॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ लंकाकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्याय ७ वा



Download mp3

श्रवुनि बंधु वच निघे बिभीषण । येइ जिथें त्रैलोक्य विभूषण ॥
नाथ ! भूधराकार शरीर । कुंभकर्ण येतो रणधीर ॥
हें जेव्हां कपिकर्णीं आले । किलकिलुनी बलवंत धावले ॥
पर्वत विटप पटापट उपटिति । कटकटुनी घटकर्णीं टाकिति ॥
कोटि कोटि गिरि शिखरीं मारा । भल्ल कपी करिती प्रतिवारा ॥
डगे न मन, तन जराहि न ढळे । गजा मारितां जशी रुइफळें ॥
मारि मुष्टि तैं मारुत सुत । पडे विकल महिं शिर बडवित ॥
मग तो उठुनि मारि हनुमंता । मूर्छित पडला क्षण न लागतां ॥
मग महिं आदळि नलनीलानां । अपटि धरुनि चहुंकडे भटांना ॥
जाइ वलीमुख सैन्य पळोनी । अति भयभीत, समोर न कोणी ॥

दो० :- अंगदादि कपि मूर्छित करुनि सहित सुग्रीव ॥
खांकें घालुनि कपिपतिसि निघे अमित बलशीव ॥ ६५ ॥

भावाचे म्हणणे ऐकून बिभीषण निघाला व जिथे त्रैलोक्य विभूषण राम होते तेथे आला. ॥ १ ॥ ( आणि म्हणाला की ) हे नाथ ! पर्वतकार शरीर असलेला रणधीर कुंभकर्ण लढाईला येत आहे. ॥ २ ॥ इतके कपींच्या कानावर पडण्याची खोटी, तोच किलकिलाट करीत सारे धावले. ॥ ३ ॥ भल्ल आणि कपी कोटी कोटी गिरिशिखरांचा मारा प्रत्येक वेळी त्यांच्यावर करु लागले. ॥ ५ ॥ तो मनांत डगमगला नाही की शरीर जागेवरुन जरा सुद्धा ढळले नाही हत्तीला रुईफळे मारली असता जशी वाटतात तसाच तो मारा त्याला वाटला. ॥ ६ ॥ मग मारुतीने एक ठोसा मारला तेव्हा मात्र कुंभकर्ण व्याकुळ होऊन खाली पडला व कपाळ बडवूं लागला. ॥ ७ ॥ मग उठून त्याने हनुमंतास एक ठोसा मारला तेव्हा तो एक क्षणही न लागतां मूर्च्छित पडला. ॥ ८ ॥ मग त्याने नलनीलांना जमिनीवर आदळले व इतर योद्ध्यांना धरुन सर्वांना आपटले. ॥ ९ ॥ तेव्हा सारे वानरसैन्य अति भयभीत होऊन सैरावैरा पळत सुटले, कोणीही युद्धास समोर येईना. ॥ १० ॥ सुग्रीव, अंगदादिंसह सर्व कपींना बेशुद्ध पाडून सुग्रीवाला काखेत मारुन् तो अमित बलवान कुंभकर्ण लंकेत जायला निघाला. ॥ दो० ६५ ॥

उमे ! करिति रघुपति नरकेली ।जसा गरुड खेळे अहिमेळीं ॥
भ्रूभंगें जो काळा खाई । शोभे कीं त्या अशी लढाई ॥
जगपावनि कीर्तिस विस्तरतिल । गा गाउनि भवनिधि नर तरतिल ॥
गत मूर्छा मारुत सुत जागे । मग सुग्रिवा शोधूं लागे ॥
सुग्रीवहि शुद्धीवर आला । गळुन पडे, मृत वाटे त्याला ॥
दशनिं नासिका कान कापले । गर्जुनि गगनी मत त्या कळलें ॥
धरुनि चरण तो अपटि महिवरी । उठुनि सुलाघविं तो त्या मारी ॥
मग ये प्रभुपाशीं बलवान । जयति जयति जय कृपानिधान ॥
कळत नासिका कान छाटले । फिरे क्रुद्ध मनिं दुःख दाटलें ॥
सहज भीम ही श्रुति ना नासा । देखत कपिदळ धरिं सुत्रासा ॥

दो० :- जय जय जय रघुवंशमणि धावति कपि हुप् हूप ॥
सर्व एकदां त्यावरी टाकिति गिरितरु खूप ॥ ६६ ॥

उमे गरुड जसा सापांच्या समूहात क्रीडा करतो तसे रघुपती नरलीला करीत आहेत. ॥ १ ॥ जो केवळ आपल्या भृकुटी-भंगाने काळाला खातो, त्याला अशी लढाई शोभते का ? ॥ २ ॥ जगाला पावन करणार्‍या कीर्तीला पसरतील व तिचे पुन:पुन्हा गान करुन मनुष्य भवसागर तरुन जातील. ॥ ३ ॥ मारुत सुताची मूर्च्छा गेली व तो जागा झाला आणि मग सुग्रीवाला शोधूं लागला ॥ ४ ॥ सुग्रीवही शुद्धीवर आला आणि खाकेतून गळून खाली पडला, कुंभकर्णाला वाटले की मरुन पडला. ॥ ५ ॥ सुग्रीवाने त्याचे नाक – कान कापले व गर्जना करुन तो आकाशात गेला. तेव्हा त्याला कळले की ( सुग्रीव मेला नाही ) ॥ ६ ॥ ( पण ) त्यानेही उठून अति चपळाईने त्याला ठोसा मारला. ॥ ७ ॥ मग बलवान सुग्रीव प्रभुपाशी आला व “ जयति जयति जय कृपानिधान ” असा त्याने जयकार केला. ॥ ८ ॥ नाक कान कापल्याचे कुंभकर्णाला आता कळले, त्यामुळे तो क्रोधित होऊन युद्धासाठी परत फिरला पण मनात दु:खी झाला. ॥ ९ ॥ स्वभावताच भयानक आणि त्यात नाक – कान कापलेले त्यामुळे त्याला पाहताच कपीसैन्य भयभीत झाले. ॥ १० ॥ “ जयजयजय रघुवंशमणी ” असा जयघोष करीत हुप, हुप करुन कपी धावले व सर्वाना एकाच वेळी कुंभकर्णावर खूप गिरीतरु टाकले. ॥ दो० ६६ ॥

कुंभकर्ण रण रंगिं विरुद्ध । जणूं काळ ये सन्मुख क्रुद्ध ॥
कोटिक कपि धर धरुनी खाई । टोळथवा गिरिगुहें किं जाई ॥
मर्दुनि देहिं कोटि करि चुर्डा । कोटि पिळुन करि धुळींत खुर्दा ॥
मुख कानां नाकाच्या वाटे । निसटुनि पळति भल्ल कपि लाटे ॥
रणमदमत्त निशाचर दर्पित । ग्रसिल विश्व, जणुं विधि या अर्पित ॥
पळति सुभट वळती न वळवतां । नयनिं दिसे ना ऐकति वदतां ॥
कुंभकर्ण कपि फौजे उधळी । ऐकुनि निशिचर धाड धावली ॥
बघुनी राम विकल कपि कटकें । अरि अनीक नानाविध ठाके ॥

दो० :- अनुज सुकंठ बिभीषण ! करा सैन्य सांभाळ ॥
बघतो खलबल, दल वदति राजीवाक्ष कृपाळ ॥ ६७ ॥

आता कुंभकर्ण रणांगणात विरोध आक्रमण करण्यासाठी जणूं काळच बनून समोर ठाकला. ॥ १ ॥ तो कोट्यावधी कपींना धरधरुन तोंडात टाकू लागला, तेव्हा असे वाटले की जणूं टोळांचे थवेच गिरी गुहेत शिरत आहेत. ॥ २ ॥ कोट्यवधी कपींचा आपल्या अंगाने मर्दून त्याने चुराडा केला व कोट्यवधी कपींना हाताने पिळून धुळीस मिळवले. ॥ ३ ॥ तोंड, कान, नाकाच्या वाटांनी भल्ल कपींचे थवे निसटून पळूं लागले. ॥ ४ ॥ रणमदाने मत्त झालेल्या निशाचराला एवढा रणमद चढला की जणूं सगळे विश्व विधीने त्याला अर्पण केले असून तो आता गिळून टाकणार ! ॥ ५ ॥ कपीवीर धूम पळत सुटले, मागे वळविता वळेनात, त्यांना डोळ्यांनी दिसेना की कानांनी ऐकू येईना. ॥ ६ ॥ या प्रमाणे कुंभकर्णाने कपिसैन्य उधळून लावले, हे ऐकून राक्षस सैन्याची धाड धावत आली. ॥ ७ ॥ रामचंद्रांनी पाहीले की सगळी कपिकटके व्याकुळ झाली आहेत व शत्रू सैन्य येऊन थडकले आहे. ॥ ८ ॥ राजीव नयन कृपाळु रामचंद्र म्हणले की अनुजा, सुग्रीवा, बिभीषणा तुम्ही सैन्याचा सांभाळ करा मी त्या दुष्टाचे बळ व त्याचे सैन्य यांना पाहून घेतो. ॥ दो० ६७ ॥

सज्य शार्ङ्ग करिं कटिं तूणीर । अरिदलदलनिं जाति रघुवीर ॥
प्रभुनीं कार्मुक टणत्कारलें । घोर रवें रिपु सैन्य बधिरलें ॥
सत्यसंघ सोडिति शर लक्ष । काळ सर्प जणुं जति सपक्ष ॥
जिथं तिथं जाति विपुल नाराच । छाटिति बहु भट विकट पिशाच ॥
तोडिति पद उर शिर भुजदंड । भट बहुतेक होति शतखंड ॥
महिं मूर्छित घायाळ हि पडती । सुभट सावरुनि उठुनी लढती ॥
लागत बाण जलद सम गाजति । बघुन कठिण शर बहु पळ काढति ॥
धावति रुंडें प्रचंड मुंडहि । ध्वनि गर्जति धर धर धर मार हि ॥

दो० :- प्रभु बाणांनीं क्षणामधिं वधिले विकट पिशाच ॥
मग रघुवीर निषंगिं ते शिरले सब नाराच ॥ ६८ ॥

सज्य केलेले शार्ड, धनुष्य हाती घेऊन व कमरेला भाता कसून रघुवीर शत्रुसैन्याचा संहार करण्यासाठी निघाले. ॥ १ ॥ प्रभूंनी प्रथम आपल्या धनुष्याचा टणत्कार केला तो घोर ध्वनी ऐकून शत्रु सैन्य बधिरले. ॥ २ ॥ सत्य प्रतिज्ञ रघुनाथाने एक लक्ष बाण सोडले व ते जणूं पंख असलेल्या काळसर्पासारखे चालले. ॥ ३ ॥ जिकडे तिकडे पुष्कळ पोलादी बाण जाऊं लागले व ते पुष्कळ विक्राळ राक्षस वीरांना कापू लागले. ॥ ४ ॥ त्यांनी पाय, उर, शिर, बाहू तोडले व बहुतेक वीरांचे शतश: तुकडे झाले. ॥ ५ ॥ ( निशाचर वीर ) घायाळ आणि मूर्च्छित होऊन भूमीवर पडूं लागले ( पण ) कोणी वीर सावरुन उठून पुन्हा लढूं लागले. ॥ ६ ॥ बाण लागताच ते मेघासारखी गर्जना करतात व पुष्कळ जण तर कठीण बाण पाहूनच पळ काढीत आहेत. ॥ ७ ॥ प्रचंड रुंडे धावू लागली व ( उडणारी ) मुंडे धरा धरा मारा मारा असे ओरडूं लागली. ॥ ८ ॥ प्रभूच्या बाणांनी क्षणात सर्व भयंकर राक्षस ठार केले आणि मग ते सर्व नाराच रघुवीराच्या भात्यात शिरले. ॥ दो० ६८ ॥

कुंभकर्ण तैं चित्तिं विचारी । क्षणिं हत राक्षस धाड किं सारी ॥
होई क्रुद्ध महाबल वीर । करि मृगनायक-नाद गंभीर ॥
रोषें उपटुनि घेई भूधर । टाकि जिथें मर्कटभट बहुतर ॥
गिरि गुरु येत पाहिले प्रभुनीं । फोडुनि रजसम करिति शरानीं ॥
ओढुनि धनू कुपित रघुनायक । सोडिति अति कराल बहु सायक ॥
घुसुनि तनूंत शर फिरती । विजा जशा चमकुनि घनिं शिरती ॥
स्त्रवते शोणित काळ्या तनुवर । गेरुपाट जणुं कज्जल गिरिवर ॥
विकल बघुनि कपि भल्ल धावले । विहसे जैं कपि निकट ठाकले ॥

दो० :- महानाद करि गर्जे कोटि कोटि धरि कीश ॥
महिं अपटी गजराज इव करी शपथ दशशीस ॥ ६९ ॥

तेव्हा कुंभकर्णाने मनात विचार केला की राक्षसांची सगळी धाड एका क्षणात यांनी मारुन टाकली ! ॥ १ ॥ तो महाबलवंत वीर क्रुद्ध झाला व त्याने गंभीर सिंहानाद केला. ॥ २ ॥ त्याने रोषाने पर्वत उपटून घेतले व जेथे पुष्कळसे मर्कट योद्धे होते तिकडे फेकले ॥ ३ ॥ मोठे पर्वत येताना पाहून प्रभूंनी आपल्या बाणांनी ते फोडून रज:कणासारखे करुन टाकले. ॥ ४ ॥ रघुनायक कुपित झाले व त्यांनी धनुष्य ताणून अति कराल असे पुष्कळ बाण सोडले ॥ ५ ॥ ते कुंभकर्णाच्या शरीरात घुसुन विजा जशा चमकून मेघात शिरतात तसे बाहेर पडून परत फिरले (रघुवीराच्या भात्यात शिरले) ॥ ६ ॥ काळ्या शरीरावर रक्त वहात असता ते काजळाच्या पर्वतावरुन गेरुचे पाट वाहील्यासारखे दिसूं लागले. ॥ ७ ॥ कुंभकर्ण व्याकुळ झाला आहे असे पाहून भल्ल कपी त्याच्यावर धावले कपी जवळ आलेले पाहताच तो खदखदा हसला. ॥ ८ ॥ मग त्याने महानाद गर्जना केली व दशकंठाची घोषणा करीत कोट्यवधी कीशांना धरुन गजराज जसा आपटेल तसा आपटूं लागला. ॥ दो० ६९ ॥

भल्ल वलीमुख पळति घाबरे । वृका विलोकुनि जशीं मेंढरें ॥
पळत सुटति कपि भल्ल भवानी । विकल पुकारित भयार्त वाणीं ॥
हा राक्षस दुकाळ सम आहे । कपिकुल देशिं अतां पडुं पाहे ॥
कृपा वारिधर राम खरारी ! । पाहि ! पाहि ! प्रणतार्ती हारी ॥
सकरुण वचन कळत भगवाना । निघति स सज्यशरासन बाणा ॥
राम सैन्य निज मागें घालुनि । निघति महाबलशाली कोपुनि ॥
शत शर लाउनि धनू ताणलें । सुटले तीर शरीरीं शिरले ॥
धावे क्रुद्ध विद्ध शरवरीं । डोल धरे डगमग भूधरीं ॥
शैल एक उपटुनी घेत तो । रघुकुळ टिळक छाटिती भुज तो ॥
धावे वाम करीं गिरिं घेउनि । प्रभु पाडिति महिं तो भुज छेदुनि ॥
छिन्न बाहु खल दिसला तैंसा । पक्षहीन मंदर गिरि जैसा ॥
उग्र विलोकें प्रभुस विलोकी । गिळूं पाहतो जणूं त्रिलोकी ॥

दो० :- करून घोर चीत्कार अति धावे मुख वासून ॥
गगनिं सिद्ध सुर घाबरे हा हा ! करून ॥ ७० ॥

लांडग्याला पाहून मेंढरांचे कळप जसे अस्ताव्यस्त पळत सुटतात तसे भल्ल मर्कट घाबरे होऊन पळत सुटले. ॥ १ ॥ हे भवानी ! भयाने आर्त झालेल्या वाणीने पुकारीत व्याकुळ भल्ल कपी पळत सुटले. ॥ २ ॥ हा राक्षस दुकाळासारखा आहे, कपिवंशरुपी देशावर हा पडूं पहात आहे. ॥ ३ ॥ कृपारुपी जलधारण करणार्‍या राममेघा ! हे खरारी ! शरणागतांचे दु:ख हरण करणार्‍या आमचे रक्षण करा, रक्षण करा ! ( असा धावा करीत कपिसैन्य पळत सुटले )॥ ४ ॥ करुणेने भरलेले ते वचन भगवंताच्या कानी पडताच सज्ज केलेले धनुष्य – बाण घेऊन भगवान निघाले. ॥ ५ ॥ रामचंद्रांनी आपले सैन्य आपल्या पाठीशी घातले व महाबलशाली क्रोधाने पुढे चालले. ॥ ६ ॥ शंभर बाण धनुष्यावर लावून धनुष्य ओढले तेव्हा ते तीर सुटून कुंभकर्णाच्या शरीरात घुसले. ॥ ७ ॥ त्या तीक्ष्ण बाणांनी घायाळ झालेला तो क्रुद्ध होऊन जोराने धावला तेव्हा पृथ्वी डोलूं लागली व पर्वतही डगमगूं लागले. ॥ ८ ॥ त्याने उजव्या हाताने एक पर्वत उपटून घेतला तेव्हा रघुकुळ टिळकंनी त्याचा तो बाहू छाटून टाकला. ॥ ९ ॥ तो पुन्हा डाव्या हातात पर्वत घेऊन धावला पण प्रभूंनी तो बाहू सुद्धा तोडून भूमीवर पाडला. ॥ १० ॥ पंख नसलेला मंदर पर्वत जसा दिसावा तसा बाहू तोडलेला दुष्ट कुंभकर्ण दिसूं लागला. ॥ ११ ॥ तो उग्र द्दष्टीने प्रभूकडे पाहूं लागला तेव्हा असे वाटले की तो त्रैलोक्याला गिळूं पहात आहे. ॥ १२ ॥ अति घोर चित्कार करुन व अति तोंड वासून प्रभूवर धावला तेव्हा आकाशात असलेले सिद्ध व सुर घाबरुन हा ! हा ! हाय ! हाय ! करु लागले. ॥ दो० ७० ॥

सभय देव करुणानिधि जाणति । श्रुतिपर्यंत शरासन ताणति ॥
विशिख निकरिं निशिचरमुख भरती । तदपि महाबल पडे न धरतीं ॥
शरपूरितमुख सम्मुख धावे । काळतूण सजीव जणुं यावें ॥
प्रभु तैं क्रुद्ध तीव्र शर घेती । धडावरुनि शिर त्याचें हरती ॥
दशमुख सम्मुख शिर तें पडलें । मणिविण फणि तेवींच विव्हळे ॥
धसे धरा धड प्रचंड धावत । प्रभु दुरवंड कापुन तें टाकत ॥
जसे नभांतुनि भूधर पडले । तळिं निशिचर कपि भल्ल चिरडले ॥
प्रभु वदनीं तत्तेज समावत । सुर मुनि सकल अचंबा मानित ॥
वाजविती सुर दुंदुभि हर्षति । स्तुती करुनि बहु सुमनें वर्षति ॥
विनति करुनि सुर सकल परतले । देवर्षी त्या समयिं ठाकले ॥
गगनीं मुनि हरिगुणगण गाती । रुचिर वीर रस, प्रभुला रुचती ॥
शीघ्र वधा खल वदुनि गत मुनी । राम शोभले रण अंगणी ॥

छं० :- संग्राम महिं रघुपतिं विराजति अतुलबल कोसलधनी ।
श्रमबिंदु मुखिं राजीव लोचन अरुण, तनुं शोणित कणी ॥
भुज युगलिं फिरविति शर शरासन कीश रीस सभोंवती ।
म्हणतसे तुलसी वर्णुं शकति न शेष छवि वदनीं अती ॥ १ ॥
दो० :- निशिचर अधम मलाकर त्यास दिलें निज धाम ।
गिरिजे ! ते नर मंदमति भजति न जे श्रीराम ॥ ७१ ॥

देव भयभीत झाले आहेत हे करुणानिधीने जाणले व आपले धनुष्य कानापर्यंत ताणले. ॥ १ ॥ बाणांच्या समूहाने राक्षसाचे मुख भरले, तरीसुद्धा तो महाबलवंत वीर धरतीवर पडला नाही. ॥ २ ॥ बाणांनी परिपूर्ण भरलेल्या तोंडाने तसाच समोर धावला तो जणूं काळाचा सजीव भाताच आला आहे असे वाटले. ॥ ३ ॥ तेव्हा प्रभूंनी तीव्र शर घेतला व त्याचे शिर धडावेगळे केले. ॥ ४ ॥ ते शिर दशाननाच्या पुढ्यात लंकेत पडले, तेव्हा ते पाहून मणिविहीन सर्पा प्रमाणे तो व्याकुळ झाला. ॥ ५ ॥ ते प्रचंड धड धावू लागले तेव्हा धरणी खचूं लागली, ते पाहून प्रभूंनी त्याचे दोन तुकडे केले. ॥ ६ ॥ आकाशातून पर्वत पडावेत तसे ते शरीर पडताच त्या खाली राक्षस भल्ल व कपी चिरडले गेले ॥ ७ ॥ त्याचे तेज प्रभुच्या मुखात सामावले ते पाहून सुर, मुनी इ. नी आश्चर्य मानले. ॥ ८ ॥ देवांना हर्ष झाला व त्यांनी दुंदुभी वाजविल्या व स्तुती करुन पुष्कळ पुष्पवृष्टी केली. ॥ ९ ॥ विनंती करुन सर्व परतही गेले व त्यावेळी नारद तेथे आले. ॥ १० ॥ आकाशात राहून त्यांनी श्रीहरीच्या सुंदर वीररस प्रधान गुणसमूहांचे गान केले व असे प्रभू देवर्षीला आवडले ॥ ११ ॥ दुष्टाचा शीघ्र वध करावा असे सांगून मुनी गेले व राम त्या रणांगणांत शोभू लागले. ॥ १२ ॥ अतुल बल असलेले कोसलेश रघुपती रणभूमीत सुशोभित दिसत आहेत श्रमाने आलेले घामाचे बिंदु मुखावर आहेत, नेत्र लाल कमळासारखे लाल असून शरीरावर रक्ताचे कण ( उडालेले ) आहेत दोन्ही हातांनी धनुष्य व बाण फिरवीत असून कीश व रीस सभोवती आहेत. तुलसीदास म्हणतात की ते रुप शेष आपल्या पुष्कळ मुखांनी सुद्धा वर्णन करुं शकत नाहीत ( तिथे मी एका मुखाने काय वर्णन करणार ! ) महेश म्हणाले – गिरीजे ! कुंभकर्ण नीच राक्षस, पापसागर होता पण प्रभुंनी त्याला आपले धाम दिले ( म्हणून अशा करुणासिंधु प्रभूला ) जे मनुष्य भजत नाहीत ते मंदबुद्धी होत. ॥ दो० ७१ ॥

वळति उभय दळ गत चिंतामणी । झाले सुभटां श्रम अति रणीं ॥
रामकृपें कपिदल बल गाढें । जसा मिळत तृण कृशानु वाढे ॥
घटती निशिचर दिवसा रातीं । स्वमुखें वदत सुकृत जशिं जाती ॥
दशकंधर बहु विलाप करतो । पुनः पुन्हां शिर उराशिं धरतो ॥
रडति नारि करिं ऊर बडविती । तद्‌बल तेजा विपुल वर्णिती ॥
मेघनाद ते अवसरिं आला । समजावी बहुपरीं पित्याला ॥
उद्या बघा तुम्हि मम पुरुषार्थहि । अतां बढाया मारुन नार्थ हि ॥
बल रथ अर्पित इष्ट दैवतें । बल न दाविलें तुम्हां तात तें ॥
यापरि जल्पत रात संपली । कपिनीं द्वारें चारि रोधलीं ॥
वीर काळसम भल्ल कपि इथें । रजनीचर रणधीर अति तिथें ॥
लढति सुभट निज निज जयहेतू । समर वर्णवे ना खगकेतू ॥

दो० :- मेघनाद मायामय रथीं जाइ गगनांत ॥
साट्टहास गर्जे पडे धाक कीश कटकांत ॥ ७२ ॥

सूर्यास्त होताच दोन्ही सैन्य परत फिरली वीरांना युद्धात अति श्रम झाले. ॥ १ ॥ तृण मिळताच अग्निचे बळ वाढावे तसे रामकृपेने कपिसेनेचे बळ वाढून गाढ झाले. ॥ २ ॥ केलेले सुकृत = पुण्य स्वत:च्या मुखाने सांगीतल्याने नष्ट होते तसे रात्रंदिवस राक्षस कमी होऊं लागले. ॥ ३ ॥ दशकंधर फार विलाप करीत भावाचे शिर वारंवार उराशी धरुं लागला. ॥ ४ ॥ स्त्रिया हातांनी ऊर बडवीत व त्याच्या विपुल बलाचे व तेजाचे वर्णन करीत रडू लागल्या. ॥ ५ ॥
मेघनाद बल-पौरुष संहार – त्याच वेळी मेघनाद तेथे आला व त्याने पुष्कळ प्रकारे बापाची समजूत काढली. ॥ ६ ॥ आणि म्हणाला की उद्यां तुम्ही माझा पुरुषार्थ पहा, आत्ताच बढाया मारण्यात काही अर्थ नाही. ॥ ७ ॥ इष्ट देवाने मला बल व रथ दिला आहे ( पण ) हे तात ! तें बळ आजपर्यंत मी तुम्हाला दाखवले नाही (तशी वेळच आली नाही) पण याप्रमाणे वल्गना करता रात्र संपली, व कपींनी लंकेची चारी द्वारे रोखली. ॥ ९ ॥ इकडे काळासारखे भल्लकपीवीर आहेत (तर तिकडे) अति रणधीर निशाचर आहेत. ॥ १० ॥ सर्व वीर आपणासच जय मिळावा या हेतूने लढत आहेत, हे गरुडा, त्या युद्धाचे वर्णन करणे अशक्य आहे ॥ ११ ॥ मेघनाद मायामय रथात बसून आकाशात गेला व अट्टाहासयुक्त गर्जला तेव्हा कपिसैन्यात भीती पसरली. ॥ दो० ७२ ॥

शक्ति शूल तलवारि कृपाणां । अस्त्र शस्त्र कुलिशायुध नाना ॥
टाकी परशु परिघ पाषाणां । वर्षुं लागला असंख्य बाणां ॥
दाहि दिशा व्यापुन शर राहत । मघामेघ झड जणुं बहु लागत ॥
धर धर मारा ध्वनि ये कानां । कोण मारि उमजे कोणा ना ॥
गिरितरुधर कपि गगनीं धावति । तो न दिसे तैं दुःखी परतति ॥
अवघड घाट वाट गिरिकंदर । मायाबळें करी शर पंजर ॥
जाति कुठें व्याकुळ अति वांदर । सुरपति बंदिं पतित जणुं मंदर ॥
मारुत सुत अंगद नल नीलां । व्याकुळ करी सकल बलशीलां ॥
मग लक्ष्मण सुग्रीव विभीषण । केले शर मारुन जर्जर तन ॥
मग रघुपतिशी करी युद्ध तो । सोडी शर तो नाग लागतो ॥
व्यालपाशवश होति खरारी । स्ववश अनंत एक अविकारी ॥
नट इव कपट चरित करि नाना । भगवान् सदा स्वतंत्र हि जाणां ॥
प्रभु बांधुनि घे रण शोभेस्तव । नागपाशिं, भय देवानां तंव ॥

दो० :- यस्य नाम गिरिजे ! जपुनि मुनि तोडिति भवपाश ॥
तो किं बंधनीं सापडे व्यापक विश्व निवास ॥ ७३ ॥

तो मेघनाद शक्ती, शूल, तखारी, कृपाण इ. अस्त्रे शस्त्रे वज्र आयुधे, परशु, परीघ व बाण टाकूं लागला. व असंख्य बाणांची वृष्टी करु लागला. ॥ १-२ ॥ बाण दाही दिशांना व्यापून राहीले की जणूं मघा नक्षत्रातील मेघांची संततधारच ! ॥ ३ ॥ धरा मारा, धरा मारा, असे आवाज येऊं लागले, पण बोलतो कोण व मारतो कोण हे कोणालाच उमजेना. ॥ ४ ॥ कपि पर्वत व वृक्ष घेऊन आकाशात धावले पण तो मारणारा दिसेचना तेव्हा दु:खी होऊन परत आले. ॥ ५ ॥ त्याने अवघड घाट, वाटा, गिरिकंदरा इ. सर्व माया बळाने बाणांचे पिंजरेच करुन टाकले ॥ ६ ॥ जाणार कुठे पळून आता ? सर्व वानर असे व्याकुळ झाले की जणूं इंद्राच्या कारागृहात मंदर पर्वतच पडले आहेत. ॥ ७ ॥ मारुती, अंगद, नल, नील इ. सर्व बलशाली वानरांना सुद्धा व्याकुळ केले. ॥ ८ ॥ मग लक्ष्मण, सुग्रीव व बिभीषण यांना बाण मारुन त्यांचे देह जर्जर केले. ॥ ९ ॥ मग तो रघुपतीशी युद्ध करुं लागला तो जो जो बाण सोडतो तो तो नाग बनूनच शरीराला लागू लागला. ॥ १० ॥ स्ववश, अनंत, एक व अविकारी असे खरारी नाशपाशांना वश झाले. ॥ ११ ॥ नटाप्रमाणे नाना प्रकारे नरचरित्र करीत आहेत, पण ते भगवान असल्याने सदा स्वतंत्र आहेत हे लक्षात असावे. ॥ १२ ॥ प्रभूंनी रणशोभेस्तव स्वत:ला नागपाशात बांधून घेतले पण देवांना मात्र भय पडले. ॥ १३ ॥ गिरीजे ! ज्याचे नाम जपून मुनी भवपाश तोडतात तो सर्वव्यापक, विश्वनिवास प्रभू का बंधनात सापडणार आहे ? ॥ दो० ७३ ॥

राम चरित्रा सगुण भवानी । तर्कवे न बुद्धी बल वाणीं ॥
अशा विचारें तज्ञ विरत जे । त्यजुनि तर्क रामास भजति ते ॥
व्याकुळ करुनि कटक घननाद । झाला प्रगट वदे दुर्वाद ॥
म्हणे जांबवान खला ! थांबरे । श्रवुनि तया मनिं रोष अति भरे ॥
वृद्ध गणुनि शठ तुला सोडला । अधमा तूं आव्हानिसि मजला ॥
तदा त्रिशुल तरल तो मारत । जांबवंत करिं पकडुनि धावत ॥
घननादाच्या उरीं मारला । सुरघाती मूर्छित महिं पडला ॥
मग रोषें पद धरि भिरकावी । धरणिं आदळी निजबळ दावी ॥
तो वरबळें मरे ना मारुनि । धरि पद दे लंकेत झुगारुनि ॥
इथें धाडि नारद गरुडाला । राम समीप सपदिं तो आला ॥

दो०:- खगपति सगळे खाई माया नाग वरूथ ॥
झाले माया विगत सब हर्षति वानर यूथ ॥ ७४रा ॥

हे भवानी ! रामचंद्रांच्या सगुण चरिताविषयी बुद्धी, बळ, आणि वाणी यांनी तर्क करणे शक्य नाही. ॥ १ ॥ अशा विचाराने जे तत्वज्ञानी व विरक्त असतात ते तर्काचा त्याग करुन श्रीरामास भजतात. ॥ २ ॥ सर्व सैन्य व्याकुळ केल्यावर मेघनाद प्रगट झाला व अपशब्द बोलू लागला. ॥ ३ ॥ तेव्हा जांबवान म्हणाला की अरे दुष्टा, थांब पळून जाऊ नकोस, हे ऐकून मेघनाद अत्यंत क्रोधीत झाला. ॥ ४ ॥ व म्हणाला रे थेरड्या, म्हातारा समजून तुला सोडला तर तूच मला आव्हान देतोस ? ॥ ५ ॥ तेव्हा त्याने दैदिप्यमान त्रिशूळ जाबंवंतावर फेकला पण जांबवानाने ते हाताने पकडले व तेच मेघनादावर फेकले. ॥ ६ ॥ ते बरोबर त्याच्या छातीत लागले व तो देवशत्रू मूर्च्छित होऊन पडला. ॥ ७ ॥ मग जांबवानाने त्याच्या तंगड्या धरुन त्याला गरगर फिरवून जमिनीवर आपटला व आपले वृद्धाचे बळ त्याला दाखवले. ॥ ८ ॥ पण वराच्या सामर्थ्यामुळे मेघनाद मेला नाही. तेव्हा त्याचे पाय पकडून त्याला लंकेत झुगारुन दिला. ॥ ९ ॥ इकडे नारदाने गरुडास पाठवले तेव्हा तो तत्काळ रामासमीप आला. ॥ १० ॥ पक्षीराज गरुडाने ते सर्व मायानिर्मित सर्पसमूह खाऊन टाकले तेव्हा सगळेच मायामुक्त झाले व सर्व वानरयूथ हर्षित झाले. ॥ दो० ७४ रा ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP