॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय १७ वा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

करणि पितृहिताकृत जशि भरतें । लाखमुन्हींहि न ती सांगवते ॥
बघुनि दिवस शुभ मुनिवर आले । सचिव महाजन सकल आणविले ॥
राजसभें बसले सब जाउनि । भरत संबंधु घेति बोलावुनि ॥
भरता निकट वसिष्ठ बसविती । नीति-धर्ममय वचन बोलती ॥
मुनिवर वदले प्रथम कहेसी । कैकयि-करणी कुटिल करि जशी ॥
नृप-धर्मव्रत सत्य हि वानिति । त्यजुन तनुस जे प्रेम निभाविति ॥
वदत राम-गुण-शिला-स्वभावा । लोचनिं सजल पुलक मुनिरावा ॥
लक्ष्मण-सिता प्रीति मग वानुनि । स्नेहिं शोकिं बडले ज्ञानी मुनि ॥

दो० :- पहा भरत भावी प्रबल कथित विकल मुनिनाथिं ॥
हानि लाभ जीवन मरण यश अपयश विधिहातिं ॥ १७१ ॥

पित्याच्या कल्याणासाठी भरताने जरी क्रिया केली ती लाख मुखांनी सुद्धा वर्णन करुन सांगता येत नाही सांगता येणार नाही ॥ १ ॥ शुभ दिवस पाहून मुनीश्रेष्ठ वसिष्ठ आले आणि सचिव महाजन व इतर सगळे सभासद यांना बोलावून आणले ॥ २ ॥ सर्व मंडळी राजसभेत जाऊन बसली तेव्हा ( वसिष्ठांनी) भावांसह भरतास बोलावून घेतले ॥ ३ ॥ ( भरत आल्यावर) वसिष्ठांनी भरतास आपल्याजवळ बसविले आणि नीतीमय व धर्ममय भाषणास प्रारंभ केला ॥ ४ ॥ प्रथम मुनीवर वसिष्ठांनी कैकेयीने कुटील करणी जशी केली ती सर्व कथा सांगितली ॥ ५ ॥ ( नंतर) शरिराचा त्याग करुन ज्यानी आपल्या प्रेमाचा निर्वाह केला त्या दशरथ राजांचे धर्मव्रत व सत्यव्रत यांची प्रशंसा केली ॥ ६ ॥ रामचंद्रांच्या ( रुप) गुण, शील स्वभावाचे वर्णन करताना डोळ्यांत पाणी आले व अंगावर रोमांच उठले ॥ ७ ॥ मग लक्ष्मण व सीता यांची रामप्रीती वाखाणून ज्ञानीमुनी स्नेह व शोक यांत बुडले ( मग्न तटस्थ झाले) ॥ ८ ॥ ( नंतर काही वेळाने) मुनीनाथांनी व्याकुळ होऊन सांगीतले की हे पहा ! भरत ! भावी प्रबल असते आणि हानी, लाभ, जीवन - मरण, यश - अपयश इ. गोष्टी विधीच्या हाती असतात ॥ दो० १७१ ॥

हें जाणुनि कोणा द्या दोषा । वृथा कुणावर करंएं रोषा ॥
तात ! विचार करुनि मनिं पाही । शोचनीय नृप दशरथ नाहीं ॥
शोच्य विप्र जो वेद-निहीन । त्यजुनी स्वधर्म विषयीं लीन ॥
शोच्य नृपति जो नीति न जाणत । प्रजा प्राणशी प्रिय ना वाटत ॥
वैश्य कृपण धनवान शोच्य तो । जो न अतिथि-शिव-भक्ति जाणतो ॥
शूद्र विप्र अपमानी शोच्य तो । मानी ज्ञानगर्विं बहु वदतो ॥
सोचनीय पतिवंचक नारी । कुटिल कलहरत इच्छाधारी ॥
ब्रह्मचर्य जो व्रत ना पाळी । शोच्य किं बटु गुर्वाज्ञा टाळी ॥

दो० :- शोच्य गृहीं जो मोहवश कर्मपथाला त्यागि ।
शोच्यहि यती प्रपंच-रत जो न विवेकि विरागी ॥ १७२ ॥

हे जाणून कोणाला दोष द्यावा व कोणावर वृथा क्रोध करावा ॥ १ ॥ तात ! मनात विचार करुन पहा ( म्हणजे कळेल) की राजा दशरथ शोचनीय नाहीत ॥ २ ॥ जो विप्र वेदविहीन असेल ( वेद - पठन केलेले नसेल) व स्वधर्माचा त्याग करुन विषयांत मग्न असेल तो शोच्य - शोक करण्याजोगा आहे ॥ ३ ॥ जो राजनीती जाणत नाही व ज्याला प्रजा प्राणासारखी प्रिय वाटत नाही तो राजा सोच्य आहे ॥ ४ ॥ जो वैश्य धनवान असून कृपण आहे आणि अतिथीभक्ती व शिवभक्ती जाणत करत नाही तो शोच्य होय ॥ ५ ॥ जो शूद्र ब्राह्मणांचा अपमान करतो, ज्याला ज्ञानाचा गर्व आहे जो मानी आहे, आणि जास्त बोलतो तो शोच्य आहे ॥ ६ ॥ जी स्त्री पतीची वंचना करते आणि कुटील, कलहप्रिय, स्वेच्छाचारी आहे ती शोचनीय आहे ॥ ७ ॥ जो बटू ब्रह्मचर्य व्रताचे पालन करत नाही व गुरुची आज्ञा मोडतो तो शोचनीय होय ॥ ८ ॥ जो गृहस्थाश्रमी मोहाने कर्म मार्गाचा त्याग करतो तो शोचनीय होय जो यति = सन्यासी प्रपंचात मग्न असतो आणि ज्ञानवैराग्यहीन असतो तो शोच्य होय ॥ दो० १७२ ॥

वानप्रस्थहि शोका-जोगा । त्यजुनि तपा ज्या आवड भोगां ॥
पिशुन शोच्य, विण हेतु क्रोधी । जननि जनक गुरु बंधु विरोधी ॥
शोच्य सर्वपरिं पर-अपकारी । निजतनुपोषक निर्दय भारी ॥
सर्वपरीं अति शोच्य सतत तो । जो त्यजुनि छल हरिस न भजतो ॥
शोचनीय नहिं कोसलरावहि । भुवनिं चतुर्दश प्रगट प्रभावहि ॥
झाला ना, होणें ना, नाहीं । भूप भरत, सम तव जनकाही ॥
विधिहरिहर सुरनाथ दिशापति । दशरथ गुणगाथा सब वानति ॥

दो० :- तन्महती कशि वर्णवे तात ! सांग कोणास ॥
राम लक्ष्मण नि तुम्हिं उभय, असे सूनु शुचि ज्यांस ॥ १७३ ॥

पिशुन निष्कारण क्रोध करणारा, आईबाप, विद्यागुरु, व भाऊ यांच्याशी विरोध करणारा शोचनीय होय. ॥ १-२ ॥ दुसर्‍यांना अपकार करणारा आपल्या शरिराचेच पोषण करणारा व फार निर्दय असणारा हे सर्व प्रकारे शोचनीय होत ॥ ३ ॥ जो अन्य भरवंसा सोडून हरिभक्ती करीत नाही तो सर्व प्रकारे नेहमी अतिशोच्य होय. ॥ ४ ॥ कोशलराव दशरथ मुळीच शोचनीय नाहीत, ( कारण) त्यांचा प्रभाव चौदाही भुवनात प्रगट आहे ॥ ५ ॥ भूप भरत ! तुमच्या पित्यासारखा भूप झाला नाही, व पुढे होणारही नाही ॥ ६ ॥ ब्रह्मा, हरि, हर, सुरनाथ व दिशापति हे सर्व दशरथांच्या गुणकथा वर्णीत आहेत. ॥ ७ ॥ ज्यांना रामलक्ष्मण तुम्ही व शत्रुघ्न असे पवित्र पुत्र झालात त्यांची महती कोणास व कशी वर्णन करता येईल ? ॥ दो० १७३ ॥

सर्वपरीं भूपति बहुभागी । वृथा खेद करणे त्यां-लागीं ॥
त्यजा शोक हें ऐकुनि समजुनि । पाळा राजाज्ञा शिरिं मानुनि ॥
नृपे राज्यपद दिलें तुम्हांला । सत्य करावें पितृवचनाला ॥
त्यक्त राम ज्या वचनालागीं । त्यक्त शरीर राम-विरहागीं ॥
वचन नृपां प्रिय, प्रिय त्यां प्राण न । करा तात पितृ-वच-परिपालन ॥
करा धरुनि शिरिं भूपाज्ञेला । यांत भलेपण सर्व तुम्हांला ॥
परशुराम मानुनि पित्राज्ञा । वधिति जननि विश्रुत लोकांना ॥
दिलें ययातिस यौवन तनये । पित्राज्ञें त्यां अयश अघ न ये ॥

दो० :- अनुचित उचित विचारविण पितृवचना करतात ॥
जगिं सुख-सुयशा पात्र ते अमरपुरीं वसतात ॥ १७४ ॥

भूपती सर्व प्रकारे फार भाग्यवान होते म्हणून त्यांच्यासाठी खेद करणे व्यर्थ आहे ॥ १ ॥ हे ऐकून व विचार करुन शोक सोडा व राजाज्ञा शिरावर धरुन तिचे पालन करा ॥ २ ॥ राजांनी राजापद तुम्हाला दिलेले आहे तरी तुम्ही पित्याचे वचन सत्य करणे जरुर आहे ॥ ३ ॥ ज्या वचनासाठी ( राजांनी) रामाचा त्याग केला व रामविरह अग्निने देहाचा त्याग केला ॥ ४ ॥ ते वचन ( पाळणे) राजांना प्रिय आहे, प्रिय वाटले; त्यांना प्राण प्रिय वाटले नाहीत म्हणून तात ! पितृवचनाचे तुम्ही पूर्ण पालन करावे (करा) ॥ ५ ॥ राजाज्ञा शिरसावंद्य मानून त्याप्रमाणे करा. यात तुम्हांला सर्व चांगलेपणाच मिळणार आहे ॥ ६ ॥ परशुरामाने पित्याची आज्ञा मानून आपल्या मातेला ठार मारली हे सर्व लोकांत प्रसिद्धच आहे ॥ ७ ॥ ययातीला त्याच्या पुत्राने आपले यौवन दिले, पण पित्याच्या आज्ञेमुळे त्या दोघांना पाप लागले नाही की अपकीर्ती झाली नाही ॥ ८ ॥ उचित की अनुचित याचा विचार न करता जे पित्याच्या वचनाचे पालन करतात त्यांना या जगात पुष्कळ सुख व सुयश लाभते ( व मेल्यावर) ते अमरपुरीत निवास करतात॥ दो० १७४ ॥

सत्य अवश्य भूप वच करणें । पाळा प्रजा शोक परिहरणें ॥
नृप सुरपुरिं पावति परितोषा । सुकृत सुयश पावाल न दोषा ॥
वेद-विदित संमत सर्वांसी । पिता देइ तो करि राज्यासी ॥
कराराज्य कीं ग्लानी टाकुनि । माना मम वचना हित जाणुनि ॥
श्रवुनि, राम वैदेहि सुखावति । पंडित कोणि न अनुचित ठरवति ॥
कौसल्यादि सकल माता ही । प्रजा-सुखें पावती सुखाही ॥
तव मर्मा रामाच्या जाणति । भले सर्वपरिं तुम्हिं, ते मानति ॥
येतां राम राज्य सोंपावें । स्नेहें सुंदर पद सेवावे ॥

दो० :- कराच गुर्वाज्ञा कथिति सचिव जोडुनी हात ॥
रघुपति येतां उचित जें तें करणें तैं तात ॥ १७५ ॥

भूपतीचे वचन अवश्य सत्य करावे; आणि प्रजेचे पालन करुन प्रजेचा शोक नाहीसा करावा ॥ १ ॥ ( हे केल्याने) स्वर्गात भूपतींना परितोष होईल, आणि तुम्ही पुण्य व सुयश पावाल, दोष पावणार नाही ॥ २ ॥ ( कारण) हे वेदात वर्णिलेले व सर्वांना मान्य आहे की पिता ज्याला देईल त्याने राज्य करावे ॥ ३ ॥ म्हणून तुम्ही निरुत्साह व दु:ख शोक सोडून माझे वचन हितकारक आहे हे जाणून माना ( त्याप्रमाणे करा) ॥ ४ ॥ हे ऐकून राम व वैदेही यांना सुख होईल; व कोणीही पंडित अयोग्य ठरवणार नाहीत कौसल्यादि सगळ्या मातांना सुद्धा प्रज्ञेच्या सुखाने सुखच होईल ॥ ५-६ ॥ तुमचे व रामचंद्रांचे मर्म जे जाणतील ( व जाणतात) ते मानतील की तुम्ही सर्व प्रकारे चांगले आहांत ॥ ७ ॥ राम परत आल्यावर राज्य त्यांना सोपवावे व सुंदर चरणांची सुंदर स्नेहाने सुंदर सेवा करावी ॥ ८ ॥ सचिव हात जोडून म्हणाले की गुरुंजी आज्ञा करा ( अवश्य पाळावी) आणि तात ! रघुपति आले म्हणजे जे योग्य वाटले ते त्यावेळी करावे ॥ दो० १७५ ॥

कौसल्या धरि धीर म्हणे हे ! । पुत्र, पथ्य गुर्वाज्ञा आहे ॥
ती आदरणें हितकर मानुनि । त्यजणें खेद कालगति जाणुनि ॥
वनिं रघुपति सुरपुरिं नरराणा । तूं तर कातर असा सुजाणा ॥
प्रजा सचिव सब माता परिजन । सकलां बाळ ! तूंच अवलंबन ॥
बघुनि वाम विधि काळ कठोर । तनु ओवाळि माय, धर धीर ॥
गुर्वाज्ञा शिरिं धरुनी आचर । प्रजे पाळि, परिजन दुःखा हर ॥
गुरुचें वचन सचिव-अनुम्दन । श्रुत भरतें जणुं हृदया चंदन ॥
वरती श्रुता मातृ-मृदु-वाणी । स्नेह शील ऋजुता-रस-खाणी ॥

छं० :- रस-खाणि सरला मातृवाणी भरत परिसुनि विव्हळे ॥
लोचन सरोजें स्रवति सिंचति विरह अंकुर नव जळें ॥
बघुनी दशा ती समयिं त्या सब देहभाना विसरती ॥
सुस्नेह सीमा सहज, तुलसी आदरें सब वानती ॥ १ ॥
सो० :- भरत कराब्ज जुळून धीर धुरंधर धीर धरि ॥
वचन अमृतिं घोळून सकलां उचितोत्तर देति ॥ १७६ ॥

कौसल्येने धीर धरला व म्हणाली की हे पुत्र ! ( बा मुला !) गुरुजींची आज्ञा पथ्य आहे ॥ १ ॥ ( म्हणून) ती हितकर आहे असे मानून तिचा आदर राखणे जरुर आहे; ( म्हणून) कालगती जाणून खेद सोडून दे ॥ २ ॥ रघुपति वनात आहे आणि नरपति अमरपुरींत आहेत, आणि तू तर असा घाबरट झाला आहेस ॥ ३ ॥ प्रज्ञा, सचिव, सर्व माता व परिवार या सगळ्यांना बाळा ! एकमात्र तूंच आता आधार आहेस ॥ ४ ॥ बा ! माता आपला देह तुझ्यावरुन ओवाळून टाकते, पण दैव फिरले आहे व काळ कठोर आहे हे ध्यानात घेऊन ( पाहून) धीर धर ॥ ५ ॥ गुरुंची आज्ञा शिरावर धरुन त्याप्रमाणे कर, प्रजेचे पालन कर व परिवाराचे दु:ख दूर कर ॥ ६ ॥ छातीला जणूं चंदनासारखे असणारे गुरुंचे वचन व त्याला सचिवांनी दिलेले ते अनुमोदन भरताने ऐकले ॥ ७ ॥ त्यावर आणखी स्नेह व शील व सरलता या रसांची खाण असलेली मातेची मृदुवाणी ( भरताने) ऐकली ॥ ८ ॥ स्नेहरसाची व सरलतेची खाणच अशी मातेची ती वाणी ऐकून भरत व्याकुळ झाले नेत्ररुपी कमळे पाझरु लागून ( हृदयातील) विरहाच्या नवीन अंकुरांवर ( जणू) जलसिंचन करीत आहेत ती भरताची दशा पाहून त्या समयी सर्व लोक देहभान विसरले, तुलसीदास म्हणतात की भरताच्या सहज सुंदर स्नेहाची सीमा सर्व लोक आदराने ( मनात) प्रशंसू लागले ॥ छंद ॥ धैर्य धुरंधर भरताने धीर धरला व आपले कमलांसारखे हात जोडून व आपल्या वचनास ( जणू) अमृतात घोळून ते आता सगळ्यांना उत्तर देतात. ॥ दो० १७६ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP