॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ४ था



Download mp3

जैं रिपु रणिं रघुनाथें जितले । सकल अमर नर मुनि भय सरलें ॥
लक्ष्मण सीते घेउनि आले । प्रभुपदिं पडत हर्षिं हृदिं धरले ॥
सीता श्याम मृदुल तनु बघते- । प्रेमें परम, न तृप्त नयन ते ॥
वसुनि पंचवटिं श्रीरघुनायक । करिति चरित सुर-मुनि-सुखदायक ॥
बघुनी खरदूषणादि-फन्ना । शूर्पणखा गत चिथवि रावणा ॥
क्रोधें अति बोले वचनासी । देश-कोष-शुद्धि च भूललासी ॥
करिसि पान निजसी दिनरातीं । शुद्धि न तिळ, तव शिरीं अराती ॥
राज्य नीतिविण धर्माविण धन । हरिस सुकर्म न करतां अर्पण ॥
येइ विवेक न विद्या शिकुनी । श्रम फल पढुनी करुनि पावुनि ॥
भूप कुमंत्रें यति संगानें । मानें ज्ञान हि लज्जा पानें ॥
प्रीती प्रणयाविण गुणि मदें । नाशति शीघ्र असें नय वदे ॥


सो० :- रिपु रुज पावक पाप प्रभु अहि समजा सान न ॥
वदुनी, विविध विलाप करित करी ती रोदन ॥ २१रा ॥
दो० :- सभेमधें व्याकुळ पडे रडे मोकलुनि धाय ॥
तूं जिवंत दशमुख असुनि । अशि मम गति हें काय ॥ २१म ॥

जेव्हां रघुनाथाने शत्रूना युद्धांत मारले तेव्हां सगळे देव मनुष्य व मुनि यांचे भय नष्ट झाले. ॥ १ ॥ लक्ष्मण सीतेला घेऊन आले व हर्षाने प्रभूला दंडवत घालीत असतां प्रभूनी त्यांस हर्षाने हृदयाशी धरले. ॥ २ ॥ सीता परम प्रेमाने त्या श्याम व अति कोमल तनूकडे पाहूं लागली पण तिचे ते नेत्र तृप्त झाले नाहीत. ॥ ३ ॥ पंचवटींत राहून श्रीरघुनायक सुर व मुनि यांना सुखदायक असे चरित्र करीत आहेत. ॥ ४ ॥ खर-दूषणादि राक्षसांचा पूर्णविनाश उडालेला पाहून शूर्पणखा रावणाकडे गेली व त्याला डिवचला. ॥ ५ ॥ ती अति क्रोधाने त्याला भर दरबारांत म्हणाली की तुला देश व कोष यांची शुद्धी राहिली नाही (त्यांची भूल पडली आहे). ॥ ६ ॥ दारून पितोस नी दिवसा रात्री झोपा ताणतोस. तुझ्या डोक्यावर शत्रू नाचत आहे याची तुला जरा सुद्धां शुद्धि नाही. ॥ ७ ॥ नीतिवाचून राज्य, धर्मावाचून धन, हरीला अर्पण न करतां केलेले सत्कर्म, आणि जी विद्या शिकल्याने विवेक उत्पन्न झाला नाही ती विद्या, यांचे पढणें करणें आणि मिळणें यांचे फळ म्हणजे फक्त श्रम. ॥ ८-९ ॥ राजा कुमंत्राने, यति (साधक) संगाने, ज्ञान मानाने, लाज लज्जा मद्यपानाने, प्रीति प्रणयाच्या अभावाने व गुणी गर्वाने शीघ्र नाश पावतात असे नीति सांगते. ॥ १०-११ ॥ शत्रु, रोग, अग्नि, पाप, स्वामी व नाग (सर्प) हे लहान क्षुद्र आहेत असे समजूं नका. असे म्हणून विविध प्रकारें विलाप करीत तिने रडण्यास सुरवात केली ॥ सो० २१रा ॥ सभेमधेच व्याकुळ होऊन पडली व धाय मोकलून रडूं लागली, व म्हणाली की दशमुखा ! तूं जिवंत असतां माझी अशी दुर्दशा व्हावी याचा अर्थ काय ? ॥ दो० २१म ॥

व्याकुळ उठति सभासद ऐकुनि । धरुनि बाहु बसविति समजाउनि ॥
वद तव वृत्त वदे लंकापति । नाक कान तव कोण किं कापति ॥
कोशल नृप-दशरथ-सुत असती । पुरुषसिंह वनिं मृगये अटती ॥
मज समजुनि ये त्यांची करणी । रहित निशाचर करतिल धरणी ॥
त्याचें भुजबळ दशमुख ! पावुनि । अभय बनुनि काननिं विचरति मुनि ॥
दिसण्या बालक काळचि जाणा । परम धीर धन्वी गुण नाना ॥
अतुलित बली प्रतापी भ्राते । खलवधरत सुरमुनि-सुखदाते ॥
शोभाधाम राम ते नामां । एक सवें त्यांचे स्त्री श्यामा ॥
विधि बनवी अशि रुपराशि वर । ओंवाळा रतिकोटि तिचे वर ॥
छिन्न तदनुजें श्रुति मम नासा । श्रवुनि बहिण तव कृत परिहासा ॥
खर-दूषण ऐकुनी पुकारिति । त्यां कटकासह ते क्षणिं मारिति ॥
खर-दूषण तिशिरा-मरणातें । श्रवुनि देहिं दव दशाननातें ॥

दो० :- शूर्पणखा समजाउनी, बहु वानी स्वबलास ॥
चिंताकुल गेला गृहीं नीज न निशिं ये त्यास ॥ २२ ॥

ते सर्व ऐकून सभासद व्याकुळ होऊन उठले व तिची समजून घालून तिला दंडाला धरून बसविली. ॥ १ ॥ तेव्हां लंकापति म्हणाला की तुझी हकिकत सांग की तुझे नाक कान कोणी कापले (कापणारा कोण ?) ॥ २ ॥ ती म्हणाली अयोध्याधीश दशरथ राजाचे पुत्र आहेत, ते पुरुषसिंह असून शिकारीसाठी वनांत हिंडत असतात. ॥ ३ ॥ मला त्यांची करणी चांगली समजली आहे, ते सर्व पृथ्वी निशाचररहित करणार ! ॥ ४ ॥ दशानना ! त्यांच्या बाहुबळाचा आश्रय मिळाल्याने मुनि भय रहित होऊन वनांत हिंडू लागले आहेत. ॥ ५ ॥ दिसण्यात आहेत बालक पण काळच आहेत म्हणून समजा. परम धीर धनुर्विद्यानिपुण व नाना गुणविभूषित आहेत. ॥ ६ ॥ अतुल्य बलवान व अतुल्य प्रतापवान असे ते दोघे भ्राते असून खलांचा वध करण्यात तत्पर व सुरांना व मुनींना सुख देणारे आहेत. ॥ ७ ॥ जे शोभाधाम आहेत त्यांचे नांव राम आहे व त्यांच्या बरोबर एक श्यामा स्त्री आहे. ॥ ८ ॥ विधीने तिला अशी श्रेष्ठ रूपराशी बनविली आहे कीं तिच्यावरून कोट्यावधि रति ओवाळून टाकाव्यात. ॥ ९ ॥ त्यांच्या धाकट्या भावाने माझे कान व नाक कापले आणि तुझी बहीण आसे असे ऐकुऊन माझा उपहास केला ॥ १० ॥ माझी हकीकत ऐकून खरदूषणांनी त्यांना युद्धास पुकारले. पण त्यांनी एका क्षणांत सैन्यासह त्यांचा फडशा उडविला. ॥ ११ ॥ खरदूषण आणि त्रिशिरा यांचे मरण ऐकून दशाननाच्या देहांत वणवा पेटला. ॥ १२ ॥ शूर्पणखेची समजून घालून रावणाने आपल्या बळाचे पुष्कळ वर्णन केले व तो चिंताव्याकुळ होऊन घरी गेला व त्याला रात्री झोप आली नाही ॥ दो० २२ ॥

सुरनर-असुर-नाग-विहंगांमधिं । सम मम अनुचर कुणि न जगामधिं ॥
मजशा खरदूषण बलवानां । कोण वधील विना भगवाना ॥
सुर-रंजन भंजन महिभारा । जर भगवंतें धृत अवतारा ॥
जाउन् वैर हठें तर करतो । प्रभुशरिं प्राण तजुनि भव तरतो ॥
भजन घडेना तामस तनुनें । मंत्रचि हा दृढ मन-वच वपुनें ॥
जर नररूप भूप सुत कोणी । हरिन नारि रणिं जिंकुनि दोनी ॥
निघे एकटा बसुनि रथावर । जिथें वसे मारिच तटिं सागर ॥
इथें राम जशि युक्ति योजती । ऐक उमे शुभ कथा आज ती ॥

दो० :- लक्ष्मण जंव गेले वनीं आणुं मूल फल कंद ॥
वदले जनक-सुतेला हसुनि कृपा सुखवृंद ॥ २३ ॥

देव, मानव, दानव, नाग व पक्षी यांच्यात माझ्या सेवकांच्या बरोबरीचा जगांत कोणी नाही. ॥ १ ॥ खरदूषण तर माझ्याच सारखे बलवान ! त्यांना भगवंताशिवाय इतर कोण मारणार ? ॥ २ ॥ देवांचे मनोरंजन करणार्‍या व भूमिभार भंजन करणार्‍या भगवंताने जर अवतार घेतला असेल ॥ ३ ॥ तर मी तेथे जाऊन हट्टाने वैर करतो व प्रभूच्या बाणानी प्राण सोडून भवसागर तरून जातो. ॥ ४ ॥ या तमोगुणी देहाने भजन-भक्ति घडणे शक्य नाही म्हणून मनाने वाणीने व देहाने हाच मंत्र (गुप्तनिश्चय) पक्का ठरला. ॥ ५ ॥ जर मनुष्यरूप कोणी राजपुत्रच असले तर त्या दोघांना जिंकून ह्या स्त्रीला बलात्काराने घेऊन येईन. ॥ ६ ॥ मग जिथे मारीच सागरतीरावर राहतो तिकडे रावण एकटाच (विना सारथी) रथांत बसून निघाला. ॥ ७ ॥
राम जानकी संवाद - इकडे रामचंद्रानी जशी युक्ति योजली ती शुभ सुंदर कथा उमे ! आत्ता ऐक. ॥ ८ ॥ लक्ष्मण कंदमूल फले आणण्यासाठी वनांत गेलेले असतां कृपा व सुख यांचा समूह असलेले श्रीराम हसून जनकसुतेला म्हणाले ॥ दो० २३ ॥

पहा प्रिये व्रत रुचिर सुशीले । काहिं करीन ललित नरलीले ॥
पावकांत तुम्हिं करा निवासा । जों मी करिन निशाचर-नाशा ॥
राम युक्ति जैं वदले सगळी । प्रभुपद हृदिं धरि राही अनलीं ॥
ठेवी प्रतिबिंबा निज सीता । तशी सुशील-रूप सुविनीता ॥
लक्ष्मणही हें मर्म न जाणति । चरित काहिं जें भगवान् विरचति ॥
गत दशमुख मारीचापासीं । नमी स्वार्थरत नीच शिरासी ॥
नमन नीचकृत दुःखद फारहि । सम अंकुश धनु अहि मार्जारहि ॥
भयदा दुष्टाची प्रिय वाणी । अकाळिचीं जशिं फुलें भवानी ! ॥

दो० :- करि पूजा मारीच तैं सादर विचारि तात ॥
व्यग्रचित्त कां एकटे लगबगिनें आलांत ॥ २४ ॥

पतिव्रताधर्र्माचे सुंदर पालन करणार्‍या प्रिये ! सुशीले ! हे पहा की मी काही ललित नरलीला (नरनाट्य) करणार आहे तरी मी निशाचरांचा विनाश करीपर्यंत तुम्ही पावकांत निवास करा. ॥ १-२ ॥ रामचंद्रानी जेव्हां सर्व युक्ति समजावून सांगितली तेव्हां प्रभुपद हृदयांत धारण करून जनकसुता अग्नीत राहिली. ॥ ३ ॥ तिने आपली हुबेहुब प्रतिकृति अशी सीता तिथे ठेवली ती तशीच सुशील, सुरूप व अत्यंत विनीत आहे. ॥ ४ ॥ जे काही चरित्र भगवंतानी केले त्याचे मर्म लक्ष्मणाला सुद्धां समजले नाही. ॥ ५ ॥
दशमुख-मारीच-संभाषण - दशमुख मारीचापाशी गेला व त्या स्वार्थरत नीचाने मारीचाला मस्तक नमवून नमस्कार केला. ॥ ६ ॥ अंकुश, धनुष्य, सर्प, मांजर यांच्या नमनासारखे नीचाने केलेले नमन फारच दुःखदायक असते. ॥ ७ ॥ भवानीं ! अकाळीं येणारी फुले जशी भयसूचक असतात तशीच दुष्टांची प्रियवाणी दुःखदायक असते. ॥ ८ ॥ तेव्हां मारीचाने त्याची पूजा केली आणि आदराने विचारले की तात ! असे एकटेच उदासचित्त व लगबगीने कां बरे आलांत ? ॥ दो० २४ ॥

कथा सकल त्या दशाननानें कथित दुर्भगें अति अभिमानें ॥
तुम्हीं कपटमृग व्हा छलकारी । जेणें आणुं हरुनि नृपनारी ॥
तो वदला ऐका दशकंधर । ते नररूप चराचर-ईश्वर ॥
त्यांसीं तात न वैर करावें । मारि मरावें जगवि जगावें ॥
मुनि मख रक्षणिं कुमार ठाकति । फलविण शर मज रघुपति मारति ॥
आलों शत योजनें क्षणामधिं वैर बरें ना त्यांच्याशीं कधिं ॥
कीटभृंगसम मग गति मातें । जिथें तिथें दिसती दो भ्राते ॥
जरि नर तरि अति तात शूर ते । वैर तयांसि न पडेल पुरतें ॥

दो० :- वधुनि ताटका सुभुज जे खंडिति हर - कोदंड ॥
वधिति तिशिर-खर-दूषणां नर किं असा बलिवंद्य ? ॥ २५ ॥

त्या अति अभागी दशाननाने त्याला सर्व कथा अति अभिमानानें सांगितली. ॥ १ ॥ आणि म्हणाला की छल करणारा कपटमृग व्हा म्हणजे मी त्या नृपाच्या स्त्रीला चोरून आणीन. ॥ २ ॥ तो मारीच म्हणाला की दशकंठा ! मी सांगतो ते ऐका, ते नररूप असले तरी चराचरांचे ईश्वर आहेत. ॥ ३ ॥ तात, त्यांच्याशी वैर करूं नका ! त्यांनी मारले तर मरावे व जगविले तर जगावे. ॥ ४ ॥ विश्वामित्र मुनींच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी आले तेव्हां तर कुमार होते त्यावेळी रघुपतीनी मला फलरहित (बोथट) एकच बाण मारला. ॥ ५ ॥ तरी मी एका क्षणांत शंभर योजनांवर येऊन पडलो. म्हणून त्यांच्याशी वैर् करणें कधीं हिताचे होणार नाही. ॥ ६ ॥ माझी कीटभृंगा प्रमाणे गति झाली व मला ते दोघे भाऊन्च जिकडे तिकडे दिसत असतात. ॥ ७ ॥ ते मनुष्य असले तरी बाबा ! अतिशय शूर आहेत. त्यांच्याशी वैर पुरें पडणार नाही. ॥ ८ ॥ ज्यांनी ताटका आणि सुबाहू यांचा वध करून महेशांचे कोदंड मोडले व त्रिशिरा खर व दूषण यांचा वध केला असा तो बलिवंद्य पुरुष काय नर आहे म्हणतां ? ॥ दो० २५ ॥

गृहिं जावें कुल-कुशल-विचारीं । ऐकुनि जळत शिव्या दे भारी ॥
गुरु सम मूढ करसि मज बोधा । बोल, कोण जगिं मज सम योधा ॥
करि मारीच हृदयिं अनुमाना । नव विरोधिं कल्याण कुणा ना ॥
शस्त्री मर्मीं प्रभु शठ धनी । वैद्य बंदि कवि बल्लव गुणी ॥
उभयपरीं पाही निज मरणा । चित्तिं शरण रघुनायक-चरणां ॥
ब्वधिल अभागी देतां उत्तर । कां न मरूं लागत रघुपति-शर ॥
चिंतुनि असें दशानन संगा- । निघे रामपदिं प्रीति अभंगा ॥
मनीं हर्ष अति तयास दावि न । स्नेही परम आज मी पाहिन ॥

छं० :- प्रियतम परम निज बघुनि लोचन सुफलुनी सुखि होइ मी ॥
श्रीसहित अनुजा सह कृपानिधि-चरणिं मन लावीन मी ॥
निर्वाणदायी क्रोध ज्यांचा भक्ति अवशा वश करी ॥
निज पाणिं शर संधूनि तो मज वधिल सुख सागर हरि ॥ १ ॥
दो० :- मम मागे धरुं धावतां धरुनि शरासन बाण ॥
प्रभु पाहिन फिर-फिरुनि मी धन्य न मज सम आन ॥ २६ ॥

आपल्या कुळाच्या कुशलाचा विचार करून आपण घरी जावे. हे ऐकून रावणाचा जळफळाट झाला व त्याने त्यास पुष्कळ शिव्या दिल्या. ॥ १ ॥ आणि म्हणाला, हे मूढा ! गुरुसारखा मला उपदेश करतोस काय ? बोल ! जगांत माझ्यासारखा योद्धा कोण आहे ? ॥ २ ॥ मारीचाने मनांत विचार केला की या नऊ जणांशी विरोध करून कोणाचे कल्याण होत नाही. ॥ ३ ॥ शस्त्र हाती असलेला, मर्म जाणणारा, स्वामी (राजा) दुर्जन, धनवान, वैद्य भाट (बंदी) आणि कुशल स्वयंपाकी. ॥ ४ ॥ दोन्ही प्रकारे त्याला आपले मरण दिसूं लागले तेव्हां तो मनाने रघुनायक चरणांस शरण गेला. ॥ ५ ॥ (मनांत म्हणतो कीं) याला उत्तर दिले तर हा अभागी मला ठार मारील मग रघुपतीचा बाण लागूनच कां मरूं नये ! ॥ ६ ॥ मनांत असा विचार करून तो दशाननाच्या बरोबर निघाला पण राम चरणीं अभंग प्रीतीने चालला. ॥ ७ ॥ आज परमस्नेही प्रभूचे दर्शन घेईन, त्याना पाहीन (असे वाटून) त्याला मनांत अति हर्ष झाला आहे पण त्याला (रावणाला) कळूं दिला नाही. ॥ ८ ॥ मी आपल्या परम प्रियतमाला पाहून नेत्र सुफळ करून सुखी होईन. श्री(सीते) सहित व अनुजासहित कृपानिधीच्या चरणी मी मन लावीन. ज्यांचा क्रोध सुद्धां मोक्षदायक आहे व त्यांची भक्ति कोणालाही वश नसणार्‍याला वश करणारी आहे तो सुखसागर हरि आपल्या हातानी, शरसंधान करून माझा वध करील ॥ छं ॥ माझ्या मागे मला धरण्यासाठी धनुष्यबाण हातांत घेऊन प्रभु धावत असतां मी पुनः पुन्हां मागे वळून प्रभूला पाहीन. माझ्या सारखा धन्य दुसरा कोणी नाही. ॥ दो० २६ ॥

त्या वन-निकटिं दशानन आला । तैं मारीच कपट-मृग झाला ॥
अति विचित्र ना जाइ वर्णिला । कनक देह मणि-खचित बनविला ॥
सीता परम रुचिर मृग पाहत । अंग अंग सुमनोहर भासत ॥
श्रुणु देवा रघुवीर कृपाकर । चर्म मृगाचें या अति सुंदर ॥
सत्यसंघ या वधुनि चर्म तें । प्रभु आणा वैदेही वदते ॥
रघुपति जाणुनि सर्व कारणा । उठति हर्षि सुर-कार्य-साधना ॥
मृगा बघुनि कटिं परिकर बांधिति । करतलिं चाप रुचिर शर लाविति ॥
लक्ष्मणास तैं प्रभु समजाविति । बंधु ! निशाचर फिरति विपिनिं किति ॥
संरक्षी सीतेला भारी । मति-विवेक-बल-समय-विचारीं ॥
प्रभुस बघुनि मृग जाई पळुनी । धावति राम शरासन सजुनी ॥
निगम नेति, शिव ध्यानिं न पावति । मायामृग-मागें ते धावति ॥
कधीं निकट कधिं सुदूर पळतो । कधीं प्रगटतो लपतो खळ तो ॥
प्रगटत लपत करत छल भूरी । घेउन गेला प्रभुला दूरीं ॥
मारिति राम कठिण शर लक्षुनि । पडे धरणीवर घोर पुकारुनि ॥
प्रथम घेइ तो लक्ष्मण-नामा । स्मरे मनामधिं नंतर रामा ॥
स्वतनू प्रगटी प्राणां त्यजतां । स्नेहें रामा हृदयीं स्मरतां ॥
तदंतरीचें प्रेम जाणुनी । मुनि-दुर्लभ गति दिधली प्रभुनी ॥

दो० :- विपुल फुलें सुर वर्षती प्रभुगुणगाथा गात ॥
निजपद असुरा अर्पिलें दीनबंधु रघुनाथ ॥ २७ ॥

त्या वनाच्या जवळ दशानन आला तेव्हां मारीच कपटमृग बनला. ॥ १ ॥ तो इतका विचित्र आहे की त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. देह सोन्याचा असून रत्‍नखचित आहे. ॥ २ ॥ सीतेने तो परम रुचिर मृग पाहिला तेव्हां त्याचे प्रत्येक अंग अति मनोहर दिसले. ॥ ३ ॥ हे देवा ! कृपाकर रघुवीरा ! ऐका, या मृगाचे चर्म अति सुंदर आहे. ॥ ४ ॥ सत्यसंघ प्रभु ! याला मारून याचे चर्म आणा असे वैदेही म्हणाली. ॥ ५ ॥ रघुपति सर्व कारण जाणत असल्याने सुरकार्य साधण्यासाठी हर्षाने उठले. ॥ ६ ॥ मृगाला पाहून उपवस्त्राने कंबर कसून हातांत रुचिर धनुष्य घेतले व त्यावर रुचिर बाण लावला. ॥ ७ ॥ प्रभूनी लक्ष्मणास समजाऊन सांगितले कीं बंधु ! वनांत कितीतरी निशाचर फिरत आहेत. ॥ ८ ॥ म्हणून बुद्धीचे विवेकबळ, देहबळ व काळ यांच्या विचाराने सीतेचे चांगले रक्षण कर. ॥ ९ ॥ प्रभूला पाहून मृग पळत चालला तेव्हां राम धनुष्य सज्ज करून त्याच्या पाठीशी धावले. ॥ १० ॥ वेद (निगम) नेति नेति म्हणून ज्याचे वर्णन करतात व जे शिवाला सुद्धां ध्यानांत सापडत नाहींत ते माया-मृगाच्या मागे धावत सुटले ! (केवढे आश्चर्य हे !) ॥ ११ ॥ तो मृग कधी जवळ दिसतो तर क्षणांत दूर जातो, केव्हां तो खल प्रगट होतो तर क्षणांत गुप्त होतो, लपतो. ॥ १२ ॥ अशाप्रकारे लपत छपत, प्रगट होत, छल कपट करीत तो प्रभूला आश्रमापासून दूर घेऊन गेला. ॥ १३ ॥ म्हणून रामचंद्रानी नेम धरून कठीण बाण मारला त्याबरोबर तो घोर पुकारा करून धरणीवर पडला. ॥ १४ ॥ त्याने प्रथम लक्ष्मणाचे नांव उच्चारले व नंतर रामाचे स्मरण मनांत केले. ॥ १५ ॥ स्नेहाने रामाचे स्मरण करीत प्राण सोडतानां त्याने आपला राक्षस देह प्रगट केला. ॥ १६ ॥ त्याच्या अंतरीचे प्रेम जाणून प्रभूनी मुनिदुर्लभगति कैवल्यमुक्ति त्याला दिली. ॥ १७ ॥ प्रभूच्या गुणगाथा गात गात देवानीं पुष्कळ फुलांची वृष्टि केली. ते म्हणाले की, रघुनाथ असे दीनबंधु आहेत की या असुराला सुद्धां निजपद दिले. ॥ दो० २७ ॥

खल हत, शीघ्र फिरति रघुवीर । शोभे धनु करिं कटिं तूणीर ॥
आर्त गिरा जैं ऐके सीता । वदे लक्ष्मणा अतिशय भीता ॥
जा सत्वर अति विपदीं भ्राते । लक्ष्मण हसुनि म्हणे श्रुणु माते ! ॥
भृकुटिं विलासिं सृष्टिलय घडतो । स्वप्निंहि संकटिं तो कधिं पडतो ॥
मर्म वचन जैं सीता वदलें- । प्रेरित हरि लक्ष्मण-मन ढळलें ॥
वनदिग्देवां सोंपवि तिजला । रावण-शशि-राहू प्रति वळला ॥
शून्य संधि दशकंधर पाहे । यति वेषें सन्निध येताहे ॥
ज्याच्या भयें सुरासुर डरती । निशिं न नीज दिनिं अन्न न गिळती ॥
दशशिर तो श्वानासम भुरटा । जाइ चहुंकडे बघत भामटा ॥
असा कुपथिं पद देत खगेश्वर ! । नुरे तेज तनु-मति-बल तिळभर ॥
वदुनि कथा नानाविध शोभन । प्रीति नीति भय दावि विलोभन ॥
सीता वदे यती तुम्हिं असतां- । स्वामी, तुम्हिं वच खलसे वदतां ॥
तैं रावण निजरूप दाखवी । होइ सभय जैं नाम ऐकवी ॥
धरुन् धीर दृढ सीता वदते । थांब खला प्रभु आले बघ ते ॥
क्षुद्र ससा इच्छी हरिवधुसी । निशिचर नाथ ! कालवश अससी ॥
श्रवुनि वचन दशशीस कोपला । मनिं पद् नमुनी मानि सुखाला ॥

दो० :- क्रोधवंत रावण तिला रथिं बसवुनि तैं घेइ ॥
निघे तातडीं नभिं, भयें रथ न हांकतां येइ ॥ २८ ॥

त्याला मारला व रघुवीर लगेच परतले तेव्हां त्यांच्या हातांत धनुष्य व कमरेला तलवार शोभत आहे. ॥ १ ॥ जेव्हां सीतेने आर्तवाणी ऐकली तेव्हां अत्यंत भयभीत होऊन ती लक्ष्मणास म्हणाली की, ॥ २ ॥ जा लवकर त्वरेनें, तुमचे भाऊ अति संकटांत आहेत. लक्ष्मण हसून म्हणाले की माते ! ऐक. ॥ ३ ॥ ज्याच्या भृकुटीच्या विलासाने सृष्टीचा लय-संहार होतो तो स्वप्नांत तरी संकटांत पडणे शक्य आहे काय ? ॥ ४ ॥ हरीच्या प्रेरणेने जेव्हां सीतेकडून मर्म वचन बोलले गेले तेव्हां हरीच्याच प्रेरणेने लक्ष्मणाचा निश्चय ढळला. ॥ ५ ॥ वनदेव आणि दिशांचे देव यांना तिला सोपविली आणि रावणरूपी चंद्राच्या राहूकडे लक्ष्मण निघाला. ॥ ६ ॥ या संधीत अगदी सामसूम पाहून दशकंठ संन्यासीरूपाने जवळ येत आहे. ॥ ७ ॥ ज्याच्या भयाने देवांची व असुरांची घाबरगुंडी उडते व त्याना रात्री झोप येत नाही व दिवसा अन्न गिळतां येत नाही. ॥ ८ ॥ तो दशशिरांचा रावण श्वानासारखा भुरटा चोर, भामटा बनून इकडे तिकडे चोहींकडे बघत आला. ॥ ९ ॥ खगेश्वरा (गरुडा) ! याप्रमाणे कुमार्गावर पाऊल टाकले की तेज, बुद्धिबळ व देहबळ जरासुद्धां उरत नाही. ॥ १० ॥ नाना प्रकारच्या सुंदर कथा सांगून रावणाने प्रीति, राजनीति भय व विशेष लोभ दाखविला. ॥ ११ ॥ तेव्हां सीता म्हणाली की स्वामी ! यती असून आपण खलांच्या सारखे बोलत आहांत. ॥ १२ ॥ तेव्हां रावणाने आपले मूळचे खरे रूप दाखविले व जेव्हां आपले नांव सांगितले तेव्हां सीता घाबरली. ॥ १३ ॥ दृढ धीर धरून सीता म्हणाली की रे दुष्टा ! थांब जरा, प्रभु आलेच, ते बघ. ॥ १४ ॥ क्षुद्र सशाने सिंहाच्या स्त्रीची इच्छा करावी तसा निशाचर राजा ! तूं कालवश झाला आहेस. ॥ १५ ॥ हे वचन ऐकतांच दशशीर्ष रावण कोपला पण मनांत सीतेच्या चरणांना वंदन करून त्याने सुख मानले. ॥ १६ ॥ तेव्हां मग कोपलेल्या रावणाने तिला उचलून रथांत बसवून घेतली व तांतडीने आकाशांतून निघाला पण भयाने रथ हाकतां येईना. ॥ दो० २८ ॥

हा ! जगदेकवीर रघुराया । काय गुन्हा किं दया विसराया ॥
संकट शरण-सुख-दायक । हा ! रघुकुल-सरोज-दिननायक ॥
हा ! लक्ष्मण तुम्हिं पात्र न दोषा । फळ आलें कीं मत्कृत रोषा ॥
विविध विलापां करि वैदेही । भूरिकृपा-प्रभु दूरीं स्नेही ॥
प्रभुस कोण मम विपत्ति कथितो । पुरोडाश खर खाउं पाहतो ॥
सीता विलाप परिसुनि भारी । होति चराचर दुःखी सारीं ॥
श्रवुनि गृध्रपति गिरा आर्त ती । रघुकुलतिलक नारि ओळखती ॥
अधम निशिचरें नेलि जातसे । म्लेंछ जशी कपिलेस नेतसे ॥
सीते पुत्रि न मनीं भया धर । मी करतो बघ नाश निशाचर ॥
धावे क्रोधवंत खग तेवीं । सुटे पर्वतावर पवि जेवीं ॥
रे रे दुष्टा कां न थांबसी । निर्भय जासि, न मजसि जाणसी ॥
येतां बघुनि कृतांत समाना । करि दशकंठ वळुनि अनुमाना ॥
कीं मैनाक किं असेल खगपति । मम बल तो जाणतो सहित पति ॥
ओळखि 'जरठ जटायु असे हा' । मम करतीर्थीं त्यागिल देहा ॥
श्रवुनि गृध्र सुक्रोधें धावे । सांगुं रावणा तें ऐकावें ॥
त्यज जानकी, कुशल घरिं जा बर । असें बहुभुजा घडेल ना तर ॥
रामरोष अति भीषण पावक । होईल सकल शलभकुल तावक ॥
उत्तर दे न दशानन योधा । धावे गृध्र करुनि तैं क्रोधा ॥
धरि कच विरथ करी गत महीं । सीते ठेवि फिरे गृध्रही ॥
चोची मारुनि वर्ष्म विदारी । मूर्छित घटिका एक सुरारी ॥
तैं संक्रुद्ध निशाचर चिडला । खड्ग घोर अति काढुनि भिडला ॥
छेदि पंख खग पडला धरणीं । स्मरत राम, कृत अद्‌भुत करणी ॥
पुन्हां रथामधिं सीते घालुनि । निघे उताविळ अति भय पाउनि ॥
जात विलाप करत नभिं सीता । व्याध विवश जणुं हरिणी भीता ॥
गिरिवर बसलेले कपि पाहुनि । हरि हरि म्हणुनि देइ पट टाकुनि ॥
ऐसा सीते घेउनि गेला । राखि अशोक-वनांत तियेला ॥

दो० :- हरला तो खल बहुविधा प्रीति भीति दावून ॥
मग अशोक पादपतळीं राखी यत्‍न करून ॥ २९ रा ॥

हा ! जगातील अद्वितीय वीरा रघुराया ! मी असा काय गुन्हा अपराध केला की आपण दया करणे विसरलांत ! ॥ १ ॥ संकट निवारण करणार्‍या ! शरणागतांस सुख देणार्‍या ! रघुकुल कमल सूर्या ! ॥ २ ॥ हा ! लक्ष्मणा ! तुम्ही दोषाला मुळीच पात्र नाही (तुमचा काही दोष नाही). मी तुमच्यावर जो रोष केला त्याचे फळ मला मिळाले ! ॥ ३ ॥ अशा रीतीने वैदेही नानाप्रकारे विलाप करीत आहे आणि म्हणते की अत्यंत कृपालु व अत्यंत स्नेही प्रभू दूर राहिले. ॥ ४ ॥ माझी विपत्ति आतां प्रभूला कोण सांगणार ! हा खर (गाढव) यज्ञांतेल पुरोडाश खाऊं पहात आहे. ॥ ५ ॥ सीतेचा भारी विलाप ऐकून सर्व चराचर दुःखी झाले. ॥ ६ ॥ गृध्रपति - गृध्रराज जटायूने ती आर्त वाणी ऐकून ओळखले की रघुकुल टिळक रामचंद्रांची स्त्री सीता संकटांत आहे. ॥ ७ ॥ व कसाबाने कपिला गाईला न्यावी तशी अधम निशाचराकडून ती नेली जात आहे. ॥ ८ ॥ लगेच तो आश्वासन देतो की, सीते, मुली ! मनात जरा सुद्धां भय धरू नकोस. मी त्या निशाचराचा नाश करतो बघ. ॥ ९ ॥ असे म्हणून त्याने क्रोधाने अशी झडप घातली की जसे वज्रच पर्वतावर फेकले असावे. ॥ १० ॥ अरे दुष्टा ! अरे ! तूं थांबत कां नाहीस ? अगदीं निर्भयपणे चालला आहेस, मला ओळखला नाहीस काय ? ॥ ११ ॥ कृतान्तासारखा त्याला येताना पाहून दशकंठ मागे वळून अनुमान करू लागला. ॥ १२ ॥ हा मैनाक पर्वत असावा किंवा खगपति गरुड असावा तो आपल्या स्वामीसहित माझे बल चांगले जाणतो मग रावणाने ओळखले की हा जरठ जटायू आहे तो माझ्या कररूपी तीर्थांत देहत्याग करील (माझ्या हाती मरेल) !॥ १३-१४ ॥ हे ऐकतांच गृध्र अति क्रोधाने धावला व म्हणाला की रावणा ! मी सांगतो ऐक. ॥ १५ ॥ जानकीला सोडून दे व कुशल घरी जा कसा. नाहीतर हे बहुभुजा ! असे होईल की ॥ १६ ॥ रामचंद्राचा रोष हा भयंकर पावक आहे आणि तुझे सर्व कुळ त्यांत पतंगाप्रमाणे जळून भस्म होईल. ॥ १७ ॥ लढवय्या दशानन उत्तर देत नाही असे पाहिले तेव्हां गृध्र क्रोध करून धावला. ॥ १८ ॥ रावणाच्या झिंझोट्या धरून त्याला रथांतून बाहेर टाकला तेव्हां तो जमिनीवर कोसळला. मग गृध्राने सीतेला रथांतून काढून नेऊन ठेवली व तो परत फिरला. ॥ १९ ॥ चोचीने घाव करून रावणाचे शरीर ठिकठिकाणी फाडले, फोडले तेव्हां रावणाला एक घटकाभर मूर्छा आली. ॥ २० ॥ शुद्धीवर आल्यावर मग राक्षस क्रोधाने अगदी चिडला आणि अति घोर असे खड्ग त्याने बाहेर काढले व जटायूला बिलगला. ॥ २१ ॥ त्याने त्याचे पंख तोडले तेव्हां तो खग-पक्षी जटायू रामस्मरण करीत जमिनीवर पडला. त्याने खरोखर अद्‌भुत करणी केली. ॥ २२ ॥ रावणाने पुन्हां सीतेला उचलून रथांत घालून तो उतावीळपणाने अति भयभीत होऊन निघून गेला. ॥ २३ ॥ आकाशांतून जात असतां सीता विलाप करीत आहे व व्याधाच्या ताब्यांत सापडलेल्या हरिणी सारखी घाबरून गेली आहे. ॥ २४ ॥ तरीसुद्धा एका डोंगरावर कपीनां बसलेले पाहून सीतेने हरि हरि म्हणून आपले एकवस्त्र खाली टाकून दिले. ॥ २५ ॥ अशा रीतीने तो सीतेला घेऊन गेला लंकेत, आणि तिला अशोकवनांत सुरक्षित ठेवली. ॥ २६ ॥ सीतेला नाना प्रकारे प्रीति व भिती दाखवून तो खल हरला तेव्हां अशोक वृक्षाखाली व्यवस्था करून तिला ठेवली. ॥ दो० २९रा ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP