॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ अयोध्याकाण्ड ॥

अध्याय २ रा

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


Download mp3

वाजति वाद्यें विविध विधानां । पुरीं प्रमोद जाइ वदला ना ॥
सकलहि भरतागमना प्रार्थति । झट येवोत नयनफल पावति ॥
हाटिं वाटिं उपपथिं घरि दारीं । पुरुष परस्पर वदती नारी ॥
उद्यां मुहूर्त विलंब न फार किं । पुरविल विधि अभिलाषासार किं ॥
कांचन-सिंहासनिं सह सीते । बसतां राम, किं होइ मनीं तें ॥
उजाडेल कधिं सर्वहि म्हणती । देव कुचाळी विघ्न विनवती ॥
नगरोत्सव त्यां क्षण बघवेना । चोरा चांदणि रात्र रुचेना ॥
आवाहुनि शारदे विनवती ॥ घडि घडि धरिती पाया पडती ॥

दो० :- अमची बघुनि विपत्तिं अति आई ! अस कर आज ॥
जातिं राम राज्या त्यजुनि वनिं, होइल सुरकाज ॥ ११ ॥

विविध वाद्ये विविध प्रकारांनी वाजत आहेत व नगरांत जो आनंद (भरला) आहे त्याचे वर्णन केले जाणे अशक्य आहे ॥ १ ॥ सर्व लोक भरताच्या आगमना साठी प्रार्थना करीत म्हणत आहेत की भरत चटकन येवोत; म्हणजे नेत्रांचे साफल्य पावतील ॥ २ ॥ बाजारात रस्त्यांत, बोळांत घरिदारी (सर्वत्र) पुरुष व स्त्रिया आपापसांत म्हणत आहेत की ॥ ३ ॥ उद्यांच तर मुहूर्त आहे आता कुठे फार वेळ आहे ! तरी विधी आपल्या सर्व अभिलाषांचे सार (मुख्य इच्छा) पूर्ण करणारच ॥ ४ ॥ (एकदां) सोन्याच्या सिंहासनावर सीतेसह राम बसले की आपल्या मनातले (मनासारखे, पूर्ण) झाले ॥ ५ ॥
राज्यरसभंग प्रकरण
- केव्हा एकदा उजाडेल असे सर्व लोक (नगरात) म्हणत आहेत परंतु कुचाळकी करणारे देव विघ्नांची (राज्याभिषेकात विघ्न आणण्याची) प्रार्थना करीत आहेत. ॥ ६ ॥ अयोध्येतील आनंदोत्सव त्यांना मुळीच बघवत नाही (कारण) चोराला चांदणी रात्र आवडत नाहीच ॥ ७ ॥ शारदेला बोलावून (आवाहन करुन) वारंवार तिचे पाय धरुन, तिच्या पायांवर लोळण घेऊन ते विनवूं लागले ॥ ८ ॥ की आई ! आमची अति विपत्ती पाहून तू आजच्या आज असे कर की राम राज्याचा त्याग करून वनांत जातील व सर्व देवांचे (सर्व) कार्य साधेल ॥ दो०११ ॥

पस्तावत उभि विनंति परिसुनि । हिमनिशि झाले मी सरोजवनिं ॥
प्रार्थिति पाहुनि देव पुन्हां ते । दोष न अल्प यांत तुज माते ! ॥
विस्मय हर्ष न मुळिं रघुरावा । तुज सब रामप्रभाव ठावा ॥
सुखदुःखें, कर्में जीवां तव । जा किं अयोध्ये देव-हितास्तव ॥
धृत पद कितिदां भीड घातली । ’विबुध नीचधी’ गणुनि चालाली ॥
उच्चनिवास नीच कर्तूती । शकति न पाहुं परावि विभूती ॥
कार्य पुढिल मग आणि मानसीं । कुशल कवी विनवितील मजसी ॥
दशरथ-पुरिं ये चित्तिं सहर्षा । दुःसह दुःखद जणूं ग्रहदशा ॥

दो० :- कैकयि-दासी मंदधी नाम मंथरा जीस ॥
अयश-पेटि तिज करि गिरा फिरवुनि जाइ मतीस ॥ १२ ॥

देवांची विनंती ऐकून शारदा उभ्यानेच पश्चाताप करुं लागली की मी सरोवरातील कमल वनाला हिमरात्रच झाले ! ॥ १ ॥ (तिची ती दशा) पाहून देव पुन्हा प्रार्थना करतात की आई, यात तुझ्याकडे मुळीच दोष राहणार नाही ॥ २ ॥ रघुराज (राम) हर्षविषाद (विस्मय) रहित आहेत रामाचा सर्व प्रभाव तुम्ही जाणताच ॥ ३ ॥ बरें, जीवांना जी सुख दु:खे होतात ती त्यांच्या कर्माने मिळतात; म्हणून देवांच्या हितासाठी तूं अयोध्येत जा की ॥ ४ ॥ देवांनी वारंवार कितिदांतरी शारदेचे पाय धरले व तिला भीड घातली; तेव्हा देवांची बुद्धी नीच आहे असे समजून ती निघाली ॥ ५ ॥ विचार करते की यांचे निवासस्थान उच्च असून कृती मात्र अगदी नीच आहे; कारण यांना दुसर्‍यांचे ऐश्वर्य - सुख भरभराट बघवत नाही. ॥ ६ ॥ मग तिने पुढील कार्याचा विचार मनांत आणला की कुशल कवी (यामुळे) मला विनवणी करतील ॥ ७ ॥ (वाईटांतून हा स्वत:स मोठा लाभ होईल म्हणून देवकार्य करण्यास हरकत नाही) ती, हर्षित मनाने दशरथपुरीत जणूं दु:सह दु:खद ग्रहदशाच आली ॥ ८ ॥ मंथरा नावाची कैकेयीची एक मंदबुद्धी दासी आहे तिला अपयशाची पेटी बनवून शारदा बुद्धी फिरवून गेली ॥ दो० १२ ॥

शृंगारित पुर बघत मंथरा । मंजुल मंगल उत्सव-गजरा ॥
पुसे जनां कीं उत्सव कसला । राम-तिलक ऐकुनि उर जळला ॥
कुमति कुजाति विचारा ती करि । रात्रिंच होइ अकार्य् कशापरिं ॥
पाहुनि पोळें किराति कुटिला । कसें मिळे कीं चिंति युक्तिला ॥
भरतजननि-पासीं उदास गत । राणी हसत म्हणे कां दुश्चित ॥
देइ न उत्तरं घेइं उसासू । नारिचरित करि ढाळी आंसूं ॥
राणि हसे किं लांब तव जिभली । गमे लक्षणें शिक्षा दिधली ॥
तरि न वदे दासी अति पापिण । श्वास सोडि जणुं काळी सापिण ॥

दो० :- सभय पुसे कां वदसि ना ? कुशल राम महिपाल ॥
लक्ष्मण भ्ररत रिपुघ्न वद तैं कुबडी-उरिं जाळ ॥ १३ ॥

मंथरा दासीने पाहीले तो सर्व नगर शृंगारलेले दिसले व जिकडे तिकडे मंगलोत्सवांचा मंजुळ गजर ऐकू आला ॥ १ ॥ तिने लोकांना विचारले की कसला उत्सव आहे ? राम राज्याभिषेक होणार आहे हे ऐकताच तिच्या छातीत आग पेटली ॥ २ ॥ ती दुर्बुद्धि व नीच जातीची दासी विचार करु लागली की आज रात्रीच्या रात्री या कार्याचे बारा कसे बरे वाजवावे ? ॥ ३ ॥ एखादी कुटील भिल्लीण मधाचे मोठे पोळे (मोहोळ) लागलेले पाहून विचार करते की हे पदरात पाडुन घेण्यास काय युक्ती करावी बरं ? (तशी मंथरा विचार करुं लागली) ॥ ४ ॥ (मग कुबडी) उदास होऊन भरताच्या आईकडे गेली; तेव्हा राणी हसून म्हणाली की तू अशी दुश्चित - उदास का आहेस ? ॥ ५ ॥ परंतू ती काही उत्तर देईना, दीर्घ श्वास घेऊं लागली व नारीचरित्र करीत अश्रू ढाळूं लागली ॥ ६ ॥ तेव्हा राणी हसत हसत म्हणाली की, तुझी जीभ लांब आहे, म्हणून मला वाटते की लक्ष्मणाने तुला शिक्षा केली असावी ॥ ७ ॥ तरीसुद्धा ती दासी, महा पापीण, काही बोलेना, व जणूं काळ्या सापीणीसारखी जोराने श्वास सोडूं लागली ॥ ८ ॥ राणी भयभीत होऊन विचारते की तू का बोलत नाहीस ? राम, महिपाल (), लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न कुशल आहेत नां ? सांग पाहू तेव्हा (हे ऐकून) कुबडीच्या उरात जाळ झाला. ॥ दो० १३ ॥

कोण करी मज शिक्षा, कां बरं । माइ ! तोंड करुं कवणबळावर ॥
कोण कुशल रामाविण आज किं । ज्या जनेश करतो युवराज कि ॥
कौसल्येला अति उजवा विधि । पाहुन राहि न गर्व मनामधिं ॥
जाउन कां न बघा सब शोभा । पाहुन मम मन पावे क्षोभा ॥
पुत्रं विदेशिं तुम्हांहि न चिंता । असे नाथ वश, तुम्हीं मनितां ॥
प्रिय बहु निद्रा गाद्यां गिर्द्या । नेणां भूप कपट चातुर्या ॥
प्रिय वच, परी मलिन मन जाणत । गप्प रहा, राणी दरडावत ॥
घरफोडे ! कधिं असे वदसि जर । जीभ काढविन तव ओढुनि बरं ॥

दो० :- कुबडे काणे पांगळे कुटिल कुचाळचि खास ॥
स्त्री त्यांतहि दासी म्हणत भ्ररतजननि करि हास ॥ १४ ॥

मला कोण शिक्षा करणार व कां करील बरं ? बरं हे माई, मी तोंड तरी कुणाच्या बळावर करणार ? ज्याला जनाधिप आज युवराज करीत आहे त्या रामाशिवाय आज दुसरा कोण कुशल असणार ? ॥ २ ॥ विधाता कौसल्येला आज अत्यंत अनुकूल झाला आहे व हे पाहून गर्व तिच्या मनात मावत नाही. (व तिला पाहून कोणाच्या मनात गर्व उरत नाही) ॥ ३ ॥ तुम्ही जाऊन सगळी शोभा का नाही पहात ? (एकदा बघा तर खर्‍या), ती शोभा पाहून माझे मन तर क्षुब्ध झाले ॥ ४ ॥ तुमचा पुत्र तर विदेशात आहे आणि तुम्हाला काही सुद्धा चिंता नाही ! (कारण इतकेच की) तुम्हाला वाटते की (तुम्ही आपल्या मानता की) पती आपल्या मुठीत आहे ! ॥ ५ ॥ शय्येवर गाद्या - गिरद्यांत लोळत पडून झोपा काढणे तुम्हांला फार प्रिय आहे; (त्यामुळे) राजाचे कपट चातुर्य तुम्हाला कळत नाही ॥ ६ ॥ (कुबडीचे) वचन प्रिय वाटले पण राणीने जाणले की हिचे मन मलीन आहे (म्हणून) राणी तिला दरडावीत म्हणाली - आता गप्प रहा (तोंड बंद कर) ॥ ७ ॥ घरफोडे ! पुन्हा कधी असे बोललीस तर (लक्षात ठेव) तुझी ही जीभ मी ओढून काढवीन बरं (गय नाही करणार) ॥ ८ ॥ कुबडे, काणे व पांगळे लोक कुटील व कुचाळक्या करणारे असतात हे ठरलेलेच; त्यात तू स्त्री आणि त्यातही दासी ! असे म्हणून भरत - माता हसली ॥ दो० १४ ॥

प्रियवादिनि बोललें तुला जरि । स्वप्निंहि नहिं मज कोप तुझ्यावरी ॥
सुदिन सुमंगल, दायक तो बरं । तुझें वचन होइल जेव्हां खरं ॥
स्वामी ज्येष्ठ बंधु लघु सेवक । हा दिनकर-कुलिं शोभन दंडक ॥
राम तिलक जर सत्य सकाळीं । देउं माग वाटे तें आली ! ॥
कौसल्येसम माता सर्वहि । प्रिय रामाला स्वभाव सहजहि ॥
स्नेह विशेष करिति माझ्यावर । प्रेम-परिक्षा केली म्यां बरं ॥
विधि देइल जर जन्म कृपायुत । देवो सीता सून राम सुत ॥
राम मला प्रिय प्राणांहुनि तर । त्यांस तिलक कां क्षोभ तुला बरं ॥

दो० :- भरतशपथ तुज सत्यवद छल-कपटा टाकून ॥
हर्षसमयिं विस्मय करिशि हेतु टाक सांगून ॥ १५ ॥

प्रियवादिनी ! मी तुला रागाने बोलले (शिक्षा केली) हे खरे पण माझ्या मनात स्वप्नात सुद्धा तुझ्यावर कोप येणे शक्य नाही ॥ १ ॥ तू म्हणालीस ते ज्या दिवशी खरे तोच सुदिन व तोच मंगलदायक होय ॥ २ ॥ ज्येष्ठ पुत्र स्वामी व्हावा व त्याच्या धाकट्या भावांनी त्याचे सेवक बनावे अशीच सूर्यवंशातील सुंदर रीत आहे. ॥ ३ ॥ जर खरोखरीच उद्या सकाळी रामराज्याभिषेक असेल तर हे सखी ! तुला वाटेल ते माग मी तुला देते. ॥ ४ ॥ रामचंद्रांना सर्वच माता कौसल्यासारख्या (इतक्याच) सहज स्वभावानेच (हि) प्रिय आहेत. ॥ ५ ॥ (पण) ते माझ्यावर विशेष स्नेह इतरांपेक्षा (कौसल्ये पेक्षाही) करतात (आणि) मी ही (त्यांच्या) प्रेमाची प्रीतीची परीक्षा करुन पाहिली आहे. ॥ ६ ॥ कृपायुक्त होऊन विधाता जर जन्म देणार असेल तर त्याने (मला) राम पुत्र द्यावा व सीता सून द्यावी ॥ ७ ॥ मला तर राम प्राणांपेक्षाही अधिक प्रिय आहेत, त्यांचा राजतिलक (राज्याभिषेक सोहळा) आहे तर तुलाच क्षोभ होण्याचे कारण काय बरं ? ॥ ८ ॥ तुला भरताची शपथ आहे, लपवालपव व कपट टाकून खरं खरं बोल व हर्षाच्या वेळी तू विषाद करतेस ह्याचे कारण काय ते सांगून टाक. (मला ऐकू दे. कळू दे.) ॥ दो० १५ ॥

सकल एकदां आशा पुरली । अतां दुजी करुनी वदुं जिभली ॥
फोडाया शिर योग्य अभागें । भलें वदत अपणां कटु लागे ॥
बनवुनि सत्य असत्या वदते । ते प्रिय अपणां मी कटु गमतें ॥
तोंड पुजेपण मीहि करीन किं । ना तरि निशिदिन मौन धरीन कि ॥
करुनि कुरूप विधी परवश करी । उप्त उगवतें दत्त मिळे परि ॥
नृप हो कोणि अम्हां का हानी । सुटुन दासिपण होणं किं राणी ॥
योग्य जाळण्या स्वभाव अमचा । बघण्या क्षम ना तोटा तुमचा ॥
वदलों म्हणुन अल्पसें काहीं । क्षमणें देवी ! चूक महा ही ॥

दो० :- गोड गूढ कपटी वचें, स्त्री तामसमति राणि ॥
सुरमाया-वश, वैरिणिसि सुहृद् प्रतीती मानि ॥ १६ ॥

(कुबडी म्हणाली) एकदाच माझी सगळी आशा पुरी झाली. आता पुन्हा (काही) बोलायचं म्हणजे दुसरी जीभ करुनच बोललं पाहीजे ॥ १ ॥ माझं हे अभागी डोकं फोडुन टाकण्यालाच योग्य आहे कारण मी चांगले सांगत असता आपल्याला कडू - वाईट वाटले ॥ २ ॥ जे खोट्याचे खरे करुन बोलणारे आहेत ते तुम्हांला प्रिय - गोड वाटतात व मी कडू वाटते ॥ ३ ॥ (माझं तरी काय अडलयं !) मी सुद्धा आता तोंडपुजेपणाच करीत जाईन; नाहीतर आपली रात्रंदिवस मौनच राहीन की ॥ ४ ॥ विधात्याने कुरुप करुन मला पराधीन करुन ठेवली आहे परंतु जे पेरलेले असते तेच उगवते व दिले असेल तसे मिळते. ॥ ५ ॥ (त्यांस काही इलाज नाही) कोणी का राजा होईना त्यात आमची काय हानी आहे (कोणी राजा झाला तरी) दासीपणा सुटून मी राणी का होणार आहे ? (मात्र राणीपणा सुटून आपण दासी व्हाल) ॥ ६ ॥ आमचा हा स्वभाव आग लावण्यास योग्य आहे कारण तो तुमचा तोटा पाहण्यास समर्थ नाही. (तुमचे अहित पाहू शकत नाही म्हणून आमचा स्वभाव दुसर्‍यांस जाळण्यास योग्य आहे - हा गूढार्थ) ॥ ७ ॥ म्हणून तर आम्ही काही थोडेसे बोलून गेलो तरी देवी ! ही आमची मोठी चूक झाली ती आपण क्षमा करावी (आता अशी चूक होऊ नये म्हणून मौन राहू म्हणजे झाले .) ॥ ८ ॥ गोड (प्रिय) गूढ व कपटी वचनांमुळे व सुरमायावश झाल्याने स्त्री तामस बुद्धी राणी वैरीणीला सुहृद समजली आणि तिच्यावर विश्वास ठेवती झाली. ॥ दो० १६ ॥

घडि घडि सादर तिलाल विचारित । शबरी-गानिं मृगी जाणुं मोहित ॥
जेविं भावि तेवीं मति फिरली । घाव चुके न किं दासि हर्षली ॥
पुसा तुम्हीं भय वदण्या गमतें । घरफोडी मज दिलें नाम तें ॥
प्रचिति करुनि नव कुभांड रचते । पुर-साडेसाती तैं वदते ॥
सीता राम म्हणां प्रिय राणी । रामा प्रिय तुम्हिं सत्यचि वाणी ॥
असे प्रथम; ते दिवस गत अतां । मित्र होति रिपु काळ बदलतां ॥
भानु कमल-कुल-पोषण-कर्ता । होइ जलविण त्यां संहर्ता ॥
सवत बघे करुं तव उन्मूलन । अडवा, घालुन यत्‍न-सुकुंपण ॥

दो० :-निंश्चिंत चि सौभाग्य बल् निजवश मानां राव ॥
चित्त मलिन-मुख मधुर नृप अपला उजू स्वभाव ॥ १७ ॥

राणी वारंवार आदराने तिला अशी विचारीत आहे की जणू शबरीच्या - भिल्लिणीच्या गाण्याने हरिणीच मोहीत झालेली आहे.॥ १ ॥ प्रारब्धाप्रमाणे राणीची बुद्धी फिरली व आपला घाव चुकला नाही असे वाटून कुबडीला हर्ष झाला ॥ २ ॥ तुम्ही मला विचारता पण मला बोलण्याची भीती वाटते कारण तुम्ही आधीच माझे घरफोडी हे नांव ठेवले आहे. ॥ ३ ॥ (या प्रमाणे बोलून राणीच्या मनात) विश्वास उत्पन्न करुन तिने नवीन कुभांड रचले व अयोध्यापुरीची साडेसाती बोलू लागली ॥ ४ ॥ राणीसाहेब ! सीता व राम तुम्हाला प्रिय व रामाला तुम्ही प्रिय असे जे तुम्ही म्हणालात ते अगदी खर. ॥ ५ ॥ (पण) असे पाहिल्याने - पूर्वी होते (असे); आता ते दिवस गेले काळ बदलला म्हणजे मित्र शत्रू बनतात (व शत्रू मित्र बनतात) ॥ ६ ॥ सूर्य कमलांच्या समूहांचे पोषण करणारा असतो (हे खरे) पण तोच पाण्याच्या अभावी त्यांना जाळून खाक (राख) करतो ॥ ७ ॥ तुमची सवत तुम्हाला मुळापासुन उपटून टाकू पहात आहे. तरी (वेळीच) उपाय रुपी दृढ कुंपण घालून तिला अडवा (तिच्या विरुद्ध प्रयत्‍न करुन आपले संरक्षण करा). ॥ ८ ॥ सौभाग्याच्या बळावर तुम्ही अगदी निश्चिंत आहात, व राजा आपल्याला वश आहे असे तुम्ही मानता पण राजा चित्ताने मलीन (पाप, कपटी) असून तोंड मात्र गोड आहे व तुमचा स्वभाव आहे सरळ ॥ दो० १७ ॥

चतुर गभीर राम-माता ही । स्वार्थ साधि जैं सुसंधि पाही ॥
आजोळीं भरतास धाडले । राम जननिमतिं जाणां घडलें ॥
सकल सवति मज ठीक सेविती । पतिबल-गर्वित भरतजननि ती ॥
कौसल्ये मनिं तुम्हिं बहु सलतां । कपट चतुर येइ न ओळखतां ॥
प्रेम नृपाचे फार तुम्हांवरि । पाहु न शकते सवती-मत्सरिं ॥
कपट रचुनि भूपा वश वळवी । रामाभिषेक-लग्ना ठरवी ॥
या कुळिं उचित राम-अभिषेकहि । सर्वां रुचतो मला विशेखाहि ॥
बघुनि भविष्य भयें चळचळतें । देवो दैव उलट तिज फळ तें ॥

दो० :- रचुनि कथा कोटी कुटिल कपटाचा करि बोध ॥
सवति कथा शत सांगुनी वाढवि मनीं विरोध ॥ १८ ॥

रामाची आई सुद्धा चतुर (धूर्त) व गंभीर (पाताळयंत्री) आहे सुसंधी पाहून तिने आपला स्वार्थ साधला ॥ १ ॥ राजाने भरतास आजोळी पाठविले ते राममातेच्या मतानेच असे तुम्ही नक्की समजा ॥ २ ॥ सगळ्या सवती माझी चांगली सेवा करतात (पण) भरताची आई मात्र पतीच्या बळाने गर्विष्ठ (असल्याने घमेंडीत) आहे. ॥ ३ ॥ (म्हणून) कौसल्येच्या मनात तुम्ही फार सलत आहांत; पण कपट करण्यात चतुर (कपट चतुर) असणारी माणसे ओळखता येत नाहीत (त्यांचे कपट ओळखतां येत नाही) ॥ ४ ॥ राजाचे तुमच्यावर फार (विशेष) प्रेम आहे हे तिला सवतीमत्सराने पाहवत नाही ॥ ५ ॥ म्हणून तिने कपट रचून राजांना वश करुन घेतले आणि रामराज्याभिषेकासाठी मुहुर्त सुद्धा ठरवला ॥ ६ ॥ या कुळाला योग्यच आहे की रामाला राज्याभिषेक करावा सर्व लोकांना ते प्रिय आहे व मला तर विशेषच बरे वाटते ॥ ७ ॥ (परंतु) भविष्यकाळाकडे पाहिले म्हणजे भयाने थरकांप सुटतो ! ते फळ दैव तिलाच उलट देवो ॥ ८ ॥ पुष्कळ कुटिल काल्पनिक कथा बनवून सांगून कपटाची जाणीव (बोध) करुन दिली व सवतींच्या कितीक गोष्टी सांगून राणीच्या मनात विरोध वाढविला (विरोध वाढेल अशा सांगितल्या) ॥ दो० १८ ॥

येइ भाविवश मनीं प्रतीती । पुन्हां घालुनी शपथ पुसे ती ॥
काय पुसां, तुम्हिं अझुनि न जाणां । कळतें निज हित अहित पशूंना ॥
गत पंध्रा दिन सजिती साज किं । तुम्हां कळे मजपासुनि आज किं ॥
राज्यिं नेसणें खाणें तुमजें । सत्य सांगणें चूक न अमचें ॥
मृषा रचुनि जर सांगुं आपणां । विधि करील आम्हां किं शासना ॥
होति राम युवराज उद्यां जर । विपद्‌बी्वीज विधि पेरि तुम्हां तर ॥
वज्रलेख वदुं संशय ना तिल । झालां भामिनि माशि दुधांतिल ॥
दास्या सूनु-समेत करा जर । अन्य उपाय न, घरीं रहा तर ॥

दो० :-कद्रू विनते तुम्हां तशि कौसल्या छळि जाण ॥
भरत बंदिगृह सेविती लक्ष्मण राम-दिवाण ॥ १९ ॥

दैववशात कैकयीच्या मनात प्रतीती आली (पूर्ण खात्री झाली) व तिने पुन्हा शपथ घालून विचारले ॥ १ ॥ (तेव्हा दासी म्हणाली) काय विचारता काय ? अजून नाही कळलं तुम्हाला आपले हित अहित पशूंना सुद्धा कळते ॥ २ ॥ गेले पंधरा दिवस तयारी चालली आहे की; परंतु तुम्हाला आजच (आणि ते ही) माझ्या कडूनच कळले ॥ ३ ॥ तुमच्या राज्यात आम्ही खावं - प्यावं व वस्त्र - प्रावरणे वापरावी मग आम्ही (तुमच्या हितासाठी निर्भयपणे) सत्य सांगणे ही काही आमची चूक नाही. (दोष नाही, कर्तव्यच आहे) ॥ ४ ॥ जर काही असत्य बनवून सांगितल, तर दैव आम्हाला शिक्षा करीलच की ॥ ५ ॥ उद्यां जर का रामाला राज्याभिषक झाला तर दैवाने तुमच्यासाठी विपत्तीचे बीज पेरलेच (म्हणून समजा) ॥ ६ ॥ मी वज्रलेख म्हणून सांगते, तिळमात्र संशय नाही, की भामिनी ! तुम्ही दुधातील माशी झालातच (म्हणून समजा) ॥ ७ ॥ तुम्ही तुमच्या मुलासह जर दास्य केलेत (सवतीचे) तरच घरात रहाल (रहाता येईल) नाहीतर दुसरा काहीसुद्धा उपाय नाही॥ ८ ॥ कद्रूने विनतेला छळली तशी कौसल्या तुम्हांला छळील व भरतास बंदीवास भोगावा लागेल आणि लक्ष्मण रामाचे दिवाण होतील हे लक्षात ठेवा ॥ दो० १९ ॥

ऐकत कटु वच कैकय-तनया । कांहि न वदवे सुकलीे सभया ॥
घाम सुटे कदली-सम कांपत । कुबडी रसने दशनीं चापत ॥
कपट कहाण्या किती किति वदे । राणिस बहु समजावि धीर दे ॥
कर्म फिरे प्रिय गमे कुचाळी । स्तवी बकिस मानुनी मराळी ॥
बघ मंथरे खरें वच तव तों । उजवा नेत्र नित्य मम लवतो ॥
दुःस्वप्नें प्रतिरात्रीं पडतीं । मोहें केलीं तुज न उघड तीं ॥
काय करूं मी उजू स्वभावें । सखि ! नेणें कधिं उजवें डावे ॥

दो० :- माझं चालतां अझुन कृत कोणा अहित न कांहि ॥
कवण अघ किं मज सकृत विधि दे दुःसह दुःखांहि ॥ २० ॥

ते कटू भाषण ऐकताच कैकयतनया भयाने सुकून गेली व तिला काहीही बोलवेना ॥ १ ॥ तिच्या अंगाला दरदरुन घाम सुटला व ती केळीसारखी थरथरा कापू लागली तेव्हा कुबडीने आपली जीभ दातांनी चावली ॥ २ ॥ तिने राणीला कितितरी कपट कहाण्या सांगून समजूत घातली व धीर दिला ॥ ३ ॥ कर्म फिरल्याने (दासीने केलेली) कुचाळकी तिला प्रिय वाटली. व बगळीला हंसी समजून तिची प्रशंसा करु लागली ॥ ४ ॥ हे पहा मंथरे तू म्हणतेस तेच खरे आहे माझा उजवा डोळा रोज लवतो आहे ॥ ५ ॥ रोज रात्री मला वाईट स्वप्ने पडतात पण माझ्य़ा मोहाने मी तुझ्याजवळ प्रगट केली नाहीत ॥ ६ ॥ सखी ! मी तरी काय करणार ! माझा स्वभावच पडला सरळ (त्यामुळे) डावे उजवे मला कधीच माहीत नाही ॥ ७ ॥ माझं चालत असतां आजपर्यंत मी कोणाचे काही सुद्धा वाईट केल नाही (असे असून) असे कोणते पाप मी केले की ज्यामुळे विधात्याने एकदमच मला हे दु:सह दु:ख दिले ? ॥ दो० २० ॥

पितृगृहिं गाळिन जन्म हवा तरि । सवत दास्य ना घडे मरण जरिं ॥
जगवि शत्रु-वश दैव जयाला । मरण बरें जगण्याहुन त्याला ॥
राणी वदे दीन बहु वचना । करि कुबडी स्त्रीमाया-रचना ॥
असं कसं म्हणां उणें मनिं मानुनि । दुणें भाग्य सुख अपणां लागुनि ॥
जी अपलें अति अहित चिंतिते । तीच घेइ फळ पदरीं अंतिं तें ॥
कुमत कानिं ये हें जैं स्वामिनि । भूक न दिवसा, नीज न यामिनिं ॥
कथिति ठाम पुसतां गणकांनां । भरत होति नृप सत्यचि माना ॥
वदुं भामिनि जर करां उपाया । असति तुम्हां सेवावश राया ॥

दो० :- कूपिं पडेन हि म्हणसि तर त्यजुं पति पुत्र शकेन ॥
वदसि दुःख मम बघुनि अति स्वहिता कसं न करेन ॥ २१ ॥

मी हवा तर वडिलांच्या घरी जन्म गाळीन (घालवीन कसातरी) परंतु मरण ओढवले तरी सवतीचे दास्य माझ्याकडून घडणार नाही ॥ १ ॥ दैव ज्याला शत्रूच्या अधीन ठेऊन जगविते त्याला जगण्यापेक्षा मरण बरे वाटते ॥ २ ॥ य़ा प्रमाणे राणी दीन वाणीने पुष्कळ बोलली तेव्हा (ते ऐकून) कुबडीने स्त्री मायेची रचना केली ॥ ३ ॥ (राणीसाहेब !) काहीतरी भलतेच मनात आणून असे कसे म्हणता ? तुम्हाला तर दुप्पट सुख व भाग्य प्राप्त होणार आहे ॥ ४ ॥ जी तुमचे अति अहित चिंतीत आहे, तिलाच शेवटी ते फळ पदरात घ्यावे लागणार आहे ॥ ५ ॥ स्वामिनि ! जेव्हा मी हे कुमत ऐकले तेव्हापासून मला दिवसा ना भूक, रात्री ना झोप (असे झाले होते) ॥ ६ ॥ मी ज्योतिषांना विचारले तेव्हा ते निश्चित सांगतात की भरत राजे होणार हे सत्य माना ॥ ७ ॥ भामिनि ! तुम्ही जर करणार असाल तर उपाय सांगते; (कारण) तुम्ही सेवेने महाराजांना वश करुन ठेवले आहेत. ॥ ८ ॥ (राणी म्हणाली) तू सांगशील तर मी आडांत उडी टाकीन आणि पति व पुत्र यांचा सुद्धा त्याग करुं शकेन; माझे अत्यंत दु:ख पाहून तू सांगत असता माझ्याच हितासाठी मी कसे करणार नाही ? ॥ दो० २१ ॥

घे कुबडी कैक‍इ-कबुलीला । लावि उपलिं उरिं कपट सुरीला ॥
कळे न राणिस निकट घात तो । बलि-पशु भक्षी हरित घास तो ॥
श्रावणिं वचन मृदु अंतिं भयानक । घालि मधांतुनि जणुं विष घातक ॥
शुद्ध असे किं न, वदली दासी । स्वामिनि कथित कथा मजपासी ॥
भूपापासीं ठेव दोन वर । मागा निववा हृदय आज बर ॥
सुता राज्य रामा वनवासा । द्या, घ्या सकल सवति उल्हासा ॥
भूपति राम-शपथ जैं घेईल । तैं मागा मग वचन न टळतिल ॥
होइ अकाज आज निशि सरतां । मम वच माना प्राणां-परतां ॥

दो० :- करि कुघात पापिण म्हणे जावें कोपगृहास ॥
सावध साधा सर्व, नच धरा सहज विश्वास ॥ २२ ॥

कुबडीने कैकयीची कबूली घेतली व आपल्या हृदयरुपी पाषाणावर (सहाणेवर) कपट सुरीला धार लावीत आहे ॥ १ ॥ बळी द्यावयाचा पशु जसा हिरवा चारा खातो (पण) तो आपला घात जाणत नाही तसा राणीला आपला तो (भावीजवळ आलेला) घात कळत नाही ॥ २ ॥ (कुबडीचे) भाषण कानास गोड लागणारे पण परिणामीं भयंकर आहे की जणूं घातक वीष मधात घालून देत आहे ॥ ३ ॥ दासी म्हणाली की स्वामिनी ! काही (मागली पुढली) शुद्ध (आठवण) आहे की नाही ? तुम्ही एकदा मजपाशी गोष्ट काढली होतीत ॥ ४ ॥ की राजाजवळ दोन वर ठेव म्हणून ठेवले आहेत, ते आज मागून घ्या व आपले हृदय चांगले निववा. ॥ ५ ॥ पुत्राला राज्य व रामाला वनवास द्या. आणि सर्व सवतींना झालेला उल्हास (आनंद व उत्साह) तुम्ही एकट्या लुटा. ॥ ६ ॥ मात्र भूपती ज्यावेळी रामाची शपथ घेईल त्या वेळीच मागा हो ! म्हणजे त्याची वचने बदलणार नाहीत ॥ ७ ॥ आजची रात्र अशीच गेली की घात झालाच म्हणून समजा, म्हणून (सांगते ते) माझे म्हणणे प्राणांपलिकडे माना ॥ ८ ॥ पापिणीने अति विश्वासघात केला व म्हणाली की तुम्ही आता कोपगृहात जा कशा, आणि फार सावध राहून सर्व कार्य साधा; एकाएकी (सहज, राजाच्या बोलण्यावर) विश्वास ठेवू नका. ॥ दो० २२ ॥

प्राणप्रिय गणि कुबडिस राणी । घडि घडि महाह मतिस वाखाणी ॥
तुज सम मम हित नही संसारां । जात वहात देसि आधारा ॥
जरि विधि वांछा पुरवि सकाळीं । नेत्र-पुतळि तुज करीन आली ॥
दासीला देउनि बहु आदर । कैकइ। कोपभवनिं गत सादर ॥
बीज विपत् वर्षा ऋतु किंकरि । कैकै कुमतिच बने भूमि बरि ॥
पडत कपट जळ अंकुर फुटतो । वर युगदल फल् अंतिं दुःख तो ॥
क्रोध साज सजुनी भुविं पडली । राज्य करत कुमतिनें ठकवली ॥
धामधूम पुरिं राज-निवासीं । कांहिं कुचाळि न कळे कुणासीं ।

दो० :- प्रमुदित पुर नर नारि सब सजिति सुमंगल सारिं ॥
प्रविशति कोणी निघतिं जन दाटी रजद्वारिं ॥ २३ ॥

राणीने कुबडिला प्राणप्रिय मानली व तिच्या मोठ्या बुद्धिमत्तेची वारंवार प्रशंसा केली ॥ १ ॥ या संसारात माझे हित करणारे तुझ्यासारखे कोणी नाही, मी वहात जात असता तूं मला आधार दिलास ॥ २ ॥ उद्या सकाळी दैवाने जर माझी इच्छा पूर्ण केली तर हे सखी ! मी तुला माझ्या डोळ्यातली बाहुली (पुतळी) करुन ठेवीन बरं ! ॥ ३ ॥ (त्याप्रमाणे) दासीला नानाप्रकारे आदर देऊन कैकेयी कोप-भवनात गेली ॥ ४ ॥ विपत्ती हे बीज आहे दासी हा पावसाळा आहे व कैकयीची कुमति ही चांगली भूमी बनली ॥ ५ ॥ कपट रुपी पाऊस पडताच अंकुर फुटला; दोन वर ही दोन दले झाली व शेवटी दु:ख रुपी फळ मिळणार ॥ ६ ॥ क्रोधाचा सर्व साज सजून नुसत्या जमिनीवरच राणी पडून राहीली राज्य करीत असता स्वत:च्या कुमतीनेच तिला ठकवली ॥ ७ ॥ इकडे नगरात व राजनिवासात (उत्सवाची) धामधूम चालू आहे व (तिकडे) काय कुचाळकी केली जात आहे हे कोणास काहीच कळले नाही. ॥ ८ ॥ नगरातील पुरुष व सर्व स्त्रिया अत्यंत आनंदित होऊन सर्वजण सर्व प्रकारच्या मंगल वस्तू सजवीत आहेत कोणी राजद्वारांतून आत जात आहेत तर कोणी बाहेर पडत आहेत व राजद्वारापाशी लोकांची खूपच गर्दी झाली आहे. ॥ दो० २३ ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP