॥ श्रीरामचरितमानस ॥

(मराठी अनुवाद)

॥ उत्तराकाण्ड ॥

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥


अध्याय १० वाDownload mp3

लोकीं लोकीं भिन्न विधाते । भिन्न विष्णु शिव मनि दिक् त्राते ॥
गंधर्वहि वेताळ भूत नर । व्याळ निशाचर पशु खग किंनर ॥
देवदनुजगण जाती नाना । जीवां सकलां आनहि वाणा ॥
महि सरि सागर सर गिरि नाना । तिथें प्रपंच सकल आनाना ॥
सर्वहि अंडकोषिं निज रूप । पाहें; अनुपम वस्तू अमूप ॥
भिन्न भुवनिं भिवनीं कोसलपुर । शरयू भिन्न भिन्न नारी नर ॥
श्रुणु, दशरथ कौसल्या माता । विविध रूप भरतादिक ताता ! ॥
प्रति ब्रह्मांडिं राम अवतारा । बालविनोदां बघें अपारां ॥

दो० :- भिन्न भिन्न सब पाहिलें अति विचित्र हरियान ॥
फिरत अमित भुवनीं प्रभु राम न दिसले आन ॥ ८१ ॥
तें शिशुपण ती शोभा ते कृपालु रघुवीर ॥
भुवनिं भुवनिं फिरलो बघत प्रेरित मोह समीर ॥ ८१म ॥

प्रत्येक ब्रह्मांडात भिन्न भिन्न ब्रह्मदेव, भिन्न, विष्णू, शंकर, मनु, दिक्पाल इ. भिन्न आहेत. ॥ १ ॥ गंधर्व, भूते, वेताळ, मनुष्य सर्प निशाचर, पशु, पक्षी, किन्नर देव दानव समुदाय इ. सर्व नाना जातींचे आहेत व सर्वच जीव भिन्न प्रकारचे आहेत. ॥ २-३ ॥ जमिन, सागर, नद्या, तलाव, व पर्वत नाना प्रकारचे असून (प्रत्येक ब्रह्मांडात) माझे स्वत:चे रुपही भिन्न दिसले, आणि पुष्कळ वस्तु दिसल्या ॥ ५ ॥ प्रत्येक ब्रह्मांडात अयोध्या पुरी भिन्न, शरयू, नरनारीही भिन्न प्रकारचे दिसले ॥ ६ ॥ तात ! ऐक प्रत्येक ब्रह्मांडातील दशरथ, कौसल्या माता, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न बंधू दिसले पण त्यांची रुपे भिन्न होती ॥ ७ ॥ प्रत्येक ब्रह्मांडात झालेला रामावतार पाहीला व अपार बाललीलाही पाहील्या ॥ ८ ॥ हे हरियान ! मी पाहीलेले सर्व भिन्न भिन्न व अति विचित्र होते, मी अगणित ब्रह्मांडात भटकलो, पण कोणत्याही ब्रह्मांडात प्रभुराम निराळे दिसले नाहीत ॥ दो० ८१ म ॥ प्रत्येक ब्रह्मांडात तेच शिशुपण, तीच शोभा व तेच कृपाळु रघुवीर मी ब्रह्मांडा – ब्रह्मांडात माया (मोह) समीराने प्रेरित असा मला पाहीले ॥ दो० ८१ म ॥

मी भ्रमतां ब्रह्मांडिं अनेक । गेले जणूं कल्प शत एक ॥
आलो फिरत निजाश्रम जेथें । कांहिं काळ राहिलोहि तेथें ॥
निज प्रभु जन्म अयोध्यें, कळला । धावत निघें प्रेम मुद भरला ॥
जाउनि जन्म महोत्सव पाहें । जसा प्रथम मी कथिला आहे ॥
दिसली राम‍उदरि जग नाना । बघणे शक्य, न वर्णन जाणा ॥
तिथें पुन्हां बघुं राम सुजाणा । मायापति कृपाल भगवाना ॥
घडि घडि केला विचार मी अति । व्यापित मोहमळें माझी मति ॥
दोन घडींत मला सब दिसलें । मम मन मोहविशेषें श्रमलें ॥

दो० :- व्याकुळ बघति कृपाल मज विहसति तैं रघुवीर ॥
हसतां क्षणिं मी मुखांतुनि येइं निघुनि मतिधीर ॥ ८२रा ॥
ती शिशुलीला मजसवें करुं लागति मग राम ॥
बहुतपरीं समजावितां मना नव्हे विश्वाम ॥ ८२म ॥

मी अगणित ब्रहमांडात भ्रमण करीत असता जणूं शंभर कल्पे निघून गेली ॥ १ ॥ मग जिथे माझा आश्रम आहे तेथे भ्रमत आलो व काही काळ तेथे राहीलोही ॥ २ ॥ जेव्हा कळले की माझ्या प्रभूचा जन्म अयोध्येत झाला तेव्हा मी प्रेमानंदाने भरुन धावत निघालो ॥ ३ ॥ आणि जाऊन जन्ममहोत्सव पाहीला, जसा मी पूर्वी वर्णन केला आहे ॥ ४ ॥ रामाच्या उदरांत मला अगणित ब्रह्मांडे दिसली, ती पाहणे शक्य होते पण वर्णन करणे शक्य नाही, हे लक्षांत असूं द्या ॥ ५ ॥ तिथे पुन्हा मायापति कृपाळु सुजाण भगवान मला दिसले ॥ ६ ॥ मी वारंवार पुष्कळ विचार केला, परंतु माझी बुद्धी मोहरुपी मळाने व्यापली होती ॥ ७ ॥ मला प्रभुच्या उदरांत जे काही दिसले ते (बाह्य जगातल्या केवळ) दोन घटकांत दिसले (पण तेवढ्याने) माझे मन विशेष प्रकारच्या मोहाने अगदी थकून गेले ॥ ८ ॥ मी व्याकूळ झालो आहे असे पाहून (उदरातील अयोध्येतले) रघुवीर मोठ्याने हसले, आणि हे धीरमती ! हसल्याबरोबर मी प्रभुच्या मुखातून बाहेर पडलो ॥ दो० ८२ रा ॥ तेव्हा प्रभू ती पूर्वीचीच शिशुलीला माझ्याबरोबर करु लागले मी आपल्या मनाला नाना प्रकारे समजावले पण मनाला विश्रांती मिळाली नाही ॥ दो० ८२ म.॥

बघुनि चरित हें, ती प्रभुता ही । स्मरतां, देह दशा ना राही ॥
पडलों महिं मुखिं वदवत नाहीं । त्राहि ! आर्तजनपाला त्राही ! ॥
प्रेमाकुल बघुनी प्रभु मजला । आवरिती निज माया प्रबला ॥
प्रभु मम शिरिं करसरोज ठेविति । दीन दयाल दुःख सब वारिति ॥
करिति राम मज विगतविमोह । सेवक सुखद कृपा संदोह ॥
प्रभुता प्रथम विचारुनि सारी । मम मनिं होई हर्ष अति भारी ॥
प्रभुची बघुनि भक्तवत्सलता ॥ प्रीति अधिक उपजे मम चित्ता ॥
सजल नयन पुलकित कर जुळले । प्रभुला नानापरीं विनवलें ॥

दो० :- श्रवुनी प्रेमळ वाणी बघुनि दीन निज दास ॥
वचन सुखद गंभीर मृदु वदले रमानिवास ॥ ८३रा ॥
काकभुशुंडी माग वर मी प्रसन्न अति जाण ॥
अष्टसिद्धि ऋद्धी सकल मोक्ष सकल सुखखाण ॥ ८३म ॥

हे (प्राकृत शिशुसारखे) चरित्र पाहून आणि तो पाहीलेला प्रभाव आठवून माझे देहभान हरपले ॥ १ ॥ हे आर्तजन पालका ! त्राहि ! त्राहि ! असे म्हणत मी जमिनीवर पडलो व मुखातून शब्द निघेना ॥ २ ॥ मला प्रेमाने विह्वळ झालेला पाहून प्रभूंनी आपली प्रबल माया आकर्षुन घेतली ॥ ३ ॥ माझ्या डोक्यावर आपले करकमल ठेवले आणि दीनदयाळ रामचंद्रांनी माझे सर्व दु:ख हरण केले ॥ ४ ॥ सेवकांना सुख देणार्‍या कृपाघन रामचंद्रांनी मला मोहमुक्त केले ॥ ५ ॥ पूर्वीच्या त्या सर्व प्रभुतेचा विचार केला तेव्हा मला खूप आनंद झाला ॥ ६ ॥ प्रभुची भक्तवत्सलता पाहून माझ्या हृदयांत अधिक प्रीती उत्पन्न झाली ॥ ७ ॥ नेत्रांत अश्रू तरळले व पंख फुलले, हात जोडून मी प्रभुला नाना प्रकारांनी विनंती केली ॥ ८ ॥ माझी प्रेमळ वाणी ऐकून व हा आपला दास दीन झाला आहे हे जाणून श्रीलक्ष्मीनिवास रघुपती गंभीर, सुखदायक व मधुर वचन बोलले ॥ दो० ८३ रा ॥ काकभुशुंडी ! मी अति प्रसन्न आहे असे जाणून वर माग (अणिमादिक) अष्ट महासिद्धी, सगळ्या ऋद्धी व सर्व सुखांची खाण मोक्ष माग ॥ दो० ८३ म ॥

ज्ञान विवेक विरति विज्ञाना । मुनि दुर्लभ गुण जे जगिं नाना ॥
आज देउं सब संशय नाहीं । माग रुचेल मना जें कांहीं ॥
प्रभु वचने प्रेमें अति भरलो । मनिं अनुमाना करू लागलो ॥
वदले प्रभु ’घे सब सुख’ जरी । ’घे मम भक्ति’ न वदले तरी ॥
भक्तिहीन गुण सब सुख तैसें । विना लवण शाकादिक जैसें ॥
भजनहीन सुख कवणे काजा । असं चिंतुनि वदलो खगराजा ! ॥
प्रभु! जर हो‍उनि प्रसन्न द्या वर । मजवर करतां कृपा स्नेह जर ॥
वर मागतो रुचे तो स्वामी ! । तुम्हिं उदार हृदयांतर्यामी ॥

दो० :- अविरल भक्ति विशुद्ध तव जी श्रुति पुराण गाति ॥
शोधिति मुनि योगीश, कुणा प्रभु प्रसादें प्राप्ति ॥ ८४रा ॥
भक्त कल्पतरु ! प्रणतहित ! कृपासिंधु ! सुखधाम ॥
तीच भक्ति निज मला प्रभु ! करुनि दया द्या राम ॥ ८४म ॥

ज्ञान, विवेक, वैराग्य विज्ञान आणि मुनींना सुद्धा दुर्लभ असणारे गुण आज मी तुला देईन यात मुळीच संशय नाही, तुझ्या मनाला जे आवडत असेल ते काहीही माग ॥ १-२ ॥ प्रभुच्या या वचनाने मी प्रेमाने अगदी भरुन गेलो व मनात अनुमान करु लागलो की ॥ ३ ॥ सगळे सुख मागून घे जरी प्रभु म्हणाले तरी, माझी भक्ती मागून घे असे काही म्हणाले नाहीत ॥ ४ ॥ मीठ नसलेले भाज्या इ. अन्न जसे असावे, तसेच भक्तीवाचून सर्व सुख व सर्व गुण ! ॥ ५ ॥ भक्तीहीन सुख काय कामाचे ? असा विचार करुन हे खगराजा ! मी म्हणालो की ॥ ६ ॥ हे प्रभु ! जर आपण प्रसन्न होऊन मला वर देत असाल व जर मजवर आपण कृपा, स्नेह करता तर ॥ ७ ॥ माझ्या मनाला जो आवडतो तो वर मी मागतो, तुम्ही उदार माझ्या हृदयात अंतर्यामी रुपाने राहून सर्व जाणताच ॥ ८ ॥ तुमच्या ज्या प्रगाढ व विशुद्ध भक्तीची प्रशंसा वेदपुराणे करतात आणि जिला मुनी व योगीश्रेष्ठ शोधत असतात, पण जी प्रभूच्या प्रसादाने अनुग्रहाने कोणा एखाद्यालाच मिळते ॥ दो० ८४ रा ॥ तीच तुमची सुखधाम भक्ती, हे प्रभु ! मनोरथ पूर्ण करणार्‍या कल्पवृक्षा, शरणागतांचे हित करणार्‍या हे कृपासागर ! हे सुखधाम रामचंद्रा ! (मजवर) दया करुन मला द्या. ॥ दो० ८४ म. ॥

एवमस्तु म्हणूनी रघुनायक । वदले वचन परम सुखदायक ॥
श्रुणु वायस तूं सहज शहाणा । मागसि कां न अशा वरदाना ॥
याचित भक्ति सकल सुखदानी । महाभाग तुजसम नहिं कोणी ॥
जी मुनि यत्‍नें कोटि न पावति । जे जप योगानलिं तनु जाळति ॥
मी प्रसन्न तव बघुनि चतुरता । प्रिय अति मजला, भक्ति याचिता ॥
श्रुणु विहंग मम अनुग्रह बळें । तव हृदिं वसतिल शुभ गुण सगळे ॥
ज्ञान भक्ति विज्ञान विरागा । योग चरित्र सहस्य विभागां ॥
जाणसि तूं सकलांचे भेदहि । कृपें मदीय, न साधन खेदहि ॥

दो० :- भ्रम माया संभूत मुळिं व्यापिति अतां तुला न ॥
ब्रह्म अनादी अगुण अज मला गुणाकर जाण ॥ ८५रा ॥
भक्त मला प्रिय संतत श्रुणु सावध हे खग ! ॥
मनकृतिवचनें मम पदीं कर अविचल अनुराग ॥ ८५म ॥

तथास्तु असे रघुनायक म्हणाले व परम सुखदायक वचन बोलले की ॥ १ ॥ वायसा ! ऐक तू स्वभावताच शहाणा आहेस, मग असे वरदान का नाही मागणार ? ॥ २ ॥ सर्व सुख देणारी भक्ती तू मागितलीस, तुझ्यासारखा महाभाग्यवान जगात कोणी नाही ॥ ३ ॥ जे मुनी जप आणि योग यांच्या अग्नीने देह जाळीत असतात, त्यांना सुद्धा जी भक्ती कोट्यावधी प्रयत्नांनी मिळत नाही ॥ ४ ॥ ती भक्ती तू मागितलीस, ही तुझी चतुरता मला अतिशय प्रिय वाटली व ती पाहून मी प्रसन्न झालो आहे (कारण भक्ती मागणारा मला अति प्रिय होतो) ॥ ५ ॥ हे विहंगा ! ऐक माझ्या अनुग्रहाच्या बळाने सगळे शुभ गुण आणि चरित्र रहस्य या सर्वांचे विभागश: व या सर्वांचे भेद तू माझ्या कृपेने जाणशील, त्यासाठी तुला साधनांचे कष्ट पडणार नाहीत. ॥ ७-८ ॥ आता मायेपासून उत्पन्न होणारे भ्रम तुला मुळीच बाधा करणार नाहीत. तू मला अनादि, गुणातीत, जन्मरहित व गुणसागर असे ब्रह्म जाण ॥ दो० ८५ रा ॥ मला भक्त सदा सर्वदा प्रिय असतात (म्हणून) हे काक ! सावधपणे ऐक ! मन – कृती व वाणीने माझ्या चरणी अगदी अढळ प्रेम कर ॥ दो० ८५ म ॥

श्रुणु मम बाणा अतां विमल अति । सत्य सुगम निगमागम वानति ॥
निज सिद्धान्त सांगतो तुजला । श्रुणु, मनिं धर, सब तज भज मजला ॥
मम माया संभव संसारीं । जीव चराचर किती प्रकारीं ॥
प्रिय मज सगळे म्यां उपजविले । प्रिय इतरांहुनि नर मज गमले ॥
त्यांत विप्र विप्रीं श्रुतिधारी । त्यांतहि वेद धर्म अनुसारी ॥
त्यांत विरागी विरतीं ज्ञानी ॥ ज्ञान्यांहुनि सुप्रिय विज्ञानी ॥
प्रिय अति त्यांहुनि मानूं दासा । ज्या गति ममहि, न दुसरे आशा ॥
सत्य सत्य मी कथितो तुजला । प्रिय सेवक सम कोणि न मजला ॥
भक्तिहीन् जरि विरिंचि असला । तो प्रिय सब जीवां सम मजला ॥
जीव भक्तिमान नीच जरि महा । प्राणप्रिय मज बाणा मम हा ॥

दो० :- शुचि सुशील सेवक सुमति कोणा प्रिय ना सांग ॥
नीति कथित निगमागमीं श्रुणु सावध अशि काग ॥ ८६ ॥

सत्य, सुगम आणि वेदपुराणांनी ज्याची प्रशंसा केली आहे असा माझा अति विमल बाणा आता ऐक ॥ १ ॥ आता मी आपला सिद्धांत तुला सांगतो तो ऐक मनात ठेव सर्व सोड आणि माझी भक्ती कर. ॥ २ ॥ माझ्या मायेपासून उदभवलेल्या या संसारात कितीतरी प्रकारचे जीव आहेत. ॥ ३ ॥ मीच सर्वांना उपजविले असल्याने सर्वच मला प्रिय आहेत; त्या सर्वात मनुष्य प्राणी मला अधिक प्रिय आहेत ॥ ४ ॥ मनुष्यात ब्राह्मण, ब्राह्मणात वेद मुखोद्गत असलेले, त्यांहूनही वेद धर्मानुसार वागणारे अधिक प्रिय आहेत. ॥ ५ ॥ त्यांतही विरक्त, विरक्तांपेक्षा ज्ञानी, आणि ज्ञान्यां पेक्षाही विज्ञानी प्रिय आहेत. ॥ ६ ॥ ज्याला माझीच गती आहे, दुसरी आशा नाही त्या निजदासाला मी विज्ञानी पेक्षाही अधिक प्रिय मानतो ॥ ७ ॥ मी पुन:पुन्हा सत्य सांगतो की दासासारखा मला प्रिय कोणी नाही. ॥ ८ ॥ भक्तीहीन ब्रह्मदेव जरी असला तरी तो मला मनुष्येतर जीवांइतकाच प्रिय वाटेल. ॥ ९ ॥ आणि भक्तीमान जीव जरी महानीच असला तरी तो मला प्राणासारखा प्रिय असतो, हा माझा बाणा आहे. ॥ १० ॥ शुचि, सुशील, आणि सुमति असलेला सेवक कोणाला प्रिय वाटत नाही, सांग पाहूं वेदपुराणे अशी नीती सांगतात की हे काक सावधपणे श्रवण कर. ॥ दो ८६ ॥

एक पित्याचे विपुल कुमार । होति पृथक गुण शीलाचार ॥
पंडित कुणि तापस वा ज्ञाता । कोणि शूर धनवान् कुणि दाता ॥
कुणि सर्वज्ञ धर्मरत कांहीं । प्रीति पित्याचे सम सर्वां ही ॥
कुणि पितृभक्त वचमनकर्मां । स्वप्निंहि नेणे दुसर्‍या धर्मा ॥
प्रिय तो सुत बापा प्राणांपरि । मूर्ख सर्वपरिं तो असला जरि ॥
तसे जीव जितके ही चराचर ॥ तिर्यक् सुर नर सहित निशाचर ॥
अखिल विश्व हें मत्कृत जाणा । सर्वांवर मम दया समाना ॥
त्यांमधिं जो सोडुनि मद माया । भजे मला मन वाणी कायां ॥

दो० :- पुरुष नपुंसक नारि वा अग जग थोर किं सान ॥
सर्वभाविं भजतो छल न, तो प्रिय अति मज जाण ॥ ८७रा ॥
सो० :- सत्य सांगु शुचि दास प्रिय खग ! मजला प्राण सम ॥
त्यजुनि भरंवसा आस हें जाणुनि कर भजन मम ॥ ८७म ॥

एकाच बापाचे पुष्कळ मुलगे असले तरी ते गुण, शील, आचार यात निराळे असतात. ॥ १ ॥ कोणी पंडीत होतो, कोणी तपस्वी होतो, कोणी ज्ञाता, कोणी शूर, कोणी धनवान तर कोणी दाता होतो. ॥ २ ॥ कोणी सर्वज्ञ होतो, कोणी धर्मरत, तरी सर्वांवर बापाची प्रीती सारखीच असते. ॥ ३ ॥ कोणी एखादा वाणी – मन – व कर्माने पितृभक्त असून (पितृभक्तीशिवाय) दुसरा धर्म स्वप्नातही जाणत नाही ॥ ४ ॥ तो पुत्र जरी सर्व प्रकारे अडाणी असला तरी तो बापाला प्राणासारखा प्रिय होतो. ॥ ५ ॥ तसेच पशुपक्ष्यादि जीव, देव, मनुष्य व निशाचर यांसह जितके चराचर जीव आहेत ॥ ६ ॥ सगळे विश्व मी निर्माण केले आहे आणि सर्वांवर माझी सारखी दया आहे. ॥ ७ ॥ परंतु त्यातील जो जीव मद आणि माया (अभिमान, ममता व कपट) सोडून मनाने, वाणीने व शरीराने मला भजतो ॥ ८ ॥ तो जीव पुरुष असो, स्त्री असो, नंपुसक, लहान थोर, स्थावर – जंगम कोणी असो, जो छलकपट सोडून मला भजतो तो मला अत्यंत प्रिय होतो हे लक्षात ठेव. ॥ दो० ८७ रा ॥ हे खगा ! मी तुला सत्य सांगतो की पवित्र (अनन्यगतिक, छलहीन, निष्काम) दास मला प्राणप्रिय असतो हे जाणून सर्व आशा व (इतरांचा) भरवंसा सोडून माझी भक्ती कर ॥ दो० ८७ म ॥

काळ कधीं व्यापी ना तुजला । स्मरण निरंतर कर भज मजला ॥
प्रभु वचनामृत पानें तृप्त न । मनिं अति हर्षित रोमांचित तन ॥
तें सुख ठाउक मन कानानां । वर्णन करूं शके ना रसना ॥
प्रभु शोभा सुख कळलें नयनां । वदति कसे ते त्यां नहिं रसना ॥
बहुविध बोधुनि मज सुख दिधलें । तें शिशुकौतुक करूं लागले ॥
लोचन सजल रुक्ष मुख केलें । बघति मातृमुख फार भुकेले ॥
बघत जननि ये धावत उठुनी । घेइ हृदयिं मृदु वचनां वदुनी ॥
घेइ अंकिं देई पयपाना । रघुपति चरित ललित करि गाना ॥

सो० :- ज्या सौख्यार्थ पुरारि अशुभ वेष कृत शिव सुखद ॥
कोसलपुर नरनारि त्या सुखिं संतत मग्न अति ॥ ८८रा ॥
तेंच सौख्य लवलेश ज्यास सकृत् स्वप्निंहि मिळत ॥
गणतो तो न खगेश ब्रह्मसुखहि सज्जन सुमति ॥ ८८म ॥

तुझ्यावर काळाची सत्ता चालणार नाही तू निरंतर माझे स्मरण व भजन कर ॥ १ ॥ प्रभु वचनामृताचे पान करण्याने माझी तृप्ती झाली नाही मी मनात अति हर्षित झालो व शरीर रोमांचित झाले (पंख फुलले) ॥ २ ॥ ते सुख मन व कान यांनाच माहीत त्यामुळे वर्णन करणे रसनेला शक्य नाही. ॥ ३ ॥ प्रभुच्या त्या शोभेचे सुख कळले फक्त डोळ्यांना पण त्यांना वाचा नाही, मग ते कसे सांगू शकणार ? ॥ ४ ॥ नाना प्रकारे उपदेश करुन मला सुख दिले व प्रभु (पुन्हा) तीच शिशुलीला करुं लागले ॥ ५ ॥ डोळ्यात पाणी आणून आणि मुख सुकल्यासारखे करुन फार भुकेले झाल्यासारखे आईच्या तोंडाकडेपाहू लागले ॥ ६ ॥ हे बघताक्षणीच कौसल्या माता उठून धावत आली व कोमल मधुर वचने बोलून उचलून हृदयाशी धरले ॥ ७ ॥ मग मांडीवर घेऊन त्यास पाजले व (पाजता पाजता) रघुपतीच्या ललित लीला गाऊं लागली ॥ ८ ॥ सुखदायक कल्याणस्वरुप त्रिपुरारीने ज्या सुखासाठी अशुभ वेष धारण केला त्या सुखात अयोध्येतील नरनारी निरंतर अति मग्न असतात. ॥ दो० ८८ रा ॥ त्या सुखाचा लवलेश ज्याला एकदाच स्वप्नात जरी मिळला तरी तो सुबुद्धी सज्जन हे खगेशा ! ब्रह्मसुखालाही किंमत देत नाही. ॥ दो० ८८ म ॥

अवधिं राहुं मग काहीं काळ । पाहुं बाललीलांस रसाळ ॥
रामकृपें वर भक्ति पावलो । प्रभुपदिं नमुनि निजाश्रमिं आलो ॥
व्यापि न तैंहुनि माया मजला । जैं रघुनायक म्हणति आपला ॥
गुप्त चरित हें सकल गाइलें । हरिमायें मज जसें मोहिलें ॥
निज अनुभव वदुं अतां खगेशा । विण हरिभजन नाश ना क्लेशां ॥
श्रुणु खगराया ! रामकृपेविण । रामप्रभुता कळणें शक्य न ॥
न जाणतां परि न ये प्रतीति । विना प्रतीति न उपजे प्रीती ॥
प्रीति विना नहि भक्तिस दृढता । खगनाथा, जशि जलचिक्कणता ॥

सो० :- गुरुविण नोहे ज्ञान, ज्ञान किं होइ विरागविण ॥
गाती वेद पुराण सुख किं मिळे हरिभक्तिविण ॥ ८९रा ॥
कधिं विश्रामा ठाव तात ! सहज संतोषविण ॥
चले किं जलविण नाव मर मर केले कष्ट तरि ॥ ८९म ॥

मग मी काही काळ अयोध्येत राहीलो. प्रभुच्या रसाळ बाललीला पाहील्या ॥ १ ॥ रामकृपेने भक्तीचा वर मिळाला. मग (पाच वर्षे होताच) मी प्रभुचरणांना वंदन करुन या माझ्या आश्रमात आलो. ॥ २ ॥ जेव्हा पासून रघुनायकांनी मला आपला म्हंटला तेव्हापासून प्रभुची माया मला व्यापू शकली नाही. ॥ ३ ॥ हरिमायेने मला ज्या प्रकारे मोहित केला ते सर्व गुप्त चरित्र मी सविस्तर सांगीतले ॥ ४ ॥
भुशुंडीचा निज अनुभव - आता खगेशा मी स्वत:चा अनुभव सांगतो हरिभजनाविना क्लेशांचा नाश होत नाही. ॥ ५ ॥ खगराजा ऐक, रामकृपेविण रामाचा प्रभाव कळणे शक्य नाही. ॥ ६ ॥ प्रभाव जाणल्याशिवाय विश्वास बसत नाही आणि विश्वासावाचून प्रीती उत्पन्न होत नाही ॥ ७ ॥ आणि प्रीतीवाचून भक्तीला दृढता येत नाही. जसे हे खगनाथा (स्नेहावाचून तेल, तुपाशिवाय) पाण्याचा चिकटपणा दृढ नसतो. ॥ ८ ॥ गुरुशिवाय ज्ञान कधी होते काय ? वैराग्याशिवाय ज्ञान मिळते काय ? (कधीच नाही) तसेच वेद पुराणे वर्णन करतात की हरिभक्ती वाचून सुख कधी मिळते काय ? (नाही) ॥ दो० ८९ रा ॥ हे तात ! सहज संतोषाशिवाय कधी विश्राम मिळतो काय ? मरे मरे पर्यंत कष्ट केले तरी जलाशिवाय नाव चालते काय ? (नाही) ॥ दो० ८९ म ॥

काम न नाशति संतोषविण । काम तिथें सुख भासे स्वप्निं न ॥
रामभजनविण काम न मरती । स्थलावीण तरु कधीं उगवती ॥
विज्ञानाविण समता ये ना । नभावीण अवकाश असेना ॥
श्रद्धेवीण धर्म कधिं न घडे । महीवीण कधिं गंध सांपडे ॥
तेज तपाविण कधिं कीं पडते । रस किं जलाविण जगी खगपते ॥
बुध सेवेविण शील किं मिळतें । प्रभु ! तेजाविण रूप किं दिसतें ॥
स्थिर मन कीं निज सौख्यावीण । स्पर्श किं होइ समीर विहीन ॥
कवणहि सिद्धि किं विश्वासाविण । भवभयनाश न हरिभजनाविण ॥

दो० :- विश्वासाविण भक्ति ना द्रवति न तीविण राम ॥
स्वप्निंहि रामकृपेविण जीवा नहि विश्राम ॥ ९०रा ॥
सो० :- हें जाणुनि मति धीर त्यज कुतर्क संशय सकल ॥
भज हि राम रघुवीर करुणाकर सुंदर सुखद ॥ ९०म ॥

संतोषाविना कामांचा नाश होत नाही. आणि जिथे इच्छा आहे तिथे सुख स्वप्नात सुद्धा दिसणार नाही ॥ १ ॥ राम भजनाशिवाय कामना – नाश नाही. स्थलाशिवाय झाडे कधी उगवतात काय ? ॥ २ ॥ जसे आकाश अवकाशावाचून नसते तसे विज्ञानविना समता येत नाही ॥ ३ ॥ श्रद्धेविना धर्म घडत नाही, तसे भूमी विना गंध नाही ॥ ४ ॥ तपाशिवाय कधी तेज पडते काय ? हे खगपते या जगात जलतत्वाशिवाय रस कसा असेल ? ॥ ५ ॥ संतांची सेवा केल्याशिवाय शील मिळते काय ? स्वामी तेज तत्वाशिवाय रुप दिसते काय ? ॥ ६ ॥ आत्मसुखावाचून मन कधी स्थिर झाले आहे काय ? आणि वायू वाचून कधी स्पर्श अनुभवता येतो कां ? ॥ ७ ॥ विश्वासाशिवाय कोणतीही सिद्धी मिळते काय ? हरिभजनाशिवाय भवभयनाश होत नाही. ॥ ८ ॥ विश्वासाविण भक्ती नाही, तिच्यावाचून राम द्रवत नाहीत, आणि रामकृपेशिवाय जीवाला स्वप्नांत सुद्धा विश्राम मिळत नाही. ॥ दो० ९० रा ॥ हे जाणून हे धीरबुद्धी ! सर्व कुतर्क आणि संशय सोडून करुणाकर सुंदर व सुखदायक श्री रघुवीर रामाला भजा ॥ दो० ९० म ॥

वर्णित मी हा नाथ यथामति । प्रभुचा प्रताप महिमा खगपति ॥
युक्ति विशेषें जरा न कथिला । हा सब निज नयनीं अनुभविला ॥
महिमा नाम रूप गुण गाथा । सकल अमित अंत न रघुनाथा ॥
निज निजमति मुनि हरिगुण गाती । निगम शेष शिव पार न जाती ॥
आपणादि खग बहु मशकान्त । गगनीं उडती पावति नान्त ॥
रघुपति महिमा अगाध तेवीं । ठाव कोण कधिं पावे केवीं ॥
राम काम शत कोटि सुभग तन । दुर्गा कोटि अमित अरिमर्दन ॥
शक्र कोटिशत सदृश विलासहि । नभ शत कोटि अमित अवकाशहि ॥

दो० :- मरुत कोटि शत विपुल बल रवि शत कोटि प्रकाश ॥
शशि शत कोटि सुशीतल सब भवभयहर खास ॥ ९१रा ॥
काल कोटि शत सदृश अति दुस्तर दुर्ग दुरन्त ॥
धूमकेतु शत कोटि सम दुराधर्ष भगवन्त ॥ ९१म ॥

हे नाथ ! हे खगराजा ! प्रभुच्या प्रतापाचा महिमा मी यथामति वर्णन केला ॥ १ ॥ यात मी काहीसुद्धा युक्तीने फुगवून वाढवून सांगीतले नाही. हा सर्व मी आपल्या डोळ्यांनी अनुभवला आहे ॥ २ ॥ रघुनाथाचा महिमा नाम, रुप, गुण यांच्या कथा सर्वच अपार व अनंत आहेत ॥ ३ ॥ जरी वेद, शेष, शिव यांना सुद्धा अंत पार लागत नाही तरी मुनी आपापल्या बुद्धी प्रमाणे हरिगुण चरित्रादि गातातच. ॥ ४ ॥ तुमच्या पासून मशका पर्यंतचे सर्व खग आकाशात उडतात पण आकाशाचा अंत कोणासच लागत नाही. ॥ ५ ॥ तसाच रघुपतीचा महिमा अपार आहे, त्याचा ठाव कोण कधी पावू शकेल ? ॥ ६ ॥ श्रीराम शरीराने शेकडो कोटी कामदेवांसारखे सुंदर आहेत आणि अनंत कोटी दुर्गाप्रमाणे अनंत शभूंचा संहार करणारे आहेत. ॥ ७ ॥ शेकडो कोटी इंद्रासारखे भोगविलास आहेत शेकडो कोटी आकाशाएवढा अवकाश त्यांच्यात आहे ॥ ८ ॥ शेकडो कोटी मरुतासारखे विपुल बळ आहे शेकडो कोटी सूर्यासारखा त्यांचा प्रकाश आहे. शेकडो कोटी चंद्रासारखे अत्यंत शितल व विशेष करुन सर्व भवभयाचे हरण करणारे आहेत. ॥ दो० ९१ रा ॥ शेकडो कोटी काळासारखे दुस्तर, व दुरंत आहेत आणि ते शेकडो कोटी धूमकेतूसारके दुराधर्ष भगवान आहेत. ॥ दो० ९१ म ॥

प्रभु अगाध कोटी पाताल । शमन कोटिशत सदृश कराल ॥
अमित कोटि तीर्थासम पावन । नाम अखिल अघपूग विनाशन ॥
हिमगिरि कोटि अचल रघुवीर । सिंधु कोटि शत सम गंभीर ॥
कामधेनु शत कोटि समान । सकल काम दायक भगवान ॥
अमित कोटि शारदा चतुरता । विधि शत कोटि सृष्टिनिपुणता ॥
विष्णु कोटि सम पालन कर्ता । रुद्र कोटि शत सम संहर्ता ॥
धनद कोटि शत सम धनवान । माया कोटि प्रपंच निधान ॥
भारधरण शतकोटि अहीश्वर । प्रभुनिरवधि निरुपम जगदीश्वर ॥

छं० :- निरुपम, न उपमा आन, राम चि राम सम वदती श्रुती ।
सम कोटिशत खद्योत रवि वदतां जशी लघुता अती ॥
या रीतिं निज निज मति विलासें हरिस मुनिवर वानिति ।
प्रभु भाव घेति कृपाल अति प्रेमें श्रवुनि सुख मानिति ॥
दो० :- राम अमित गुण सागर लागे थांग कुणास ॥
जसे सत्संगीं समजलें तसें कथित आपणांस ॥ ९२रा ॥
सो० :- भाव वश्य भगवान सुखनिधान करुणायतन ॥
विण ममता मद मान भजा सदा सीतारमण ॥ ९२म ॥

प्रभु अनेक कोटी पाताळासारखे अगाध आहेत शेकडो कोटी यमराजासारखे कराल आहेत ॥ १ ॥ अगणित कोटी तीर्थासारखे पावन करणारे असून त्यांचे नाम संपूर्ण पातक समूहांचा विनाश करणारे आहे. ॥ २ ॥ कोटी हिमालय पर्वतासारखे रघुवीर अचल आहेत आणि शेकडो कोटी सागरासारखे गंभीर आहेत. ॥ २ ॥ भगवान शेकडो कोटी कामधेनूसारखे सकल कामना पूर्ण करणारे आहेत. ॥ ४ ॥ अमित कोटी शारदांसारखी चतुरता त्यांच्या ठायी आहे शेकडो कोटी ब्रह्मदेवाप्रमाणे सृष्टी निर्माण करण्याची निपुणता आहे ॥ ५ ॥ अनेक कोटी विष्णूसारखे पालन करणारे व अनंत कोटी रुद्राप्रमाणे ते संहार करणारे आहेत. ॥ ६ ॥ श्रीरघुनाथ शेकडो कोटी कुबेरासारखे धनवान आहेत आणि कोटी मायांच्या सारखे प्रपंचाचे निधान आहेत. ॥ ७ ॥ भार धारण करण्यात ते शेकडो कोटी शेषांसारखे आहेत. (सार हे की) प्रभु रघुनाथ जगदीश्वर असून सीमारहित व उपमारहित आहेत. ॥ ८ ॥ श्रीराम उपमारहित असून, त्यांना दुसरी उपमाच नाही रामच रामासारखे असे वेद सांगतात शतकोटी काजव्यासारखा रवी आहे असे म्हणण्यात जसे सूर्याला कमीपणा आहे (तसेच हे सर्व वर्णन समजावे) याप्रमाणे मुनीश्रेष्ठ आपल्या बुद्धी वैभवानुसार श्रीहरीचे वर्णन करतात पण प्रभु अति कृपालु व भाव घेणारे (ग्राहक) आहेत (म्हणुन) प्रेमाने ऐकतात व सुख मानतात ॥ छंद ॥ श्रीराम अगणित गुणांचा सागर आहेत, त्याचा थांगपत्ता कोणाला लागला आहे काय ? संतांच्या जवळ सत्संग – श्रवणात जसे मला समजले तसे मी आपल्याला सांगीतले ॥ दो० ९२ रा ॥ भगवान सुखाचे आगर व करुणेचे माहेरघर असून भावाला वश होणारे आहेत. म्हणून ममता, गर्व, मान सोडून सीतारमणाला नेहमी भजा ॥ दो० ९२ म ॥

* * * * *

श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु

GO TOP