॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय १२ वाDownload mp3

दो० :- त्या कलिकालीं वर्ष बहु कोसलिं राहुं खगेश ॥
पडे दुकाळ, विपत्तिवश केलें गमन विदेश ॥ १०४म ॥

(आता भुशुंडी त्या एका कलियुगातील आपले शूद्र जन्मातील चरित्र पुढे सांगतो) अहो पक्षीराज ! त्या कलिकालात मी पुष्कळ वर्षे अयोध्येत राहीलो, पण एकदा तेथे दुष्काळ पडला तेव्हा विपत्तीने ग्रस्त होऊन मी प्ररदेश गमन केले ॥ दो० १०४ म ॥

श्रुणु खगेश उज्जयिनी प्रति । म्लान दरिद्री दीन दुःखि अति ॥
जात काळ कांहीं संपत्ती । मिळे, लागलो करु शिवभक्ती ॥
विप्र एक वैदिक शिवपूजा । करी सदा उद्योग न दूजा ॥
परम साधु परमार्था विंदक । शंभु उपासक नहि हरिनिंदक ॥
मी त्या सेवीं कपटसमेत । द्विज दयालु अति नीति निकेत ॥
स्वामि ! बाह्य नम्रता बघुन मम । विप्र पढवि मजला पुत्रासम ॥
शंभु मंत्र मज देती द्विजवर । करिति विविध उपदेशहि सुंदर ॥
जपूं मंत्र शिवमंदिरिं जाउनि । हृदयीं दंभ अहं अति वाढुनि ॥

दो० :- मी खल मलसंकुलमति नीच जाति वश मोह ॥
द्विज हरिजन बघुनी जळे करीं विष्णुचा द्रोह ॥ १०५रा ॥
सो० :- गुरु मज करती बोध दुःखि बघुनि आचरण मम ॥
मज अति उपजे क्रोध रुचे दांभिका नीति कशि ॥ १०५म ॥

हे खगेश ऐक, मी अति उदास, अति दरिद्री, अति दीन, व अति दु:खी होऊन उज्जयिनीला गेलो ॥ १ ॥ काही काळ गेल्यावर काही संपत्ती मिळाली तेव्हा पुन्हा शिवभक्ती करु लागलो ॥ २ ॥ तेथे एक वैदिक ब्राह्मण होता, तो वेदविधीयुक्त सदा शिवपूजा करीत असे (त्याशिवाय) त्याला दुसरा उद्योगच नव्हता ॥ ३ ॥ तो परम साधु व परमार्थ जाणणारा होता, शिवाय उपासक होता, पण श्रीहरीची निंदा करणारा नव्हता ॥ ४ ॥ मी त्याची सेवा कपटाने करु लागलो (पण तो फार भोळा !) तो ब्राह्मण फार दयाळू व नीतीचे माहेरघरच होता. ॥ ५ ॥ अहो स्वामी ! माझी दिखाऊ नम्रता पाहून तो ब्राह्मण मला पुत्रासारखा मानून शिकवूं लागला ॥ ६ ॥ त्या द्विजश्रेष्ठाने मला शिवमंत्र दिला आणि सुंदर प्रकाराने खूप उपदेश केला ॥ ७ ॥ मी शिवमंदिरात जाऊन (तेथे बसून) मंत्राचा जप करीत असे, परंतु मनांत दंभ व अहंकार फार बळावला ॥ ८ ॥ मी स्वभावानेच दुष्ट, त्यात नीच व माझी बुद्धी पापानी भरलेली त्यामुळे मी मोहवश होऊन विष्णुभक्त व ब्राह्मण द्रुष्टीस पडताच जळत असे आणि विष्णुचा द्रोह करीत असे. ॥ दो० १०५ रा ॥ माझे आचरण पाहून गुरुजींना दु:ख होई व ते मला उपदेश करीत असत परंतु (तो ऐकून) मला फार क्रोध येत असे, कारण की दांभिकाला नीती कशी आवडणार ? ॥ दो० १०५ म ॥

एक वार गुरु हांक मारती । मजला विविधा नीति शिकवती ॥
शिव सेनेचें पुत्र ! हेंच फळ । अविरल भक्ति रामपदिं निर्मळ ॥
तात ! भजति रामा शिव धाता । नरा पामरा काय किं वार्ता ॥
यच्चरणीं अज शिव अनुरागी । तद् द्रोहें सुख बघसि अभागी ? ॥
गुरु हरास हरिसेवक वदले । श्रवुनि खगेश हृदय मम जळलें ॥
अधम जाति मी विद्या मिळतां । होइं जसा पय अहिस पाजतां ॥
मानी कुटिल कुभाग्य कुजाती । गुरुचा द्रोह करीं दिन रातीं ॥
अति दयालु गुरु जरा क्रोध नहि । पुनः पुन्हां मज करिति सुबोध हि ॥
ज्यानें नीच महत्वा चढतो । प्रथम तयाचा करी नाश तो ॥
धूम अनल संभव खग ! जो तो । विझवि तयाला जैं घन होतो ॥
रज पथिं पतित अनादृत राही । सर्वांच्या पदलत्ता साही ॥
मरुत उडवितां प्रथम तया भरि । मग नृपनयनिं भरे मुकुटावरि ॥
श्रुणु खगपति बघुनि या प्रसंगा । बुध न करिति अधमाच्या संगा ॥
कवि कोविद अशि गाती नीती । कलह खला न भला ना प्रीती ॥
त्यास उदास सदाच रहावें । दुरुन खलां श्वानसे त्यजावे ॥
मी खल हृदयीं कपट कुटिलता । गुरु हित वदतां रुचे न चित्ता ॥

दो० :- एक वार हरमंदिरीं करितां जप शिवनाम ॥
गुरु आले, मी मदें कृत उठुनी नहि प्रणाम ॥ १०६रा ॥
कांहिं दयाल न बोलले उरिं न रोष लवलेश ॥
अति अघ गुरु अपमान तो सहुं शकले न महेश ॥ १०६म ॥

एकदा गुरुजींनी मला हाक मारली आणि अनेक प्रकारे नीती शिकवूं लागले ॥ १॥ अरे पुत्रा ! श्रीरामचरणीं प्रगाढ निर्मळ भक्ती हेच तर शिवसेवेचे फळ आहे ॥ २ ॥ शंकर व ब्रह्मदेव श्रीरामास भजतात मग पामर मनुष्याची कथा ती काय ? ॥ ३ ॥ अरे अभाग्या ! ब्रह्मदेव व शंकर ज्यांच्या चरणीं प्रेम करतात त्यांचा द्रोह करुन सुख मिळवूं पाहतोस ? ॥ ४ ॥ गुरुंनी शंकरास हरिसेवक म्हटले ते ऐकून अहो पक्षीराज ! माझ्या हृदयाची आग झाली ॥ ५ ॥ मी नीच जातीचा असल्यामुळे विद्या प्राप्त होताच मी असा झालो की दूध पाजल्याने जसा सर्प होतो ॥ ६ ॥ मी मानी, कुटील, दुर्भागी व हलक्या जातीचा असल्यामुळे मी रात्रंदिवस गुरुचा द्रोह करुं लागलो ॥ ७ ॥ गुरु दयाळू होते त्यामुळे त्यांना कधी जरा सुद्धा क्रोध आला नाही. तर उलट ते मला पुन:पुन्हा सदुपदेशच करीत असत. ॥ ८ ॥ ज्याच्या योगाने नीच महत्वास चढतो त्याचाच तो प्रथम नाश करतो ॥ ९ ॥ अग्नी पासून उत्पन्न झालेला धूर तो हे खगा ! मेघ बनताच अग्नीला विझवतो ॥ १० ॥ धूळ रस्त्यात अपमान सहज करीत पडलेली असते व सगळ्यांच्या लाथा खात असते. ॥ ११ ॥ पण वार्‍याने तिला उडवली की प्रथम ती त्याच्यात भरते आणि (त्या देशाच्या) राजाच्या सुद्धा डोळ्यात व मुकुटावर बसते ॥ १२ ॥ खगपती ! ऐक अशा या प्रसंगास पाहून शहाणे लोक नीचांची संगती करीत नाहीत. ॥ १३ ॥ कवी आणि पंडित अशी नीती सांगतात की दुर्जनांशी कलह करणेही चांगले नाही व प्रीती करणेही चांगले नाही ॥ १४ ॥ त्यांच्याशी नेहमीच उदासीन रहावे, आणि कुत्र्यांसारखा त्यांचा दुरुनच त्याग करावा. ॥ १५ ॥ मी दुष्ट माझ्या हृदयात कपट व कुटिलपणा भरलेला त्यामुळे गुरु माझे हित सांगत असता माझ्या मनाला रुचत नसे. ॥ १६ ॥ एके दिवशी मी शिवमंदिरात शिवनामजप करीत असता गुरु आले पण मी गर्वामुळे उठून नमस्कार केला नाही ॥ १०६ रा ॥ दयालु गुरु काहीही बोलले नाहीत व त्यांना तिळमात्र रागसुद्धा आला नाही, पण ते अत्यंत पाप, तो गुरुचा अपमान महेश सहन करुं शकले नाहीत ॥ दो० १०६ म ॥

मंदिरींच झाली नभवाणी । रे हतभाग्य अज्ञ अभिमानी ॥
यद्यपि तव गुरुला ना क्रोध । अति कृपालु मन सम्यक बोध ॥
देतो तदपि शाप शठ तुजला । नीति विरोध न रुचतो मजला ॥
खल तुज मी जर करीन दंड न । श्रुतिमार्गा मम होईल खंडन ॥
जे शठ गुरुशीं ईर्ष्या करती । रोरव नर्कि कोटि युग पडती ॥
तिर्यग् योनिं जन्म मग पावति । अयुत जन्मभर पीडा पावति ॥
अजगर इव पापी ! बसलासी । खल अघमयमति भुजंग होसी ॥
महाविटपकोटरांत जाउनि । बस, अधमाधम अधगति पाउनि ॥

दो० :- करिती हाहाकार गुरु श्रवुनि घोर शिवशाप ॥
मजला कंपित बघुनि अति उरिं उपजे परिताप ॥ १०७रा ॥
करुनी प्रेमें दंडवत जोडुनि शिवास हात ॥
बघुनि घोर मम गती, स्तुति द्विज गद्‌गद करतात ॥ १०७म ॥

त्या शिवमंदिरातच आकाशवाणी झाली की रे हतभाग्या ! मूर्खा ! गर्विष्ठा ! जरि तुझ्या गुरुला क्रोध नाही ते अति कृपालु मनाचे आहेत आणि यथार्थ ज्ञानी आहेत.॥१-२॥ तरी रे शठा ! मी तुला शाप देतो कारण की मला नीती विरोध मुळीच आवडत नाही ॥ ३ ॥ रे दुष्टा ! मी जर तुला दंड केला नाही तर माझ्या वेदमार्गाचे खंडन होईल ॥ ४ ॥ जे शठ गुरुशी ईर्षा करतात ते कोटीयुगे रौरव नर्कात पडतात ॥ ५ ॥ मग कृमी कीटादि तिर्यग, योनीत जन्माला जातात आणि दहा हजार वर्षे पीडा भोगतात ॥ ६ ॥ अरे पाप्या ! तू (गुरुच्या समोर) अजगरासारखा बसून राहीलास, रे दुष्टा, तुझी बुद्धी पापमय आहे, तू भुजंग (अजगर) होशील जा. ॥ ७ ॥ अरे, अधमाहून अधमा ! या अधोगतीला पावून महावृक्षाच्या ढोलीत जाऊन रहा. ॥ ८ ॥ घोर शिवशाप ऐकून गुरुंनी हाहाकार केला आणि मी थरथर कापत आहे असे पाहून त्यांच्या हृदयात विषाद उत्पन्न झाला.॥ दो० १०७ रा ॥ प्रेमाने शंकरास दण्डवत करुन आणि हात जोडून ते विप्र गुरु माझ्या घोर गतीचा विचार करुन गद्गद् कंठाने शिवस्तुती करु लागले ॥ दो० १०७ म ॥

नमामीशमीशान निर्वाणरूपं । विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं ॥
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं । चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं ॥
करालं महाकालकालं तुरीयं । गिराज्ञानगोतीतमीशं गिरिईशं ॥
तुषाराद्रिसंकाशगौरं गभीरं । मनोभूत कोटिप्रभा श्रीशरीरं ॥
स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगंगा । लसद्‌भालबालेंदु कंठे भुजंगा ॥
चलत्कुंडलं भ्रू सुनेत्रं विशालं । प्रसन्नाननं नीलकंठ दयालं ॥
मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं । प्रियं शकरं सर्वनाथं भजामि ॥
प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं । अखंडं अजं भानुकोटिप्रकाशं ॥
त्रयःशूलनिर्मूलनं शूलपाणिं । भजेहं भवानीपतिं भावगम्यं ॥
कलातीत कल्याण कल्पांतकारी । सदा सज्जनानंद दाता पुरारी ॥
चिदानंद संदोह मोहापहारी । प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी ॥
न यावद् उमानाथ पादारविंदं । भजंतीह लोक परे वा नराणां ॥
न तावत्सुखं शांति सन्तापनाशं । प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासं ॥
न जानामा योगं न जपं नैव पूजां । नतोऽहं सदा सर्वदा शंभु तुभ्यं ॥
जरा जन्म दुःखौघ तातप्यमानं । प्रभो पाहि आपन्नमामीश शंभो ॥
श्लोक० :- रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरतोषये ॥
ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शंभु प्रसीदति ॥ १ ॥

दो० :- श्रवुनि विनति सर्वज्ञ शिव बघुनि विप्र अनुराग ॥
मंदिरिं नभवाक् झाली, हे द्विजवर वर माग ॥ १०८रा ॥
प्रभु मजवरी प्रसन्न जर स्नेह दिनावर नाथ ? ॥
प्रभुपदिं देउनि भक्ति मज, द्या दुसरा वर तात ॥ १०८म ॥
प्रभु तव मायावश फिरे सदा भुलुनि जड जीव ॥
कोप न करणें त्यावरि भगवान् करुणाशीव ॥ १०८चं ॥
शंकर दीनदयाल व्हा यावर नाथ ! कृपाल ॥
शापानुग्रह होइ कीं अल्पचि जातां काल ॥ १०८द्र ॥

रुद्राष्टक - मोक्षस्वरुप, सर्वशक्तीमान, व्यापक, ब्रह्म, ज्ञानस्वरुप, ईशान्य दिशेचे स्वामी हे ईशान ! मी आपल्याला नमस्कार करतो. चिरस्थायी, सर्वगुणातीत, निर्विकल्प, इच्छारहित, चिदाकाशरुप, आकाशाचा वास ज्यांच्यात आहे व ज्यांचा वास आकाशात आहे, अशा तुम्हांला मी भजतो शरण आलो आहे ॥ १ ॥ निराकार ओंकाराचे मूळ, तुरीय, वाणी मन व इंद्रिये यांच्या पलिकडे असलेले, ईश, कैलासगिरीचे स्वामी, महाकराल, काळाचेही काळ, कृपाळू, गुणांचे माहेरघर, संसाराच्या पार असलेले, आणि संसाराचा अंत करणारे, हे महाकाल मी तुम्हांला नमस्कार करतो ॥ २ ॥ जे हिमालयासारखे गौरवर्ण व गंभीर आहेत, ज्यांचे शरीर कोटी मदनांसारखे तेजस्वी व सुंदर आहे, ज्यांच्या प्रकाशमान मस्तकावर जटा कलापांवर तरंगयुक्त अशी सुंदर गंगा आहे व ज्याच्या ललाटावर बाल चंद्रमा व कंठात भुजंग शोभत आहेत त्या शंकरास मी भजतो. ॥ ३ ॥ ज्यांच्या कानातील कुंडले डोलत आहेत, ज्यांच्या भुवया व सुंदर नेत्र विशाल आहेत, जे प्रसन्न मुख, नीलकण्ठ व दयालु आहेत, ज्यांनी व्याघ्रचर्म हेच वस्त्र धारण केले आहे, व गळ्यात मुंडमाळा आहेत त्या प्रिय कल्याण करणार्‍या व सर्वांचे नाथ असलेल्या शंकरास मी भजतो ॥ ४॥ खवळलेले, उत्कृष्ठ, निश्चयी, परमेश्वर, अखंड, अजन्मा, कोटी सूर्यासारखे दैदिप्यमान, तिन्ही प्रकारच्या शूलांचे निर्मूलन करणारे, हातात त्रिशूल धारण केलेले, व भावभक्तीनेच ज्याची प्राप्ती होऊ शकते अशा भवानी पतीला मी भजतो ॥ ५ ॥ कलांच्या पलिकडे असलेले, कल्याण करणारे, कल्पान्त करणारे, सज्जनांना संतांना सदा आनंद देणारे, त्रिपुरासुरांचे शत्रु, सच्चिदानंदघन, मोहहरण करणारे, आणि मदनाचे शत्रू ! हे प्रभो ! आपण प्रसन्न व्हा. ॥ ६ ॥ जोपर्यंत उमापतीच्या चरण्कमलांचे भजन मनुष्य करीत नाही, तोर्यंत त्यांना इहलोकात किंवा परलोकात सुखशांती मिळत नाही. कारण त्यांच्या त्रिविधतापांचा नाश होत नाही म्हणून सर्व भूतांच्या हृदयात निवास करणार्‍या हे प्रभो ! आपण प्रसन्न व्हा. ॥ ७ ॥ मी योग जाणत नाही की जप जाणत नाही किंवा मला तुमची पूजा करणे माहीत नाही, हे शंभु ! सदा सर्वदा फक्त आपल्याला नमस्कार करीत असतो. हे प्रभो ! हे परमेश्वरा ! हे शंभो ! वृद्धपणा, जन्म इत्यादि दु:खाच्या प्रवाहात सतत जळत असलेल्या मला आपत्तीत पडलेला वाचवा (माझे रक्षण करा) ॥ ८ ॥ विप्राने हराला संतुष्ट करण्यासाठी म्हटलेले हे रुद्राष्टक जे मनुष्य भक्तीने पठण करतील ते त्यांच्यावर शंभु प्रसन्न होतील . ॥ श्र्लोक १ ॥ सर्वज्ञ शिवानी प्रार्थना ऐकून विप्राचा अनुराग पाहीला आणि त्या मंदिरात आकाशवाणी झाली की हे विप्रश्रेष्ठा वर माग ॥ दो० १०८ रा ॥ (विप्र म्हणला) प्रभो, आपण जर माझ्यावर प्रसन्न आहांत आणि नाथ जर या दीनावर आपला स्नेह आहे तर प्रभु मला तुमच्या चरणी भक्ती देऊन तात ! दुसर वर द्या. ॥ दो० १०८ म ॥ प्रभो ! जडमूढ जीव तुझ्या मायेला वश होऊन भुलुन जाऊन सदा फिरत असतो तरी हे करुणाशीव ! भगवंता ! त्याच्यावर आपण कोप करुं नये ॥ दो० १०८ चं ॥ दीनांवर दया करणार्‍या कल्याणकारी शंकरा ! कृपाला ! नाथ ! आता आपण यावर कृपा करा. की थोडाच काळ गेल्यावर शापानंतर अनुग्रह होईल. ॥ दो० १०८ द्र ॥

हा पावेल परम कल्याणा । असें करावें कृपानिधाना ॥
द्विजवच परहितपूर्ण ऐकुनी । एवमस्तु झाली नभवाणी ॥
दारुण पाप जरी कृत यानें । दिला शाप मी जरि कोपानें ॥
तरि ही तुमची बघुनि साधुता । क्रृपा विशेष करिन यावरतां ॥
क्षमाशील जे परोपकारी । द्विज ते प्रिय मज यथा खरारी ॥
द्विज ! मम शाप वृथा ना जाइल । जन्म हजार नक्किं या मिळतिल ॥
दुःसह दुःख जन्मतां मरतां । यास न होइल जराहि आतां ॥
नाश न कवणहि जन्मीं ज्ञाना । ऐक शूद्र मम वचा प्रमाणा ॥
रघुपतिपुरीं जन्म तव झाला । मम भजनीं लाविलें मनाला ॥
अनुग्रहें मम, पुरीप्रभावें । रामभक्ति तव हृदयिं उद्‍भवे ॥
तात, सत्य हें श्रुणु मम भाषण ॥ द्विजसेवा हें व्रत हरितोषण ॥
आतां कर न विप्र अपमान हि । जाण किं संत अनंत समान हि ॥
इंद्रकुलिश मम शूल विशालहि । कालदंड हरिचक्र कराल हि ॥
मारुनि यानीं जो ना मरतो । द्विजद्रोहपावकिं तो जळतो ॥
हा विचार मनिं ठेव सदा ही । मग तुज जगिं दुर्लभ ना काहीं ॥
मम आशीर्वच एक आणखी । अप्रतिहत गति होइल तव कीं ॥

दो० :- ऐकुनि शिववच मुदित गुरु एवमस्तु वदतात ॥
मला प्रबोधुनि जाति गृहिं शंभुचरण हृदिं ध्यात ॥ १०९रा ॥
विंध्य पर्वतीं जाहलो काळगतीनें व्याळ ॥
अनायस ती त्यक्त तनु जातां काहीं काळ ॥ १०९म ॥
जी जी तनुधृत जी त्यजिलि अनायास हरियान ॥
पट नूतन नेसुनि जसे नर परिंहरति पुराण ॥ १०९चं ॥
श्रुतिनीती रक्षित शिवें अल्प न मजला क्लेश ॥
धरतां बहु तनु यापरीं ज्ञान न नष्ट खगेश ॥ १०९द्र ॥

हे कृपानिधाना ! हा परम कल्याण पावेल असे आपण करावे ॥ १ ॥ परहिताने भरलेले असे ते ब्राह्मणाचे वचन ऐकून ‘ एवमस्तु ’ अशी आकाशवाणी झाली ॥ २ ॥ जरी याने घोर पाप केले आणि मी जरी कोपाने शाप दिला असला तरीसुद्धा तुमचा साधुपणा पाहून (तुमच्यासाठी) मी आता यावर विशेष कृपा करतो ॥ ३-४ ॥ हे द्विज ! जे क्षमाशील आणि परोपकारी असतात ते मला खरारी रामचंद्रासारखे प्रिय वाटतात ॥ ५ ॥ हे विप्रा माझा शाप व्यर्थ जाणार नाही याला हजार जन्म नक्की घ्यावे लागतील ॥ ६ ॥ पण जन्मताना व मरताना दु:सह दु:ख होते ते आता याला जरा सुद्धा होणार नाही ॥ ७ ॥ कोणत्याही जन्मात ज्ञानाचा नाश होणार नाही. असे शूद्रा माझे प्रमाणभूत – सत्य वचन ऐक ॥ ८ ॥ रघुपती पुरीत तुझा जन्म झाला आणि तेथे तू माझ्या भजनात मन लावलेस ॥ ९ ॥ त्या पुरीच्या प्रभावाने व माझ्या अनुग्रहाने तुझ्या हृदयात रामभक्ती उत्पन्न होईल ॥ १० ॥ अरे बाबा, मी तुला सत्य सांगतो ते ऐक, ब्राह्मणाची सेवा हे श्रीहरीला संतुष्ट करणारे व्रत आहे ॥ ११ ॥ आता (यापुढे पुन्हा कधी) विप्रांचा अपमान करु नकोस आणि संत अनंतासारखे आहेत हे ध्यानात ठेव. ॥ १२ ॥ इंद्राचे व्रज, माझा विशाल शुल आणि श्रीहरीचे करालचक्र यांनी मारुन सुद्धा जो मरत नाही तो ब्राह्मण – द्रोहरुपी पावकांत जळतो ॥ १३–१४ ॥ हा विचार नेहमी मनात बाळग म्हणजे तुला या जगात दुर्लभ असे काही नाही. ॥ १५ ॥ माझा आणखी एक आशीर्वाद आहे की तुझी अप्रतिहत (अकुंठित) होईल ॥ १६ ॥ शिवाचे वचन ऐकून गुरुंना आनंद झाला व तेही तथास्तु असे म्हणाले व मला उपदेश करुन शंभु चरणांचे हृदयात ध्यान करीत घरी गेले ॥ दो० १०९ रा ॥ काळगतीने मी विध्य पर्वतात सर्प झालो व काही काळ गेल्यवर काही कष्ट न पडताच तो सर्प देह मी सोडला ॥ दो० १०९ म ॥ हे हरिवाहना ! जसे मनुष्य नवे वस्त्र नेसून जुन्या वस्त्राचा आनंदाने त्याग करतात त्या प्रमाणे मी जो जो देह धरला तो तो काही श्रम न पडता सोडला ॥ दो० १०९ चं ॥ शंकरांनी वेदमर्यादेचे रक्षण केले आणि मलाही जरासुद्धा क्लेश झाले नाहीत. या प्रमाणे मी पुष्कळ देह धारण केले तरी हे पक्षीराज माझे ज्ञान नष्ट झाले नाही ॥ १०९ द्र ॥

तिर्यक् सुर नर जी जी तनुधरुं । तिथें रामभजनातें अनुसरुं ॥
एक शूळ विसरलो न अंमळ । श्रीगुरुचा सुस्वभाव कोमळ ॥
चरम देह विप्राचा मिळला । सुरदुर्लभ निगमागमिं कथिला ।
खेळुं तिथें पण बालकमेळीं । करत सकल रघुनायककेली ।
होतां प्रौढ पिता मज पढवित । ऐकुं, विचारें कळे, नावडत ॥
मनोवासना एक न जागे । केवळ रामचरणिं लय लागे ॥
कोण असा जगिं नाथ ! अभागी । खरी सेवि सुरधेनु त्यागी ॥
प्रेममग्न मज काहिं न रुचलें । मला पढवितां पिता हि थकले ॥
होति कालवश जैं पितृजननी । जनपालकभजनास गत वनीं ॥
जिथें जिथें वनिं मुनिवर दिसले । आश्रमिं जाउनि त्यां शिर नमलें ॥
पुसत तयांस रामगुणगाथा । वदति ऐकुं हर्षित खगनाथा ॥
ऐकत फिरुं हरिगुणानुवादां । अव्याहत गति शिवप्रसादां ॥
त्रिविध एषणा गेल्या गाढ । हृदिं अति एक लालसावाढ ॥
रामचरणवारिज जैं देखूं । तैं निज जन्मसफलता लेखूं ॥
ज्यां पुसतो ते कथिति किं मुनिवर । सर्व भूतमय आहे ईश्वर ॥
निर्गुण मत मजला न आवडे । ब्रह्मिं सगुण रति हृदयिं अति जडे ॥

दो० :- लागे रघुपतिचरणिं मन स्मरुनी गुरुवचनास ॥
गात रामयश फिरूं, नव प्रीती क्षणोक्षणास ॥ ११०रा ॥

खगमृगादि तिर्यग् योनीत किंवा देव मनुष्यादि जो जो देह धारण केला त्या त्या देहात मी रामभजन करीत राहीलो ॥ १ ॥ मात्र एका शूलाचा मला कधीही विसर पडला नाही, तो हा की माझ्या श्रीगुरुंचा स्वभाव अति कोमल (व मी त्याच्याशी केलेले दुर्वर्तन !) ॥ २ ॥ शेवटचा देह (या काक देहापूर्वीचा) मला ब्राह्मणाचा मिळाला, जो देवांना सुद्धा दुर्लभ आहे, असे वेद पुराणे सांगतात ॥ ३ ॥ त्या देहात सुद्धा बालकात मिळून खेळत असे, पण श्रीरघुनायकाच्याच सर्व लीला करीत असे. ॥ ४ ॥ मी जरा मोठा झाल्यावर माझे वडील मला शिकवायला लागले ते मी श्रवण करीत असे, व विचाराने ते मला समजतही असे, पण ते शिकणे मला मुळीच आवडत नसे ॥ ५ ॥ माझ्या मनात एकही वासना उठेनाशी झाली व केवळ श्रीरामचरणीच लक्ष लागून राहीले ॥ ६ ॥ हे नाथ ! असा कोण अभागी आहे या जगात की कामधेनुचा त्याग करुन जो गाढवीची सेवा करील ? ॥ ७ ॥ रामप्रेमात मग्न झालेल्या मला काहीच सुचले नाही, शेवटी माजे वडील मला शिकवून शिकवून थकले (व त्यांनी मला शिकवणे सोडून दिले). ॥ ८ ॥ पिता व माता मरण पावल्यावर मी दास रक्षण करणार्‍या भगवंताच्या भजनासाठी वनात गेलो ॥ ९ ॥ वनात जेथे जेथे कोणी मुनीश्रेष्ठ दिसतील तेथे जाऊन त्यांना नमस्कार करीत असे ॥ १० ॥ व त्यांना रामगुणकथा विचारीत असे व ते जे सांगत ते आनंदाने श्रवण करीत असे ॥ ११ ॥ या प्रमाणे श्रीहरीच्या गुणानुवादाचे श्रवण करीत मी फिरत असे कारण की शिवाच्या प्रसादाने मला आता कुठेही जाता येत असे (गति अकुंठित होती व आहे) ॥ १२ ॥ तीनही प्रबल एषणा (पुत्र – वित्त – सत्ता लोकेषणा) नष्ट झाल्या आणि हृदयात एकच लालसा फार वाढली की ॥ १३ ॥ श्रीरामांच्या चरण कमलांचे दर्शन होईल तेव्हाच खर्‍या अर्थाने जन्म सफल होईल. ॥ १४ ॥ ज्या मुनीवरांना (सगुण साक्षात्काराचे साधन) विचारावे ते सर्व हेच सांगत की ईश्वर सर्व भूतमय आहे ॥ १५ ॥ पणे हे निर्गुण मत मला मुळीच आवडेना कारण की सगुण ब्रह्माची आवड माझ्या हृदयात फारच जडली होती. ॥ १६ ॥ श्री गुरुंच्या वचनांचे स्मरण करुन माझे मन श्रीरघुपतीचरणी लागले, श्रीरामयश गात गात मी फिरुं लागलो. व क्षणो क्षणी प्रीती अधिकाधिक वाढूं लागली. ॥ दो० ११० रा ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP