॥ श्रीगणेशाय नमः ॥

॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥

॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीजानकीपतये नमः ॥

॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ द्वितीय सोपान ॥

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय १ ला

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

अनुवादककृत मंगलाचरण

पृथ्वी :- मुमूर्षुजन-दक्षिण-श्रुतिपुटेषु नामामृतम् ।
समर्पयति यो मुदा रघुपतीश-काशीपतिः ॥
हलाहल-विभक्षको दनुजदेव-संरक्षको ।
विराग-परिवर्धको भवहरो भवः पातु माम् ॥ १ ॥
स्नग्धरा :- यत्प्रेमाम्भोधिपारं कथमपि गमने नैव शक्तो वसिष्ठः ॥
सुप्रेम्णा निर्जितान्तर्वचनवशमभूद्यस्य वै रामचंद्रः ॥
यस्य प्रेमातिरेकाद्‍भयवशमगमद्राममाताऽप्यरण्ये ।
भावं वक्तुं विदेहःस्वयमपि भरतं नैव शक्तो नतोऽस्मि ॥ २ ॥

मूळ मंगलाचरण

शा.वि:- यास्यांके च विभाति भूधर-सुता देवापगा मस्तके ।
भाले बालविधु-र्गले च गरलं यस्योरसि व्यालराट् ॥
सोऽयं भूतिविभूषणः सुरवर: सर्वधिपः सर्वदा ।
शर्वः सर्वगतः शिवः शशिनिभः श्रीशंकरः पातु माम् ॥ ३ ॥
वंशस्थ :- प्रसन्नतां या न गताभिषेकतः
तथा न मम्ले वनवास दुःखतः ।
मुखांबुजश्री रघुनंदन मे
सदाऽस्तु सा मञ्जुलमङ्गलप्रदा ॥ ४ ॥
इंद्रवज्रा :- नीलांबुज-श्यामल कोमलांगं ।
सीता-समारोपित-वामभागम् ॥
पाणौ महासायकचारुचापं ।
नमामि रामं रघुवंश-नाथम् ॥ ५ ॥

दो. :- श्रीगुरु-पादाम्बुज-रजें धुउन मुकुर मन फार ॥
वर्णूं रघुवर-विमल-यश जें दायक फल चार ॥ मं १ ॥

तुलसीदासकृत मंगलाचरण -
जो मरणार्‍या प्राण्यांच्या उजव्या कर्णपात्रांत आनंदाने रामनामरुपी अमृत उत्तम प्रकारे घालतो, तो हलाहल विष विशेष भक्षण करुन देवदानवांचे उत्तम प्रकारे संरक्षण करणारा, वैराग्याची सर्व प्रकारे वृद्धी करणारा, संसाराचा संहार करणारा रघुपति - सेवक काशीक्षेत्राचा अधिपति - शंकर - विश्र्वेश्र्वर माझे रक्षण करो. ॥ १ ॥ २) ज्याच्या प्रेमसागराच्या पार जाण्यास वसिष्ठ कोणत्याही प्रकारे मुळीच समर्थ झाले नाहीत, शुद्ध प्रेमाने अन्त:करण जिंकले गेलेले रामचंद्र ज्याच्या वचनाला वश झाले, ज्याच्या प्रेमाच्या अतिरेकाने ( चित्रकूटच्या) अरण्यात राममाता कौसल्या सुद्धा भयभीत झाली आणि ज्याचा भाव सांगण्यास स्वत: विदेह सुद्धा मुळीच समर्थ झाले नाहीत, त्या भरताला मी नमस्कार करतो. ॥ २ ॥ तुलसीदासकृत मंगलाचरण - १) ज्याच्या मांडिवर पर्वताची कन्या पार्वती विशेष शोभत आहे, ज्याच्या मस्तकावर देवांची नदी - गंगा शोभते, कपाळावर चंद्रकोर विराजत आहे, ज्याच्या कंठात हलाहल विष शोभत आहे, ज्याच्या छातीवर सर्पांचा राजा शोभत आहे, तो हा चिताभस्म - विभूषित सर्व देव - श्रेष्ठ, सर्वांचा स्वामी, संहारकर्ता सर्वव्यापक, कल्याणस्वरुप चंद्रासारखा असलेला श्रीशंकर सर्वदा माझे रक्षण करो. ॥ ३ ॥ २) रघुवंशाला आनंद देणार्‍या रामाच्या मुखकमलाची कान्ती - शोभा राज्याभिषेकाच्या बातमीने प्रसन्नता वाढली नाही तसेच जी वनवास दु:खाने कोमेजली नाही ती मला सदासर्वदा सुंदर कल्याण प्रदान करणारी होवो. ॥ ४ ॥ ३) ज्यांचे शरीर नीलकमलासारखे श्यामल व कोमल आहे, ज्यांनी सीतेला आपल्या वामभागीं बसविली आहे, ज्यांच्या हातात मोठा बाण व सुंदर धनुष्य आहे, त्या रघुवंशनाथ रामाला मी नमन करतो. ॥ ५ ॥ श्रीगुरूंच्या चरणकमलांच्या रजाने ( स्वत:चा) मनरुपी आरसा पुष्कळ स्वच्छ करुन चार पुरुषार्थ देणारे रघुवरांचे विमल यश मी वर्णन करतो. ॥ मं. दो.१ ॥

जैंहुनि राम विवाहुनि आले । मुद मंगल उत्सव नव चाले ॥
भुवन चारदश भूधर भारी । वर्षति सुकृत-मेघ सुख-वारी ॥
ऋद्धि सिद्धि संपत् शुभ सरिता । अयोध्यांबुधीं येती भरिता ॥
मणिगण सुजाति पुर नारी नर । सर्वपरीं शुचि अमोल सुंदर ॥
कांहीं न वदवे नगर-विभूती । जणुं इतकिच विरंचि कर्तूती ॥
सकल सुखें पुरजनां समस्तां । रामचंद्र मुखचंद्र निरखतां ॥
सखि-साजणींसह माता मुदिता । बघुनि मनोरथ वल्ली फलिता ॥
राम-रूप-गुण-शिला स्वभावा । बघुनि परिसुनी प्रमोद रावा ॥

दो. :- स्तवितिं महेशा प्रार्थिती सकल ह्रदयिं अभिलाष ॥
विद्यमान नृपती करो युवराजा रामास ॥ १ ॥

जेव्हापासून राम विवाह करून ( घरी) आले तेव्हापासून नित्यनवे आनंद मंगलोत्सव चालू आहेत. ॥ १ ॥ चार व दहा भुवने हे मोठे पर्वत होत, व सुकृतरुपी मेघ सुखरुपी जलाचा वर्षाव करु लागले ॥ २ ॥ ऋद्धि, सिद्धी व सुख शुभ संपत्ती या सरिता अयोध्यारुपी सागरात भरभरुन येऊ लागल्या ॥ ३ ॥ नगरातील उत्तम जातीचे ( जन्मानेच शुभ असणारे) पुरुष व स्त्रिया उत्तम जातीचे मणीसमूह (रामभक्तीरी चिंतामणी) असून ते सर्व प्रकारे पवित्र, अमोल व सुंदर आहेत. ॥ ४ ॥ नगराची विभूती काही वर्णन करता येणे शक्य नाही ( पण असे वाटते की) विरंचीचे कर्तृत्व केवळ इतकेच आहे. ॥ ५ ॥ सगळ्या पुरवासी लोकांना सर्व प्रकारची सुखे रामचंद्रांच्या मुखचंद्राच्या अवलोकनाने मिळत आहेत ॥ ६ ॥ मैत्रिणी व सहचरींसह सर्व माता आपली मनोरथवल्ली फळली असे पाहून आनंदित आहेत ॥ ७ ॥ रामचंद्रांचे रुप, गुण, शील व स्वभाव पाहून व ऐकून दशरथ राजाला परम आनंद होत आहे. ॥ ८ ॥ ( अयोध्यावासी) सर्व लोकांच्या हृदयात अभिलाषा आहे व सर्व लोक महेशाची स्तुती करुन प्रार्थना करीत असतात की ( दशरथ) राजाने आपण असताच रामचंद्रांस युवराज करावे. ॥ दो० १ ॥

एक समयिं सह सकल समाजा । राजसभे भ्राजे रघुराजा ॥
सकल-सुकृत-मूर्ति च नरनाहो । राम-सुयश परिसुनि सूत्साहो ॥
सर्वहि नृपति कृपा अभिलाषिति । प्रीति करिति लोकप रुचि राखिति ॥
त्रिभुवनिं कोणी त्रिकाळिं जगतीं । भूरिभाग्य दशरथ-सम नसती ॥
मंगलमूल राम सुत ज्यानां । जें वदाल तें थोडें त्यानां ।
सहज घेइ नृप करीं मुकुराला । वदन बघुनि सम करि मुकुटाला ॥
श्रवण-समीप बघत सित केशां । जरठपणा जणुं करि उपदेशा ।
दे युवराज नृपा रामाला । घे किं जन्म-जीवन-लाभाला ॥

दो. :- हा विचार मनिं करुनि नृप सुसमय सुदिन मिळून ॥
प्रेमें पुलकित तनु मुदित विनवि गुरुस जाऊन ॥ २ ॥

एके समयी रघुकुलातील राजा दशरथ आपल्या सर्व समाजासहित राजसभेत ( दरबारात) विराजमान झाले आहेत. ॥ १॥ नरनाथ दशरथ म्हणजे सर्व सुकृतांची प्रत्यक्ष मूर्तीच ! रामाचे सुंदर यश ऐकून त्यास फारच उत्साह वाटला ॥ २ ॥ सर्व नृपती दशरथांच्या कृपेची अभिलाषा करतात. व इंद्रादी लोकपाल त्यांच्यावर प्रीती करुन त्यांची रुची जाणून ती पूर्ण करतात. ॥ ३ ॥ तिन्ही भुवनात तिन्ही काळी सर्व जगात दशरथांसारखे अत्यंत भाग्यवान कोणीही नाहीत. ॥ ४ ॥ सर्व मंगलांचे मूळ जे राम तेच त्यांचे पुत्र बनले त्या दशरथांचे जे जे वर्णन करावे ते ते थोडेच ॥ ५ ॥ राजाने सहज आरसा हातात घेतला व त्यात सहज मुख पाहून मुकुट नीट नेटका केला ॥ ६ ॥ तेव्हा सहज दिसले की कानाजवळचे केस पांढरे झालेले आहेत व जणू काय वृद्धपणा उपदेश करुं लागला की ॥ ७ ॥ राजा ! रामाला युवराज्य दे व आपल्या जन्माचा व जीवनाचा लाभ घे. ॥ ८ ॥ हा विचार मनात करून सुदिन व सुसंधी मिळून दशरथ राजाचे शरीर प्रेमाने रोमांचित झाले आहे. व ( मनात) आनंद झाला आहे ( अशा स्थितीत) त्यांनी जाऊन गुरु वसिष्ठांना विनंती केली ॥ दो० २ ॥

श्रुणु मुनिनायक भूप म्हणाले । राम सर्वपरिं लायक झाले ॥
सेवक सचिव सकल पुरवासी । जे आम्हां अरि मित्र उदासी ॥
प्रिय मज राम तसे सर्वाप्रत । प्रभु-आशिस् जणुं तनुधर शोभत ॥
विप्र सहित परिवारा स्वामी ! । स्नेह करिति अपणां-सम नामी ॥
जे गुरुचरण-रेणु शिरीं धरिती । ते जणुं सकल विभव वशकरिती ॥
जे गुरुचरण-रेणु शिरीं धरिती । ते जणुं सकल विभव वशकरिती ॥
मज सम हें अनुभविति न दूजे । प्राप्त सकल पावन रज-पूजें ॥
सहज-स्नेहें प्रसन्न मुनिवर । दिसत, म्हणति ’आज्ञा द्या’ नृपवर ॥

सो. :-राजन् ! अपलें नाम यश पुरवि सकल कांक्षांस ॥
फल-अनुगामी महिप-मणि तव मानसिं अभिलाष ॥ ३ ॥

भूप म्हणाले की मुनिनायका ! जरा ऐकावे राम सर्व प्रकारे लायक झाले आहेत ॥ १ ॥ सेवक, सचिव, व सर्व पुरवासी लोक तसेच आमचे शत्रू, मित्र, व आमच्याशी उदासीन असणारे असे ॥ २ ॥ जे आहेत त्या सर्वांना राम तितकेच प्रिय आहेत. जितके मला प्रिय आहेत. ॥ ३ ॥ तसेच स्वामी ! परिवारांसह सगळे विप्र आपल्यासारखेच रामावर उत्तम प्रेम करतात. ॥ ४ ॥ जे गुरुचरणांची धूळ ( तिचा एक कण) आपल्या मस्तकावर धारण करतात ते जणू सर्व वैभवाला वश करतात. ॥ ५ ॥ याचा अनुभव माझ्यासारखा इतर कोणालाही आलेला नाही. कारण आपल्या पवित्र चरणरजांच्या पूजनानेच मला सर्व काही प्राप्त झाले आहे . ॥ ६ ॥ आता माझ्या मनात एकच अभिलाषा आहे. व ती नाथ ! तुझ्या अनुग्रहाने पुर्ण होईल ( अशी माझी खात्री आहे.) ॥ ७ ॥ सहज स्नेहाने मुनीश्रेष्ठ प्रसन्न झाले आहेत असे दिसताच नृपश्रेष्ठ म्हणाले की आज्ञा द्यावी ॥ ८ ॥ राजा ! तुमचे नांव व यश सर्वांच्या सकल कांक्षा पुरविणारे आहे; व तुमच्या मनात जी अभिलाषा असते ती हे महीपमणी ! फळाच्या मागोमाग जाणारी असते. ( हे महीपमणी ! चारी पुरुषार्थ तुमच्या अनुगामी असता तुमच्या मनांत अभीलाषा !) ॥ दो० ३ ॥

सर्व परीं गुरु प्रसन्न कळुनी । वदले नृप हर्षित मूदु वचनीं ॥
करणें नाथ ! राम युवराजा । वदा कृपायुत ‘सजवा साजा’ ॥
मी असतां उत्सव हा व्हावा । लोकीं लोचन-लाभ लुटावा ॥
शिवें प्रभु कृपें सर्व पुरविली । हौस, एक ही मनीं राहिली ॥
मग न शोच तनु राहो जावों । तेणें पश्चात्ताप न पावों ॥
नृप-शुभ-वच मुनि-कानीं पडलें । मंगल-मोद-मूल मनिं रुचलें ॥
श्रुणु नृप ज्यास विमुख अनुतापति । यद्‍भजनाविण ताप न नाशति ॥
झाला तुमचा सुत तो स्वामी । राम पुनीत-प्रेम-अनुगामी ॥

दो. :- त्वरा करा न विलंब नृप सजवा सारा साज ॥
सुदिन सुमंगल तैंच जैं राम होति युवराज ॥ ४ ॥

गुरुमहाराज सर्व प्रकारे प्रसन्न आहेत हे जाणून दशरथ राजा हर्षाने मृदु वाणीने बोलले ॥ १ ॥ नाथ् ! रामचंद्राला युवराज करावा, तरी कृपा करुन आज्ञा द्यावी की सर्व तयारी करा ( साज सजवा) ॥ २ ॥ मी जिवंत असता हा उत्सव व्हावा व लोकांना लोचन लाभ लुटण्यास सापडावा. ॥ ३ ॥ प्रभू ! आपल्या कृपेने शिवाने सगळी हौस पुरविली; फक्त एवढी एकच हौस मनात उरली आहे ॥ ४ ॥ ( एवढी पुरी झाली की) मग हा देह राहो, किंवा जावो मला वाईट वाटणार नाही. ( काही चिंता, शोक करण्याचे कारण नाही) व तेणे करुन मग पश्र्चाताप करण्याची पाळी माझ्यावर येणार नाही. ॥ ५ ॥ दशरथ राजाचे सुंदर शुभ वचन मुनींच्या कानी पडताच, ते मंगल व मोद यांचे मूळ असल्याने वसिष्ठांस आवडले ॥ ६ ॥ ( ते म्हणाले की) राजा ! ऐका ! ज्याच्याशी विरोध केला असता विरोधकांना पश्र्चाताप करावा लागतो व ज्याच्या भजनाशिवाय ताप नष्ट होत नाहीत ॥ ७ ॥ तोच पवित्र प्रेंमाच्या मागे धावणारा स्वामी राम तुमचा पुत्र झाला आहे ॥ ८ ॥ राजा ! त्वरा करा विलंब मुळीच करूं नका व अभिषेकाचा सर्व साज सजवा जेव्हा राम युवराज होतील तोच सुमंगल ( मुहूर्त) व तोच सुदिन ! ॥ दो० ४ ॥

आले मंदिरिं मुदित महीपति । सेवक सुमंत्र सचिवां आणति ॥
ते जय जीव वदुनि शिर नमिती । भूप सुमंगल वचना कथिती ॥
हें मत रुचेल जर पांचांला । अभिषेकणें मुदा रामाला ॥
मंत्री ती प्रिय परिसुनि वाणी । मुदित नवांकुरिं पडे किं पाणी ॥
विनति सचिव करती जोडुनि कर । जगा जगत्पति ! कोटी वत्सर ॥
जग-मंगलकर विचार हितकर । नको विलंब किं करणें सत्वर ॥
श्रवुनि मुदित नृप, सचिवसुभाषा । वाढत लते मिळे किं सुशाखा ॥

दो. :- भूप कथिति मुनिराज जी आज्ञा देतिल कांहि ॥
राम-राज्य-अभिषेकिं ती सत्वर पूर्ण करा हि ॥ ५ ॥

महीपति आनंदाने मंदिरी ( राजवाड्यात) आले व सेवकांनी सुमंत व इतर सचिवाना बोलावून आणले ॥ १ ॥ ( ते आले) व जय जीव म्हणून त्यांनी मस्तक नमविले तेव्हा राजाने त्यांस सुंदर, मंगलमय वचन सांगितले ॥ २ ॥ ( म्हणाले की) हे मत जर पांच जणांना रुचत असेल तर रामाला आनंदाने ( यौवराज्य) अभिषेक करावा ॥ ३ ॥ ते प्रिय वचन ऐकून मंत्री हर्षित झाले की जणूं मनोरथरुपी रोपावर ( पावसाचे) पाणी पडावे ( पाऊस पडावा) ॥ ४ ॥ हात जोडून सचिव विनंती करतात की अहो जगत्पती ! आपण कोटी वर्षे जगावे ॥ ५ ॥ आपण केलेला विचार सर्व जगाचे मंगल करणारा व हितकारक आहे; तरी आता विलंब मुळीच नको; हे कार्य अगदी त्वरेने करावे ॥ ६ ॥ सचिवाचे सुंदर भाषण ऐकून राजाला असा आनंद झाला की जणू वाढणार्‍या लतेला - वेलीला सुंदर शाखेचाच आधार मिळाला ॥ ७ ॥ दशरथ राजा ( सचिवांस) म्हणाले की मुनीराज वसिष्ठ जी काही आज्ञा देतील ती रामराज्याभिषेकासाठी त्वरेने पूर्ण कराच ॥ दो० ५ ॥

म्हणति मुनीश मुदित मृदुवाणीं । आणा सर्व तीर्थ=वर-पाणीं ॥
औषधि मूल फूल फल पानें । मंगल वस्तु कथिति अभिधानें ॥
चामर चर्म वसन नाना तीं । रोम पाट पट अगणित जाती ॥
मणिगण मंगल वस्तु अनेका । ज्या जगिं योग्य भूप-अभिषेकां ॥
वेदविहित सब वदुनि विधाना । म्हणति रचा पुरिं विविध वितानां ॥
सफल रसाल पूगफल केळी । लावा पथिं नगरीं शुभ मेळीं ॥
रचा मंजुमणि चौक सुचारू । सांगा शीघ्र सजा बाजारू ॥
पूजा गणपति गुरु कुलदेवा । करा सर्वपरिं भूसुर-सेवा ॥

दो. :- ध्वज पताक तोरण कलश सजा नाग रथ वाजि ॥
शिरीं धरुनी मुनिवर-वचन लागति सब निज काजिं ॥ ६ ॥

मुनीश्रेष्ठ हर्षित होऊन मृदु वाणीने महणाले की सगळ्य़ा श्रेष्ठ तीर्थाचे पाणी आणा ॥ १ ॥ औषधी, मुळे, फुले व नाना प्रकारची फळे, पाने वगैरे विविध मांगलिक पदार्थांची नावे सांगून ते आणा असे सांगितले ॥ २ ॥ चवर्‍या, विविध चर्मे (व्याघ्राजिन, मृगाजिन इ., विविध वस्त्रे व लोकरीचे, रेशमी व सुती कपडे अगणित जातीचे सांगितले ॥ ३ ॥ अनेक मांगलिक रत्‍नांचे समूह आणि राजाच्या अभिषेकासाठी योग्य असे नानाविध मांगलिक जिन्नस ( आणण्यास सांगितले) ॥ ४ ॥ या प्रमाणे वेदशास्त्रोक्त विधानाप्रमाणे सर्व सांगितले व म्हणाले की नगरात विविध प्रकारचे मंडप घालून नगर शृंगारा ॥ ५ ॥ फळे आलेले आम्रवृक्ष, सफळ पोफळी ( सुपारीची झाडे) व सफळ केळी नगरातील सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूस ओळीने लावा ॥ ६ ॥ मण्यांच्या रांगोळ्यांचे सुंदर चौक भरा; व बाजार त्वरेने शृंगारण्यास सांगा ॥ ७ ॥ गुरु, गणपती, व कुलदेव यांचे पूजन करा; ब्राह्मणांची सर्व प्रकारे सेवा करा. ( त्यांस संतुष्ट करा) ॥ ८ ॥ ध्वजा पताका, तोरणे उभारा व मंगल कलश सजवा हत्ती, घोडे व रथ शृंगारा ( असे मुनीश्रेष्ठांनी सांगितले) मुनीश्रेष्ठांची आज्ञा शिरसामान्य करुन सर्व मंडळी आपआपल्या कामाला लागली ॥ दो० ६ ॥

जे ज्यां कथिलें मुनीश्वरांनीं । पूर्विंच जणुं तें केलें त्यानीं ॥
विप्र साधु सुर पूजी राजा । रामहिता करि मंगल काजां ॥
शोभन रामभिषेक ऐकत । उत्सव-गजर नगरिं शुभ चालत ॥
सीता राम शकुन अनुभवती । सुंदर मंगल अंगें स्फुरतीं ॥
प्रेमें पुलकित वदति परस्पर । सुचविति भरतागमना प्रियकर ॥
गत किति दिन वाटे चुकलेसें । शकुनिं वाटें प्रिय भेटेसे ॥
कोण जगीं प्रिय सम भ्रताही । हेंच शकुन फल दुसरें नाहीं ॥
रामा निशिदिन बंधु-सुचिंता । जशि अंडांची कासवि-चित्ता ॥

दो. :- परिसुनि मंगल परम तैं हर्षित राणि निवास ॥
खुलत बघुनि विधु-वृद्धि जणुं वारिधिं वीचि-विलास ॥ ७ ॥

मुनीश्र्वर वसिष्ठांनी ज्याला जे काम सांगीतले ते ते त्यांनी त्यांनी जणू काय आधीच केले होते. ॥ १ ॥ राजाने विप्र, साधू व देव यांची पूजा केली व रामहितासठी मंगल कार्ये करु लागले ॥ २ ॥ रामचंद्रांच्या सुंदर ( सुखद) राज्याभिषेकाची बातमी कळताच नगरात जिकडे तिकडे उत्सवाच्या वाद्यांचा शुभ गजर चालू झाला ॥ ३ ॥ राम व सीता यांची सुंदर मंगल अंगे स्फुरण पावून त्यांना शुभ शकुन अनुभवास आले ॥ ४ ॥ शरीर प्रेमाने पुलकित होऊन एकमेकांस म्हणतात की हे शुभशकुन भरताचे प्रियकर आगमन सुचवितात. ॥ ५ ॥ भरत गेल्याला कितीतरी दिवस झाले ( त्यामुळे) अगदी चुकल्यासारखे वाटत आहे, आणि शकुनांवरुन वाटते की आवडत्याची भेट होणार ॥ ६ ॥ भरतासारखा प्रिय जगात दुसरा कोण आहे ? म्हणून ( ही) शकुनाचे हेच फळ, दुसरे नाही ॥ ७ ॥ कासवी जशी आपल्या अंड्यांची चिंता ( चिंतन) आपल्या हृदयात करीत असते तशीच राम रात्रंदिवस भावाची ( भरताची) चिंता करीत आहेत. ॥ ८ ॥ ( राम सीता यांना शुभ शकुन झाले) त्याच वेळी हा परम मंगलाचा समाचार राण्यांस समजला व अंत:पुरातील सर्व राण्यांस असा परम हर्ष झाला की जणू काय चंद्राची वृद्धी पाहून सागरात लाटांचा विलास ( वाढून) तो शोभू लागला ( खुलला) ॥ दो० ७ ॥

जाउनि आधिं वृत्त जिहिं कथिलें । वसन भूषणें भूरि लाभले ॥
प्रेमें पुलकित मनिं अनुरागति । मंगल कलश सकल सजुं लागति ॥
रांगोळ्यांस सुमित्रा बहु भरि । अति सुंदर मणिमय नाना परि ॥
रामजननि आनंद-मग्न अति । दे दानां अणवुनि विप्रांप्रति ॥
ग्रामदेवि पूजुनि सुर-नागां । म्हणे देउं पुनरपि बलिभागां ॥
जेणें होइ राम-कल्याण । दया करुनि तें द्या वरदान ॥
गाति सुमंगल कोकिल वचना । विधुवदना मृगशावकनयना ॥

दो.:- कळत राम-अभिषेक, मनि नर नारी हर्षून ॥
लागति मंगल साज सजुं विधि अनुकूल बघून ॥ ८ ॥

सर्वांच्या आधी जाऊन ज्यांनी हा ( परममंगल) समाचार कळवला त्यांना पुष्कळ वस्त्रे, भूषणे ( बक्षिसे) मिळाली ॥ १ ॥ ( ज्यांना कळले) त्या प्रेमाने पुलकित झाल्या व मनात अनुराग वाढून त्या सर्व राण्य़ा मंगल वस्तू व मंगल कलश सजवूं लागल्या ॥ २ ॥ सुमित्रेने गजमुक्तांच्या व रत्‍नांच्या नाना प्रकारच्या अति सुंदर रागोळ्या काढल्या ॥ ३ ॥ रामाची आई आनंदात मग्न झाली व ब्राह्मणांस बोलावून आणून तिने त्यांस नाना विध दाने दिली ॥ ४ ॥ कौसल्येने ग्रामदेवी देव व नाग यांचे पूजन करून प्रार्थना केली की ( राम राज्याभिषेक झाल्यानंतर) पुन्हा बलिभाग देईन ॥ ५ ॥ ( तरी जेणे) करुन रामाचे कल्याण होईल असे वरदान द्या. ॥ ६ ॥ कोकिळे सारखा कंठ असलेल्या, चंद्रासारखे मुख असलेल्या, हरिण-पाडसा सारखे नेत्र असलेल्या ( नगरनारी) सुंमंगल गीते गाऊ लागल्या. ॥ ७ ॥ रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची बातमी कळताच सर्व पुरुष व स्त्रिया यांना हर्ष झाला व विधी अनुकूल आहे पाहून ( विचाराने जाणून) सर्वजण मंगल साज सजवूं लागले ॥ दो० ८ ॥

वसिष्ठांस नरपति बोलाविति । रामधामिं उपदेशा लाविति ॥
गुर्वागमन कळत रघुनाथा । द्वारिं येति पदिं नमिती माथा ॥
सादर अर्घ्य देति गृहिं आणिति । षोडशपरिं पूजुनि सन्मानिति ॥
सीतेसह गुरुपद मग धरले । राम कमल-कर जोडुनि वदले ॥
सेवक-सदनीं स्वामि-आगमन । मंगल-मूल अमंगल-भंजन ॥
प्रभु ! बोलावुनि दासा प्रीतीं । उचित धाडणें कार्या, नीती ॥
प्रभुता त्यजुनि नाथ परि आले । स्नेहें, आज पूत गृह झालें ॥
आज्ञा द्यावी करिन तें देवा । लाभ सेवका स्वामी-सेवा ॥

दो. :- परिसुनि मुनि सुस्निग्ध वच प्रशंसि रघुवीरास ॥
हंस-वंश-अवतंस ! या कां न वदां वचनास ॥ ९ ॥

मग नरपतीने वसिष्ठांस बोलावून ( आणूवून) रामास उपदेश करण्यासाठी रामधामी पाठवले ॥ १ ॥ गुरु येत आहेत असे रघुनाथांस कळताच ( प्रवेश) द्वारा जवळ येऊन त्यांनी त्यांच्या पायांवर मस्तक ठेऊन नमस्कार केला ॥ २ ॥ आदराने अर्घ्य देऊन आदराने त्यांना घरात आणले व षोडशोपचरांनी पूजा करुन त्यांचा सन्मान केला ॥ ३ ॥ ( मग) सीतेसहित गुरुचे पाय धरले व कमलकर जोडून राम म्हणाले ॥ ४ ॥ सेवकाच्या घरी स्वामींचे आगमन ( येणे) मंगलाचे मूळ व अमंगलाचा नाश करणारे असते . ॥ ५ ॥ तरीपण प्रभु ! ( नाथ) दासाला बोलावून ( घेऊन) प्रीतीने कार्याला धाडणे उचित झाले असते, ( कारण) तशी नीती आहे ॥ ६ ॥ तथापि प्रभूत्वाचा त्याग करुन नाथ स्नेहाने आले व आज हे घर पावन झाले ॥ ७ ॥ काय असेल ती आज्ञा द्यावी, त्याप्रमाणे हे देवा ! मी ते करीन; कारण स्वामीची सेवा करावयास मिळणे हाच सेवकाला ( मोठा) लाभ आहे ॥ ८ ॥ अत्यंत स्नेहमय ( सु-स्निग्ध) भाषण ऐकून मुनी रघुवीराची प्रशंसा करीत म्हणाले की राम ! तुम्ही रघुवंशाचे शिरोमणी असे भाषण कां बरे करणार नाही ? ॥ दो० ९ ॥

राम शील गुण स्वभाव वानुनि । वदले प्रेमें पुलकांकित मुनि ॥
भूप करिति अभिषेक-सुसाजा । तुम्हां करूं इच्छिति युवराजा ॥
राम करा सब संयम आजीं । जर निभावि विधि कुशल किं काजीं ॥
शिकवुनि गुरु नृपभवनिं निघाले । राम असे मनिं विस्मित झाले ॥
सवें जन्मलों बंधु चारिजण । खाणे निजणें बालकेलि पण ॥
कर्णवेध उपनयन विवाहां । सर्व बरोबर कृत उत्साहां ॥
एक विमल कुलिं अनुचित हें किति । त्यजुनि बंधु मोठ्या अभिषेकिति ॥
प्रेमें प्रभु-परिताप सुशोभन । भक्त-मनाचें हरो कुटिलपण ॥

दो. :- लक्ष्मण अवसरिं येति त्या प्रेम-मग्न सानंद ॥
प्रियवचनें सन्मनिति रघकुल-कैरवचंद ॥ १० ॥

( याप्रमाणेच) रामचंद्रांच्या गुणशील स्वभावाची प्रशंसा करुन प्रेमाने रोमांचित झालेले मुनी म्हणाले ॥ १ ॥ भूपतीनी अभिषेकाची सर्व तयारी केली असून तुम्हांला युवराज करण्याची त्यांची इच्छा आहे ॥ २ ॥ ( म्हणून) राम ! आज सर्व प्राकारचा संयम करावा; दैवाने जर निभावून नेले तर कार्यात कुशल लाभेल ॥ ३॥ उपदेश करुन ( शिकवण देऊन) गुरु राजाकडे निघाले ( गेले) इकडे रामचंद्रांच्या मनात विस्मय ( खेद) उत्पन्न झाला की ॥ ४ ॥ आम्ही चौघे भाऊ बरोबर जन्मास आलो, जेवणखाण, झोपणे, खेळ बाललीला इत्यादी सर्व बरोबर करीत राहीलो. ॥ ५ ॥ कान टोचणे, मुंज, लग्न इ. सर्व संस्कार व उत्सव सर्वांचे बरोबर झाले ॥ ६ ॥ ( पण) या विमल वंशांत एकच गोष्ट अनुचित होत आहे की इतर भावांना सोडून मोठ्यालाच राज्याभिषेक करीत आहेत. ॥ ७ ॥ प्रभूचा हा प्रेमजनीत सुंदर परिताप भक्तांच्या मनाचा कुटिलपणा हरण करो ॥ ८ ॥ त्याचवेळी आनंदित व प्रेममग्न झालेले लक्ष्मण ( रामाकडे) आले व रघुकुल कैरवचंद्राने प्रिय वचनांनी त्यांचा सन्मान केला. ॥ दो० १० ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP