॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ बालकाण्ड ॥

अध्याय २९ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

झांजा मृदंग सणया बहुतर । ढोल दुंदुभी भेरी सुंदर ॥
सुंदर विविधा वाद्य-सुवादान । जिथं तिथं युवती-मंगल-गायन ॥
सखीं सहित हर्षित अति राणीं । सुकत साळि जणुं पडलें पाणी ॥
सुख जनकास काळजी जाउनि । तरतां दमत ठाव जणुं पावुनि ॥
श्रीहत होति भूप धनु तुटतां । दीप-तेज दिन जसें उगवतां ॥
येइ कसें सीतासुख वदतां । चातकि जणूं स्वातिजल मिळतां ॥
लक्ष्मण रामा निरखिति केवीं । विधुस चकोर-किशोरक जेवीं ॥
शतानंद आज्ञा तंव झाली । सीता रामाकडे निघाली ॥

दो० :- सवें सखी सुंदर चतुर गाती मंगल गीत ॥
चाले बाल-मराल-गति सुषमा अंगिं अमीत ॥ २६३ ॥

सीता स्वयंवर --
पुष्कळ व सुंदर झांजा, मृदुंग, सनया, शंख, ढोल, दुंदुभी, भेरी इत्यादी सुंदर विविध वाद्ये वाजू लागली व जिकडे तिकडे तरुण स्त्रिया मंगलगीते गाऊ लागल्या ॥ १-२ ॥ साळीचे पीक सुकून चालले असता पाऊस पडावा त्याप्रमाणे सर्व राण्या सखींसह हर्षित झाल्या. ॥ ३ ॥ पोहत असता थकून गेलेल्यास पायांखाली जमिन लागावी त्याप्रमाणे जणू जनकाची काळजी दूर झाली व त्यांस सुख झाले ॥ ४ ॥ दिवस उगवल्यावर दीपांचे तेज जसे नष्ट होते तसे धनुर्भंग होताच सर्व राजे तेजोहीन झाले ॥ ५ ॥ सीतेला जे सुख झाले ते शब्दांनी कसे सांगता येणार !(पण) जणूं चातकीला स्वातीचे पाणी मिळाले म्हणजे ती जशी सुखी होते तशी सीता सुखी झाली ॥ ६ ॥ चकोराच्या पिलाने चंद्राकडे पहावे तसे लक्ष्मण रामचंद्रास निरखून पहात आहेत ॥ ७ ॥ इतक्यात शतानंदांनी आज्ञा दिली त्यानुसार सीता रामांजवळ जाण्यास निघाली ॥ ८ ॥ सुंदर चतुर सखी तिच्याबरोबर असून त्या(समयोचित) मंगल गीते गात आहेत, सीता बालमरालीच्या गतीने चालत आहे व तिच्या अंगाची परम शोभा अमित-अपार आहे. ॥ दो० २६३ ॥

शोभे सीता सखि मधिं कैसी । छवि-गणमध्य महाछवि जैसी ॥
कर-सरोज-जयमाला सुंदर । विश्वविजय शोभा पसरे वर ॥
तन सलज्ज मन परमोत्साही । प्रेम गूढ ना कळे कुणाही ॥
जाइ समीप रामछवि पाही । चित्रलिखित कुमरी जणुं राही ॥
चतुर सखी जाणुनि समजावति । घाल गळां जयमाळ शुभा अति ॥
परिसुनि उचली माल युगल करिं । प्रेमविवश ती घालवे न परि ॥
शोभति जणुं युग जलज सनाल । शशिस सभय घालिति जयमाल ॥
गाती छवि अवलोकुनि आली । सिय जयमाल रामगळिं घाली ॥

सो. :- रघुवर-उरिं जयमाळ बघुनि विबुध वर्षति सुमन ॥
म्लान सकल भूपाळ बघुन भानु जणुं कुमुदगण ॥ २६४ ॥

सखीच्या मध्ये सीता कशी शोभते आहे (म्हणाल तर) छबिसमूहाच्या मध्यभागी महाछबी शोभावी तशी ॥ १ ॥ सुंदर करसरोजात सुंदर सरोज जयमाला आहे व तिच्यावर विश्वविजयाची शोभा पसरलेली आहे ॥ २ ॥ शरीर सलज्ज आहे पण मन अत्यंत उत्साही आहे (पण) तिचे गूढ प्रेम कोणाच्याही लक्षात येत नाही ॥ ३ ॥ ती जवळ गेली व रामाच्या छबीकडे तिने पाहीले (मात्र) तोच जणूं चित्रात काढलेल्या कुमारी सारखी (उभी) राहीली, टक लावून तटस्थ झाली ॥ ४ ॥ (सीतेची ती दशा) जाणून चतुर सखींनी समजावून सांगितले की अती सुंदर व शुभ अशी ती जयमाला घाल बघू (लवकर) ॥ ५ ॥ हे ऐकून सीतेने दोन्ही हातानी माळ वर उचलली खरी पण प्रेमविवश झाल्याने ती घालवेना. ॥ ६ ॥ देठासह दोन कमळे चंद्राला जयमाळ घालीत आहेत असे ते सुंदर दृश्य दिसत होते. ॥ ७ ॥ ती शोभा पाहून सखी त्या शोभेचे गान करु लागल्या (इतक्यात) सीतेने रामाच्या गळ्यात जयमाळ घातली ॥ ८ ॥ रघुवराच्या हृदयावर् रुळणारी ती जयमाला पाहून देवांनी पुष्पवृष्टी सुरु केली सुर्याला पाहून रात्रविकासी कमळे कोमेजून - मिटून जावीत तसे सर्व भूपालांचे समुदाय म्लान झाले ॥ दो० २६४ ॥

नभीं नगरिं बहु बाजे वाजति । खल उदास सब साधू राजति ॥
सुर किन्नर नर नाग मुनीश्वर । जयजय करिति देति आशीर्वर ॥
विबुध-वधू कल गाती नाचति । वारंवार सुमांजलि वाहति ॥
विप्र वेद-घोषा बहु करती । बंदी ब्रीदावलि उच्चरती ॥
महिं-पातालिं भरे यश नाकां । राम सिते वरि, मोडि पिनाका ॥
पुर-नर-नारी आरति करुनी । ओवाळति धन भान विसरुनी ॥
जोडा सीताराम सुचारू । एके स्थळिं शोभा-शृंगारू ॥
म्हणति सखी प्रभुपद धर सीते । स्पर्श न चरणां करि अति भीते ॥

दो० :- स्मरुनी गौतमनारि-गति लावि न पायां हात ॥
प्रीति अलैकिक बघुनि मनिं रघुकुलमणि हसतात ॥ २६५ ॥

आकाशात व नगरात विविध वाद्ये वाजू लागली खल दुर्जन दु:खी उदास झाले व सर्व साधुसंत विराजू लागले (प्रसन्न तेजस्वी दिसूं लागले). ॥ १ ॥ सुर, किन्नर, नर, व मुनिश्रेष्ठ अनेक वेळा जयजयकार करुन उत्तम आशीर्वाद देऊ लागले ॥ २ ॥ अप्सरा सुंदर नृत्यगायन करु लागल्या व देव वारंवार पुष्पांजली वाहू लागले ॥ ३ ॥ पुष्कळ विप्र वेद घोष करू लागले व बंदी ब्रीदावलिचा उच्चार करु लागले ॥ ४ ॥ पृथ्वी पाताळ व स्वर्ग या सर्व लोकात यश भरले की रामचंद्रांनी पिनाक मोडून सीता वरली ॥ ५ ॥ पुरनरनारींनी आरत्या करुन इतके धनादि ओवाळून टाकले की त्याचे भानही त्यांना राहीले नाही ॥ ६ ॥ सीता व राम हे जोडपे इतके सुंदर आहे जणूं शोभा व शृंगारच एके ठिकाणी आहेत असे वाटते. ॥ ७ ॥ सीतेच्या सखी तिला म्हणाल्या की सीते ! प्रभूचे पाय धर पाहूं ! पण ती स्पर्श करण्यास अतिशय भीत आहे ॥ ८ ॥ गौतमनारी अहल्येच्या गतीची आठवण झाल्याने सीता पायांना हात लावीत नाही. तिची ती अलौकिक प्रीती बघून रघुकुलमणी मनातल्या मनात खूप हसले ॥ दो० २६५ ॥

सीते बघुनि भूप लोलुभले । कुटिल कुपुत्र मूढ मनिं रुषले ॥
उठुनि घालुनी कवच अभागी । शेखी मिरविति जागोजागीं ॥
म्हणति हरुनि घ्या सीता कोणी । घ्या बांधा नृप बालक दोनी ॥
काम न भागे चाप भंगतां । वरि कुणि कुमरि जीत अम्हिं असतां ॥
जरि विदेह करि कांहिहि साह्या । जिंकु तया रणिं सह उभयां या ॥
ऐकुन वदले साधु भूप ते । राज-समाजा लाज लाजते ॥
बल प्रताप-वीरता-महती । नाक, पिनाका संगें गत ती ॥
तीच शूरता नव किं मिळाली । अशि मति तरी विधि मुखं करि काळीं ॥

दो० :- राम नयन भर पहा मद क्रोधेर्षा सोडून ॥
लक्ष्मण रोषानलिं महा व्हा न शलभ जाणून ॥ २६६ ॥

इतक्यात सीतेला पाहून भूपांना तिचा फार लोभ सुटला व ते कुटिल, कुपुत्र, मूढ मनांत रुष्ट झाले. ॥ १ ॥ त्या (अभाग्यांनी) भराभर उठून अंगावर चिलखते वगैरे चढविली व जागोजागी शेखी मिरवूं लागले ॥ २ ॥ सीतेला जबरीने ताब्यात घ्या, असे कोणी म्हणू लागले कोणी म्हणतात त्या दोन्ही नृपबालकांना बांधा, धरा ॥ ३ ॥ धनुष्य मोडले म्हणजे काम भागले की काय ? आम्ही चांगले जिवंत असता कुमारीला कोण वरणार ? ॥ ४ ॥ विदेहाने जरी काहीही साह्य केले तरी या दोघांसकट त्याला युद्धात जिंकून टाका ॥ ५ ॥ (त्या भूपांचे भाषण ऐकून) जे सज्जन राजे होते ते म्हणाले की राजसमाजाला लाज सुद्धा लाजली ॥ ६ ॥ तुमचे बल, प्रताप, वीरता, महती (प्रतिष्ठा) तुमची नाके जी काही होती ती गेली पिनाकाच्या बरोबर लयाला ॥ ७ ॥ तीच शूरता आहे की कुठून नवी मिळविली ? तुमची बुद्धी अशी आहे म्हणून तर विधात्याने तुमची तोंडें काळी केली. ॥ ८ ॥ मद, क्रोध व ईर्षा सोडून देऊन डोळे भरुन रामास पाहून घ्या व जाणून बुजून लक्ष्मणाच्या प्रबल रोषाग्नीत पतंग बनून पडू नका. ॥ दो० २६६ ॥

वैनतेय बलि काक कांक्षतो । ससा नागरिपु-भाग मागतो ॥
कांक्षि अकारण कोपी कुशला । शिवद्रोहि जशि संपद सकला ॥
लोभी लोलुप सुकीर्ति कांक्षिति । अकलंकिता किं कामी मिळविति ॥
वांछी हरिपद-विमुख परमगति । लालुच तुमची तशीच नरपति ॥
ऐकुनि गडबड सशंक सीता । सखिनीं राणी-सन्निध नीता ॥
राम सहज जाती गुरुपाशीं । वर्णित सीतास्नेह मनासी ॥
सीता राण्यांसहित विव्हळे । काय करी विधि आतां न कळे ॥
ऐकुनि नृपवच लक्षण फिरवित । दृष्टी, रामभयें ना बोलत ॥

दो० :- अरुण नयन भृकुटी कुटिल निरखिति नृपां सकोप ॥
मत्त गजगणां बघुनि जणुं हरिशावक साटोप ॥ २६७ ॥

गरुडाला दिलेला बळी खाण्याची इच्छा जशी कावळ्याने धरावी. हत्तीचा शत्रू - सिंह त्याचा भाग जशा सश्याने मागावा ॥ १ ॥ निष्कारण रागावणार्‍याने जसे कुशल इच्छावे व शिवाचा द्रोह करणाराने जशी सर्व प्रकारची संपत्ति मिळण्याची इच्छा करावी ॥ २ ॥ लोभी व लोलुप माणसाने विमल कीर्तीची इच्छा करावी किंवा कामी व्यक्तीने अकलंकिता मिळविण्याची इच्छा करावी, किंवा हरिपद - विमुखाने परमगतीची इच्छा करावी तशीच हे नरपतींनो, ही तुमची लालूच आहे ॥ ३-४ ॥ गडबड कानी येताच सीतेला भयाची शंका आली तेव्हा तिच्या सखींनी तिला राण्यांजवळ नेली ॥ ५ ॥ राम सहज (स्वभावानुसार) गुरुपाशी गेले (पण) मनात सीता - स्नेहाची प्रशंसा करीत ! ॥ ६ ॥ राण्यांसहित सीता व्याकुळ झाली, आता विधात्याच्या मनात काय करायचे आहे, कोणास ठाऊक ? ॥ ७ ॥ त्या दुष्ट नृपांचे बोलणे ऐकून लक्ष्मण आपली दृष्टी गरगर फिरवित आहेत (पण) रामभयाने (काही बोलू शकत नाहीत.) ॥ ८ ॥ डोळे लालीलाल झालेले आहेत, भृकुटी वक्र झाल्या आहेत व लक्ष्मण त्या नृपांकडे क्रोधाने निरखून पहात आहेत; जणूं मत्त हत्तीच्या कळपांना पाहून सिंहाच्या छाव्याला आवेश चढला आहे. ॥ दो० २६७ ॥

खळबळ बघुनि विकळ-पुरनारी । शिव्या देति सब भूपां भारी ॥
तदाच, परिसुनि शिव-धनु-भंग । आला भृगुकुल-कमल-पतंग ॥
पाहुनि महिप सकल संकुचले । श्येन-झडपिं जणुं लावे लपले ॥
गौर शरीर भूति विभ्राजे । भालिं विशाल तिपुंड्र विराजे ॥
शिरीं जटा शशिवदन सुशोभन । क्रोधें अरुण जरा दिसतें पण ॥
भृकुटि कुटिल लोचन रोषारुण । सहज बघति तरि जणुं संतापुन ॥
वृषस्कंध उर भुजा विशाला । जानवं चारु मृगाजिन माला ॥
कटिं मुनिवसन तूणयुग कसले । स्कंधिं परशु करिं शर धनु धरलें ॥

दो० :- शांतवेष करणी कठिण ना वर्णवे स्वरूप ॥
धृत-मुनि-तनु जणुं वीर रस प्राप्त जिथें सब भूप ॥ २६८ ॥

भार्गव दर्प विमर्दन --
)त्या कुटिल कुपुत्र मूढ नृपतींची ती) खळबळ पाहून सर्व पुरनारी भयाने व्याकुळ झाल्या व त्या सर्व भूपांना शिव्या देऊं लागल्या ॥ १ ॥ शिवधनुष्याचा भंग झालेला ऐकून त्यावेळी भृगुकुलरुपी कमलांचा पतंग - परशुराम तेथे आले ॥ २ ॥ त्यांना पाहताच सगळे महीप संकोचले की जणू ससाण्याच्या झडप घालण्याने लावे पक्षीच लपले ॥ ३ ॥ गौर शरीरावर भस्म विशेष शोभत आहे व विशाल कपाळावर त्रिपुंड विराजत आहे ॥ ४ ॥ बैलासारके खांदे (पुष्ट) असून छाती व बाहू विशाल आहेत सुंदर जानवे, मृगचर्म व माळ आहे ॥ ५ ॥ कमरेला वल्कले असून दोन भाते कसून बांधलेले, खांद्यावर परशु व हातात धनुष्य बाण आहेत ॥ ६ ॥ मस्तकावर जटा असून चंद्रमुख फार शोभायमान आहे पण क्रोधाने जरा लाल झालेले दिसत आहे ॥ ७ ॥ भुवया चढलेल्या व वक्र आहेत (त्यामुळे) त्यांनी सहज पाहीले तरी जणूं संतापून पहात आहेत असे वाटते. ॥ ८ ॥ वेष शान्त पण करणी कठिण आहे, ते स्वरुप वर्णन करता येत नाही. (परंतू) जणूं वीररसच मुनीदेह धारण करुन जिथे सकल भूप आहेत तिथे आला आहे.॥ दो०२६८ ॥

भृगुपति-वेषा भीषण पाहति । भय विव्हळ सब उठले क्ष्मापति ॥
तात नाम निजनामा वदती । सगळे दण्डप्रणाम करती ॥
हित मानुनि ज्या सहज पाहलें । भरले निज दिन तया वाटालें ॥
जनक येति मग मस्तक नमविति । आणुनि सीते प्रणाम करविति ॥
दे आशीर्वच, हर्ष सखींसी । सुज्ञ नेति निज समाजिं तिजसी ॥
येउनि विश्वामित्र भेटले । पद-सरोजिं युग बंधु घातले ॥
राम नि लक्ष्मण दशरथ-नंदन । आशिस दे छवि जोडी पाहुन ॥
होति बघत रामा स्थिर-लोचन । रूप अपार मार-मद-मोचन ॥

दो० :- विदेहासि मग बघुनि, अति गर्दि वदा कशि काय ॥
पुसती जाणुनि अज्ञसे व्यापि कोप सब काय ॥ २६९ ॥

भृगुपतीचा तो भीषण वेष पाहून सगळे भूपती भयाने व्याकुळ होऊन उठून उभे राहीले ॥ १ ॥ बापाच्या व आपल्या नांवाचा उच्चार करुन सगळे दण्डवत प्रणाम करू लागले ॥ २ ॥ परशुरामाने हित मानून ज्या कोणाकडे सहज पाहीले त्याला त्याला वाटू लागले की आपल्या आयुष्याचे दिवस भरले ॥ ३ ॥ नंतर जनकाने येऊन नमस्कार केला व सीतेला बोलावून तिच्याकडून प्रणाम करविला ॥ ४ ॥ (भृगुपतीने) सीतेला आशीर्वाद दिला (तेव्हा) सखींना हर्ष झाला व त्या सूज्ञ तिला आपल्या समाजात (राण्या वगैरेत) घेऊन गेल्या ॥ ५ ॥ (नंतर) विश्वामित्र येऊन भेटले व दोघा बंधूंना चरणकमलांवर घातले ॥ ६ ॥ (आणि म्हणाले की) हे दशरथ पुत्र राम आणि लक्ष्मण आहेत. भृगुपतीने ती शोभाढ्य जोडी पाहून आशीर्वाद दिला ॥ ७ ॥ रामास पाहताच भृगुपतीचे नेत्र स्थिर झाले व ते अपार रुप मदनाच्या मदाचा (सुद्धा) विनाश करणारे आहे ॥ ८ ॥ मग विदेहाला पाहून जाणत असून सुद्धा न जाणल्याप्रमाणे विचारतात की (ही) इतकी अतिशय गर्दी कशी काय जमली आहे ? सांगा (पण हे बोलताना) त्यांचे शरीर कोपाने व्यापले ॥ दो० २६९ ॥

सांगति जनक समाचारा तंव । जमला महिपति समाज ज्यास्तव ॥
तें ऐकुनि बघतांच पलिकडे । दिसले भूवर पिनाक-तुकडे ॥
अति रोषें वच कठोर सोडी । वद जड जनक! कोण धनु मोडी ॥
दाखव शीघ्र मूढ! अजि नातर । उलथिन भूमि राज्य तव जोंवर ॥
नृप अति भीत, न देई उत्तर । कुटिल महींपां मनीं हर्षभर ॥
सुर मुनि नाग नगर नर नारी । सकल सचिंत सभय मनिं भारी ॥
मनीं शोक सीता-मातेला । विधि बिघाडि संच किं जुळलेला ॥
श्रवुनि भृगुपतीस्वभाव सीते । अर्ध निमेष कल्प सम जाते ॥

दो० :- सभय विलोकुनि लोक सब जाणुनि जानकि भीरु ॥
हर्ष विषाद न हृदिं जरा वदले श्रीरघुवीरु ॥ २७० ॥

तेव्हा ज्याच्यासाठी महापतींचा समाज जमला तो समाचार जनकाने सांगितला ॥ १ ॥ तो ऐकून जरा पलिकडे पाहीले तो पिनाकाचे तुकडे जमिनीवर पडलेले आढळले ॥ २ ॥ (तेव्हा) अतिरोषाने कठोर भाषण (रुपी बाण) सोडले की हे मूर्ख जड जनका ! धनुष्य कोणी मोडले सांग. ॥ ३ ॥ (ज्याने धनुष्य मोडले) तो मूढ लवकर दाखव नाहीतर आज तुझे राज्य जेथवर आहे तितकी सगळी भूमी उलथून टाकीन ॥ ४ ॥ (जनक नृप अत्यंत भयभीत होऊन काहीच उत्तर देत नाही हे पाहून) सर्व कुटिल महिपांना मनात हर्षाचा भर आला ॥ ५ ॥ व सुर, मुनी, नाग व नगरातील स्त्री-पुरुष वगैरे सर्व चिंताग्रस्त होऊन मनात अतिशय भयभीत झाले आहेत. ॥ ६ ॥ सीता-माता सुनयना मनात चिंता करु लागली की चांगला जुळलेला सगळा संच विधात्याने बिघडून टाकला ॥ ७ ॥ भृगुपतीचा स्वभाव ऐकून सीतेला अर्ध निमेष कल्पासारखे जाऊ लागले ॥ ८ ॥ सगळे लोक भयार्त झाले आहेत असे पाहून व जानकी भयाने आर्त, खिन्न झाली आहे हे जाणून श्री रघुवीर बोलू लागले (पण) त्यांच्या हृदयात हर्ष किंवा विषाद जराही नाही ॥ दो० २७० ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP