दोष मनीं दैवप्रति ॥
सहित विषाद परस्पर वदती । विधिकृति सगळ्या उलट्या असती ॥
निष्ठुर निरंकूश निःशंकी- । अति, जो करि शशि सरुज कलंकी ॥
रूख कल्पतरु सागर खारा । तो पाठवि वनिं राजकुमारां ॥
यांस धाडले जर वनवासा । वृथा निर्मि विधि भोगविलासां ॥
पथिं जाणें अनवाणी यांनां । रुचि विरंचि जगिं वृथाचि यानां ॥
हे महिं पडाती कुशपर्णांवर । सुभग शेज विधि निमीं का तर ॥
तरुतळिं वास यांस जर दिधला । धवल धाम रचरचुनी श्रमला ॥

दो० :- हे जर मुनिपटधरजटिल सुंदर अति सुकुमार ॥
नानाविध भूषण वसन सृजी वृथा विधि फार ॥ ११९ ॥

घराकडे परत फिरताना स्त्रिया व पुरुष अति व्याकुळ होतात व मनात दैवाला दोष देऊ लागतात ॥ १ ॥ खिन्न होऊन एकमेकांस म्हणतात की, विधीच्या सर्व कृती अगदी उलट्या असतात ॥ २ ॥ तो निष्ठुर, निरंकुश व नि:शंक आहे कारण की त्याने चंद्राला रोगी व कलंकयुक्त केला ॥ ३ ॥ कल्पतरुला रुख केला व सागरला खारा बनविला व त्यानेच या दोन राजकुमारांना वनात पाठवले ॥ ४ ॥ या राजकुमारांना ज्याअर्थी वनांत धाडले त्या अर्थी ब्रह्मदेवाने विविध भोगविलास व्यर्थ निर्माण केले ( असे म्हणावे लागले) ॥ ५ ॥ यांना जर रस्त्याने अनवाणी चालत जावे लागत आहे तर विरंचीने या जगात नाना प्रकारच्या यानांची, वाहनांची रचना केली तरी कशाला ? व्यर्थच केली ! ॥ ६ ॥ गवत व पालापाचोळा घालून यांस जमिनीवर पडावे लागत आहे तर मग विधीने सुंदर शय्या का निर्माण केल्या ? ॥ ७ ॥ यांना जर वृक्षाखाली वस्ती करावयास लावले तर मग मोठमोठ्या अनेक चुनेगच्ची हवेल्या रचून त्याने ( वृथा) श्रमच केले ( म्हणावयाचे) ॥ ८ ॥ हे अति सुंदर व अति सुकुमार असून यांना जर मुनी वस्त्रे वापरावी लागत आहेत तर ब्रह्मदेवाने नाना प्रकारची विपुल ( तलम) वस्त्रे व भूषणे विनाकारणच ( वृथा) ( कां) निर्माण केली ? ॥ दो० ११९ ॥

कंद मूळ फळ हे जर खाती । खाद्य सुधादि जगांत वृथा तीं ॥
कोणि म्हणति हे स्वभाव सुंदर । स्वयें प्रगटले नहिं विधिकृत बरं ॥
जितके वेद वदे विधि-निर्मित । श्रवण-नयन-मनगोचर वर्णित ॥
धुंडुनि पहा भुवनिं दशचारी । असे पुरूष कोठें अशि नारी ॥
यांस बघुनि विधि मनिं अनुरागें । यांसम दुसरें नित्मूं लागे ॥
बहुत करी श्रम परि न साधलें । त्या ईर्षें या वनीं धाडले ॥
कोणि म्हणति अम्हिं बहु न जाणतों । धन्य आपणां परम मानतों ॥
पुष्पपुंज आम्हीं गणुं तेही । ते बघती बघतिल दिसले ही ॥

दो० :- अशि वचनें प्रिय बोलतां लोटे लोचनि नीर ॥
अशीं कठिंअ पथिं चालती अति सुकुमार शरीर ॥ १२० ॥

यांना जर कंदमूळफळे खावी लागत आहेत तर मग विधात्याने नाना प्रकारचे खाद्य पदार्थ व अमृतादि पेय पदार्थ व्यर्थच निर्माण केले ॥ १ ॥ कोणी म्हणतात की हे स्वभावताच सुंदर असून स्वत:च प्रगट झाले आहेत यांना विधीने नाही निर्माण केले बरं ! ॥ २ ॥ ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्याचे वेदांनी जितके वर्णन केले आहे ते सर्व विधी निर्मित कान, नयन व मन यांचा विषय आहे ॥ ३ ॥ ( पातळापासून इंद्र लोकांपर्यतची खालची) दहा भुवने व ( महर्लोकापासून सत्यलोकापर्यंतची वरची) चारी भुवने धुंडून पहा व असे पुरुष व अशी स्त्री कोठे आहेत का सांगा ॥ ४ ॥ यांना पाहताच विधीच्या मनात अनुराग उत्पन्न झाला व तो यांच्यासारखे दुसरे निर्माण करु लागला ॥ ५ ॥ त्याने पुष्कळ श्रम केले पण ते काही साधले नाही, तेव्हा त्या ईर्षेने त्याने यांना वनांत आणून लपविले ॥ ६ ॥ कोणी म्हणतात की आम्हाला असे काही जास्त माहित नाही - कळत नाही आम्ही परमधन्य आहोत इतके आम्ही समजतो ॥ ७ ॥ आणि आम्ही मानतो की ज्यांनी यांना पाहीले, जे बघत असतील व पुढे बघतील ते पुण्य पुंजच होत ॥ ८ ॥ अशी प्रिय वचने बोलता बोलता त्यांचे डोळे पाण्याने भरुन आले ( व म्हणतात की) अत्यंत कोमल शरीर असलेली ( ही तिघं) कठीण मार्गाने चालतील तरी कशी ? ॥ दो० १२० ॥

नारी स्नेह-विकल अति बनल्या । सायं कोकी समान दिसल्या ॥
मृदु पदकमल कठिण पथ गणुनी । वदति वचन मृदु हृदिं गहिंवरुनी ।
कोमल लाल पाउलें लागत । निज हृदयांसम महि संकोचत ॥
दिधलें जर जगदीशें यां वन । का प्रसूनमय केला मार्ग न ॥
विधिं देइल जर जें मागावें । सखि यांनां लोचनिं ठेवावें ॥
जे नर नारि न अवसरिं आले । त्यांना सीताराम न दिसले ॥
परिसुनि सुरूप विव्हळ पुसती । गेले अतां कोठवर असती ॥
धावत जाउनि समर्थ बघती । सुफलित जन्म मुदित अति वळती ॥

दो० :- अबला बालक वृद्ध, कर चोळति हळहळतात ॥
असे प्रेमवश जन, जिथें जिथें राम जातात ॥ १२१ ॥

सायंकाळी जशा चक्रवाकी तशाच जणू स्त्रिया स्नेहाने अति व्याकुळ झालेल्या दिसू लागल्या ॥ १ ॥ मार्ग कठीण आहे व त्यांचे पाय कोमल आहेत हे लक्षात घेऊन हृदय गहिवरुन कोमल वाणीने म्हणतात की ॥ २ ॥ कोवळी लाल पावलं जमिनीला महीसुद्धा आपल्या हृदयासारखी संकोचित होते. ॥ ३ ॥ जगदीशाने जर यांना वनवास दिला तर ( निदान) मार्ग पुष्पमय का नाही करुन टाकला ? ॥ ४ ॥ सखी ! विधिजवळ जे मागावे ते मिळत असेल तर असे वाटते की या तिघांना डोळ्यांतच ठेवून घ्यावीत ॥ ५ ॥ ज्या स्त्रिया व पुरुष ( बाल व वृद्ध) वेळेवर आले नाहीत त्यांना सीताराम व लक्ष्मण दर्शन झाले नाही ॥ ६ ॥ त्यांच्या सुंदर रुपाचे वर्णन ऐकून ते विचारतात की आता या वेळेपर्यंत ते कोठपर्यंत गेले असतील ? ॥ ७ ॥ जे सशक्त होते ते धावत गेले व त्यांनी दर्शन घेतले व ते आपला जन्म सुफल करुन अति आनंदित होऊन परत आले ( वळले) ॥ ८ ॥ दुर्बल स्त्रिया, बालक व वृद्ध माणसे हात चोळीत हळहळूं लागली याप्रमाणे राम - सीता - लक्ष्मण जिथे जिथे जातात तिथे तिथे लोक असे प्रेमवश होतात ॥ १२१ ॥

गावों-गांविं असा आनंदू । बघुनि भानुकुल-कैरव चंदू ॥
कांहिं समाचारास ऐकती । ते नृप-राणिंस दोष लावती ॥
भला म्हणति अति कुणि नरनाहो । देइ अम्हां जो लोचन लाहो ॥
कथिति परस्पर पुरूष वाया । स्नेहल सुंदर सरल कथा या- ॥
पितरौ धन्य जयां हे झाले । धन्य नगर जेथुनि हे आले ॥
धन्य देश वन शैल गांव ते । जिथं जिथं जाती धन्य ठाव ते ॥
रचुनि विरंचि तया सुख पावे । हे स्नेही ज्याचे सर्वस्वें ॥
पथिक राम-लक्ष्मण-सुकथेनें । मार्ग सकल भरलेहि काननें ॥

दो० :- ऐसे रघुकुल-कमल-रवि मार्गजनां सुख देत ॥
बघत जाति वन जानकी सौमित्री समवेत ॥ १२२ ॥

सूर्यवंशरुपी कैखांना ( कुमुदांना) प्रफुल्ल करणार्‍या रामरुपी चंद्राचे दर्शन होताच प्रत्येक गावी असा आनंद होऊ लागला ॥ १ ॥ ज्यांना काही ( थोडासा) समाचार ऐकण्यास सापडला ते राजाराणींना दोष देऊ लागले ॥ २ ॥ कोणी म्हणतात की राजा अत्यंत चांगला आहे; कारण त्याने आम्हांला लोचनलाभ दिला ॥ ३ ॥ पुरुष व बाया स्नेहाने भरलेल्या सुंदर व सरल कथा याप्रमाणे आपसांत सांगू लागतात ॥ ४ ॥ ज्यांना हे झाले ते आईबाप धन्य होत; व ज्या नगरांतून हे आले ते नगर धन्य होय ॥ ५ ॥ हे जिथे जिथे जातात, जातील वा गेले ते देश, पर्वत, वने व ती स्थाने धन्य होय. ॥ ६ ॥ ज्याचे हे सर्व प्रकारे स्नेही आहेत ( जो ह्यांच्यावर सर्व प्रकारे स्नेह करतो) त्याला निर्माण करुन ब्रह्मदेवाला सुख झाले ( परिश्रम सफल झाल्याचे समाधान वाटले) ॥ ७ ॥ रामलक्ष्मण वाटसरुंच्या सुंदर कथेने सर्व मार्ग व कानने व्यापली ॥ ८ ॥ याप्रमाणे रघुकुल कमलरवि रामचंद्र मार्गावरील लोकांना सुख देत देत व वन - शोभा बघत बघत सीता व सौ‍मित्री यांच्यासह जात आहेत ॥ दो० १२२ ॥

पुढें राम लक्ष्मण माघारीं । तापस वेषिं विराजति भारी ॥
मधें सिता शोभतसे कैसी । ब्रह्म-जिवांमधिं माया जैसी ॥
पुन्हां वदें छवि जशि मनिं वसते । जणुं मधु-मदनमधें रति लसते ॥
पुन्हां देउं उपमा हृदिं शोभत । जणुं बुध-विधुमधिं रोहिणि शोभित ॥
प्रभुपद-चिन्हयुगांमधिं सीता । चालत पथिं पद टाकि सुभीता ॥
सीता-राम-पदांकां राखुनि । लक्ष्मण चालै उजवीं घालुनि ॥
राम - सिता - लक्ष्मण - सुप्रीती । वाचाईता वदूं कशी ती ॥
मग्न विहग मृग रूप विलोकुनि । राम पथिक ने चित्ता चोरुनि ॥

दो० :- सिते सहित दो प्रिय पथिक दिसले बंधु जयांस ॥
भवपथ दुर्गम मुदित तिहिं अश्रम नीत लयास ॥ १२३ ॥

पुढे राम व मागे लक्ष्मण असे दोघे तपस्वी वेषांत फारच चांगले शोभत आहेत. ॥ १ ॥ आणि ब्रह्म व जीव यांच्या मध्ये जशी माया शोभावी तशी सीता त्या दोघांच्या मध्ये शोभत आहे ॥ २ ॥ माझ्य़ा हृदयांत ही छबी ( शोभा) जशी वसत आहे तशी सांगतो की जणूं वसंत ( मधु) व मदन यांच्यामध्ये रति शोभत आहे ॥ ३ ॥ हृदयात शोधून पाहून पुन्हा उपमा देतो की जणूं बुध व पूर्णचंद्र ( विधु) यांच्यामध्ये जशी रोहीणी सुशोभित दिसते ॥ ४ ॥ प्रभूच्या दोन चरणचिन्हांच्या मध्ये पाऊल टाकत सीता भीत भीत चांलते ॥ ५ ॥ सीता व राम या दोघांच्याही चरणचिन्हांना राखून ( त्यांना धक्का न लावता) त्यांना उजवी घालून ( उजवीकडून प्रदक्षिणा घालीत) लक्ष्मण चालतात ॥ ६ ॥ राम सीता व लक्ष्मण यांची सुंदर प्रीती वाचेचा विषय नाही ( वाचातीत आहे) मग तिचे वर्णन मला कसे करता येईन ? ॥ ७ ॥ ( मार्गावरील) पशु पक्षी सुद्धा रुप पाहून प्रेममग्न होतात कराण प्रवासी राम त्यांच्या चित्तास चोरुन नेऊ लागले ॥ ८ ॥ ज्यांनी ज्यांनी सीतेसहित दोन प्रिय प्रवासी बंधूंना पाहीले त्यांनी दुर्गम असा भवपंथ आनंदाने श्रमांशिवाय लयास नेला ॥ दो० १२३ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP